कोबीची खरेदी


    बरीच वर्षं होत आली असतील त्या घटनेला. पुढचं वाक्य ओळखण्याचा प्रयत्न करायची चूक करू नका. ‘आजही अगदी कालच घडल्यासारखी लख्ख आठवत’ असायला ती घटना म्हणजे काही अनेक वर्षांच्या विरहानंतर आयफेल टॉवरच्या माथ्यावरचं एक घट्ट आलिंगन किंवा तत्सम काही अजिबात नव्हती. आईने मला भाजी आणायला पाठवलं होतं, इतकंच. माझ्या अपुऱ्याच राहिलेल्या निद्रेकडे आर्जवं करत असलेल्या माझ्या इंद्रियांसाठी आईचा तो आदेश म्हणजे एक कोसळत्या विजेसारखा आघात होता. पण तरीही मी शहाण्या मुलासारखा माझी ब्रिटिश लायब्ररीकडून भेट मिळालेली पिशवी घेऊन बाहेर पडलो. कधी नव्हे ते लंडन सकाळच्या कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत शांतपणे पहुडलेलं होतं. 

    माझं भाजीचं दुकानही ठरलेलं असतं, आणि पूर्वी एकदा कधीतरी माझ्याकडून मला तिथे जायला खूप आवडतं असं आईला सांगण्याचा गाढवपणा घडलेला असतो आणि तेव्हापासून भाजी आणायचं काम माझं असतं. पण मला खरंच तिथे जायला आवडतं; त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथे कायम खूप भन्नाट लोक भेटतात. माझ्या काही अत्यंत जवळच्या मित्रमैत्रिणींशी माझी गाठ या दुकानात भेटलेल्या लोकांनी घालून दिली आहे. तर सांगत काय होतो, की त्या दिवशी आईने मला असंच भाजी आणायला पाठवलं. मला भाजीची पारख वगैरे फारशी नाहीच आहे, पण तिथले लोक पुष्कळदा मदत करतात. एक कोबी तेवढा मला चांगला घेता येतो, कारण तो पाहून घेण्याची शिकवणी मला खूप लहानपणीच तिथे खरेदीला आलेल्या एका बाईंनी दिली होती. तेव्हापासून मी भाजी आणायला गेलो की काही ठरलेल्या भाज्यांसोबत कोबीही ऐटीत घेतो आणि आजूबाजूच्या लोकांना मोठं कौतुक वाटतं. खूश होऊन ते मग मला तिसरीच कुठलीतरी भाजी घ्यायला मदत करतात. मग मी घरी आणलेल्या ठरलेल्या भाज्या, ती नवी भाजी आणि कोबी असं सगळं निवडत आई कुतूहलाने माझे अनुभव ऐकत बसते, आणि नंतर त्या नवीन भाजीसाठी यूट्यूब उघडते. 

तसंच त्या दिवशी मी दुकानात शिरल्यानंतर प्रथम ठरलेल्या सगळ्या भाज्या क्रमाक्रमाने घेऊन टाकल्या. यानंतर कोबी, पण तो एकदम घेऊन टाकायच्या ऐवजी कोणी लोक आजूबाजूला आहेत का नाही ते मी बघून घेतो. भाज्यांच्या त्या रांगेत मला थोड्या अंतरावर एकदम एक वयस्कर काका दिसले. हातात काठी, डोक्यावर ती एक गाडीच्या चाकाखाली आल्यासारखी दिसणारी टोपी आणि मोठा तपकिरी ओव्हरकोट. त्यांना काय घ्यायचं होतं ते काही त्यांच्याकडे पाहून कळत नव्हतं. मी हळूच त्यांच्या जवळ गेलो, आणि ते जरा चौकस नजरेने इकडेतिकडे पाहत असताना सगळ्या ढिगाऱ्यातून एक मस्त कोबी सराईतपणे उचलून माझ्या पिशवीत टाकला. माझ्या अपेक्षेप्रमाणेच, माझी कामगिरी त्यांच्या नजरेतून सुटली नव्हती. दोनतीन क्षण ते नुसते माझ्याकडे पाहत उभे राहिले. मग ते मोठ्याने हसत हसत त्यांच्या काठीवर रेलले. म्हणजे लोक करतात तसं कौतुकाचं स्मितहास्य वगैरे नाही बरं का. ते व्यवस्थित खिदळतच होते. आणि तेही इतक्या मजेने की मला चुकून मी दिखाव्याचा प्लॅस्टिकचाच कोबी उचलला की काय अशी धास्ती वाटली. या दुकानाची ही एकमेव वाईट खोड आहे. 

पण तसं काही नव्हतं. कारण मग हसणं थांबवून ते म्हणाले, “अहाहा, काय छान सुरुवात झाली दिवसाची! आधी येताना ते मांजर ट्राफल्गारच्या कारंज्यात पडताना दिसलं आणि आता हे! अरे बेटा, किती चुणचुणीत आहेस तू! तू या कौशल्यावर कुणाचातरी खास कोबी निवडण्याचा सहाय्यक होऊ शकशील. नाहीतर थांब! आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये कोबी निवडण्याची स्पर्धा तर ते घेतीलच. आपण तुझं नाव नोंदवू!”

आत्तापर्यंत माझं इतकं तोंड भरून कौतुक कधीच झालं नव्हतं, त्यामुळे मी खूश. मग पुढची काही मिनिटं आम्ही मिळून त्या ट्राफल्गारच्या कारंज्यातल्या मांजरावर हसून घेतलं आणि एकत्रच दुकानाबाहेर पडलो. 

त्यांनी मला नाव विचारलं. तेव्हा मला उगाच माझं पूर्ण नाव सांगायची सवय होती. मी तसं सांगितल्यावर ते पुन्हा हसले आणि म्हणाले ते बरेच दिवस माझ्याच मागावर होते, आता पूर्ण नावामुळे कुठूनही शोधून काढता येईल. मग मी त्यांना काय म्हणू असं विचारलं. 

“सगळे मला प्लम म्हणतात. हो ना, पण त्यांना कुठे काय कळतं? नाव कसं तुझ्यासारखं स्पष्ट आणि पूर्ण घेतलं पाहिजे. माझं नाव पेल्हम ग्रीन वूडहाऊस. पण तू मला प्लमकाका म्हटलंस तर मला छान वाटेल. आज काय सुट्टी का?”

“हो,” मी म्हणालो. “मी खरंतर तुमचं नाव ऐकलंय. माझे एक भाईकाका आहेत; ते मला लहानपणी खूप गोष्टी सांगायचे. खूप विनोदी गोष्टी. आणि ते म्हणाले होते बऱ्याचदा की तुम्ही त्यांना खूप हसवलं असं. पण कसं? तुम्ही त्यांना कसे ओळखता?”

“नाही रे मी ओळखत. असायला पाहिजे होतं. मीपण गोष्टी सांगतो. त्यातल्या काही त्यांनी ऐकल्या असतील.” ते म्हणाले. “आणि लहानपणी म्हणजे काय रे शहाण्या? आत्ता तू काय मोठा आहेस का? फक्त कोबी घेता आला म्हणजे मोठं झालं असं नसतं!”

एरवी कोणी माझी अशी थट्टा केलेली मला खपत नाही. पण या काकांकडून मात्र ती मला चालवून घ्यावी लागली. मी जर चिडून काही बोललो असतो तर त्यांनी त्याचीही थट्टा केली असती असं मला तेव्हा वाटलं, म्हणूनही असेल. 

“बरं, मग तुला सुट्टी आहे आणि गोष्टी ऐकायला आवडतात ना?” ते पुढे म्हणाले. “मीच तुला सांगितल्या असत्या, पण आज मी माझ्या एका मित्राला भेटणार आहे. तो माझ्यापेक्षाही छान गोष्टी सांगतो असं त्याला वाटतं. तर चलतोस का माझ्याबरोबर? आज संध्याकाळी. त्याच्या गोष्टी ऐकूया, मग मी तुला माझ्या सांगीन, मग तू ठरव कोण जास्त चांगलं सांगतं ते.”

मी लगेच हो म्हणालो, पण तेवढ्यावर अर्थातच भागणार नव्हतं. ते मला घरी पोचवायला आले आणि मी नंतर अर्धाएक तास त्यांना माझ्या आईशी बोलताना ऐकत होतो. ते काही का असेना, आई हो म्हणाली आणि संध्याकाळी सहा वाजता ते मला घ्यायला आले. 

आम्ही एका बारमध्ये गेलो आणि काचेच्या खिडकीशेजारी दोन गुबगुबीत आरामखुर्च्यांमध्ये बसलो. त्यांनी माझ्यासाठी एक सरबत घेतलं आणि स्वतःसाठी एक ड्रिंक घेतलं. तेव्हा मी त्याची चव मागू नये म्हणून त्यांनी माझं सरबत किती फालतू आणि बेचव आहे; त्यांना ते नकोच असं सांगितलं. मग मीही जरा चिडून ‘मलाही तुमचं नको’ असं म्हणालो. मग आम्ही त्यांच्या मित्राची वाट बघत बसलो. तो येईपर्यंत मी काकांना या बारच्या नावाचा अर्थ विचारला. “अँग्लर्स रेस्ट म्हणजे मासे पकडणाऱ्यांची विश्रांतीची जागा,” असं त्यांनी सांगेपर्यंत त्यांचा मित्र आला आणि त्याची मोठी छत्री मिटून त्याने ती हुकवर अडकवून ठेवली. बारमधल्या बाकीच्या काही लोकांनी त्यांच्याकडे पाहून उत्साहाने हात हलवला. 

“इथल्या सगळ्यांना यांच्या गोष्टी खूप आवडतात,” असं काका म्हणाले. “Son, Meet Mr. Mulliner.”

तोपर्यंत कोणीतरी तोतरं बोलणाऱ्यांचा विषय काढला आणि त्यावरून मलिनरसाहेबांना त्यांचा कोणीतरी नातेवाईक जॉर्ज आठवला आणि त्याची एक गोष्ट सांगण्यात ते रंगून गेले. मी माझं सरबत पीत ती ऐकायला लागलो. काका अधूनमधून माझ्याकडे पाहून हसत होते. त्यांची गोष्ट चालू असताना बाहेर रिमझिम पाऊस पडायला लागला. आधीच अंधार झालेलाच होता, त्यामुळे बारमधल्या सगळ्यांनी आपापल्या टेबलावरचे दिवे लावले. बारच्या अगदी वरचा एक मोठा दिवा मलिनरसाहेबांच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकत होता. बारमध्ये सर्वत्र शांतता होती; फक्त त्यांचा आवाज आणि पार्श्वभूमीला बाहेरच्या दगडी फुटपाथवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज एवढंच शिल्लक होतं. काकांनी मला मघाशीच त्यांचा मोठा ओव्हरकोट दिला होता आणि आता मी त्यात गुरफटून माझ्या आरामखुर्चीत बसलो होतो. काचेवरून हळूहळू ओघळणारं पाणी बघत जॉर्जची गोष्ट ऐकत होतो. 

हीच ती घटना. तिला आता बरीच वर्षं झाली. त्यानंतर कधीतरी मी काकांकडे त्यांच्या गोष्टी सांगायचा आग्रह केला, पण त्याऐवजी त्यांनी पुन्हा माझी त्यांच्या एका मित्राशी भेट घालून दिली. त्यानंतर मी एकटाच बर्टीकडे जायला लागलो आणि मोठं झाल्यावर त्याच्या क्लबमध्येही जायला लागलो. बर्टीमुळेच माझी पॉंगो ट्विस्टल्टन, मॉन्टी बोडकीन, स्टॅन्ली उक्रीज, पॉंगोचे काका लॉर्ड इकेनहॅम, बर्टीची आत्या डाहलिया अशा अनेकजणांशी ओळख झाली. बराच काळ या सगळ्यांसोबत काढताना मला प्लमकाकांची अधूनमधून आठवण यायची, पण ते फारसे कधी भेटलेच नाहीत. मग एकदा अचानक मी त्यांना त्याच भाजीच्या दुकानात पुन्हा गाठलं. ते आधीपेक्षा हळू चालत होते आणि त्यांना मी एकदम ओळखू आलो नाही. पण मी पुन्हा माझं पूर्ण नाव सांगितल्यावर ते तसेच पूर्वीसारखे हसले आणि आम्ही पुन्हा एकत्रच बाहेर पडलो. 

तीही लंडनमधली एक थंडगार सकाळ होती. आम्ही ट्राफल्गार चौकात एका बाकावर जाऊन बसलो. सुरुवातीचा बराच वेळ आम्ही त्यांच्या एका गॉल्फर मित्राबद्दल बोलत बसलो. त्याच्या आधीच्या वर्षी पॉंगोच्या काकांनी माझी आणि त्यांची भेट घडवून आणली होती. 

“काय रे, भारतातही जातोस ना अधूनमधून?” त्यांनी विचारलं. “नंतर भेटलास का तुझ्या भाईकाकांना?”

“हो, बऱ्याचदा भेटलो. ते आमच्या सगळ्या फॅमिलीचे दोस्त आहेत; बऱ्याचदा घरी येऊन जातात.” मी सांगितलं. “मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला भेटलो ते.”

“अरे वा! काय म्हणाले मग ते?”

“खूप काहीकाही सांगितलं त्यांनी मला तुमच्याबद्दल,” मी जरासं गंभीर होऊन म्हणालो. “ते म्हणाले लहानपणी फक्त गमतीजमती सांगायचो, आता काही इतरही गोष्टी तुला कळायला हव्यात.” 

प्लमकाका दचकून माझ्याकडे पाहत होते. “मी कधीतरी कुठल्याशा जंगलात उंदीर समजून मोर मारला असं काहीतरी सांगितलं की काय त्यांनी?”

हे ऐकून क्षणभर माझा आधीचा विचारच मी विसरलो, पण मग घाईघाईने मान हलवली. “नाही, तसं काही नाही.”

“मग ठीक आहे. मी तरी उंदीर कशाला मारायला जाईन?”

“काका, मी जर्मनीबद्दल बोलतोय,” मी म्हणालो. तेही एकदम गंभीर झाले. “मी हे सगळं ऐकलं तेव्हा सहनच नाही झालं मला. असं कसं वागू शकले ते तुमच्याशी? आणि परत या तुमच्या इंग्लंडनेही अशी कशी शंका घेतली तुमच्यावर? या दोन्हींबद्दल मनात चीड दाटून आली हे ऐकल्यावर. राग येतो या सगळ्याचा.”

“येतो का? मग माझ्यावाटचाही थोडा येऊ देत. मला तर काही येत नाही आता,” ते शांतपणे म्हणाले. “तुझ्या भाईकाकांनी तुला हे सगळं सांगितलं, तेव्हा या सगळ्यावर माझी प्रतिक्रिया काय होती तेही सांगितलं असेल. मला कुठल्याही एका गटाचा सामूहिक राग येत नाही. काय करायचंय? त्यांनी तेव्हा मला दिला त्रास, कबूल. पण आत्ता तो विचार करून मी माझी ही छानशी सकाळ खराब करणार नाहीये. तूही करू नकोस. ते बघ ते मांजर त्या कारंज्याच्या जवळून चाललंय. पडतं की काय आत!”

मला हसू आलं. काहीच बदललेलं नसल्यासारखं वाटत होतं. “पूर्वी आपण अगदी कशाची फिकीर नसल्यासारखे हास्यविनोद करत बसायचो. पण आता मला राहूनराहून ते आठवतं आणि मग हसू आलं तरी मी अपराधी असल्यासारखं वाटतं.”

“का वाटतं? का वाटायला हवं? हसण्यासारखं सगळं संपलं का जगातलं? ठीक आहे, त्यांनी मला तो खूप त्रास दिला वगैरे सगळं झालं. त्या दिवसांतही मी हसण्यासाठी काहीतरी शोधायचो आणि तेवढ्यापुरतं मला बरं वाटे. आत्ताही मी तेच करतोय. ते बघ ते मांजर आत पडलं.”

“म्हणजे तुमचा मुद्दा असा आहे, की संकटकाळातही आपण हसण्यासाठी काहीतरी शोधून काढू शकतो, कारण जगात हसण्यासारखं काही उरलं नाहीये असं कधीच नसतं, आणि आपण तसं केलं तरच आपण आनंदी राहू शकतो?”

“नाही ना. माझा मुद्दा एवढाच आहे, की आत्ता समोर ते मांजर बघ पाण्यात कसं केकाटत बसलंय, तर तत्त्वज्ञान पाजळणं बंद कर आणि समोर बघून हास!”

ते एवढं म्हणतायत म्हणून मी समोर बघून खदाखदा हसलो. हसायची इच्छा तर कधीपासून होती, पण मी एक गंभीर विषय घेऊन आलेलो असल्याने जरा मोठ्या समजूतदार माणसासारखा वागायचा प्रयत्न करत होतो. पण शेजारी प्लमकाका एका मांजराची धडपड पाहून लहान मुलासारखे मोठमोठ्याने हसत असताना आपण मोठेपणाचा आव आणून काय करतोय ते मला कळेना, म्हणून मी सोडून दिलं. 

“तुम्ही, तुमच्या गोष्टी, आणि तुमचे सगळे मित्र, सगळ्यांनी मला खूप हसवलंय,” मी मनापासून म्हणालो. “असं कायम व्हायचं की मला जरा उदास वाटलं की मी लगेच या एकाला भेटायचो आणि ते मला सगळं विसरायला लावायचे. याच्याइतका चांगला उपाय मला दुसरीकडे कुठेच सापडला नाही. त्यामुळे आता मला जरा उदास वाटलं किंवा कशाची चिंता वाटली, तर तुम्ही सगळे आहातच, याचं फार बरं वाटतंय.”

“असं म्हणतोस?” ते म्हणाले. “मग आम्हाला उदास वाटल्यावर, कशाची चिंता वाटल्यावर आम्ही कुठे जायचं? तुझ्याकडे? पण तुला तर कारण नसताना वाईट गोष्टींवर विचार करायची खोड. म्हणजे त्या गोष्टीने प्रत्यक्ष जितकं छळलं ते काय कमी म्हणून पुन्हा तू त्याच्या आठवणीने छळायला लावणार? मला नाही बुवा भेटायचं मग तुला.” असं म्हणून ते पुन्हा मोठ्याने हसले. 

मग ते पुढे म्हणाले, “बाळा, मी तुला कायम हसवू शकेन. आत्ता तर प्रत्यक्षात, आणि मी नसेन तेव्हा तू माझ्या मित्रांना भेटत राहू शकतोस. तेही नसतील तेव्हा तू आमच्या सगळ्यांच्या आठवणीनेही हसत राहू शकतोस. आणि तुझे भाईकाका आहेतच की. पण असा विचार कर ना, की तुला जर स्वतःलाच हसवता आलं, तर काही गरजच पडणार नाही या सगळ्यांची. ते तुला खरंच जमलं तर मग आम्ही उरलो तोंडी लावण्यापुरते. आता तूच सांग, मांजर कारंज्यात धबकन पडलं होतं याच्या आठवणीने तू जास्त हसशील, का ते प्रत्यक्ष घडताना पाहून? अरे, मी तर माझं सुदैवच म्हणेन, की माझ्यावर क्वचितच काहीतरी विनोदी आठवून हसायची वेळ आली. तू जर जरा लक्ष देऊन इकडेतिकडे पाहत गेलास, तर तुला ढिगाने गोष्टी सापडतील. मी बघ की, मी आलो होतो भाजी घ्यायला आणि एका मुलाने माझ्यासमोर इतक्या ऐटीत कोबी उचलला माहितीय? त्याला जो एक अभिमान होता ना त्याच्या हुशारीचा… ते पाहिल्यावर ते मांजर म्हणजे किस झाड की पत्ती!”

मी हसायला लागलो. 

आजही तो प्रसंग, आणि त्याच्या आधीचे अनेक असे प्रसंग आठवून मला मनापासून हसू येतं आणि खूप बरं वाटतं. तेव्हा मी प्लमकाका नसले तरी बर्टी आणि मलिनरच्या मात्र कायम संपर्कात राहायचं असा संकल्प केला होता. पण तसं जमत नाही हो. प्रत्येकवेळी, प्रत्येक उदास करून टाकणाऱ्या ओझरत्या क्षणी उर्वरित संध्याकाळ थेट यांच्यासोबत घालवण्याची मुभा नाही मिळत. आणि दरवेळी हसायला काहीतरी सापडतंच असंही नाही, पण तरी काकांचं ‘जगात हसण्यासारखं काही उरलंच नाहीये असं कधीच होत नाही,’ हे वाक्य खोडून काढावं असं मला कधीच वाटलं नाही. या एकाच विश्वासावर ते सगळीकडे हसण्यासारखं काहीतरी शोधत राहिले, सापडेल ते इतरांना दाखवत राहिले, त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या दिवसांमध्ये, लॉर्ड इकेनहॅमच्या शब्दांत ‘sweetness and light’ भरत राहिले. त्यांनी मला खूप हसवलं हे तर खरंच, पण मला हसायला शिकवलं हे त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त मौल्यवान.   

 

Comments

Post a Comment