माय
“हो, आहे ना माझा एक ब्लॉग. मी लिहितो माझ्या प्रवासांबद्दल, अनुभवांबद्दल, डोकं फिरवणाऱ्या आधिभौतिकातल्या प्रश्नांबद्दल…” “ओह!!!” “त्यावरच्या नव्वद टक्के गोष्टी मराठीत आहेत,” “ओह….” अर्थातच, वरच्या दोन्ही ‘ओह’ मध्ये फरक असतो. उत्कंठेच्या फुग्याला टाचणी लावायच्या आधीचा आणि नंतरचा असे ते दोन उद्गार असतात. हा संवाद अगदी अशाच प्रकारे मी पुण्यातच एका नव्या नोकरीला लागल्यापासून चारपाच वेळा तरी घडला असेल. गेल्या काही वर्षांत मी माझी हे सांगण्याची शैली पुष्कळ सुधारली होती; नुसतंच “माझा ब्लॉग आहे. वाचा हं!” असं म्हणायच्या ऐवजी त्यांना आधीपासून रस असलेल्या एखाद्या विषयावर जरा चर्चा करून मग “यावरच मीही काहीतरी लिहिलंय,” असं म्हणून त्यांना उद्युक्त करण्याची कला मला आता जमली आहे. सुदैवाने या नव्या नोकरीच्या ठिकाणी आधिभौतिकात रस असलेले खूप जण निघाले म्हणून त्यांना वाचकांच्या गर्दीत आणणं सोपं झालं, पण काही क्षणांपुरतं. बहुतांश गोष्टी मराठीत आहेत हे ऐकल्यावर त्यांचा उत्साह ओहोटीसारखा ओसरताना मी पाहू शकत होतो. अर्थात यात त्यांची काही चूक नव्हती कारण मराठी त्यांच्यापैकी काहींची मातृभाषा नव्...