भिंगरी

  “काय मग, ओलांडून जाऊया ना?”

मी हलकेच मान डोलावली. दोन्ही बाजूंना उंच, हिरव्यागार झाडांची गर्दी, पुढे दूरवर कुठेतरी चालायला आलेल्या इतर लोकांचे अस्पष्ट होत जाणारे आवाज, आणि झाडांच्या सळसळणाऱ्या पानांमधून मध्येच आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून देणारा सूर्य. अशा वातावरणात मी आणि माझा दोनच मिनिटांपूर्वी ओळख झालेला नवा चिनी मित्र आणि समदुःखी, आमच्या समोरच्या वाटेवर शांतपणे पहुडलेल्या एका अजस्त्र घोरपडीकडे बघत उभे होतो. हाच माझा मित्र, मघाशी या वाटेने वेगात जॉगिंग करत येत असताना मला मध्येच थांबलेलं बघून गाडीने गचकन ब्रेक मारावेत तसा थांबलेला असतो आणि थांबताथांबता त्याने माझी “यशवंती, जरा वाटेतून बाजूला होतेस का?” ही अभिव्यक्ती कुतूहलाने ऐकलेली असते. माझी सांस्कृतिक मुळं अशी भलत्या ठिकाणी डोकं वर काढत असतात. 

हा माझा चिनी दोस्त माझ्यापेक्षा सर्वार्थाने वेगळा असतो. एकतर कुठल्यातरी कार्यालयात किंवा फूड कोर्टमध्ये भेटला असता तर त्याने सहज मला ‘बाळा’ असं संबोधलं असतं, इतकं आमच्या वयात अंतर होतं. दुसरं म्हणजे ‘सकाळी व्यायामासाठी चालायला जाणे’ या धर्माचा तो अगदी एकनिष्ठ उपासक दिसत होता. त्याने एक नायलॉनची शॉर्ट्स, बहुधा पुढे चालणाऱ्या लोकांना तो लांबून येताना दिसावा म्हणून एका भडक तांबड्या रंगाचा जाळीदार नायलॉनचा बाह्या नसलेला शर्ट आणि तिथल्या भूप्रदेशाला अनुकूल असे बूट घातलेले होते. शिवाय एका दंडावर त्याचे हृदयाचे ठोके, ऑक्सिजन आणि अशा इतर बऱ्याच गोष्टी स्वेच्छेने मोजत बसणारं कुठलंसं उत्साही यंत्र आणि दुसऱ्या दंडावर वेल्क्रोने बांधून ठेवलेली एक चपटी आयताकार पाण्याची बाटली असं सगळंही होतं. मी मात्र माझी ठरलेली ट्रॅकपँट, एक आठवड्याभरात झोपताना घातला न गेलेला टीशर्ट आणि सगळीकडे वापरायचो तेच बूट घालून माझ्या पाठीवर एक लिटरची माझी नेहमीची बाटली घेऊन उभा होतो. एरवी अशाच एखाद्या वाटेवर क्षणभर हसणे आणि एकमेकांना वाट करून देणे यापलीकडे आम्ही गेलोही नसतो; पण इथे या घोरपडीने आम्हाला काही मिनिटं का होईना, पण एकाच नावेतले प्रवासी बनवलं होतं. 

“समोरून का शेपटाकडून?”

खरं तर यात विचारण्यासारखं काहीच नव्हतं आणि हे त्यालाही ठाऊक होतं, कारण त्याने असं विचारल्यावर आमची क्षणभरच नजरानजर झाली आणि मग आम्ही दोघंही एकदमच त्या घोरपडीच्या शेपटाच्या बाजूने अर्धवट उडी मारत तिला ओलांडून पुढे आलो. हे झाल्यावर डान्स पार्टनर असल्यासारखे एका तालात पाच पावलं चालत पुढे गेलो आणि मग एकदमच मागे वळून बघितलं. ती घोरपड अजिबात हललेली नव्हती, पण मला लांबून तिच्या चेहऱ्यावर उगीचच, बऱ्याच प्राण्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तो ‘मनुष्यप्राण्याच्या बालिशपणापुढे हात टेकले’ असा भाव दिसल्याचा भास झाला. मग मी आणि माझ्या दोस्ताने एकमेकांकडे मोकळेपणाने हसून पाहिलं; तो परत जॉगिंग करत पुढे निघून गेला आणि मी माझ्या फोनवर पॉज करून ठेवलेलं ‘शूर आम्ही सरदार’ हे गाणं पुन्हा ऐकायला सुरुवात केली. 

एरवी अगदी डबक्यांपासूनही सावध राहण्याची सतत आठवण करणारा (डबकं शोधूनही सापडू शकत नसताना) सिंगापूरचा काळजीवाहू जीव हा ‘घोरपड’ या विषयावर मात्र खूपच शांत असतो. सिंगापूरमध्ये घालवलेल्या दीड वर्षात मी साधारणपणे दहाबारा वेगवेगळ्या जंगलसदृश वाटिकांमध्ये फिरलो असेन, आणि त्यापैकी किमान अर्ध्या वेळा मला एक घोरपड आडवी आलेली असेल. हळूहळू मीही अगदी सराईतासारखं त्यांना ओलांडून जाऊ लागलो. घोरपडीपासून सावध राहण्याचं नक्की काय कारण असतं ते मला आजतागायत कळलेलं नाही, पण ती अचानक समोर दिसल्यावर आणि विशेषतः तिची मधूनच आतबाहेर होणारी जीभ बघितल्यावर, तिचा उगाच आपल्यावर डोळा असेल अशी आपण अगदी सहज समजूत करून घेतो. त्यामुळे तिथे मी जितक्यांदा घोरपडीला ओलांडून पुढे गेलो आहे; त्या प्रत्येक वेळी मी अगदी व्यवस्थित अंदाज घेऊन, अक्षरशः क्षणार्धात ओलांडून, नेहमीच्या चालण्याच्या वेगापेक्षा जास्त पण आपण पळतोय असं तिला वाटू नये अशा बेताने सातआठ पावलं टाकून पुढे गेलेलो आहे. आणि हे सगळं तिला कासवही शर्यतीत हरवू शकेल हे पक्कं माहित असताना. 

पण एरवी आपण ज्या गोष्टींना उगाचच खूप जास्त घाबरू अशांकडे तसं शांतपणे पाहण्याची सिंगापूरची आणि तिथल्या माणसांची ही वृत्ती फक्त घोरपडीपर्यंतच मर्यादित नसल्याचा अनुभव मला नंतर बऱ्याचदा येत गेला. मी तिथे असताना एकदा कुठल्यातरी माणसावर एका ठिकाणी फिरताना एका ऊदमांजरीने ‘हल्ला’ केल्याची बातमी जरा चार ठिकाणी ऐकायला मिळत होती. माझ्या माहितीप्रमाणे, ऊदमांजर त्या माणसावर चालून गेली आणि त्याला चावली किंवा बोचकारलं असं काहीतरी; आणि त्या माणसाला झालेली जखम अगदीच मंत्र म्हणून बरी होण्यासारखी नव्हती, इतकंच घडलं होतं. आमच्या होस्टेलच्या जवळच्या ‘सिंगापूर बोटॅनिक गार्डन्स’ नावाच्या अवाढव्य अरण्यसदृश वाटिकेत काही मोठे तलाव होते आणि आसपास काही ऊदमांजरींचे संसार थाटलेले होते. ही बातमी ऐकल्यावर मला मुख्य भीती अशी वाटली की यावरून आता काहीतरी गहजब वगैरे होऊन त्या ऊदमांजरींना तिथून हलवण्याची मागणी वगैरे केली जाईल; त्यावर दुसरीकडून टीका होईल आणि मग ही वादावादी चालू असतानाचे काही महिने तरी आपल्याला तिथे जाता येणार नाही. तोपर्यंत बोटॅनिक गार्डन्स हा माझ्या सिंगापूरमधल्या अस्तित्त्वाचा अक्षरशः प्राणवायू बनला होता; त्यामुळे मला या कल्पनेने खूप त्रास झाला. पण झालं तसं काहीच नाही. एकतर ऊदमांजरी मुळातच जरा दांडगट वगैरे असल्याचा दावा एवढ्या प्रकरणात कुणीच केला नव्हता. आपल्या मार्गाने सरळ चालणाऱ्या माणसाला त्या उगाच काहीही करणार नाहीत अशी साधी बुद्धी त्या परिसरात फिरायला येणाऱ्या बहुतांश लोकांना असेल असं गृहीत धरायला लोक तयार होते; आणि तरीही हे न कळणारा निघालाच कोणीतरी तर सावधगिरीचा उपाय म्हणून त्या तलावांच्या परिसरात काही ठिकाणी “ऊदमांजरींकडे लक्ष ठेवा आणि जर दिसल्या तर फार जवळ जाऊ नका; त्यांना वाट द्या,” असं लिहिलेल्या पाट्या दिसू लागल्या होत्या. एवढ्यावरच प्रश्न सुटला होता; आणि दरम्यान त्याच वाटेवर पुढे दोन झाडांना जोडणारं जाळं विणणारा एक पंजाएवढा कोळी रस्त्याच्या अगदी वर अधांतरी बसलेला असायचा त्याच्याबद्दल कुणालाही काही बोलायची गरज वाटत नव्हती. सिंगापूरमध्ये निसर्गाला स्वतःचं एक मानाचं स्थान आहे; शहरी भागांत झाडं असतात पण निसर्गाच्या भागात फक्त निसर्गच असतो. फारतर आपल्या सोयीसाठी मातीतच काढलेल्या पाऊलवाटा आणि एकदोन ठिकाणी बसायला उघड्या लाकडी झोपड्या एवढं सोडलं तर पूर्ण निसर्गाचं साम्राज्य असतं. आणि शहरी जीवनामुळे मुंग्यांना घाबरू लागलेल्या आपल्या जीवाला, ‘स्वतःहून निसर्गात चालायला जातोयस तर सगळंच तुझ्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाही याची तयारी पाहिजेच’ अशी शिकवण इथे अशा प्रकारे सहजच दिली जाते. या प्रकाराला मी हळूहळू इतका सरावलो की माझ्या अशाच एका भटकंतीच्या वेळी माझ्या वाटेत घोरपडीशेजारी एक छोटा साप आला, आणि तरीही ती त्या भटकंतीतली मला सगळ्यात घाबरवणारी गोष्ट ठरली नाही. 

तो सापाचा प्रसंग त्या मानाने अगदीच क्षुल्लक होता. आमच्या त्या लाकडी पूलवजा पायवाटेवर एकदमच एक अजस्त्र जांभळट रंगाची घोरपड आणि एक साप असे विरुद्ध दिशांनी येऊन एकमेकांकडे तोंड करून बसले होते. दोन्ही बाजूचे वाटसरू दचकून थांबलेले होते, पण या दोघांना फक्त एकमेकांच्यात रस होता. दोन मिनिटांनी कुठलातरी तहाचा करार झाला आणि साप शांतपणे सरपटत दुसऱ्या बाजूने खाली उतरून पुन्हा झाडीत दिसेनासा झाला. इकडे घोरपड कसली हलतेय? ती उलट जरा मान वर करून इकडेतिकडे बघत, जणू काही ‘आता घालवलं ना त्याला, मग हला ना तुम्हीही’ असं आम्हाला म्हणत असल्यासारखी बसली. मग हळूहळू लोक तिला ओलांडून जायला लागले. मी वेगळ्याच विवंचनेत होतो. मघाशीच माझ्या कानात वाजणारं गाणं अचानक थांबल्यावर मी चकित होऊन फोन काढून बघितलेला होता आणि त्याने माझ्या डेटा पॅकला ‘रोमिंग’ वर चालण्याची परवानगी नसल्याचं सांगितलेलं होतं. . 

“रोमिंग कुठून काढलंस मध्येच?” मी. 

“तुम्ही या क्षणी सिंगापूरच्या हद्दीच्या बाहेर आहात.” शांतपणे फोन. 

मी हादरलोच. मी तसं त्या दिवशी जरा ‘टोक’ गाठलेलं असल्याचं मला माहित होतं, पण माझ्याकडून चुकून एवढा पराक्रम घडलेला असेल असं मला वाटलं नव्हतं. सिंगापूरच्या मुख्य बेटाच्या उत्तर भागात एक सुंदरी झाडांचं रान आहे; तिथे मी फिरायला गेलो होतो. एका कुठल्यातरी फाट्यावर जरा डावीकडची वाट काय निवडली, तर मी थेट सिंगापूरच्या हद्दीच्या बाहेर? थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की मी जिथे होतो त्या टप्प्याच्या पुढे मनुष्यवस्ती काहीच नसल्यामुळे, सिंगापूरचं संपर्कक्षेत्र त्याच्या अलीकडेच संपत असणार. पण याचा सिंगापूरच्या राजकीय सीमेशी अर्थातच काहीच संबंध नव्हता. काही वेळाने त्या वाटेवरून चालत मी एका काहीशा उंचावरच्या मचाणावर पोहोचलो; तोपर्यंत आजूबाजूची झाडी कमी दाट होत गेली होती आणि माझ्या समोर फक्त निळाशार समुद्र होता. सुंदरी झाडं पाण्यातच आपली मुळं वर करून बसत असल्यामुळे, मी बऱ्याच वेळापासून अगदी समुद्रातच बांधलेल्या लाकडी पुलांवरून चालत होतो हे विसरूनच गेलो होतो. या टप्प्यावर मात्र सगळ्या वाटा संपल्या होत्या; आणि समुद्रात फक्त लांबवर काही उंच इमारती दिसत होत्या. मी इथे येण्यापूर्वी नकाशा पाहिला होता तेव्हा हे सुंदरींचं जंगल इतक्या टोकावर असेल असं मला वाटलं नव्हतं; पण आता त्या इमारती बघून खात्री पटली. मग सिंगापूरला आल्यापासून मला लागलेल्या एका सवयीला जागून मी ऐटीत ‘Hello, Neighbour’ असं मोठ्याने म्हणून परत फिरलो.



भारत हा एक अवाढव्य देश असून मी त्याच्या कुठल्याच हद्दीच्या जवळपासही राहत नव्हतो; पण तरीही दुर्दैवाने फक्त हे भौगोलिक अंतरच मला हे वाक्य ऐटीत उच्चरण्यापासून परावृत्त करत नसे. आपल्या भारताला जे विलक्षण शेजारी लाभले आहेत त्यांच्या चुकून जरा जवळ जाण्याचा अनुभव आलाच तरी मनात ही भावना अगदीच नसू शकते. काही वर्षांपूर्वी मी आईबाबांसोबत सिक्कीममध्ये गेलो होतो आणि तिथे हिमालयाच्या कुशीत दडलेल्या ‘छांगु’ नामक सरोवराला भेट दिली होती, तेव्हा आम्ही ज्या हिमाच्छादित डोंगराच्या कड्याच्या सावलीत उभे होतो त्याच्या मागे काय आहे असं विचारल्यावर आमचा ड्रायव्हर हसतहसत ‘चीन’ असं सांगून मोकळा झाला होता. यापेक्षा खूपच कमी नाट्यमय असा एक प्रसंग आम्ही अबू धाबीमधल्या एका डोंगराच्या वरून पलीकडे नजर टाकता तिथे ओमान देश असल्याचं आम्हाला कळलं होतं तेव्हाचा. असं एका वेगळ्या देशात डोकावून बघणं तसं रोमांचक असायला हवं होतं, पण सगळीकडे नुसतं वाळवंटच पसरलेलं असल्यामुळे इकडचं काय आणि तिकडचं काय असं शेवटी आम्हाला वाटलं. या पार्श्वभूमीवर, अगदी पुण्याला मुठेच्या पलीकडच्या काठावर गाव दिसतं तसं पाण्याच्या एका तशा अरुंदच प्रवाहापलीकडे थेट मलेशिया दिसते हे मला तेव्हा खूप रोमांचक वाटलं होतं. 

सिंगापूरच्या उत्तर किनाऱ्यापासून मलेशियातलं ‘जोहोर’ हे गाव खूपच जवळ आहे आणि त्याला सिंगापूरशी जोडणारे दोन पूलही आहेत. त्यातला एक पूल हा उत्तरेकडच्या ‘वूडलँड्स’ या भागापासून जवळ आहे आणि त्या पुलापासून थोड्याच अंतरावर एक उद्यान आहे असं कळल्यावर मी एकदा तिथे संध्याकाळी फिरायला गेलो होतो, तेव्हा त्या उद्यानातून पुढे समुद्रात फुटणाऱ्या एका जेट्टीवर उभं राहून मी पहिल्यांदा मलेशियाकडे बघितलं होतं. अंतर एवढं कमी आहे की मला जोहोरच्या किनाऱ्यावरच्या इमारतींचे मजलेही मोजता येत होते. माझी जिनिव्हात राहणारी मैत्रीण भाजी आणायला चालत चालत फ्रान्सला गेल्याचे किस्से अगदी सहजपणे सांगत असते, पण माझ्यासाठी तरी तो असा काहीतरी भन्नाटच अनुभव होता. त्या जेट्टीवर उभं राहून समोर बघताना मी असा विचार केला, की मी आत्ता पाण्यात उडी मारून जोहोरच्या दिशेने पोहायला सुरुवात केली, तर कुठल्यातरी टप्प्यावर मी त्या अदृश्य सीमारेषेपाशी पोहोचेन. मग समजा पोहताना माझं डोकं रेषा ओलांडून गेलं पण उर्वरित शरीर अलीकडेच असलं, तर मी हद्द ओलांडली असा त्याचा अर्थ होईल का? आणि समजा मी कुणालाही कळायच्या आत डोकं मागे घेतलं तर, मी ज्या देशांना भेट दिली आहे अशांच्या यादीत मलेशियाला घालू शकलो असतो का? पण या कल्पनांपेक्षाही मला जास्त अविश्वसनीय वाटणारं सत्य हे होतं, की मी असाच जेट्टीवरून परत फिरलो, उद्यान ओलांडून परत रस्त्यावर आलो की मी थेट माझ्या लाडक्या शहरात परत जाणार होतो. एरवी सीमारेषा म्हटलं की आपल्याला एक ठराविक चित्र रंगवण्याची खूप सवय झालेली असते. कुठल्याही मनुष्यवस्तीपासून खूप लांब, कुठल्याशा खेडेगावातून केलेली ती आठवड्यातून एकदाच धावणारी बस, कुंपणं, असं बरंच काहीकाही. त्याउलट इथे असं अक्षरशः आपल्याच अंगणातून परसात गेल्यासारखं थेट सीमारेषेवर जाऊन उभं राहायचं आणि रात्रीच्या जेवणासाठी थेट घरीच परत यायचं, कुठलाही दिव्य प्रवास केल्याची भावना अजिबात घेऊन न येता, हे सगळंच विलक्षण होतं. आणि असंच ध्यानीमनी नसताना एका वाटिकेतून फिरताफिरता थेट समुद्रात जाऊन उभं राहायचं आणि पलीकडे दुसऱ्या देशाला बघायचं हे आणखीनच विलक्षण. या अनुभवाची मला जरा जास्तच गोडी लागली की काय कोण जाणे; पण सिंगापूरच्या उत्तर भागातल्या माझ्या फेऱ्या वाढल्या मात्र नक्की. 

त्या जेट्टीवर आणि त्या सुंदरी झाडांच्या जंगलात मी एकदाच गेलो, पण सिंगापूरच्या मुख्य बेटाच्या, वूडलँड्सच्या पूर्वेला असलेल्या पुंगोल नावाच्या उत्तर किनाऱ्याकडच्या भागाला माझं चांगलं चारपाच वेळा जाणं झालं. मी सिंगापूरला राहायला यायच्या आधीपासूनच पुंगोल हे नाव मला फक्त एका कारणासाठी परिचित होतं: सिंगापूरच्या सहा मेट्रो लाइन्सपैकी एकीचा उगम तिथे व्हायचा म्हणून. २००९ साली पहिल्यांदा सिंगापूरला आलो होतो तेव्हा त्यातल्या तीनच लाइन्स कार्यरत होत्या आणि त्यांच्या टोकांची नावं माझ्या विशेष लक्षात राहिली होती, कारण प्रत्येक वेळी मेट्रोत चढताना स्टेशनवर त्या गाडीची दिशा सांगताना त्या टोकाच्या स्टेशनांचा उल्लेख व्हायचा. त्या ट्रिपनंतर मी बऱ्याचदा मंत्र जपावा तसं ‘जू कून-चांगी’, ‘ज्युराँग-मरिना बे’ आणि ‘हार्बरफ्रन्ट-पुंगोल’ अशा जोड्या पुटपुटत असे. याशिवाय, त्या आणि त्यानंतरच्या २०१९ सालच्या ट्रीपमध्येही अनुभवता न आलेल्या सिंगापूरच्या छोट्या ट्रॅम यांचं एक जाळं पुंगोल स्टेशनशी जोडलेलं असल्याने त्याचं एक खास आकर्षण. म्हणून सिंगापूरला मुक्काम हलवल्यावर भेट द्यायची असं ठरवलं होतं त्या ठिकाणांच्या यादीत याचं नाव होतंच. अडचण एवढीच की पुंगोल हा तसा उपनगरीय भाग होता आणि बेटाच्या टोकावर असला तरी त्याला स्वतःचा असा समुद्रकिनारा नव्हता. म्हणून वूडलँड्समधल्या त्या जेट्टी असलेल्या उद्यानासारखं चालत जाता येईल असं एक ईप्सित स्थळ तिथे काहीच नव्हतं. सायकल चालवायला लागल्यानंतर तो प्रश्न सुटला. मी मेट्रोने पुंगोलपर्यंत जाऊन, तिथून ती पुलांवरून फिरणारी छोटी ट्रॅम पकडून किनाऱ्याजवळच्या एका स्टेशनवर उतरायचो आणि तिथे आसपास एखादी भाड्याची सायकल शोधायचो. सिंगापूरमध्ये ठिकठिकाणी पोपटी रंगाच्या अनेक सायकली ठेवलेल्या असतात आणि एका ॲपवरून त्यातली कुठलीही सायकल भाड्याने घेता येते. अशीच एखादी सायकल घेऊन मी त्या भागातून फिरायला सुरुवात करायचो. पुंगोलला समुद्रकिनारा नसला तरी एका सोसायटीच्या आवारात समुद्राच्या काठानेच जाणारा एक लांब रस्ता मात्र होता. शिवाय त्या संपूर्ण उपनगरीय भागाला विभागणारा एक समुद्राला मिळालेला ओढा होता आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी एक सायकलिंग ट्रॅक असलेली बाग होती. त्या ट्रॅकला चकरा मारून तो रस्ता ओलांडला की त्या संपूर्ण भागाला एक गोल चक्कर मारून मी पलीकडच्या बाजूला असलेल्या एका मॉलच्या आवारात येई. या सायकलींचं एक बरं होतं की त्या घेतल्या तिथेच परत कराव्या असा काही नियम नव्हता. त्या कंपनीने ठिकठिकाणी आखलेल्या पार्किंग्सपैकी एकात ती लावून टाकली आणि त्याची नोंद केली की काम होत असे. सुदैवाने त्या मॉलच्या आवारात एक पार्किंग होतं. तिथे माझी फेरी संपवून मी तिथल्याच एका ठरलेल्या डोनटच्या दुकानातून ‘माचा’ नावाच्या जपानी चहाचा वाफाळता कप आणि त्याच फ्लेवरचा एक डोनट घेऊन बाहेर कट्ट्यावर बसून नाश्ता करत असे. हा क्रम मी त्या दुकानातल्या मुलीने मला येताना पाहूनच माझी ऑर्डर तयार करून ठेवेपर्यंत नेमाने पाळला, आणि यात पुंगोलच्या परिसरातून मलेशियाचं पुन्हा अनेकदा दर्शन झालं. 



ही सायकलिंगची कल्पना माझ्या हॉस्टेलवरच्या एका उत्साही मित्राची होती आणि त्यानेच मला ती गोडी लावली याबद्दल मी त्याचा ऋणी आहे, कारण मला एरवी सायकलिंगची खूप आवड असली तरी त्यासाठीचा हा अभ्यास काही मी केला नसता. एकदा हे जमू लागल्यावरही माझे अगदी ठरलेले असे दोनच सायकलिंगचे मार्ग तयार झाले. एक अर्थातच हा पुंगोलचा आणि दुसरा मरिना बे वरचा. माझ्या मित्राने मला ती सायकल भाड्याने घ्यायला शिकवलं तेव्हा आम्ही त्याच मार्गाने फिरून आलो होतो. तो मार्ग आम्हाला आधी साक्षात मरिना बे सँड्सच्या सावलीतून घेऊन जायचा (जी माझ्या दृष्टीने स्वर्गसुखाची गोष्ट होती) आणि मग गार्डन्स बाय द बे या तिथल्याच वाटिकेच्या आवारातून फिरवून शेवटी ‘मरिना बॅराज’ नावाच्या भागात आणायचा. त्या ठिकाणी या मरिना बे नावाच्या खाडीला मुख्य समुद्रापासून वेगळी करणारी एक धरणवजा भिंत होती, आणि तिला सायकलवरून ओलांडून पलीकडे दूरवरपर्यंत पसरलेल्या ‘ईस्ट कोस्ट पार्क’ मध्ये जायची सोय होती. ती भिंत ओलांडून एकदा पलीकडे गेलो की त्या तीरावरून पलीकडच्या गार्डन्सचं आणि त्यांच्या पुढे असलेल्या मरिना बे सँड्स आणि किनाऱ्यावरच्या इतर गगनचुंबी इमारतींचं अत्यंत मनोहर दृश्य दिसायचं. त्या तीरावर, तो त्या वाटिकेचाच भाग असल्याने दुसऱ्या बाजूला अगदी दाट झाडी होती. त्या किनाऱ्यावरून नुसती एक चौफेर नजर फिरवली की सिंगापूरच्या मूळ स्वरूपाचं एकदमच दर्शन व्हावं, अशी एक अभूतपूर्व जागा होती ती. 



पुण्यातच लहानाचं मोठं झाल्यामुळे कुठलीही सीमारेषा जशी खूप लांबची वाटे, तसाच समुद्रही. वास्तविक मुंबईचा समुद्र हा जवळचाच मानायचा. पुण्यातच राहून अशी शेजाऱ्याला अधूनमधून हाक मारायची भूक असेल तर ती भागवायला सगळ्यात लायक उमेदवार अर्थात मुंबईच! अगदी लहानपणापासून, त्या शहराला स्वतःहून अनुभवलेलं नसलं तरी ती कायम ‘आपली’ मुंबईच असे. ती आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तिचं नाव दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद यांच्या यादीत घेतलं जातं ही पुस्तकी माहिती होती, पण एक स्वतंत्र शहर म्हणून तिचा प्रभाव खऱ्या अर्थाने कळला तो सिंगापूरला आल्यावरच. परदेशी मित्रांशी गप्पा मारताना हमखास ‘तू कुठचा’ असा प्रश्न येई, आणि त्यांना भारताच्या विस्ताराची कल्पना असल्याने त्यात कुतूहलही असे. मग मी पुण्याचं नाव घ्यायचो आणि त्यांना काही बोध होत नाही हे पाहिल्यावर त्यांना जरा महाराष्ट्राचा भूगोल समजावून सांगायचा माफक प्रयत्न करायचो, पण तीनचार वाक्यांनंतरही त्यांच्या चर्येवरील प्रश्नचिन्ह कायम असेल तर ‘ते मुंबईच्या जवळ आहे’ असं सांगून टाकायचो. मग लगेच त्यांचा चेहरा सगळं कोडं सुटल्याच्या लखलख चंदेरी तेजाने उजळायचा. साक्षात दिल्लीही पटकन लक्षात येत नसणाऱ्या परदेशी मंडळींना मुंबई माहित असते हे ज्ञान मला सिंगापूरला आल्यावर झालं आणि माझ्या प्रांतीय आपलेपणात थोडी भर पडली, पण तरी मुंबईचा समुद्र अगदी मनात आणलं तर जाऊ इतका आपला कधीच वाटू शकणार नाही. म्हणूनच सिंगापूरला समुद्र अगदी हाकेच्या अंतरावर असल्याचा मी पुरेपूर फायदा घेत होतो. 

ते बेटच असल्याने तांत्रिकदृष्ट्या मला समुद्र सगळीकडे भेटू शकला असता, पण उत्तर भागात अगदी किनाऱ्यावर उपनगरं अनेक असल्याने तो समुद्रासारखा वाटत नसे. पूर्वेला चांगी विमानतळ आणि पश्चिमेला ‘टुआस’ नावाचं संपूर्ण औद्योगिक क्षेत्र, म्हणून दोन्ही भाग नुसतेच भटकायला जाण्यासाठी उपयोगाचे नव्हते. त्यामुळे उरला फक्त दक्षिण किनारा, आणि त्यातही काही औद्योगिक भाग वजा केले तर मुख्य दोनच ठिकाणं शिल्लक राहतात: मरिना बे आणि हार्बरफ्रन्ट. मरिना बे या परिसराचं वर्णन आता नव्याने करण्यात काहीच अर्थ नाही. सिंगापूरच्या Financial District चा केंद्रबिंदू, सिंगापूरमधल्या सगळ्या गगनचुंबी इमारतींचा भरलेला दरबार आणि त्यांच्यात सिंहासनावर विराजमान असलेली अद्वितीय मरिना बे सँड्स, तिच्या पलीकडे जगभरातल्या असंख्य दुर्मीळ वृक्षवल्लींना जपण्यासाठी घडवलेली ‘गार्डन्स बाय द बे’ नावाची सुरेख वाटिका आणि तिच्या समोरच्या किनाऱ्यावर उभा असलेला सिंगापूरचा प्रसिद्ध मरलायन. तो सगळा परिसर म्हणजे माझं, बोटॅनिक गार्डन्सनंतरचं सिंगापूरमधलं सगळ्यात जिव्हाळ्याचं आश्रयस्थान होतं, पण त्याच्या एकूणच लोकप्रियतेमुळे शांतपणे समुद्राकडे बघत बसावं अशी जागा ती कधीच होऊ शकत नव्हती. शिवाय, तिथे समुद्रावर जाणं म्हणजे अगदीच सोपी गोष्ट होती असं मला वाटे. माझ्या होस्टेलजवळच्या मेट्रोच्या स्टेशनवरून मेट्रोत बसलो, की भुयारातून वर आल्यावर लगेच समुद्रच. मला समुद्र माझ्या जवळ हवा होता, पण तरीही का कोण जाणे अगदी इतका सहज accessible ही नको होता. मला स्वतःच्या मेहनतीने समुद्र गाठायचा होता. पण म्हणजे नक्की काय ते माझं मलाच कळत नव्हतं. सुदैवाने एके दिवशी एका पूर्णपणे वेगळ्या बेतामुळे माझी ही इच्छाही पूर्ण झाली. 

सिंगापूरचं एक वैशिष्ट्य हेही आहे की खास पर्यटनाच्या भागांमध्ये काही अद्भुत कलाकृती आणि आविष्कार जसे आहेत, तसेच त्याच्या इतर शहरी आणि उपनगरीय भागांमध्येही पुष्कळ आहेत. आणि त्यांची खूप जाहिरात न करता, ते ‘शोधत आलात तर गवसेल’ अशा प्रकारे अगदी अकल्पित ठिकाणी दडलेले असू शकतात. ‘हेंडरसन वेव्ह्ज’ नावाचा एक पूलही यापैकीच. तो तिथे तसा प्रसिद्ध असला तरी सिंगापूरला जाणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी जी यादी असते त्यात मात्र नाहीये. तो पूल काही कुठल्या अत्यंत प्रसिद्ध स्थळांना जोडतो असंही नाही. सिंगापूरमधल्या एका साध्या रस्त्याच्या वरून तो दोन टेकड्यांना जोडतो; जेणेकरून टेकड्यांवर चालणाऱ्यांना उगाच रस्त्यापर्यंत उतरून पुन्हा चढायला लागू नये. त्याचं वैशिष्ट्य त्याच्या लाटांसारख्या रचनेत आणि त्याच्यावरून दिसणाऱ्या दृश्यात आहे, कारण तो ज्या उंचावर बांधलेला आहे तिथून त्या टेकड्यांपलीकडचा समुद्र दिसू शकतो. पण मला सगळ्यात जास्त आकर्षण वाटतं ते त्याच्या अलिप्ततेचं! त्याला भेट देण्याचं पहिल्यांदा ठरवलं, तेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निश्चित करणंच मला जरा कठीण गेलं. ज्या रस्त्याच्या वर तो होता त्या रस्त्यावरून एकच कुठलीतरी बस जात होती, आणि ती बस पकडायलाही मला नेहमीची वाट सोडून जरा आडवळणावरच्या एका डेपोत जावं लागलं होतं. त्या डेपोपर्यंतच्या प्रवासात गुप्त धनाच्या शोधावर असल्यासारखंच वाटत होतं. सिंगापूरमध्ये सरकारने बांधलेल्या निवासी इमारतींना फक्त ‘ब्लॉक नंबर अमुक अमुक’ अशीच नावं आहेत, आणि त्या इमारतींपुढचे बसस्टॉपही त्याच नावांचे असल्यामुळे मी तोपर्यंत माझ्या रोजच्या प्रवासात ५६, ९०८, ३४२, अशा अनेक इमारती पाहिल्या होत्या. या डेपोपर्यंतच्या प्रवासात मला अचानक चक्क ‘१’ नंबर असलेली इमारत आढळली आणि मी अतिशय रोमांचित झालो, पण आपण अगदी सिंगापूरमधल्या पहिल्या अशा इमारतीच्या सान्निध्यात आहोत याचं बसमधल्या बाकी कुणालाही फारसं काही वाटलेलं दिसलं नाही. ती अगदीच पहिली तशी इमारत नसेलही. क्रमांक देण्याची विभागांनुसार काहीतरी पद्धत असून या विभागाला हे आकडे मिळाले असंही अगदीच शक्य आहे. पण तेवढ्या दृश्याने, इतरांच्या नजरेतून सहज सुटणारी अशी काहीतरी मौल्यवान गोष्ट आता आपल्याला गवसणार आहे या माझ्या मनातल्या भावनेत भरच पडली. 

त्या बसने मला कुठल्यातरी अगदीच अक्षरशः कोपऱ्यातल्या स्टॉपवर सोडलं. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरव्यागार टेकड्या होत्या आणि बाकी कुठेच काही दिसत नव्हतं. मग मला त्या स्टॉपच्या मागे एक लहानसा जिना त्या टेकडीच्या माथ्यावर जाताना दिसला. मी अगदी उत्साहाने तो जिना चढून वर गेल्यावर मला तो सुरेख पूल माझ्या समोरच पसरलेला दिसला. आजूबाजूला चालणारी इतर माणसं होती, पण मी अजूनही कुठल्यातरी गुप्त वाटेने इथे पोहोचल्याच्या कल्पनेत होतो. तो पूल ओलांडल्यावर मी माऊंट फेबर नावाच्या त्या पलीकडच्या टेकडीवर आलो आणि त्याच्यावर पुढे चढायला आणखी एक मार्ग दिसत होता. वास्तविक माझं फक्त पूल पाहून परत यायचं असं ठरलं होतं, पण आता इथे आलोच होतो तर जरा आणखी चक्कर मारून हा परिसर पाहून घेऊ, मनात आणलं की पुलाकडे परत जाता येईल असा विचार करून मी तो मार्ग चढायला लागलो. वाटेत मला एक केबल कारचं स्टेशन लागलं आणि त्यापुढे एका चढावर दोन्ही बाजूंना विश्रांतीसाठी करून ठेवलेल्या उघड्या कुटी आढळल्या. त्यापैकी एकीत बसून थोडा आराम केल्यावर मी पुन्हा मूळ रस्त्याला लागणार होतो, पण तेवढ्यात मला तिच्या मागच्या बाजूला एका अरुंद पायवाटेवर कसलंतरी वेगळंच फूल सापडलं आणि त्याचा फोटो काढायला मी त्या वाटेवर उतरलो. फोटो काढल्यावर त्याच वाटेवर पुढे अशीच वेगळी फुलं असतील म्हणून चालत राहिलो आणि मध्येच कधीतरी त्या अरुंद पायवाटेतून एक लाकडी पायवाट फुटली. त्या लाकडी पायवाटेवरून पुढे गेल्यावर काही लाकडी जिने होते आणि त्यापुढची पायवाट कुठल्यातरी दाट झाडीत अदृश्य होत होती. मी तसाच तिच्यावरून चालत राहिलो आणि त्या झाडीत हरवून गेलो. त्या झाडीत वळणावळणाच्या त्या वाटेवरून चालताना माझं दिशाभान पार गडबडून गेलं होतं. हेंडरसन वेव्ह्ज आणि ती परत जायची बस किती मागे पडल्या आहेत याची जाणीव टोचत होती, पण आजूबाजूला चालणारे लोक पाहून आपण अगदीच भलतीकडे बाहेर पडणार नाही असा विश्वासही होता. बऱ्याच चालण्यानंतर एका ठिकाणी एकदम एक उघडीप दिसली आणि त्यातून चालत बाहेर आल्यावर समोर बघून मी थक्क झालो. या दडलेल्या वाटेने मला सरळ हार्बरफ्रन्टच्या समुद्रकिनाऱ्यावर आणून सोडलं होतं. तिथे उभं राहून समोरच्या समुद्राकडे पाहताना मला तो ‘गाठल्याची’ जाणीव पहिल्यांदाच झाली आणि खूप समाधान वाटलं. 

तो भाग भलतीकडेच नसला तरी माझ्यासाठी अपरिचितच होता, म्हणून मला परत जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी जरा डोकं वापरावं लागणार होतं. ‘वाटलं तर कधीही पुलाकडे परत जाऊ’ असं घोकत चालताना मी प्रत्यक्षात खूप लांब आलो होतो, त्यामुळे उलटं फिरण्यालाही काही अर्थ नव्हता. म्हणून मी त्या किनाऱ्यावरूनच चालत हार्बरफ्रन्टच्या मुख्य मॉलपाशी आलो; त्याच्या आत मेट्रो स्टेशन होतं. तिथे पोहोचलोच होतो म्हणून मी त्या मॉलच्या अंगणात जाऊन त्याला एका पाण्यावर तरंगत्या पुलाने चिकटलेल्या सेंटोसा बेटाला लांबूनच बघून घेतलं. तसंच त्या पुलावरूनही चालत जाऊन सेंटोसावर फेरफटका मारण्याची माझी अतीव इच्छा झाली, पण वाढत्या उन्हाकडे बघून मी समंजसपणे परत फिरून मेट्रोने घरी गेलो आणि पुढच्या वेळी थेट इथे येऊन सेंटोसाकडे चालत जाण्याचा संकल्प केला. त्याच्या पुढच्या रविवारी मी अगदी ठरल्याप्रमाणे अगदी पहाटेची मेट्रो पकडून या मॉलला आलो आणि सकाळच्या वेळी अर्थातच बंद असलेल्या तिथल्या सगळ्या दुकानांच्या रांगेतून हसत हसत चालत परत अंगणात आलो आणि उर्वरित सकाळ सेंटोसा बेटावर ठिकठिकाणी भटकण्यात घालवली. काही तासानंतर रणरणत्या उन्हात त्याच पुलावरून परत मॉलकडे चालत येताना मनातली समाधानाची भावना साऱ्या थकव्याचा विसर पडायला लावत होती.  



पुण्यात लहानपणापासून माझी एक ‘घरकोंबडा’ अशी प्रतिमा होती. कॉलनीत खाली खेळायला जायला मी कायमच उत्सुक नसायचो आणि कॉलेजमध्ये शक्य तितकी लेक्चर्स अलीकडे हलवून लवकर घरी पळायचा प्रयत्न करायचो. माझ्या मित्रमैत्रिणींनाही दिवसभराचे किंवा रात्री उशिरापर्यंत चालणारे बेत आखताना माझी अडचण व्हायची. तेव्हाही मला काही स्वतःसाठी वेळ मिळत नसे म्हणून मी तो असा मिळवायचा प्रयत्न करायचो असंही काही नव्हतं; उलट माझ्याकडे बहुतेकवेळा अर्धा दिवस मोकळाच पडलेला असायचा. त्या दृष्टीने, सिंगापूरमध्ये माझ्याकडे स्वतःसाठी खूपच कमी वेळ असे. आठवड्याचे पाच दिवस एकतर ऑफिस नाहीतर कॉलेज, आणि त्यामुळे घरकामांनी शनिवार व्यापलेला असे. फक्त एक दिवस मोकळा मिळालेला असताना मी कित्येकदा तो असाच उगीच कुठेतरी भटकत घालवला याचं आता मलाच आठवून आश्चर्य वाटतंय, पण त्यापेक्षा खूप जास्त आनंदही वाटतोय. सिंगापूरवरचं माझं प्रेम हे वरवरचं डोळे दिपवणारं आकर्षण नसून, या शहराची खूप खोलवर पाहणी केल्यानंतर निर्माण झालेला स्नेह आहे, ही जाणीव खूप आनंददायी आहे. अशाच आनंदाच्या आणि समाधानाच्या भावनेसह मी त्या दिवशी संध्याकाळी खोलीवर परत आलो आणि पलंगावर कोसळून शांतपणे काही वेळ पडून राहिलो. त्यानंतर पाचच मिनिटांत माझी बोटं फोनवरच्या नकाशावर उत्सुकतेने फिरत होती आणि मनात पुढच्या रविवारचे विचार सुरु झालेले होते.  


Comments

  1. बापरे ! अरे किती लांबलचक लेख हा ! वाटेत पडलेल्या घोरपडी सारखा ! वाचता वाचता डोळे मिटत होते.त्यामुळे अजून दोनदा तरी
    नक्कीच वाचावा लागणार आहे. अर्थात मी वाढणारच आहे कारण आत्ता फक्त रस्त्यात पहुडलेलली घोरपडी लक्षात राहिली आहे.
    पुन्हा वाचला की विविध गोष्टींचा खुलासा करेन. इति अलम् .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प