Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प
नाही पंक, नाही पाणी, तरी उमलले कमळ असे
तीन दिशा, नऊ पाकळ्या, ते सर्वांगाने मोहक दिसे.
मृत्तिका न खाली कोठे, असतो केवळ सिकतेचा थर
त्यातून परि खुलून आले हे कमलपुष्प त्या मरुभूमिवर.
वाळवंटातून त्या भटकती पांथस्थ अनेक लहानमोठे
दिवस गेला सरून तरी मार्ग हरवलासे वाटे
थकल्या नयनांना मग दिसती क्षितिजावर सहस्त्र तारे
सर्वांहून उतुंग उभे असे कमलपुष्प ते चकाकणारे
मृगजळ भासेल कुणाला परि आभास हा मुळी नसे
गेले योजने दूर सात तरी गंध तयाचा पोहोचतसे
गंधाने त्या केवळ एका थकव्याचा साऱ्या पडे विसर
खुणावते फिरुनी फिरुनी, हे कमलपुष्प त्या मरुभूमिवर
कथा दशकाधीची, रिक्त होती ती भूमि जेव्हा
प्रयासाने खणून खोल पुरला तेथे अमूल्य ठेवा.
आरंभली मग उभारणी इंच इंच त्या पायावर
असे परि त्या भूमिकडे सदा सूर्याची नजर
प्रतिकूल होती अवस्था सारी; कामही ते सुसह्य नसे
तरी प्रतिमा त्या सुमनाची मनांवर साऱ्या विलसतसे
जिद्दीने दुर्दम्य तयांनी दूर केले सारे अडसर
अन् शून्यत्वातून प्रकट जाहले, हे कमलपुष्प त्या मरुभूमिवर
उंची असे अशक्य तयाची, विस्तार कल्पनेपलीकडे
दृष्टीक्षेपात केवळ एका दर्शन पुरे न कधी घडे
स्फटिकामागे दडलेले अंतरंगही असे तितके सुंदर
गतिशील उद्वाहके तयाची क्षणांत काही नेती वर
उंचीवरून त्या नजर फेकता सारे निराळेच भासे
मग वसुंधरेच्या काठावरून तो सूर्य बुडताना दिसे
समाधीचा त्या क्षणाच्या पडू शके न कधी विसर
किमयेला त्या नित्य साक्ष हे कमलपुष्प त्या मरुभूमिवर
पाकळी हरेक मग तयाची शुभ्र रंगात उजळिते
कृष्णधवल ते रूप तयाचे नेत्रांना साऱ्या मोहविते
क्षणार्धात लक्ष रंगांनी उजळून निघे त्याचा किनारा
विशाल त्या जलाशयातून जेव्हा नृत्य करिती जलधारा
भक्तिभावाने जणू ओवाळती तयास कर हजार
सम्राटाला इमारतींच्या असे जणू तो नमस्कार
सरल्यावर ते नृत्य होई आसमंतात टाळ्यांचा गजर
स्वीकारते ते त्या धारांसह हे कमलपुष्प त्या मरुभूमिवर
नाही पंक, नाही पाणी, तरी पसरला गंध असा
सुवासाने त्या कुणी पांथस्थ आकृष्ट न होईल कसा?
असंख्य नामांनी भूषविले गेले इमारतीस त्या आजवर
परि मजसाठी केवळ असे ते एक कमलपुष्प त्या मरुभूमिवर.
The Dubai Diaries continue on DD11
Comments
Post a Comment