Dubai Diaries: स्वर्गस्पर्श १


“The next station is, Burj Khalifa, Dubai Mall,”
मेट्रोमध्ये अशी घोषणा ऐकू आली आणि मी ताडकन उठलो, तेव्हा शेजारी बसलेले बाबा हसले. 
Next station,” ते म्हणाले. मी शांतपणे परत खाली बसलो. 
अखेर तो दिवस उजाडला होता, ज्याची गेली काही वर्षं आतुरतेने वाट पाहण्यात घालवलेली होती. दुबईला येण्यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण हे होतं. आता ट्रीपहून परत येऊन सहा महिने होत आलेले असले तरी तितक्याच प्रकर्षाने मला पुन्हा दुबईकडे ओढतेय ती हीच एक गोष्ट. 
दुबईच्या ‘डाऊनटाऊन’ मध्ये ‘बुर्ज खलिफा पार्क’ नावाचा एक मोठा भाग आहे. या भागात एक मोठा तलाव, त्याच्या काठावर काही मोठी हॉटेल्स, महाकाय ‘दुबई मॉल’ आणि अर्थातच ‘तो’. मेट्रोने आम्हाला सर्वप्रथम दुबई मॉल नावाच्या स्टेशनवर सोडलं, तिथून परत त्या मोठ्या बंद काचेच्या पुलांमधून आम्ही थेट मॉलच्या आत शिरणार होतो. मॉलमध्ये फिरून, मग त्या तलावाच्या काठाकाठाने पार्कला एक चक्कर मारून मग दुपारी आम्ही बुर्ज खलिफाच्या आत जाणार होतो. 
बुर्ज खलिफा ८२८ मी. उंचीचा असून, त्याला एकूण १६३ मजले आहेत. त्यापैकी १२४, १२५ आणि १४८ हे मजले खास पर्यटकांसाठी राखून ठेवलेले आहेत. सुप्रसिद्ध गगनचुंबी इमारतींमध्ये बऱ्याचदा वरचा मजला हा पर्यटकांसाठी ‘Viewing Deck’ म्हणून तयार केलेला असतो; असे खास Decks हाँग काँगच्या एका व्यावसायिक इमारतीच्या १००व्या मजल्यावर, तसेच न्यू यॉर्कच्या ‘एम्पायर स्टेट’च्या ८६व्या आणि १०२व्या मजल्यांवर आहेत. त्या प्रथेनुसार बुर्ज खलिफाचा १६३व्या मजल्यावरच हवा होता, पण तिथे तो फारच निमुळता होत गेल्यामुळे यासाठी फार जागा नाहीये (एम्पायर स्टेटच्या सगळ्या मजल्यांच्या आकार तसा सारखाच आहे) याशिवाय, एवढ्या उंचावर पर्यटनस्थळ ठेवणं जरा धोक्याचंही वाटलं असावं. ते काही असो, पर्यटकांना १४८व्या मजल्याच्या वर जाता येत नाही, आणि तो मजलाही १२५ पेक्षा महाग असतो. आमचं तिकीट १२५चंच होतं. Viewing Deck तुलनेने एवढा खाली ठेवूनही तो तरीही जगातला सर्वांत उंचावरचा Deck आहे, म्हणून दुबई खूश आहे. 
या १२४-१२५ मजल्यांवरच्या पर्यटनस्थळाला ‘At The Top’ असं नाव आहे आणि अशा सगळ्या Decks प्रमाणेच, त्याला भेट द्यायला तिकिटं काढावी लागतात. पण टूर असा काही प्रकार नसतो. त्याउलट तिथे जाऊन तुम्ही काही तास तिथे हवं ते करू शकता. एका तिकिटावर मनात आणलं तर दिवसभरही तिथे बसू शकतो. आम्ही तिकीट दुपारी अडीच वाजताचं काढलं होतं, जेणेकरून आम्ही जेवण वगैरे करून मग तिथे जाऊ शकलो असतो आणि सगळी दुपार आणि संध्याकाळही तिथेच काढू शकलो असतो. 
मेट्रोतून उतरल्यावर माझ्या हृदयाची धडधड मला ऐकू येण्याइतकी वाढली होती. यावेळी स्टेशन आमच्या ‘ईप्सित स्थळा’पासून खूपच लांब निघाल्याने आम्हाला चांगला चारपाच लांबसडक बोळांचा तो मोठ्ठा बंद पूल पार करून जावं लागलं. ‘यात्रेला निघालेला भक्त कधी तक्रार करतो का?’ या माझ्या तेव्हाच्या वाक्यावर बाबांनी उसासा टाकला आणि आता उरलेला दिवसभर असलं काहीतरी ऐकण्याची मनाची तयारी केली. पण त्या पुलाच्या काचेरी भिंतींतून मॉल आणि त्यामागे कुठेतरी उभा असलेला बुर्ज खलिफा अर्धवट दिसला, तेव्हा ‘यात्रा’, ‘मंदिर’, वगैरे सगळ्या फालतू उपमा माझ्या मनातून गळून पडल्या. मी ठरवलं, की आता खूप काही बोलायचं नाही; व्यक्त होण्याच्या भानगडीत पडायचं नाही. फार काय, तिथे गेल्यावर अगदी श्वासही आत ओढून घ्यायचा नाही. या सगळ्याला नंतर खूप वेळ मिळणार आहे; आज फक्त डोळ्यांच्या सगळ्या इच्छा पुरवण्यावर भर द्यायचा. आता आठवल्यावर असं वाटतंय, की दुबईवर काहीतरी मोठं, विस्तृत असं लिहायची कल्पना तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात आली आणि घर करून बसली. तेव्हाच आम्ही तो पूल एकदाचा ओलांडून मॉलच्या आत प्रवेश केला आणि बुर्ज खलिफा दिसेनासा झाला. 
मॉलमध्ये आता जेवणापर्यंतचा वेळ काढायचा होता, पण आपण एरवीही ‘शॉपिंग’ म्हटल्यावर उत्साहाने उठायच्या ऐवजी सोफ्यावर कोसळून टी.व्ही.वर ‘इन्सेप्शन’ सापडल्याचा बहाणा करणाऱ्या गटातले असलो तरी मॉलमध्ये वेळ काढणं कधी फार अवघड जात नाहीच. तरीही, त्या दिवशी आमचं ध्येय तो मॉल पाहणं नसून, त्याच्यामधून सगळ्यात जवळची वाट शोधून बाहेर पार्कमध्ये जाऊन तळ्याच्या काठावरून बुर्ज खलिफाचे फोटो काढणं हा होता. आणि नेमकी या वेळी दुबई मॉलला ‘खजिनाशोध’ खेळण्याची हुक्की आलेली होती. एकतर आम्ही आलोच मुळात दुसऱ्या मजल्यावर होतो, त्यामुळे आधी तळमजल्यावर जाणं भाग होतं. तिथे गेल्यावर तळघराकडे जाणाऱ्या सरकत्या जिन्यापाशी लावलेल्या पाटीवर ‘बुर्ज खलिफा’ असं दिसलं आणि आम्ही थेट खाली गेलो. तिथे काही खूप लांब एकाच दिशेने जाणाऱ्या बोळांमधून फिरून शेवटी जिथे पोहोचलो, ते ‘At The Top’ चं प्रवेशद्वार निघालं. बुर्ज खलिफाचं पर्यटकांसाठीचं प्रवेशद्वार दुबई मॉलच्या तळघरात असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. इथे पुन्हा एकदा या सगळ्या अजस्त्र रचनाकृतींच्या एकमेकांना जोडलेल्या अंतरंगाची प्रचिती आली. तेव्हा आत जात येणार नव्हतंच, पण तिथे आलोच होतो तर आमची तिकिटं ताब्यात घ्यायचं ठरवलं. खुद्द वर जायच्या वेळी खूप गर्दी असते म्हणून जमल्यास तिकिटं आधीच घेतलेली बरी अशी काकाने सकाळी सूचना केलेली होती; ती किती योग्य होती त्याची प्रचिती दुपारी पुन्हा तिथे गेल्यावर आलीच. त्या प्रवेशद्वाराच्या इतक्या जवळ येऊनही आणि तिकिटं हातात असूनही परत फिरून त्या लांबलचक बोळातून पुन्हा मॉलमध्ये यायला मन जरा घट्टच करावं लागलं!
मग पुन्हा आम्ही मॉलच्या तळमजल्यावर येऊन जरा शोधाशोध केली. जरा फिरल्यावर आम्हाला तिथलं प्रसिद्ध मत्स्यालय सापडलं. या तळमजल्याची उंची साधारण आपल्या एरवीच्या दोन मजल्यांएवढी होती आणि अशात, एका बाजूला संपूर्ण भिंतच काचेची होती आणि त्यामागे निळंशार पाणी दिसत होतं. आयमॅक्स थिएटरच्या पडद्यावर जिवंत माशांच्या हालचालींची चित्रफीत लावून ठेवल्यासारखं ते दिसत होतं. अर्थात, ती चित्रफीत नसून त्या काचेमागे खरोखरीच सगळ्या प्रकारच्या माशांचं साम्राज्य होतं ही जाणीव पुन्हापुन्हा येऊन रोमांचित करून जात होती. त्या काचेच्या अगदी जवळ जाऊन उभं राहिलो (लोखंडी रेलिंग अर्थातच न ओलांडता) आणि दोन अवाढव्य शार्क माशांना थेट डोक्यावरून पोहताना पाहिलं, तेव्हा ती काच खरंच केवढी मजबूत आहे ते एकदा तपासून पाहावंसं वाटलं. अनेकदा दीर्घ उसासे आणि अधूनमधून निष्कारण किंकाळ्या काढणाऱ्या त्या गर्दीचा एवढा भाव मिळत असूनही ते मासे सराईत सेलिब्रिटींसारखे शांतपणे विहरत होते. सिंगापूरच्या मत्स्यालयात पाण्याखालच्या एका बोगद्यातून जाऊन माशांना शब्दशः डोक्यावरून पोहताना पाहिल्यामुळे मला दुबई मॉलमधल्या या अनुभवाला दुसऱ्या क्रमांकावर ठेवावं लागलं, पण तरी तो अद्भुत होता खराच. तेवढी दहापंधरा मिनिटं मी बुर्ज खलिफाला विसरून गेलो होतो. 
त्यानंतर पुन्हा आम्ही शोधमोहीम सुरु केली. तिथून पुन्हा पहिल्या मजल्यावर आल्यावर आम्हाला एक मोठा दरवाजा दिसला; त्याच्याबाहेर ऊन दिसत होतं. मग घाईघाईने तिकडे गेलो. जाताजाता त्या आवारातल्या एका सुरेख मॉडेलने आमची पाच मिनिटं तेवढी घेतली. ‘दुबई क्रीक टॉवर’ नावाच्या एका नव्या प्रकल्पाचं ते मॉडेल होतं. ती इमारत होती तशी साधीच, पण तिला वरपासून अनेक तारांनी जमिनीशी बांधून ठेवल्यामुळे तिलाही एक वेगळीच गोलाई येत होती. मागच्या लेखात उल्लेख केलेली हीच ती ‘राणी’! तिच्या या प्रतीकात्मक रुपासमोर काही फोटो काढून आम्ही त्या दारांतून बाहेर पडलो. 
त्या प्रखर उन्हाला डोळे सरावल्यावर पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं की आम्ही चुकीच्या ठिकाणी बाहेर पडलो होतो. हे मॉलचं त्या पार्कच्या विरुद्ध दिशेला असलेलं टोक होतं आणि इथे आमच्यासमोर थेट मोठा रस्ताच होता. तरीही, मॉलमधून जाण्यापेक्षा कडेकडेने जाणं जास्त सोपं पडेल असा विचार करून आम्ही त्या मॉलच्या अजस्त्र भिंतींच्या बाजूबाजूने चालत निघालो. एक पूर्ण बाजू ओलांडल्यावर अचानक फुटपाथच संपला. आता आम्ही बुर्ज खलिफातल्या ‘अरमानी हॉटेल’कडे नेणाऱ्या एका प्रवेशद्वारापाशी उभे होतो. रस्त्याच्या पलीकडे त्या भागातल्या प्रसिद्ध ‘द अड्रेस’ नावाच्या पंचतारांकित हॉटेलची मोठी इमारत उभी होती; तिच्यासमोरही मरिनासारखे फोटो काढून थोडीशी ‘लास्ट मिनिट प्रॅक्टिस’ करून घेतली. आता मात्र त्या सगळ्या सरावाचा उपयोग करून घेण्याची वेळ आली होती. आमचा वळून जायचा बेत तिथेच रद्द करून आम्ही त्या अरमानीच्या व्हॅन्सच्या मागून मॉलच्या पार्किंगमध्ये शिरलो आणि कसेबसे पुन्हा मॉलमध्ये आलो. यावेळी कुठेही न भरकटता, नकाशा दोनदा पाहून आम्ही तळमजल्यावरच्या एका दारातून बाहेर पडलो.   
उजेडाला पुन्हा डोळे सरावल्यावर आम्हाला दिसलं की आम्ही पायऱ्या उतरून एका मोठ्या आवारात आलेलो होतो. आम्ही बाहेर पडलो ती मॉलची बाजू खूप वेगवेगळ्या प्रकारच्या दुकानांनी आणि त्यांच्यासमोर मांडलेल्या बहुरंगी छत्र्यांखालच्या खुर्च्या-टेबलांनी भरलेली होती. आमच्या समोर एक रुंद फुटपाथ उजवीकडच्या तळ्याच्या काठाने गोल फिरून दूर पुढे कुठेतरी एक लहानसा पूल बनून तळ्यावरून जात होता. पुलाच्या त्या बाजूला तळ्यातच बांधलेल्या एका लहानशा कृत्रिम बेटावर सँडस्टोनच्या रंगाच्या छोट्याछोट्या इमारती आणि बंगले दिसत होते. ते नीट पाहायला आम्ही जरा पुढे आलो आणि त्या सगळ्या छत्र्यांच्या आणि मॉलच्या भिंतीच्या सावलीतून बाहेर आल्यावर उजवीकडे नजर टाकली आणि थक्क झालो. 




तळ्याच्या पलीकडच्या किनाऱ्यावर इमारतींचा सम्राट उभा होता. त्याच्या अजस्त्र देहावर सूर्यकिरण कोसळून त्याच्या हजारो काचांपैकी प्रत्येकीवर एक उभी चंदेरी रेषा काढून जात होते. तळ्याच्या स्वच्छ, नितळ, निळ्याशार पाण्यात त्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होतं. एकमेकांपासून ठराविक उंचीवर असलेल्या, जणू वर जाणारा गोल जिनाच वाटणाऱ्या त्याच्या सगळ्या काचेरी कठडे असलेल्या गच्च्या, एखाद्या सुंदर फुलाच्या मोत्यांसारख्या दवबिंदूंनी भिजलेल्या कडांच्या अर्धवर्तुळाकार पाकळ्यांसारख्या दिसत होत्या. मुकुटात एखादा डोळे दिपतील असा चमकदार हिरा कोंदलेला असावा तसा त्याच्या निमुळत्या डोकावर बसवलेला तो उभा खांब त्या प्रखर उन्हात तळपत होता.  
काही वेळ नुसतंच त्याच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहून झाल्यावर मग आम्ही फोटो काढायची तयारी केली. बाबांनी मला तळ्याच्या काठापर्यंत जायला सांगितलं आणि आदल्या दिवशी केलेल्या ‘ड्रिल’ नुसार खाली बसून फोटो काढायचा प्रयत्न केला. तरी त्या फ्रेममध्ये तो पूर्ण येत नव्हता. मग बाबा कॅमेरातूनच पाहत पाहत दहाबारा पावलं मागे गेले. आता तो कसाबसा मावत होता, पण त्याच्यासमोर माझं फक्त डोकंच दिसू शकत होतं. अजून फार मागे जाणं तर शक्य नव्हतं, आणि तुलनेने सबंध पार्कमधलं हेच एक ठिकाण त्याच्यापासून एवढं लांब होतं. सुमारे पंधरा मिनिटं आम्ही एखादा चांगला फोटो काढण्याच्या खटपटीत असू. “फक्त धड्याखालची गणितं करा आणि बिनधास्त,” असं कॉलेजमध्ये शिक्षकांनी सरळ सांगून टाकल्यावर पेपरमध्ये नेमका ‘डोक्याला चालना’ विभागातला एखादा प्रश्न सापडावा तसं झालं होतं. (म्हणजेच असं होण्याची ही दुसरी वेळ होती!) पण आम्हाला एकदम एक युक्ती सुचली. बाबांनी कॅमेरा तिरपा करून तसा फोटो काढल्यावर मग तो व्यवस्थित मावला, शिवाय मीही अगदीच नगण्य दिसलो नाही. मग त्यानंतर आम्ही आमचे त्याच्यासोबतच बहुतेक सगळे फोटो असे तिरप्या अँगलनेच काढले. 
त्यानंतर आम्ही भूक लागेपर्यंतचा सगळा वेळ तळ्याच्या काठाकाठाने फिरून त्याच्याकडे बघण्यात घालवला. तो लहानसा पूल ओलांडून त्या कृत्रिम बेटावर आलो. त्याचं नाव ‘सूक अल बहार’ असं होतं आणि तोही एक लहानसा मॉलच होता. फक्त बाहेरच्या भिंती सँडस्टोनच्या रंगाच्या होत्या आणि आतमधली सगळी सजावट जुन्या स्टाईलची होती. अरबी गालिच्यांनी अंथरलेल्या पायवाटा, कोरीव नक्षीकाम केलेल्या भिंती वगैरे. आम्ही आत काही गेलो नाही; फक्त त्याच्या कडेकडेने तळ्याच्या काठावरून फिरत राहिलो. इथे तशी सावली आणि झाडाझुडुपांमुळे गारवाही असल्यामुळे एका बाकावर बसून शांतपणे समोर पाहत राहणं खरोखरंच आल्हाददायक होतं. त्या बेटाच्या मागून एका रस्त्यावरून पुढे तळं ओलांडून बुर्ज खलिफाच्या पायथ्यापर्यंतही जाता येत होतं, पण त्याला न्याहाळण्याची इच्छा बाळगणाऱ्याला इतक्या जवळ जाऊनही उपयोग नाही. तसंही तिथून आम्हाला आत जाता नसतंच आलं, कारण पर्यटक म्हणून आम्हाला फक्त आमचा तळघरातला खास एंट्रन्स वापरता येणार होता. तळ्याचा तो उभा आहे तो किनारा ‘पार्क’ म्हणून ठेवलेला आहे आणि तिथे हिरवळ, जॉगिंग आणि सायकल ट्रॅक्स वगैरे असं सगळं आहे. आणि अर्थातच पार्क असल्यामुळे कोणीही तिथे केव्हाही येऊ शकत होतं. याच भागात जवळपास कुठेतरी घर असावं, सकाळच्या वेळी ऊन कोवळं असताना तिथल्या एखाद्या कॅफेतल्या त्या रंगीबेरंगी छत्र्यांखाली मित्रमैत्रिणींसोबत जमावं, आणि रात्री त्याच तळ्याच्या काठाने त्यांच्याबरोबर भटकावं ही माझ्या सर्वाधिक सुखाच्या कल्पनांपैकी एक आहे (आणि त्यातल्यात्यात सगळ्यात शक्य कोटीतलीही!)
साडेबाराच्या सुमारास आम्ही त्या सुखद वातावरणातून काढता पाय घेतला आणि पुन्हा त्याच मार्गाने दुबई मॉलच्या आत आलो. शोधमोहिम अजून संपलेली नव्हती; आता फूड कोर्टचा माग काढायचा होता. आधी सरळ नकाशाकडे जाऊन फूड कोर्टच्या जागा पाठ करून मगच आम्ही त्या दिशेने कूच केलं. भूक लागलेली असली तरी वाटेतल्या एका सुरेख शिल्पाकृतीने आमचं लक्ष वेधून घेतलं. मॉलमधल्याच एका आवारात एक मोठी भिंत काळ्या पाषाणाची बनवल्यासारखी दिसत होती. तिच्या वरून पाणी सोडून त्याचा कृत्रिम धबधबा केलेला होता आणि खाली छोटंसं तळं होतं. यातली नजरेत भरण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या भिंतीवर वरून सूर मारतानाच्या अवस्थेत असलेल्या सात-आठ मानवी प्रतिकृती लटकवलेल्या होत्या. वाहत्या पाण्यामुळे त्या सगळ्या कलाकृतीला एक जिवंतपणा आलेला होता. तसंच दुसऱ्या एका आवारात एक भलामोठा डायनासॉरचा सांगाडा ठेवलेला होता. तिथे लावलेल्या पाटीवरून तो जगातल्या सगळ्यात जास्त लांबीच्या शाकाहारी डायनासॉरचा, म्हणजेच ‘डिप्लोडॉकस’चा सांगाडा होता. ते पाहून मला लहानपणी आत्ता गगनचुंबी इमारतींचं आहे तसंच डायनासॉरचं कसं वेड होतं ते सगळं आठवलं. या दोन्ही ठिकाणी दोनचार फोटो काढून आम्ही पुढे सरकलो. यानंतर फूड कोर्टमध्ये जाऊन आम्ही आरामात थाई जेवणावर ताव मारला. जेवणानंतर दोन सॉफ्टी घेऊन आम्ही मॉलच्या बाहेर गच्चीवर आलो आणि तिथून दिसणाऱ्या ‘अड्रेस’कडे बघत शांतपणे वेळ घालवत राहिलो. 




अखेर दोन वाजले, तसे आम्ही एकदमच उठून काही न बोलता परत मॉलमध्ये जाऊन तळघराकडे चालू लागलो. सकाळी एकदा पादक्रांत केलेल्या मार्गावर पुन्हा एकदा चालत आम्ही त्या लांबलचक बोळांतून शेवटी त्या प्रवेशद्वारापाशी आलो. तिथे विमानतळावरच्या चेक-इन करण्याच्या प्रक्रियेसारखी व्यवस्था दिसत होती. एका मोठ्या काउंटरच्या मागे बसलेले तीनचार कर्मचारी गर्दीला चार रांगा करून पुढे यायला सांगत होते. गर्दी सकाळच्यापेक्षा खूपच वाढलेली होती. आम्हीही कडेच्या रांगेत शिरलो. पुढे सरकताना तिथल्या भिंतींवर लिहिलेली बुर्ज खलिफाची माहिती वाचता आल्यामुळे नेहमीच रांगेतला कंटाळा आला नाही. काही काही माहिती अगदीच विलक्षण होती, उदाहरणार्थ त्याच्या बांधकामाच्या काळातले काही किस्से किंवा त्याच्या नावावर असलेले सगळे वर्ल्ड रेकॉर्ड्स वगैरे. शेवटी एकदाचा आमचा नंबर लागला आणि पलीकडच्या भारतीय माणसाने आमची तिकिटं तपासायला मागितली. ती आधीच ताब्यात घेतल्यामुळे बाकीच्यांना लागत होता तेवढा वेळ आम्हाला लागला नाही, पण तरीही अधीरता टोकाला पोहोचलेली होती. सरतेशेवटी त्याने हसून आम्हाला ती परत दिली आणि तो म्हणाला,  
“Please Proceed.”

The Dubai Diaries continue on DD12                                     

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प