Dubai Diaries: स्वर्गस्पर्श २


प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पहिल्यांदा आमची विमानतळ-स्टाईल तपासणी झाली आणि त्यातून सुटल्यावर आम्ही एका मोठ्या लॉबीत शिरलो. तिथे मध्यभागी बुर्ज खलिफाचं एक सुरेख मॉडेल ठेवलेलं होतं. ते जमिनीवर नसून एका मोठ्या चौकोनी टेबलावर होतं, जो स्क्रीन असल्याचं त्याच्या जवळ गेल्यावर कळलं. स्वतः मॉडेल वेगवेगळ्या रंगांत चमकत होतं. ते मॉडेल मूळ वास्तूशी योग्य प्रमाणात तयार केलेलं असल्याने ते माझ्याएवढं उंच होतं. आम्ही गेलो तेव्हा स्क्रीन तसा शांत होता, पण मग कळलं की त्याच्यावर हात ठेवला की काहीतरी भारी सुरु होणार होतं. संधी मिळाल्यावर मीही माझा हात त्या स्क्रीनवर टेकवला. 
माझ्या हाताखालून असंख्य पांढरेशुभ्र किरण बाहेर पडले आणि चहूबाजूंना पसरून शेवटी मॉडेलवर एकवटले. त्यांनी तसं करताच मॉडेल जिवंत झालं आणि एकेक करत खालपासून त्याचा मजलान् मजला उजळून निघाला. काही वेळ ते नुसतंच चंदेरी प्रकाशात चमकत राहिलं. मग त्याचा तो ढगांच्या रंगासारखा रंग जाऊन ते अर्धपारदर्शक झालं. आता त्याच्यावर ठिकठिकाणी लिफ्ट्स वरखाली होताना दिसत होत्या. साधारण मिनिटभर या लिफ्ट्सचा खेळ सुरु होता. आणि त्या मॉडेलवर हे सगळं सुरु असताना खाली स्क्रीनवर त्याच शुभ्र रंगाच्या धुक्याच्या लाटा पसरून त्याच्या अवतीभवती नक्षी काढत होत्या. यानंतर तो स्क्रीन पुन्हा शांत झाला आणि मॉडेलही, त्याच्या आधीच्या सोनेरी-पिवळ्या रंगाकडे परतून पुढच्या इच्छुकाचा स्पर्श होण्याची वाट पाहू लागलं. 
मी हा खेळ कितीही वेळा खेळून पाहायला तयार होतो, पण तेवढ्यात लॉबीत रोमांचित जपानी पर्यटकांच्या एका घोळक्याने प्रवेश केला आणि ते मॉडेल त्यांच्याकडे सोपवून आम्हाला पुढे सरकावं लागलं. 




एवढा सगळा वेळ स्वतः बुर्ज खलिफा आमच्या डोक्यावर उभा आहे असं मला वाटत होतं, पण प्रत्यक्षात आम्ही अजूनही मॉलच्याच आत होतो. त्या लॉबीतून पुढे गेल्यावर एक खूप लांब बोळ लागत होता. त्यात आधीपासून उभ्या असलेल्या रांगेत जाऊन थांबलो. आता या रांगेतूनच सरकत सरकत आपल्याला सगळं पटकन पाहून परतावं लागेल की काय अशी भीती वाटत होती. सुदैवाने ही रांग फक्त लिफ्टपर्यंतचीच होती. शिवाय, पुढेपुढे सरकतानाही दोन्हीकडे बघायला पुष्कळ होतं. डावीकडे एका मोठ्या पोस्टरवर ‘बुर्ज खलिफा साकार करण्यात यांचे मोलाचे सहकार्य’ याखाली त्याच्या इंजिनिअर्स आणि डिझायनर्सनी नावं आणि फोटो होते. एकदोन मुकादमांचेही आणि कामगारांचेही होते. त्या संतुष्ट चेहऱ्यांच्या जमावात दोनतीन भारतीय चेहरे बघून छान वाटलं. मनात आलं, जगभरातली वेगवेगळ्या प्रकारची डोकेबाज माणसं अशी एकत्र यायला अशीच जबरदस्त कारणं लागतात, आणि ती जेव्हा प्रेरित होऊन एकत्र येतात तेव्हा जे घडवतात त्याचं सौंदर्य कल्पनेपलीकडे असतं. एका कुठल्यातरी देशाच्या अभिमानाच्या शिक्क्याऐवजी मानवाचाच एक सांघिक उपक्रम म्हणून जसं International Space Station कडे बघितलं जातं तसंच बुर्ज खलिफाकडेही पाहू शकतो. 
पुढे बोळ एके ठिकाणी डावीकडे वळला तेव्हा तिथल्या भिंतीवर अजून एक स्क्रीन बसवलेला असून, त्याच्यावर बुर्ज खलिफाच्या बांधकामाची ब्ल्यूप्रिंटसारखी चित्रफीत लावलेली होती. अगदी पायापासून ते वरच्या टोकापर्यंत त्याला हळूहळू उभं राहताना पाहण्यात वेगळीच मजा येत होती. ब्ल्यूप्रिंट असूनही ते सुरेख बनवलेलं होतं, म्हणून प्रत्येक मजला चढवला जाताना ओळखू येत होता. आधी अर्धी इमारत पूर्ण झाली, मग वरचे मजले बांधणं आणि खालच्यांना काचा बसवणं एकाच वेळी व्हायला लागलं. आमच्या डोळ्यांदेखत त्याच्या क्रेन्स सतत फिरत फिरत वरपर्यंत गेल्या, त्याच्या सर्वांत वरच्या मजल्याला काचा बसवून झाल्या आणि शेवटच्या गच्चीचा कठडाही व्यवस्थित ‘फिनिश’ करून झाला. हे सगळं मिनिट-दीड मिनिटात. तेव्हा मला रांग हळूहळू सरकत असल्याचा खूप आनंद झाला, आणि मी या चलतचित्राचा एक व्हिडिओ काढला आणि त्यानंतर दोनदा ते पाहूनही घेतलं. 
अशीच रांगेत असताना पाहिलेली दुसरी एक अविस्मरणीय गोष्ट म्हणजे एक पोस्टर. अगदी साधं; काही स्क्रीन वगैरे नाही. त्यावरचे शब्द हे असे:
I am the power that lifts the world’s head proudly skywards, surpassing limits and expectations.
Rising gracefully from the desert and honouring the city with a new glow, I am the extraordinary union of engineering and art, with every detail carefully considered and beautifully crafted.
I am the life force of collective aspirations and the aesthetic union of many cultures. I stimulate dreams, stir emotions and awaken creativity.
I am the magnet that attracts the wide-eyed tourist, eagerly catching their postcard moment, the centre for the world’s finest shopping, dining and entertainment and home for the world’s elite.
I am the heart of the city and its people; the marker that defines Emaar’s ambition and Dubai’s shining dream.
More than just a moment in time, I define moments for future generations.
I am Burj Khalifa. 
स्वतः त्याचे शब्द! आणखीन काय हवं? नंतर शांतपणे या काव्यात्मक संदेशावर विचार केल्यावर मला असं जाणवलं की तो जितका सुंदर आहे तितकाच सूचकही आहे. दुबईला गेल्यावर तिच्या एकूण स्वभावाबद्दल आपलं जे काही मत बनतं, तेच सगळं या संदेशातूनही लीलया उमटताना दिसतं. यातली प्रत्येक ओळ १००% सत्य आहे. (विशेषतः ते ‘I stimulate’ ने सुरु होणारं वाक्य, स्वानुभवावरून!) नुसतं सत्य नाही, तर उघड उघड आणि निःसंशय सत्य आहे. तरीही ते असं शब्दांत कोरून ठेवल्यामुळे दुबईला विशेष आनंद झाला असावा. खासकरून ‘surpassing limits’, ‘details considered’, ‘magnet’ या वाक्यांमधील उद्गारांतून हा अविष्कार किती अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे; फक्त दुबईनेच नाही तर एक माणूस म्हणून आपणही, हे मनावर ठसवलं जातंय. अर्थात ना अशी अपेक्षा करण्यात त्यांचं काही चुकतंय ना ती पूर्ण करण्याला आपली काही हरकत आहे! पण कधीकधी मला दुबई, मोठ्ठी पार्टी ठरवून आता जरा गडबडली असली तरी प्रत्येकाला ११०% मजा आलीच पाहिजे या निश्चयाने पेटलेल्या व्यक्तीसारखी वाटते. कौशल्य प्रचंड असूनही थोडीशी insecure असल्यासारखी. थोडक्यात, बुर्ज खलिफाच्या या शब्दांनी दुबईच्या मनात खोल दडलेल्या भावना सहज व्यक्त होत असल्यासारखं वाटत होतं. आणि यात नवल ते कसलं? त्याच्याच म्हणण्याप्रमाणे, तो तिचं हृदयच नाही का?
अर्थात, त्यावेळी ते वाचून मला यातलं काहीच न वाटता फक्त ‘तो आपल्याशी बोलला’ या कल्पनेनेच भारी वाटत होतं. इथे एक खुलासा करायला हवा की त्याने उल्लेख केलेला ‘इमार’ म्हणजे दुबईमधला एक खूप मोठा प्रॉपर्टी डेव्हलपर आहे आणि बुर्ज खलिफा, दुबई मॉल, द अड्रेस आणि तो सगळा परिसर त्यांच्याच मालकीचा आहे. 
दरम्यान रांगेतून पुढे सरकत सरकत आम्ही सरतेशेवटी लिफ्ट्सपर्यंत पोहोचलेलो होतो. या इमारतीत एकूण सत्तावन्न लिफ्ट्स आहेत. त्यापैकी दोन तेव्हा आमच्यासमोर होत्या. सगळे त्यांच्यासमोर गर्दी करून उभे होते. या लिफ्ट्स फक्त आम्हा पर्यटकांसाठी होत्या, आणि त्या वापरून आम्हाला दुसऱ्या कुठल्या मजल्यांवर जाताच आलं नसतं. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या जगातल्या सगळ्यांत वेगवान लिफ्ट्सपैकी होत्या, आणि त्यामुळे १२४व्या मजल्यावर जायला आम्हाला साधारण मिनिटभराचाच वेळ लागणार होता. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या त्याच मजल्यावर थांबल्या होत्या, आणि आमच्यासमोर त्यांनी खाली यायला सुरुवात केली. हे सगळं मागे कुठेतरी बसवलेला प्रोजेक्टर त्यांच्या दारांवर त्या कुठल्या मजल्यावर आहेत ते दाखवत असल्यामुळे कळत होतं. त्या खाली येईपर्यंत बाबांनी माझा त्यांच्यासमोर एक फोटो काढला. मधल्या काही आकड्यांवरून वेगाने घसरल्यानंतर त्या पुन्हा वेग कमी करत शून्यावर आल्या. त्याक्षणी प्रोजेक्टर बंद झाला, आणि दारं उघडली. एका वेळी चांगले सोळा लोक मावू शकत असल्याने आमच्याबरोबर एक मोठा घोळका त्यांच्या आत शिरला. दारं बंद झाल्यावर सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला. वर एका डिस्प्लेवर मजल्याचा आकडा दिसत होता. वेळ मिनिटभराचाच असला तरी तेवढ्यात भिंतीवरचे  एकदोन स्क्रीन्स अचानक जागे झाले आणि त्यांनी काहीतरी दाखवायचा प्रयत्न केला; पण कुणाचंच तिकडे फारसं लक्ष नव्हतं. त्याऐवजी काही लोक कानांवर हात ठेवत होते आणि काही वेळाने मलाही दडे बसल्याचं जाणवलं. या ‘राईड’ची आणि IMG मधल्या राईड्सची तुलना करता ही काहीच नव्हती, पण माझं हृदय मात्र तितकंच धडधडत होतं एवढं मात्र नक्की!
त्या अंधारामुळेच असावं, पण लिफ्टमधून बाहेर पडल्यावर दिवसभरात तिसऱ्यांदा प्रखर उजेडाला डोळे सरावायला वेळ लागला. पण ते सरावल्यावर समोर जे दिसलं, त्याची जगात कशाशीच तुलना होऊ शकत नाही. 
मधला लहानसा बोळ झोपेत चालणाऱ्या माणसासारखा ओलांडून मी थेट १२४व्या मजल्यावरच्या गच्चीत प्रवेश केला. गच्ची खूप रुंद तरीही तिच्या सुबक अर्धवर्तुळाकार आकाराची गोलाई टिकवून होती. आणि टोकावर कठडे कसले? चांगल्या दहा फूट उंचीच्या उभ्या काचांची फळी बसवून ठेवली होती. आणि त्यांच्यामधून दिसत काय होतं? दाहीदिशांना क्षितिजापर्यंत पसरलेलं वाळवंट; आणि त्याच्या जवळच्या भागात एक अवाढव्य शहर. उंच इमारतींनी भरलेलं; ज्या सगळ्या आता हास्यास्पदरीत्या खुज्या वाटत होत्या. आणि एकूण केवढ्या पिवळ्या पृष्ठभागावर हिरवं आच्छादन पसरलेलं आहे तेही दिसत होतं आणि डोळ्यांना सुखावून जात होतं. लांबवर पसरलेल्या दुबईतली प्रत्येक लहानसहान इमारत स्पष्ट दिसू शकत होती. 
यापलीकडे त्या दृश्यात वर्णन करण्यासारखं फार काही सापडत नाहीये, पण अशा ‘अवर्णनीय’ या शब्दाला सार्थ करणाऱ्या खूप कमी गोष्टी असतात, तेव्हा हिला तसंच राहू द्यावं. 
चांगला अर्धा तास आम्ही फक्त त्या काचांना टेकून निःशब्दपणे सगळीकडे पाहून ते अद्भुत दृश्य दोन्ही प्रकारच्या मेमरीजमध्ये स्टोअर करून ठेवत होतो. मधूनच वर पाहिलं तर वरच्या ३९ मजल्यांचेही अप्रतिम दर्शन झाले. बऱ्याच वेळाने, गर्दी वाढायला लागली तसे आम्ही गच्चीतून पुन्हा आतल्या बोळात आलो. त्या गच्चीलाच जोडून एक लहानशी अर्धवर्तुळाकार खोली होती जिच्यातून एक जिना वरच्या १२५व्या मजल्यावर नेत होता. ही दोन्ही मजल्यांना जोडणारी खोलीही इमारतीच्या बाहेरच्या भागात असून तशीच काचांनी बनवलेली होती, म्हणून जिना चढत असताना बाहेर बघितलं तर चक्क आकाशातच वर जात असल्यासारखं वाटत होतं. 
१२५व्या मजल्यावर गच्ची नव्हती, पण त्याच्यावरून आम्हाला संपूर्ण दुबईचं दर्शन होऊ शकत होतं. त्याचा तो एकच बोळ त्याच्या काचेच्या भिंतींच्या कडेकडेने तिन्ही ‘पाकळ्यां’वर पसरला होता. काही वेळ इमारतीला चकरा मारून सगळ्या बाजूंनी तेच अद्भुत दृश्य पाहून झाल्यावर मग आम्ही उरलेल्या वेळासाठी एक जागा शोधायला लागलो. इथून सूर्यास्तही पाहायचा असल्यामुळे तो व्यवस्थित दिसेल अशी जागा शोधणं गरजेचं होतं. तिन्ही पाकळ्या ज्या तीन बिंदूंपाशी एकत्र येत त्या ठिकाणी फक्त तो बोळ अरुंद होत होता; बाकी ठिकाणी ती खरंतर एक चांगली प्रशस्त लॉबीच होती. त्या तिन्ही अर्धवर्तुळाकार लॉबींपैकी आम्ही मरिनाच्या बाजूला असलेली निवडली, कारण सूर्यास्त तिथेच होणार होता. त्या लॉबीत एका कोपऱ्यात काही शेल्फमध्ये souvenirs मांडून ठेवलेली होती. कीचेन्स, फ्रिजवर लावायची मॅग्नेट्स, आणि त्याच्याच सुंदर, हुबेहूब प्रतिकृती. त्यांच्या किमती पाहिल्या, तर सरासरी शंभर दिऱ्हम्सच्या घरात जात होत्या. अगदी तितक्याच सुबक आणि खऱ्यासारख्या दहा दिऱ्हम्सच्या प्रतिकृती मी दोन दिवसांपूर्वी जुन्या बाजारात बघितल्या होत्या म्हणून बरं!




याशिवाय तिथे एक कलाकार बसलेली होती; ती कुणाच्याही नावाची अक्षरं दुबईच्या गगनचुंबी इमारतींच्या आकारात, वेगवेगळ्या रंगात काढून द्यायची. ज्याच्या नावात ‘I’ हे अक्षर असेल त्याची तर चांदीच! याशिवाय एक जुन्या काळातलं वाटणारं मशीन ठेवलेलं होतं, ते त्यात पैसे टाकले की बुर्ज खलिफाचा छाप असल्याचं पितळ्याचं नाणं बाहेर टाकायचं. राजमुद्राच! याशिवाय त्याचे फोटो असलेले चहाचे कप, घड्याळं आणि काही लहान मुलांची चित्रांची पुस्तकं असं सगळं तिथे मांडून ठेवलेलं होतं. त्यातल्या एका ‘टॉवर्स ऑफ दुबई’ नावाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बुर्ज अल अरब, कयान, प्रिन्सेस वगैरे मंडळी समुद्रात आनंदाने खेळत होती आणि दोन लहान मुलांना हातात घेऊन फिरवत किनाऱ्यावर सौम्यपणे हसत बुर्ज खलिफा उभा होता. माझ्या मनात आलं, आपण जसे लहानपणी ससा आणि कासवाच्या गोष्टी ऐकत मोठे झालो तशी, दुबईत जन्मापासून वाढलेली मुलं अशाच गोष्टी ऐकत मोठी होत असतील, तर त्यात नवल काय? सगळी souvenirs छान होती, कलाकुसरीतही दोष काढायला जागा नव्हती, पण आमचं एक souvenir केव्हाचं ठरलेलं असल्यामुळे (आणि ते इथे घ्यायचं नाही हेही ठरलेलं असल्यामुळे) आम्ही शांतपणे शेल्फ शॉपिंग करून आमच्या ठरलेल्या जागी जाऊन बसलो. 
मोठेमोठे सोफे, आरामखुर्च्या वगैरे काही नाही. अगदी बाकही नाहीत. थेट फरशीवरच. आणि काचांना टेकून! खाली बसणं कित्येक पटींनी जास्त सुखावह होतं हे कळल्यावर असंही जाणवलं, की खुर्च्या कितीही ठेवल्या तरी पुरल्या नसत्याच. आणि मग उगीचच जागा अडली असती. शिवाय, खुर्च्यांमुळे निष्कारण अवघडलेपण येऊ शकलं असतं. काचेला डोळे लावून बसायची इच्छा होत असताना आपल्या खुर्चीवर बसून राहायचं, आणि जरा पुढे जाऊन पाहावंसं वाटलं की खुर्ची जाण्याची भीती. आणि बाकी सगळे खुर्च्यांवर बसलेले असताना एकट्यानेच काचेपाशी कट्टा टाकायचा संकोच! कशासाठी? आम्ही आरामात एका काचेला टेकून पाय पसरून गार फरशीवर बसलो होतो, आणि आजूबाजूचे सगळे तेच करत होते. सगळेच करतायत म्हटल्यावर संकोच कसला? आणि मग जरा गर्दी वाढली, जरा सरकून घ्यावं लागलं आणि वेळप्रसंगी चिकटून दाटीवाटीने बसावं लागलं, तरी औपचारिकतेचे पडदेच नसल्यामुळे कुणीही सहज ते केलं असतं. आमच्या उजवीकडे एक युरोपियन कुटुंब तसंच बसलं होतं. आम्ही एकदोनदा एकमेकांकडे बघून हसलोही. पलीकडे एक भारतीय त्रिकुट होतं. ते मनसोक्त, पण फार आवाज न करता निवांत गप्पा मारत होते. त्यापलीकडे कोणी काहीतरी वाचत होतं; कुणी पाहत होतं, कुणी दाखवत होतं, तर कुणी नुसतंच डोळे मिटून शांत बसून होतं. जगातला सगळ्यात उंचावरचा बागेतला कट्टा!
मधूनच काही लोक उठून इमारतीच्या दुसऱ्या भागात जात; तिथे सुगरणीच्या खोप्यासारख्या दिसणाऱ्या तीन काळ्या तारांच्या जाळ्यांनी बनवलेल्या खुर्च्या छताला टांगून ठेवलेल्या होत्या. आणि मग माझं लक्ष छताकडे गेलं, तर त्याच्यावरची नक्षी मधमाश्यांच्या पोळ्यासारखी होती. आम्ही आलो तेव्हा ती हिरवी होती, पण तिचा रंग थोड्या थोड्या वेळाने बदलत असे. लाल, निळ्या, पिवळ्या, अशा सगळ्या रंगात ते छत चमकत राही. काही वेळ त्याच्याकडे, काही वेळ तिथल्या भिंतीवरच्या टी.व्ही.वर बुर्ज खलिफाची माहिती पाहत आणि उरलेला वेळ खिडकीतून हळूहळू असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने नटणाऱ्या दुबईकडे बघत काढला. त्या टी.व्ही.वरची काही माहिती नवीनच होती. उदाहरणार्थ त्याचे टोक ९३ किलोमीटर एवढ्या अंतरावरूनही दिसू शकते वगैरे. मग तो आकडा मनात ठेवून मी ‘कमलपुष्प’च्या वेळी आजीला ‘९३ किलोमीटर म्हणजे किती योजनं’ हे विचारलं होतं!
सूर्यास्ताची वेळ व्हायच्या आत, आम्ही इमारतीच्या दुसऱ्या भागात जाऊन एक प्रयोग करून बघितला. आमच्या कॅमेराची झूम शक्य तेवढी मोठी करून काही लांबचे फोटो काढले. खूप दूरवर एका ठिकाणी एक लहानसं खेळाचं मैदान दिसलं, ज्यात फक्त काही छोट्या घसरगुंड्या आणि काही चौकोन आखलेला पट ठेवलेला होता. त्याचा फोटो काढल्यावर कॅमेरा बाजूला करताच ते मैदानच काय पण त्याच्या आजूबाजूचा सगळा भागच हरवला! पण कॅमेरा काचेला अगदी टेकवून खालच्या तलावाचा आणि सूक अल बहारचा फोटो मात्र मस्त आला. याशिवाय दूरवर कॅमेरातून पाहिल्यावर आम्हाला विमानतळ दिसला; त्याच्या धावपट्टीवरून एक A380 उड्डाण घेतानाचा एक व्हिडिओ काढला. मग सर्वत्र संधिप्रकाश पसरू लागेपर्यंत विमानं पाहत बसलो, आणि मग आमच्या जागेवर परत आलो. 
आता गर्दी वाढली होती, त्यामुळे आमची जागा आम्ही ताब्यात घेतल्यानंतर आमच्या आजूबाजूला खूप मोठा घोळका जमायला लागला. आम्ही सूर्यास्त बघायला सज्ज झालो. इथून दिसणारा सूर्यास्त ‘लाईव्ह’ घरी आई आणि आजीला दाखवायची आमची इच्छा होती, ती नेटवर्कमुळे कितपत शक्य होणार होती माहित नव्हतं. पण तिथे अचानक बुर्ज खलिफाचं स्वतःचं वायफाय सापडलं आणि सहज जोडलंही गेलं. वेग पाहिला तर चक्क बहात्तर MB प्रतिसेकंद!! (तुलना करण्यासाठी म्हणून सांगतो की आपल्या घरातल्या रोजच्या वायफायचा वेग एक किंवा फारतर दोन MB एवढा असतो) मग काय? जगातल्या सर्वांत उंचावरच्या डेकवरून पाहिलेला अद्भुत सूर्यास्त आई आणि आजीला आरामात घरी बघता आला!
खरंतर सूर्याचा रंग केशरी झाल्यापासूनच सगळे मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पाहत होते. तो अतिशय हळूहळू खाली सरकत होता. या बाजूला मरिना आणि समुद्रकिनारा दिसत असल्यामुळे तर दृश्याच्या सौंदर्यात खूपच भर पडलेली होती. काही वेळापूर्वी गडद निळं असलेलं पाणी आता हळूहळू सोनेरी, मग पारदर्शी होत होतं. संधिप्रकाशाच्या तिरिपा मरिनातल्या मंडळींवर पडून त्या सगळ्या डोक्यावर हिऱ्याचा मुकुट घातल्यासारख्या दिसत होत्या. खालचे रस्ते हळूहळू प्रकाशमय होत होते. आणि सूर्य त्याच्या गतीने संथपणे खाली जात होता. लोकांनी शक्यतो फोन आणि कॅमेरे काचेला टेकवून ठेवून दिलेले होते आणि स्वतः दृश्य डोळ्यात साठवून घेत होते. सेल्फी वगैरे काढायची हुक्की कुणालाही आली नाही. आणि शांतपणे सूर्य क्षितिजापर्यंत आला. त्याला चिकटला. त्याच्यात बुडायला लागला. दिवसाचा शेवटचा प्रकाश सोनेरी पाण्यात उभ्या असलेल्या बुर्ज अल अरबवर त्याने फेकला आणि हळूच त्या पाण्यात लुप्त झाला. जाताना थोडासा प्रकाश ठेवून गेला. कुणी काहीच हालचाल केलेली नव्हती. 
यापूर्वी बघितलेल्या अनेक ‘सनसेट पॉईंट्स’पाशी लोक तो बुडायला लागला की शिट्ट्या मारून, टाळ्या वाजवून त्याला मूर्खासारखा निरोप वगैरे देतात हे पाहिलं होतं. आज मात्र ना कुणाच्या तोंडातून शब्द फुटत होता ना कुणाची पापणी लवत होती. सगळेच थिजल्यासारखे ती जादू अनुभवत होते. तो शेवटचा प्रकाश कधी विरून गेला कळलंच नाही. दुबई हळूहळू पूर्णपणे प्रकाशमान झालेली होती आणि अंधार वेगाने पसरू लागला होता. 
कुठेतरी काहीतरी वाजलं आणि सगळे एकदमच त्या समाधीतून भानावर आले. बुर्ज खलिफामधले दिवे लागलेले होते.                           


   
                                                                                                                                                                                      
The Dubai Diaries continue on DD13

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प