Dubai Diaries: स्वर्गस्पर्श ३


सगळीकडे दिवे लागून लॉबी प्रकाशमान झाली तेव्हा तिथे येण्यासाठीचं शेवटच्या खास आकर्षण अनुभवायची वेळ झाल्याचं जाणवलं. काकाने आखून दिलेल्या योजेनेमागची हुशारी आता मला व्यवस्थित कळली होती. त्या दुपारच्या तिकीटामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा मस्त जुळून आल्या! सकाळच्या वेळी कसलीही घाई करावी न लागता आरामात त्याला बाहेरून पाहून झालं. जेवण करूनच वर गेल्यामुळे मध्येच परत खाली येण्याचा प्रश्नही उरला नाही. सूर्यास्त सहा-सव्वासहा पर्यंत होणार होता त्यामुळे मधला चार तासांचा वेळ आरामात वर बसून काढता आला. एवढा वेळ उरकल्यासारखं वाटण्याएवढा कमीही नव्हता आणि कंटाळा येण्याएवढा जास्तही नव्हता; आणि बुर्ज खलिफामध्ये कंटाळा येण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. सूर्यास्ताची चिन्ह दिसू लागल्यापासून तो होईपर्यंतचा वेळ अक्षरशः उडून गेला होता, आणि थोडासा थकवा जाणवू लागला असेल, वाट बघण्याची क्षमता कमी झाली असेल त्याच वेळी लगेच आमच्यासमोर पुढचं आकर्षण हजर होतं.  
ते आकर्षण म्हणजेच प्रसिद्ध ‘दुबई फाउंटन्स’! तळ्यात ठिकठिकाणी बसवलेल्या पाण्याच्या पाइप्समधून पाण्याचे फवारे उडवून त्यांना एखाद्या गाण्यावर नाचवायचं हा तो कार्यक्रम. हे ऐकून तिसरीत जत्रेला गेला असाल तेव्हाच्या आठवणी आल्या असतील, तर ते तितकंसं चुकीचं नाही! हो, अगदी खरं सांगायचं झालं तर अशा शो मध्ये मोठ्ठे फरक असे काही नसतात; असला तर एवढाच असेल की दुबई फाउंटन्सचं पाणी गाण्याकडे दुर्लक्ष करून बिनधास्त फ्रीस्टाईल न करता व्यवस्थित गाण्यावर नाच करतं. त्या दिवशी आम्ही त्याचे तीन शो बघितले, एक खास १२५व्या मजल्यावरून आणि उरलेले दोन खालून. खालून बघितल्यावर खरंच तो अनुभव एवढा विलक्षण का आहे ते नीट कळतं. पण त्याआधी वरून पाहिलेल्या शोची वेगळीच मजा सांगितली पाहिजे. 
सूर्यास्ताच्या समाधीतून बाहेर पडल्यावर सगळ्यांनी तिथून धाव घेतली आणि आम्ही दुपारी जिथून सूक अल बहारचा फोटो काढला होता त्या ठिकाणी पोहोचले. आम्हालाही मोक्याची जागा मिळाली. आता साडेसहा वाजत आले होते. पहिल्या शोची सुरुवात होणार होती. काचेला नाक टेकवून खालच्या तळ्याकडे पाहत होतो. त्याच्या शेजारीच दुबई मॉल दिसत होता. रात्रीच्या अंधारात त्याच्या भल्यामोठ्या छपरावर ठिकठिकाणी हिरव्या दिव्यांच्या रांगा चमकत होत्या. वरून नीट पाहिल्यावर त्याचा विस्तार पहिल्यांदाच नजरेत भरत होता. जगातला सगळ्यात मोठा मॉल म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे जे उभं राहू शकत नाही (किंवा त्याच्या आत गेल्यावरही राहू शकत नाही) ते एकदम तिथून पाहिल्यावर जाणवतं. त्याशिवाय आता सर्वत्र लागलेल्या दिव्यांमुळे अड्रेस आणि आजूबाजूच्या इमारतीही जास्त स्पष्ट दिसू शकत होत्या. अड्रेसमधल्या तर गच्च्याही दिसत होत्या. बाबा म्हणाले, की ज्या सगळ्या इमारती बुर्ज खलिफावरून दिसू शकतात त्यांच्यात राहणाऱ्या लोकांना, गच्चीत कपडे वाळत घालतानाही दोनदा विचार करावा लागत असेल!  




मग मागून कुणीतरी साडेसहा वाजल्याचं जाहीर केलं आणि सगळे सावध झाले. मीही इमारतींवरून माझी नजर काढून खाली तळ्याकडे वळवली. आत्तापर्यंत ते पूर्णपणे काळंकुट्ट होऊन गेलेलं होतं. इतकं, की तेवढ्याशा भागावरच लक्ष केंद्रित केलं तर मॉलचा काही भाग आणि सूक अल बहार ताराविरहित आकाशात कुठेतरी टांगलेले असल्यासारखे वाटत होते. पाण्याच्या पृष्ठभागावर काही हालचाल झाली असतीच तरी एवढ्या उंचावरून दिसू शकली नसती. पाचएक मिनिटं सगळे शांतपणे त्या काळ्याशार डोहाकडे टक लावून बघत होते. मग ते घडलं. 
त्या काळ्या पडद्यावर मधूनच कुठूनतरी एक सोनेरी किरण बाहेर पडला आणि त्याने स्वतःभोवतीच संथपणे एक गोलाकार फेरी मारली. एक वर्तुळ पूर्ण केलं तेव्हा तिथला बिंदू अधिक प्रखरपणे चमकला. त्यानंतर त्याच किरणाने तशी अजून दोनदा फेरी मारली आणि त्यानंतर सुळकन् आडव्या ‘S’ सारखा आकार काढून तळ्याच्या दुसऱ्या भागात गेला. तिथेही त्याने एक वर्तुळ; यावेळेस आधीच्यापेक्षा जास्त मोठं असं गिरवायला सुरुवात केली. तर त्याच्या मूळ बिंदूपाशी एक दुसरा किरण फुटला होता आणि आधीच्याचेच वर्तुळ पुन्हा रेखाटत होता. त्यांची ही ‘पार्टनरशिप’ चालू असताना दूर एका टोकाला तिसऱ्याच एका किरणाने स्वतःचं वर्तुळ सुरु केलं होतं. ते बाकी दोघांच्यापेक्षा फारच लहान होतं. थोड्या वेळाने तोही त्याचं वर्तुळ सोडून बाकी दोघांना येऊन मिळाला. यानंतर ते असेच बराच वेळ फिरत राहिले. एखादा मधूनच गायब व्हायचा, आणि तेवढा काळ ते वर्तुळ किंवा त्यांना जोडणारी वळणदार नक्षी अदृश्य होई. मग अचानक ती प्रकट व्हायची. आता जरा नीट त्यांच्याकडे पाहिल्यावर हे सगळे किरण काही विशिष्ट बिंदूंपाशी खूप जास्त चमकत असल्याचं जाणवलं, तर कधीकधी ती संपूर्ण नक्षीच क्षणात उजळून निघे आणि क्षणात विरूनही जाई. ते सोनेरी किरण म्हणजे अर्थातच पिवळ्या रंगाच्या प्रकाशात उसळणारं तळ्यातलं पाणी होतं, आणि ते खूप उंच उसळी मारायचं तेव्हा ती विशिष्ट चमक दिसायची, हे आता लक्षात आलं होतं. शिवाय, काही वेळ नक्षीच्या रचनेत काही फरक पडला नाही असं वाटलं, तरी ती नक्षी थरथरताना जाणवत होती, म्हणजेच पाणी नुसतंच उसळ्या मारत नसून वेगवेगळ्या प्रकारे नाचतही होतं हे कळत होतं. गाणं अर्थातच ऐकू आलं नाही, पण यामुळे एक गंमतच अनुभवायला मिळाली. नाचणाऱ्या कारंज्याचा तोच शो आम्ही नाचणारी कारंजी म्हणून न बघता त्याहून वेगळंच काहीतरी म्हणून बघू शकलो. मगाचच्या ताराविरहित आभाळातच कोणीतरी जणू आमच्यासमोरच सोन्याच्या शाईने नक्षी काढत होतं; लगेच पुसूनही टाकत होतं. 
सहासात मिनिटांत तो पहिला शो संपला. भानावर आल्यावर सगळ्यांच्या एकदमच लक्षात आलं, की आता मात्र बुर्ज खलिफावरून उतरायची वेळ आलेली होती. काहीशा पडलेल्या चेहऱ्याने लोकांनी पुन्हा लिफ्ट्सपाशी रांग करायला सुरुवात केली. यावेळेस आम्ही १२४व्या मजल्यावर न थांबता थेट खाली जाणार होतो. यावेळी रांग जरा जास्त लांबली; किंवा कदाचित सतत पुढे सरकत राहायला जागा नसल्यामुळे तसं वाटत असेल. हळूहळू पुढे सरकताना एका भिंतीवर बसवलेला टी.व्ही. अचानक मला दिसला; त्याच्यावर बुर्ज खलिफाचा इतिहास आणि त्याच्यावर काढलेल्या काही माहितीपटांमधल्या क्लिप्स लावलेल्या होत्या. ती सगळी माहिती कुतूहलजनक होती तर खरीच, पण मला आता त्यातल्या खूप गोष्टींचं विशेष अप्रूप वाटलं नाही. मला स्वतःला बुर्ज खलिफा कधीच, ती जगातली सर्वात उंच इमारत आहे किंवा त्याच्या नावावर ढीगभर वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत म्हणून आवडला नव्हता. 
शेवटी एकदाचे आम्ही पुन्हा त्याच्या तळाशी येऊन पोहोचलो आणि त्या लांबलचक बोळातून पुन्हा दुबई मॉलच्या दिशेने पादक्रमण करायला सुरुवात केली. पण बोळाचा हा भाग तुलनेने खूपच मनोरंजक निघाला. त्याच्या अर्ध्याअधिक भागात डावीकडे एका काचेपलीकडे बुर्ज खलिफाची मॉडेल्स ठेवलेली होती. तीही, त्याच्या बांधकामातले महत्त्वाचे टप्पे दाखवणारी. दहा-पंधरा तरी असावीत. सगळी पांढऱ्याशुभ्र प्लॅस्टिकची बनलेली आणि त्या souvenirs इतकीच कोरीव. सकाळी जे एका अर्ध्या मिनिटाच्या चलतचित्रात पाहिलं होतं तेच आता टप्प्याटप्प्याने व्यवस्थित वेळ घेऊन पाहिलं. मी आग्रह केला म्हणून बाबांनी चालताचलता त्या मॉडेल्सच्या संपूर्ण ओळीचा एक व्हिडिओ काढला. मी त्यांच्यामागून, प्रत्येक टप्पा मिनिटभर निरखून येत होतो. त्यामुळे ‘पन्नास मीटर खोल’ पासून ‘आठशे अठ्ठावीस मीटर उंच’ पर्यंत यायला आमची किमान दहावीस मिनिटं तरी गेली असतील. तिथून त्या बोळाच्या सुरुवातीला पुन्हा त्या फोटोवरच्या ‘साकार’ करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य पाहून मॉलच्या आत आलो. काका-काकू आम्हाला घ्यायला येणार होते आणि त्यांना आम्ही सूक अल बहारमध्ये भेटणार होतो. 
मॉलमधून बाहेर पडून तळ्याच्या काठाने चालत जाताना मी परतपरत वर बुर्ज खलिफाकडे पाहत होतो. सकाळच्या वेळी निरभ्र आकाशाचं प्रतिबिंब पडल्यामुळे तशाच रंगाचे भासणारे त्याचे रूप आता कृष्णधवल दिसत होते. सगळ्या गच्च्यांच्या त्या काचेरी कठड्यांवरच्या पट्ट्या पांढऱ्या रंगात चमकत होत्या आणि उर्वरित पृष्ठभाग पाषाणातून कोरला असावा असा काळा होता. काहीकाही मजल्यांवर त्यांचे स्वतःचे दिवेही लागलेले होते. गच्च्यांवरचे पांढरे दिवे अधूनमधून गुडूप होऊन प्रकट होत होते आणि तो ‘दिवे मिचकावण्या’चा खास लक्षात राहिलेला इफेक्ट उत्पन्न करत होते. मी नीट मोजून आमची १२४व्या मजल्यावरची गच्ची आणि तिला जोडलेला तो बाहेरचा जिना असलेली खोली शोधून घेतली. अर्ध्याच तासापूर्वी आपण तिथे होतो, यावर विश्वास ठेवणं जरा जड जात होतं. 
सूक अल बहारला जाताना लागणाऱ्या त्या तळ्यावरच्या पुलावर आम्ही थांबलो आणि पुन्हा काही खास फोटो काढून घेतले. इथून अंतर योग्य तेवढंच असल्यामुळे एका फोटोत बाबांना मी त्याला हात लावून उभा आहे असा इफेक्ट आणता आला. तेवढ्यात सगळे लोक पुलाच्या एका बाजूला गर्दी करायला लागले तेव्हा पुढचा शो सुरु होणार असल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्हीही लगेच एक चांगलीशी जागा पकडली. 
यावेळचा अनुभव पूर्णपणे वेगळा ठरला. त्या पाण्याच्या हालचाली आता जरा परिचयाच्या झालेल्या असल्या तरी आता आम्ही त्याला खरोखरीच उसळताना पाहत होतो. ते पाणी मधूनच उंच उसळ्या मारायचं, तर उरलेल्या वेळात थोड्याशाच उंचीवर वेगवेगळ्या हालचाली करायचं. त्या वर्तुळाचा एक प्रकार तर फारच मनात भरला. एका बिंदूपाशी उसळायला सुरुवात करून, प्रत्येक बिंदूपाशी आधीच्यापेक्षा थोडं जास्त उंच उडी मारून पुन्हा सुरुवातीच्या बिंदूला ते सर्वात उंच उडायचं; आणि हे सगळं अगदी क्षणभरात. मग उरलेला वेळ ते वर्तुळातलं पाणी स्वतःभोवतीच फिरत राहायचं. प्रत्येक बिंदूतून बाहेर येणारा फवारा वर्तुळाच्या आतल्या बाजूला वळून नाचत होता आणि त्यामुळे ते संपूर्ण वर्तुळ एका फुगून वर येणाऱ्या केकसारखं दिसत होतं. इतर दोन्ही वर्तुळांमध्येही असंच चालू होतं. एवढा सगळं वेळ एक संथ अरबी गाणं लावलेलं होतं आणि त्याच्या शब्दांच्या चालीप्रमाणे ते पाणी उड्या मारत होतं. या कार्यक्रमांना हिंदी सिनेमातली गाणीही लावतात हे माहित होतं, पण त्यादिवशी त्यांनी अरबी गाणी लावल्याचं पाहून मला जास्त आनंद झाला. ते गाणं सुंदर होतं. कळत एक शब्दही नव्हता, पण पोहोचत होतं. एखाद्या अनोळखी भाषेतल्या एखाद्या गाण्यावर जर पाणीच इतक्या सुंदर प्रकारे नाचताना पाहिलं आणि तेही बुर्ज खलिफाच्या समोर, तर त्या भाषेच्या प्रेमात पडणार नाही असं कसं होईल? आणि ते पाणी काय नाचत होतं! विशेषतः त्या वर्तुळांना जोडणाऱ्या नक्षीमधले फवारे. एकदा उसळी मारून हवेतच राहिले की सगळ्या बाजूंना सळसळल्यासारखे हलत. डावीकडून उजवीकडे फिरत, एक फवारा वाकून दुसऱ्याला स्पर्श करे आणि अशी साखळी सुरु होई. एका बाजूला जाऊन संपली की तेच फवारे उलट्या दिशेला वळून दुसऱ्या टोकापर्यंत साखळी नेत. जणू एकच तबक घेऊन ते एकमेकांकडे देत अनेक हात भक्तिभावाने मागे उभ्या असलेल्या सम्राटाला ओवाळत असावेत. मग वर्तुळातलं पाणी पुन्हा उंचउंच उसळ्या मारायला लागलं तेव्हा त्याच्याकडे पाहिलं. प्रत्येक उसळी आपली नजर तिच्यासोबत वर आणत बुर्ज खलिफाच्या टोकापर्यंत नेत, आणि लगेच त्याच्या पायाशी पुन्हा पुढची उडी पाहायला खाली आणत. मग अचानक क्लायमॅक्स जवळ आल्याचं जाणवलं आणि ते पाणी क्षणात सुळसुळत त्या नक्षीवरच्या प्रत्येक बिंदूतून उसळून गेलं आणि शेवटी तिन्ही वर्तुळांतून त्यांची आत्तापर्यंतची सर्वांत उंच उडी निघाली. यानंतर उरलेलं पाणी लगेच पुन्हा तळ्यात पडलं. पिवळा प्रकाश गायब झाला, तळ्याचा पृष्ठभाग पुन्हा काळाशार दिसू लागला होता. गाणं संपलं होतं. शेवटच्या उसळीनंतर आकाशातच राहिलेले आणि मग वाऱ्याने इकडे आलेले तुषार चेहऱ्यावर रेंगाळत होते. 
पुलाच्या पलीकडून काकूने हाक मारली तेव्हा त्या समाधीतून बाहेर पडून तिच्याकडे गेलो. मग तिच्याबरोबर आणि काकाबरोबर सकाळच्याच रस्त्यावरून पुन्हा पलीकडे उभा असलेला बुर्ज खलिफा पाहत राहिलो. “Dream come true?” काकूने हसून विचारलं. मी फक्त हसलो. मग आम्ही चौघांनी निःशब्दपणे पाण्याचा अजून एक शो पाहिला आणि परत निघायला सूक अल बहारच्या आत जायला लागलो. जाण्यापूर्वी मी शेवटचं एकदा म्हणून त्याच्याकडे पाहायला वळलो.    


                                                                        
आधी मला या क्षणी कसं वाटेल हे माहित नव्हतं; पाय निघेल का नाही कल्पना नव्हती. पण तसं काही झालं नाही. गेले दहाबारा तास माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात विलक्षण आणि अविस्मरणीय क्षणांपैकी होते. कुठेही कसलाही अपेक्षाभंग झालेला नव्हता; झालंच तर एकदोन सुखद धक्केच होते. या सगळ्यामुळे मी समाधानी होतो आणि आता माझी कशाविषयी कसलीच तक्रार नव्हती; कसली काळजीही नव्हती. तृप्त मनाने मी काकाच्या गाडीत मागे जाऊन बसलो आणि सीटबेल्ट लावला. रस्त्याला लागल्यानंतर काही काळाने मी मागे वळून खिडकीतून डाऊनटाऊन दुबईकडे एक नजर टाकली. 
तो तिथेच होता; रोज रात्री असायचा तसा. सगळ्यांची नजर चुकवून मी त्याच्याकडे पाहून हळूच डोळे मिचकावून घेतले.    

The Dubai Diaries continue on DD14

                                                                                               

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प