Dubai Diaries: मरुभूमिवर १


“ऊठ,” काका मला हळूच हलवत म्हणाला. मी आळस देऊन तसाच पडून राहिलो तेव्हा तो हसून म्हणाला, “अरे, दुबई संपली नाहीये अजून.”
वास्तविक मी आजही तितक्याच उत्साहात होतो. दुबईच्या ट्रीपचा पूर्वार्ध बुर्ज खलिफाकडे डोळे लावून बसण्यात आणि उत्तरार्ध त्याच्या आठवणीत हरवून बसण्यात घालवला असता तर अल एय्न, IMG, मरिना आणि इतर अविस्मरणीय अनुभवांची मजा कशी घेता आली असती? आणि असेच काही अनुभव आता रांग लावून उभे होते, तेव्हा मी बुर्ज खलिफाचा विचार डोक्यातून पूर्णपणे काढून टाकला. त्याला दिलेल्या भेटीत जे काही करायची माझी इच्छा होती, ते सगळं करून झालेलं होतं. शिवाय रोज रात्री तो दिवे मिचकावताना दिसणार होताच. तेव्हा मी माझं लक्ष आजच्या मोहिमेवर केंद्रित केलं. 
आज खऱ्या अर्थाने वाळवंटात आल्याचं चीज होणार होतं. आमची संध्याकाळ व्यापलेली होती ती म्हणजे, बाकी काही कृत्रिम उचापती केलेल्या नसत्या तरी ज्या एका कारणासाठी दुबई आणि तिचे भाऊबंद प्रसिद्ध झाले असते त्या ‘डेझर्ट सफारी’ या खास आकर्षणाने! सकाळी काकाने जे काही थोडंसं वर्णन केलं होतं त्यावरून तरी तो प्रकार फारच रोमांचक वाटत होता. राजस्थानला जाऊनही प्रत्यक्ष वाळवंटाकडे न फिरकल्यामुळे त्या दिवशी मी पहिल्यांदाच ‘खऱ्या’ वाळवंटात पाऊल ठेवणार होतो. अनेक सिनेमांमध्ये दाखवल्याप्रमाणेच ते असेल का अशी परत जरा काळजी वाटायला लागली होतीच. लालसर पिवळ्या रंगाच्या, क्षितिजापर्यंत पसरलेल्या वाळूच्या अगणित लाटा. गोठून गेल्यासारख्या दिसणाऱ्या. कसलं झाड नाही, झुडूप नाही, पशुपक्षी नाही किंवा माणूसही नाही! नजर पडेल तिकडे फक्त दोन रंग - पिवळा आणि आकाशी. (हे चित्र मनात तयार व्हायला टिनटिनचा Secret of the Unicorn नावाचा ॲनिमेटेड सिनेमा कारणीभूत होता असं जरा वेळाने लक्षात आलं. वास्तव अर्थातच यापेक्षा खूपच वेगळं निघालं.)
  ही सफारी ‘दुपारी कोण वाळवंटात मरायला जाईल’ हे तत्त्व मनात ठेवून फक्त संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारासच उपलब्ध होती, पण त्यामुळे सकाळ मात्र सगळी मोकळीच राहिलेली होती. बुर्ज खलिफाला गेल्याच्या आदल्या रात्रीच मी ते Maze Runner पुस्तक संपवून टाकलेलं असल्यामुळे काय करायचं हा प्रश्नच होता. बहीण शाळेत गेलेली होती. काही नाही तर टी.व्ही. बघत बसू शकलो असतो, पण बाहेर दुबई हाका मारत उभी असताना घरी बसून पुण्याला बघतो त्याच सगळ्या गोष्टी काय बघायच्या? तेव्हा काका-काकूच्या सुचवण्यावरून मी आणि बाबा दुबईतल्या माणसाची फावल्या वेळातली सर्वात लोकप्रिय करमणूक पुन्हा अनुभवायला निघालो, पण यावेळी मॉलमध्ये न जाता घराच्या त्याहीपेक्षा जवळ असलेल्या ‘लुलु हायपरमार्केट’ मध्ये जायचं ठरवलं. संध्याकाळसाठी एकदोन गोष्टी घ्यायच्याही होत्याच. तसंही, ‘घरातलं संपत आलंय म्हणून आणायला हवं’ या निरागस हेतूने कोणीच मॉलमध्ये जात नसतं हे माहित असल्यामुळे, आज आमचा तो हेतू होता तर साध्या मार्केटमध्ये जाणं हेच योग्य नव्हतं का?  
चालत जाऊन त्या ‘हायपरमार्केट’ नावाच्या इमारतीकडे एक कटाक्ष टाकल्यावर त्याच त्या इंग्लिश शब्दांचे वेगवेगळ्या ठिकाणी किती भिन्न अर्थ होतात हे जाणवलं. त्यांनी ज्याला हायपरमार्केट असं नाव दिलं त्याला आपण आपल्याकडे मॉल म्हटलं असतं. (आणि नुसतं मॉल नाही, तर ‘छ्या गेला सगळा रविवार मॉल’ म्हटलं असतं) ते ज्याला मॉल म्हणतात त्यासाठी आपल्याकडे शब्दच नाही. तरी आपली परिभाषा पुष्कळ सोपी म्हणायची! आपल्याकडे सुपरमार्केट नावाच्या रेंजमध्ये बिग बझार पासून ते एकाऐवजी दोन शेजारचे गाळे मिळाल्यामुळे पाटीवर ऐटीत ‘सुपरमार्केट’ असं लिहून ठेवलेलं किराणामालाचं दुकान इथपर्यंतचं सगळं येतं. दुबईत अशी लहान दुकानं असणारच नाहीत असं वाटलं होतं. आमच्याच उपनगरीय भागात चालत जायच्या अंतरावर एक प्रचंड मॉल आणि एक हे ‘हायपरमार्केट’ असल्यावर त्यांची गरज काय? पण असतात. मग मी नंतर विचार केला की, दिवसाच्या कुठल्याही वेळी पटकन काहीतरी हवं असेल तर या भुलभुलैयांमध्ये खेळत बसण्याएवढा वेळ कुणाकडे असेल? आमच्याकडे मात्र संपूर्ण सकाळ मोकळी पडलेली होती, म्हणून आम्ही शांतपणे त्या हायपरमार्केटमध्ये जाऊन काही खरेदी करण्यासाठी हुडकायला लागलो. तिथलं उंटिणीच्या दुधापासून बनवलेल्या ‘लबान’ नावाच्या खास विशिष्ट चव असलेल्या ताकाची एक मोठी बाटली आणि इतर काही वस्तू घेऊन परतलो. 
संध्याकाळी चार-साडेचारच्या सुमारास आम्ही घरातून बाहेर पडून खाली आमची गाडी येण्याची वाट बघत उभे राहिलो. डेझर्ट सफारी हे एक विस्तृत नेटवर्क आहे. दुबई जवळच्या वाळवंटात ठिकठिकाणी वेगवेगळ्या सफारी कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पचा काही विशिष्ट ड्रायव्हर्सशी करार असतो. काका-काकूने ही सफारी यापूर्वी अनेकदा केलेली असल्यामुळे त्यांची कॅम्प ठरलेलीच होती आणि ड्रायव्हरही ओळखीचा होता. सफारीचा मुख्य कार्यक्रम त्या कॅम्पमध्ये होतो आणि तो काय असेल ते प्रत्येक कॅम्प ठरवते. मग त्या कॅम्पमध्ये नोंदणी केलेल्या सगळ्या लोकांना शहराच्या विविध भागांतून घेऊन यायचं काम या ड्रायव्हर्सचं असतं. याशिवाय ते आणखी एक भन्नाट कामही करतात असं तिथे पोहोचल्यावर मला कळलं. 
दरम्यान आमचा ड्रायव्हर येऊन थांबला होता. तो आम्हा चौघांना आणि शिवाय दोन इतर ‘आशियन’ लोकांना घेऊन जाणार असल्यामुळे, गाडी अर्थातच चांगली मोठी SUV होती. सगळ्यात मागच्या भागात ते दोघेजण शांतपणे बसलेले होते. बाबा पुढच्या सीटवर बसले आणि उरलेले आम्ही तिघं मधल्या सीट्सवर बसलो. अल एय्नला जाताना आलेल्या चांगल्या अनुभवाला स्मरून मी याहीवेळेस मध्यभागी बसलो, आणि मला पुढचा रस्ता पुन्हा व्यवस्थित पाहता आला. आमचे ड्रायव्हर भारतीयच निघाले, त्यात काकूने त्यांना ‘अंकल’ असं संबोधल्यानंतर सगळीच औपचारिकता जाऊन उर्वरित प्रवास आम्ही त्यांच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. मधूनमधून इंग्लिशमध्ये बोलत असूनही आमच्या मागच्या आशियन लोकांनी त्यात अजिबात भाग घेतला नाही. त्यांची पहिलीच वेळ असेल बहुधा. मग माझ्या अचानक असं लक्षात आलं, की त्यांची असो वा नसो आमची तरी नक्कीच पहिलीच होती, पण काका-काकूसोबत आम्हीही सराईत असल्यासारखे वावरत होतो. त्यांच्यामुळे अशा ठिकाणी एरवी जाणवतो तो एक पडदा इथे कुठे जाणवत नव्हता; ते बरोबर असल्यामुळे दुबईच आमच्याकडे पाहुणे म्हणून बघायच्या ऐवजी घरचे म्हणून बघत होती. (म्हणजे जितकं शक्य आहे तितकं ‘घरचं’, कारण तिच्या दृष्टीने एरवी घरचेही पाहुणेच असतात)
दुबईतून बाहेर पडेपर्यंत काही विशेष घडलं नाही. मी हळूहळू रस्ता निमुळता होत गेला, आजूबाजूची झाडी जरा वाढायला लागली. अधूनमधून पामची आणि काही फळांची शेतीही लागत होती. ती झाडं पाहून मला खजूर आठवायला लागले. काका कधीही दुबईहून भारतात आला की न चुकता खजूर आणायचा, आणि ते खरंच खूप गोड आणि चविष्ट असत. खजुरापासून बनवलेले इतर अनेक पदार्थही इथल्या मॉल्समध्ये आणि दिएरातल्या गल्ल्यांमध्ये मिळतात असं काकाने नंतर सांगितलं. खूप काळ मला दुबईत फक्त खजुराचंच उत्पादन होतं असं वाटायचं. त्या सगळ्या देशातल्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण जमिनीचा खूप मोठा भाग खजूर उत्पादनासाठीच आहे हे खरं असलं, तरी टोमॅटो, कोबी वगैरेंसारख्या भाज्यांचीही शेती तिथे आहे. फळांमध्ये मुख्यतः आंबे आणि संत्री. यापैकी बहुतांश उत्पादन रास-अल-खाईमा या भागात होतं; दुबईत तशी शेतं कमीच आहेत. पण तीच आता आमच्या दोन्ही बाजूंना लांबवर पसरलेली होती. मध्येच एका झाडांच्या समूहाकडे बोट दाखवून ‘अंकल’नी ते संत्र्याचं शेत असल्याचं सांगितलं. त्यानंतर बराच काळ आमच्या उजवीकडे एक खूप मोठी भिंत होती. तो राजघराण्याचा एक महाल होता असं कळलं. मग त्या भिंतीच्याच कडेकडेने जाऊन आम्ही उजवीकडे वळलो आणि एका चेकपॉईंटपाशी आलो. 
त्या दिशेने वाळवंटात जाणाऱ्या सगळ्या गाड्यांचा तो ठरलेला नाका होता. आपल्याकडच्या ढाब्यांसारखाच. इथे आम्ही सगळे उतरलो, कारण गाडीवरही एक खास प्रक्रिया करायची होती. वाळवंटात गेल्यावर, जिथे रस्ताच नाही तिथे नुसत्या वाळूवरून गाडी चालवत न्यायची असल्याने तिच्या सगळ्या टायर्समधली हवा कमी करायला हवी होती. यामागचं कारण तसं सोपं आहे. हवेने टम्म फुगलेलं टायर आपल्या रस्त्यांवर उत्तम चालतं, पण तिथे ते वाळूत जाऊन बसतं आणि मग नुसती ती इकडेतिकडे उडवत राहतं. वाळूवरून फिरताना योग्य वेळेला ते दबलं गेलं पाहिजे; म्हणून हा सगळा खटाटोप. हे चालू असताना आम्ही पाण्याच्या एकदोन बाटल्या घेण्यासाठी तिथल्या एका दुकानात जाऊन आलो. शिवाय मी आणि काकूने दोन ओढण्या घेतल्या आणि त्या दुकानातल्या लोकांनी आम्हाला त्या खास अरबी पद्धतीने बांधून दिल्या. तिथे तसा एक फोटो काढायचा विचारही केला होता पण ती जागा महालाच्या इतक्या जवळ असल्याने आम्हाला तसं करू दिलं नाही. मग आम्ही परत आमच्या जागांवर बसलो. आशियन लोक कधीच येऊन थांबलेले दिसत होते. मग अंकलनी गाडी सुरु केली. हवा किंचित कमी झाल्याची थोडीशी जाणीव होत होती. बघताबघता ती छोटी दुकानं, ती महालाची भिंत आणि मग उरलीसुरली झाडीही लहान होत दिसेनाशी झाली आणि त्यांची जागा कोणीच घेतली नाही. आता आम्ही एका अरुंद रस्त्यावरून पळत होतो; समोर क्षितीजाच्या जवळ येणारा सूर्य होता आणि त्याच्या आणि आमच्यामध्ये फक्त वाळूचं साम्राज्य पसरलेलं होतं. 
एक नवीन, वेगळ्याच प्रकारची थ्रील राईड आमच्या नशिबात होती. अचानक एका ठिकाणी आम्ही रस्ता सोडून सरळ त्या अथांग पसरलेल्या, सुरकुत्यांनी भरलेल्या केशरी पिवळ्या जाजमावर अवतरलो. याक्षणी अंकलनी एकदा मागे बघून सगळ्यांनी सीटबेल्ट लावल्याची खात्री करून घेतली, आणि दुबईत कधीही गाडीच्या काचा बाय डिफॉल्ट बंदच असूनही त्याही तपासून घेतल्या. मग गिअर बदलून त्यांनी सरळ समोरच्या अजस्त्र ड्यूनकडे आमची गाडी हाकली. वाळवंटाच्या सपाट भागातून आम्ही आता लाटांसारख्या पसरलेल्या ड्यून्सच्या प्रदेशात जात होतो. जसा तो ड्यून जवळ यायला लागला तसा अधिकच मोठा वाटायला लागला. अगदी त्याच्या पायथ्याशी पोहचेपर्यंत समोरच्या काचेतून आकाश दिसत नव्हतंच. मग आमची गाडी तितक्याच सहजपणे सरळ तो तसा अवघड चढ चढू लागली. आता तिरप्या झालेल्या गाडीत बसून समोरच्या काचेतून आकाशाकडे पाहणं आणि ‘प्रिडेटर’ राईडमध्ये हळूहळू वरच्या छताकडे सरकण्यात जो काही फरक होता तो हृदयाच्या दृष्टीने गैरलागू होता. तशी ही चढण तुलनेने खूपच लवकर संपली, पण उतार मात्र अगदी तसाच होता. 
ड्यूनच्या माथ्यावर गेल्यावर लगेच दुसऱ्या बाजूने उतरायला लागलो असलो तरी एकदम खालपर्यंत गेलो नाही. मध्येच उतारावरच गाडी चक्क वळली आणि त्या उतरत्या वाळूच्या भिंतीवरून आडवी पळायला लागली. हे तसं आधीच्यापेक्षा जरा जास्त भीतीदायक होतं, कारण कुठल्याही क्षणी गाडी उजवीकडे कलंडून लोळत लोळत खाली जाईल अशी भीतीही त्यात मिसळली होती. पण अंकलची ‘व्हील’वरची कमांड जबरदस्त होती. अचानक त्यांनी गाडी पुन्हा वळवून थेट खाली नेली. असं अचानक दोनदा वळल्यामुळे आम्ही वळलो त्याच्या विरुद्ध दिशेला वाळूची कारंजी उडाली आणि काचा क्षणभर पूर्ण अपारदर्शक झाल्या. हे असेच प्रकार त्यानंतर आम्ही अनेकदा अनुभवत आम्ही ड्यूनमागून ड्यूनचा फडशा पाडत राहिलो. सुमारे दहापंधरा ड्यून्स असे उभे-आडवे चेपून झाल्यानंतर आमची गाडी बऱ्यापैकी सपाट जमिनीला लागली आणि त्याच वेगाने पळत आम्ही वाळवंटात लांब जात राहिलो. ही पंधरा-वीस मिनिटांची दीर्घ, पण जवळपास तितकीच थरारक राईड चालू असताना आमच्या तोंडून जे अगणित उत्स्फूर्त उद्गार निघाले, त्यात त्या मागच्या अबोल आशियन दोघांचे कधी मिसळले कळलंही नाही. 
आता आम्ही एका वाळूच्या पठारावर उभे होतो आणि जरा पुढे असलेल्या एका खोलगट जागेत आमची कॅम्प दिसत होती. तिकडे जाण्यापूर्वी आम्ही खास वाळवंटातल्या काही गोष्टी करून घ्यायचं ठरवलं. सर्वप्रथम आमचं लक्ष वेधून घेतलं ते एक ससाणा घेऊन उभ्या असलेल्या एका माणसाने, तो ‘या, काही होत नाही’ अशा अर्थाच्या खुणा करून आम्हाला बोलवत होता. मी जवळ गेल्यावर त्याने पहिल्यांदा मला हात पुढे करायला सांगितलं, आणि मग माझ्या मनगटावर त्याने त्या ससाण्याला ठेवलं. त्या पक्षाची ‘ग्रिप’ मला ठळकपणे जाणवत होती, पण त्याच्या तीक्ष्ण नख्यांनी मला अजिबात इजा न होऊ देता तो माझ्या हातावर बसला होता. माझ्या अपेक्षेपेक्षा थोडा जड होता इतकंच. पूर्वी एकदा हिमाचल प्रदेशातल्या एका ट्रीपमध्ये मी ससा धरला होता तशासारखाच हाही अनुभव होता; फरक एवढाच की हा पक्षी मला अजिबात भाव देत नव्हता. तो शांतपणे विचारात गढून गेल्यासारखा दूर कुठेतरी नजर लावून बसला होता. फोटो काढल्यानंतर त्या माणसाने त्या ससाण्याला माझ्या तळव्यावर बसवलं, मग खांद्यावर, मग डोक्यावर. ती अरबी ओढणी अजून डोक्याला होती म्हणून ठीक. तो पक्षी कधी बावरला नाहीच; फक्त काहीसा कंटाळलेला वाटला. पूर्वी ससाण्यांना बहुधा संदेशवहनासाठी पाळून ट्रेनिंग देणं वगैरे अरबी परंपरेत होतं, पण या ससाण्याने समजा कधी ते काम केलं असलं तरी त्याला रिटायरमेंट फारशी आवडलेली दिसत नव्हती. 
तिथे एकामागे एक अशा खूप Quad Bikes (चारचाकी बाइक्स) रांगेने मांडून ठेवलेल्या होत्या. तिथल्याच ट्रॅकवर ती चालवायला मिळायची. ट्रॅक असा ठरलेला नव्हता; फक्त पूर्वीच्या गाड्यांनी फिरवून फिरवून केलेल्या पट्ट्यांवरून ती गाडी फिरवायची होती. ते वर्तुळ तसं बऱ्यापैकी मोठं होतं, पण त्या बाइकची सवय होऊन तिला सतत वळतं ठेवायला जमेपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावरही आमचा ठसा उमटून गेला होता. मग मी आणि बाबांनी आळीपाळीने एक गाडी त्या वर्तुळात फिरवली. गर्दी काही नव्हतीच; आमच्याशिवाय दुसरी एक गाडी तिथे फिरत होती. त्याशिवाय त्या मालकांपैकीच एक सगळ्या परिसरावर लक्ष ठेवायला स्वतःच्या गाडीवरून चकरा मारत होता. मी सूर्य अगदी क्षितिजाला टेकेपर्यंत मनसोक्त वाळू डिस्प्लेस करून घेतली. मग आम्ही कॅम्पला जाण्यापूर्वी वाळवंटातल्या एका ठरलेल्या आकर्षणाकडे गेलो.                                 
तिथे काही उंट उभे होते आणि त्यांचे राजस्थानी वाटणाऱ्या पोषाखातले मालक त्यांच्यावर बसणाऱ्या शहाण्यांना दोनचार चकरा मारून आणत होते. खरंतर उंटावर बसून ड्यून चढायला मजा आली असती, पण त्यांना बहुधा कॅम्पपासून फार लांब जायचं नव्हतं. त्या ससाण्यापेक्षा उंट जरा जास्त उत्साहात वाटले. दोन युरोपियन्सची फेरी झाल्यानंतर आम्ही चौघं दोन उंटांवर चढलो. त्या मालकांनी चुचकारल्यावर उंट अचानक उभे राहिले तेव्हा जोरदार हादरा बसला, पण त्यानंतर चारपाच चकरा संथपणे डुलत डुलत पार पडल्या. उंटावरून उतरण्याचा कार्यक्रम काही तेवढा नीट नाही झाला; आमचा उंट एकदम खाली बसल्यावर मी अंबारीच्या समोरच्या भागावर आपटून मग घसरून उंटावरून खाली पडलो. हादरा बसला होता, पण लहानपणी Sandpit मध्ये खेळताना कुणाला कधी लागल्याचं आठवतंय का? तिथून जाताना काकाप्रमाणेच मी उंटाच्या डोक्यावरून हात फिरवला, तेव्हा वेगळ्या माणसाचा स्पर्श झाल्यामुळे तो दचकेल अशी थोडीशी धास्ती वाटत होती, पण त्याने तसं काही केलं नाही. आता त्याला त्या हात फिरवण्यामागची भावना कळली, का मालकासमोर दचकायची भीती वाटली कळायला मार्ग नव्हता. 
डेझर्ट सफारीमधल्या सगळ्या ‘स्टार्टर’ गोष्टी अशा यथासांग पार पडल्या होत्या, तरी अंधार पडायला लागेपर्यंत आम्ही ड्यून्स चढून काही फोटोही काढून घेतले. ते चढणं तसं अवघडच होतं. मध्येच पाय सरळ आत जाऊन तोल जाई. कसेबसे आमच्या पोझेस टिकवून धरत आम्ही तिथे गेल्याचं शिक्कामोर्तब केलं. माझ्या आग्रहावरून काकाने माझ्या वाळूतून चालणाऱ्या पावलांचा एक व्हिडिओ काढला. मग कॅम्पच्या कुंपणावरचे आणि दरवाजावरचे दिवे लागले तसे आम्ही तिच्याकडे चालत निघालो.                                         

  

The Dubai Diaries continue on DD15

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प