Dubai Diaries: मरुभूमिवर २
कॅम्प म्हणजे फक्त वाळवंटातल्या एका सपाट भागात कुंपणं घालून बंदिस्त केलेलं मोठं आवार. पण आतमधून ते खूप छान सजवलेलं होतं. मध्यभागी एक मोठा चौकोनी प्लॅटफॉर्म होता. त्याच्या चारही बाजूंना बैठका मांडून ठेवलेल्या पाहिल्यावर रात्रीच्या कार्यक्रमांसाठी तो रंगमंच असल्याचं कळलं. बैठकीचा थाट काय होता! रंगीबेरंगी, गुबगुबीत गाद्या पसरून ठेवलेल्या, त्यांच्यावर ठिकठिकाणी छोटीछोटी टेबलं, मांडी घालून बसलं तर सहज उंचीला येतील अशी आणि मखमली कापडांनी अंथरलेली. टेबलाच्या आजूबाजूला एकदोन तितक्याच गुबगुबीत उशा. आणि टेकायला लोड तर हवेतच! थोडक्यात सगळीकडे वर्णनांमध्ये वाचलेल्या किंवा कुठल्याही कार्यक्रमात पाहिलेल्या अरबी बैठकांमधले फक्त हुक्के वगळता बाकीचं सगळं तसंच होतं. अशात त्या रंगमंचावर उर्दू शायरीची मैफल वगैरे जमली असती तर चित्र पूर्ण झालं असतं, पण त्याऐवजी आमच्यासमोर श्रीमंत अरबांच्या ‘तंबूतल्या करमणूकी’ सादर होणार होत्या.
कॅम्पच्या मध्यभागी हे सगळं तर कुंपणाला लागून तिन्ही बाजूंना पंधरासोळा गाळे होते. त्यातल्या काहींमध्ये आमच्या रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु होती. फाटक ओलांडून कॅम्पच्या आवारात पाऊल ठेवल्याबरोबर पहिल्यांदा आमचं लक्ष गेलं ते कोपऱ्यातल्या सँड-आर्टच्या स्टॉलकडे. एकावर एक रचलेल्या चार काचेच्या कप्प्यांमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या काचेच्या बरण्या मांडून ठेवलेल्या होत्या, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांची वाळू भरून सुंदर चित्रं रेखाटलेली दिसत होती. जांभळ्या, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या आकाशासमोर फिकट पिवळ्या रंगाचं वाळवंट आणि त्यात काळ्या रंगाचे उंट हे एक लोकप्रिय डिझाईन वाटत होतं. शिवाय तो कलाकार त्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याच काळ्या रंगाने आपल्याला हवे ते लिहूनही देत असे. सगळं रंगीत वाळूपासून. या डिस्प्लेच्या मागे त्या कलाकाराचा छोटासा स्टुडिओचा होता म्हणा ना. वेगवेगळ्या रंगांची वाळू मोठ्या परातींमध्ये भरून ठेवलेली होती आणि एका कप्प्यात त्याचे खास त्या वाळूला आकार देण्याचे बोरू, कुंचले वगैरे दिसत होते. एका बरणीची किंमत तशी जास्त होती, म्हणून आम्ही एकूण खर्च कमी करायला चार बरण्या घ्यायचं ठरवलं. एका मोठ्या बरणीत आम्हा चौघांची नावं घालायचं ठरवलं आणि उरलेल्या तिन्ही काही खास लोकांना देण्यासाठी म्हणून ठेवल्या. सगळी नावं त्याला लिहून दिली आणि त्याच्याशी सौदा करायचं काम काकूवर सोपवून आम्ही डावीकडच्या पहिल्या गाळ्याकडे गेलो.
तो तसा रिकामाच होता आणि आत कोणी माणूस नव्हता, पण कोपऱ्यात खुंट्यांवर काही मोठे कपडे अडकवून ठेवलेले होते. नीट पाहिल्यावर ते अरबी अंगरखे असल्याचं कळलं. पोषाखात फोटो काढण्याची हौस म्हणून ठेवलेले. आम्ही दोघांनी एकेक अंगरखा परिधान केला आणि काकाने आमचे फोटो काढले. तेवढी पाचएक मिनिटं स्वतःला राजपुत्र वगैरे समजायला मजा आली. मग मी अशी कल्पना रंगवायला लागलो की मी दोन-अडीच शतकांपूर्वी या ओसाड वाळवंटात माझा उंट घेऊन फिरत आहे आणि माझ्या सोबत्यांना आणि मला ही समुद्राकाठची सपाट जमीन वसाहतीसाठी अनुकूल असल्याचं सापडलंय (तोपर्यंत कानांवर पडलेल्या इतिहासात दुबईची सुरुवात मच्छिमारांची वस्ती म्हणून झाल्याचं आठवत होतं) आणि आम्ही तिथे स्थायिक होऊन दूरदूरच्या व्यापाऱ्यांना आकर्षित करून घेतील अशा वस्तू विकून आमच्या या खेड्याचे नाव त्या हजारो मैल पसरलेल्या अजस्त्र मरुभूमिवर अजरामर करू, अशा विचारात पडलो. मग असा विचार करू लागलो, की दुबईतले ते पहिलेवहिले अरब आज हयात असते तर आत्ताच्या दुबईकडे पाहून त्यांच्या मनात कोणती भावना आली असती? आपली इवलीशी वसाहत आजच्या जगातल्या सर्वात महत्त्वाच्या ग्लोबल शहरांपैकी एक झालेली पाहून त्यांचे ऊर अभिमानाने भरून येईल, का त्या प्रयत्नात दुबई स्वतःचे ‘अरबीपण’ जवळपास पूर्णपणे हरवून बसली हे पाहून त्यांच्या काळजात गलबलेल? अर्थात, नीट परिस्थिती समजावून घेतल्यावर यात काही फार तथ्य आढळत नाही. दुबईत अजूनही अरबी परंपरेला, भाषेला आणि अनेक अंशी संस्कृतीलाही आज तेच मानाचे स्थान आहे, आणि तसंही नूतनीकरण झाल्यावर संस्कृती हरवते हा क्षुद्र विचार आहे. आणि समजा मुख्य शहरात पूर्वीच्या अरबी जीवनशैलीचा फील येत नसेल म्हणून काय झालं? त्याक्षणी तरी मी अशा ठिकाणी होतो की जिथे मला तीच शतकांपूर्वीची जीवनपद्धती न्याहाळता आणि अनुभवता येणार होती, आणि हा अनुभव मला कसलाही त्रास न होता घेऊ देण्याची खबरदारी दुबईनेच घेतलेली होती.
ते अरबी अंगरखे उतरवून ते काही उत्साही युरोपियनांच्या हाती दिल्यानंतर आम्ही इतर गाळे बघत पुढे गेलो. पण दुकानं, किंवा अशा प्रकारचे ‘उपक्रम’ वगैरे असलेले गाळे पुढे फारसे नव्हतेच. बहुतेकसे बंद होते; तिथे आतमध्ये रात्री आमच्यासमोर सादरीकरण करणार असलेले कलाकार तयारी करत असावेत असा तर्क मी केला. तो नंतर बरोबरच असल्याचं कळलं, कारण त्यांच्या शोसाठी त्यांना लागणाऱ्या भरमसाठ गोष्टी आणि पूर्वतयारी पाहता त्यांचा ‘कॅम्प’ही अगदीच जवळ कुठेतरी असायला हवा होता. आत्तापर्यंत सूर्यास्त होऊन गेला होता आणि आवार ठिकठिकाणी लावलेल्या दिव्यांनी आणि काही मशालींनी उजळलेलं होतं. आम्ही आधी त्या चौकोनी स्टेजच्या एका बाजूला असलेल्या एका बैठकीत एका टेबलापाशी जागा धरली आणि मग एकेक करून आमचं जेवण आणायला गेलो. लवकर हालचाली केल्यामुळे आम्हाला अगदी मोक्याची जागा मिळाली होती; स्टेजला लागूनच असलेल्या रांगेत आम्ही होतो.
आवाराच्या टोकाला असलेल्या दोन मोठ्या गाळ्यांमध्ये बुफेच्या रांगा होत्या; एक व्हेज आणि एक नॉन-व्हेज. आम्ही अर्थातच आधी नॉन-व्हेजच्या गाळ्यात शिरलो आणि काही कबाब आणि इतर प्रकारचे भाजलेले किंवा बार्बेक्यू केलेले पदार्थ वाढून घेतले. त्यानंतर बघायला म्हणून त्या शेजारच्या व्हेज गाळ्यातही डोकावलो. तिथे एकदोन प्रकारचे पुलाव, मसालेदार भाज्या वगैरे असा सगळा नेहमीचाच बेत होता. शिवाय तिथे ‘सॅलड पास्ता’ नामक प्रकारही दिसला, तो मला जरा आकर्षक वाटल्यामुळे मी तो घेतला. पण सॅलड असल्यामुळे तो तसा फक्त कोथिंबीर वगैरेंनी सजवलेला कोरडा पास्ता होता असं कळलं आणि तो अगदीच बेचव लागला; त्यामुळे मला तो आवडला नाही. कदाचित शेजारी नॉन-व्हेजच्या परातींकडे एक कटाक्ष टाकून आपण ‘हेल्थ फूड’ वर भर देणारे असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांसाठी तो तिथे ठेवलेला असावा. कबाब वगैरेंनी मात्र पूर्ण तृप्त केले. याशिवाय एक डेझर्ट बारसुद्धा होता; तिथे खजुराचं काहीतरी असेल असं आपलं मला वाटलं होतं. पण तिथेही बऱ्यापैकी जनरलच गोष्टी होत्या.
आमच्या जाण्यायेण्याच्या फेऱ्या चालू असतानाच त्या फाटकापासच्या माणसाने आम्हाला हळूच एकेक करून आमच्या चारही बरण्या आणून दिल्या. कागदात व्यवथित गुंडाळलेल्या. पण आम्ही तो गेल्यावर तो कागद काढून नावं बरोबर असल्याची खात्री करून घेतली. पूर्वी एकदा मनालीला ट्रिपला गेलेलो असताना तिथल्या ‘मॉल रोड’ वरच्या काही उत्कृष्ट कलाकारांकडून एक नावाच्या पाटीसारखी पाटी करून घेतली होती तो प्रसंग आठवला. ‘मी, आई आणि बाबांनी मनालीला या दिवशी भेट दिली’ अशा अर्थाचं ते वाक्य त्यांनी अतिशय सुंदर फॉन्टमध्ये एका लाकडी पाटीवर काढून दिलं, शिवाय मागे काही डोंगर आणि झाडंही काढली होती. पण त्यांच्याकडून चुकून एका ‘and’ ची जागा बदलली गेल्यामुळे ते अचानक अर्थहीन वाटायला लागलं, तेव्हा आमच्या विनंतीवरून त्यांनी कौशल्याने ती चूक दुरुस्त केली आणि त्या पाटीच्या सौंदर्याला कसलाही धक्का लागला नाही. पण तरी, इतक्या बारकाईने बनवलेल्या कलाकृती एकदा तपासून घेण्याची सवय लागलीच आहे आता. यावेळी आम्ही कागदावर स्वच्छ (तेही आधी स्पेलिंगवरून आपसात वाद घालून) लिहून दिलेलं असल्यामुळे सगळं योग्य तसं झालं होतं. बरणीतलं रंगांचं कॉम्बिनेशन पण आम्ही डिस्प्ले पाहून ठरवल्याप्रमाणेच होतं. त्या सुबक लहान तोंडाच्या बरण्यांमध्ये वाळूने रेखाटलेल्या दृश्यात, बहुरंगी आकाशात आमची आणि आम्ही ज्यांना या भेट देणार होतो त्यांची नावं नक्षत्रांसारखी दिसत होती. त्या नावांच्या काळ्याशार अक्षरांच्या सावलीत खाली वाळूच्याच रंगाच्या वाळूवरून उंट मजेत चालत होते.
काही वेळ कौतुकाने त्यांच्याकडे पाहून आम्ही त्या पुन्हा जेवणाकडे लक्ष वळवलं, पण तेव्हाच रात्रीच्या कार्यक्रमालाही सुरुवात होत होती. एकूण तीन कार्यक्रम होते, आणि ते घडत गेले तसंच त्यांचं स्वरूप आमच्या लक्षात येत गेलं. फक्त तिसऱ्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला आधीपासून कल्पना होती, आणि तो होता ‘बेली डान्स’. पण त्याच्याआधीचे दोन कार्यक्रम अगदीच अनपेक्षित आणि खूपच विलक्षण निघाले.
सर्वप्रथम एक लांब केस असलेला माणूस स्टेजवर अवतरला. त्याला पाहून मला एकदम ‘नटरंग’ सिनेमातल्या तमाशाची आठवण झाली. त्याचे कपडे खूप रंगीबेरंगी होते. तो आला स्टेजवर नाचत नाचतच. मग त्याने आमच्यासमोर खूप वेगवेगळ्या करामती करून दाखवल्या. त्यातली माझ्या विशेष लक्षात राहिली ती म्हणजे त्याने केलेला टोपीचा खेळ. त्याच्या डोक्यावर असलेली, एका गोल चाळणीसारख्या आकाराची हिरवी टोपी त्याने मध्येच काढली आणि ती तालावर हातात गोलगोल फिरवायला लागला. मग शिताफीने त्याने त्यातून आधीच्यासारखीच एक दुसरी टोपी काढली आणि दोन्ही एकत्र फिरवू लागला. त्याच्या हालचाली अगदीच सराईत नर्तकासारख्या होत्या. मग त्याने त्याच टोपीतून तिसरी, चौथी, पाचवी अशा टोप्यामागून टोप्या काढल्या आणि फिरवत राहिला. काही खास क्षणी तो ऑलिम्पिकच्या एकमेकींत अडकलेल्या कड्याच घेऊन फिरवत असल्यासारखं वाटत होतं. मग अचानक त्याने त्या सगळ्या क्षणात एकमेकांमध्ये घालून पुन्हा त्याची जुनी टोपी बनवली आणि ती डोक्यावर घालून थांबला. लोकांच्या टाळ्या संपेपर्यंत तो दम खात उभा होता.
मग मात्र त्याने कमालच केली. त्याच्या कपड्याला कमरेपासून पुढे जोडलेला मोठा झगा त्याने सुटा केला आणि स्वतःभोवती आवर्तने घ्यायला सुरुवात केली. हे असं कितीतरी मिनिटं स्वतःभोवती फिरत राहू शकणाऱ्या लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. या माणसाचं हे नृत्य पाहून मी तसाच भारावून गेलो होतो. आधी दहा मिनिटं झाली, मग पंधरा…. मग वीस. तो थांबतच नव्हता. उलट त्याच्या त्या भोवऱ्यासारख्या गरगर फिरणाऱ्या झग्याकडे पाहून आम्हालाच चक्कर यायला लागली होती. मग त्याने गती कमी केली तेव्हा झालं असं वाटून मी हुश्श करत टाळ्या वाजवायची तयारी केली. पण काही झालंबिलं नव्हतं. आता तो स्टेजच्या मधल्या भागात फिरायचं सोडून कडेकडेने फिरत होता. स्टेजला लागून बसलेल्या प्रत्येकासमोर जाऊन तो झग्याचा भोवरा आता उभा करून फिरवत होता. स्वतः फिरणं एकदाही न थांबवता, तो हातांच्या साहाय्याने तो झगा स्वतंत्रपणे फिरवत होता. तो झगाही मोकाट सुटलेल्या ‘लंडन आय’सारखा गरगर फिरून पहिल्या रांगेत बसलेल्या आम्हा सर्वांच्या समोर नाचत होता. अशी एक पूर्ण फेरी मारून तो परत मध्यभागी आला आणि पुन्हा आधीच्यासारखी आवर्तने घ्यायला लागला. दुसऱ्यांदा जेव्हा त्याने गती कमी केली तेव्हा मला आजूबाजूचे सगळे लोक असे दबा धरून बसल्यासारखे दिसत होते. या खेपेला तो शांतपणे वेग कमी करत थांबला आणि तितक्याच सहजपणे ताठ उभं राहून आमच्या सगळ्यांकडे पाहत राहिला. त्याचा झोक जातोय अशी आम्हाला किंचितही शंका येत नव्हती. क्षणभराच्या शांततेनंतर त्याच्यावर टाळ्यांचा पाऊस पडला. तो आनंदाने हसून ते स्वीकारत असतानाच लोक उठून उभे राहायला लागले आणि बराच वेळ टाळ्या वाजवत राहिले. जेव्हा लोक standing ovation देण्यासाठी खास मांडी मोडून आणि लोडावर ठेवलेलं कोपर काढून उभे राहतात, तेव्हा ते खरंच किती मनापासून असतं हे लगेच समजतं.
यानंतर चांगला पंधरावीस मिनिटांचा ब्रेक होता, पण तो आमच्यासाठी नव्हता हे पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मघाचाच नर्तक परत स्टेजवर आला तेव्हा कळलं. दुसरा कार्यक्रम म्हणजे आगीचे खेळ होते. त्या माणसाने आता फक्त एक काळी पँट घातलेली होती तो दोन हातात दोन मशाली घेऊन चालत आला होता. मशाली कसल्या? दोन लांबलचक लोखंडी सळयाच होत्या त्या, आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना आग भडकलेली होती. अशा प्रकारचे शो चांगल्या अंतरावरून, शिवाय स्टेजपेक्षा जास्त उंचावर असलेल्या खुर्च्यांत बसून पाहायची सवय असलेल्या तिथले बहुसंख्य लोक, हा प्रकार इतक्या जवळ घडणार असल्याचं पाहून जरा टरकले असल्याचं दिसत होतं. तो माणूस मात्र शांत होता. मग त्याने आधीप्रमाणेच सराईतपणे त्या सळया फिरवायला सुरुवात केली. काही वेळाने तो त्या इतक्या गरागरा फिरवायला लागला की अक्षरशः चमकदार पिवळ्या रंगाच्या जाड कड्याच तो फिरवत असावा असं वाटत होतं. त्याने त्या आधी दोन्ही बाजूंना फिरवल्या, मग एक डोक्यावर आडवी आणि दुसरी समोर उभी धरून फिरवली, मग एक हात मागे नेऊन पाठीजवळ फिरवली; काही विचारू नका. पुन्हा एकदा त्याने गती कमी केल्यावर लोक जरा हुश्श करायला लागले पण त्याचं संपलं नव्हतंच. त्या दोन सळयांपैकी एक त्याने पूर्ण विझवली. मग दुसरी पाठीवरून घरंगळत सोडून दिली आणि खाली पडायच्या आत दुसऱ्या हाताने पकडली. मग बराच वेळ तो असाच मी फुटबॉल घेऊनही करण्याची कल्पना करू शकलो नसतो अशा गोष्टी ती पेटलेली सळई घेऊन करत राहिला. यानंतर आधीप्रमाणेच तो स्टेजच्या मधल्या भागातली जागा सोडून कडेने फेरी मारायला निघाला आणि एकदमच सगळीकडून घाईघाईने सरकून मागे होण्याचे आवाज आले.
पण यावेळेस त्याने काही लोकांच्या डोक्यावर वगैरे ती सळई फिरवली नाही, फक्त जवळ जाऊन फिरवली. आमच्या जवळ आला तेव्हा त्या आगीची उष्णता मला तापलेल्या कढईत वाकून बघताना (आम्ही काय संकटात पाय घातला नाहीये का) जशी उष्णता जाणवते तशी वाटली. तसं फार वेळ वाकून बघता येत नाही, आणि इथे हा माणूस गेल्या वीस-पंचवीस मिनिटांपासून ही उष्णता अंगावर घेऊन खेळत होता. फेरीच्या शेवटी त्याने मागे रेलून रेलून थकलेल्या दोन जणांना ती आग विझवण्याची विनंती केली. मग त्यांनीही खिलाडूपणा दाखवून फुंकरी मारल्या; काही झालं नाही. मला नाही वाटत खाली बसलेल्या कोणालाही ते इतक्या पटकन विझवता आलं असतं. मग या माणसाने दोन निःश्वास टाकून ती विझवली आणि तो स्टेजच्या मध्यभागी परत आला.
तो कडेकडेने ती फिरवत असताना एक अत्यंत गमतीदार प्रकार घडला होता. तिथे तशी सेल्फ-सर्व्हिस असूनही चारपाच वेटर कार्यक्रम सुरु झाल्यानंतर लोकांना उठायला लागू नये म्हणून घुटमळत होते. त्यांच्यातल्याच एकाने स्टेजला लागून असलेल्या रांगेत बसलेल्या एका कुटुंबाला त्यांचे पदार्थ आणून दिले होते. तो स्टेजच्या काठावर उभा होता. ते पदार्थ ट्रेमधून उचलून त्यांच्या टेबलवर ठेवायला तो जेव्हा वाकला तेव्हा या माणसाने खुशाल त्याच्या पाठीवर ती जळती सळई ठेऊन दिली. मग त्या वेटरला ‘घाईत उभा राहू नकोस’ अशा आशयाचा विविध भाषांतला आरडाओरडा झाला. पण तो सरळ उभा राहिला आणि चपळाईने ती सळई पडायच्या आत पकडून त्याने ती त्या नर्तकाला देऊन टाकली, आणि शांतपणे रिकामा ट्रे घेऊन चालता झाला. हे सगळं पूर्वनियोजित असून तो वेटरही स्वतः एक ‘प्रोफेशनल’ असल्याचं लोकांच्या लक्षात येईपर्यंत तिथे सगळ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडालेली होती.
सळयांच्या खेळाशिवाय त्या माणसाने तोंडातून ड्रॅगनसारखी आग बाहेर काढण्याचाही खेळ करून दाखवला. हा प्रकार मी या पूर्वी टी.व्ही.वर अनेकदा पाहिला होता. अल्कोहोलचा एक घोट घेऊन तो तोंडातच ठेवायचा आणि तोंडासमोर छोटंसं पेटलेलं कडं आणून ते थुंकायचं. Theoretically, साबणाचे बुडबुडे करण्यासारखंच. (Theoretically!) मग त्याच्या तोंडातूनच आगीच्या लाटा उसळण्याचा भास होतो. एक मोठा आगीचा ढग उमटून क्षणात विरूनही जातो. हा प्रकार त्याने दहाबारा वेळा सलग केला. घशाला कोरड पडली असेल बिचाऱ्याच्या. पण या सगळ्यानंतर तो सगळ्या आगी एकदाचा विझवून जेव्हा वाकला, तेव्हा त्याला अगदी पूर्वीसारखाच प्रतिसाद मिळाला. असे हे पहिले दोन कार्यक्रम करणाऱ्या कलाकाराने हृदयात बाण मारायच्या ऐवजी प्रत्येकाजवळ हातात बाण घेऊन जाऊन, व्यवस्थित जागा वगैरे पाहून तो अलगद खुपसल्यानंतर, त्या बेली डान्सरला त्या तोडीचं सादरीकरण करणं भाग होतं. ही जबाबदारी तिने चांगली पेलली. तिच्याही हालचालींवरून ती एक कुशल नर्तिका असल्याचं कळत होतं, आणि तिने नृत्य केलं ते अगदी सहजतेने आणि सगळ्यांना ते आवडलंही. तिच्या नाचाचा हायलाईट, तिने दोन तशाच सळया (अर्थातच जळणाऱ्या नाहीत) तिच्या कमरेवर पेलून नाचवल्या तो भाग होता.
यानंतर स्टेजवरचे दिवे घालवण्यात आले आणि कॅम्पमध्ये फक्त कुंपणावरच्या दिव्यांच्या माळांचा आणि मशालींच्या उजेड उरला. डेझर्ट सफारीचा शेवट झाल्याचीच ती सूचना होती. एव्हाना सगळे ड्रायव्हर्सही आतमध्ये येऊन थांबले होते. त्यांच्यासोबत लोक घोळक्यांनी पांगायला लागले. आम्हीही आमचे अंकल दिसल्यावर त्यांच्यामागून बाहेर पडलो. आमचे गाडीतले आशियन सोबती आम्हाला इतका वेळ कुठे दिसले नव्हते, पण आम्ही गाडीपाशी पोहोचताच तेही वेळेत तिथे आले. आता पूर्ण अंधार पडला होता. यावेळी वाळूशी दंगामस्ती वगैरे काहीही न करता आम्ही तशाच सपाट भागातून हळूहळू बाहेर पडत रस्त्याला लागलो. अंकलनी रेडिओवर हिंदी स्टेशन लावलं होतं आणि ‘मेरे रश्के कमर’ हे गाणं वाजत होतं. थोड्या अंतरावर दुबईच्या इमारतींचे दिवे दिसू लागले होते. दुबईत शिरण्यापूर्वी दिवसभरात अनुभवलेल्या सगळ्या पारंपरिक गोष्टी एकदा आठवून पाहिल्या. काही तासांकरिता का होईना, पण वाळवंटात भटकणाऱ्या अरबी व्यापाऱ्याच्या आयुष्यात डोकावायची संधी मिळाली होती. आजची मोहीमही आधीच्या सगळ्यांइतकीच समाधान देणारी ठरली होती.
तेवढ्यात त्या गाण्यातली ‘रेत ही रेत थी मेरे दिल में भरी...’ ही ओळ कानांवर पडली आणि मी हळूच हसलो.
The Dubai Diaries continue on DD16
The Dubai Diaries continue on DD16
Comments
Post a Comment