Dubai Diaries: शेजारधर्म


आजच्या दिवसात काही मोठा प्लॅन नसल्यामुळे, आम्ही काकाचा प्रस्ताव मान्य केला. त्याला काही कामानिमित्त अबू धाबीला जायचे होते, आणि ते काम दुपारपर्यंत संपणार होते. तेव्हा त्याच्याबरोबर जाऊन त्याचे काम होईपर्यंत अबू धाबीत भटकायचा आमचा बेत ठरला. अबू धाबीला जायचं आणि तेही रस्त्याने म्हटल्यावर मला एकदम इथे येतानाचा पहिला प्रवास आठवला. तो ‘monotonous’ रस्ता आणि त्याच्यावरून जाताना ‘प्लीज घोरू नका नाहीतर मला झोप येते,’ अशी विनवणी करणारा ड्रायव्हर हे सगळं आठवलं. ते डोळ्यासमोर आणताना खूपच विचित्र वाटत होतं. जेमतेम आठवड्यापूर्वी घडलेली गोष्ट ती; का कोण जाणे पण अगदीच दूरच्या भूतकाळात घडून गेल्यासारखी वाटत होती. 
आता त्याच monotonous रस्त्याने परत जायचं होतं; तरी काकाने काही आम्हाला घोरू नका असं सांगितलं नसतं म्हणा. पण मागच्या वेळेसारखी यावेळी मला झोप येईल असं अजिबात वाटत नव्हतं. तेही चांगलंच होतं, कारण येताना प्रवास संपवायची घाई झालेली असल्यामुळे रस्त्याने जाताना दिसणाऱ्या काही खास गोष्टी बघायच्या राहून गेल्या होत्या, त्या आता काका दाखवत होता. त्यांच्यापैकी खास लक्षात राहिलेल्या दोन इमारती म्हणजे अल्दार हेडक्वार्टर्स आणि कॅपिटल गेट या दोघी. त्यापैकी रस्त्याने जाताना आम्हाला अल्दार HQ ही आधी लागली. ती आकाराने संपूर्ण गोलाकार होती आणि लांबून कडेवर उभ्या केलेल्या नाण्यासारखी दिसत होती. अर्थात, तिच्या जरा जवळ गेल्यावर असं दिसलं की तिच्या दोन बाजू काही चपट्या नसून बऱ्यापैकी फुगीर होत्या, पण कड मात्र तशी लहानशीच होती. डोळ्यात एकदम भरतो तो तिचा आकार. अबू धाबीमधल्या सुंदर कलाकृतींकडे मी यापूर्वी फारसं लक्ष दिलं नव्हतं, पण त्यामुळेच हिने सुखद धक्का दिला. त्यानंतर महामार्ग सोडून आम्ही शहराच्या बऱ्यापैकी आतमध्ये आलो तेव्हा कॅपिटल गेट दिसली. पिसाच्या मनोऱ्याच्या कललेल्या आकृतीने त्या शहराला जगात सर्वत्र प्रसिद्धी मिळवून दिली, आणि इकडे एका दिशेने वाकण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी ही दुसरी इमारत आता कुठे हळूहळू प्रसिद्ध होत आहे. नेटवरून मला, ही पश्चिमेकडे चांगली अठरा अंश झुकलेली आहे ही माहिती कळली. अर्थात, हिची रचना पिसाच्या मनोऱ्यापेक्षा पुष्कळ वेगळी आहे. हिचा खालचा भाग तसा ताठ उभा असून मध्यातून ती एकीकडे सरकून वाकली आहे, तर पिसाचा मनोरा थेट पायापासूनच झुकलेला आहे. पण वर्ल्ड रेकॉर्ड हिच्या नावे आहेच. कृत्रिम रचनांच्या बाबतीत दुबई एक खूपच पुढे गेलेली असली तरी तिच्याकडे जे नाही ते आपल्याकडे आहे असं आता अबू धाबी म्हणू शकतेच. ‘दुबईकडे जगातली सर्वांत उंच इमारत आहे, पण आमच्याकडे जगातली सगळ्यात जास्त वाकलेली इमारत आहे’ अशी जाहिरात करून अबू धाबी पर्यटकांना आकर्षित करून घेतेय, आणि तिकडे दुबई जगातल्या पहिल्या स्वतःभोवती फिरणाऱ्या इमारतीच्या प्लॅन्समध्ये डोकं खुपसून बसली आहे, तेव्हा या प्रकाराचं तिला काहीच वाटत नाही असं म्हणता येणार नाही. हे लिहीत असताना मला ट्रिपनंतर काही महिन्यांनी, मार्चमध्ये ऑस्करच्या वेळी माझं आणि बाबांचं झालेलं संभाषण आठवलं. 
२०१८ सालचे ऑस्कर अबू धाबीने प्रायोजित केले होते, आणि म्हणून त्याच्या प्रत्येक ‘काही क्षणांत’ मध्ये अबू धाबी टूरिझमची जाहिरात झळकून जायची. शेवटच्या फ्रेममधल्या रात्रीच्या वेळी समुद्रातून दिसणाऱ्या एतिहाद टॉवर्सच्या एका दृश्याने मला विशेष भुरळ घातली होती. 
सतत त्या जाहिराती पाहून बाबा गमतीने म्हणाले, “आता दुबईला टेन्शन आलं असणार!”
“ती पुढचे ‘गोल्डन ग्लोब्ज’ प्रायोजित करेल, त्यात काय,” मी म्हणालो. 
मागे काकाने सांगितल्याप्रमाणे, आता हळूहळू अबू धाबीतही मॉल्स, amusement parks आणि इतर प्रेक्षणीय स्थळांची संख्या वाढत चालली होती ते सगळं आठवलं. वास्तविक आपल्या या कानामागून येऊन तिखट झालेल्या धाकट्या बहिणीशी स्पर्धा करण्याची अबू धाबीला काहीच गरज नाहीये, पण काकाच्या मते या सगळ्याचा संबंध अर्थव्यवस्थेशी जास्त आहे. इथल्या बहुतेक सगळ्या अर्थव्यवस्था तेलाच्या उत्पादनावर बेतलेल्या आहेत, पण दुबईकडे मुळातच तेल कमी असल्यामुळे तिने सुरुवातीपासून व्यापारावर आधारित अर्थव्यवस्था घडवली आहे. काकाच्या म्हणण्यानुसार, भविष्यात तेलाचं महत्त्व खूप कमी होण्याची कुणकुण लागल्यामुळे या बाकीच्या अर्थव्यवस्थाही दुबईच्या पावलावर पाऊल टाकतायत. याशिवाय दुबईच्या तुलनेत अबू धाबीकडे जागा खूप आहे, आणि त्या देशाच्या केंद्रस्थानी तीच आहे, त्यामुळे या धाकट्या बहिणीला जरा ‘टेन्शन’ आलं तर त्यात नवल नाही. पण मग, आमची ट्रिप वगळता दुबईच्या इतर planned tours मध्येही एक दिवस अबू धाबीला दिलेला असतोच, आणि हेच नातं दुसऱ्या बाजूनेही अर्थातच अस्तित्वात आहे. यामुळे असं वाटतं की एकमेकींकडच्या गोष्टींची नक्कल करण्याऐवजी दोघींनी स्वतःकडची खास वैशिष्ट्यं जपली तर येणाऱ्या काळात दोघींची एकत्र भरभराट व्हायला मदतही होऊ शकेल, काय सांगावं?
स्वतःकडचं एक वैशिष्ट्य मात्र अबू धाबीने खूपच जपलंय, आणि आम्ही आमची जवळपास सगळी सकाळ तिथेच घालवली. आमची घरची ट्रिप नसून ‘स्टडी टूर’ वगैरे असती तर सर्वप्रथम आम्ही इथेच आलो असतो अशी ते सगळं पाहून माझी खात्री झाली. (आणि IMGचा नंबर कधीच लागला नसता!) स्वतःच्या कामासाठी जाण्यापूर्वी काकाने आम्हा दोघांना अबू धाबीतल्या सगळ्यात मोठ्या मशिदीत, म्हणजेच ‘शेख झायेद ग्रँड मॉस्क’मध्ये आणून सोडले. तिथे काही वेळाने एक वॉकिंग टूर सुरु होणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ती सुरु होईपर्यंत आवारात भटकायला म्हणून आम्ही त्या पार्किंगमधून लांबवर दिसणाऱ्या त्या प्रचंड संगमरवरी वास्तूकडे चालत निघालो. 
पार्किंगमधून आवारात जाताना एक चेकपॉईंट लागला. असे अनेक पॉईंट्स सगळ्या प्रवेशद्वारांपाशी बसवलेले होते. तिथे आमची विमानतळावर होते तितकी कडक तपासणी झाली. त्यातून बाहेर पडून आवारात आल्यावर ठिकठिकाणी कुठल्याही मोठ्या धार्मिक स्थळी दिसतील अशा सगळ्या गोष्टी दिसत होत्या. ही मशीद आयताकार असून तिच्या एका बाजूला खूप घुमट आणि मनोरे आहेत. मशिदीच्या आतमध्ये गेल्यावर समोर एक अजस्त्र चौकोनी आवार लागतं, त्यालाही संगमरवरी फरशी घातलेली होती. फरशीवर फुलांची वगैरे अशी खूप सुंदर डिझाइन्स आहेत, आणि एकूण आवार सतरा हजार चौरस मीटर असल्यामुळे जगातलं सगळ्यात मोठं ‘Tiles Mosaic’ तेच आहे. ही सगळी माहिती नंतर त्या टूरमध्ये मिळणार होती. त्या आवाराच्या दोन बाजूंना दोन रुंद उघडे बोळ होते आणि पलीकडे मशिदीतली मुख्य प्रार्थनाकक्ष होता. हे सगळं आम्ही आवाराच्या अलीकडे उभं राहून पाहत ती टूर सुरु व्हायची वाट बघत होतो. आमचे बूट प्रवेशाबाहेर ठेवलेल्या मोठ्या ड्रॉवर्समध्ये विश्रांती घेत होते. 




यापलीकडे तिथे कपड्यांसंबंधी खूप सक्ती नव्हती, फक्त पाय पूर्णपणे झाकलेले असावेत असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे त्यांनी शॉर्ट्स घालून आलेल्या काही युरोपियन पर्यटकांना ते पांढरे अंगरखे घालायला सांगितले. स्त्रियांना डोक्यावर हिजाब घालायला सांगितला, पण ज्यांच्याकडे स्कार्फ किंवा ओढण्या होत्या त्यांना त्याच वापरू दिल्या. सगळी तयारी झाल्यानंतर मग टूरला सुरुवात करण्यात आली. त्यांचा आक्षेप मुख्यतः घट्ट किंवा तोकड्या कपड्यांना होता, असं आमच्या गाईडने आम्हाला नंतर सांगितलं. 
आमचा गाईड चांगला हसतमुख तरुण अरब होता. त्याने भरपूर विनोद करत आम्हाला सूचना दिल्या आणि सगळ्यांना वॉकीटॉकी वाटले. ग्रुपमधल्या सगळ्यांना त्याचं बोलणं स्पष्ट ऐकू यावं, तसंच काहीतरी बघत भरकटलात तरी माहिती ऐकायची राहून जाऊ नये म्हणून हा खटाटोप. “तुमची इच्छा असल्यास तुम्ही ते बंदही करू शकता, पण मग मला वाईट वाटेल,” असं हसून सांगत त्याने ते सगळ्यांना वापरायला शिकवले. मग त्याच्यामागून आम्ही उजवीकडच्या बोळातून त्या मुख्य नमाजच्या खोलीकडे चालत निघालो. 
बोळातून चालत जाताना गाईडच्या बोलण्यातून त्या मशिदीचा आणि शेख झायेद यांचाही थोडा इतिहास समजला. UAE हा एक स्वतंत्र देश झाला १९७१ मध्ये, आणि तो घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अबू धाबी, दुबई, शारजाह, अजमान, फुजैराह, रास-अल-खैय्यामा आणि उम-अल-कुवेन या सात अमिराती स्वतंत्र राज्ये होत्या आणि त्यांची राजघराणीही वेगळी होती. १९६६ मध्ये अबू धाबीच्या सरकारमध्ये बंडसदृश कारवाया झाल्यानंतर त्यांना राज्यपद मिळालं आणि १९६८ मध्ये ब्रिटनने या सगळ्या प्रांतातून कायमचा काढता पाय घेतल्याचं जाहीर केल्यानंतर शेख झायेद आणि दुबईचे शेख रशीद यांनी पुढाकार घेऊन सगळ्या अमिरातींना एकत्र आणलं. संयुक्त UAE राष्ट्राचं राष्ट्रपतीपद मग त्यानंतर शेख झायेद यांना सलग चार वेळा मिळालं. ते उदारमतवादी विचारांचे असून त्यांनी ‘freedom of worship’चं धोरण ठेवलं होतं हे ऐकून मला दुबईत फिरताना दिसलेलं एक देऊळ आणि जवळ पूजेचं साहित्य विकणारी दुकानं आठवली. २०१८ मध्ये त्यांची जन्मशताब्दी असल्यामुळे त्याला ‘Year of Zayed’ असं नाव दिलेलं असल्याचं जगभर जाहीर करायला ३१ जानेवारीला रात्री खास तशी सजावट बुर्ज खलिफावर केली होती. त्यांचं चिरविश्रांतीस्थान ही मशीदच असल्याचं आमच्या गाईडने आम्हाला शेवटी सांगितलं आणि काहीशा लांबवर असलेल्या एका संगमरवरी इमारतीकडे बोट दाखवलं. तेव्हाच बांधकामासाठी कशाकशाचा वापर केला होता ते सांगताना आम्ही आत्ता ज्या खांबांच्या मधून चालत आलो त्यांचा वरचा भाग खऱ्या सोन्याचा असल्याचं सांगितलं. मग सगळे दचकून पुन्हा मागे वळून खांबांकडे पाहू लागले.
मुख्य कक्षाला जोडून दोन स्वतंत्र कक्ष, त्यातला एक स्त्रियांसाठी राखीव होता. मुख्य कक्षाला एक प्रवेशकक्षही होता, तिथे पोहोचल्यावर गाईडने सगळे यायची वाट बघितली, मग घड्याळावर लावलेल्या एका सहा पाकळ्यांच्या फुलासारख्या आकाराच्या घड्याळाकडे बोट दाखवून त्याचं वैशिष्ट्य समजावून सांगितलं. त्याच्या सहा पाकळ्यांमध्ये सहा नमाजच्या वेळा लिहिलेल्या होत्या. त्या वेळी तो का करायचा असतो तेही त्याने सांगितलं. घड्याळाच्या मध्यभागी दिसणारी तारीख आणि सन पाहून मी थक्क झालो. ग्रेगेरियन कॅलेंडर ज्याप्रमाणे ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरु होतं त्याप्रमाणे इस्लामच्या कॅलेंडरची सुरुवात पैगंबराच्या काळापासून होणार हे तसं माहित होतं, पण त्याचा खरा अर्थ आता लक्षात येत होता. इस्लामी कॅलेंडरनुसार तेव्हा चालू साल हे १४३८ होतं! आपण एकाच वेळी एकविसाव्या आणि पंधराव्या शतकात जगतोय हा विचार खूपच कुतूहलजनक होता. याप्रमाणे आपल्या हिंदू कॅलेंडरचाही जरा अभ्यास केला तर आपण तिसऱ्याच कुठल्यातरी शतकात जगत असू! 
मुख्य कक्षात शिरल्यावर सामूहिक आ वासला गेला, आणि एका सहा-सात वर्षांच्या युरोपियन मुलीने गाईडला विचारलं, “ही जगातली सगळ्यात मोठी मशीद आहे का?”
“नाही, त्या यादीत ही आठवी आहे,” गाईड हसून उत्तरला. 
“पण ही केवढी आहे….” ती हळूच उद्गारली, आणि सगळे हसले. 
खरंच, ती ‘तेवढीच’ होती. या महाकाय कक्षाची तुलना फक्त विमानतळाच्या लॉबीशी किंवा विद्यापीठातल्या सर्वात मोठ्या हॉलशी वगैरे होऊ शकते. त्याच्या आडव्या भिंतीवर खूप बारीक नक्षीकाम केलेलं होतं. त्याच भिंतीसमोर खाली एक लहानसा मंच वगैरे होते, आणि बाकी संपूर्ण कक्ष रिकामा होता. फरशीवर एकच अवाढव्य जाजम अंथरलेलं होतं, आणि ते जगातलं सर्वांत मोठं एकसंध कार्पेट होतं. ते इतकं मोठं होतं की इराणहून (तिथे बनवलेलं होतं) इथे आणण्यासाठी त्याचे दोन तुकडे करून आणून ते इथे जोडले गेले होते. त्या सबंध कार्पेटवर एकच नक्षी सातत्याने राखली गेलेली होती. मग गाईडने आमचं लक्ष त्या भिंतीकडे आणि मंचाकडे वळवलं. त्या मंचावरून मौलवी सूचना करतात आणि त्यांच्यापुढे नमाजसाठी सगळा जनसमुदाय दाटीवाटीने उभा असतो. त्या कक्षात सात हजार लोक मावतात. त्या गाईडने मग सर्व प्रकारच्या प्रार्थनांचे स्वरूप, तिथे उभं राहण्याच्या पद्धती वगैरे सगळं समजावून सांगितलं, तसंच काही प्रार्थना करताना उभं राहणं आवश्यक असलं तरी अपंगांना किंवा पायाला दुखापत झालेल्यांना कसे बसायची परवानगी असते हेही सांगितलं. मग त्याने भिंतीवर केलेल्या कोरीव नक्षीकामाकडे आमचं लक्ष नेलं. नीट पाहिल्यावर त्यात एकसारखे खूप नक्षीदार आकार दिसले; आणि प्रत्येक आकाराच्या मध्यभागी अरबी भाषेत काहीतरी लिहून ठेवलेलं होतं. अक्षर बाकीच्या सगळ्या सजावटीइतकंच वळणदार आणि सुंदर होतं. ते एकूण शंभर आकार असून, त्यापैकी नव्याण्णव आकारांमध्ये अल्लाची नव्याण्णव विशेषणं (Attributes) लिहिलेली होती. शंभरावा रिकामा आकार हे शंभराव्या, अज्ञात विशेषणाचं प्रतीक होतं. 




शेवटी त्याने आम्हाला छतावर लावलेल्या तीन झुंबरांबद्दल सांगायला सुरुवात केली. तिन्ही झुंबरं एकाच आकाराची होती : छताला चिकटलेला एक उंच उभा खांब आणि त्याच्या खालच्या भागात उमललेल्या फुलासारख्या पसरलेल्या अनेक पाकळ्या. हे सगळं बहुरंगी स्फटिकांच्या तुकड्यांनी नटवलेलं असल्यामुळे खूप चमकत होतं. त्या तीनपैकी मधलं झुंबर सगळ्यात मोठं होतं आणि त्याचा खांब १५ मी. होता म्हणे. त्यांच्यासाठी वापरलेल्या स्फटिकाच्या आणि काचेच्या तुकड्यांचा आकडाही असलाच काहीतरी डोक्यावरून जाणारा होता. मग गाईडने हसून एक मजेदार माहिती पुरवली; ती अशी की या झुंबरांची दरवर्षी सफाई करावी लागते, तेव्हा छतातून त्यांच्यावर उतरावं लागतं. या कामासाठी त्या झुंबराच्या खांबांच्या आतल्या भागात चक्क जिने बसवलेले आहेत! एवढं सांगून त्याने हसतमुखाने एवढा वेळ त्याची बडबड ऐकल्याबद्दल आमचे आभार मानले, आणि आत्तापर्यंत डोळे फाडफाडून त्या झुंबराच्या खांबांकडे पाहायला लागलेल्या जमावाला बाहेर घेऊन गेला. 




एका वेगळ्या धर्माच्या दृष्टीने त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी, परंपरा आणि रीतिरिवाज यांचं पहिल्यांदाच इतक्या बारकाईने दर्शन झालं होतं, आणि त्यांच्या पद्धती व्यवस्थित टूरच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून दोन प्रार्थनांच्या वेळच्या मध्ये मशीद पर्यटकांसाठी खुली केल्याबद्दल अबू धाबीचं कौतुक वाटत होतं. 
काका पार्किंगमध्ये आला होता. जेवायची वेळ झालेली असल्यामुळे आम्ही एखाद्या मॉलच्या शोधात निघालो. वाटेत अबू धाबी शहराशी पहिल्यांदाच नीट परिचय झाला. रस्त्यांची यंत्रणा वगैरे दुबईसारखीच वाटत होती. समुद्रकिनाऱ्याच्या जवळ जाऊन तिथे उभ्या असलेल्या त्या सुंदर एतिहाद टॉवर्सकडे एकदा बघून घेतलं. देठाजवळ तिरका काप घेऊन उभ्या केलेल्या वेगवेगळ्या उंचीच्या पाच काकड्या असाव्यात तशा त्या दिसत होत्या. ‘फास्ट अँड फ्युरिअस’च्या सातव्या भागात एका स्पोर्ट्सकारला यातल्याच तीन इमारतींच्या वरच्या मजल्यांमधून उड्या मारताना पाहिल्यापासून त्या एकदा बघायचं मनात होतं; ती इच्छा आज पूर्ण झाली. काकाने दुसरीकडे एका ठिकाणी बोट दाखवून तो अबू धाबीच्या राजांचा महाल असल्याचं सांगितलं. त्याच्याकडे काही वेळ बघून मग आम्ही ‘मरिना’ मॉलच्या आत शिरलो. तो आतमधून एका दृष्टीक्षेपात मावत होता याचं एकच कारण म्हणजे तो पूर्ण डेव्हलप व्हायचा होता. खूप दुकानं रिकामीच होती, पण आम्हाला फूड कोर्ट सापडला. जेवण वगैरे झाल्यानंतर भरदुपारी या काहीशा उदासवाण्या मॉलमध्ये फिरण्यात आम्हाला काही रस नव्हता, म्हणून आम्ही आल्यासारखे गाडी काढून निघालो. जाताना अबू धाबीच्या ‘फेरारी वर्ल्ड’ जवळ एक खराखुरा फॉर्म्युला वन रेसट्रॅक पाहायला गेलो आणि तिथे काही काळाने होणार असलेली रेस पाहता येणार नसल्याबद्दल (ती बघायला तसा कंटाळाच आला असता असं मनाशी कबूल करून) हळहळ व्यक्त करत परत निघालो.
परत जाताना एक वेगळ्याच प्रकारचं समाधान वाटत होतं. दुबई दौऱ्यानंतर आज पहिल्यांदाच ठरवून कुठल्यातरी विशेष महत्त्वाच्या स्थळाला केवळ माहिती मिळवण्याच्या उद्देशाने भेट दिलेली होती, आणि आधीच्या काही दिवसांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या अर्थाने मनोरंजन झालं होतं. तसं पाहायला गेलं तर ‘तशा’ प्रकारच्या मनोरंजनासाठी अबू धाबी पुष्कळ काही देऊ करत होती. फेरारी वर्ल्ड होतं, ‘यास’ नावाच्या बेटावर एक वॉटरपार्क होती. हे नाही तर मॉल्स होतेच इतरही, आणि तेही नाही तर फक्त किनाऱ्यावर जाऊन मनसोक्त समुद्राकडे आणि मागच्या एतिहाद टॉवर्सकडे बघत बसू शकलो असतो. आता असं वाटतं की अबू धाबीला दिलेल्या या अगदीच छोट्याशा भेटीत काय करायचं हा निर्णय माझ्यावर असता तर मी नक्कीच यापैकी एक निवडलं असतं. किंबहुना स्वतःहून ‘मशीद बघू या’ असं नक्कीच म्हटलं नसतं. तरी आपण काकाचं ऐकलं आणि हे सगळं करण्याऐवजी दुबईत नसलेली ती एक गोष्ट पाहिली याबद्दल समाधान होतं ते. शेजारी डोकावण्याचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने पार पाडला होता. 
आता दूरवर दुबईच्या गगनचुंबी इमारती दिसू लागल्या होत्या, पण पहिल्यांदा याच रस्त्याने येताना त्यांच्याकडे जसं बघितलं होतं त्यात आणि आजच्या बघण्यात पुष्कळ फरक पडला होता खरा.  


The Dubai Diaries continue on DD17

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प