Dubai Diaries: पुनःश्च दौरा
एक ठरलेला प्रोग्रॅम असण्याचा आज शेवटचा दिवस होता, आणि त्यातही पुन्हा सकाळ मोकळीच होती. मुख्य प्रोग्रॅम होता रात्री ‘ग्लोबल व्हिलेज’ला भेट देणं, आणि तिथे खूप दगदग होईल असं आम्हाला बजावण्यात आलं, आणि म्हणूनच सकाळ मोकळी असली तरी फार काही मोठं करायला जाऊ नका असंही सुचवलं. शहरातच जवळ कुठेतरी फिरायला जाऊया असं आम्ही दोघांनी ठरवलं, तरी परत कुठे हा प्रश्न होताच. पहिल्या दौऱ्याच्या वेळी काही अगदी सबंध दुबई पालथी घातलेली नसली तरी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी अशी फारशी कुठली जागा उरली नव्हती. एखादा नवीन मॉल शोधून काढून तो ‘सर’ करण्याचीही इच्छा नव्हती. पुन्हा मरिनात गेलो तर खूपदा पाहिल्यामुळे कदाचित त्या गगनचुंबी इमारती आवडेनाशा होतील अशी आपली मला एक वैयक्तिक भीती वाटत होती (तसंही मी तिथे जायचं म्हटलं असतं तर यावेळी मला नक्कीच एकट्यालाच जावं लागलं असतं!) मग आम्ही पहिल्या दिवशीच्या दौऱ्यात पाहिलेल्या स्थळांच्या यादीवरून एकदा नजर फिरवली.
पहिल्या दौऱ्याच्या वेळी ‘एका दिवसात सगळीकडे एक नजर टाकून घेऊया म्हणजे काही खास आवडलं तर परत जाता येईल’ असा बेत करून आम्ही सर्वत्र भटकलो होतो. पण आज खरंच ते करायची वेळ आल्यावर मात्र त्यातली कुठलीच गोष्ट पुन्हा करावी असं वाटत नव्हतं. तो दिवस तसा घाईगडबडीचा गेलेला असूनही सगळ्या गोष्टींना आम्ही आमच्या परीने पुरेसा वेळ दिला होता असं लक्षात आलं. मग आम्हाला असं जाणवलं की गेला आठवडाभर सातत्याने नवनवीन गोष्टी केल्यानंतर आम्हाला आता खरं म्हणजे जिथून हवा तेवढा वेळ फक्त दुबईकडे बघत बसता येईल अशी एखादी शांत जागा हवी होती; जमल्यास काहीतरी नवीन, वेगळंच असं डोळ्यात साठवून घेण्यासाठी, पण तसं काही सापडलं नसतं तरी त्याचं काही वाटलं नसतं. थोडक्यात ट्रिप संपत आल्याचे संकेत मिळू लागले होते.
मग माझ्या बहिणीने आणि काकूने आम्हाला ‘सूक मदिनात जुमेराह’ नावाच्या एका मॉलमध्ये जाऊन यायचा सल्ला दिला. तो व्यवसायाने मॉल असला तरी तिथे वावरणं कुठल्याही इतर मॉलपेक्षा खूप जास्त सुखावह असतं असं माझी बहीण म्हणाली. शिवाय त्या मॉलच्या परिसरापासून बुर्ज अल अरब खूपच कमी अंतरावर असल्याचं कळल्यावर मग आम्ही तयार झालो, नाहीतरी ती एक वास्तू जवळून पाहायची राहून गेलेलीच होती. काकाने फक्त आमची कार्ड्स तपासून त्यात जाण्यायेण्यासाठी पुरेसे पैसे असल्याचं पाहून घेतलं आणि आम्हाला बाहेर सोडून दिलं.
आम्ही पहिल्या दिवशी घेतलेल्या त्या नकाशात पाहून आम्हाला कळलं की आमच्या ‘ईप्सित स्थळा’च्या तोंडातच एक बसस्टॉप होता, म्हणून आम्ही मेट्रोने जायचा आमचा बेत रद्द करून घराजवळच्या एका बसस्टॉपकडे निघालो. यामुळे जरा कमी चालावं लागेल असं मला वाटलं होतं, पण तो स्टॉपही नेमका मॉल ऑफ द एमिरेट्सच्या शेजारीच निघाला. आम्ही नकाशात पाहून आमच्या मार्गाचा क्रमांक पाठ करून ठेवला होता, तो आठवून ८१ नंबरच्या बसची वाट पाहू लागलो. ती डुलत डुलत येईपर्यंत दोन अगदीच भलतीकडे जाणाऱ्या आणि एक आमच्या मार्गाच्या अगदी जवळून (पण ती बस घेता येईल इतक्या जवळून नाही) अशा येऊन गेल्या होत्या आणि ते पाहून मला क्षणभर घरची आठवण येऊन गेली होती.
बसमध्ये शिरल्यावर तिच्यातल्या खांबावर योग्य ठिकाणी ते कार्ड दाबून घेतलं. आता उतरताना फक्त पुन्हा ते एकदा दाबायचं म्हणजे तिकिटाचे पैसे कार्डातून वजा होणार. ते कार्ड दाबल्याशिवाय बाहेर पडायला दारं उघडतच नसावीत अशी मला एक शंका आली, पण तरी बाकीच्यांनी कार्ड वापरून उघडलेल्या दारातून त्यांच्यामधून हळूच सटकणारा महाभाग निघाला तर? अशा प्रकारच्या गोष्टींसाठीही काहीतरी यंत्रणा असणार, पण आम्ही तसं काही न केल्याने तिचा आमचा परिचय झाला नाही. या पद्धतीमुळे निष्कारण कागदाचा वापर टळत होता हे खरंच, पण त्याचबरोबर दारावर वॉच ठेवून योग्य वेळेला “ओ, कुठे?” वगैरे ओरडायला बसमध्ये कोणी नव्हतं. सकाळी माझ्या मनात उगीच आलेल्या या शंकेचं निरसन दुपारी माझ्या बहिणीनेच नकळत करून टाकलं, आणि तेही जरा अनपेक्षितरीत्याच.
मला वाटतं ही बसदेखील थेट नव्हती आणि आम्हाला मध्येच एका ठिकाणी मार्ग बदलून ८८ नंबरची बस घ्यायची होती. नकाशात पाहिल्यावर तो स्टॉप अगदीच जवळ वाटला, आणि असंही दिसलं की त्या स्टॉपवर आम्ही उतरणार म्हणजे ही ८१ आम्हाला फक्त शेख झायेद रोड क्रॉस करण्यात सहाय्य करणार होती. पण ही कामगिरी वाचायला वाटते तेवढी साधीसोपी अर्थातच नव्हती. शेख झायेद रोड क्रॉस करणे हे वाक्य आपण ‘कर्वे रोड क्रॉस केला’ हे ज्या अर्थाने म्हणू शकतो त्या अर्थाने म्हणणंच अशक्य आहे. (दोन्ही क्रॉस करण्यातला धोका कदाचित तेवढाच असेल!) कारण तो रस्ता थेट हायवेच असून त्यात सिग्नल, फाटे, चौक वगैरे असले प्रकार नाहीच आहेत, त्यामुळे पायी जाण्याची गोष्ट सोडाच पण बसलाही त्या रस्त्यावर जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर पडणं अशक्य आहे. आपल्याकडच्या रस्त्यांवरची बसची दादागिरी सर्वज्ञात आहे. डावीकडे अगदी कडेला असलेल्या स्टॉपवरून सुटल्यावर ती खुशाल थेट उजवीकडच्या लेनमध्ये घुसते. त्यातून तिला वळायचं असेल तर विचारच करायला नको. आमची बस शेख झायेद रोडवर उतरल्यावर तो हायवे नसता तर तिने काय केलं असतं अशा विचारात मी पडलो. एखाद्या चौकात सिग्नलला थांबली असती, मग सिग्नल सुटल्यावर उजवीकडे वळून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावरून पलीकडच्या रस्त्यांवर गेली असती. पण इथे मात्र तिला पुढच्या सर्व्हिस ओपनिंगला वेग कमी करून, मग त्या रस्त्यावर चढून, पुढच्या उड्डाणपुलावरून संपूर्ण गोल वळण घेऊन मग शेख झायेद रोड आकाशातून क्रॉस करावा लागला आणि त्या बाजूला असंच साग्रसंगीतपणे उतरावं लागलं. सिग्नल्स आणि फाटे काढून टाकून त्यांनी हायवेवरच्या गाड्यांचा पुष्कळ वेळ वाचवला होता खरा, पण बाकीच्या गाड्यांना हा सगळा खटाटोप करायला सिग्नलला वळण्यापेक्षा जास्त वेग नाही का लागणार?
आमचा स्टॉप आल्यावर ते कार्ड पुन्हा खांबावरून फिरवून आम्ही उतरलो. स्टॉपचं नाव ‘दुबई पोलिस अॅकॅडमी’ असं होतं. मागे काही वाळूच्या रंगाच्या काही इमारती दिसत होत्या; त्यांच्याकडे पाहिल्यावर त्या कुठल्यातरी academic complex चाच भाग असतील असंच कुणालाही वाटलं असतं. त्यांचा फक्त वरचा भाग दृष्टीस पडत होता, कारण गर्द झाडीने खालचा बराचसा व्यापून टाकला होता. त्या इमारती वसतिगृहांच्या असून, त्यांच्या पलीकडे ट्रेनिंगची मैदानं असल्याचं नंतर कळलं. त्या मैदानांवर नवशिके पोलिस अधिकारी गर्दीतून त्यांच्या भारीतल्या मोटारसायकल्स चालवायचं प्रशिक्षण घेत असतील असा एक सुखद विचार करून मी बाबांच्या मागून त्या स्टॉपच्या आत शिरलो. बसस्टॉप म्हणजे एक लहानशी आयताकार केबिनच असते, जिच्या आतल्या भिंतीवर नकाशा आणि बसेसच्या वेळा लावलेल्या असतात. तिथे आत बसून पुढच्या बसची वाट पाहताना माझ्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंतच्या सगळ्या ठिकाणांमध्ये आज पहिल्यांदाच आपण ए.सी. नसलेल्या बंदिस्त जागेत बसलेलो आहोत. बाकी एरवी सर्वत्र कृत्रिम गारवा असतोच.
८८ नंबरची बस येऊन आम्हाला ‘सूक मदिनात जुमेराह’च्या प्रवेशद्वाराशी घेऊन गेली. तिथे आत फिरताना घाई करायला लागू नये म्हणून आम्ही आधीच थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या बुर्ज अल अरबला भेट देऊन घेतली. समोरून बघितल्यावर तो खरोखरीच एका उभ्या ठेवलेल्या फोडीसारखा दिसत होता. त्याची उंची त्याचं खास वैशिष्ट्य नसली तरी तो काही अगदीच आडव्या फोटोत मावेल एवढा बुटका नव्हता. तसंही त्याच्या प्रवेशद्वारातून आत जाऊन त्याच्या बेटाला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या पुलावरून फोटो काढायची इच्छा ते हॉटेल असल्यामुळे पूर्ण होणार नव्हतीच, म्हणून आम्ही तिथूनच फोटो काढून घेतले. त्याच्या सुबक आकारात मध्यभागी एक गोलाकार हेलिपॅडसारखा दिसणारा प्लॅटफॉर्म डोकावत होता, तो टेनिसचा कोर्ट असून त्यावर एक मॅच खेळायला अँड्रे अगासी आणि रॉजर फेडरर यांना खास आमंत्रण होतं असं काकाने आम्हाला सांगितलं. तिथे आकाशात टेनिस खेळणं म्हणजे काय अनुभव असेल! मला असं आमंत्रण मिळालं असतं तर माझं बॉलकडे लक्ष राहिलं असतं का नाही कोण जाणे! त्यातून परत जरा जास्तच आवेशाने आऊट मारला तर पंचाईत!
सूक मदिनात जुमेराहच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तरी वातावरण काही विशेष सुखावह वगैरे वाटलं नाही, कारण तिथे फक्त एक कारंज आणि व्यवस्थित वेगवेगळ्या आकाराच्या फरशा बसवलेली जमीन होती. डावीकडे एक दरवाजा होता; तिथपर्यंत पोहोचताना आम्हाला कुठल्यातरी उत्साही पर्यटकांच्या गर्दीने भरलेल्या मोठ्या बसला चुकवून जावं लागलं. तिथून आत जाताना मी मागे वळून पाहिलं, तर ती अगदी डौलदार वळण वगैरे घेऊन डावीकडच्या उतारावरून खाली पळत जाताना दिसली.
यापूर्वी एकदा(च!) एका टूर कंपनीबरोबर सिमल्याला जाऊन आलो होतो, तेव्हा अजेंडावरच्या दाखवायच्या गोष्टी दाखवून झाल्या आणि निघायला वेळ असेल तर त्या काय करतात याचा चांगलाच अनुभव आलेला होता. तास-दोन तास पर्यटकांना कुठल्यातरी मोठ्या, ज्याच्यात नुसतंच फिरायला मजा येईल अशा आवारात सोडून त्याच्या प्रवेशापाशी बस उभी करून गाईड मंडळी दुसरीकडे जात. चंदीगढला आमच्या बसने आम्हाला असंच ‘रोझ गार्डन’ मध्ये सोडून दिलं. ती बागही खूप सुंदर होती खरी, पण काही वेळाने कंटाळा येणारच. मला आठवतंय, आम्ही त्या बागेतला बराचसा वेळ एका चौकोनी छपराखालच्या बाकांवर बसून काढला होता. सकाळी आमच्या उत्साही गाईडने घातलेलं क्लिष्ट कोडं आई सोडवत होती आणि मी आणि बाबा तिला मदत म्हणून काही न बोलता सगळीकडे नजर फिरवत उभे होतो. असा वेळ घालवायला दुबईकडे नैसर्गिक जागा कुठल्या? म्हणून त्या बसने त्या पर्यटकांना इथे आणलं असावं असा बाबांचा कयास होता. मॉल म्हणजे ‘Never A Bad Idea’ प्रकारची जागा. पण तो सगळा फिरून आल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्या बहिणीचं बरोबर होतं, आणि ती खरोखरीच एक सुंदर बागच असून तिच्यातल्या काहीकाही बोळांमध्ये फक्त गोष्टी विकायला ठेवलेल्या होत्या, आणि तेही तसं केल्याशिवाय दुबईला राहवत नाही म्हणूनच असावं.
बाहेरून वाटतो त्यापेक्षा तो सगळा परिसर मोठा होता खरंच. आम्हाला लांबून दिसलेली ती सँडस्टोनची गढी पूर्णपणे फिरून येण्यातच आमचा अर्धा तास गेला. पण तीही एक सबंध इमारत अशी नव्हती, तर अगदी कुठलातरी किल्ला असावा असे जिने, अंधारे बोळ, भिंतींनी वेढलेली आवारे वगैरेंनी भरलेली होती. बोळांच्या अंतर्भागात त्यांनी खूपसे लाकडी खांब उभे करून त्यांच्यावरून लांब काळे पडदे खाली सोडलेले असल्यासारखं दिसत असल्यामुळे आपण एकाच इमारतीच्या आत आहोत असं वाटत नव्हतं. आणि यांच्यात दोन्ही बाजूंना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मांडून ठेवलेल्या होत्या. काही पहिल्या दौऱ्याच्या वेळी जुन्या दुबईतल्या खऱ्या सूकमध्ये पाहिलेल्या, तर बाकीच्या खूपच अनपेक्षित, आणि म्हणूनच हव्याहव्याशाही. निळ्या, हिरव्या रंगांच्या अनेक छटांचे नदीपात्रातले असावेत असे गुळगुळीत दगड, मणी आणि कुठेकुठे नुसती भुकटी ठेवलेली होती. दुसरीकडे असेच अनेक नक्षीदार शंखशिंपले आणि तत्सम वस्तू होत्या. या सूकच्या एका बोळात नुसतं फिरूनही माझ्या काही ‘Imitation Jewellery’ तयार करण्याची हौस असलेल्या मैत्रिणींच्या डोक्यात कल्पनांचा स्फोट झाला असता. मी मात्र शांतपणे त्यांच्याकडे एक नजर टाकून पुढे ठेवलेल्या काही पुरातन वाटणाऱ्या खुर्च्या, नक्षीकाम केलेले कापडी पडदे वगैरे गोष्टींकडे वळलो. तर थोडक्यात मॉल म्हणावं असं इथे सगळ्या प्रकारच्या गोष्टींची गर्दी नव्हती, तर त्या सगळ्या नेपथ्याला शोभून दिसेल अशाच गोष्टी व्यवस्थित पसरल्या होत्या. आणि तो इफेक्ट जमला होताच. आम्ही असेच बराच वेळ या बोळांमधून फिरत राहिलो; एकदोनदा मधल्या चौकांत येऊन पुन्हा वाट चुकून त्याच बोळांमध्ये शिरलो. मी असंच दुपारपर्यंत फिरत राहायलाही तयार होतो, कारण ते सगळं वातावरण मला भारी वाटत होतं. पण शेवटच्या बोळाच्या टोकाला आमच्यापुढे जे दृश्य उभं राहिलं त्याची आधी कल्पना असती तर मी मधलं काही न बघता सरळ त्याच्याकडे पळत गेलो असतो.
अंधारात भटकून खूप शोधल्यानंतर अचानक स्वच्छ प्रकाशात पाऊल ठेवत ते सापडलं की खराखुरा आनंद झालेला असतो, आणि यावेळी मला झालेल्या आनंदाची तुलना फक्त दुबई मॉलचं योग्य ते दार सापडून आम्ही अचानक बुर्ज खलिफाच्या समोर आलो तेव्हा झालेल्या आनंदाशीच होऊ शकते. किंबहुना हा आनंद जास्तच होता, कारण इथे नक्की काय शोधतोय ते आधी माहित नव्हतं आणि सापडल्यावर मात्र हेच मनात ठेवून इथे येण्याचा निर्णय घेतल्यासारखं वाटत राहिलं होतं.
ते दृश्य पाहून मला, माझ्या चित्रकलेची खूप हौस असलेल्या सोबत्यांनी इथे असायला हवं होतं असं खूप वाटलं. पुढच्या वेळी त्या सगळ्यांना घेऊन यायचं, त्यांना सूक मदिनात जुमेराहमध्ये सोडायचं आणि त्यांचं होईपर्यंत मरिनात एक चक्कर मारून यायची असं मी ठरवून टाकलं. मग म्हटलं, की तसं खरंच घडलं तर अगदी मलाही हे सोडून मरिनात जावंसं वाटेल? सँडस्टोन आणि लाकडाचा निरोप घेऊन आम्ही आता उघड्या आवारात पुन्हा पांढऱ्याशुभ्र फरशांवरून चालत होतो. आम्ही एका झऱ्याच्या काठावर होतो आणि सर्वत्र गर्द झाडी होती. त्याच हिरव्यागार रंगाचं प्रतिबिंब झऱ्याच्या नितळ पाण्यात पडून तेही तितकंच हिरवं दिसत होतं. डावीकडे एक छोटासा चढ पुढे त्या झऱ्यावरून पलीकडे जाणाऱ्या एका अर्धगोलाकार पुलाचं रूप घेत होता आणि आमच्या डोळ्यांदेखत त्या पुलाखालून एक लहानशी होडी चारपाच पर्यटकांना घेऊन आली आणि पुढे लगेच वळून दिसेनाशीही झाली. किनाऱ्याच्या उजवीकडे आम्ही नुकतंच जिच्यातून बाहेर पडलो होतो त्या इमारतीचा बाहेरचा भाग दिसत होता. उजवीकडची ही इमारत, डावीकडची झाडी आणि खालून वाहणारा झरा हे तिघंही पुढे एका बिंदूपाशी एकवटत होते. त्या बिंदूपाशी तसाच एक दुसरा पूल पलीकडे जात होता. त्या पुलाच्या मागे दोन माडाची झाडं एकमेकांकडे वळून इमारतीची भिंत आणि झाडी यांच्यामध्ये एक खिडकी तयार करत होती, आणि त्या खिडकीतून दूर समुद्रात उभा असलेला बुर्ज अल अरब स्पष्ट दिसत होता.
त्या झऱ्याच्या काठाकाठाने आम्ही फिरत होतो. हा भागही पुष्कळ मोठा होता. ठिकठिकाणी पूल होते, मध्येच पायऱ्या आणि चढ-उत्तर होते. कुठल्यातरी मोठ्या गेमच्या पहिल्या लेव्हलमध्ये फिरत असल्यासारखं वाटत होतं. इमारतीच्या भिंतीला लागून खूप वेगवेगळे पुतळे ठेवलेले होते, तेव्हा झरा शक्य तेवढा डोळ्यांत साठवून आम्ही त्या पुतळ्याशेजारी फोटो काढू लागलो. मी त्या अगदी टोकाला असलेल्या पुलावर जाऊन तिथून बुर्ज अल अरबचा फोटो काढायचा प्रयत्न केला, पण त्याच्यापलीकडे हॉटेल असल्यामुळे तिथल्या एका रक्षकाने मला तो ओलांडू दिला नाही. तेव्हा त्या परिसरात एक हॉटेलही असल्याचं कळलं.
काठाकाठाने फिरताना एकदा मी सहज घड्याळाकडे बघितलं आणि थोड्या वेळात निघावं लागेल असं कळलं. जायची इच्छा आधी नसली तरी, इथे फारसं कारण्यासारखंही काही नव्हतं हे मान्य करावं लागेल. शिवाय ग्लोबल व्हिलेजमध्ये भरपूर मजा करायची असेल तर घरी लवकर जेवून आराम करायला हवा असं आम्हाला बजावलेलं होतंच. माझे विचार ग्लोबल व्हिलेजकडे वळले तसे ते तिथून फारच कमी वेळात सगळ्या योजनेच्या तक्त्यात उद्याच्या पूर्ण कोऱ्या जागेवरून फिरून परवा दुपारच्या वेळेत लिहिलेल्या ‘विमानतळ’ या शब्दावर विसावले. माझा चेहरा पडल्याचं बाबांना दिसलं तेव्हा त्यांनी मला काय झालं म्हणून विचारलं.
“ट्रिप संपली,” मी खिन्नपणे उद्गारलो. त्यावर आता उरलेल्या वेळात उदास होऊन बसण्यापेक्षा तो सगळा वेळ आधीसारखाच फक्त मजा करण्यात घालवलेला बरा असं त्यांनी सुचवल्यावर माझा मूड थोडा ठीक झाला आणि एका मोठ्या पुतळ्याशेजारी उभं राहून फोटो काढून घेताना मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या पुतळ्यासारखाच हसलोही. पण तो विचार काही पूर्णपणे मनातून गेला नाही. परतीचा सगळा प्रवासभर तो मला छळत राहिला आणि त्या नादात मी शेख झायेद रोडवरची पुलांची गर्दी पाहायचंही विसरून गेलो.
दुपारनंतर मात्र तो विचार कायमचा कुठल्याकुठे पळून गेला. निघायची वेळ जवळ आली होती हे खरंच, पण त्यापूर्वी दुबईच्या आणखी एका भन्नाट कल्पनेशी आमचा परिचय होणार होता.
The Dubai Diaries continue on DD18
Comments
Post a Comment