Dubai Diaries: पृथ्वीप्रदक्षिणा १


“ही दुबई आहे!” टॅक्सीचा चालक आपल्याला फसवणार तर नाही ना या बाबांनी गमतीत विचारलेल्या प्रश्नाला डोळे विस्फारून उत्तर देत माझी बहीण म्हणाली, आणि मागे उभा असलेला मॉल ऑफ द एमिरेट्स छद्मीपणे हसत असल्याचा मला उगीचच भास झाला. 
दुपारचे चार वाजले होते आणि आम्ही टॅक्सीची वाट बघत मॉल ऑफ द एमिरेट्सच्या विरुद्ध बाजूच्या फुटपाथवर उभे होतो. मी, बाबा, माझी बहीण आणि आजी. काका आणि काकू ऑफिसमधून थेट तिकडे येणार असल्याने आत्ता आम्हालाच तिथे पोहोचण्यासाठी व्यवस्था करायची होती. ग्लोबल व्हिलेजचा परिसर IMG पार्कच्या जवळ होता आणि तो भाग शहराच्या बाहेर असल्यामुळे तिथे जायला टॅक्सीशिवाय पर्याय नव्हता. ‘Around the World in 8 Hours’ साठी आम्ही सज्ज होऊन थांबलो होतो. अर्थात, तेव्हा आम्हाला हे आठ तास चालणार असल्याची कल्पना नव्हती. 
ग्लोबल व्हिलेज हे वर्षातील सहा महिने उघडं असतं, आणि ते सहा महिने अर्थातच बाहेर उघड्यावर तग धरता येईल अशाच काळातले असतात. २०१७ चं ग्लोबल व्हिलेज नव्हेंबरमध्ये सुरु होऊन यावर्षीच्या एप्रिलमध्ये संपलं, त्यामुळे आम्ही गेलो तेव्हा सगळं अगदी ‘फ्रेश’ होतं. हा प्रकार तीन-चार भलीमोठी मैदानं एकत्र करून त्यावर पसरलेला आहे. त्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या देशांकडच्या खास गोष्टींचं प्रदर्शन आणि विक्री, आणि त्यासाठी प्रत्येक देशाचा एक pavilion उभारण्यात आला होता. हे म्हणजे चारही बाजूंनी भिंती घालून तयार केलेलं एक आवार आणि त्यामध्ये छोटीछोटी दुकानं, गाळे आणि इतर विविध प्रकारच्या सजावटी मांडून ठेवलेल्या. हे आम्ही गाडीत असताना माझ्या बहिणीने मला वर्णन करून सांगितलं पण तरी pavilion नामक संकल्पनेची पूर्ण ओळख झाली ती आत गेल्यावरच. 
आम्ही पोहोचलो तेव्हा सूर्य बुडायचा होता आणि गर्दीही फार नव्हती. तो सगळा प्रकार अत्यंत ‘भव्यदिव्य’ असल्यामुळे तो दिवसाउजेडी बघण्यात काहीच मजा आली नसती. सर्वप्रथम आम्हाला एक मोठं रिकामं मैदान लागलं, त्याच्या टोकाला खूपसे दिवे दिसत होते. त्या मैदानातून आमची टॅक्सी गेली तेव्हा ठिकठिकाणी ओढलेल्या पिवळ्या रेघा पाहून ते पार्किंग असल्याचं कळलं. दुबईत चांगला आठवडा काढूनही एवढ्या मोठ्या पार्किंगची गरज काय असा एक फालतू प्रश्न मनात येऊन गेलाच, आणि त्याचं उत्तर परत निघाल्यावर सहज मिळालं. आत्तापर्यंत सूर्य बुडला होता आणि त्या पार्किंगच्या आवारामागे उभा असलेला विचित्र आकार आता ओळखू यायला लागला होता. ते ग्लोबल व्हिलेजचं प्रवेशद्वार असून ते अबू धाबीच्या मशिदीसारखं दिसत होतं; फरक एवढाच की ते पांढराशुभ्र नसून पिवळ्या रंगांच्या प्रकाशात चमकत होतं. आम्ही जवळ गेलो तसे त्याने असे खूप रंग बदलले. तिकिटं काढण्याचं काम माझ्या बहिणीवर सोपवून आम्ही तिघे त्यातून आत गेलो. आता आमच्यासमोरच्या मैदानात जगभरातल्या प्रसिद्ध वास्तूंच्या कलाकृती उभ्या होत्या. डावीकडच्या कोपऱ्यात हिरव्या प्रकाशात चमकणारी स्वातंत्र्यदेवतेची मूर्ती उभी होती आणि तिच्या अगदी शेजारी आयफेल टॉवर होतं. या दोन्ही वस्तू स्वतंत्रपणे उभ्या नसून दोन दुकानं आणि हॉटेलच्या इमारती यांच्यामधून बाहेर डोकावत होत्या. थोडं पुढे गेल्यावर एक जपानी पॅगोडादेखील लागला. वेस्टमिन्स्टरच्या महालाचा थोडासा भाग आणि बिग बेन दिसले. बिग बेनच्या पायाला लंडनच्या प्रसिद्ध लाल डबलडेकर बसचा पुढचा भाग बसवलेला होता. जवळच एक लाल टेलिफोन बूथदेखील होता; तशा एका बूथचं हॅरी पॉटरच्या कथेमधलं महत्त्व स्मरून मी त्याच्यासोबत फोटो काढून घेतला. या सगळ्या वास्तूंच्या प्रतिकृतींपैकी ताजमहालाची प्रतिकृती सगळ्यात जास्त जागा व्यापून उभी होती; तिच्या पांढराशुभ्र भिंती काही ठिकाणी जांभळ्या आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशात चमकत होत्या. हा प्रकाश जरी त्या विशिष्ट भागांना एक वेगळाच गूढ असा ‘लूक’ देत असला तरी त्याच्यामुळेच उर्वरित भिंतीची शुभ्रता आधीच प्रखरपणे उठून दिसत होती. इथला ताजमहाल आणि स्वतंत्रदेवतेचा पुतळा हेच काही काळाने खऱ्या वास्तूंपेक्षा अनुक्रमे जरा जास्त शुभ्र आणि हिरवे दिसू लागतील असा एक उदास विचार मनाला चाटून गेला, पण तो लगेच बाजूला करून मी त्यांच्याशेजारचं लालभडक कौलांचं छत असलेलं चिनी मंदिर पाहू लागलो. त्याच्या मागे उभी असलेली प्रतिकृती पाहून जरा दचकलोच. ती एवढी उंच असूनही आत्तापर्यंत कशी दिसली नाही या विचारात पडलो. वास्तविक मला अशी अंधुकशी शंका आलीच होती की ‘जगभरातल्या सुप्रसिद्ध वास्तू’ म्हटल्यावर इथे तीही असेल का........? होती. खऱ्या वास्तूपासून केवळ काही किलोमीटरच्याच अंतरावर या इतर सगळ्या प्रतिकृतींच्या वर डोकं काढत बुर्ज खलिफाची प्रतिकृती दिमाखात उभी होती. दुबईचं जगातलं स्थान ठळकपणे अधोरेखित करत. 




तिच्याकडे नीट बघितल्यावर मला ती प्रतिकृती फार आवडली नाहीये असं मी ठरवून टाकलं. ती बुर्ज खलिफा ओळखू येईल एवढी चांगली नक्कीच होती, पण तिच्यात मला ‘तो’ काही दिसला नाही. त्याची उंची, पाकळ्यांची संख्या आणि आकार या सगळ्या गोष्टी एकमेकींना इतक्या अचूकपणे पूरक ठरतात की त्यांच्यापैकी एकीत जरी बदल केला तरी त्याची रचना बिघडते. मग मला वाटलं की, हे असं फक्त बुर्ज खलिफाचीच बाबतीत का होईल? बिग बेन, आयफेल टॉवर, स्वतंत्रदेवतेचा पुतळा आणि आपला ताजमहाल यांच्यातही तशी विशिष्ट प्रमाणबद्धता असणारच, आणि त्यामुळेच या सगळ्या वास्तू कलाकृती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना प्रत्यक्ष न पाहिल्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या या प्रतिकृतींच्या रचनेमधली ती विषमता लगेच लक्षात येत नव्हती, पण तरी ती असणार हे उघड होतं. मग कशासाठी हा उपद्व्याप? याला उत्तर अर्थात हेच होतं की या सगळ्या प्रतिकृतीच काय पण त्याच्यापुढचं सगळं ग्लोबल व्हिलेज हेच मुळी प्रतिकात्मक होतं. ज्याप्रमाणे ग्लोबल व्हिलेजमध्ये एक संध्याकाळ घालवून काही पृथ्वीप्रदक्षिणा होऊ शकत नाही त्याचप्रमाणे त्या वास्तूंच्या प्रतिकृती पाहून खुद्द त्यांना पाहण्याचं समाधान मिळूच शकत नाही.  
दुबईला हे ठाऊक आहे. सिंगापूरने जसं आपल्या एवढ्याशा जागेत ‘लिट्ल इंडिया’ आणि ‘चायनाटाऊन’ वगैरे उभारलं आहे, तसंच दुबई फक्त एक पायरी पुढे गेली आहे. समोरच्या लांबवर पसरलेल्या टेबलवर मांडून ठेवलेल्या पदार्थांपैकी सगळे पूर्ण संपवणं आपल्याला शक्य नाही हे ओळखून, प्रत्येक पदार्थाचा एकेक घास काढून आपल्यासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि व्हिलेजमध्ये गेल्यावर हा प्रयत्न किती यशस्वी झाला आहे ते सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट होतं. 
ग्लोबल व्हिलेजमध्ये पाऊल टाकल्यावर तो विस्तार पाहूनच पाय दुखायला लागतात. एका प्रचंड फुटबॉलच्या मैदानासमोर उभं असल्यासारखं वाटत होतं. आमच्या उजवीकडे pavilions च्या रांगा सुरु होत होत्या आणि खूप लांबवर एका ठिकाणी एकमेकींना भेटत होत्या. मधला सगळा भाग हा एक मोठं हिरवंगार लॉन होतं ज्यावर लोक हवे तसे पसरले होते. त्याच्या काठाकाठाने आणि pavilionsच्या विरुद्ध बाजूला खूपशा खाण्याच्या गाड्या उभ्या होत्या. त्या दृष्टीस पडताच माझ्या बहिणीने दोन पदार्थांची नावं घेऊन ते इथे खाऊन बघितलेच पाहिजेत असा आम्हाला आग्रह केला. ते विकणाऱ्या गाड्या शेवटी होत्या म्हणून थेट तिथे जायच्याऐवजी मधले pavilions पाहत पुढे जायचं ठरलं. खरं म्हणजे आम्हाला कुतूहल होतं ते भारताचा pavilion पाहण्याचं. बाकी अमेरिका, युरोप, चीन वगैरे देश आणि त्यांच्या गोष्टी भारतात जशा उपलब्ध असतात तशाच इथेही असल्या असत्या. आपल्याएवढ्या वैविध्यपूर्ण देशाला त्यांनी एका pavilion मध्ये कसं बसवलं असेल याचं कुतूहल वाटत होतंच. पण तिथे उभं राहून दूरवर नजर टाकली तरी भारताचा pavilion काही दृष्टीस पडत नव्हता. मग त्याच्या शोधार्थ जाताना रस्त्याने जायच्या ऐवजी बाकीचे pavilions पाहत जाऊ असा विचार करून आम्ही एकेका pavilion मध्ये डोकवायला लागलो. या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे एरवी आपल्याला दिसणारं या इतर देशांचं रूप खूपच त्रोटक असतं; त्यांच्यातही पुष्कळ विविधता आहे आणि ती या लोकांनी भरपूर अभ्यास करून टिपल्यासारखी वाटत होती. 
सर्वप्रथम आम्ही पाहिले ते थायलंड, टर्की आणि सौदी अरेबियाचे pavilion. थायलंडच्या pavilion मध्ये खूपशी छोटीछोटी दुकानं आणि गाळे दाटीवाटीने उभे होते. लहानसे अरुंद रस्ते, त्यांच्यावर भरपूर गर्दी आणि दोन्ही बाजूंना अशी दुकानं अशा पसाऱ्यात आम्ही फिरत राहिलो. तेव्हा मला या pavilion नामक संकल्पनेची पूर्ण कल्पना आली. प्रसिद्ध थाई ब्रँड्सच्या शोरूम (आत्ता हे लिहिताना एकही ब्रँडचं नाव डोळ्यासमोर येत नाहीये!) वगैरे दुतर्फा उभ्या असलेला मोठा रस्ता नव्हता हा, तर थायलंडचा एक तुकडा इथे उभा करायचा प्रयत्न केला होता. सिंगापूरच्या ‘चायनाटाऊन’ आणि ‘लिट्ल इंडिया’ सारखं. अर्थात, ज्याप्रमाणे लिट्ल इंडियामध्ये आम्ही ‘यात भारत उतरला नाहीये’ असं म्हटलं आणि चायनाटाऊनमध्ये कुठलातरी अस्सल चिनी माणूस ‘चार लाल कंदील लटकावले की चीन होत नाही’ असं म्हणेल, तसंच काहीतरी इथे येणाऱ्या थाई माणसालाही सुचू शकेल. पण त्यापुढे कदाचित तो असंही म्हणेल, की थायलंडचा आत्मा बँकॉकच्या गगनचुंबी इमारतींत नसून त्यातल्या अशा गल्ल्यांतच आहे. थाई माणसाला त्याची मायभूमी आठवेल एवढं व्यवस्थित डिटेलिंग करणं दुबईला जमलं होतं का नाही सांगता येत नाही, पण शेवटी भारताचा pavilion पाहिला तेव्हा या प्रश्नाचं तुलनात्मक उत्तर मिळालं. 
त्या गजबजलेल्या गल्लीत उजवीकडे एका मोठ्या गाळ्यावर किराणामालाच्या भरपूर पसारा मांडून एक प्रौढ थाई माणूस बसला होता, आणि ‘डिस्प्ले’च्या मागच्या भागातून ऐकू येणाऱ्या खुडबुडीवरून त्याचा तरुण सहाय्यक काहीतरी रचत असावा असं वाटलं. बाकी दुकानाचं रंगरूप आपल्या पुण्यातल्या तुळशीबागेतल्या एखाद्या दुकानासारखंच होतं. मला एका कोपऱ्यात स्वस्त ‘रामेन’ नूडल्सची पाकिटं दिसली. गंमत म्हणून आजी आणि बाबांनी त्या माणसाला अगदी साध्या गोल साबणाच्या वड्यांच्या आठच्या संचाची किंमत विचारली. त्या दुकानातून काय घेतलं ते आठवत नाहीये, पण ते या दोन गोष्टींपैकी नक्कीच नव्हतं. एकूण किमतीचा अंदाज घेऊन आजी म्हणाली की त्या खरोखरीच हे दुकान बँकॉकच्या एखाद्या बोळात असावं अशा होत्या; प्रत्यक्षात ते दुबईच्या ग्लोबल व्हिलेजमध्ये असल्याचा त्यावर तसा काही परिणाम झालेला दिसत नव्हता. समजा झाला असता तरी, इथे अशा दुकानातून काहीतरी घेतील असे परदेशीच! त्यामुळे घरच्या आणि इथल्या किमतीत तफावत असली तरी थाई माणसाला काय त्याचं?
टर्कीचा pavilion थायलंडपेक्षा आकाराने जाणवण्याएवढा मोठा होता, शिवाय सगळं एकाच रस्त्यावर नव्हतं. जरा बऱ्यापैकी मोठी दुकानं आणि त्यांच्यामधून जाणाऱ्या वळणदार वाटा असं त्याचं स्वरूप होतं. काही खाद्यपदार्थांची आणि काही कापडी वस्तूंची दुकानं इथेही होती. मागे एकदा मॉलमध्ये पाहिलेल्या स्टॉलसारखा इथेही एक टर्किश आईस्क्रीमचा स्टॉल होता आणि त्याच्यामागचा टर्किश माणूस तशाच करामती करून लोकांना हसवत होता. आम्ही दोनतीन मिनिटं त्याचे खेळ पाहत उभे राहिलो, आणि तेवढ्या अवधीत मागणाऱ्या एकालाही आईस्क्रीम मिळालं नाही. आत्तापर्यंत हळूहळू असं लक्षात आलं होतं की त्यातला टर्किश भाग फक्त ही थट्टा नसून, ते आईस्क्रीमही कुठल्याशा खास टर्किश फ्लेवरचं होतं. हे कळल्यावर, आणि त्याचा हिरव्या पेरूसारखा रंग पाहून तिकडे जाऊन त्या दुकानदाराचा छळ सोसण्याची क्षणभर अनावर इच्छा झाली. पण हा विचार कृतीत उतरवण्याआधी आमचं लक्ष दुसऱ्या एका दुकानाच्या, किंवा खरं तर दुकानदाराने वेधून घेतलं. हा एक हसतमुख गोरापान टर्किश तरुण हाका मारून लोकांना त्याच्या मिठाईच्या दुकानाकडे बोलावत होता. माझी आणि माझ्या बहिणीची नजर त्या दुकानातल्या ‘नमकीन’ पदार्थांपासून रचून ठेवलेल्या ‘टर्किश डिलाइट्स’च्या खोक्यांपर्यंत फिरून शेवटी बहुरंगी लॉलिपॉप्सच्या बरणीवर जाऊन स्थिरावली. त्यांच्या त्या किंचित चमक असलेल्या रंगांमुळे ते रसाळ आणि आंबटगोड असावेत असं वाटत होतं. मला आंबट हवा होता म्हणून मी एक हिरवा, उभ्या दंडगोलाच्या आकाराचा घेतला आणि माझ्या बहिणीने एक लाल-केशरी बशीच्या आकाराचा घेतला. ते धरून आमचे फोटो काढायला बाबांनी कॅमेरा काढला तेव्हा “अरे वा, फोटो काढताय?” असं म्हणून तो उत्साही तरुण दुकानदार फोटोत आम्हाला सामील झाला. माझा आंबटपणाचा तर्क मात्र साफ चुकला; आम्ही दोघांनी एकाच वेळी आपापल्या लॉलिपॉपचा तुकडा तोडल्यावर तोंडात नळ सोडून साखरेचा पाक भरावा असं झालं. एकदोन घासांनंतर आमची इच्छाच मेली होती. पुढे कोपऱ्यात एका मंचावर सुरु असलेलं एक टर्किश नृत्य बघत आम्ही कसेबसे ते संपवले! त्यानंतर बराच वेळ बाबांनी फोटोचं निमित्त काढून मुद्दाम ‘हसा’ म्हटलं की आम्ही त्यांच्याकडे चिडून बघत होतो.          
सुरुवातीचा काही काळ आम्ही इमानेइतबारे लागेल त्या pavilion मध्ये फिरून येत होतो. मग पहिले चार pavilions पाहण्यातच आमचा अर्धापाऊण तास गेलाय असं लक्षात आलं तेव्हा आम्ही मुख्य रस्त्यावरून फिरत त्यांचे बाहेरचे देखावे फक्त पाहत राहिलो, आणि अगदीच कुतूहल ‘चाळवलं’ वगैरे गेलं तरच आत जाऊ लागलो. रस्त्यावरून फिरताना डावीकडे पसरलेल्या अथांग हिरव्या गवतावर ठिकठिकाणी उभ्या असलेल्या टपऱ्या आता लक्ष वेधून घेऊ लागल्या. त्यातल्या एकीवर मिळणारा बटाट्याचा एक प्रकार खाऊन बघायला हवा असं माझी बहीण म्हणल्यावर आम्ही चौघे निमूटपणे तिकडे गेलो. तो प्रकार तसं पाहायला गेलं तर चिप्ससारखाच, पण तो करताना पाहायला मजा येत होती. एका बटाट्याची सालं सर्रकन हात फिरवून काढून तो माणूस त्या बटाट्याचा DNA करायचा आणि एक लांबलचक सळई त्या सगळ्या चकत्यांमधून फिरवून ते तळायचा. तळताना काहीतरी मसाला टाकायचा. आम्ही अशा चार सळया घेतल्या आणि पुन्हा pavilions कडे निघालो. त्या मसाल्याची चव आणि बटाट्याचा कुरकुरीतपणा जमला होता, पण विशेष मजा येत होती ती त्या एकमेकांना जोडलेल्या चकत्या त्या सळईवरून तोडून खाण्यात. 
आम्ही भारताच्या pavilion च्या दिशेने चाललो होतो. मध्ये वाटेत नेपाळ, भूतान वगैरेंचे लागले तेव्हा त्यांच्यात डोकावून आलो, पण तिथल्या बऱ्याच गोष्टी कापड-प्रकारातल्या होत्या. खाद्यपदार्थांच्या बाबतीत म्हणाल तर प्रत्येक pavilion मध्ये त्या देशात मिळणारी फळं, भाज्या आणि तत्सम गोष्टींवरही भर असायचा. तसं बघून आपल्याला नक्की सांगता येत नाहीच, पण बहुतेककरून एका देशाच्या pavilion मध्ये त्याच देशातली माणसं काम करताना दिसतात. अर्थात, दुबईमध्ये जवळपास सगळ्या देशांमधले लोक आधीपासून राहत असल्यामुळे हे घडवून आणणं फार अवघड असलं नसतंच. आपला देश सोडून उदरनिर्वाहासाठी दुबईला आल्यावर आपल्याच देशाच्या pavilion मध्ये आपल्याच देशाच्या वस्तू विकण्यात किती सुख असेल!
आता आम्ही या मुख्य रस्त्याच्या अगदी टोकाला आलो होतो. आम्ही तोपर्यंत पादक्रांत केलेलं अंतर तसं भरपूर असलं तरी आम्ही तेव्हा उभे होतो ती जागा मुख्य प्रवेशद्वारापाशी उभं राहून पाहणाऱ्या कुणाच्याही दृष्टीपथात होती. त्यामुळे आता तिथेच थांबून काका-काकूची वाट पाहायचं ठरलं. त्या टोकाला खुद्द UAE देशाचा pavilion होता आणि त्याच्या प्रवेशद्वारापाशी माझ्या बहिणीने अगदी सुरुवातीला उल्लेख केलेले दोन पदार्थ तयार होत होते आणि त्यांच्यासमोर गर्दी जमलेली होती. आम्ही दोन्हीचं एक एक ‘पोर्शन’ घेतलं आणि पलीकडच्या गवतावर जाऊन बसलो. पहिला पदार्थ होता दिसायला डोशासारखा, पण गोड होता. त्याचं नाव ‘Rgag’ असं काहीसं होतं. तो तुलनेने आमच्या चौघांत लवकर संपला. दुसरा पदार्थ म्हणजे कुठल्याशा खमंग, कुरकुरीत तळलेल्या पिठाचे गोळे, जे साखरेच्या दाट पाकात बुडवून दिलेले होते. त्यांना ‘Logmat’ असं नाव होतं. त्या पिठाची आणि पाकाची एकत्रित चव छानच होती, पण एक खाल्ल्यावरच मला पोट भरल्यासारखं वाटायला लागलं. 
मी आजूबाजूला बघितलं - उरलेल्या तिघांनीही एकेक गोळा खाल्लेला होता आणि त्यांच्याही चेहऱ्यावर तसेच भाव होते. आम्हाला दिलेले गोळे मात्र दहाबारा होते. अशा प्रकारे आम्ही आमची पोटं तात्पुरती भरून, दर पाचदहा मिनिटांनी एकमेकांना भरपूर आग्रह करून एकेक गोळा संपवत उरलेले काका-काकूही घेतील अशी आशा करत आणि आता हवेत पसरायला लागलेल्या गारव्याची मजा घेत त्या गवतावर बसून राहिलो.      

The Dubai Diaries continue on DD19

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प