Dubai Diaries: पृथ्वीप्रदक्षिणा २
रात्री नऊच्या सुमारास सहा जणांचा एक कंपू त्या महाकाय पार्कमध्ये भारताचा pavilion शोधत भटकत होता.
वाटेत एका ठिकाणी आमचं लक्ष वेधून घेतलं ते ओळखीच्या गाण्यांच्या आवाजाने. सर्वबाजूंनी pavilions असलेल्या एका मोठ्या जागेत मध्यभागी स्टेजवर हिंदी गाण्यांवर नाच सुरु होता. त्याच्याभोवती भरपूर गर्दी जमलेली होती आणि लोक उत्साहाने टाळ्याही वाजवत होते. आपल्याकडच्या चांगल्या हिंदी गाण्यांवर चांगले नाच होतातही, पण आमच्यासाठी तरी त्यात नवीन काहीच नव्हतं. मी आजूबाजूला नजर टाकली आणि आसपासच्या pavilions मध्ये भारताचा दिसतोय का ते शोधू लागलो. नव्हता. क्षणभर एक हादरवून टाकणारा विचार माझ्या मनात डोकावला : तो नाच म्हणजेच भारताचा pavilion तर नव्हता? बॉलिवूड म्हणजेच भारत अशी गैरसमजूत निदान, विविध देशांच्या अभिमानाच्या गोष्टी अचूक टिपल्या असल्याची भाषा करणाऱ्या दुबईने तरी करू नये! पण माझ्या या काळजी करण्याला काहीच कारण नव्हतं हे नंतर लक्षात येणार होतं.
तो कार्यक्रम तिथे असण्याचं कारण फक्त तिथे पुरेशी जागा होती एवढंच असावं. एव्हाना आम्ही pavilions नी वेढलेलं ते मुख्य हिरवळीचं मैदान सोडून पार्कच्या बरेच आतमध्ये शिरलो होतो. आता इथे फक्त pavilions, त्यांच्या मधून मधून दुकानं आणि गाळे असं एवढंच होतं. आता रस्त्याकडे लक्ष ठेवायला हवं असं मला वाटलं. एकतर त्यांनी कुठलाच नकाशा दिला नव्हता. पण काका म्हणाला की परत त्याच मार्गाने येण्याची गरज नसून आम्ही जात होतो त्या रस्त्याने पुढे जात राहिलो तर पार्कला वळसा घालूनच परत येऊ शकलो असतो. तो नाचाचा शो एक ‘खास आकर्षण’ म्हणून गर्दी जमवण्यासाठी उभा केलेला होता, आणि पुढे पुढे तसे इतरही दिसले. दोन मोठ्या pavilions च्या भिंतींच्या मधून आम्हाला पलीकडे चालू असलेला स्टंट शो अर्धवट दिसत होता. इथे गर्दी इतकी प्रचंड होती की असा एखादा शो प्रत्यक्ष पाहण्याची माझी पहिलीच वेळ असूनही आम्हाला त्यापेक्षा जवळ जाता आलं नव्हतं. आम्ही उभे होतो तिथून त्या स्टंट बाईक्सही नीट दिसत नव्हत्या; फक्त मुद्दाम वातावरणनिर्मितीसाठी अधूनमधून सोडला जाणारा धूर तेवढा दिसत होता. थोडा वेळ असं पाहायचा प्रयत्न केल्यानंतर आम्हालाही कंटाळा येऊ लागला आणि आम्ही पुन्हा शोधमोहिमेवर निघालो. पण तिथून फार लांब जायच्या आधीच गर्दीची हळूहळू वाढत जाणारी किंकाळी कानावर पडली; तेव्हा आम्ही लगेच मान वळवून पाहिलं आणि एका बाईकस्वाराला हवेत पूर्ण कोलांटी उडी मारताना पाहू शकलो. त्यावरच समाधान मानून पुढे जायचं ठरलं; तसंही यापेक्षा खूप जास्त भव्यदिव्य असं काय घडू शकणार होतं?
काका-काकूच्या म्हणण्याप्रमाणे भारताचा pavilion आकाराने चांगलाच मोठा होता त्यामुळे तो सापडणारच नाही अशी शक्यता कमीच होती. पण चारपाच मोठे रस्ते पालथे घातल्यानंतरही तो काही सापडला नाही. या शोधाशोधीत काही मधल्या महत्त्वाच्या pavilions कडे दुर्लक्ष झालं होतं, म्हणून आम्ही परत फिरून त्यांच्याकडे वळलो. आता असं लक्षात येत होतं की जरी Global Village चं मुख्य उद्दिष्ट सर्व जगाची (ट्रेलर) सफर घडवणं असलं तरी त्यातल्या अरबी विश्वावर जरा जास्त भर दिलेला होता. सौदी अरेबिया, येमेन, ओमान तसंच कुवेत, कतारसारख्या लहान देशांनाही स्वतंत्र pavilion होते, तर दुसरीकडे जगातले बाकीचे काही भाग एकत्र केलेले होते. आम्ही सुरुवातीला पाहिलेला एक pavilion नेपाळचा असल्याची माझी समजूत झाली होती, पण तो नेपाळ, बांगलादेश, म्यानमार अशा सगळ्या देशांचा होता. मध्ये आम्हाला सबंध युरोपचाही एक pavilion लागला. एका pavilion चं नाव तर ‘The Americas’ असंच होतं, म्हणजे त्यातच उत्तर-दक्षिण दोन्ही खंडांमधले सगळे देश होते वाटतं! बाहेरच्या भिंतीवरची सजावट रेड इंडियनच्या चेहऱ्याची होती. अर्थात, त्यातल्या बहुसंख्य देशांच्या गोष्टी सामावून घेऊ शकेल इतका तो मोठा नक्कीच वाटत होता. बाकीच्यांप्रमाणेच त्याच्यातही एक चक्कर टाकून आम्ही परत आलो.
सौदी अरेबियाचा pavilion मात्र आम्ही व्यवस्थित पाहून घेतला. त्याच्या प्रवेशद्वारापाशी उभ्या असलेल्या एका तीन माणसांच्या उंचीच्या पुतळ्याशेजारी मी फोटोही काढून घेतला. त्यामधल्या काही गोष्टी अगदीच अनुभवण्यासारख्या होत्या असं आमच्यातल्या अनुभवी लोकांचं म्हणणं पडलं होतं, आणि ते खरंच होतं. त्यांनी खजुरांचेही दोन प्रकार दाखवले. पण एकाच वस्तूचे सर्वाधिक विविध प्रकार पाहायला मिळाले ते यातल्या अगदी टोकाच्या दुकानात, आणि ती वस्तू म्हणजे मध! दहाबारा वेगवेगळ्या पारदर्शक बरण्यांमध्ये दहाबारा वेगवेगळे रंग असलेला मध भरून ठेवलेला होता. प्रत्येक बरणीत एक लांब चमचाही घालून ठेवलेला होता. दुकानदाराने आनंदाने आम्हाला सगळ्या प्रकारांची चव बघायला देण्याची तयारी दर्शवली. घरीही नुसता मध शेवटचा कधी चाखून पाहिला होता ते आठवत नव्हतं. पण इथे ते सगळे वेगवेगळे रंग खूपच आकर्षक वाटत होते, म्हणून आम्ही दोनतीन प्रकारच्या मधाची चव घेऊन बघितली. चव वेगळी नक्कीच होती, आणि घरचा मध त्यापैकी एकही चवीचा नव्हता एवढं नक्की होतं! याशिवाय इराणच्या pavilion मध्येही आम्ही तेवढाच वेळ घालवून त्यांच्याकडचे मसाले आणि सुकामेव्याचे प्रकार पाहिले. एका लांबलचक दुकानांच्या रांगेत वेगवेगळ्या प्रकारचा खूप सुकामेवा विकायला ठेवलेला होता. दुकानदार अगदी थोडासा फुकट चवीसाठी देऊन आपल्याला सारख्याच वाटणाऱ्या सुकामेव्यामधले फरक समजावून सांगत होते.
आत्तापर्यंत साडेदहा वाजून गेले होते. पायांचा मूक निषेध सुरु व्हायला लागला होता. त्या गोड कुरकुरीत पाकातल्या गोळ्यांमुळे तेव्हा पोट भरल्यासारखं वाटलं असलं तरी आता भूकही लागली होती. भारताच्या pavilion च्या अगदी जवळच पार्कमधली सगळ्यात चांगली हॉटेलं असल्याचं माझ्या बहिणीला अचानक आठवलं, म्हणून आम्ही आमची शोधमोहीम दुप्पट जिद्दीने पुन्हा सुरु केली. उजवीकडे दूरवर काही भिंतींच्या वरून चीनचा pavilion फक्त त्याच्या लालभडक रंगामुळे ओळखू येत होता, तेव्हा आम्ही त्या दिशेने वाट काढत निघालो. एकदोन गल्ल्या ओलांडून चीनच्या pavilionच्या अगदी शेजारी येऊन उभं राहिल्यावर पुढचं दृश्य पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदमच हसू उमटलं.
Pavilions च्या गर्दीतून वाट काढत आम्ही एका छोट्याशा नदीच्या किनाऱ्यावर येऊन थांबलेलो होतो. दोन्ही किनारे भरपूर रुंद होते आणि ते अर्धवर्तुळाकार पुलांनी एकमेकांना जोडलेले होते. त्या पुलांखालून एकदोन छोट्या नावा संथपणे विहरत होत्या. नदीच्या आमच्याच बाजूला डावीकडेआता आफ्रिकेचा भलामोठा pavilion होता आणि उजवीकडे तितकाच मोठा चीनचा. त्याचा प्रखर लाल प्रकाश पाण्यावर पडून त्याला रक्तवर्णी करत होता. पलीकडच्या किनाऱ्यावर आमच्या समोर काही मोठी हॉटेलं दिसत होती, आणि जवळपास सगळी डावी बाजू व्यापत भारताचा अवाढव्य pavilion उभा होता. आम्ही आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्यांपैकी तो सगळ्यात मोठा असणं सहजच शक्य होतं.
भारताचा pavilion आणि हॉटेलं नदीच्या त्या बाजूला असल्यामुळे ती ओलांडायच्या आधी या बाजूचं सगळं बघून घ्यायचं आम्ही ठरवलं. तसंही भारताला फार वेळ दिल्यानंतर पुन्हा आफ्रिका आणि चीन व्यवस्थित पाहण्याचं त्राण कदाचित उरलं नसतं, आणि ते दोन्ही pavilions व्यवस्थित पाहायची इच्छा होतीच. चीनच्या pavilion मध्ये नेहमीच्या गोष्टी होत्याच (खरं तर चीनमध्ये तयार होणाऱ्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या ठरवल्या तर त्याच्या pavilion मध्ये आणि दुबई मॉलमध्ये फार फरक उरणार नाही!) शिवाय काही तुलनेने अनपेक्षित गोष्टीही होत्या, आणि वेगवेगळ्या आकारांचे मांडून ठेवलेले मोती हे त्यांच्यापैकीच होते. बाकी चिनी संस्कृतीशी संबंधित कार्यक्रम भरवण्यासाठी रंगमंच वगैरे होता, पण आम्ही गेलो तेव्हा कार्यक्रम चालू नसावा. वास्तविक चीनचा इतिहास आपल्या इतिहासाएवढाच भरीव आणि खळबळजनक असूनही आपल्याला त्याबद्दल खूप माहिती नसते; त्यामुळे तो कार्यक्रम बघून एकदोन नवीन गोष्टी कळल्या असत्या. पण वाट बघण्याऐवजी आम्ही आफ्रिकेला जाऊन आलो. तिथे कार्यक्रम सुरु होता, म्हणून दहा मिनिटं तो आदिवासींचा नाच पाहून बाहेर आलो. तिथे विकायला ठेवलेल्या गोष्टींमध्ये अर्थातच फळं, भाज्या आणि त्यांच्यापासून बनवलेले असंख्य पदार्थ यांची सद्दी होती.
ते पूल लांबून इवलेसे वाटत असले तरी प्रत्यक्षात चांगलेच लांबरुंद होते आणि त्यांच्यावर बसायलाही जागा होती. जरा विश्रांती म्हणून आम्ही मग त्याच्यावर बसून नदीकडे बघत राहिलो. आता आमच्या एका बाजूला भारत होता आणि दुसऱ्या बाजूला (supposedly) उर्वरित जग! पूर्णपणे अनोळखी देशांपासून ते काहीशा ओळखीच्या देशांमध्ये ओळखीच्या गोष्टी पाहिल्यानंतर आता तेवढ्याशा जागेत भारत उभा करताना दुबईने कायकाय ठेवलं असेल ते पाहायची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आमच्या या पृथ्वीप्रदक्षिणेची सांगता मायभूमीवर व्हावी याचाही आनंद होत होता. काही वेळाने आम्ही शांतपणे पुलावरून उतरून भारताच्या pavilion च्या समोर येऊन थांबलो. बाहेरच्या भिंती उंच होत्या आणि त्यांना किल्ल्यांच्या तटबंदीसारखा ‘लूक’ दिलेला होता. प्रवेशद्वार आपल्या नेहमीच्या भाषेत बोलायचं तर ‘हत्ती सहज जाऊ शकेल’ एवढं होतं आणि त्याचा आकार सुबक कमानीसारखा होता. आम्ही आत गेलो.
यापेक्षा आकाराने बाकीचे काही pavilions लहान असले तरी गुंतागुंतीचे होते. इथे मात्र आमच्यासमोर एक चौक होता, ज्यात दोन मोठे रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत होते. त्या चौकाच्या आजूबाजूच्या भागात हिरवळ होती. दोन सिग्नलचे खांब मध्यभागी बसवलेले होते आणि खरोखरीच रंगही बदलत होते. हेच रस्ते चारही बाजूंनी पसरून पुढे गल्लीबोळांमध्ये विभागले जात होते. या बोळांमध्ये झाडं, छोटी दुकानं आणि टपऱ्या वगैरे मांडलेलं होतं. दूर एका कोपऱ्यात रूळ आणि एक अस्सल भारतीय इंजिन त्यांच्यावर उभं करून ठेवलेलं होतं. मोठ्या रस्त्यांवर दोन रिक्षाही उभ्या होत्या. बाहेरून पाहिल्यामुळे आणि आताही त्या आतपर्यंत पसरत जाणाऱ्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे तो pavilion खरंच अजस्त्र असल्याचं जाणवत होतं. या रस्त्यांच्या मागच्या भागातली दुकानं खरी होती आणि तिथे मोठ्या संख्येने भारतीय गोष्टी विकायला होत्या हे दुरून दिसत होतं. त्या दुकानांभोवती गर्दी होती, आणि खास भारतीय गोष्टी कुठल्या असतील ते ओळखण्यात दुबई काही चुकणार नाही एवढा विश्वास असल्याने आम्ही तिकडे फिरकलो नाही. तसंही आम्ही जर दुबईला जाऊन तिच्या ग्लोबल व्हिलेजच्या भारताच्या pavilion मधून भारतात मिळणारं काहीतरी घेऊन परत आलो असतो तर पुण्यात आमची मिरवणूक निघायचीच बाकी राहिली असती. त्याऐवजी आम्ही सगळा देखावा बघत फिरत राहिलो.
एका रस्त्याच्या कडेला एक माणूस एक ‘सिनेमाचा बॉक्स’ घेऊन उभा होता. त्याच्यात भारताच्या इतिहासाची छोटी फिल्म असल्याचं त्याने आम्हाला सांगितल्यावर मी आणि माझी बहीण ते बघायला थांबलो. तसा होता तो भारताचा इतिहास, पण त्याच्यात भर जास्त आपल्या सिने-इंडस्ट्रीच्या इतिहासावर दिलेला होता. पण तरीही त्या लहानशा गोल भोकांमधून डोळे घालून ते पाहायला खूप मजा आली. आपल्याकडे खूप पूर्वीपासून असलेला हा 4D शोच की! पर्यटक इथेही गर्दी करत होते आणि दोन भारतीय मुलंच हे बघण्यासाठी का बसली आहेत असा विचार काहींच्या मनात आला असता. त्या फिल्ममधलं आम्हाला काहीच नवीन नव्हतं हे खरं, पण अशा प्रकारे काहीतरी बघण्याचा अनुभव एरवी कुठे मिळाला असता?
आमचं पाहून झाल्यावर आम्ही बाकीच्यांच्या शोधार्थ निघालो. प्रवेशद्वाराच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्याच्या टोकाला असलेल्या एका टपरीपाशी ते उभे होते. ती चहाची टपरी होती आणि तसं देवनागरीत लिहिलेलं होतं. आजूबाजूला चार खाटाही ठेवलेल्या होत्या. टपरीच्या मागच्या दोन खाटांपैकी एकीवर दोन पुतळे बसलेले होते तर दुसरीवर एक पहुडलेला होता. तिघांच्याही हातात चहाची मातीची भांडी होती. टपरीवर चहा देण्याचं काम मात्र खरा माणूस करत होता. आम्हीही सगळ्यांसाठी एकेक ‘कडक’ घेतला आणि त्या रिकाम्या खाटांवर बसलो. या भागात फार गर्दी नव्हती म्हणून आम्हाला बहुतेक सगळ्या खाटा मिळाल्या. आजूबाजूला फक्त रस्त्यावरच्या दिव्यांचा उजेड (pavilion चे दिवे दूर भिंतींवर होते) आणि वाढती थंडी अशा वातावरणात त्या काथ्याच्या खाटांवर बसून तो चहा पिताना आत्तापर्यंत केलेली सगळी पायपीट सार्थकी लागल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात वरून मोठाले थेंब येऊ लागले. दुबईमधल्या दहा दिवसांच्या आमच्या वास्तव्यातला हा दुसरा पाऊस! आडोसा वगैरे काहीच नव्हता, आणि सरही जोरात नव्हती, म्हणून आम्ही तसेच भिजत बसून राहिलो. चहाच्या वाफाळत्या कपाचा वरून कोसळणाऱ्या पावसापासून बचाव करत एकाच वेळी थंडी आणि ऊब यांचा अनुभव घेताना पावसाळ्यातल्या सिंहगडावरच्या सहलींच्या आठवणी जाग्या झाल्या. किल्ल्याची तटबंदी, गल्ल्या, खाटा, इंजिन, सिनेमाचा बॉक्स या सगळ्यांपेक्षा त्या चहापानामुळे मला खऱ्या अर्थाने मायभूमीची आठवण आली.
पाऊस कधी थांबला कळलंही नव्हतं. ग्लोबल व्हिलेज पाहून झालं असं ठरवून आम्ही भारताच्या pavilion मधून बाहेर पडलो आणि शेजारच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन पोटभर जेवण केलं. रात्री पाऊणच्या सुमारास जेवण्याची ती पहिलीच वेळ! आता पोटही भरलेलं होतं, मनही तृप्त होतं आणि पेंग मनाच्या दारात घुटमळताना दिसत होती. अशा अवस्थेत आलो त्या मार्गाने परत जाणं खूपच अवघड गेलं असतं, पण भारताच्या pavilion ला ओलांडून गेल्यावर अचानक ते मोठं गवताळ मैदानच लागलं. मग ते पटकन ओलांडून आम्ही सरळ बाहेर पडून पार्किंगच्या मैदानात आलो. काही तासांपूर्वी पूर्ण रिकामं असलेलं ते मैदान आता पूर्ण भरून गेलं होतं. आम्हाला एक खेळण्यातली आगगाडीही दिसली, लोकांना खूप लांब पार्क केलेल्या त्यांच्या गाड्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी! सुदैवाने काकाला गेटच्या जवळच जागा मिळाली होती, म्हणून आम्ही चालतच तिच्यापर्यंत गेलो. गाडीत सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्यावर काकाने हीटर चालू केला आणि गाणी लावली. बोलण्याचंही त्राण आमच्यापैकी कोणाच्यात उरलेलं नव्हतं, पण मनातली भावना मात्र पहिल्या दिवशीच्या दौऱ्यानंतर घरी आलो तेव्हाच्या भावनेसारखीच होती. दुबईतला पहिला आणि शेवटचा कार्यक्रम हे दोन्हीही पूर्णपणे समाधानकारक ठरले असं मी मनाशी म्हटलं, मग म्हटलं की बाकीचे सगळेही होतेच की! ते सगळे अनुभव एकामागून एक आठवून बघत मी शांतपणे बसलो होतो. गाडी दुबईच्या मुख्य रस्त्यावरून पळत होती.
पृथ्वीप्रदक्षिणा संपली होती. आम्ही परत वास्तवात, दुबईत आल्याचं आम्हाला मूकपणे सांगत दूर कुठेतरी दिसणारा बुर्ज खलिफा शांत उभा होता.
The Dubai Diaries continue on DD20
Comments
Post a Comment