काटेरी वाट

  कॉलेज संपून बराच काळ झालेला असला तरी मित्रमैत्रिणींसोबत रात्री जागवण्याची प्रथा मात्र अजूनही इमानाने पाळली जात होती. अशाच एका रात्री, गप्पांचा पूर ओसरल्यानंतर पहाटे अडीच-तीनच्या सुमारास मी एकटाच खिडकीत बसून, मला काही काळापासून सतावत असलेल्या एका प्रसिद्ध thought experiment ची माझी आवृत्ती मनात घोळवत होतो. बाहेरच्या काळ्याकुट्ट आकाशातल्या अगणित चमकदार ठिपक्यांपैकी एकावर लक्ष केंद्रित करून तो माझा लाडका शनी असेल अशी मी कल्पना केली. मी माझ्या यानातून शनीच्या जवळून जात असतो. सध्याच्या तंत्रज्ञानानुसार शनीकडे जाऊनयेऊन मला सुमारे सात ते बारा वर्षं लागू शकली असती, पण माझ्या कल्पनेत मी भविष्यकाळात होतो आणि माझ्या यानाच्या अत्युच्च तंत्रज्ञानामुळे मी फक्त तीन महिन्यांत पृथ्वीपासून शनीपर्यंत पोहोचू शकलो होतो. काही वेळ त्याच्या संगतीत मनसोक्त घालवल्यावर परत फिरून मी पुन्हा तीन महिन्यांनी पृथ्वीवर आलो असतो. पण नेमकी इथेच एक गोची होते. माझ्या यानातल्या इंधनाच्या साठ्याचं गणित करताना कुणीतरी माती खाल्लेली असते आणि माझ्याकडे फक्त एक महिना पुरेल एवढं इंधन शिल्लक असतं; ते वापरून मी कसाबसा नेप्च्यूनपर्यंत पोहोचू शकलो असतो. मला अचानक आठवतं की नुकत्याच लागलेल्या एका शोधानुसार नेप्च्यूनच्या पलीकडे जवळच एक लहानसं कृष्णविवर असतं. माझ्या मनात लगेच एक योजना तयार होते.

        मी जर माझं यान त्या कृष्णविवराच्या गुरुत्वीय कक्षेत घेऊन गेलो, तर अर्थातच मी त्याच्याभोवती वेगाने घिरट्या घालायला लागून काही वेळाने आत पडलो असतो. पण समजा, मी आत पडण्याच्या आधी अचानक यानाला त्या कक्षेच्या बाहेर ढकललं, तर तोपर्यंत यानाने गाठलेला वेग वापरून मी इंधनाशिवायच पृथ्वीकडे फेकला जाऊ शकत होतो. क्रिकेटमध्ये बॉलर ज्याप्रमाणे चेंडूला वेग देण्याकरता तो टाकायच्या आधी हात गोल फिरवून घेतो तशासारखंच, जणू या कृष्णविवराने मला पृथ्वीच्या दिशेने भिरकावलं असतं. ही सगळी खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असते, पण नशिबाने मला ती जमते आणि मग कृष्णविवराला भेट दिल्यानंतर तीन महिन्यांनी मी विजयी मुद्रेने पृथ्वीवर उतरतो. 

माझ्या स्वागताला हजर असलेल्या लोकांच्या गर्दीतून वाट काढत एक सत्तरी ओलांडलेली आजीबाई माझ्यापर्यंत पोहोचते आणि मी स्वाभाविक प्रतिक्रिया देऊन तिच्या पाया पडतो. ती खूप उचकते. माझ्या अचानक लक्षात येतं की मी निघालो तेव्हा मला निरोप द्यायला आलेली ती माझी कॉलेजमधली मैत्रीण असते. मी निघालो तेव्हा आम्ही दोघं चोवीस वर्षांचे असतो. आता मी अजूनही चोवीसच वर्षांचा असतो पण ती बहात्तर वर्षांची झालेली असते. नक्की किती काळ उलटला यावर आमचा काही वेळ वाद होतो, पण त्यात काही तथ्य नसतं कारण आमच्या दोघांचंही अर्थातच बरोबर असतं. तिच्या दृष्टीने मध्ये जवळपास पन्नास वर्षं झालेली असतात आणि ती सगळी तिने जगलेली असतात. तर दुसरीकडे माझ्या मोहिमेच्या डायरीत फक्त सात महिन्यांच्याच नोंदी असतात, माझ्या यानातला वर्षभरच पुरेल एवढ्या अन्नाच्या साठ्यामधला काही भाग अजूनही शिल्लक असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नसते! मग नक्की घडलं काय?

Twins Paradox नावाच्या त्या thought experiment मधले तपशील मी माझ्या सोयीसाठी बदलून घेतले होते, पण मी निवडलेले सगळे तपशील अगदीच शक्य कोटीतले होते याची मला खात्री होती. याचा शेवटही मला ठाऊक होता. कृष्णविवराच्या जवळ काळाची गती खूप मंदावते; त्यामुळे मी माझी ती गुंतागुंतीची प्रक्रिया करण्यात जी काही मोजकी मिनिटं घालवली, तेवढ्या वेळात पृथ्वीवर पन्नास वर्षं उलटून गेली होती. त्यामुळे ‘नक्की काय घडलं’ हा खरा प्रश्न नव्हताच. मला सतावणारा खरा प्रश्न हा होता की जर माझ्या दृष्टीने ती पाचसहा मिनिटंच होती आणि माझ्या मैत्रिणीच्या दृष्टीने तीच पन्नास वर्षं होती, तर नक्की प्रत्यक्षात किती काळ उलटला होता? आणि तो मोजायचा कसा? मुळात हे म्हणता येण्यासाठी काळ नावाची काही गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्त्वात तरी होती का? का हा सगळा फक्त आपल्या सगळ्यांना एकाच वेळी होणारा आभास होता?

कॉलेजमध्ये असताना मी ‘कालप्रवासातले Paradoxes’ यावर एक शोधनिबंध लिहून सादर केला होता; तेव्हापासून ‘काळ’ ही संकल्पना, मी स्वान्तःसुखाय हाती घेतलेल्या अभ्यासाच्या काही विषयांमधला मुकुटमणी बनली होती. तिचा पिच्छा पुरवताना वाचनात आणि बघण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी त्याक्षणी आठवण्याचा प्रयत्न करत मी या प्रश्नावर उत्तर शोधत होतो. काळ म्हणजे नक्की काय? आणि तो कशावरून अस्तित्त्वात आहे? एरवी विश्वात अस्तित्त्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीची कुठलीतरी भौतिक खूण आपल्या नजरेस पडतेच. अगदी विद्युतचुंबकीय आणि इतर बलांची खूण असलेले मूलकण आढळतात. काळाचं असं काय आढळतं? वास्तविक काळ एक मिती आहे हे उत्तर आपल्याला पूर्वीपासून ठाऊक आहे, आणि मितींना स्वतःची अशी भौतिक खूण नसते कारण आपल्याला मिती कधीच दिसत नाहीत; फक्त मितीय वस्तू दिसतात. म्हणूनच आपण कागदावर काढलेलं काहीतरी द्विमितीय आहे आणि आपलं जग त्रिमितीय आहे असं म्हणू शकतो. काळ ही चौथी मिती आहे असं आपल्याला माहित आहे. पण इतर मितींचं आपल्या आयुष्यातलं अस्तित्त्व आपल्याला ठळकपणे जाणवतं; तसंच काळाचं जाणवतं का? तसं नसेल तर मग काळाला एक मितीच का म्हणतात? 

हे समजून घेण्यासाठी मी ‘मिती’ म्हणजे काय त्याच्या जरा खोलात जायचा प्रयत्न केला. गणिताच्या भाषेत, एक मिती म्हणजे एक संपूर्णपणे नवी दिशा. इथे दिशा म्हणजे आपण म्हणतो तशा चार, आठ किंवा ‘दाही…’ दिशा अभिप्रेत नाहीयेत. सर्वप्रथम, उत्तर आणि दक्षिण या दोन विरुद्ध दिशा आहेत हेच मुळी गणित अमान्य करेल. आपल्याला त्या विरुद्ध वाटतात कारण आपण मध्यभागी बसलेलो आहोत. म्हणजे दिशांकडे बघण्याची आपली दृष्टी सापेक्ष झाली, आणि त्यातून वेगळेच घोळ निर्माण होतील. मी आणि माझी मैत्रीण एकमेकांकडे चालत येत असू, तर आमच्या दृष्टीने आम्ही दोघे विरुद्ध दिशेत चालतोय; पण रस्ता होता तिथेच आहे आणि पृथ्वी तर सूर्याभोवती फिरतेय. यातून नक्की दिशा कशी काढणार? म्हणूनच गणिताच्या दृष्टिकोनातून मी दिशा जेव्हा समजावून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला असं कळलं की कशालातरी नवीन दिशा म्हणण्यासाठी अस्तित्त्वात असलेलं सगळं त्या नव्या दिशेत हलवता आलं पाहिजे, म्हणजे सापेक्षता उरणार नाही. समजा आपण एका बिंदूपासून सुरुवात केली, ज्याला आपण शून्य मितीय म्हणतो कारण त्याला दिशाच नाही, आणि मग त्याच्यासारखेच असंख्य बिंदू त्याच्या शेजारी एका ओळीत ठेवले, तर आपल्याला एक मितीय रेषा मिळते. आता पुढची मिती म्हणजे पुढची पूर्ण नवी दिशा शोधायची असेल, तर या आख्ख्या रेषेला त्या दिशेने नेता आलं पाहिजे. ते आपण करू शकतो. आपण त्या रेषेची एक समांतर प्रतिकृती तिच्या शेजारी तिला खेटून ठेवू शकलो, तर याचाच अर्थ मूळ रेषेच्या डाव्या बाजूला एक संपूर्ण नवी दिशा अस्तित्त्वात आहे आणि ती आधीच्या दिशेशी काटकोन करत आहे. प्रत्येक मिती ही आधीच्या सगळ्या मितींशी काटकोनात असते या गणिताच्या सिद्धांताशी हे संयुक्तिक आहे. मग आपण या रेषेच्या अशाच असंख्य समांतर प्रतिकृती तिच्या आजूबाजूला निर्माण केल्या, तर आपल्याला द्विमितीय प्रतल मिळतं. तसंच आपण या द्विमितीय प्रतलाच्या असंख्य समांतर प्रतिकृती त्याच्या वरखाली रचल्या, तर आपल्याला त्रिमितीय अवकाश मिळतं. याच त्रिमितीय अवकाशात आपलं सबंध विश्व सामावलेलं आहे. आपण हीच प्रक्रिया पुढे करत राहिलो तर आपल्याला गणिताला मान्य असेल अशी चौथी मिती मिळेल. म्हणजे आता आपल्याला या आख्ख्या विश्वाच्या असंख्य प्रतिकृती हुडकाव्या लागणार आहेत? रेषा आणि प्रतलं होती तोपर्यंत ठीक होतं; आपण मुद्दाम विश्वाच्या असंख्य प्रतिकृतींची कल्पना केली म्हणून काय त्या प्रत्यक्षात असू शकणार आहेत? आणि आता जायला दिशा तरी कुठली उरलीय? हे सगळे प्रश्न रास्तच आहेत, पण केवळ हट्ट म्हणून आपण हे सगळं चार मितींमध्ये मांडायचा प्रयत्न केलाच तर ते कसं दिसेल? विश्वाच्या असंख्य प्रतिकृती, एकमेकींना खेटून, एका कुठल्यातरी दिशेत पुढे जात आहेत. 

या टप्प्यावर पोहोचल्यावर मी आ वासून मीच मांडलेल्या या विधानाकडे बघत राहिलो. प्रत्यक्षात हेच तर घडतंय! विश्वाच्या असंख्य प्रतिकृती म्हणजेच एका विशिष्ट क्षणी विश्वाची असलेली अवस्था! ज्याप्रमाणे आपण रेषेवर असताना आपल्या डावीकडे आणि उजवीकडे रेषा पसरलेल्या होत्या, प्रतलावर असताना वर आणि खाली प्रतलं पसरलेली होती; त्याप्रमाणेच अवकाशात असताना आपल्या पुढे आणि मागे, म्हणजेच भूतकाळात आणि भविष्यकाळात, आपणच आत्ता बघत असलेल्या अवकाशाचीच वेगवेगळी रूपं आहेत. आणि ही सगळी रूपं ज्यात पसरलेली आहेत ती चौथी मिती, ती नवी दिशा, म्हणजेच काळ. भौतिकशास्त्रात ज्याला ‘Arrow of Time’ म्हणतात तो हाच, आणि म्हणूनच आपल्याला जशा इतर मिती दिसत नाहीत तसंच काळाचंही अस्तित्त्व जाणवत नाही, हे सगळं आपल्या निष्कर्षाशी संयुक्तिक ठरतं. अर्थात, इतर मितींप्रमाणे आपल्याला काळाच्या या पट्ट्यावर बसलेली विश्वाची असंख्य रूपं दिसू शकत नाहीत, पण त्याला कारणीभूत आपल्या स्वतःच्या अस्तित्त्वातल्या कमतरता आहेत. एका द्विमितीय वस्तूला तिसरी मिती अनुभवता येणं ज्याप्रमाणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे आपल्यासारख्या मूळच्या त्रिमितीय जीवांना चौथी मिती अशी अनुभवता येणं अशक्य आहे, आणि हे फक्त काळाच्याच बाबतीत खरं आहे असं नाही. भौतिक वास्तवात काळ ही जरी चौथी मिती असली तरी गणिताच्या अमूर्त वास्तवात तर अक्षरशः अगणित मिती आहेत आणि सगळ्या याच नियमानुसार निर्मित आहेत. त्यानुसार, आपल्या द्विमितीय चौरसाची आणि त्रिमितीय घनाची चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मितीतली रूपं असलेल्या आकृत्या गणितात अस्तित्त्वात आहेत, आणि त्यांचं वर्णन करणारी समीकरणंही आहेत, पण आपल्याला त्या काढता येत नाहीत किंवा कल्पनेतही बघता येत नाहीत!

काळाचं एक मिती म्हणून अस्तित्त्व स्वीकारलं तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला एरवी खात्रीशीरपणे वाटतं तसा तो एक प्रवाह नसून आपल्या भौतिक वास्तवाचा एक अविभाज्य आणि अढळ असा गुणधर्म आहे. काळाच्या नदीत तरंगत पुढे जाणारं आपलं विश्व आहे असं आपलं आणि काळाचं नातं नाहीये; किंबहुना या नात्याचं वर्णन करायला आपल्या रोजच्या भौतिकातली कुठलीही उपमा देणं कठीण आहे. काळ सर्वत्र आहे आणि आपलं अस्तित्त्व त्याच्याशिवाय अपूर्ण आहे. मग एक स्वाभाविक प्रश्न समोर येतो, की काळ नक्की पुढेच चालला आहे याची आपल्याला इतकी खात्री का आहे? शनिवारनंतर रविवार उजाडतो, पण ही आपण दिलेली नावं झाली. प्रत्यक्षात पृथ्वीने स्वतःभोवतीच एक गिरकी घेतलेली असते आणि रविवारची सुरुवातही सूर्य उगवण्यापासूनच होते आणि शेवटही तसाच. आपल्या तारखा आणि वार यांच्या अनुपस्थितीत, प्रत्येक नवा दिवस आणि आधीचा दिवस यात तसा वरवर काहीच फरक नसतो. काही दिवसांपूर्वी २०२४ साल सुरु झालं तेव्हा आपण सगळ्यांनी ‘नवे संकल्प’, ‘नवी क्षितिजं’ आणि तत्सम घोषणा एकमेकांना पाठवल्या; आणि दरम्यान पृथ्वीने मात्र शांतपणे तिची ठरलेली प्रदक्षिणा पुन्हा सुरू केली. काळ हा नुसताच गोलगोल फिरत नसून पुढेच चालला आहे आणि आपणही त्यासोबत पुढेच जात असून आपल्याला मागे वळण्याची सोय नाहीये, हे इतक्या ठामपणे म्हणायला आपल्याला आपणच आखलेल्या दिनक्रमाच्या चक्रापेक्षा खूप जास्त सबळ अशा कारणाची गरज आहे. 

सुदैवाने तसं कारण आपल्याला अगदी सुरुवातीपासून माहित आहे. ही एकच गोष्ट अशी आहे जी आपण आपल्या मानवी वंशाच्या अगदी पहिल्या क्षणापासून अनुभवत आहोत आणि तिच्यात एकदाही खंड पडलेला नाहीये. तिचं सर्वत्र असलेलं अस्तित्त्व ओळखूनच आपल्या पूर्वजांनी ‘क्षणभंगवाद’ मांडला आणि तर्कशास्त्राच्या अभ्यासात ‘कारणमीमांसा’ (Causality) या संकल्पनेचा कायमचा समावेश झाला. आजचं आपल्या विश्वाचं स्वरूप जसं आहे तसं निर्माण होण्याला सर्वस्वी ही गोष्टच कारणीभूत आहे. ही गोष्ट म्हणजे अर्थातच, ‘बदल’! बदलाच्या अस्तित्त्वामुळेच काळ पुढे जात आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो, आणि आजच्या विश्वाच्या क्षणभरापूर्वीच्या प्रतिकृतीपासून त्याला वेगळं पाडणारी ‘बदल’ ही एकमेव गोष्ट आहे. बदल घडत नसता तर काळाच्या या एकमार्गी पट्ट्यावर बसलेल्या विश्वाच्या या असंख्य प्रतिकृती अगदी तंतोतंत एकसारख्याच असत्या. म्हणजेच, काळ अस्तित्त्वातच नसता. एक स्वतंत्र मिती म्हणून काळ अस्तित्त्वात असण्यासाठी बदल आवश्यक आहे. यामुळेच, काळाचं स्वरूप आणखी खोलवर समजून घेण्यासाठी आपल्याला बदलाचं स्वरूप आधी जाणावं लागेल.

तर्कशास्त्रात ‘कारणमीमांसा’ शिकताना आपला ‘सामान्यांचा दृष्टिकोन’ आणि ‘शास्त्रीय दृष्टिकोन’ यांच्याशी संबंध येतो. समजा ‘अ’ ला कारण (Cause) आणि ‘ब’ ला परिणाम (Effect) असं म्हटलं, तर या दोघांमधलं नक्की नातं काय? सामान्यांचा दृष्टिकोन असं म्हणतो की ‘अ’ हा ‘ब’ ला घडवून आणतो. तो कर्ता आहे, आणि ‘ब’ त्याच्याशिवाय घडूच शकत नाही. उदाहरणार्थ, पाऊस पडल्यावर जमीन ओली झाली म्हणजेच पावसाने जमिनीला ओलं केलं. याउलट शास्त्रीय दृष्टिकोन असं म्हणतो की ‘अ’ आणि ‘ब’ या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत, आणि त्यांच्यातलं नातं एवढंच की ‘ब’ हा ‘अ’ घडल्यानंतर लगेचच घडतो; किंबहुना ‘अ’ घडल्यावर ‘ब’ घडणं अटळ आहे. पण ‘ब’ घडायला ‘अ’ च घडला पाहिजे असं नाही; इतर घटनाही ‘ब’ घडायला कारणीभूत ठरू शकतात. म्हणजेच पाऊस पडला आणि लगेचच जमीन ओली झाली या स्वतंत्र घटना; आणि जमीन दुसऱ्या कुठल्या करणानेही ओली होऊच शकते की! 

तर्कशास्त्रानुसार जरी शास्त्रीय दृष्टिकोन योग्य असला, तरी सामान्यांचा दृष्टिकोन आपल्याला कधीकधी आवडतो, कारण ‘अ’ हा कर्ता आहे आणि ‘ब’ घडवून आणण्याची त्याच्यात ताकद आहे हा विचार आपल्याला काहीसा सुखावह वाटतो. तर दुसरीकडे शास्त्रीय दृष्टिकोन हेच म्हणतो की कोणी कोणाला घडवून आणू शकत नाही; या सगळ्या स्वतंत्र घटना असून घटनाक्रम तोच असण्यापलीकडे त्यांचा काहीही संबंध नाही. एका गोष्टीवर मात्र या दोन्ही दृष्टिकोनांचं अगदी एकमत होतं; ती म्हणजे ‘ब’ हा कधीच ‘अ’ चं कारण (Cause) ठरू शकत नाही. घटनाक्रम बदलू शकत नाही. ‘अ’ घडला, मग ‘ब’ घडला; यानंतर पुन्हा ‘अ’ कधीच घडू शकणार नाही. आपण ‘अ’ पासून ‘ब’ कडे जाऊ शकत असू तर उलट पुन्हा ‘अ’ कडे कधीच येऊ शकणार नाही. इथे कुणालातरी कदाचित कोंबडी आणि अंड्याचा प्रश्न पडेल. कोंबडीने अंडं दिलं आणि त्या अंड्यातून पुन्हा कोंबडीच जन्माला आली, पण तरी तीच कोंबडी नाही ना जन्माला आली? जन्म देणारी कोंबडी आणि जन्माला येणारी कोंबडी हे दोन स्वतंत्र जीव आहेत आणि यात कधीच फरक पडू शकत नाही. पावसाने ओली झालेली जमीन काही वेळाने अर्थातच पुन्हा कोरडी होईल. पण याचा अर्थ इथे ती आधी ओली होणं आणि मग कोरडी होणं असे दोन बदल एकापाठोपाठ एक घडले. ती ओली झाली हा पहिला बदल reverse झाला नाही. तिची आधीची कोरडी स्थिती आणि नंतरची कोरडी स्थिती ही काळाच्या पट्ट्यावरची विश्वाची दोन स्वतंत्र रूपं आहेत.

इथे असाही एक प्रश्न पडू शकतो, की जर ‘अ’ घडल्यानंतर ‘ब’ कायम घडेलच हे शास्त्रीय दृष्टिकोनाला मान्य असेल, तर मग ‘अ’ नेच ‘ब’ ला घडवून आणलं असं म्हणायला काय हरकत आहे? ‘अ’ नंतर ‘ब’ घडलाच पाहिजे असं खुद्द विश्वाचं म्हणणं असेल, तर देऊया की ‘अ’ ला जरा श्रेय त्याच्या कुवतीचं! पण इथेच खरी मेख आहे, कारण विश्व असं काहीच म्हणालेलं नाहीये. ‘कारणमीमांसा’ याबद्दलची विश्वाची मतं यापेक्षा खूपच वेगळी आहेत. ती काय आहेत ते जाणून घ्यायला आपल्याला ‘सुव्यवस्था’ (Order) आणि ‘अव्यवस्था’ (Chaos) या संकल्पनांना विश्वाच्या दृष्टिकोनातून जाणून घ्यावं लागेल. आपण जेव्हा सुव्यवस्था म्हणतो, तेव्हा आपल्याला अशी कुठलीतरी व्यवस्था किंवा घटनाक्रम अभिप्रेत असतो ज्याचा आपण आपल्या परीने काहीतरी अर्थ लावू शकतो, आणि कदाचित त्या शृंखलेतल्या पुढच्या घटना ओळखूही शकतो. आपण अशा प्रकारे सुव्यवस्थेची आपली स्वतःची व्याख्या करू शकतो, आणि तशी सुव्यवस्था अनुभवू पण शकतो, आणि विश्व हे अमान्य करत नाही. यात समस्या एवढीच आहे की कुठलीही सुव्यवस्था प्रत्यक्षात येण्याच्या संभाव्यतेपेक्षा अव्यवस्थेची संभाव्यता (Probability) कायमच जास्त असते; आणि याचं कारण इतकंच आहे की सुव्यवस्थेसाठी प्रत्येक गोष्ट बरोबर घडावी लागते, तर अव्यवस्थेसाठी त्यातली एकच चुकली तरी पुरते.

एक सोपं उदाहरण घेण्यासाठी मी अशी कल्पना करतो की मी विश्वाशी माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल एक सौदा करायचा प्रयत्न करतोय. सुरुवातीची माझी मागणी, मी आणखी काही वर्षं जगावं, एवढी साधी असते. गणित सोपं करायला आपण असं समजू की विश्व या घटनेची संभाव्यता ५०% आहे असं म्हणतं. हरकत नाही. पण मग माझी अजून एक मागणी असते: माझा मृत्यू शांतपणे, कसलाही त्रास न होता यावा. या घटनेचा मी किती वर्षं जगतोय याच्याशी थेट असा काही संबंध नसल्यामुळे, या दोन्ही घटनांना स्वतंत्र मानून दोघींची संभाव्यता ५०% धरली, तर अर्थातच दोन्हीही घडण्याची संभाव्यता २५% होते. माझ्या मागण्या अजून संपलेल्या नसतात. हळूहळू त्यात शिक्षण, नोकरी, घर अशा इतर नेहमीच्या गोष्टी येऊन एकूण माझ्या सुव्यवस्थेतल्या घटनांची संख्या सात होते. या सात घटनांना मघाचाच नियम लावला, तर सातही घडण्याची संभाव्यता ०.७८% एवढीच उरली आहे. 

या गणितातही एक दोष आहे; तो म्हणजे आपण या सगळ्या घटनांकडे त्या फक्त एका नाणं उडवण्याच्या घटनेसारख्या साध्यासरळ आहेत असं बघतोय. प्रत्यक्षात ते सगळे आयुष्यातले मोठे टप्पे आहेत आणि ते घडण्यासाठी प्रत्येक टप्प्यामागे असंख्य लहानसहान घटना बरोबर घडाव्या लागणार आहेत, आणि या सगळ्यामुळे संभाव्यता खूपच खाली कोसळेल. शिवाय ही फक्त माझी सुव्यवस्था झाली; बाकीच्यांचं काय? त्यांच्या इच्छित सुव्यवस्था कधीतरी माझ्या सुव्यवस्थेला येऊन छेदणार, आणि याने संभाव्यता परत घसरणार. या गोष्टीचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे टाईपरायटरवर बसवलेल्या माकडाची कथा. हे माकड कशीही कुठलीही बटणं दाबत बसलं, तर ते एकाच बैठकीत संपूर्ण ‘हॅम्लेट’ बिनचूक टाईप करून काढेल या घटनेची संभाव्यता काय? माकडांचं सोडा, हे कुठल्या माणसालाही जमेल असं मला वाटत नाही. ही संभाव्यता आकड्यांत मांडायला आपले संगणकही तयार होत नाहीत. विश्वाची ही अत्यंत चतुर खेळी आहे. ते कुठलीच घटना अशक्य आहे असं म्हणत नाही, पण बहुसंख्य घटनांना इतकं असंभव बनवतं की त्या तशाही घडत नाहीतच. यावर आक्षेप घेतला तर त्याचं उत्तर ठरलेलं: ‘सुव्यवस्थेची अपेक्षा करायला मी सांगितलं नव्हतं’. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन हे त्यांच्या ‘The Universe is under no obligation to make sense to you.’ या गाजलेल्या विधानामार्फत हेच सुचवत आहेत.

ठीक आहे, मी आता थेट विश्वाला उद्देशून म्हणतो. माझ्या स्वतःच्या आशा-आकांक्षांशी संबंधित सुव्यवस्थेचं तुला काही देणंघेणं नाहीये हे मी स्वीकारतो. पण तुझं स्वतःचं काय? जर तुझ्या रचनेत कुठे सुव्यवस्था नसेल, तर तुझं जे काही चालू असतं त्यातलं एवढं सगळं मी कसा काय व्यवस्थित समजावून सांगू शकतो? सूर्याभोवतीची पृथ्वीची प्रदक्षिणा? मूलकणांचं वर्तन? ताऱ्यांचे जीवनचक्र? गुरुत्त्वाकर्षण? या सगळ्या गोष्टींना समजावून सांगणारे सिद्धांत आम्ही मांडलेत आणि ते अपूर्ण असतील कदाचित, पण हे नियम मोडले गेलेले आम्ही पाहिले नाहीयेत. म्हणूनच आम्ही हेच नियम वापरून काय घडणार आहे तेही सांगू शकतो. मग ही सुव्यवस्थाच नाही का? 

यावर विश्व मला त्याच्या भाषेत समजावून सांगायला लागतं. आपल्याला विश्वाची भाषा बोलायची असेल तर आपण ऊर्जेबद्दल बोलणं प्राप्त आहे, कारण ऊर्जा हा विश्वाच्या आत्ताच्या स्वरूपाचा कणा आहे. पदार्थ (Matter) आणि ऊर्जा (Energy) ही अस्तित्त्वाची दोन स्वरूपे असली तरी पदार्थ हा उर्जेपासूनच निर्मित आहे हे आपल्याला आईन्स्टाईनच्या कृपेमुळे ठाऊक आहे. आपल्याला हेही ठाऊक आहे की ऊर्जा विश्वाच्या जन्मापासून होती तेवढीच आहे; ती वाढतही नाही किंवा कमीही होत नाही. ती फक्त स्वतःचं रूप बदलू शकते. म्हणूनच विश्वाच्या भाषेत, आपण जेव्हाही कुठलाही ‘बदल’ अनुभवतो, तेव्हा त्याच्या मुळाशी ऊर्जा आपलं रूप बदलत असते. ऊर्जेचं वर्तन समजून घेतल्यास आपल्याला बदल घडणं म्हणजे नक्की काय ते कळू शकतं. आणि ऊर्जेच्या वर्तनाबद्दल आपण कायम बघितलेली एक गोष्ट म्हणजे ऊर्जा balance होत राहते. दोन प्रदेशांपैकी एकात खूप जास्त ऊर्जा असेल आणि एकात खूप कमी ऊर्जा असेल तर ऊर्जा नेहमी पहिल्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाते आणि दोन्हीकडे समान ऊर्जा उरेपर्यंत जात राहते. ती जर नेहमी असंच करत असेल, तर अर्थातच ती विश्वाच्या रचनेतली एक सुव्यवस्था नाही का? पण इथे विश्व पुन्हा म्हणतं की तिने अस्संच वागलं पाहिजे अशी काही सक्ती नाहीये. माझ्यासमोर गरम चहाचा कप असेल, तर तो थंड होणार हे मला माहित आहे कारण चहात वातावरणापेक्षा जास्त ऊर्जा असल्याने ती चहातून वातावरणात जाईल. पण विश्वाच्या म्हणण्यानुसार, ती तितक्याच सहजपणे वातावरणातून माझ्या चहाच्या कपात येऊन त्याची उष्णता वाढवूही शकेल. मग मला असं प्रत्यक्षात घडताना कधीच का दिसत नाही?

याचं उत्तर तुम्ही कदाचित आता ओळखू शकाल. यालाही कारणीभूत पुन्हा संभाव्यताच आहे. ऊर्जा एका ठिकाणातून दुसरीकडे जाणं म्हणजेच ऊर्जेचं एकक असलेल्या ‘Quanta’ इकडून तिकडे फिरत असतात. समजा चहाच्या कपात ऊर्जेच्या चार Quanta आहेत आणि हवेत दोन आहेत असं मानलं, तर आपलं नेहमीचं गणित करून आपल्या लक्षात येतं की दोन्हीकडे तीन तीन Quanta उरण्याच्या घटनेच्या संभाव्यता ३१.२५% एवढी असून, सगळ्या शक्यतांचा संभाव्यतांपैकी ती सगळ्यात जास्त आहे, तर दुसरीकडे एकाच ठिकाणी सहा Quanta उरण्याच्या घटनेची संभाव्यता फक्त १.५६% एवढीच आहे. तशी हीही काही अगदी वाईट नाहीये, कारण याचा अर्थ मी चहाचे शंभर कप पाहिले तर त्यातल्या एका कपात तरी मला हे घडताना दिसलं असतं. पण प्रत्यक्षात चहाच्या कपात आणि बाहेरही अब्जावधी Quanta असतात, त्यामुळे त्या एका घटनेची संभाव्यता इतकी कमी होते की ते प्रत्यक्षात कधीच घडत नाही. 

हे माझ्या लक्षात आणून दिल्यावर विश्व मग मला सुव्यवस्था आणि अव्यवस्था यांच्याकडे त्याच्या दृष्टिकोनातून बघायला शिकवतं. त्याच्या लेखी या दोघी परस्परविरोधी संकल्पना नाहीच आहेत. त्याच्या मते उलट, ‘अव्यवस्था’ हा एकूणच सगळ्या शक्यतांचा संच आहे आणि ‘सुव्यवस्था’ ही फक्त त्या संचातली एक शक्यता आहे. ते आधी मला मूलकणांचं उदाहरण देतं. हाईझेनबर्ग या शास्त्रज्ञाच्या शोधामुळे आपल्याला हे माहित आहे की अणूच्या अंतरंगात केंद्राभोवती फिरणारा एक इलेक्ट्रॉन आणि वर बाहेर सूर्याभोवती फिरणारा एक ग्रह यांच्यात, प्रथमदर्शनी काहीच जाणवला नाही तरी एक मोठा फरक आहे. आपला शनी बरोबर एका तासाने आकाशात नक्की कुठे असणार आहे ते आपण ठामपणे सांगू शकतो, कारण त्याच्या प्रदक्षिणेची गती आणि आत्ताचं स्थान आपल्याला माहित आहे आणि पुढचं गणित सोपं आहे. पण हाईझेनबर्ग तत्त्वानुसार, एका इलेक्ट्रॉनची गती आणि त्याचं स्थान हे आपल्याला एकाच वेळी अचूकपणे कधीच सांगता येत नाही. जर आपण गती अचूकपणे सांगायचा प्रयत्न केला तर आपला स्थानाचा अंदाज हमखास चुकेल, आणि उलटही तसंच. यामुळेच, आपल्याला त्या इलेक्ट्रॉनची कक्षा माहित असली तरी कुठल्याही क्षणी तो त्या कक्षेवर कुठे आहे ते सांगता येत नाही, आणि म्हणूनच संभाव्यतेनुसार तो त्यावर कुठेही असू शकतो. आपण सुव्यवस्थेनुसार नेमून दिलेल्या स्थानावर असण्याचं त्याच्यावर काहीही बंधन नाही. आणि आपण एरवी पृथ्वीवर बघतो ती प्रत्येक गोष्ट मुळात याच मूलकणांची बनलेली असल्यामुळे, त्यांच्या या वर्तनाचा तिच्या वर्तनावरही परिणाम होतो. परिणामी, निसर्गातल्या पानांची सळसळ, गवताच्या पात्यांची हालचाल, पावसाच्या थेंबांचे कोसळणे वगैरेंसारख्या सगळ्या गोष्टी अत्यंत अव्यवस्थित आहेत; म्हणजेच त्यांची हालचाल नक्की कशी असावी ते आपल्याला काहीच गणित मांडून सांगता येत नाही. यावर मी असं म्हणतो, की जर त्या इलेक्ट्रॉनने कुठल्या स्थानावर असावं याने त्याला काहीच फरक पडत नाही, तर समजा असला तो मी सुव्यवस्थेने आखून दिलेल्या ठिकाणी, तर त्याचं काय जातं? विश्वाचं यावरचं उत्तर अगदी सोपं असतं: समजा त्याने तसं केलंच, तरी त्याला सुव्यवस्था म्हणता येणार नाहीच. का? कारण ‘मी सांगितलेल्या ठिकाणी थांबलास तरी चालेल’ यावर सुव्यवस्थेचं कसं समाधान होईल? ती ‘सुव्यवस्था’ आहे, याचाच अर्थ तिचं कायम ‘मी सांगितलेल्या ठिकाणीच थांबलं पाहिजेस’ असंच म्हणणं असणार! जोवर इलेक्ट्रॉनला हे धुडकावून लावण्याची मुभा आहे, तोवर तो तिथेच थांबला काय किंवा वेगळीकडे थांबला काय, त्याने काहीच फरक पडत नाही. इथे, विश्व सुरुवातीला ‘सुव्यवस्था ही अव्यवस्थेच्याच अनेक शक्यतांपैकी एक असते’ असं का म्हणालं होतं ते माझ्या लक्षात येतं. 

पण मला वाद सुरु ठेवण्यासाठी विश्वानेच मघाशी दिलेल्या एका उदाहरणातून पळवाट सापडते: इलेक्ट्रॉन नसेल जुमानत, पण शनी जुमानतो ना? म्हणूनच आपल्याला त्याचं भविष्यातलं स्थान अचूकपणे सांगता येतं, आणि पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर मोजून ठेवता येतं; फार काय, आपल्या आकाशगंगेचं एक स्थिर असं चित्रही काढून जपून ठेवता येतं आणि या गोष्टींत आपल्या पाहण्यात तरी काहीच फरक पडत नाही. इथे विश्व मला या सगळ्या थरारनाट्यामधल्या अजून प्रवेश न घेतलेल्या शेवटच्या पात्राचा परिचय करून देतं: कृष्णऊर्जा (Dark Energy). 

विश्व प्रसरण पावत आहे हे आपल्याला माहित झाल्याला आता बराच काळ झाला, पण आपल्याला हे नक्की कळलं तरी कसं? एकतर आपल्या विश्वाच्या सीमारेषा कुठे आहेत तेच आपल्याला माहित नाहीये. आपण ज्याला ‘दृश्य विश्व’ (Observable Universe) म्हणतो, तेच प्रत्यक्षातलं संपूर्ण विश्व असल्याचा दावा आपण शहाणपणा दाखवून कधीच केलेला नाहीये. प्रत्यक्ष विश्व या दृश्य विश्वापेक्षा थोडंसंच मोठं आहे, का नेहमीप्रमाणे अकल्पित मोठं आहे; आपल्याला काही अंदाज नाहीये. शिवाय या विश्वात आपण नक्की कुठे आहोत तेही आपल्याला माहित नाहीये. आपण एरवी आपल्या शहरांना प्रसरण पावताना पाहतो, तेव्हा नक्की काय घडत असतं? शहराची आज जी काही अनधिकृत सीमा असते, तिच्या पलीकडे उद्या कोणीतरी एक अपार्टमेंटची इमारत, चार दुकानं आणि एक स्टारबक्स (असायलाच हवं!) टाकतं, आणि तो लहानसा तुकडा शहराचा भाग होऊन जातो. विश्वाच्या बाबतीतही हेच होत असेल का? आत्ता विश्वाची सीमारेषा जिथे कुठे आहे तिच्या जरासं पलीकडे विश्व आणखी तारे, ग्रह वगैरे निर्माण करून स्वतःला वाढवतंय का? पण आपण मघाशीच लक्षात घेतल्याप्रमाणे, विश्वातलं ऊर्जेचं प्रमाण ठरलेलं आहे आणि त्यात बदल होऊ शकत नाही, म्हणूनच नव्या पदार्थाची अशी नुसतीच निर्मिती होऊ शकत नाही. मग नक्की काय चालू आहे?

प्रसरण पावण्याचा दुसरा मार्ग म्हणजे आपला देह आहे तसाच आणखी जागा व्यापून पसरणं! विश्वाचा देह म्हणजेच हे असं विखुरलेल्या ग्रहताऱ्यांनी भरलेलं अवकाश असल्यामुळे, याच ग्रहताऱ्यांमधलं अंतर जर वाढत असेल तर विश्व प्रसरण पावत असल्याचं आपल्याला कळू शकेल. असं होत असेल तर, आत्ताच्या क्षणी विश्वाच्या अगदी काठांवर असलेल्या गोष्टी विश्वाच्या केंद्रापासून जरा आणखी लांब जात असतील आणि त्यामुळे विश्वाची सीमारेषा रुंदावत असेल. हे मात्र आपण प्रत्यक्ष बघितलेलं आहे. खरोखरीच, विश्वातल्या सगळ्या गोष्टी एकमेकींपासून हळूहळू लांब सरकत आहेत. आपली आकाशगंगा आणि शेजारची देवयानी यांच्यातलं, आपली सूर्यमाला आणि शेजारच्या ग्रहमालांमधलं; फार काय, आपल्या आणि सूर्यामधलं अंतरही अगदी हळूच वाढत आहे. हे घडवणाऱ्या शक्तीला आपण ‘कृष्णऊर्जा’ असं नाव दिलं आहे, आणि आपल्याला तिच्याबद्दल आता एवढं कळलं आहे की विश्वातलं स्वतःचं प्रमाण वाढवू शकणारी ती एकमेव गोष्ट आहे. ती दोन गोष्टींमध्ये आणखी अंतर, म्हणजेच आणखी अवकाश निर्माण करते आणि मग स्वतः ते व्यापते. परिणामी, विश्वाचा एकूण पसारा सर्व बाजूंनी प्रसरत जातो; आणि तिचं विश्वातलं प्रमाण आणि तिची शक्ती, दोन्हीही वाढत जातं. आपल्या माहितीनुसार, आत्ताच्या क्षणी विश्वातली ६८% जागा तिने व्यापलेली आहे; आणि आपले सगळे ग्रह, तारे, आकाशगंगा यांच्यासकट यच्चयावत सगळ्या पदार्थरूपी गोष्टींनी मिळून फक्त ५% जागा व्यापलेली आहे. ती जर अशीच सक्रिय राहिली तर ती हळूहळू विश्वातली ७०%, मग ८०% आणि शेवटी १००% जागा व्यापून टाकेल. विश्वाचा अंत कसा होईल याबद्दल आपण जे अंदाज बांधले आहेत त्यांच्यापैकीच हा एक अंदाज आहे. हा अंदाज म्हणजेच, कृष्णऊर्जा आपल्या विश्वाला अक्षरशः ताणून ताणून फाडून काढेल आणि सगळ्या गोष्टी एकमेकींपासून इतक्या लांब भिरकावल्या जातील की त्यांच्यावर गुरुत्वीय आणि इतर बलं कार्यरत राहू शकणार नाहीत आणि त्या पुन्हा कधीही एकाच विश्वाचा भाग उरणार नाहीत.

विश्वाच्या बाकी सगळ्या भयकथांप्रमाणेच, हिचाही शेवट ‘हे घडायला अजून अब्जावधी वर्षं आहेत’ या वाक्याने होतो, म्हणून आत्ता आपण त्याची काळजी करण्याचं कारण नाही. आपल्याला मुख्य कर्तव्य या गोष्टीशी आहे, की विश्वात अगदी सगळ्या पातळ्यांवर अव्यवस्थाच नांदत असल्याचा ही कृष्णऊर्जा हा सज्जड पुरावा आहे. आपल्या लेखी स्थिर आणि अढळ असलेल्या अवकाशातल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्या नकळत अव्यवस्थेला बळी पडत आहेत, आणि तेही आजपासून नाही तर विश्वाच्या जन्मापासून! महास्फोट झाल्यानंतर विश्व सुरुवातीला ज्या गतीने प्रसरण पावलं आणि आत्ताच्या रूपात स्थिरावलं, त्यालाही कृष्णऊर्जाच कारणीभूत होती. अस्तित्त्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीला इतस्ततः भिरकावण्याचा हा खेळ विश्वाच्या जन्मापासूनच सुरु झालेला आहे, आणि आत्ता आपल्या परिचयाचं सगळं - अगदी आपली सूर्यमाला, आकाशगंगा असं सगळं - जसं अपघातानेच एकत्र येऊन निर्माण झालेलं आहे, तसंच एक दिवस ते अपघातानेच विखरून नष्टही होणार आहे. सगळा मुद्दा हा आपण सुव्यवस्था हुडकण्याचा नसून, ती कधी अस्तित्त्वात नव्हतीच हे स्वीकारण्याचा आहे. यातूनच आपल्याला हेही कळतं की ‘बदल’ हा अव्यवस्थेशिवाय अशक्य आहे, कारण जर सुव्यवस्था टिकायला हवी असेल तर महास्फोट घडूनच चालणार नाही. महास्फोटाच्या त्या क्षणातच आपलं विश्व, अव्यवस्था, सातत्यशील बदल, आणि काळ, अशा चौघांचा एकत्र जन्म झाला. 

बऱ्याच वेळाने ‘काळ’ हा शब्द परत आला, नाही का? जरा भरकटलोच आपण मध्ये. आता या सगळ्याला एकत्र गुंफून मगच पुढे जाऊया. आपण कुठवर पोहोचलो आहोत? महास्फोट झाला. सुव्यवस्था नष्ट झाली. अव्यवस्थेचा जन्म झाला. अस्तित्त्वात असलेली प्रत्येक गोष्ट कायमस्वरूपी भरकटत राहण्याऱ्या मार्गावरून चालू लागली. या मार्गावरून चालण्याची तिची क्रिया म्हणजेच ‘बदल’. हा बदल एकाच दिशेने घडू शकतो. ती दिशा एक नवी मिती आहे, आणि ती मिती म्हणजेच काळ. 

यातून आपल्याला ‘काळ’ आणि ‘बदल’ यांच्यातलं अतूट नातं स्पष्टपणे कळून चुकतं. म्हणूनच, काळाच्या ‘प्रवाहा’ची गती मंदावणं किंवा तो थांबणं म्हणजे नक्की काय ते आता आपल्याला बदलाच्या भाषेत समजून घेता येईल. काळ थांबणं म्हणजेच बदल घडण्याचं थांबणं. दृश्य पातळीवर, बदल नाही म्हणजे कोणीच काहीच हालचाल करत नाही अशी आपण कल्पना करू शकतो, पण प्रत्यक्षात हा परिणाम यापेक्षा खूप खोलवर गेलेला असतो. आपण अगदी स्थिर असलो, तरी आपल्या शरीरात आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या असंख्य प्रक्रिया चालूच असतात. रक्तप्रवाह चालू असतो. अवयव आपापली कामं करत असतात. नव्या पेशी जन्माला येत असतात आणि आधीच्या मरत असतात. जर काळ थांबला, तर त्याही थांबतील. आणि म्हणूनच, काळ थांबल्याचं आपल्याला जाणवू शकणार नाही. कारण मुळात काहीतरी जाणवायला, आपल्या इंद्रियांनी काहीतरी माहिती गोळा करून ती मेंदूपर्यंत पोहचवली पाहिजे. काळ थांबला तर यातलं काहीही होणार नाही आणि आपण अक्षरशः निर्जीव होऊ. आपल्यात आणि रस्त्यावरच्या दगडात काहीही फरक उरणार नाही. 

या निर्जीव होण्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं हृदयही अर्थातच थांबेल. तुम्हाला जर कधी असा प्रश्न पडला असेल, की हृदयाप्रमाणेच आपली फुफ्फुसं, किडनी, जठर वगैरे सगळेच आपण जिवंत राहण्यासाठी आवश्यक असताना, एकट्या हृदयालाच आपण जीवितावस्थेचं सर्वश्रेष्ठ प्रतीक म्हणून गौरवतो? आपण जिवंत आहोत आणि आपल्याला ‘जाणीव’ आहे याचा संबंध आपण नेहमी हृदयाशीच का लावतो? याचं कारण असं आहे की हृदय फक्त एक रक्ताचा पंप नसून, ते आपली काळाच्या प्रवाहाची जाणीव करून देणारा एक Meter देखील आहे. आपण जेव्हा काळ सापेक्ष आहे म्हणतो तेव्हा आपण थेट कृष्णविवरांची चौकशी करायला जातो, पण याचाच पुरावा आपल्या अगदी आजूबाजूलाही आढळतो. पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाचं आयुर्मान वेगवेगळं असतं. माश्या आणि डास काही दिवसच जगतात, कुत्री आणि मांजरं बारातेरा वर्षं जगतात, आपण शंभर वर्षं जगू शकतो आणि काही कासवं चारशे वर्षं जगू शकतात. याचा थेट संबंध आपल्या सगळ्यांच्या Heart Rate शी असतो हेही आपल्याला माहित आहे. आपल्यापेक्षा खूपच कमी आयुर्मान असलेल्या उंदराचं हृदय एका मिनिटाला आपल्या हृदयाच्या कितीतरी पट ठोके देतं. याचाच एक परिणाम असाही होतो, की त्या उंदराच्या दृष्टीने काळाचा प्रवाहच आपल्या तुलनेत मंदावतो. आपल्याला त्याच्या हालचाली खूपच जलद वाटत असल्या तरी त्याच्या दृष्टीने त्या normal असतात आणि त्याला उलट आपण खूप हळू हालचाल करतो असं वाटतं. याच तफावतीचा आयुष्यभराच्या पातळीवर झालेला परिणाम म्हणजे, आपल्या लेखी उंदीर फारच लवकर मरत असला तरी त्याच्या दृष्टीने तो आपल्याइतकंच लांबीचं आयुष्य जगलेला असतो! Heart Rate चा Aging शी थेट संबंध असल्यामुळे, उंदीर आपल्या तुलनेत खूपच लवकर म्हातारा होतो; तर उलट आपल्या तुलनेने मंदपणे ठोके देणाऱ्या हृदयामुळे आपला म्हातारं होण्यापर्यंतचा कालावधी खूप जास्त असतो, पण आपल्या दृष्टीने! आपण जर त्या चारशे वर्षांच्या कासवाला जाऊन विचारलं, तर आपण मनुष्यप्राणी बिचारे खूपच लवकर मरतो असं मत ते दयेने व्यक्त करेल.

मी कृष्णविवराजवळ ती जी पाच मिनिटं घालवली तेव्हा नक्की काय घडलं त्याचा उलगडा आता अखेर आपल्याला होऊ शकतो. कृष्णविवराच्या आतमध्ये काळ खरंच थांबतो आणि त्याच्या जवळ त्याची गती मंदावते. आता आपल्याला माहित आहे की काळाची गती मंदावणं म्हणजेच बदल घडण्याची गती मंदावणं. म्हणूनच मी कृष्णविवराच्या जवळ गेलो तेव्हा माझ्या सगळ्या शारीरिक प्रक्रियांची गती एकदम खूप मंदावली. माझं हृदय अतिशय संथपणे ठोके देऊ लागलं. इतक्या संथपणे, की त्याचा एक ठोका होईपर्यंत पृथ्वीवरच्या माझ्या मैत्रिणीचे अक्षरशः कोट्यवधी ठोके पूर्ण होत होते! माझं हृदयच इतकं मंदावल्यामुळे, मला अर्थातच तो सगळा काळ पाच मिनिटांएवढाच भासला, आणि माझ्या शरीराचं वयही तेवढ्याच प्रमाणात वाढलं. दरम्यान पृथ्वीवरच्या सगळ्यांची हृदयं नेहमीच्याच गतीने ठोके देत असल्यामुळे माझी मैत्रीण पन्नास वर्षांनी मोठी झाली. शेवटी आमच्या दोघांचंही बरोबरच होतं. विश्वाच्या आयुष्यातला एकच विशिष्ट टप्पा आम्ही दोघांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने अनुभवला होता. आणि नक्की किती काळ उलटला या प्रश्नाचं उत्तर आहे, पाच मिनिटंही, आणि पन्नास वर्षेही! आणि याहून स्पष्ट काहीच सांगता येणार नाही, कारण काळाचा स्वभावच असा. त्याच्या याच स्वभावामुळे अगदी त्या राक्षसी कृष्णविवरांपासून विश्वातल्या सगळ्या गोष्टींचं आपल्यासारख्या एका लहानशा ग्रहावरच्या लहानशा जीवांमधल्या लहानशा हृदयाशी एक अतूट असं नातं निर्माण झालेलं आहे. काळाची ही नवलकहाणी सर्वार्थाने आपल्या सगळ्यांचीच; आपल्या विश्वाचीच कहाणी आहे.            

“किती वाजलेत?” माझ्या जवळपास कुठेतरी अचानक एक झोपाळलेला आवाज आला.

        “सात,” मी फोन बघत म्हणालो. उजाडल्याचं माझ्या लक्षातही आलं नव्हतं. “उठतेयस ना आता?”

        “नाही, तू असं कर… आत्तापासून बरोबर पंधरा मिनिटांनी मला परत उठव. किती?” 

        “पंधरा मिनिटं,” असं मी आज्ञाधारकपणे पुटपुटल्यावर माझी मैत्रीण परत झोपली. तिने मलाच ‘किती’ असं ठणकावून विचारल्याचं आधी मला हसू आलं, पण मग मी विचार केला की तिचं बरोबरच होतं. पंधरा मिनिटं म्हणजे काय यावर जोपर्यंत आमचं एकमत होऊ शकत होतं, तोपर्यंतच या सगळ्याला काहीतरी अर्थ असू शकत होता. 



 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प