... आणि पाऊस आला मोठा


मागे वळून पाहिल्यावर, हे पटत नाही की जवळजवळ दोनच वर्षांपूर्वी माझा या जगाशी इतका कमी परिचय होता की मला ‘ब्रोकर’ ही व्याकरणाची चूक वाटायची. इतक्या कमी काळात माझ्यासमोरची ती अलिबाबाची गुहा उघडली, आणि एकदोन वेळा मलाच बाहेर ढकलून बंदही झाली. का कोण जाणे, पण मागचा लेख काहीसा अपूर्ण वाटत होता. हाही बऱ्यापैकी तसाच असेल; म्हणजे यातही शेअर मार्केटविषयी काही गोष्टी, काही किस्से, काही गप्पा वगैरे आहेत. शिवाय वडाच्या झाडाखालच्या कट्ट्यावर बसलेल्या चार अनुभविक मंडळींनी खांद्यावर हात ठेवून दिलेले सल्ले ते वेगळेच!
बाकी गावाकडच्या एका गोष्टीचा या बाजारपेठेशी खूपच जवळचा संबंध आहे. शेतावर राबणाऱ्या आणि शेतकऱ्याच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या पण त्याच्या कुटुंबाचा भाग असलेल्या बैलांपैकी एक आज मुंबईच्या BSEच्या भव्य इमारतीसमोर ऐटीत उभा आहे. आपण कुठेही हललो तरी आपल्याकडेच पाहणारा! असाच तेजस्वी बैल हा वॉल स्ट्रीटचाही अविभाज्य भाग आहे. मार्केटमध्ये तो सर्वात शक्तिमान, आणि त्याची चाल ही मार्केटची ट्रेंड! तसं अस्वल पण तितकंच शक्तिमान असतं, पण लोकांना बैलाचं कौतुक जास्त. आपल्या संस्कृतीत बैल हा साधा-भोळा आणि लोभस असा प्राणी आहे, पण या बाजारपेठेचा उगम ‘तिकडे’ झालेला असल्याने आपणही त्यांची बैलाची इमेज वापरतो. हत्ती फार संथ आणि चित्ता तसा लहान, म्हणून प्रचंड ताकद आणि तितकाच वेग याचं ‘बैल’ हे सर्वमान्य प्रतीक आहे. मार्केटमध्ये शेअर्स विकत घेणाऱ्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणजे बैल, तर विकणाऱ्यांचा म्हणजे अस्वल. घेणारे किमती वाढवून एकूण उलाढालीला जोर आणतात म्हणून ते बैल, आणि विकणारे एकूणच मरगळ पसरवतात म्हणून ती अस्वलं. मजा याची वाटते की या कल्पना इतक्या लोकप्रिय झाल्यात, की आजही buyers आणि sellers या शब्दांऐवजी बैल आणि अस्वल हेच प्रचलित आहेत. यात उतरणाऱ्या प्रत्येकाला एकदा ही रूपं घ्यावी लागतात. थोडक्यात, शेअर मार्केट मध्ये राहून जिंकणे म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून, दिवसा बैलांच्या कळपात राहून त्यांच्यासोबत दौड करणे आणि रात्री हळूच अस्वल बनून अंधारात गुडूप होणे, हेच!
शेअर मार्केटला एकूणच प्रतीकं आणि प्रतिनिधी यांचा पुळका फार! त्याला स्वतःचं असं अस्तित्व नसल्याने असेल. मागच्या लेखात उल्लेख केलेल्या त्या खास चॅनेल्सची ‘हवामान’ सांगण्याची स्वतंत्र तऱ्हा असते. पण याचे सगळ्यात लोकप्रिय आणि तितकेच उपयोगी प्रतिनिधी म्हणजे इंडेक्स! प्रत्येक मोठ्या स्टॉक एक्सचेंजकडे स्वतःची इंडेक्स असतात. आपल्याकडची BSE Sensex आणि Nifty 50 ही सगळ्यात लोकप्रिय आहेत. त्याशिवाय इतर आर्थिक क्षेत्रातील ‘Bank Nifty’ सारखी तर कंपनीच्या आकारानुसार ठरलेली ‘Nifty Mid 100’ अशी काही खास इंडेक्सही असतात. जगातल्या सगळे मार्केट्स जोडले गेलेत ते या इंडेक्समुळे, आणि तेही अगदीच कुतूहलजनक स्वरूपात. मला तरी सगळे इंडेक्स खूप हळवे वाटत आले आहेत. मोठा धक्का बसला की सहन न होऊन मट्कन खालीच बसतात. कोणी वेळेत खुर्ची दिली नाही तर थेट जमिनीवरच! बातमी आनंदाची असेल तर बरोबर उलटं. शिवाय जगभरातल्या इंडेक्समध्ये जवळिकीचं नातं असतं. त्यांच्यापैकी कुणी एक पडला तर बाकीचे हसत नाहीत, उलट स्वतःच पडतात. बहुतेक सर्व वेळा या इंडेक्सची वागणूक देशातली किंवा जगातली मानसिक स्थिती दर्शवते. युरोपीयन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडला तेव्हा सेन्सेक्स असाच कोसळला होता, पण त्यांच्या FTSE या इंडेक्सला फारसं काही झालं नाही. म्हणजे ब्रिटिश लोक आपल्या निर्णयावर खूश होते वाटतं. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा त्यांच्या Dow Jones ने तर सूर मारला होता. पण लगेचच दुसऱ्या दिवशी तो वेगाने चढायला लागला आणि काही काळातच त्याच्या विक्रमी उंचीवर (All Time High) जाऊन पोहोचला. अशा परिस्थितीत हे इंडेक्स खूप बोलके असतात. पण त्यांचा खरा उपयोग होतो तो मार्केटची स्थिती सांगण्यासाठी आणि आपल्याला चांगल्या कंपन्यांची माहिती देण्यासाठी. नव्या कंपनीत गुंतवणूक करताना आपण साशंक असलं पाहिजे, कारण खोट्या कंपन्या काढून बाजारपेठेचा फायदा घेणारे लोक असतात. अशा वेळी सेन्सेक्स आणि निफ्टी हे उपयोगी निकष ठरतात. ‘पॉवर ग्रिड’ नामक कंपनीचा भाव अचानक चढायला लागल्याचं कारण शोधताना मला कळलं की त्याच्या पुढच्या महिन्यात तिला सेन्सेक्समध्ये समाविष्ट करण्याचं ठरलं होतं. यानंतर कंपनीच्या क्षमतेबद्दल आपल्याला काळजी वाटत नाही. तेव्हा मी ती घेतली आणि आज ती माझ्या आवडत्या ठरलेल्या कंपन्यांपैकी एक आहे.
‘आवडती कंपनी’ म्हटल्यावर, वडाच्या झाडाखालच्या आजोबांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. काही ठरलेल्या कंपन्या ठेवणं यात काही गैर नाही, पण कंपनी इतकीही ‘आवडती’ होऊ नये. त्या तज्ञांच्या मते, शेअरच्या प्रेमात पडणं ही मार्केटमधली एक भयंकर चूक आहे. असं केलं तर आपल्याच्याने तो वेळेवर विकला जात नाही, आणि मग आपले प्रेम हे साताजन्माचे वैर होते आणि नंतर बराच काळ ती कंपनी चढत असतानाही आपण घेत नाही. म्हणून आजोबा सांगतात की शेअरकडे केवळ ‘financial asset’ म्हणूनच बघावं, आणि आपल्याला जास्त पैसे मिळवून देणे एवढाच त्याचा उपयोग आहे हे लक्षात ठेवावं. पण काही लोक यात उगीचच भावनिक गुंतवणूक करतात. “तो पडतोय तर अशा परिस्थितीत मी त्याची साथ कशी सोडू” वगैरे वगैरे. मग व्हायचं तेच होतं आणि हेच लोक नंतर शेअर मार्केटला ‘क्रूर’, ‘हृदयशून्य’, ‘निर्दय’ अशी विशेषणं जोडत सगळीकडे प्रवचन देत फिरतात. आता त्यांच्याइतक्या प्रकर्षाने आपल्याला वाटत नसलं तरी ते हृदयशून्य आहे हे तर खरंच आहे. मग असा काही विषय निघाला की आजोबांच्या डोळ्यात अंगार फुलतो आणि ते “Show no mercy, for you will receive none!” हा त्यांचा आवडता आणि संदर्भ सोडून काढलेला डायलॉग मारतात. तात्पर्य हेच की आपण यामध्ये गुंतवणूक करावी; गुंतून पडू नये.
शेअर मार्केटमध्ये राहिलं की आपल्या देशात किती उद्योग सुरु आहेत हे आपल्याला पहिल्यांदाच स्पष्ट जाणवतं. मी कुठेतरी वाचलं की BSE वर ६०००हून अधिक कंपन्यांची नोंद आहे. सहा हजार? बापरे! एरवी रोजच्या आयुष्यात आपला फारतर पंधरावीस कंपन्यांशी संबंध येत असेल. शिवाय त्यातल्या काही हटकून परदेशी असतातच. आणि संपूर्ण भारतीय असे कमीत कमी ६००० उद्योग आपल्या आजूबाजूला कार्यरत आहेत, हे वाचून धक्काच बसतो. आणि ‘कमीत कमी’ ६०००, कारण मार्केटमध्ये नोंद न केलेल्या कंपन्यांची संख्या त्याहून कितीतरी जास्त असेल. नोंद होते म्हणजे काय होतं? तर IPO (Initial Public Offering) नामक एक दिवस असतो. म्हणजे जरा चांगली परिस्थिती असलेली कंपनी आपली एकूण पुंजी मोजते आणि त्याला एका ठराविक Face Value ने भागून तेवढे शेअर्स तयार करते. त्यातले काही मार्केटवर विकायला काढते. इथे बाजारभाव आणि Face Value यांच्यात फरक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. १००च्या नोटेची किंमत आणि त्या कागदाच्या तुकड्याचं मूल्य यांच्यात जो फरक असतो तोच. बहुतेक कंपन्या १० रु. Face Value ने शेअर्स काढतात. मग नंतर भाव अतीच वाढला तर शेअर ‘split’ करून, म्हणजे Face Value कमी करून आणि शेअर्सचे तुकडे करून भाव कमी करता येतो. IPOची किंमत कंपनी स्वतः ठरवते. कुठल्या IPOची बातमी आली की तो मालक त्यांच्या कुलदेवतेला नवस बोलतानाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं. “एवढा IPO यशस्वी होऊ देत, मी पुढच्या सोमवारी तुला सोन्याचा बैल वाहीन,” वगैरे. श्रद्धाळू वृत्ती असते, त्यात गैर काय? पण कारण हेच की IPO बुडण्याची शक्यताच जास्त असते. खूप चांगल्या मोठ्या कंपन्यांचे IPO आधी जोरात आपटून मग वरच्या दिशेने मार्गक्रमण करतात, असे पूर्वी झालेले आहे. याचं कारण हेच की बऱ्याचदा त्या कंपनीची आपल्याला शून्य माहिती असते. एका मोठ्या कंपनीने आपलीच एक छोटी शाखा काढली, किंवा आपल्या ओळखीची एखादी कंपनी पहिल्यांदा आली (CCD सारखी) तर गोष्ट वेगळी. पण CCD (कॅफे कॉफी डे) चा IPOही असाच जोरात आपटला होता. कारण कंपनी चांगली असली तरी शेअर चांगली हालचाल करेलच याची काही शाश्वती नसते. रोजची खरेदी करणाऱ्यांपेक्षा IPO घेणाऱ्यांच्या मनात जास्त भीती असते. म्हणून भाव जरा फिरला तरी त्यांचं अवसान गळतं आणि ते अस्वल बनायची घाई करतात. आणि सगळेच विकतायत म्हटल्यावर काय होणार? गंमत अशी आहे, की जगातले नावाजलेल्या, शेअर मार्केटमध्ये भरपूर कमाई केलेल्या लोकांच्या संपत्तीचा मोठा वाटा योग्य ते IPO वेळेवर घेतल्यामुळे झालेल्या कमाईचा आहे. सगळ्या कंपन्या सुरुवातीला लहानच असतात. कल्पना करा, आज Colgate किंवा Britannia वगैरेंचे IPO घेतलेले लोक किती चैनीत असतील! थोडक्यात, सगळ्यात जास्त फायदा आणि तोटा हा IPOतून होऊ शकतो. प्रश्न असा आहे, की योग्य त्या कंपन्यांचे IPO कसे ओळखायचे? या प्रश्नाचं उत्तर हेच शेअर मार्केटमधल्या दणदणीत Lifetime Achievementचं रहस्य आहे, आणि ते शोधण्यासाठी हा अभ्यास!!
पण हा अभ्यास काही पुरेसा नसतो; त्याला अनुभवही बराच लागतो. तो मिळवायला यात उतारण्याशिवाय पर्याय नाही. व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या एका मेसेजनुसार, भारतातले केवळ ४% लोक याच्यात गुंतवणूक करतात. माझ्या मते शेअर मार्केटभोवती असलेलं नकारात्मक वलय त्याला कारणीभूत असावं. काही लोक त्याला जुगार म्हणतात, तर काही बुद्धिबळ. शेवटी तो खेळ आहे हे सर्वांना मान्य आहे असं दिसतं. तसा तो बऱ्यापैकी आहेही. पण माझ्या मते त्याकडे खेळ म्हणून न पाहता, आपल्या उत्पन्नाचा दुसरा एक महत्वाचा सोर्स म्हणून पाहावं. त्याचा उपयोग होतो. पण एक लक्षात असू द्या, की आपलं संपूर्ण उत्पन्न यात गुंतवलं, तर मात्र तो निश्चितपणे जुगार होतो. कर्ज वगैरे काढून शेअर्स घेणं म्हणजे तर, एक धोंडा आपल्या डोक्यावर पडायची दाट शक्यता असतानाही हौसेने दुसरा पायावर पाडून घेण्यासारखं आहे. आणि म्हणूनच आजोबा म्हणतात, “बाळांनो, तुम्हाला जे मिळेल, त्याचा एक तुकडा इथे बाजूला काढून ठेवा. तो मोठा होऊ शकतो. पण त्याकडे लक्ष दिलंत तरच. आणि तो मोठा झाला तर तुमच्याकडे एकूण जास्त होईल, आणि मग तुम्हाला त्या सगळ्याचा एक छोटा तुकडा गरिबाला देता येईल. कायम लक्षात ठेवा : तुम्हाला कुणाला मदत करायची असेल तर त्याला आणि तुम्हाला दोघांना पुरेल एवढं तुमच्याकडे पाहिजेच! हे झालं आपल्या बाजारपेठेभोवतीचं सकारात्मक वलय! अरे, सव्वानऊ वाजले की. पळा, पळा, पहिली घंटा होईल आता..............”                               

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प