विषयांचे माझे नाते


आत्तापर्यंत अनेक विषयांशी माझा संबंध आला आहे. इथे प्रथम मला स्पष्ट करावे लागेल की विषय म्हणजे जे आपण शिकतो ते (किंवा जे आपण शिकावेत असे आपल्या सांदिपनींना वाटत असते ते). इथे हेही स्पष्ट करावेसे वाटते ‘आत्तापर्यंत’ म्हणजे मी काही जगातले सर्व विषय अनुभवले आहेत असे नाही. यात फक्त त्यांचाच उल्लेख आहे, ज्यांचा शाळेची दहा वर्ष सहवास होता, आणि विशेषतः ते विषय ज्यांचा सहवास अजूनही टिकून आहे. नशीब हेच, की यातल्या कुठल्याही विषयाने युद्ध पुकारलं नाही. जरा अधूनमधून चावटपणा करायचे आणि अकारण टांग मारून गम्मत बघायचे. पण याच कारणामुळे मला ते अगदी जिवलग मित्रांसारखे भासतात!
सुरुवात अर्थातच माझ्या प्रिय मातृभाषेकडून करणार आहे. मराठी शिकायला, व वापरायला मला कधी शाळेची पायरी चढावी लागली नाही. घरात, कॉलनीत, शाळेत, आणि इतर सगळीकडे तेच संपर्काचे साधन असल्याने तिचीच सर्वप्रथम गोडी लागली. (किंवा सवय म्हणा) नंतर इंग्लिश शिकल्यावर, व बऱ्यापैकी बोलू लागल्यावर, मराठीचा मोकळेपणा त्यात कधीच जाणवणार नाही असे वाटले. इंग्लंडमध्ये जन्मलो असतो तर गोष्ट कदाचित वेगळी असती. पण मराठीच्या व माझ्या नात्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न पहिल्यांदा ‘बोर्ड’ नामक अदृश्य संस्थेने केला. पहिलीपासून आजपर्यंत त्या संस्थेची अशीच नुसती तोंडओळख आहे, की म्हणजे ‘असा एक बोर्ड असतो बर का भाऊ!’ त्याचा पहिला परिचयही असाच घाबरवण्यासाठी केला होता. ‘शहाण्या मुलासारखं उत्तर लिही, नाहीतर अंधारातून ‘बोर्ड’ येईल!’ चौथीपर्यंत मराठी अगदी जवळची मैत्रीण होती, मग पाचवीत अचानक ती परदेशातून येऊन ओळख विसरल्यासारखी वाटली. पुढची ४ वर्ष ती परत नव्याने मैत्री करत असल्यासारखी वागली, मग नववीत अचानक बालपणीचं सगळं आठवल्यासारखं हातात हात घेऊन चालू लागली. मला कॉलेजातही तिची सोबत हवी होती, पण ‘आता या मैत्रीत अभ्यासक्रम तो कशाला’ हा आईचा मुद्दा रास्त आहे.  
यानंतर मी वळणार आहे माझ्या अशाच एका अत्यंत प्रिय भाषेकडे. मला अनेकांनी मराठी आणि हिच्यामधली जास्त कोण आवडते, हे विचारून वात आणला होता. पण हे विचारणं म्हणजे दोन बहिणींपैकी आवडती कुठली हे विचारण्यासारखं आहे. ‘Is it not strange that our nation, with as many as 1635 languages, is united by a foreign language?’ हे जेव्हा मी कुठेतरी (म्हणजे व्हॉट्सअॅपवरच, उघड आहे) वाचलं, तेव्हा ते कटू सत्यासारखं भासलं. ते जरी सत्य असलं, तरी त्याचं कारण हेच की इंग्लिश ही आता इतकी आपलीशी वाटते की तिला परकी म्हणणं जिवावर येतं. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषा आपापल्या सर्वगुणसंपन्न मातांचे सर्व गुण घेऊन जन्माला आल्या आहेत. संस्कृत व लॅटिन या त्या जगद्जननी आदिभाषा! इंग्लिशची खरी मजा काही अस्सल इंग्लिश पुस्तकं वाचल्यावरच आली. मराठीप्रमाणे हीही भाषा स्वाध्यायातूनच जमू लागली. मराठी माणसाने कधी इतर भाषेतून लिहू नये, असं जो म्हणत असेल तो इतर भाषांचा अपमान करतो याची त्याला जाणीवच नाही. मला वाटते, की मातृभाषेशिवाय इतर भाषा जो तितक्याच सहजतेने वापरू शकतो, तो खरा लेखक!
या भाषांसारखी हिंदी कधी जवळची वाटली नाही. तशी तीही छान आहे, ऐकायला मधुर वाटते, ……… पण इथेच खरी मेख आहे. ही  भाषा खूपच मधुर वाटते. पण ते माधुर्य म्हणजे चहाच्या कपात चुकून वाटीभर साखर सांडल्यासारखं! इथे आईलाही आदराने ‘आप’ म्हणतात. त्याला काही आक्षेप नाही आमचा; असलाच तर एवढाच आहे की नको तिथे आदर दाखवल्यामुळे informalityच नष्ट होते. सारख्या त्या ‘आप’ ‘आप’ च्या गजराने ‘आप’लेपणच जातं. आमच्या शाळेत आमच्या ‘राष्ट्रभाषेच्या अध्यापिका’ जेव्हा आम्हालाही ‘आप’ म्हणायच्या तेव्हा प्रचंड लाज वाटायची. हिंदीत ‘तू’ किंवा ‘तुम’ हे शब्द तुच्छांना संबोधताना असतात, असा नियम व्याकरणातच दिलेला होता. आम्ही मित्रांनी एकमेकांना ‘आप’ म्हणावे अशी त्यांची अपेक्षा होती की काय! वाट बघा म्हणावं! तशी ही व्यवस्था चांगली आहे, पण लोक जेव्हा हिंदीवरून मराठी लिहायला जातात तेव्हा भयंकर राग येतो, पण मग त्यांच्या अडाणीपणाचे हसूही येते. माझ्या एका दुबईत स्थायिक झालेल्या बहिणीने ‘अहो दादा’ असे संबोधले तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. तिने हिंदीवरून मराठी केले याचे दुःख होतेच, पण भाषेच्या नियमामुळे ती मनात नसतानाही मला ‘आप’ म्हणते हे पटत नव्हतं. तिला मी मराठीत बोलताना ‘तू’च म्हण असं सांगितल्यावर तिला प्रचंड आनंद झाला. काही लोकांना खोटा आदर दाखवणे फारच जड जाते बुवा! मग तो का दाखवावा?
आता मी त्या विषयाकडे वळणार आहे, ज्याला केवळ ‘सर्वशक्तिमान’ हेच विशेषण लागू पडेल. आजपर्यंत हा विषय अगणित विद्यार्थ्यांना चिंतेने अस्वस्थ करत आला आहे. ‘अगणित’ हाही याच विषयाचा एक खास शब्द. याच्याशी मैत्री करणे अत्यंत अवघड, पण एकदा झाली कि मग अवघड ते काय असे वाटते. हा विषय म्हणजे गणित, हे कोणीही आता ओळखेल. मला वाटते, पाचवीनंतर याचा आगाऊपणा जास्तच वाढला आहे. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसतो. पाचवीनंतर याची ‘डिफीकल्टी लेव्हल’ भौमितिक श्रेढीने वाढत गेली. नववीत तर तिने उच्चांक गाठला असे वाटायचे, इतके तेव्हाचे गणित अवघड होते. मला वाटले होते, की मी आर्ट्सला जाणार असल्यामुळे दहावीनंतर हे संबंध संपणार…… पण नाही. माझ्या आवडत्या विषयाला नंतर बारावीपर्यंतचे गणित लागते हे समजले. माझा आवडता विषय कोणता? त्याचा काही संबंध नाही. सगळ्याच विषयांना नंतर गणित लागत असले तरी मला नवल वाटणार नाही. पण मी जरा कृतघ्नपणाच करतोय. दहावीच्या अंतिम परीक्षेत गणितानेच मला साथ दिली होती. मला सगळ्यात जास्त मार्क्स गणितातच पडले, पण मग लोक म्हणाले, की आई यातली पी.एच.डी असल्यावर काय होणार? आईला गणित म्हणजे जीव की प्राण आहे हे खरे. पण याचा मला फायदाच झाला आहे. दहावीपर्यंत कुठला क्लास नाही लावावा लागला गणितासाठी. अकरावीत गणित जरा फुगायला लागले आहे हे खरे. पण एक विषय कोणाचा नावडता असण्याची दोन कारणं असतात. एक तर तो जमत नसतो किंवा खरोखरच आवडत नसतो. सुदैवाने माझे कारण दुसरे आहे. त्यातून मला ते मुळीच आवडत नाही, असेही नाहीये! दहावीत त्याने दिलेली साथ मी अजून स्मरतो. हे आहेच, शिवाय आईची मदत, कॉलेजातल्या समदुःखी मित्रांची सोबत, आणि आवडत्या विषयासाठी हेही पार पाडण्याची तयारी यामुळे मला खात्री आहे की, बारावीचे वर्ष दहावीसारखेच असेल आणि पुन्हा गणितच मला तारून नेईल. गणिताची एक गोष्ट आवडते, आणि ती म्हणजे तो पूर्णतः स्वतंत्र विषय आहे. इतर विषय त्याच्यात जराही शिरू शकत नाहीत. तो मात्र त्यांच्याबरोबर राहून त्यांना लागेल तिथे मदत करतो. गणिताशिवाय अपूर्ण असणाऱ्या अशाच एका विषयाकडे मी आता वळणार आहे.
‘विज्ञान’ म्हणजे त्यात सर्व आलं. भौतिक, रसायनशास्त्र, पर्यावरण, परिसर, शरीरशास्त्र, इत्यादी. विज्ञान हे या सर्वांचे, आणि इतर बऱ्याच गोष्टींचे ‘क्युम्युलेटिव’ नाम आहे. (हा शब्दही खास गणिताचाच!) हा विषय मला आपला पहिलीपासून आवडायचा बुवा. अर्थात, भाषांनंतर आणि गणितानंतरही! मला वाटायचे, की पहिलीतच आम्हाला ते या विषयाचे सर्व ज्ञान देऊन मोकळे झालेत. दुसरीत कळलं, की त्याखालील धडे त्याच स्वरूपाचे होते, पण प्रत्येक धड्याबाबत आधीपेक्षा थोडी जास्त माहिती असे. तिसरीत हाच अनुभव पुन्हा नव्याने आला. माझ्या या अंदाजावरून मला असे वाटे, कि दहावीपर्यंत सर्व माहिती खच्चून भरल्यामुळे ते पुस्तक गलेलठ्ठ असेल. पण ते आधीच्याएवढेच निघाले. याचे कारण, खूप पूर्वी दिलेली माहिती पुन्हा द्यायची त्यांना गरज वाटली नव्हती. पूर्वी जेव्हा मला वाटायचे की आपण बाबांच्या वयाचे होईपर्यंत तिसावी, एकतिसावी असे करत करत शिकू, तेव्हा वाटले कि त्या अंतिम इयत्तेत तरी विज्ञानाची संपूर्ण माहिती मिळेल. पण देता येईल अशी संपूर्ण माहिती अजून कोणालाच कळली नाहीये, हे खूप नंतर समजले. दरवर्षी यात होणारी प्रगती, आणि त्यातून निर्माण होणारी नवी माहिती पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमात घातली जाते, असे कळले. दहावीनंतर अशा इयत्ता ठरलेल्या नसतात, आणि आपण आपले विषय ठरवतो म्हटल्यावर मी लागलीच विज्ञानाला रामराम ठोकला. याचे कारण म्हणजे विज्ञानातला भौतिक हा भाग मला मुळीच आवडत नाही, आणि जमतही नाही. पण विज्ञान शिकत नसलो म्हणून काय झालं? आपल्या रोजच्या आयुष्यात विज्ञान ठासून भरलेलं असतं, फक्त ‘का’, ‘कसे’ हे प्रश्न विचारण्याची तयारी असली पाहिजे, असं एक वाक्य आमच्या शिक्षिका सांगत. ते खरं असल्याची जाणीव आत्ता, म्हणजे विज्ञानाशी रोजचा संबंध संपल्यानंतर झाली. प्रत्येक गोष्टीला काहीतरी शास्त्र असतंच, आणि त्याचं उत्तर विज्ञान देऊ शकतं, हे पटलं. आता फक्त मानवाच्या सर्व अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं हे विज्ञान केव्हा देतंय, याची वाट बघत मी आपला आर्ट्सच्या वर्गात बसतोय.
कधीकधी मला हे सगळे विषय एकमेकांचे मित्र वाटतात. संध्याकाळी खेळायला जमतात. त्यांच्या या कंपूत विज्ञान हा अर्थातच सर्वमान्य कॅप्टन, तर गणित हा टीममधला त्याचा उजवा हात. भाषा तर अशा, कि कुठल्याही स्थानावर छान खेळणाऱ्या! पण याच टीममध्ये दोन साधे, गरीब बिचारे पण चांगले खेळाडू असतात. त्यांना डोकं नाही असं नाही, पण ते त्यांचं कामच नाही असंच सगळेजण समजतात. शिवाय गणितासारखा स्मार्ट खेळाडू असतांना त्यांना कोण विचारतो? खरंच त्यांना कोणी विचारत नाही. पण काय करणार, तेच रटाळ बनण्यात पटाईत! ते म्हणजेच इतिहास आणि भूगोल! खरं तर हे अत्यंत इंटरेस्टिंग विषय, पण कोण्या विज्ञानाच्या निरागस विद्यार्थ्याने यांनाही ‘का’ असा प्रश्न विचारला असावा, आणि याला काहीच उत्तर देता न आल्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. एका वाक्यात दोन्ही विषयांचा सारांश सांगायचा झाला, तर इतिहास म्हणजे ‘पूर्वी जग कसं होतं’ आणि भूगोल म्हणजे ‘आता जग कसं आहे’! विज्ञानाप्रमाणेच यांनीही दरवर्षी थोडी नवीन माहिती घालण्याचा प्रयत्न केला, पण त्या माहितीत आणि आधीच्या माहितीत काही फारसा फरक नाही हे हुशार मुलांच्या लक्षात आले. परिणामी हे विषय वर्षागणिक रटाळ होत गेले. याचे कारण एकच. यांचे विज्ञानासारखे नसून, यांची आपल्याला असलेली माहिती पूर्ण व मर्यादित आहे. ती या दहा-बारा वर्षांच्या अभ्यासक्रमात पुरवून वापरावी लागते. आम्हाला तर स्वातंत्र्यलढा दोनदा आला होता, एकदा चौथीत आणि एकदा सातवीत. दहावीत इतिहास तेवढा इंटरेस्टिंग होता खरा, पण तेव्हा ते शेवटचं ठरलेलं वर्ष असल्याने त्यांनी तो त्यांच्या परीने अगदी काल-परवापर्यंत आणून दाखवला होता. भूतकाळाला वर्तमानापाशी आणून चिकटवण्याचा असफल प्रयत्न केल्यामुळे इतिहासाच्या शेवटच्या टप्प्याने दहावीत खूप त्रास दिला. तीच गत भूगोलाची! भूगोलात आम्ही पुणे जिल्ह्यातून निघून महाराष्ट्र, भारत असं करत करत जग फिरून येऊन नववीदहावीत पुन्हा महाराष्ट्र आणि भारतावर आलो. आणि मुळात विकास, शेती, कारखाने या गोष्टी भूगोलात येतातच का याचे मला कोडे आहे. तिसरीत भूगोल सुरु होईल आणि आपल्या आवडत्या ग्रहतार्‍यांबद्दल शिकता येईल असे मला कोणीकोणी सांगितले होते. पण झाले भलतेच! ही मंडळी पृथ्वी सोडायला तयारच नाहीत. शाळेत असताना विज्ञानाच्या दिपवणाऱ्या प्रभावाखाली असल्याने यांची किंमत कमी होती, पण इथे आर्ट्सला विज्ञानापासून दूर असल्याने त्यांची भरपूर हवा आहे. आर्ट्समध्ये सामाजिक शास्त्रांची सद्दी आहे हे खरेच. त्यात इतिहास व भूगोल हे बलाढ्य. मी यातला एकही घेतला नाही. सगळेही हेच म्हणाले, ‘आर्ट्सला आलास ते काय इतिहास-भूगोल शिकण्यासाठी?’ बघा! पण याच शास्त्रांची इतर काही पिल्ले शाळेत शेवटीशेवटी आली. नववीपासून राज्यशास्त्र व अर्थशास्त्र हे विषय अनुक्रमे इतिहास व भूगोल यांच्या पुस्तकांत भाड्याने राहत होते. त्यांचा तुटपुंजा परिचय होईल एवढीच माहिती त्या - नववीत चार व दहावीत चार - मिळून आठ छोट्या धड्यांत होती. तेव्हा यातल्याच एका पिल्लावर कायमचे प्रेम जडेल, असे कोणाला वाटले होते?
आत्तापर्यंत कुठल्याही विषयासाठी मी अवांतर वाचन केले नाही. भाषेची गोष्ट वेगळी. त्या जमायला तेच आवश्यक होते. नाही म्हणायला अच्युत गोडबोल्यांचे ‘गणिती’ वाचले होते ( तेही आईच्या आग्रहावरून, पण नंतर-नंतर ते आवडायला लागले). बाकी इतरांसाठी मात्र पाठ्यपुस्तकच खूप व्हायचे! एखादेवेळेस कुठल्याशा प्रकल्पासाठी तशी काही पुस्तके चाळली होती. पण इंटरनेट वापरायला लागल्यावर तेही बंद पडलं. पण मी वर ज्या पिल्लांचा उल्लेख केला, त्यातला एक विषय आता असा आवडू लागलाय कि अवांतर वाचन करायचंच! ( अवांतर काय म्हणा, सरळ गोडबोल्यांचं ‘अर्थात’ म्हणा की!) हा विषय म्हणजेच नववी-दहावीची दोन वर्ष भूगोलाच्या पुस्तकाचा एक तृतीयांश भाग व्यापणारा - अर्थशास्त्र!
अर्थशास्त्र प्रत्यक्ष शिकण्यापूर्वी त्याचे बरेच उल्लेख इकडेतिकडे झालेले पहिले होते. ते अगदीच छोटेसे आणि नकारात्मकच! पूर्वी वाचलेला एक विनोद आठवतो : एक मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतो, की त्याला कॉलेजात अर्थशास्त्र विषय घ्यायचाय. त्यावर वडील म्हणतात, “छान, चांगलं आहे. यामुळे आपण श्रीमंत तर होऊ शकणार नाही, पण आपण किती गरीब आहोत ते तरी तुला कळेल! इतर काहीकाही ठिकाणी त्याला ‘रुक्ष विषय’ म्हणून टोकायचे. मला मात्र हा विषय आवडला बुवा. कारण मलाही सांगता येणार नाही. पण नववीत मी अर्थशास्त्राची, अभ्यासक्रमाबाहेरची एक परीक्षा दिली होती. त्या परीक्षेसाठी त्या लोकांनी दिलेला ‘पाठ’ शिकून घेताना मजा आली. बाबाच मला उत्साहाने शिकवायचे. त्यांनाही हा विषय खूप आवडतो बुवा. त्या परीक्षेत चांगले मार्क्स पडले, पण एकूणच तो उपद्व्याप अर्थव्यवस्था, बँकेचं कामकाज, शेअर-मार्केट वगैरे यांच्याबद्दलचं कुतूहल मनात ठाण मांडून बसलं. आर्ट्सला आल्यावर मी हा विषय घेतला, आणि शाळेत असताना गणिताचा आलेला अनुभवच इथे परत आला. हा विषयही इतर सामाजिक शास्त्रांशी चांगले संबंध ठेवून आहे. माझ्या काही नव्या मित्रांनी भूगोल घेतलाय. त्यांच्या सांगण्यावरून असं वाटलं, की भूगोलाने त्याच्या स्वभावाशी विसंगत असलेल्या गोष्टींची (म्हणजे विकास, शेती, कारखाने, वगैरे) जबाबदारी अर्थशास्त्रावर एकदाची सोपवली आणि तो आपल्या भूगर्भाच्या तांत्रिक विज्ञानात हरवून गेला. आता लक्षात येतंय, की आठवीत भूगोलाने ताप द्यायचं कारण वारे, पाऊस, तापमान वगैरे तांत्रिक गोष्टीच होत्या, आणि नववी-दहावीत जी थोडीफार मजा आली ती त्यात घुसडलेल्या या आर्थिक संकल्पनांमुळे!
आता काहीच विषय उरतात. कॉलेजला आल्यावर तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र हे दोन नवीन विषय घेतलेत, आणि दोन्हींच्याही बाबतीतला निर्णय चुकलेला नाहीये. विशेषतः लॉजिक जर जास्त प्रिय आहे. बहुदा आईकडून आलेल्या गणिती डोक्याच्या काही अंशामुळे असेल. पण हेही विषय अजून अभ्यासक्रमाच्या माध्यमात आहेत; यांचीही परीक्षा द्यायची आहे. मी खरतर आता वळणार आहे काही अशा विषयांकडे, ज्यांचा अभ्यासक्रमाशी काही संबंध नव्हता, आणि ज्यांच्या नाममात्र परीक्षांची शाळेत असतानाही मुळीच पर्वा नव्हती! चित्रकला हा त्यातला पहिला आणि नावडताही तोच! चित्रकला कधीच माझ्या बोटांत बसली नाही. मी असा काही बोलून दाखवताच शाळेतले काही लोक मला सांगायचे, की तुझी बोटं लांबसडक असून ती कलाकृतीलाच अनुकूल आहेत. हे खरं आहे का नाही कोण जाणे! पण शाळेत कला म्हणजे चित्रकला असा एक समज पसरला होता. दहावीत बोर्डाने याला ‘इंटर्नल मार्क्स’ ठेवून घोळ घातला होता. तीच गत पी.टी.ची! त्या अज्ञात, अदृश्य बोर्डाने दहावीत त्यालाही पुस्तक, लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा वगैरे लावले होते. वर आमच्या पी.टी.च्या टीचर सांगायच्या की पी.टी.त नापास झालात तर बोर्डात नापास व्हाल! सुदैवाने या दोन्ही विषयात मी, कशी कुणास ठाऊक, पण ‘ए’ ग्रेड मिळवली. प्रगतीपुस्तकावर इतर मन सुखावून टाकणाऱ्या मार्कांखाली ही ‘ए’ ची छोटीशी रांग होती. त्यात ‘समाजकार्य’ आणि ‘व्यक्तिमत्व विकास’ हे असलेच दोन विषयही होते. आता मी चित्र काढतो, पण ती फक्त माझ्या आवडत्या गोष्टींचीच. तीही पूर्वीपेक्षा बरीच बरी येऊ लागली आहेत, हे माझ्या नजरेतून सुटलेलं नाही!
काही विषयांना अवांतर वाचन लागे हे होतंच. पण काही विषयच पूर्णतः अवांतर होते. ते म्हणजे, केवळ आवडायचे म्हणून शाळेचा गृहपाठ झाल्यानंतर वाचायला घेतलेले विषय. कॉम्प्युटर प्रोग्रामिंग हा त्यांच्यापैकीच एक! सुरुवातीला तोही आवडत होता, पण नंतर जसा-जसा तो अवघड होत गेला तशी त्यातली आवड विरून गेली. एक तर ‘अवांतर’ विषय, जमतही नाही, आणि अगदी त्याच्या मी प्रेमात पडलो होतो असंही नाही. मग मी तो विषय सोडूनच दिला. मग दहावीच्या परीक्षेनंतर बाबांनी मला अशाच एका विषयाची ओळख करून दिली. त्याची आवड (स्पष्ट बोलायचं तर, नाद) मात्र अजूनही टिकून आहे. मी तर असंही म्हणेन, की या विषयातला इंटरेस्ट जर गेलाच, तर तो नक्कीच गणित आणि अर्थशास्त्र आवडेनासे झाल्यानंतर जाईल. त्या विषयाला ‘तांत्रिक विश्लेषण’ ( टेक्निकल अॅनॅलिसिस) असं भारी नाव आहे, पण तो आहे शेअर-मार्केटशी संबंधित! शेअर घेणे-विकणे, त्यांच्या किंमतींचे चार्ट्स बघून किंमत कुठपर्यंत जाईल याचा अंदाज लढवणे, हे सगळं मला आवडायला लागलं. बाबाही खुश झाले आणि त्यांनी मला त्यावरची सहा पुस्तकं आणून दिली, जी सध्या वाचतोय. मला असं कळतंय, की कुठल्याही विषयावरची जी अशी पुस्तकं असतात, त्यांच्या लेखकांनी वाचकांना खिळवून ठेवण्याची आणि त्या विषयाबद्दल भरपूर इंटरेस्ट निर्माण करण्याची कला सहज जमली आहे. ‘Economics for Dummies’ हे असेच एक पुस्तक मी वाचले, आणि ते वाचल्यावर याला रुक्ष विषय का म्हणतात असा मला प्रश्न पडला होता, इतकं ते त्यांनी हलक्याफुलक्या प्रकारे आणि विनोदांतून समजावून दिलं होतं!
असो. माणूस आयुष्यभर शिकत राहतो, म्हणतात. तत्त्वज्ञानात मांडलेल्या ज्ञानप्राप्तीच्या चार मार्गांतून आपल्याला रोज काही-ना-काहीतरी नवीन समजत असते. त्या सर्व ज्ञानाचे सोयीनुसार वर्गीकरण करण्यामुळेच हे विषय निर्माण झाले. काहीही नवीन कानावर पडलं ( हाही एक मार्ग आहे बरं का!) की आपण सहज ते कुठल्या विषयाशी संबंधित आहे हे ओळखू शकतो. बऱ्याचदा ते अनेक विषयांशी संबंधित असतं. पुढे जाऊन मी काय शिकीन याची मला आत्ता काही कल्पना नाही, पण मला खात्री आहे की त्यातही शास्त्र असेल, त्याचाही कुठल्यातरी सामाजिक शास्त्राशी संबंध असेल, आणि किती का प्रमाणात असेना, त्यात गणित नक्की असेल!!!                                                           

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प