भविष्यवेध


माणूस हा प्राण्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळा आहे. त्यातला एक महत्वाचा फरक म्हणजे माणूस पुढचा विचार करू शकतो. तसेच तो फक्त स्वतःचाच नाही तर स्वतःवर ज्यांची जबाबदारी आहे अशा सगळ्यांचा विचार करू शकतो. वन्य प्राण्यांमध्ये साधारणतः आपल्या पिल्लांना ते एकट्याने जगू शकतील एवढंच मोठं करायचं, अशी प्रवृत्ती असते. मग ते त्यांना स्वतःचं आयुष्य जगायला पाठवतात आणि स्वतः पंजे झटकतात. पण आपण तसं करत नाही. एकूणच, आपल्या आणि वन्य प्राण्यांच्या लेखी ‘मुलांना तयार करणे’ याचे वेगवेगळे अर्थ आहेत. बछडे मोठे झाल्यावर स्वतः शिकार करून जगू शकतात, म्हणजेच नख्या आणि सुळे वाढल्यावर ते स्वयंपूर्ण होतात. माणूस मात्र उच्च शिक्षण पूर्ण करतो, नोकरी-धंद्याला सुरुवात करतो, लग्न करतो आणि तरीही बहुतेक वेळा त्याच्या आईवडिलांना तो स्वयंपूर्ण झालाय असं वाटत नाही! पण या सगळ्याला कारणही आहे. प्राण्यांचं आयुष्य, आपण मध्ये कडमडलो नाही तर, साधंसरळ असतं. आपण मात्र, आपण घडवलेल्या या जगात स्वतःलाच जगणं अवघड करून ठेवलंय, म्हणून ‘तयार होणं’ हेही अवघड असतंच.
माणूस आणि प्राणी यांच्यामधला अजून एक महत्वाचा फरक म्हणजे माणसाला खूप पूर्वीपासून स्वतः घडणाऱ्या, ‘डेव्हलप’ होणाऱ्या गोष्टींचं आकर्षण आहे. सिंह किंवा वाघ हरिणीला पकडलं की लगेच पानं घेतात; पण ‘ही हरिणी उद्या पिल्लांना जन्म देईल, मग आपण सगळ्यांना खाऊ,’ असा विचार नाही करत. माकड आंबा खाल्ल्यावर कोय फेकून देईल, आणि त्याच्यातून कालांतराने झाड उगवेल. पण कोय स्वतः जमिनीत पुरून, तिला नियमित पाणी मिळेल हे बघून, नंतर आपण वाढायला मदत केलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे खाऊन स्वसंतुष्ट होईल तो माणूसच! आपल्या थोड्याशा परिश्रमातून स्वतः वाढणाऱ्या या गोष्टींच्या आकर्षणापायी माणूस शेती करायला लागला, फळांची झाडं लावू लागला, आणि गायी-गुरं पाळू लागला. (खरं तर वृक्षतोड ही मानवाच्या या स्वभावाशी विसंगत आहे, पण हावरटपणा हीही माणसाचीच एक खास क्वालिटी आहे) या सगळ्या खटाटोपामागे असतो तो फक्त ‘उद्याचा विचार’! आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणसाच्या या अशा गुणावर लोक टीका करतात; म्हणतात की उद्याचाच विचार केलात तर आज कसं जगणार? याचा मतितार्थ हाच असतो की आज करायची तेवढी मजा करून घ्या, उद्या मेलो तर मेलो! आज आनंदात जगूया. पण उद्याचा विचार केला, तर आज, उद्या आणि परवाही आनंदात जगता येईल असा विचार केला पाहिजे. एक तर उद्या ‘आनंदाने मरुया’ असे म्हणण्याइतकं मुक्त कोणीच नसतं. मग आपण आज मजा करायची, उद्या मेलो तर सुटू, मग पुढची काळजी आपल्यावर जबाबदारी असणाऱ्यांची! हा चक्क कृतघ्नपणा आहे. पण उद्याचा विचार करणारे, बँकेत पैसे ठेवणारे, मुलांच्या फिया भरणारे, झाडं लावणारे तसंच दुसऱ्या दिवशी सकाळचा गजर लावणारे, असंच म्हणतात की याउप्परही उद्याचा दिवस नाही पाहायला मिळाला, तर त्याला कोण काय करणार? Not that we didn’t try.
आणि try म्हणजे काय? साधं सरळ उत्तर असं की उद्याची व्यवस्था आज करून ठेवायची. परवाची उद्या. आणि मग आजची केव्हा असं म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण तेवढा वेळ प्रत्येकाकडे असतो. यासंबंधी बोध देणारी गोष्ट काही वर्षांपूर्वी ‘किशोर’ मासिकात आली होती. पण त्यावर नीट विचार केल्यास तो बोध चुकीचा आहे असं कळतं. ती गोष्ट अशी :
एक कामगार एका शेतकऱ्याच्या शेतात सकाळपासून दुपारच्या जेवणापर्यंत राबायचा. त्याला याचे २०० रु. मिळायचे. ते २०० रु. रोजच्या संसाराला लागायचे. तो आणि त्याची बायको सुखी होते. (त्यांचं सुख हे पूर्णतः अज्ञानावर बेतलेलं होतं. मुळात ही परिस्थिती किती भयंकर आहे! समजा दुसऱ्या दिवशी कामगार घसरून पडला असता, तर कमीत कमी एक दिवस त्यांना भुकेलं राहावं लागलं असतं. केवढी ही अनिश्चितता!) मग एके दिवशी त्याच्या बायकोला किनई एक फार भारी (पण अपूर्ण) कल्पना सुचली बघा. तिने त्याला संध्याकाळ होईपर्यंत काम करायला सांगितलं. मग त्या दिवशी त्याला ४०० रु. मिळाले. आता मज्जा! कारण त्यातले २०० संसाराला वापरून उरलेल्या २००चा बायकोने भाजीपाला आणला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विकला. त्याचे ४०० रु. मिळाले, जे अशाच प्रकारे वापरले गेले. थोडक्यात आता कामगाराची स्थिती ‘fixed income’ वरून ‘fixed income + profit expenditure’ अशी झाली. (ही दुसरी मोठी चूक. आता कामगार घरी बसून फुगायला लागला आणि बायको चरितार्थ चालवू लागली. म्हणजे परत ठराविक उत्पन्नावर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही तो नाहीच!) एकदा कामगाराने ५० रु. उधळले. मग तीनच दिवसात ‘आता शिल्लक नाही जा परत शेतावर’ बायकोने सांगितले. (हे बरंय. यालाच आपण सुरक्षिततेचा आभास देऊन भरकटवणे म्हणतो) याचे कारण म्हणजे, २०० रु. संसाराला आणि ५० रु. बाहेर खर्च झाल्यावर उरले १५०. त्याचा भाजीपाला विकून मिळाले ३००, ज्यातले २०० संसाराला लागून उरले १००. त्याचा भाजीपाला विकून मिळाले २००, जे संसाराला लागले. खतम! या गोष्टीचा बोध हा की पैसे उधळू नयेत. पण ही गोष्ट जरा बदलली असती तर मग जास्तीच्या पैशाचं करायचं काय या प्रश्नाचंही उत्तर मिळालं असतं.
एक सत्य हे की ‘जास्तीचा पैसा’ या विधानाला काही अर्थ नाही.  जेवढा आपण मिळवतो तेवढ्याची आपल्याला कालांतराने गरज भासतेच; तो त्या क्षणी कितीही एक्स्ट्रा वाटला तरीही. त्याचप्रमाणे “मी पुरेसे पैसे मिळवतोय ना? मग बास झालं.” हेही विधान चुकीचं आहे. हे म्हणजे रोजच्या २०० रुपयावर खूश असणाऱ्या त्या कामगारासारखं झालं. उद्या समजा नाही काम करता आलं, पैसे नाही मिळवता आले, तर काहीतरी ‘बॅकप’ नको का? मग त्याच्या बायकोने केलेल्या योजनेनुसार २०० रु. खर्च आणि २०० रु. धंद्याचं भांडवल अशी ४००च्या उत्पन्नाची विभागणी झाली. म्हणजे परत, खर्च २००पेक्षा वाढला तर भांडवल कमी होणार, आणि उत्पन्नही. समजा त्या कामगाराने ते ५० रु. न उधळता त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांना पाठवले असते, तरी हेच घडलं असतं, फरक एवढाच की मग त्याच्या बायकोला त्याला सुनावता आलं नसतं. त्याऐवजी तिने जर त्याला एक आठवडा सलग दिवसभर काम करायला सांगितलं असतं, तर आठवड्याच्या शेवटी त्याला एकूण २८०० रु. मिळाले असते, ज्यातले १४०० खर्च झाले असते. मग त्याच्या बायकोने उरलेल्या १४०० पैकी १०००चा भाजीपाला आणून विकला असता, तर २००० रु. मिळाले असते, ज्यातले २०० संसाराला लागून १८०० उरले असते. त्यापैकी मागच्या वेळेएवढेच, म्हणजे ४०० वाचवून उरलेल्या १४०० चा भाजीपाला आणून विकला असता. २८०० मिळाले असते, ज्यातले २०० खर्च करून, ४०० वाचवून, उरलेल्या २२००चा भाजीपाला मिळाला असता. बापरे! या गतीने तो कामगार चांगलाच श्रीमंत झाला असता, आणि तेही काही आठवड्यांतच. या मार्गे त्याचं भांडवल दिवसागणिक वाढतं, आणि तसेच त्याच्या स्वयंपाकघरातल्या पीठाच्या डब्यात रोज ४०० पडत गेले असते. खऱ्या जीवनात हे एवढं सोईस्कर नसतं, पण त्याचा परिणाम फक्त मार्केट-उत्पन्नावर झाला असता. आणि त्यातून कामगाराला स्फूर्ती येऊन त्याने अजून एक आठवडा असंच काम केलं, की मग विचारायलाच नको. खरं तर, यातून बोध हाच घेतला पाहिजे की हातपाय धड आहेत आणि साथ देतायत तोवर जमेल तेवढं काम करा. मिळतील तेवढे पैसे मिळवा. न जाणो, उद्याच लागले तर? आणि उद्या नाही लागले, तरी हातपाय थकल्यावर लागतीलच ना? या वक्तव्यावर काही लोक चाचरत ‘तोपर्यंत मुलगा, मुलगी कमवायला लागतील’ असं काहीतरी म्हणतात. परावलंबन आणि त्याच्या धोक्यांचं अज्ञान याचं हे अजून एक उदाहरण!
हा धडा एकदा मिळाल्यावर सगळेजण आपले सेव्हिंग्ज पीठाच्या डब्यात, उशीच्या खाली किंवा माळ्यावर ठेवू लागले. स्वतः त्यात नियमितपणे जास्त भरत गेले. पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माणसाला आपणहून वाढणाऱ्या गोष्टींचं खूप आकर्षण आहे. म्हणूनच पैसा आपणहून वाढू शकतो हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याला काय आनंद झाला असेल! मग लगेच सगळे पैसे माळ्यावरून खाली काढण्यात आले आणि जिथे ते स्वतःहून वाढतील अशा जागी पुरण्यात आले.
अशा जागा आता आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत. सगळ्यात लोकप्रिय सुपीक जमीन म्हणजे बँक. शिवाय तिथे पैसे जास्त सुरक्षित असतात यावर आपण विश्वास ठेवू शकतो. कारण ते पैसे जपणे ही त्यांची जबाबदारी असते आणि ते नाही जपले तर त्यांचाही धंदा बुडतो. दुसरी अशी जागा म्हणजे गुंतवणूक. मग ती करून आपण जमीन विकत घेऊ शकतो, शेअर्स घेऊ शकतो, बॉंड्स घेऊ शकतो, किंवा घरचं बरं असेल तर एखाद्या छोट्याशा धंद्याचे शेअरहोल्डर होऊ शकतो. बचत केलेल्या पैशांना स्वतः काही न करता वाढवण्याचे हे मार्ग म्हणूनच ‘उद्याचा विचार’ करणाऱ्यांसाठी आदर्श आहेत.
पैसा ही एक अशी गोष्ट आहे (आनंद सोडून) जी वाढल्यामुळे सगळ्यांनाच फायदा होतो. आपण बँकेत ठेवले की आपले वाढतात, बँकेचा धंदा सुरु राहतो. शेअर्स घेतले तर (नशिबाने) आपले वाढतात, आणि तसेच घेतलेल्या सगळ्या लोकांचेही. बॉंडचीही तीच अवस्था. जमीन विचारविनिमय करून घेतली असेल तर ती घेतल्याचा घेणाऱ्यांना आणि विकल्याचा आपल्याला फायदा होतो. आणि एवढा पैसा आपल्या घरी कपाटात पडून राहण्याऐवजी ‘खेळता’ राहिला तर अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो. सत्य हेच आहे, की आयुष्यात दोन गोष्टींमध्ये निवड करण्याची संधी आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा दोन्ही उपभोगण्याएवढे पैसे आपल्याजवळ असतात. तेव्हा तेवढे पैसे कायम असू द्यावेत. उद्याची चिंता नसेल तरच आज खऱ्या अर्थाने मजा करता येते.          

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प