वन ट्रॅक लाईफ


माझ्या ओळखीतले बहुतेक लोक त्यांना ट्रेनचा प्रवास सगळ्यात जास्त आवडतो असं सांगतात. त्यात काही विमानाचा चांगला अनुभव असणारेही असतात. माझ्याकडे विमानाचा थोडासा आणि रेल्वेचा भरपूर असा अनुभव आहे, आणि मी या मताशी पूर्णतः सहमत आहे. आजपर्यंत आम्ही जिथेजिथे ट्रीपला गेलो, तेव्हा जाण्यायेण्याचा प्रवास अगदीच पर्याय नसेल तरच विमानाने केला. उदाहरणार्थ, अंदमान आणि सिंगापूर. एरवी आमचा ‘फर्स्ट चॉईस’ ट्रेन हाच असे, आणि केवळ ती जास्त स्वस्त आहे म्हणून नाही. मला स्वतःला ट्रेन आवडते याची अनेक कारणे आहेत, आणि त्यातली काही रेल्वेचा प्रवास आवडणाऱ्या सर्वांसाठी खरी असतात अशी मला खात्री आहे.
ती कारणं समजून घ्याची असतील तर आधी बस, ट्रेन आणि विमान यांच्यात तुलना करता यायला हवी. माझ्या मते, बस आणि विमान हे एका रेषेवरील दोन टोकाचे बिंदू असतील तर ट्रेन हा त्यांच्यातला मध्यबिंदूच ठरेल. कारण बस (म्हणजेच रस्त्याने प्रवास) आणि विमान यांच्यातल्या सगळ्या उणीवा ट्रेनने यशस्वीरीत्या भरून काढल्या आहेत. ट्रेन ही बसपेक्षा जास्त वेगवान आणि विमानापेक्षा जास्त स्वस्त असते. तसंच ती दोन्हीपेक्षा जास्त आरामदायक असते. पण ही म्हणजे भूगोलाच्या पुस्तकात दिलेली कारणं झाली. बसमधली मुख्य उणीव म्हणजे प्रवास तेवढा आरामदायी होत नाही. एक तर बस साधी एस.टी. असेल तर त्या बाकांवर ४-५ तास बसून काढायचे, आणि तेही खूप गर्दीत. जास्त लोकांसाठी बसण्याची सोय व्हावी या हेतूने मांडलेल्या ‘आसनांमधल्या’ त्या अंतरामुळे पायही नीट हलवता येत नाहीत. त्यात खिडकीतून ऊन येत असेल तर मग विचारायलाच नको. अशा प्रकारे चहूबाजूंना संकट असल्याने एकाच अवघडलेल्या अवस्थेत बसलेला माणूस हा प्रवास संपायची आतुरतेने वाट पाहात असतो. हा सगळा त्रास ए.सी. असलेल्या बसमधून प्रवास केला तर बऱ्यापैकी कमी होतो. तिथे आपली स्वतःची सीट असते, आणि तिला जरा विस्तृत करून अगदीच झोपता येत नसलं तरी मागे रेलून आराम करता येतो. ए.सी.मुळे जाणवणारा गारवा आणि पडदे लावल्यामुळे न होणारा उन्हाचा त्रास, यामुळे माणूस शांतपणे झोपू शकतो. पण अशी सुखाची समाधी लागलेल्या माणसाला वास्तवात परत खेचून आणण्यास रस्त्यावरचा एक खड्डा कायम समर्थ असतो.
विमानात यापेक्षा बरं म्हणजे असे सारखेसारखे हादरे बसत नाहीत; किंबहुना बसलेच तर चांगलेच मोठे बसतात आणि त्यांची पूर्वसूचनाही मिळते. पण एरवी मात्र आपण आणि आपले सहप्रवासी एका मोठ्ठ्या डब्यात बसून संथ गतीने अवकाशातून पुढे सरकत असल्याची जाणीव असते. विमानात हे एक उत्तम असतं की बाहेरच्या त्याच्या इंजिनचा प्रचंड आवाज, त्याची उंची आणि हवेतल्या त्याच्या हालचालीमुळे उलट दिशेने वाहणारा वारा, या सगळ्यापासून आपण अगदी अलिप्त असतो. पण अशा शांत, आल्हाददायक प्रवासाची किंमतही तेवढीच जास्त असते. शिवाय कधीकधी प्रवासाच्या आधीच्या सर्व कार्यांपेक्षा खुद्द प्रवासच कधीकधी कमी वेळचा असतो.
रेल्वे ही विमान आणि बस यांच्यातला मध्यबिंदू आहे असं मला वाटण्याचं कारण म्हणजे तिने बसचा ‘सुरक्षित प्रवास’ आणि विमानाचा ‘प्रचंड वेग’ हे दोन्ही गुण आत्मसात करून घेतले आहेत. जमिनीशी घर्षण आणि त्यामुळे वेग मर्यादित असणं यावर रेल्वे हाच सगळ्यात चांगला तोडगा आहे. झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्यापेक्षा पाईपमधून वाहणाऱ्या पाण्यामध्ये जशी जास्त गती आणि जास्त बळ असतं, तशातलाच हा प्रकार आहे. रेल्वेसाठी रूळ हे असं सुरक्षित आवरण निर्माण करतात, की ज्यात नैसर्गिक अडथळे तिला स्पर्शच करू शकत नाहीत. त्यामुळे ती मनाला येईल तितकं वजन मनाला येईल तितक्या वेगाने हलवू शकते. आता उरला प्रश्न आरामाचा. स्लीपर कोचच्या एका कंपार्टमेंटमध्ये आठ बर्थ बसवलेले असतात, पण तरी दाटी झालीय असं अजिबात वाटत नाही. ट्रेनचा डबा एकूणच बाहेरून दिसतो त्यापेक्षा खूप रुंद असतो, त्यामुळे आत बसलेलो असताना काही प्रमाणात आपण स्थिर असल्याची भावना असते. बसमध्ये आपल्याला आख्खी बस वळल्याचं दिसतं आणि जाणवतं, पण तसं इथे होत नाही. इथे म्हणजे कंपार्टमेंटच आपलं जग असतं, आणि अशा कितीतरी कंपार्टमेंट मिळून ट्रेन होत असल्याने आपल्याला आपण स्थिर आहोत असंच वाटत राहतं. अर्थात थोडी खडखड आपल्याला जाणवते, पण काही वेळाने त्याची सवय होऊन जाते.
आत्तापर्यंत मी ट्रेनने अनेक वेळा प्रवास केला आहे, पण प्रत्येक वेळी ती वेगळ्याच कारणासाठी आवडायची. पहिल्यांदा बसलो तेव्हा सोलापूरला चाललो होतो, आणि त्याच्याआधी ट्रेन हा प्रकार काय असतो ते फक्त टी.व्ही.वरून आणि विश्वकोशातले तेच तेच फोटो पाहून समजून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण तरीही पहिल्यांदा फलाटावरून ट्रेनला येताना बघण्यात एक वेगळाच ‘थ्रिल’ अनुभवायला मिळतो. मला आठवतंय की स्टेशनच्या इमारतीतून पुढे पहिल्या प्लॅटफॉर्मवर आलो, तेव्हा तिथे दुसरीच ट्रेन उभी होती. मी पाहिलं, तर एका दृष्टीक्षेपात एक डबाही मावत नव्हता. इकडेतिकडे मान हलवून, टाचांवर उभं राहून, अगदी थोडं पुढे चालत जाऊनही इंजिन कुठे आणि शेवटचा डबा कुठे ते कळत नव्हतं. शेवटी ती हलल्यावरच ते कळेल असं वाटलं, आणि मी निमूटपणे बाबांच्या मागून जिना चढू लागलो. वरच्या पुलावरून जाताना मी खाली डोकावून पाहत होतो; तिथून प्लॅटफॉर्म १ आणि २ वरच्या दोन लांबलचक गाड्या अजस्त्र पाईपसारख्या दिसत होत्या. पुलावर गर्दी व्हायच्या आत आम्ही प्लॅटफॉर्म ४ वर उतरलो, तो रिकामाच होता. तेव्हा मी बाबांना ट्रेन कुठून येणार ते विचारल्याचं आठवतंय, पण ते पिशवीत काहीतरी शोधत होते. म्हणून मीच ती उजवीकडून येणार असा तर्क केला, आणि त्या दिशेने बघत बसलो. काही वेळाने शिट्टी ऐकू आली. आता समोरून इंजिन येईल, मागून डब्यांची रांग, मग ते मोठं मोठं होत आपल्यापाशी येऊन उभं राहील, पोलर एक्स्प्रेसमधलं ते इंजिन थांबलं होतं तसंच...……. अशी स्वप्नं मी रंगवत होतो आणि तोपर्यंत ती मागच्या बाजूने माझ्या शेजारी येऊन थांबली होती. मग आम्ही लगेच आमचा डबा आणि त्यातल्या आमच्या सीट्स शोधल्या. मी अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो. ट्रेन प्रचंड वेगाने येते आणि स्टेशनात घुसते असं ऐकलं होतं, पण मी पाहिलेली पहिली ट्रेन मात्र सरळ येऊन माझ्या मनातच घुसली होती.  
त्यानंतर एकदा आम्ही माझ्या काका-काकू आणि माझ्या भावांसोबत कन्याकुमारीला गेलो होतो, तेव्हाचा प्रवास असाच लख्ख आठवतो. तो आत्तापर्यंतचा ट्रेनचा सगळ्यात मोठा प्रवास होता, आणि याची कल्पना आधीच मिळाल्यामुळे मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. प्रवास जर रात्रीपर्यंत संपणार नसेल, तर ट्रेनमध्ये चढताना एक वेगळाच विचार येतो. चढल्यावर लगेच काही तासांनी उतरायचं असेल, तर आपण प्रवासी कपड्यांत तसेच बसून राहतो, पण रात्र काढायची आहे म्हटल्यावर जास्त आरामात पसरतो. आमची ट्रेन रात्री साडेसातला येणार होती. त्याच्या तासभर आधी आम्ही स्टेशनवर भेटलो, आणि काही वेळातच ती लेट असल्याची घोषणा झाली. मग काय? आधी तिथल्या हॉटेलात गेलो, पण चार तास तिथेच काढता येतील असे आकर्षक पदार्थ नव्हते. मग परत बाहेर आलो. रात्र झाली होती, आणि ट्रेन उशिरा येणार असल्याने प्लॅटफॉर्म सुस्तावला होता. ट्रेन नसताना प्लॅटफॉर्म सुस्त असतो आणि ती यायच्या वेळेला एकदम खडबडून उठतो हे मी खूप जणांकडून ऐकले होते, पण ही ‘वादळापूर्वीची शांतता’ सलग तीन-साडेतीन तास अनुभवायची ती पहिलीच वेळ होती. (शेवटचीही असावी अशीच नम्र प्रार्थना!) मग आम्ही एका खांबाभोवती रिंगण करून बसलो. गर्दी नसते तेव्हा असं आरामात पसरायला कुणाला काही वाटत नाही. मग आम्ही उरलेला सगळा वेळ पत्ते खेळत बसलो. असा वेळ घालवायलाही खूप मजा आली; नाहीतरी ट्रेनमध्ये आम्ही तेच करणार होतो. शेवटी रात्री साडेअकरा वाजता ती रेड कार्पेटवरून चालत असल्यासारखी संथपणे अवतीर्ण झाली. मग तिने तिच्या प्रवाशांची एवढा वेळ काळजी घेतल्याबद्दल प्लॅटफॉर्मचे आभार मानण्यात आणखी अर्धा तास स्टेशनवरच घालवला. आम्हाला हे काही माहित नव्हतं; आम्ही बाथरुमला जाण्याचे नंबर ठरवून आपापल्या बर्थवर कोसळलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी कुठवर आली होती ते पाहिल्यावर ह्या घटनेची माहिती आम्हाला मिळाली.
आम्ही दोन संपूर्ण दिवस त्या ट्रेनमध्ये राहणार होतो, आणि तिसऱ्या दिवशी दुपारी ती कन्याकुमारीला पोहोचणार होती. खरं तर एवढा वेळ लागत नाही, पण ही ट्रेन जरा ‘स्पेशल’ होती. गूगलच्या नकाशावर तिचा रूट पाहिल्यावर मला असं वाटलं की हा रूट आखण्याचं काम त्या अधिकाऱ्याने त्याच्या लहान मुलांवर सोपवलेलं असावं. भारताच्या दक्षिण भागात सगळीकडे रेघोट्या ओढत ही ट्रेन जाणार होती, आणि मोठ्ठ्या प्रवासाचा आनंद घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आदर्श होती. आणि आम्हालाही तो आनंद मिळाला. एरवी पुण्यातच राहूनही एवढा वेळ एकमेकांबरोबर घालवायचो नाही. आता एकमेकांच्या घरी जात होतो, पण ते जास्तीत जास्त ४-५ तास वगैरे. अगदी मी तिकडे राहायला गेलो किंवा माझे भाऊ इकडे आले तरी असं संपूर्ण स्वातंत्र्य मिळत नसे, कारण दुसऱ्या दिवशीची काही कामं असत. किंवा घर जवळ असल्याने उगीच जर इकडेतिकडे भटकणं होतं; पण सगळा वेळ एकत्र जात नाहीच. ट्रीप मात्र कमिटमेंट असते. आणि आता आम्हाला किमान ४० तास फक्त एकमेकांच्या सहवासात घालवायला लावण्याची जबाबदारी ट्रेनची होती. आणि यामुळेच आम्हाला सर्वांना खूप मज आली. पत्ते, गप्पा होतेच, शिवाय मी आणि माझे भाऊ सगळीकडे शिवाशिवी खेळत होतो. त्यात कधी नव्हे ते, आम्ही आठ जण असल्याने आणि खूप आधी रिझर्वेशन केल्याने आम्हाला एक आख्खा कंपार्टमेंट मिळाला होता. त्यामुळे वरच्या बर्थवरून खाली, आणि वरच्यावर उड्या मारण्यापासून आम्हाला कुणी अडवलं नाही. तेव्हा एवढा वेळ सगळ्यांबरोबर मजेत घालवायचा असेल, तर ट्रेनच्या प्रवासाला पर्याय नाही हे माझं मलाच जाणवलं.   
ए.सी.च्या डब्यातही एक वेगळाच अनुभव मिळतो. बाहेर अगदी कोरडा रखरखाट असला तरी त्याची झळ बसत नाही. शिवाय रेल्वेतला ए.सी. टपाच्या आत लपवून ठेवल्यामुळे त्याचं फक्त अस्तित्व जाणवतं. अशाच ए.सी.च्या डब्यातून आम्ही ऊटीला गेलो होतो, तेव्हाचा प्रवास माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय ठरला होता. दुपारची वेळ होती. नुकतंच जेवण झाल्यामुळे जरा सुस्ती आली होती. शेजारच्या रुळाची मजा बघण्याचाही कंटाळा आला होता. एरवी मी अशा प्रवासांत तासंतास शेजारच्या रूळाकडे बघत घालवतो. अचानक ध्यानीमनी नसताना समोरून एक ट्रेन धडधडत निघून जायची, नाहीतर (तेव्हा मी त्या प्रकाराला हा शब्द वापरायचो) आमचीच ट्रेन त्या शेजारच्या रुळाला खाऊन टाकायची. पण ए.सी.मुळे काचा बंद होत्या आणि बाहेरचं पिवळं दिसत होतं. तेव्हा पलीकडचा वरचा बर्थही आमचाच होता. म्हणून मी एक पाण्याची बाटली आणि हॅरी पॉटरचा सहावा भाग (५व्यात  आणि ६व्यात तोच जास्त हलका असल्याने आईने तो घेतला होता) उचलला आणि वरच्या त्या बर्थवर जाऊन बसलो. तिथे ए.सी. डब्यातली एक सुविधा उपलब्ध होती. मग मी टेकून वाचत बसण्याचा विचार बदलला आणि त्या मोठ्या उशीवर डोकं ठेवलं आणि शेजारी ठेवलेले दोन्ही जाड रग पांघरून पडल्या-पडल्या वाचत बसलो. तरी अजून कंपार्टमेंटमधलं दृश्य दिसत होतं. म्हणून मी वरचे पडदे लावून घेतले आणि उशीशेजारचा छोटा दिवा लावला. ती एक अद्भुत समाधी होती. अगदी श्वासांचीही ट्रेनच्या गदगदण्याशी लय जुळली होती. एका बाजूला डब्याचं उतरतं छप्पर आणि दुसऱ्या बाजूला पडदे असलेल्या या पूर्णतः व्यक्तिगत डब्यात मी विसावलो होतो आणि तशाच स्थितीत हॅरी पॉटर वाचताना मला जगाचा विसर पडून गेला. मला झोप केव्हा लागली ते कळलं नाही, पण आपण इतका वेळ काळहीन अंतराळात भरकटत नसून ट्रेनमध्येच होतो, हे उठल्यावरच लक्षात आलं.
कधी-कधी मात्र तो सगळा प्रकार निष्कारण घाबरवून सोडतो. काही काही लोकांना आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत काळजीत ठेवून मग दिलासा देण्यात एक असुरी आनंद मिळत असावा. आमच्या राजस्थानच्या ट्रीपमध्ये ‘इंडियन रेल्वे’देखील तशी वागू शकते याचा आम्हाला प्रत्यय आला. राजस्थानच्या ट्रीपमध्ये आम्ही चार गावांना भेट देणार होतो, आणि प्रत्येक गावात एक-दोन दिवस काढून रात्रीच्या ट्रेनने पुढच्या गावी जाणार होतो. म्हणजे दिवसभर फिरणं आणि रात्री स्टेशनवर जाणं असा कार्यक्रम ठरलेला. असेच जयपूरमध्ये दिवसभर फिरलो. मग सगळं सामान घेऊन आम्ही शिणलेल्या, दमलेल्या अवस्थेत स्टेशनवर पोहोचलो. आता बर्थवर अंग टाकून उद्या पहाटे फ्रेश होऊन उतरायचं अशा विचारात आम्ही गढलो होतो, तर तिकडे त्यांना प्रवाशांची खोडी काढायची हुक्की आली होती. एक तर ट्रेन वेळेवर येईना, आणि त्याबद्दल ते काही सांगेनात! म्हणजे नेहमी सांगतात असं नव्हे! पण थोड्या वेळाने माहिती पुरवली जाते. इथेही कालांतराने घोषणा सुरु झाल्या. त्यातही आमची ट्रेन या वेळेला या प्लॅटफॉर्मवर येण्याची ‘शक्यता’ आहे, असं राष्ट्रभाषेत सांगून आमची तात्पुरती आलेली पेंग उडवली होती. आता याचा काय अर्थ घ्यायचा? ज्यांना पक्की माहिती असावी अशी आपली अपेक्षा असते ते संभाव्यताशास्त्राचे विद्यार्थी असल्यासारखे ‘स्टेटमेंट’ मांडत होते. आणि या वेळात कुणी विचार न करता कोड्याचे तुकडे कसेही बसवावेत, तशी आमच्या ट्रेनची यार्डात मांडणी सुरु होती. शेवटी एकदाची ती आली, पण आमच्या डब्यावर मात्र ‘उदयपुर शटल’ असं लिहिलेलं नसून ‘हैदराबाद एक्सप्रेस’ असं लिहिलेलं होतं. त्याच्या मागच्या डब्यावर पाटीच नव्हती. मग टी.सी.ला गाठले; त्याने आमची तिकिटं पाहून आम्हाला एका डब्यात बसवून दिलं. आम्ही शक्य तितक्या निश्चिंतपणे झोपलो, आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तिने आम्हाला उदयपूरला पोहोचवलंय, हे पाहून आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. त्यानंतर सलग दोन रात्री हाच प्रकार चालला होता. त्या ‘येण्याची शक्यता’ या प्रकाराला आता सरावलो होतो, पण आपण झोपलेलो असताना ट्रेन दुसरीकडेच नेणार तर नाही, ही भीती मात्र त्यांनी आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत वाटायला लावली. तेव्हा मला कोणी ट्रेन किती आवडते विचारलं असतं तर मी कदाचित वेगळं उत्तर दिलं असतं!                           
ट्रेनमधल्या जेवणाबद्दल लोक बहुतेक वेळा कुरकूर करतात. बेचव जेवण आणि निवड करायला अजिबात वाव नाही, अशा परिस्थितीत सापडण्यापेक्षा लोक घरूनच ‘रेशन्स’ घेऊन येतात. बाहेरच्या जगातही कुणी ‘बाजारचं खाणं कसं वाईट’ यावर बोलताना आढळलं तर त्या व्यक्तीने एकदा तरी ‘इंडियन रेल्वे’ या संस्थेच्या हातचं खाल्लं आहे असं ओळखावं. आम्हीसुद्धा हेच बहुतेक ट्रेनच्या प्रवासात अनुभवलंय. आपल्या जेवणाच्या वेळेच्या किमान तासभर आधी तो ‘माणूस’ ऑर्डर विचारायला येतो, आणि मग आपण आता तो पाच मिनिटांतच जेवण आणेल अशी समजूत करून घेऊन आपला रंगात आलेला पत्त्याचा डाव घाईघाईने मोडतो. पण या प्रकाराला सरावल्यावर असं लक्षात येतं की एकदा ऑर्डर दिली की तो जेवण कधी आणेल हे काही निश्चितपणे सांगता येत नाही. किंबहुना, ऑर्डर रात्रीच्या जेवणाची असेल तर जेवण,  दुसऱ्या दिवशीच्या ब्रेकफास्टची ऑर्डर घ्यायला तो यायच्या आधी येणार, एवढंच आपण ठामपणे म्हणू शकतो. पण आपण त्यांना दोष देत नाही. कारण तोच माणूस आता अजून हजारेक लोकांच्या ऑर्डर्स घेणार, त्या पँट्रीकडे पोहोचवणार आणि मग ते तिथल्या पाकिटांच्या ढिगाचं वर्गीकरण करणार, हे आपल्याला ठाऊक असतं. रेल्वेतलं जेवण, तांत्रिक दृष्ट्या बेचव नसतं. पण आपल्याला ऑर्डर देऊन आपण काय साध्य केलं, असा प्रश्न नंतर खूप वेळ सतावत राहतो. एकदा आम्ही स्टेशनवर इडल्या घेतल्या आणि त्या ‘माणसाला’ फक्त भाताची ऑर्डर दिली. आईने व्हेज बिर्याणी; मी आणि बाबा एग बिर्याणी हे ठरलं, आणि ऑर्डर स्वतंत्र असली तरी सगळ्यांनी मिळून सगळं संपवायचं या करारावर सह्यासुद्धा झाल्या. मग अर्ध्या तासाने पाकिटं आली, आणि आईने ‘व्हेज’ असं लिहिलेलं पाकीट उघडलं. मटारांऐवजी रेल्वेला ते जाडजूड पिवळे वाटाणे कोण पुरवतं यावर पूर्वी बरीच चर्चा झालेली असल्याने आम्ही तेव्हा तो विषय काढला नाही. पण ‘एग’ लिहिलेलं आमचं पाकीट उघडल्यावर आत तेच दृश्य दिसल्यावर मात्र आम्ही चकित झालो. ऑर्डर चुकली असं वाटून बाबांनी त्या ‘माणसाला’ बोलावलं; तो सुदैवाने डब्यातच होता. पण मग मला त्या भातात दोन नुसतीच उकडलेली अंडी सापडली. त्या माणसाने ते पाहिलं, आणि आम्ही काही बोलायच्या आत ‘सॉरी’ असं पुटपुटून दोन प्लॅस्टिकच्या लोणच्याच्या डब्या आमच्याकडे टाकल्या. त्या रात्री आम्हाला रेल्वे कंपनी किती रूळासारखा सरळसोट विचार करते याचा साक्षात्कार झाला. ‘लोणच्याने सगळ्याची चव सुधारते’ ही एक आणि ‘ज्यात अंडं ती एग बिर्याणी, अंडं नाही ती व्हेज’ ही दुसरी, अशा रेल्वेच्या दोन ठाम समजुती आम्हाला त्या रात्री कळल्या!
पण हे एवढं सोडलं तर रेल्वेच्या इतर सगळ्या सुविधा खूपच जास्त समाधानकारक असतात; फक्त त्या त्या विशिष्ट ट्रेनमध्ये. ए.सी.च्या तिकिटात उशा, चादरी आणि रग येतात, आणि एरवी आम्हाला आमच्या हवा भरायच्या फुगवायच्या उशा न्याव्या लागतात. दुरोंतो आणि शताब्दी या ट्रेन्समध्ये खाण्यापिण्याची जबाबदारी ते अंगावर घेतात आणि नीट सांभाळतात. दर काही तासांनी ज्यूस आणि सँडविचेस मिळतात, आणि जेवणही जास्त चांगलं असतं. अशा सुविधा सगळ्या गाड्यांमध्ये ठेवणं खूपच खर्चिक आहे हे आपण समजू शकतो. त्याचप्रमाणे सामान्य मार्केटच्या नियमाला रेल्वेही अपवाद नाहीये. जे जास्त पैसे देऊ शकतात आणि देतात, त्यांचं रेल्वे आपल्या परीने चांगलं आदरातिथ्य करते. साध्या गाड्यांचा मुख्य हेतू साध्या गरीब लोकांनाही असा जलद प्रवास करता यावा असाच असतो, आणि त्या दृष्टीकोनातून पाहिलं तर साध्या गाड्यांमधल्या सुविधा बऱ्यापैकी समाधानकारक असतात.
मला रेल्वे आवडते याचं एक मुख्य कारण म्हणजे ती, का कोण जाणे, पण जिवंत भासते. तशी बसही वाटायला हवी, पण तो केवळ एक रिकामा डबा वाटतो. विमानात बसण्याआधी त्या सगळ्या सत्वपरीक्षांमधून जावं लागत असल्याने तेही असं निर्विकार वाटतं. पण रेल्वेतच काय, पण स्टेशन आणि एकूणच त्या आख्ख्या सिस्टीममध्ये जीव असतो. ट्रेन गेलेली असेल, तर प्लॅटफॉर्मला अक्षरशः मरगळ आलेली आपल्याला दिसते. मग काही वेळाने दुरून ट्रेनचा चित्कार ऐकू येतो. इतर प्राणीमात्रांप्रमाणे ट्रेनलाही स्वतःचा असा आवाज असतो. ती तिकडून किंचाळली की इकडे प्लॅटफॉर्म खडबडून उठतो. आडगावचं स्टेशन असेल आणि मेनलाईन जर लांब असेल तर आपल्याला ट्रेन पळताना पाहता येते. मला तर रेल्वे क्रॉसिंग असलेल्या गावातल्या लोकांचा जरा हेवादेखील वाटतो, कारण एरवी आपल्याला कधीच ट्रेनच्या खऱ्या वेगाची कल्पना येत नाही. रूळाशेजारून चालत जाणे आणि या ‘metallic monster’ला जवळून जाताना पाहणे यात मजा असावी. एकदा मात्र स्टेशनातच हा अनुभव मिळाला होता. माझ्या धाकट्या भावाच्या बारशाला जाण्यासाठी आम्ही मुंबईतल्या एका छोट्या स्टेशनवर उभं राहून डोंबिवली लोकलची वाट पाहत होतो. तेव्हा दुरून एक ‘वेस्टर्न रेल्वे’ येताना दिसली. आता ही किती वेळ थांबणार, आणि लोकल कधी येणार या विचाराने आम्ही गडबडलो, पण तिचा तिथे थांबण्याचा मानस दिसत नव्हता. आम्ही नेहमीप्रमाणे पुढे वाकून तिच्याकडे बघत होतो, तेवढ्यात ती थांबणार नाहीये असं बाबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आम्हाला बरंच मागे जायला सांगितलं. तरी ती जेव्हा जवळून गेली तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला आणि माझ्या मानेवरचे मागचे केस एकदम ताठ झाले. (तसे ते कधीच नीट बसत नाहीत हा मुद्दा इथे गैरलागू आहे) आपण शांत बसलेलो असताना कुणीतरी इशारा न देता समोरचा कूलर अचानक चालू केला, तर जे काही होतं ते मला तेव्हा जाणवलं. डोळ्यात धूळ जाईल म्हणून मी डोळे मिटले होते, ते परत उघडले तेव्हा ट्रेन निघून गेलेली होती आणि प्लॅटफॉर्म आता सावरताना दिसत होता.   
तसे माझे ट्रेनमधले बहुतेक सगळे प्रवास सुखाचे झाले आहेत. काही काही तर इतके सुखाचे होतात, की आपण इच्छित स्थळी पोहोचायला ट्रेनमध्ये बसलोय का ट्रेनमध्ये बसल्यावर ती कुठेतरी नेणारच म्हणून आपल्या इच्छित स्थळी चाललोय, हेच समजत नाही. ‘काय, कसला विचार करतोयस एवढा? माझं स्वागत करायला सगळा प्लॅटफॉर्म उभा आहे, आणि तू असाच हरवलेला? आज माझी शिट्टी जरा हळू आली का? हे घे मग.’ आणि समोर पाहतो तर ट्रेन उभी, आता चढतो का जाऊ पुढे असं विचारात असल्यासारखी! छे छे, चढायचं आहेच मला! पुढे काय वाढून ठेवलंय ते पाहण्याची अशी संधी कोण सोडेल? चला तर मग. All aboard!!!                                                                               

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प