प्रथमच परदेशात
अगदी खरं सांगायचं, तर हे एक प्रवासवर्णनच आहे. मी आईबाबांबरोबर केलेल्या एका ट्रिपचं. तशी त्यांनाही ट्रीपची हौस असल्याने आमच्या तोपर्यंत अनेक झाल्या होत्या; त्यानंतरही अनेक झाल्या. पण माझ्यासाठी हीच सगळ्यात अविस्मरणीय ठरली. म्हणूनच हे प्रवासवर्णन. मधल्या काळात मी आईच्या आग्रहावरून मीना प्रभूंची युरोपची प्रवासवर्णने वाचली. शिवाय पु.लं.चं ‘अपूर्वाई’ होतंच. त्या पुस्तकांशी तुलना करायची म्हटली, तर माझ्या या लेखाला ‘प्रवासवर्णन’ म्हणणे म्हणजे (पु.लं.च्या शब्दांत) गांडूळाला शेष म्हणण्यासारखं आहे, किंवा (माझ्या शब्दांत) मलेशियाला चिकटून असलेल्या एका पिटुकल्या बेटाला देश म्हणण्यासारखं आहे. पण नकोच तसं म्हणायला. कारण मग उपमा चुकेल. सदर बेट खरोखरच एक मान्यताप्राप्त देश आहे, आणि हे प्रवासवर्णनही त्याचसंबंधी आहे.
या बेटाचा उल्लेख आमच्या घरी त्याच्या आधी अनेक वेळेला झालेला होता. कंपनीच्या कामासाठी बाबा तिथे बऱ्याचदा गेले होते. तेव्हा मी लहान असल्याने बाबांना ‘दुसरा देश’ म्हणजे काय काय वेगळं असतं ते तपशीलवार विचारायचो. त्यांच्या वर्णनावरून मला तरी तो देश खूप ‘इंटरेस्टिंग’ वाटला होता. मी पाचवीत असतानाच्या एका संध्याकाळची गोष्ट आहे. बाबांनी घरी येऊन पुढची ट्रिप इथे काढायची का, असं विचारलं होतं. मी एका पायावर तयारच होतो; पण मग पुण्यात स्वाईन फ्लूची साथ पसरली. तो सगळा प्रकारच इतका गंभीर होता की आम्हाला ट्रिप शक्य असल्यास पुढे ढकलावी लागेल, नाहीतर रद्दच करावी लागेल अशी चिन्हं होती. त्यावेळी मी हा धक्का कसा पचवला होता ते आमच्यापैकी कुणालाच आठवत नाही. एका अर्थी बरंय ते. पण आम्ही बेत बदलेपर्यंत ते प्रकरण बऱ्यापैकी निवळलं होतं, आणि आम्ही जायच्या तारखेपर्यंत ते मिटलं असेल असा आईबाबांना विश्वास होता. म्हणून आमची ट्रिप नक्की झाली. त्यानंतरचा एक प्रसंग मला नीट आठवतोय. मी आणि मुक्ता भेटलो होतो. तेव्हा आमच्यात कुणाकडे सांगण्यासारखं जास्त भारी काहीतरी असेल, अशी चढाओढ लागायची. “या दिवाळीत आम्ही संगमनेरला जाणार आहोत.” ती म्हणाली होती. एरवी हे विधान ऐकून मला चिक्कार हेवा वाटला असता. पण तेव्हा मी सरळ म्हणालो, “आणि आम्ही सिंगापूरला!!” आधी एकदा जवळपास रद्द झाल्यामुळे, त्यावर असं शिक्कामोर्तब करून मला बरं वाटलं. तिची प्रतिक्रिया काही आठवत नाही, पण तेव्हापासून मला वेध लागले.
पुण्याहून बंगलोर, तिथून सिंगापूर असा आमचा प्रवास होणार होता. तेव्हा मला पुण्याचा विमानतळ, तो केवळ एका दृष्टीक्षेपात मावत असल्याने आवडत नसे. बंगलोरचा त्यामानाने खूप ‘समाधानकारक’ होता. आमच्या विमानाने आम्हाला दुपारी तिथे आणून सोडलं. पुढचे साडेसहा तास तिथेच काढायचे होते, आणि बाहेर पडायची आमची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून आम्ही तिथल्या प्रशस्त वेटिंग रुममध्ये बसून राहिलो. मला पुस्तक बरोबर न ठेवल्याचा पश्चात्ताप होत होता. तशी ही सात वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे, पण तेव्हा बाबांकडे साधा, बटणं असलेला (थोडक्यात, बोअर) फोन होता. मग त्यांनी मला ‘हर्ज’चं एक कॉमिक विकत घेऊन दिलं. ते पहिल्या तासाभरात संपलं. मग आम्ही तिथे खाऊन घेतलं, गप्पा मारल्या. उशिरा येणाऱ्या ट्रेन्सचा भरपूर अनुभव असल्याने आम्ही तेव्हा करायचो ते सर्व करून वेळ घालवायचा प्रयत्न केला. तरीही तीन तास शिल्लक होतेच, म्हणून मग मी ते कॉमिक पाठ होईपर्यंत पुन्हापुन्हा वाचलं. तरी नंतर वेळ कसा उडून गेला ते कळलं नाही.
विमानतळावर, सुरक्षा तपासणीच्या क्षेत्राच्या आतच असूनही, शेवटच्या दोन तासांत आम्हाला बऱ्याच प्रक्रियांमधून जावं लागलं. एका मोठ्या रांगेत आख्खा विमानतळ फिरून आम्ही शेवटी बाहेरच्या भागात आलो. यावेळी आमचं विमान इमारतीलाच येऊन चिकटणार असल्याने धावपट्टीवरून बसने प्रवास करावा लागला नाही. रांगेत उभे असताना आम्हाला टाय नीट बांधला नाहीये, केस विस्कटलेत आणि चष्मा नाकावरून घसरायच्या बेतात आहे, अशा अवतारातला एक मनुष्य आमच्याच बोर्डिंग गेटमधून आमच्या विमानाकडे जाताना दिसला. रांगेतून बाहेर पडेपर्यंत आम्ही विमानाच्या कुठल्या पार्टची जबाबदारी त्याच्यावर असेल यावर तर्क करत बसलो. आम्ही विमानात चढताना त्यानेच आमचं हसून स्वागत केलं आणि त्याच्यावर कॉकपिटची जबाबदारी होती हे आपणहून सांगितलं.
आम्ही एका मोठ्या मैदानावर उतरलो, आणि परत तशाच पॅसेजमधून मुख्य इमारतीत आलो. तिथल्या सर्व प्रक्रियांमधून बाहेर पडेपर्यंत आम्हाला सूर्योदय होताना दिसला. सिंगापूरमध्ये सकाळ झालेली होती. आजूबाजूचं सगळं वातावरण पूर्णतः वेगळं असल्याची जाणीव होत होती. एकदोन सरकत्या जिन्यावरून खाली येऊन आम्ही इमारतीच्या बाहेर आलो. आमच्या टर्मिनसवर मेट्रो स्टेशन नसल्याने आम्हाला टॅक्सीने दुसऱ्या टर्मिनसला जायचं होतं. तेव्हा मी ‘टर्मिनस’ हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवला. एक छोटंसं गावच असावं असा तो विमानतळ पसरलेला होता. इतका प्रचंड विस्तार असलेलं ठिकाण मी, आईबरोबर एकदा पुणे विद्यापीठात गेलो होतो त्याच्यानंतर, पहिल्यांदाच बघत होतो. दोन टर्मिनसमधला रस्ता हायवे वाटावा तसा प्रशस्त होता. त्याच्या दोन्हीबाजूंना आणि डिव्हायडरवर नीट जपलेली हिरवळ पसरलेली होती. पहाटेच्या अंधुक प्रकाशात आम्ही जात असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या लाल-पिवळ्या दिव्यांनी रस्ता उजळून निघाला होता.
मेट्रोच्या स्टेशनवर आम्हाला एक नकाशा फुकट मिळाला. त्याशिवाय आम्ही प्रत्येकी एक-एक ‘टुरिस्ट कार्ड’ घेतलं, जे वापरून आम्हाला आम्ही होतो तो काळ मेट्रोने कुठेही जाता येणार होतं. बाबांनी आपला स्टॉप एअरपोर्टनंतरचा सातवा आहे, असं सांगितलं. मी त्या स्टॉपचं नाव लक्षात ठेवून मेट्रोत चढलो. तिच्या दोन्ही बाजूंचा वरचा भाग काचेचाच बनलेला होता. दर दोन मिनिटांनी ऐकू येणाऱ्या सुस्पष्ट घोषणांकडे कान देऊन मी त्या खिडकीतून सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारं एक अवाढव्य शहर बघत होतो. तेव्हा मला गगनचुंबी इमारतींचं आत्ताएवढं आकर्षण नसल्याने माझं त्यांच्याकडे खास लक्ष गेलं नाही. तेवढ्यात त्या आवाजाने आमच्या स्टॉपची घोषणा केली आणि मी ताडकन उठलो. पण आमच्या शेजारीच दार असल्याने घाई करायची गरज नव्हती. तसंही, अजिबात गर्दी नसताना घाई करायचीच कशाला? मधल्या वेळात मेट्रो आकाशातून थेट जमिनीखाली कधी गेली ते माझ्या लक्षातही आलं नव्हतं. मग शेवटी ते स्टेशन आलं. त्याच अदृश्य बाईला ‘please mind the platform gap’ हे वाक्य सातव्यांदा म्हणताना ऐकत होतो. म्हटलं, बघू तरी ती platform gap अशी किती मोठी होती ते. पण ती ‘गॅप’ इतकी लहान होती की, मी समजा पडायचं ठरवलं असतं तरी, मेट्रो निघून गेल्यावर मग खाली उतरलो असतो तरच ते शक्य झालं असतं. पण काय सांगावं, असे अपघात झालेही असतील. आणि नसतील तरी, गरज भासेल तिथे सावधगिरीचा इशारा देणं यात तिथल्या कुणालाच काही गैर वाटत नसावं.
आमचं हॉटेल त्या स्टेशनपासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर होतं. ते मेन रोडवरील एका मोठ्या इमारतीत नसून एका गल्लीत एका कोपऱ्यावर होतं. ती एक लहानशी, पण प्रशस्त जागा होती. ते हॉटेल म्हणजे एक घरगुती धंदा असावा. दोन्ही बाजूंनी दोन इमारती असल्यामुळे, आमच्या खोलीला खिडकी नव्हती. पण ही उणीव त्या मालकाने मोठ्या चतुराईने खोलीतल्या मोठ्या आरशाला लाकडी दारं बसवून भरून काढली होती. शिवाय हे हॉटेल, काचेच्या इमारतीतलं दिखाऊ हॉटेल नसल्याने दरही कमी होते, आणि तेवढ्यातच आमची अगदी घरच्यासारखी सोय होत होती. आम्ही रोज सकाळी बाहेर पडत असू तेव्हा तो मालक न चुकता आमच्याकडे पाहून हसायचा आणि गोळ्यांनी भरलेला एक बाऊल आमच्यापुढे ठेवायचा.
आम्ही तिथे पाचच दिवस राहणार होतो, आणि रोज एकेक ठरलेली जागा ‘उरकून’ घेणार होतो. पण तरीही यातल्या प्रत्येकाला एक-एक दिवस दिल्याने ते उरकणं वाटलंच नाही. असं असूनही, प्रत्येक प्रेक्षणीय स्थळाहून रात्री परत येताना असं वाटे की आपण अगदीच कमी काळासाठी इथे आलो आहोत. तसं पाहायला गेलं तर ते बेट साधारण पुण्याएवढं. गाडीत बसून प्रदक्षिणा घालायची ठरवली तरी दोन तास पुरतील असं. पण तरीही ते नुसतं एक गजबजलेलं शहर वाटत नाही. त्याच्या अंतर्भागातील खूप मोठी जागा तिथल्या सुप्रसिद्ध झू आणि बर्ड पार्क यांनी व्यापली आहे. शेजारचं ‘सॅन्टोसा’ बेट हेही एक आकर्षक Amusement Park आहे. शिवाय सिंगापूरला जाऊन ‘मरलायन’ न पाहता परत येणे हा खूप मोठा अपराध आहे. (आपण गाढव ठरतो म्हणून) आणि कुठेही जायचं ते मेट्रोनेच! या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना स्वतःची अशी मेट्रो स्टेशनं आहेत. तसंही, अर्धा प्रवास गजबजलेल्या रस्त्याच्या पंधरा फूट वरून आणि उरलेला अर्धा त्याच रस्त्याच्या काही कमीअधिक फूट खालून करता आला, तर रस्त्यावरून जायची इच्छा होईल कुणाला?
आम्ही पाहिलेल्या सगळ्या ठिकाणांमध्ये आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो सिंगापूरच्या ‘झू’चा. आता ‘झू’ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक बाग येते, ज्याच्या एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिंजऱ्यात प्राणी ठेवलेले असतात. (प्राणी ‘संग्रहालय’ असं नाव असल्यावर दुसऱ्या कशाची अपेक्षा करणार?) क्षणाची नजरानजर आणि आपण पुढच्या प्राण्यांकडे वळणार, आणि तेही ते जागे असतील तर. तेही त्या प्रकाराला कंटाळून गेलेले वाटतात. पण सिंगापूरचा झू, जगातल्या इतर नावाजलेल्या झूप्रमाणे ‘Natural Habitat’ वर आधारित आहे. खरं तर, ते एक अतिशय नीट जपलेलं जंगलच आहे. स्टेशनच्या समोर प्रवेशद्वार असलेली एक छोटी लाकडी इमारत आहे, आणि त्यापलीकडे पूर्ण दाट झाडी आहे. दोन्ही बाजूंनी उंच झाडांनी वेढलेले रस्ते पसरलेले आहेत. बराच वेळ चालल्यानंतर एखादी मोकळी जागा लागते, ज्यात बऱ्याच प्राण्यांच्या स्वतंत्र जागा असतात. दोन प्रकारच्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये मोठे खंदक आहेत. कुणाला कसलीच भीती नाही, सगळेच मुक्तपणे वावरतायत असं अद्भुत वातावरण असे. प्रवेशद्वारापाशी ते एक नकाशा देत. त्यात कुठले प्राणी कुठे आहेत ते प्राण्यांची कार्टून काढून दाखवलेलं होतं. शिवाय त्या जंगलात कुठेकुठे छोटे स्टॉल्स आहेत तेही दाखवलेलं होतं. कांगारूंसारखे काही प्राणी मी पहिल्यांदा तिथेच पाहिले. आम्ही झूला भेट दिली त्यावेळी तीन प्राण्यांचे ‘शो’ होते; त्यांनाही आम्ही हजेरी लावली. या प्राण्यांचं राज्य जरा जास्त मोठ्या भागात पसरलेलं असे. आधी एका माणसाने जमलेल्या सगळ्यांना एका प्रचंड टॅंकच्या एका बाजूला उभं केलं. त्या टँकच्या आतच एक मोठी गुहा होती. काही वेळाने एक पोलर अस्वल शांतपणे त्या गुहेतून बाहेर पडलं आणि आमच्या समोर आलं. पण ते काही पिंजऱ्यातल्या प्राण्यांसारखं कंटाळलेलं वाटत नव्हतं; उलट त्याला इतका भाव मिळत असल्याने त्याला मजा वाटत असावी. त्याने मजेत आमच्यासमोर बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय वगैरे करून दाखवलं. थोडा वेळ ते पाण्याच्या वर येऊन तिथल्या (कृत्रिम असावा) बर्फावर बसलं, आणि तितक्याच शांतपणे गुहेत परत गेलं.
दुसरीकडे सील माशाने आमची खूप करमणूक केली. त्यालाही स्वतःचा एक मोठा गोलाकार टॅंक होता. तो आणि त्याचा ट्रेनर मिळून धमाल करत होते. तो मधूनच टँकच्या काठावर येऊन बसे. मग काही लोक मागे सरकत, पण तो कोलांटी मारून परत पाण्यात शिरे. त्याला कुणी रिंग्जमधून उड्या मारायला लावल्या नाहीत, की हॉर्न वाजवायला लावले नाहीत. तो त्याच्या मनात येईल तेच करत होता, पण लोक त्यानेही प्रभावित होत होते. तसंही, आपल्याच नादात असलेले प्राणी कधी आपल्याला इतक्या जवळून बघता येतात? पण सगळ्यात जास्त लक्षात राहिला तो आपल्या पांढऱ्याशुभ्र बंगाली वाघांचा शो. त्यांच्या जेवणाच्या वेळी आम्हाला खासकरून बोलावलं होतं. एका खूप मोठ्या जमिनीच्या तुकड्यावर तीन वाघ बसलेले होते. तिथे त्यांच्यासाठी एक मोठी दगडी गुहा आणि एक झरादेखील होता. तिथल्याच एका मोठ्या झाडावर एक छोटंसं मचाण होतं. आम्ही हे सगळं गॅलरीत उभं राहून बघत होतो. दोन झूचे कर्मचारी त्या मचाणावर आणि आमच्या शेजारच्या गॅलरीत उभं राहून त्यांना त्यांचं जेवण देत होते. यांनी वरून ते फेकले की हे वाघ उडी मारून ते झेलायचे. त्यांनी ते मांस दातात धरून झऱ्यात धुवून घेतलं. त्यांना इतक्या सगळ्या लोकांसमोर जेवायचा संकोच वाटला असावा. पण ते ते गुहेत घेऊन गेले. मग आम्हाला बाहेर काढण्यात आलं.
सिंगापूरच्या झूची रचना फार डोकं वापरून केलेली आहे. आपण जेव्हा झूला भेट देतो तेव्हा आपल्याला प्राणी खऱ्या अर्थाने कसे राहतात ते पाहायचं असतं. इथे आपली ती इच्छा पूर्ण होते. एक तर प्राणी आपल्यापासून बऱ्यापैकी अलिप्त असतात. त्यांना अशी सुरक्षिततेची आणि स्वातंत्र्याची जाणीव असल्याने ते अगदी आरामात असतात. आणि ते सगळं बघून आपण अगदी तृप्त होतो. अशाच समाधानी अवस्थेत आम्ही झूची खासगी बस सुटायची त्या बस स्टॉपवर परत आलो. बसने परत जायला लागल्यावरच आपण अजून एका मोठ्या शहरात आहोत हे आठवलं.
याशिवाय आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो सॅन्टोसा बेटाचा. हे बेट सिंगापूरच्या मुख्य बेटाच्या दक्षिणेला आहे. तिथे जायलाही मेट्रोच. तशी एक केबल कार असते म्हणा, पण त्या दिवशी ती बंद होती. आम्हाला काय, मेट्रोने जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्या बेटावर फिरायला मोनोरेलची सोया होती. मोनोरेलचा अनुभवही वेगळाच होता. खरं तर आत बसल्यावर मेट्रो आणि मोनोरेलमधला फरक जाणवत नाही, जाणवलाच तर इतकाच की मेट्रोसारखी ही मधूनच जमिनीखाली जात नाही. सॅन्टोसा बेट हे पर्यटनस्थळ म्हणूनच वसवलेलं आहे. (खरं तर काही औद्योगिक आणि सरकारी भाग सोडले तर सगळं सिंगापूरच पर्यटनस्थळ म्हणून वसवलेलं आहे) तिथला 4D शो माझ्या खास लक्षात राहिला. 4D म्हणजे 3Dच्या पुढची पायरी. म्हणजे ते दाखवत असलेल्या 3D शॉर्टफिल्ममध्ये दाखवलेले इफेक्टस आपल्याला घडताना जाणवतात. त्यांनी काही लोक एका निर्जन बेटावर आल्याचं दाखवलं. मग समुद्राच्या लाटा आल्या की आम्हाला चेहऱ्यावर जोराचा वारा जाणवे, आणि शिंतोडेही उडत. त्या लोकांच्या पायाजवळून खेकडे जाऊ लागल्यावर आमच्याही पायाशी (यंत्राद्वारेच!) गुदगुल्या केल्या गेल्या. थोडक्यात, थोड्याफार फरकाने त्यांनी आम्ही खरोखरच बेटावर असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता; आणि तो जमला होता. या शोच्या खालोखाल मला सेगवे ट्रॅकवर त्या अद्भुत एकचाकी वाहनाने फिरणं आवडलं. त्याशिवाय रात्री जमलेल्या सगळ्यांसाठी एक ‘लाईट अँड साउंड’ शो होता. समुद्रकिनाऱ्यावर एका मोठ्या अर्धवर्तुळात स्टेडियमसारख्या रचनेत खुर्च्या रचून ठेवल्या होत्या. किनाऱ्यावर काही लोक एक नाटक सादर करत होते. त्यात नाच होते, गाणी होती, आणि मधूनच laser projectors वापरून केलेली हलती चित्र होती. एका तरुणाला एक झोपलेली राजकन्या दिसते, मग तिला उठवायला तो गातो, आणि त्याच्या गाण्याने किती काल्पनिक प्राणी जागे होतात, अशी काहीशी ती गोष्ट होती. तो गाणारा सोडला तर बाकी सर्व पात्र प्रोजेक्शन्स होती. अशा प्रकारे आम्हाला नाटक आणि सिनेमा यांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळाला, आणि तोही पडद्याशिवाय. तशाच भारावलेल्या अवस्थेत रात्रीच्या मोनोरेलने आम्ही हॉटेलवर परत आलो.
मागे वळून पाहिल्यावर एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे सिंगापूरला स्वतःचा स्वभाव नाही. त्यांचा जगप्रसिद्ध ‘मरलायन’ सोडला तर स्वतःचं असं व्यक्तिमत्त्व नाही. इथले समुद्रकिनारेही बाहेरून वाळू आणून कृत्रिमरीत्या तयार केलेले आहेत, ही वस्तुस्थिती माहित असताना त्या नाटकातल्या गाण्यात ‘Where flowers bloom for you and me’ ही ओळ ऐकताना काहीसं विचित्र वाटतं. असं वाटतं, की ते एक परिपूर्ण पण निर्जीव शहर आहे. त्यांची संस्कृती मलेशियन, त्याला तिथल्या तमिळ लोकांचा अपवाद. स्वतंत्र देश असला, तरी मलेशियाचे राजधानी क्वाला लंपूर अक्षरशः हाकेच्या अंतरावर. (म्हणजे एक मेट्रो या दोन शहरांना जोडते) त्यांच्या झूमध्ये जगभरातले अनेक प्राणी आहेत, पण त्यातला एकही त्यांच्या स्वतःच्या बेटावरचा नाही. आम्ही तिथल्या अजस्त्र जायंट व्हीलमध्ये बसलो होतो, तेव्हा ते जगातलं सगळ्यात मोठं होतं. म्हणून अभिमान. पण २०१४ मध्ये अमेरिकेतल्या लास व्हेगासमध्ये त्यापेक्षा मोठं एक बांधून झालं.
शेवटी सिंगापूरमध्ये असं काही नाही, जे इतर जगात कुठेतरी नाही, हेच सत्य आहे. (अर्थात मरलायन सोडून) पण तरीही ते ‘सगळं सगळं’ असण्याबद्दल प्रसिद्ध आहे! कृत्रिम का होईना, पण कशाचीही उणीव भासू न देण्याची त्यांची धडपड आपल्याला दिसते. एका प्रसिद्ध पर्यटनस्थळाशिवाय ते पूर्वेकडील आर्थिक महत्वाचं एक शहर या नावाखाली हाँग काँगच्या खांद्याला खांदा भिडवून उभं आहे. (आर्थिक सेंटर्सना खांद्याला खांदाच द्यावा लागतो, स्पर्धा करून चालत नाही तो भाग वेगळा!) स्वतःचं व्यक्तिमत्व नसलेला हा देश आपल्या शहरात ‘लिटिल इंडिया’, ‘चायना टाऊन’ वगैरे विकसित करण्यात गुंतलेला आहे. आणि हे विभाग पूर्णतः भारत आणि चीनसारखे करणं हे त्यांना जमलेलं आहे, हे विशेष. या दोन्ही विभागांत एकूण गल्ल्या जास्त आणि छोट्या, दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती दिसतात, आणि पलीकडच्या विभागातल्या गगनचुंबी इमारती इकडे बघून फिदीफिदी हसत असतात. त्यांनी शहरातल्या प्रमुख इंटरचेंज स्टेशनचं नाव ‘धोबी घाट’ ठेवलं आहे, हे जरा विशेष! चायना टाऊन तिथून जवळ आहे. तिथल्या गल्ल्या अरुंद, आणि दोन्ही बाजूंनी लालभडक कापडी छते असलेले स्टॉल्स. अधूनमधून नक्षीदार लाल कंदील खांबांवर लटकवलेले दिसत. तिथे आम्हाला राईसप्लेट म्हणून नुसताच भात वाढला होता. आईला एकूणच चायना टाऊनमधलं ते ‘जेवण’ अजिबात आवडलं नाही. मग रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ‘लिटिल इंडिया’त गेलो आणि तिथल्या फूड कोर्टमध्ये छोले-भटुरे खाऊन धन्य झालो. त्या गल्ल्या कशाही असल्या, तरी ते सगळं एकदम घरच्यासारखं वाटलं. तेव्हा असं वाटलं, की येणाऱ्या प्रत्येकाची जमेल त्या प्रकारे काळजी घेणं, हा सिंगापूरचा स्वभाव, आणि सगळ्यांना खूश करण्यात आनंद मानणारं एक आनंदी, हसतमुख व्यक्तिमत्त्व!
एक दिवस आम्ही फक्त शहरात फिरलो. आमच्या हॉटेलमालकाने आम्हाला तिथलं एक खेळण्यांचं दुकान पाहण्याचा सल्ला दिला होता. त्याला म्हणत जरी ‘दुकान’ असले तरी ते एक प्रदर्शनच होतं, आणि तेही नुसत्या खेळण्याचं नाही तर त्यांच्या इतिहासाचं. प्रवेशद्वारापाशी ‘मारिओ’ स्वागत करायला उभा होता. त्याच्यामागच्या काचेच्या कपाटात लाकडी खेळणी, व्हिन्टेज कार्सची मॉडेल्स आणि बसेस, असं सगळं होतं. त्यापलीकडे सुपरहिरो लोकांची खेळणी होती. ती सगळ्यात लोकप्रिय दिसत होती. काचेच्या कपाटात सगळे छाती पुढे काढून उभे असले, तरी काउंटर्स मात्र बऱ्यापैकी रिकामे होते. अगदी बाहेर पडायच्या आधी अविश्वसनीय इलेक्ट्रॉनिक खेळणी ते कर्मचारी हौसेने चालवून दाखवत होते. तिथून आम्ही ‘सायन्स सेंटर’ ला भेट दिली. झूमध्ये ठेवता आला नाही म्हणून की काय, पण तिथे एक डायनासोर होता. त्यांनी एकूणच आतलं वातावरण रहस्यमय ठेवलं होतं. एका खोलीत संपूर्ण अंधार होता, आणि निऑन लाईट्स बसवलेले भूमितीतील आकृत्या ठेवलेल्या होत्या. तर दुसऱ्या खोलीत आर्केड मशिन्सवर बौद्धिक खेळ होते. एका लांबलचक भिंतीवर गणितातल्या ‘e’ची १२० दशांश स्थानापर्यंतची किंमत लिहिली होती. बारावीत ‘e’शी ओळख झाल्यावर त्याची किंमत लिहायला ग्रेट वॉल ऑफ चायनाही पुरली नसती हे समजलं. पण नेहमीप्रमाणेच सिंगापूरने आपल्या परीने प्रयत्न केला होता.
या वेळेपर्यंत आमची ट्रिप संपत आली होती. त्यानंतरच्या दिवशी ‘ज्युरॉंग बर्ड पार्क’ ला भेट देऊन आलो, आणि झूमध्ये पक्ष्यांच्या अनुपस्थितीचं कारण लगेच लक्षात आलं. तो आमचा सिंगापूरमधील शेवटचा दिवस होता. त्या संध्याकाळी आम्ही त्या ‘मरलायन’ला भेट दिली. तो एका प्रचंड तलावाच्या काठावर उभा आहे. त्याच तलावाच्या कडेने एक मोठा वॉकिंग प्लाझा आहे. रात्र होईपर्यंत आम्ही तिथे मजेत भटकत होतो. त्या रात्री बाबांच्या दोन कलिग्ससोबत आम्हाला ‘डिनर’ला जायचं होतं. त्या ‘क्वी फॉंग’ आणि ‘बी एन्ग’ नावाच्या दोन हसतमुख स्त्रिया होत्या. त्यांच्याशी बोलताना मी पहिल्यांदाच इंग्लिशमधून एक संपूर्ण संभाषण केलं. बाबांसोबत त्यांना भारतात येण्याचा आग्रह करताना मजा आली. तो पुणेरी आग्रह होता हे मला फार नंतर कळलं. त्या त्यानंतर भारतात आल्या असतीलही. पण त्या रात्री मी त्या खरंच आल्या तर आपल्याकडेच उतरतील आणि मग शाळेत काय भाव खाता येईल, अशी सुखस्वप्नं रंगवत होतो.
दुसऱ्या दिवशी आमचं सकाळचं विमान होतं. सिंगापूर सोडून जाताना वाईट वाटत होतं, पण परत विमानतळाला पाहून बरं वाटलं. परत खिडकीची सीट मिळाल्याने मी त्या बेटाकडे ते अगदी ढगांच्या आड जाईपर्यंत पाहत होतो. दुपारी आम्ही रिटर्न फ्लाईटने बंगलोरला आलो. या खेपेस मात्र जवळपास आख्खी रात्र तिथे काढावी लागणार होती. कशीबशी ती पार पडल्यावर पहाटेच्या विमानाने आम्ही परत पुण्याला आलो
बंगलोरच्या विमानतळाला दुसऱ्यांदा पाहून मला अचानक एक वेगळाच साक्षात्कार झाला. तेव्हा आणि तिथून पुढे भारतातल्या प्रत्येक पर्यटनस्थळाला भेट देताना ते आठवत राहायचं. सिंगापूरच्या झूमधील बहुसंख्य प्राणी भारतभर पसरलेले होते. सिंगापूरच्या सुबक समुद्रकिनाऱ्यांसारखेच सुंदर किनारे गोव्यात आहेत. मागच्या वर्षी उटीला गेल्यावर तिथे तसाच एक 4D शो दिसला. याशिवाय गगनचुंबी इमारती, मेट्रो आणि अशा अनेक गोष्टी ज्या मी सिंगापूरमध्ये पहिल्यांदा पाहिल्या, त्या सगळ्या मुंबईत आहेतच. सिंगापूरमध्ये जे पूर्ण वेगळं वातावरण अनुभवलं होतं, त्या समाधीतून बाहेर पडल्यावर असं दिसलं की हळूहळू आपलाच देश त्या दिशेने प्रगती करू लागला आहे.
तरीही, शेवटी सत्य हेच की जगातील प्रत्येक देश आपल्या परीने वेगळा असतोच. आणि काही गोष्टी फक्त तिथेच आढळतात. पण सगळीकडे अनुकरणाचा लाटा पसरत असल्याने कधीतरी कदाचित आपण सगळे अनेक बाबतींत समान होऊ. सिंगापूरमध्ये तर आजच अशी परिस्थिती आहे, की स्वतःचं असं फक्त तिथेच सापडणारं काहीच नाही. (मरलायन सोडून यार!!) पण तरीही तो छोटासा देश जगभरात इतरत्र सापडणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या शहरात एकत्र करून दाखवण्यात मग्न आहे. कॅनव्हास कधी तक्रार करतो का?
सिंगापूरला माझे प्रणाम!!!!
Comments
Post a Comment