स्थानमाहात्म्य


‘स्थान’ या शब्दामुळे इथे थोडा घोळ होऊ शकतो. स्थान म्हणजे कुठलंतरी एक ठिकाण असं मला म्हणायचं नाहीये. मी ‘स्थान’ हा शब्द ‘एक व्यवस्था, जिथे लोक जमून काहीतरी करतात’ या अर्थी वापरतोय. ते तिचे रहिवासीसुद्धा असू शकतात. थोडक्यात, स्थान हा शब्द मी इथे ‘मानवी वसाहतीचं एक युनिट’ या अर्थी वापरतोय हे लक्षात आले असेल. तसं म्हणालात तर माझं आवडतं ‘स्थान’ म्हणजे ‘शहर’.
एखादं शहर हे मला अनेक पातळींवर मध्यभागी वाटतं. ते गावापेक्षा बरंच मोठं, पण राज्यापेक्षा (युरोपबद्दल बोलत असाल तर देशापेक्षा) खूपच लहान असतं. देशाच्या नकाशावर ते असतं फक्त एक जरासा मोठा ठिपका, तर प्रदेशाच्या किंवा स्वतःच्याच नकाशावर सर्वाधिक भाग व्यापून असतं. देशातलं सर्वात लहान स्वतंत्र आणि परिपूर्ण युनिट शहरच असतं, तर दुसरीकडे अनेक माणसांनी एकत्र राहण्याचं सर्वात मोठं युनिट तेच असतं. आणि एका शहराचा (सरकारी भाषेत महानगराचा) काही पातळींवर संपूर्ण देशाला आधार असतो, तर इतर पातळींवर त्याच्या आसपासच्या लहानसहान खेड्यांना! तसंच, देश किंवा राज्य यांचा आकार बदलू शकत नाही, परंतु शहर मात्र वाढू शकतं.  
एका आदर्श शहरासंबंधी माझ्या काही कल्पना आहेत. एक म्हणजे, शहर हे स्वयंपूर्ण असावं. ते एका राज्याचा किंवा देशाचा भाग असलं, तरी बाकी अर्थांनी स्वतंत्र असावं. त्याखेरीज एका आदर्श शहरात कायकाय असावं याबद्दलही माझी काही मतं आहेत. माझ्या मते एक शहर दिसायला सुंदर असलं पाहिजे. अर्थतज्ञ वगैरे देशाचा विकास कसा मोजतात कल्पना नाही, परंतु एका देशाची ‘इमेज’ बनते ती त्याच्यातल्या प्रसिद्ध शहरांनुसारच. आता आपल्या भारतात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, आणि त्यातलं एकही केवळ एक शहर असल्याने प्रेक्षणीय नाहीये. परदेशी भेट देतीत ते अशाच स्थळांना. पण तिथपर्यंत पोहोचायला प्रत्येकाला आधी आसपासच्या एका गावात जावं लागतं, आणि तेही अशा गावात जिथे वाहतुकीची सोय असेल. माझ्या मते एका आदर्श शहरातच वाहतुकीच्या सगळ्या, अगदी टांग्यापासून विमानापर्यंत सुविधा असू शकतात.
शहराचा मला आवडणारा एक गुण म्हणजे अतूट विस्तारक्षमता. एक शहर मोठं होताहोता आजूबाजूच्या उपनगरांना गिळंकृत करत जातं. यात काही चुकीचं नाहीये. तारे (खरे बरं का!) सुद्धा असंच करतात. शहराशी जोडलं गेल्यामुळे आपोआपच त्या गावाचा विकास होतो. शहराबद्दल मला आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे त्याचा विकास केवळ सरकारवर अवलंबून नसतो. एखादं फुगलेलं शहर पाहताच त्यात आपल्या कंपनीची एखादी शाखा उभी करायचा मालकांना अनावर मोह होतो. याच कारणामुळे आज पुण्यात मॅक्डोनाल्ड्स, स्टारबक्स वगैरे आढळतात.
याच संबंधी माझा एक सिद्धांत आहे (म्हणजे मला असं वाटतं बुवा). जबाबदाऱ्या लादल्या की या विस्तारक्षमतेला आळा बसतो. अमेरिकेत आपल्यासारखीच विविध राज्यं आहेत. मी एकदा उगीच त्यांची त्यांच्या राजधान्यांसह यादी करत होतो. शहरांच्या या वेडामुळे मला इतर देशातल्या शहरांची नावं माहीत होती. ती मी त्या-त्या राज्याला चिकटवायचो आणि अडलं तर गूगलची मदत घ्यायचो (आईबाबांची घ्यायची तशी गूगलची! त्यात संकोच कसला). पण गूगलने मला संपूर्ण यादीच दिली, आणि ती पाहिल्यावर मला धक्काच बसला. माझ्या माहितीचं अमेरिकेतलं एकही आकर्षक, जगप्रसिद्ध शहर त्याच्या राज्याची राजधानी नव्हतं! खुद्द न्यू यॉर्क राज्याची राजधानी न्यू यॉर्क सिटी नसून अल्बानी नावाचं दुसरंच गाव होतं. मग मला याचं कारण कळल्यासारखं वाटलं. न्यू यॉर्क सिटी म्हणजे जगातल्या सर्वात प्रसिद्ध, सुंदर, iconic शहरांपैकी एक. मग त्याच्यावर राज्याचं कामकाज कशाला लादायचं? छे छे, अशा शहराचं काम केवळ एकंच, आणि ते म्हणजे अफाट वाढायचं आणि तूफान लोकप्रियता मिळवायची. ही विचारसरणी सुरुवातीला थोडी विचित्र वाटली, पण ती एका अर्थी बरोबरही आहे. एक प्रसिद्ध आणि सुंदर शहर हे त्या देशाचं एक asset असतं. त्याने फक्त मनं जिंकावीत; सरकारी काम एक छोटंसं सुबकठेंगणं शहरही करू शकतं, हा त्यामागचा विचार. आपल्या महाराष्ट्रात मात्र राजधानी मुंबई, देशाची आर्थिक राजधानी मुंबई, देशाच्या सेन्ट्रल सिने-इंडस्ट्रीची राजधानी मुंबई, आणि भारतातलं सर्वात सुंदर आणि सुप्रसिद्ध शहरही मुंबईच. या सगळ्या भूमिकांमुळे बिचारीची परवड होतीय असं माझं आणि काही चॅनेलवाल्या लोकांचं मत आहे. (Mumbai is a victim of it's own success............... इति History TV 18)
यापुढे मी फक्त माझ्या काही आवडत्या शहरांचं वर्णन करणार आहे. त्यापूर्वी सांगू इच्छितो कि यातल्या कोणालाच मी स्वतः भेट दिली नाही. परंतु शहरांची माहिती मिळवण्याच्या छंदामुळे त्यासंबंधीचे अनेक प्रोग्रॅम पाहिले आहेत. (मुंबईच्या माहितीसाठी सुद्धा मला प्रोग्रॅम बघावा लागला, काय हे दुर्दैव!) तसेच एखादे शहर आवडायला तिथे गेलेच पाहिजे असे नाही, आणि त्याची इत्यंभूत माहिती असली पाहिजे असेही नाही. इंग्रजी सिनेमे बघायची आवड असल्याने त्या शहरांतली अनेक दृश्य मात्र अनेकवेळा पाहिलीयेत. माझ्या मते आपल्या सिनेमाची कथा एका प्रसिद्ध शहरात घडवणे यामागे त्या शहराची इमेज उसनी घेण्याचाही हेतू असावा. हॉलीवूडचे जवळपास सगळ्या सुपरहिरो किंवा फिक्शन चित्रपटांच्या कथा हटकून न्यू यॉर्कमधेच कशा घडतात, याचं मला कोडं आहे. कदाचित हे सुंदर शहर त्या व्हिलनने उद्व्हस्त केलेलं बघून आधी प्रेक्षकाला हळहळ वाटणार, मग हिरोने त्याला नष्ट केल्यावर एक प्रकारचा असुरी आनंद मिळणार, या सगळ्या ठरलेल्या क्लृप्त्या असाव्यात.
सुरुवात माझ्या प्रिय पुण्यापासूनच करणार आहे. महानगर म्हणून प्रसारण पावायला लागल्यापासून पुणं खरोखरच ‘पुणे तिथे काय उणे’ या दिशेने चालू लागलेलं आहे. खरंच, आज पुण्यात काय नाही? भूगोलात भूखंड जसा वाळवंट, पर्वत, सुपीक जमीन, जंगल वगैरे ‘फॅक्टर्स’ वरून ओळखला जातो, तसेच एका शहराचेसुद्धा  ‘फॅक्टर्स’ ठरलेले असतात. चौपदरी-सहापदरी रस्ते, उड्डाण पूल, गगनचुंबी इमारती, अंतर्गत वाहतूक सेवा (बस किंवा रेल्वे), इत्यादी. पण हे सगळं फक्त पुण्याने नव्याने गिळलेल्या उपनगरांत. खुद्द पुणे, ज्याला ‘गाव’ असंच म्हणतात, ते मात्र अनेक वर्ष तसंच आहे. अगदी स्वभावाने देखील! तिथल्या रस्त्यांना ‘रस्ते’ म्हणायचीच सोय नाही, तिथे चौपदरी कुठले आले? उड्डाण पूल घालायचा म्हटला तर दोन बाजूच्या दोन इमारतींत मावणारही नाही. आणि गगनचुंबी इमारती? गावातल्या इमारती तर अतिशय घनदाट जंगलातल्या, एकाच उंचीच्या, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी एकमेकांना ढकलत उभ्या राहणाऱ्या झाडांची आठवण करून देतात. पण असं असूनदेखील मला पुण्यातलं ‘गाव’ सगळ्यात जास्त आवडतं. त्याला कारणं बरीच आहेत. एक म्हणजे गावातलं कुठलंही ठिकाण कुठूनही ‘जवळ’च असतं. गावाबाहेर कार्स फिरवणारे लोक असतील, पण गावातला शाहणा माणूस गावातच जायचं असल्यास पायी जातो. अगदीच नदीपलीकडे वगैरे जायचं असल्यास कुरकुरत दुचाकी काढतो. सगळी ठिकाणं ‘जवळ’ असण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे सगळे लहान गल्लीबोळ. दहा मिनिटांत पोचायचं असल्यास या गल्ल्या बघाव्यात. दहा मिनिटंसुद्धा लागत नाहीत.        
शहरांची विस्तारक्षमता तशी आवडत असली, तरी स्वतःच्याच शहरात ती कधी-कधी नकोशी वाटते. पुण्यात एखादी ३०-३५ मजली इमारत उभी रहावी असं मला खूप वाटतं, पण ती प्रत्यक्ष पाहिल्यावर वाटतं की हे ‘आपलं’ पुणं वाटत नाही. मग मी गावात येतो, आणि जरा बरं वाटतं. पुण्यात इतर ठिकाणी कितीही ‘विकास’ झाला, तरी ‘गाव’ आहे तसंच राहील हा विश्वास वाटतो. म्हणूनच मला गावाचे एवढे आकर्षण असावे.
यानंतर मी माझ्या जगातल्या सर्वात आवडत्या शहराकडे वळणार आहे. (खरा पुणेकर कुठल्याही शहराला पुण्यापेक्षा वरचं स्थान कसं देऊ शकतो?? प्रश्न तत्वाचा आहे. असो.) म्हणूनच मी म्हणेन की ‘माझं आवडतं शहर’ हा मान पटकावण्यासाठी जे ‘नॉमिनीज’ आहेत, त्यांच्यात पुणे कशाला? इतर शहरं काळानुसार बदलतील, पण पुण्याचं स्थान असंच राहू दिलं जाईल. असं म्हटलं तर माझ्यातला पुणेकर, किंवा माझ्या आजूबाजूचे पुणेकर, शांत होतील. असो. परत पुण्याबद्दलच बोलत बसलो. आता ‘त्या’ शहराकडे वळतो.
‘लंडन’ हे माझं सर्वात आवडतं शहर आहे. ‘बिग बेन’ नावाच्या तिथल्या प्रसिद्ध घड्याळाने दोन टोले दिले की जसा आवाज होईल, तसाच आवाज या शहराचं नाव उच्चारल्यावर होतो, असं मला वाटतं. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असण्यात एक वेगळीच मजा असते, याचं शहरांच्या बाबतीतलं जिवंत उदाहरण म्हणजे लंडन. जुन्या, साधाच पण प्लेन आणि गुळगुळीत रंग दिलेल्या आणि चार मजल्यांच्या वर न जाणाऱ्या इमारती या एकाच शहराला शोभून दिसतात. लंडनच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा म्हणजे या इमारती. या डोळ्यात भरतील एवढ्या उंच नसल्या तरी लांबवर पसरलेल्या असतात. त्यांच्या साध्या  रंगाच्या कोरीव भिंतींत त्यांचं सौंदर्य दडलेलं आहे. त्यांच्या दारांना पांढऱ्याशुभ्र विटांनी केलेली कमान असते. आश्चर्य म्हणजे दोन-तीन शतकांपूर्वी बांधलेल्या या इमारती अजून तशाच सुंदर, आकर्षक आणि नव्याने वाढणाऱ्या गगनचुंबी इमारतींना तोंड देत उभ्या आहेत. पुण्याच्या ‘गावा’प्रमाणे लंडनच्या या इमारती त्याचा स्थायिभाव बनल्यात. इतर शहरांत त्यांना पाडून काचेच्या इमारती बांधण्यात येतात, पण लंडनच्या बाबतीत तर त्याच या शहराची खरी आकर्षणं आहेत. आता विस्ताराबरोबर काही गगनचुंबी इमारती आल्या, पण इथेही लंडनने आपलं वेगळेपण सिद्ध केलं. इतर शहरांत अशा इमारतींना त्यांच्या सौंदर्याला साजेशी अशी ‘भारी’ वाटणारी नावं दिली जातात. याचं एक उदाहरण म्हणजे न्यू यॉर्कची ‘एम्पायर स्टेट’ ही १०२ मजली इमारत. पण लंडनने मात्र हा नियम पाळला नाही. लंडनमध्ये आता तोंडल्याच्या आकाराची एक सुबक वर्तुळाकार इमारत आहे, आणि आश्चर्य म्हणजे तिचं नावही तेच आहे. ‘द घर्किन’ या तिच्या नावाचा शब्दशः अर्थ ‘तोंडले’ हाच होतो. तसंच दुसऱ्या एका नदीकिनारी असलेल्या काचेरी सुळक्याला ‘द शार्ड’ म्हणजे ‘काचेचा तुकडा’ हेच नाव आहे. ही सर्व माहिती मला एका प्रोग्रॅममधून कळली, आणि आवडलीही. त्यानंतर जगातला पहिला स्टॉक एक्स्चेंज तिथे सुरु झाला म्हटल्यावर काय? लंडन हे माझं सर्वात आवडतं शहर बनलं.
लंडन आवडण्याचं अजून एक कारण म्हणजे माझ्या काही आवडत्या कादंबऱ्यांच्या आणि टी.व्ही. शोजच्या कथा तिथेच घडतात. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी लंडनमधल्या ‘बेकर स्ट्रीट’ वर राहणाऱ्या शेरलॉक होम्स या अत्यंत लोकप्रिय गुप्तहेराने लंडनचे नाव काढले. त्यानंतर जवळपास एका शतकानंतर तिथल्या व्हाईटहॉलमध्ये जिम हॅकर या पात्राने आणि हम्फ्री आणि बर्नार्ड या त्याच्या सहाय्यकांनी(?) प्रशासन मंत्रालयात आणि लोकांच्या मनांवर राज्य केले. तीच कथा पुढे जाते तेव्हा जिम पंतप्रधान होऊन डाउनिंग स्ट्रीटवर जातो. स्थळ लंडनच! तिथूनच काही अंतरावर ‘ग्रेस ब्रदर्स’ या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी टी.व्ही.वरून, ‘आर यू बिईंग सर्व्हड्’ या मालिकेतून लोकांचे मन जिंकले. आणि याच सुमारास कधीतरी हॅरी पॉटर तिथल्याच ‘किंग्स क्रॉस’ स्टेशनवरून जादूच्या शाळेत गेला! गंमत म्हणजे, या सगळ्या कथा काल्पनिक, पण लंडन मात्र खरंखुरं! माझ्या मते या काल्पनिक गोष्टींना वास्तवाच्या जवळ आणण्यात आणि लोकांना त्या आपल्याशा वाटण्यात ते लंडन असण्याचा खूप मोठा वाटा आहे.
आता मी माझ्या अशाच एका आवडत्या शहराकडे वळणार आहे. याचा उल्लेख या लेखात आधी दोनचार वेळा झालेलाच आहे. काही उदाहरणं द्यायला हे शहर खूप उपयोगी पडतं. भारतात जशी काही मोठी शहरं प्रसिद्ध आहेत, तशीच अमेरिकेतही एकापेक्षा जास्त शहरं प्रसिद्ध आहेत. पण या सगळ्या शहरांमधलं सगळ्यात लोकप्रिय शहर म्हणजे न्यू यॉर्क सिटी! याच्या मूळ नावापुढे ‘सिटी’ हे जोडलंच पाहिजे, कारण स्वतः न्यू यॉर्क हे एक राज्य आहे, आणि ही ‘सिटी’ त्याची राजधानी नाहीये. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेल्या या सुप्रसिद्ध शहराला ‘द सिटी दॅट नेव्हर स्लिप्स’ असं म्हटलं जातं. खरं तर याला फारसा काही अर्थ नाही, कारण मोठ्या शहरात रात्रभर आपलं दुकान, हॉटेल किंवा आपल्या घरातले दिवे चालू ठेवणारा कमीत कमी एक तरी निघतोच. पृथ्वीच्या भोवती फिरणाऱ्या काही उपग्रहांनी रात्रीचे व्हिडिओ काढून, ते काही अॅप्समार्फत प्रसिद्ध केलेत. रात्री बाहेरून पृथ्वीकडे पाहिल्यास जमीन आणि समुद्र यांच्यातला फरक सहज कळत नाही, पण डोळे दिपवणाऱ्या छोट्या-छोट्या पिवळ्या बिंदूंनी आणि रेषांनी पृथ्वी नटलेली दिसते. जिथे अशा ठिपक्यांचा मोठा समूहच दिसतो, तिथे एक शहर आहे हे ओळखता येते. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर, अटलांटिक महासागराच्या वरच्या भागाजवळ एक असाच मोठ्ठा समूह होता. ते ठिपके इतके चिकटून होते, की तो पाण्यात पडलेल्या सोन्याच्या एका तुकड्यासारखाच दिसत होता. ते न्यू यॉर्क होते.                                
न्यू यॉर्कच्या सौंदर्याचा आजवर अनेक दिग्दर्शकांनी सहज वापर केला. लोकप्रिय कार्यक्रम आणि सिनेमांद्वारे लंडन हे जसं शांत, सुखी आयुष्याचं शहर म्हणून दाखवलं जातं, तसंच हॉलीवूडच्या बऱ्याच सिनेमांतून न्यू यॉर्क हे धकाधकीच्या आयुष्याचं प्रतिक बनवलं गेलंय. जगातला सर्वात लोकप्रिय सुपरहिरो, म्हणजेच स्पायडरमॅन, हा न्यू यॉर्कचाच रहिवासी असतो. ‘मेन इन ब्लॅक’ या पराग्रहवासियांशी संबंध ठेवणाऱ्या गुप्त संघटनेचं मुख्यालय न्यू यॉर्कमध्ये असतं. ‘द डे आफ्टर टुमारो’ या सिनेमात सगळ्या पृथ्वीवर बर्फाळ वादळ येता, पण हे लोक फक्त स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा बुडताना दाखवत बसतात.  बॅटमॅनच्या काल्पनिक आयुष्यावर काढलेल्या सगळ्या सिनेमांत ‘द डार्क नाईट’ चे तीन सिनेमे सर्वात लोकप्रिय आहेत. ‘गॉथम’ नावाच्या एका काल्पनिक शहरात ही सगळी कथा घडते. Computer graphics वापरून एवढं खऱ्यासारखं वाटणारं शहर कसं केलं असेल, असा प्रश्न जेव्हा मी बाबांना विचारला, तेव्हा त्यांनी सांगितलं की या तीनही सिनेमांचं शूटिंग न्यू यॉर्कमध्येच झालं आहे! वरच्या एका परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे ‘शहराची इमेज उसनी’ घेण्याचं हे एक उदाहरण. कथेतल्या तपशीलानुसार गॉथम हे अमेरिकेतलं सगळ्यात महत्वाचं, आणि आकर्षक शहर असतं. आणि अशा शहराचा सेट म्हणून त्यांनी न्यू यॉर्कला निवडलं. यावरून एक कळतं, की न्यू यॉर्कशी फक्त ते स्वतःच बरोबरी करू शकतं, हे सगळ्यांनाच मान्य आहे!
आता मी परत भारतात येणार आहे. लहानपणी मला भारताला दोन राजधान्या आहेत असं वाटायचं. दिल्ली नुसतीच राजधानी आणि मुंबई आर्थिक राजधानी हे मला ‘अर्थ’ शब्दाचा अर्थ कळायच्या आधीपासून माहित होतं. तेव्हा मी त्याचा अर्थ मुंबई जास्त भारी असा घ्यायचो. नंतर अजून थोडा तपशील कळल्यावर महाराष्ट्राची राजधानी अगदी त्याच्या पश्चिम टोकाला का आहे, असं मला कोडं होतं. आणि तोच प्रश्न अजूनही मला पडतो. मुंबई हे शहर म्हणूनच का राहू शकत नाही? हल्ली मुंबई भारतातलं सर्वात सुंदर शहर आहे असं ‘लोक’ म्हणतात. गगनचुंबी इमारती, अगदी व्याख्येनुसार ४०पेक्षा जास्त मजले असणाऱ्या इमारती पहिल्यांदा तिथे आल्या, आणि अजूनही येताहेत. वरच्या एका परीच्छेदात ज्या ‘फॅक्टर्स’चा उल्लेख केला आहे, त्यानुसार बेंगळूरू मुंबईशी बरोबरी करू शकतं. पण एक असा फॅक्टर आहे ज्यामुळे मुंबई वरच राहील, आणि कदाचित चेन्नई तिच्याशी बरोबरी करू बघेल. तो म्हणजे समुद्रकिनारा! जगातली बहुसंख्य सुंदर, आकर्षक अशी शहरं समुद्रकिनाऱ्यावर वसलेली असतात. याचं कारण म्हणजे समुद्रातून जेव्हापासून व्यापार होत आहे  तेव्हापासून ह्या शहरांचा विकास होत आहे आणि तो असाच चालू राहणार आहे. याला अपवाद म्हणजे अमेरिकेतली लास व्हेगास आणि शिकागो. लास व्हेगासचं जाऊ दे. ते वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे. आणि शिकागोसुद्धा समुद्राजवळ नसलं तरी तिथल्या प्रचंड सरोवराच्या काठावर आहे. असो. मुंबईच्या मनोहर दृष्यांतली बरीचशी ‘मरीन ड्राईव्ह’ वरून पाहिलेली असतात.
मुंबई इतक्या जवळ असून ते मी अजून पूर्णपणे पाहिलं नाहीये. एकदा हिमाचल प्रदेशात ट्रीपला जायला मुंबईच्या एका रेल्वे स्टेशनवरून गेलो होतो, तेव्हा मुंबईचं ओझरतं दर्शन घडलं होतं. मुंबईला ट्रीप काढली तर पाहू अशी माझी काही ठरलेली ठिकाणं आहेत. लोक मुंबईला कायकाय बघायला जातात मला माहित नाही. माझी आपली रिझर्व बँक पाहायची बालिश इच्छा आहे. आता तिची इमारत इतर मोठ्या बँकांच्या इमारतींसारखीच असणार, पण तरी तिथे नोटा छापतात हा तपशील माहित असल्यामुळे जरा उत्सुकता वाटेल. माझ्या काही इतर आवडीनिवडींचं ‘मुख्यालय’ मुंबईत असल्याने त्यांना भेट द्यायचीही इच्छा आहे. काही लोकांना मुंबईत त्यांच्या आवडत्या नटनट्यांची घरं दुरून बघितल्यावर जो हर्ष होत असेल तोच मला बी.एस.ई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) ची भव्य इमारत बघितल्यावर होईल. काही दिवसांपूर्वी एन.एस.ई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) दिल्लीत आहे अशी माझी समजूत होती. त्यामुळे दिल्लीला जरा भाव मिळत होता. तेसुद्धा मुंबईतच आहे, असं परवाच कळलं. याचे परिणाम सांगणे नलगे.

आता एका शेवटच्या शहराबद्दल थोडसं. या शहराबद्दल, मला कबूल केलं पाहिजे, या पाचांपैकी सर्वात कमी माहिती आहे. या शहराची काही दृश्य मनात इतकी भरली की एक छंद म्हणून खेळण्यातल्या विटांच्या संचापासून मी काल्पनिक शहराची निर्मिती करू लागलो तेव्हा मला वाटत होतं, कि माझं हे शहर असावं तर या शहरासारखं! तो फावल्या वेळातला छंद कधीच मागे पडला, पण आजही माझ्या आवडत्या शहरांच्या यादीत हे शहर आहे. आता तो मान्यताप्राप्त देश झाला आहे, पण एका शहराचे गुण बदलत नाहीत. फारतर त्याच्यात राजकीय कारभाराच्या पायाभूत सुविधा आल्या असतील. इथे हे शहर स्वतःचीच राजधानी असल्याने त्यांचा इमेजला उपद्रव होत नसावा. आणि खरंच, काय इमेज आहे त्या शहराची! आज प्रत्येक मोठ्या देशाचे या शहराशी संबंध असतातच. आणि का नसावेत? हे शहर आशियाचीच नाही, तर आख्ख्या पूर्वेची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. आता लक्षात आलंच असेल, की हे शहर, हा देश म्हणजेच चीनच्या दक्षिण किनाऱ्यावरचा २००हून अधिक छोट्या-छोट्या बेटांचा समूह : हाँग काँग!
शहरांना एकूणच ‘काँक्रिटचं जंगल’ असं एक जगमान्य नाव आहे. लोक ते तुच्छतेने आणि कौतुकाने, या दोन्ही प्रकारे वापरतात. हाँग काँगला मात्र त्यापेक्षा ‘काचेचं जंगल’ म्हटलं तर जास्त योग्य होईल. हाँग काँगच्या मुख्य बेटांवरच्या औद्योगिक इमारती पूर्णतः काचेने मढलेल्या आणि सूर्यप्रकाशात तळपत असतात. हाँग काँगचं वैशिष्ट्य हे, की दिवसाच्या कुठल्याही वेळी, अगदी रात्रीही, ते शहर कुठूनही बघितलं तरी सुंदर दिसतं. लंडनमध्ये लख्ख सूर्यप्रकाश फार क्वचित असल्याने तो पसरल्यावर ते वेगळंच, अनोळखीदेखील वाटतं. एरवी त्याच्या जुन्या इमारती धुक्यात आणि पावसाळी हवेतच छान दिसतात. न्यू यॉर्क पहाटे खूप सुंदर दिसतं. पण धुकं पडलं कि तिथे एवढी मजा येत नाही. हाँग काँगला मात्र सर्व प्रकारच्या हवेत ते प्रचंड काचेचे सुळके शोभून दिसतात. मी जर कुठेच गेलो नाही तर………. असा प्रश्न पडू देऊ नका. हल्ली इंटरनेटमुळे असे फोटो बघता येतात. पण फोटोतून खरं नेत्रसुख घेता येत नाही, हे खरंच. म्हणूनच माझी हाँग काँगला जायची लंडनइतकीच आणि न्यू यॉर्कपेक्षा जरा जास्तच इच्छा आहे.                                          
                                                                                      

असो. शहरांबद्दल खूप बोलणं झालं. शहराच्या मला असलेल्या आकर्षणामुळे मला ही माहिती गोळा करायची हौस होती. मी माझ्या आवडत्या शहरांबद्दल काहीतरी लिहायला उत्सुक होतो, आणि त्या इच्छेतूनच हे ‘स्थानमाहात्म्य’ तयार झालं. इतर अनेक शहरं त्यांचे फोटो बघून आवडतात, पण आपलं म्हणून पुणे, देशाचं लाडकं म्हणून मुंबई, जगाचं लाडकं म्हणून न्यू यॉर्क, शहराचं वय धरलं तर सगळ्यात वृद्ध पण आजही तितकंच दिलखेचक असल्यामुळे लंडन, आणि या पाचांपैकी सर्वात सुंदर म्हणून हाँग काँग हे मात्र माझ्या हृदयात कायमचं स्थान मिळवून आहेत. हृदयात भरपूर जागा असते, ही एक आनंदाची गोष्ट!      


Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प