किमया
परवा मी असा विचार करत होतो, की जीविताचा स्थायीभाव काय असावा. यात गोंधळून जाण्यासारखं काही नाही; मी कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान घेतलंय. कुणी म्हणेल, की जीव हाच स्थायीभाव असणार. यच्चयावत सर्व जीवितांची ‘जिवंत राहणे’ हीच समान क्रिया असू शकते, बाकीच्या सगळ्या क्रिया जीवितानुसार बदलतात. पण मग असे वाटले की जर जीवितावस्थेत राहणे हा एक कॉमन फॅक्टर असेल, तर निर्जीवावस्थेत राहणे हासुद्धा का नाही असू शकत? आपण आणि इतर सगळ्या प्राण्यांमध्ये आता कॉमन काही उरलं असेल, तर आपण सगळे झोपतो, हे सत्य! इथे कबूल करावेसे वाटते की मी आधी झोपण्याचा विचार करून मग त्याला ही सगळी पार्श्वभूमी जोडली. पण काय करणार, विषय उलगडत नेण्याचा मोह आवरत नाही.
कोणी म्हणेल की झोपेबद्दल लिहिणं म्हणजे खाण्याबद्दल लिहिण्यासारखं आहे. त्याबद्दल एवढा सखोल विचार केला काय, किंवा त्याकडे दुर्लक्ष केले काय, आपण पोटातल्या कावळ्यांना आणि तोंडातल्या जांभयांना आवरू शकत नाही. माझ्या मते तरी आपल्या आवडत्या पदार्थांवर कुणाचाही डोळा चुकवावा न लागता ताव मारण्यापेक्षाही झोपणे जास्त सुखावह आहे. (कदाचित मी कधी खरोखरच तसे केले तर माझं मत बदलेल, काय सांगावं? खांदे उडवणारा इमोजी कुठे गेला?)
शरीराने झोप म्हटले की मी झोपत असल्याने माझ्या या विधानांवर कदाचित आक्षेप घेतला जाईल. अगदी लहानपणापासून मला दुपारी झोपायला लावायचे आईचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. माझी शाळा सकाळची होती; मी जेवायला घरी येत असे. मग त्यानंतर झोपण्याला काही हरकत नव्हती, यावर आई ठाम होती. पण मला जेवण झाल्यावर झोपायच्या ऐवजी होमवर्क करत बसलेला पाहून, मी बिघडल्याचं बाबांना मनापासून दुःख व्हायचं. सलग पाच दिवस ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यावर त्यांना शनिवार आणि रविवार दुपारच्या झोपेचं खूप अप्रूप वाटत असावं. अर्थशास्त्रात मागणीच्या तुलनेत पुरवठा खूप जास्त असला की किंमत कमी होते, हे पहिल्यांदा शिकलो तेव्हा माझ्या मनात हेच दुपारी झोपण्याचं उदाहरण आलं होतं. आता रात्री जागरण केल्याशिवाय मला जन्मात दुपारी झोप लागणार नाही, हे चांगलं आहे का वाईट कुणास ठाऊक.
जागरणावरून आठवलं. एरवी गादीवर अंग टाकून, दिवा मालवून झोप यायची वाट बघण्याची सवय असताना, रात्री उशिरापर्यंत जागं असताना ती आपोआप येण्याचा अनुभव खास असतो. आम्ही बऱ्याचदा रात्री पत्ते (म्हणजे कनास्ताच) खेळायला जागायचो. विशेषतः एरवीपेक्षा जास्त, ‘दुर्मिळ’ नातेवाईक आलेले असताना मोकळा वेळ पत्ते खेळण्यासाठीचा आहे हा सर्वमान्य नियम असे. दिवसा सगळे आपापल्या कामात, पण रात्री प्रत्येकजण मोकळा. अशा वेळी, प्रत्येक क्षण धरून ठेवावासा वाटत असताना, झोप आली की खूप चीड यायची. पण तेव्हा नाही; दुसऱ्या दिवशी सकाळी. सगळं अकस्मात घडतं. डाव चालू असतो, मग काही क्षण आपल्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. काय होतंय ते लक्षात आल्याक्षणी आपण डोळे उघडतो. शेजारचा भिडू उगीचच हसत बसलेला पाहून मधल्या वेळात त्याने आपली पाने पाहिली हे आपल्या लक्षात येतं. मग वैतागून आपण पुन्हा एकाग्रतेने खेळू लागतो. पण दोन तीन वेळा असं झाल्यावर आपली जिंकण्याची इच्छाच नष्ट होते. ‘आता हे काय म्हणतील’ हा विचार मनाला शिवायच्या आत ‘मरू देत’ म्हणून त्याला उडवले जाते. इतका वेळ घालून ठेवलेली मांडी हळूच मोडली जाते आणि शेजारीच एखादा आधार शोधून आपण त्याकडे झुकायला लागतो..............
दुसऱ्या दिवशी सकाळी आपण घरात एकटेच मूर्खासारखे जागे असतो. मग काय घडलं ते आठवायचा प्रयत्न करतो. छे, झोप नव्हती लागली मला. मी तर खेळ संपेपर्यंत खेळत होतो. ज्या डावात शेजारच्याने पाने पहिली त्याच्या पुढच्या डावात माझ्या टीमने खाली पडेल ते प्रत्येक पान उचलून ते आपल्या ‘इस्टेट’ला जोडत नेऊन स्कोअर अशक्य वाढवला होता. तेव्हाच दोन्ही टीमच्या स्कोअरमध्ये हजार पॉईंट्सचं अंतर असताना पुढचा डाव सुरु झाला होता आणि त्यात माझा हँड कनास्ता होऊन आमची टीम अजून हजार पॉईंट वर सरकली होती. त्यानंतरच्या डावात दुसऱ्या टीमला धरून बुडवण्यात आलं होतं आणि तिथे सर्वांनुमते खेळ संपवला होता. ‘मॅन ऑफ द मॅच’ने सगळ्यांसाठी कॉफी करायचा प्रस्ताव मी विजयाच्या आनंदात मान्य केला होता. मला हेच सगळं आठवत होतं, पण मग मनाने केलेल्या खोड्या लक्षात येऊन मी ते कुणासमोर बोललो नव्हतो.
मला स्वप्न हा प्रकार अतिशय कुतूहलजनक वाटतो. आपण जागेपणी जे अनुभवू शकत नाही, ते काय असेल ते ओळखून त्याचा आभास निर्माण करणं आपल्या मेंदूला कसं जमत असेल? याला कदाचित विज्ञानात उत्तरं असतील. पण ती मिळवण्यापेक्षा मला ते कुतूहलच राहिलेलं आवडेल. जादू अनुभवण्याचा हा आपला एक हक्काचा मार्ग आहे, आणि जादूचं आकर्षण तिच्यामागचं कारण न कळण्यात आहे, नाही का?
मध्ये एका सिनेमात असं पाहिलं की एक चोर दुसऱ्याला सावध करताना म्हणतोय की त्या तिजोरीच्या रक्षकापासून त्याने सावध राहिलं पाहिजे, कारण तो जरी ड्यूटीवर घोरत असला तरी मागे एका मारामारीत त्याने त्याच्या पापण्या गमावल्यामुळे........ आता इथे हे फक्त सिनेमातच घडू शकतं हे पटतं. पण मला प्रश्न पडला, की खरोखरच कुणाला पापण्याच नसतील, तर तो झोपूच कसा शकत असेल? कदाचित डोळे बंद होण्याचा झोपण्याशी फार कमी संबंध असेल. पण स्वप्न? समोरच्या दृश्याचा अर्थ लावण्याच्या कामातून मेंदूची सुटका झाली की मग तो खोट्या प्रतिमा निर्माण करून स्वप्न दाखवू शकतो, नाही का? पण इथे तर डोळे कायम उघडे, आणि मेंदू चोवीस तास समोरच्याचाच अर्थ लावत बसणार. शिवाय त्या माणसाचं काय? आपण झोपलोय, तरी समोरचं सगळं दिसतंय, ही किती विचित्र परिस्थिती होईल? नंतर असा तर्क केला की पापण्या या फक्त बाहेरून डोळ्यांवर आघात होऊ नये म्हणून असतात. आतमध्ये डोळ्यांना स्वीच ऑफ करायची काहीतरी यंत्रणा असावी. हेच पटण्यासारखं होतं, कारण आपल्या शरीराची रचना ज्या निसर्गाने इतक्या हुशारीने केली आहे, तो इतकी महत्वाची संवेदना बंद करायला केवळ एका ‘शटर’वर विसंबून राहील, हे पटत नाही.
आपल्या सुप्त इच्छा आपल्याला स्वप्नात पूर्ण होताना दिसतात, अशी एक थिअरी आहे. खरं तर मला अशा थिअरी काढणाऱ्यांना ‘दुसरी कामं नाहीत का’ असं सरळ विचारावंसं वाटतं. उगीच स्वप्नासारख्या किमयेला विज्ञानाच्या नियमात बांधायला बघतात. आधी इच्छा म्हणजे नक्की काय ते सांगा म्हणावं! ‘इन्सेप्शन’ नावाच्या एका अवर्णनीय सिनेमात त्यांनी स्वप्न हा मनाचा दरवाजा, किंवा मनाचं स्वतःचं जग असतं असं म्हटलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार आपलं मन स्वप्नात एक वेगळं जग एकाच वेळी तयारही करत असतं आणि पाहतही असतं. यात आपण एखादी तिजोरी, किंवा बँक वगैरे अतिसुरक्षा असलेल्या वास्तू निर्माण केल्या, तर मन त्यात आपोआप गुप्त माहिती भरून ठेवतं, आणि ती जाऊन चोरणाऱ्यांची त्या सिनेमात कथा आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वप्न आपण त्यात असताना, खरीच भासतात. आपण उठल्यावर आपल्याला ते स्वप्न होतं हे कळतं. ज्यांना आपली स्वप्न आठवतात ते हे कबूल करतील, की स्वप्नात आपण जागेच असतो आणि आजूबाजूचं सगळं पाहतच नाही, तर अनुभवतही असतो.
‘इन्सेप्शन’ चा विषय निघालाच आहे, तर त्यात त्यांनी हीही कल्पना वापरली आहे की स्वप्नात आपण मेलो तर खऱ्या जगात आपल्याला जाग येते. तसंच जोरात हादरा बसला तरीही हेच होतं. आपल्याला पडलेली स्वप्नं आठवून पहिली तर आपल्याला हेही पटतं. मी माझ्या स्वप्नात कैक वेळा घसरून पडलोय. अगदी रस्त्यावर पडलेल्या तेलावर घसरून ते उंच इमारतीच्या गच्चीवरून, आणि या ‘रेंज’मधल्या सगळ्या प्रकारे. खाली पडलो की जाग येते हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय. काय घडत असेल? कदाचित आपला मेंदू आपल्याला दाखवत असलेल्या घटनेत इतका गुंततो की त्याला तेच खरं वाटायला लागतं. आपल्यालाही नसतं का वाटत? मग असं काहीतरी घडलं की तो गडबडतो आणि लगेच आपल्या सगळ्या इंद्रियांना जागं करतो. घसरून खाली पडणं ही एक anomaly असते ना, म्हणून तिचा अर्थ लावायला त्याला इंद्रियांची मदत लागत असेल. कशावर पडलो ते समजायला डोळे आणि नाक, आजूबाजूच्या लोकांचं हसणं ऐकायला कान (पडण्याच्या कृतीचा हा एक अविभाज्य भाग आहे), वेदना जाणवायला त्वचा आणि शिवी द्यायला तोंड......... असं सगळं असावं. पण जाग आल्यावर मेंदूला दिसतो समोरचा बिछाना, आजूबाजूचा अंधार आणि काय घडलं ते त्याच्या लक्षात येतं. ‘स्वप्नच होतं ते’ अशी आपली समजूत काढत तो आपल्याला झोपवतो; मग स्वतः झोपतो. आणि बाकीची इंद्रियंही ‘या मेंदूला स्वप्न आणि वास्तव यातला फरक कधी कळणार’ वगैरे विषयांवर गुरगुर करत परत झोपी जातात.
स्वप्नांचे चांगलं स्वप्न आणि वाईट स्वप्न हे दोन ठरलेले प्रकार. दोन्ही व्यक्तिसापेक्ष असल्याने त्यांची व्याख्या करणं अवघड आहे, पण करायचीच असेल तर एवढीच करता येईल. ज्या स्वप्नातून आपल्याला जाग आल्यावर अतिशय दुःख होतं ते चांगलं स्वप्न, आणि व्हाइस व्हर्सा! मी दोन्ही बाबतीत हा अनुभव घेतलाय. दुःखात बुडून जात असताना आणि सुखाच्या सर्वोच्च शिखरावर असताना डोळे उघडतात. स्वप्न चांगलं असो वा वाईट, सगळ्या घटना घडून गेल्यावर, एक निष्कर्ष निघाल्यावर ते संपलं असं कधीच होत नाही. ते नेहमी क्लायमॅक्सलाच तुटतं. एखादा अद्भुत सिनेमा संपल्यानंतर लोक अगदी सगळी ‘क्रेडिट्स’ संपेपर्यंत मंत्रमुग्ध होऊन बसलेले असतात, आणि इथे हे असं. तीच गत सुरुवातीची. “तुला कुठल्या स्वप्नाची सुरुवात आठवत नाही ना? तू नेहमी घडतंय त्याच्या मध्येच जाऊन टपकतेस ना?” ‘इन्सेप्शन’चा नायक नायिकेला विचारत होता. माझ्या कल्पनेनुसार एका समांतर विश्वात घटनांची एक साखळी चालू असते, आणि एका स्वप्नात आपल्याला त्याचा एक भाग पाहायला मिळतो. आपण सिनेमाचे प्रोमो बघतो तसंच. फक्त याचा सिनेमा कधी पाहता येणार नाही, पण तो पाहायची इच्छाही नसते. प्रोमोने जी उत्सुकता आणि कुतूहल जागं केलेलं असतं, ते तसंच ठेवण्यात एक वेगळीच मजा असते. माझी अशी इच्छा आहे की ही अशी स्वप्न कधी पूर्ण होऊ नयेत. नाहीतर आपण त्यांचा अर्थ लावायचा किंवा त्यातून बोध घ्यायचा प्रयत्न करू आणि त्याची जादू हरवून जाईल.
पण ही जादू काही फक्त त्या स्वप्नाशी निगडित नसते; त्याला आजूबाजूचं वातावरणही कारणीभूत असतं. रोजच्या आपल्या कामाच्या, जबाबदाऱ्यांच्या आणि सगळ्या चिंता-काळज्यांच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाणारी ती जादू रात्रीतच असावी. कधी रात्री नुसतेच जागे राहिलो तरी आपल्याला याची प्रचिती येते. याचं कारण कदाचित हे असेल की रात्री जागणं हे आपल्याला ठरवून दिलेल्या दिवस-रात्रीच्या चक्राचं उल्लंघन आहे. The most unexpected and unusual things are experienced when one behaves as one is not supposed to. (नाही, हे इन्सेप्शनमधलं वाक्य नाहीये; माझं आहे) याबाबतीत माझ्याकडे एकच लक्षात ठेवण्यासारखा अनुभव आहे. आमच्या कॉलेजच्या ग्रुपचं एका सदस्याच्या घरी रात्री जमायचं ठरलं होतं. रात्रीचं जेवण झाल्यानंतर, त्या सदस्याचे आईवडील (एकदाचे) झोपायला गेल्यावर आम्ही जागायला सुरुवात केली. अशा वेळी वेळ कसा घालवायचा हा एक प्रश्न नसतो, हाही जागरणाचा फायदा. विषय सापडले तर गप्पा मारायच्या, नाहीतर गाद्या घातलेल्या आहेतच असा सुज्ञ विचार प्रत्येकाच्या मनात येतो. पण त्या रात्री बोलायला भरपूर विषय निघाले. आणि एरवी काही पर्सनल विषय निघाले की संभाषणाची गाडी तिथून होमवर्क आणि ‘बस चुकली’ वगैरे तत्सम रुळांवर आणून ठेवणारे माझे सोबती तेव्हा मात्र अगदी मोकळेपणाने व्यक्त होत होते. कॉलेजमध्ये एक वर्ष सोबत काढून जेवढी झाली नव्हती तेवढी एकमेकांची ओळख आम्हाला तेव्हा झाली. एरवी मी अशा प्रसंगी स्वतःला चिमटा काढून मुद्दाम जोरात ओरडलो असतो, पण त्या वेळी झोपेत चालणाऱ्या व्यक्तीप्रमाणे मीही ऐकत आणि बोलत बसलो होतो. त्या रात्री आम्ही सगळे भावनिक पातळीवर जवळ आलो, आणि त्यानंतर कायम सोबत असताना एक वेगळीच जाणीव असे. लहानपणी एका काल्पनिक गुप्तहेर संघटनेचे सदस्य होऊन त्याचे बॅज लावून फिरण्यात जसं भारी वाटायचं, तसंच. एरवी काहीही बोलताना दोनदा विचार करणारे आपण अशा प्रसंगी तसं करत नाही, कारण जगाचं इकडे लक्ष नसल्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटतं. थोडक्यात, रात्रीच्या वेळी दिवस दिसते त्यापेक्षा वेगळे काही अनुभवायचे असेल, तर डोळे मिटलेच पाहिजेत असं काही नसतं.
स्वप्नांवर विवेचन करण्यासाठी इन्सेप्शन प्रसिद्ध आहेच, पण त्याशिवाय त्या कथेत एक अंतःप्रवाह वाहत असतो. तो म्हणजे, आपलं हे आयुष्य एक स्वप्नच असेल तर? स्वप्नाप्रमाणेच ते अद्भुत आहे, अतर्क्य आहे, आणि कधी त्रासदायक तर कधी सुखावह आहे. मला कधीकधी या कल्पनेवर विचार करायला आवडतो. ‘स्वप्नांच्या जगात राहून वास्तव विसरून जाणं ही चांगली गोष्ट नव्हे’ असं हॅरी पॉटर कथेतील डम्बलडोर या बुद्धिमान वृद्ध जादूगाराचं म्हणणं होतं. पण वास्तव हेच एक स्वप्न असेल तर? कधीकधी हीच कल्पना उलटी करावीशी वाटते. आपल्या स्वप्नात आपण झोपलो तर काय होत असेल? मग आपल्याला आधी स्वप्नात उठून मग इथे उठावं लागत असेल का? शेवटी आपण या निष्कर्षावर येऊन पोहोचतो, की जीवन हे अंतिम स्वप्न आहे. इन्सेप्शननुसार, इथे मरण पावल्यावर आपण कुठेतरी जागे होणार असू, तर? तर तेव्हा जाग आल्यावर आपल्याला अतिशय दुःख होईल, असं जीवन जगूया! गुड नाईट!
Can't get enough of dreams? Me neither! Let's just go to K2
Can't get enough of dreams? Me neither! Let's just go to K2
mast majkur
ReplyDelete