आमचा Family Sport
माझा मित्र एका बाबतीत सारखा माझ्या मागे लागलेला असतो. ती म्हणजे मी एक चांगला ‘स्पोर्ट’ ‘सिलेक्ट’ करून तो ‘सिरिअसली’ खेळावा. का, तर म्हणे कारण त्याला त्याच्या तर्जनी व अंगठ्यात माझं मनगट धरता येतं. त्यात काय, मलाही येतं असं मी म्हटल्यावर तो खरोखरच डिप्रेस्ड झाला होता. दोन क्षणांपुरता. मग त्याच्यात परत तो जोम आला व त्याने खेळाचं महत्व वगैरे मला पटवून दिलं. तो चक्क आमच्या शाळेच्या टीचरांसारखाच बोलत होता, म्हणून मी गप्प बसलो. मग जी गोष्ट मी टीचरना सांगू इच्छित होतो ती मी त्याला ऐकवली. ती म्हणजे, ‘सक्ती हा कलेचा शत्रू आहे. मग तो खेळाचा का नसावा?’
पण तो काही माझा पिच्छा सोडायला तयार नव्हता. माझा आवडता खेळ मला खेळायला लावावा, म्हणून त्याने तो कुठला ते विचारलं. मी फुटबॉल सांगितलं, जो मी बऱ्यापैकी खेळू शकतो. मग त्याने विचारलं कि माझा फॅमिली स्पोर्ट कोणता. म्हणजे जर माझ्या ‘ फॅमिली’त तो बऱ्याच जणांना चांगला येत असेल, तर मलाही तो येईल असे त्याला वाटले असावे. काही चूक नाही त्यात. मी बॅडमिंटन म्हणेन अशी त्याची अपेक्षा असावी. कारण मी तो छान खेळतो, माझे बाबाही छान खेळतात, आईलाही चांगला जमतो व माझी बहीण मुक्ता माझ्याच बॅडमिंटन क्लासला यायची हे त्याला ठाऊक होते. मीही तेच म्हणणार होतो, पण तेवढ्यात एक जास्त भारी उत्तर मला सुचलं, जे मी अभिमानाने त्याच्या तोंडावर फेकलं: “पत्ते!”
हेरंब, माझी होपलेस केस आहे असा चेहरा करून गेला. त्यानंतर त्याने मला पुन्हा कधी यावरून सतावले नाही, पण काही म्हणा, पत्ते हा आमचा फॅमिली स्पोर्ट आहे खरा!
तरी बरं की हेरंब हा काही अॅव्हरेज माणसासारखा पूर्वग्रहदुषित नाही. असे लोक पत्ते खेळणं पाप समजतात. त्यांच्या लेखी पत्ते म्हणजे जुगार. हे १००% असत्य आहे. पत्तेच काय, कोणत्याही खेळात पैसा किंवा चुरस शिरली की खेळण्याची मजा हरवते. तसंही जुगार सोडून इतर अनेक खेळ असतात हे या लोकांच्या गावीच नाही. पण हेरंब मात्र तसा नाही. त्यालाही काही चांगले, ‘उच्चभ्रू’ पत्त्यातले खेळ येतात. पण पत्ते हा आमचा फॅमिली स्पोर्ट आहे हे मात्र त्याला पटते.
माझ्या लेखी आमच्या घरी पत्ते खेळण्याची परंपरा एका अर्थी माझ्या आजीपासून सुरु होते. आजतागायत जे खेळ मी खेळलेत, पाहिलेत अथवा ऐकलेत त्या सर्वांशी तिचा नुसता परिचयच नाही तर घनिष्ठ संबंधही आहे (अर्थात जुगाराचे ते गलिच्छ खेळ सोडून). आजही आम्ही सगळे पत्ते खेळतो ते तिच्या नियमांनुसार. गमतीची गोष्ट अशी, कि ती स्वतः बॅडमिंटनमध्ये नॅशनल लेव्हलला जाऊन आली होती. म्हणजेच माझा आवडता खेळ बॅडमिंटन असता तरी त्यातील माझे आदर्शाचे स्थान तिचेच असते. मला तरी तिच्या पत्त्यांतल्या कौशल्याचा अभिमान अधिक आहे बुवा.
पत्त्यांमध्ये एक वेगळीच मजा असते. एक म्हणजे पत्त्यांतील सर्व खेळ त्याच बावन्न पानांत फिरतात. बदाम, इस्पीक, चौकट, किलवर हा ठरलेला पॅटर्न आहे. आजपर्यंत एका खेळाचे साहित्य दुसऱ्या खेळाला चाललेले मला तरी आठवत नाही, कारण ते साहित्य मुळी त्या खेळासाठीच बनवण्यात आलेले असते. एक अपवाद म्हणजे टेनिसचा बॉल; त्याचे क्रिकेटच्या इतर साहित्याशी उत्तम जुळते. तसा फुटबॉलसुद्धा टेनिसच्या अगर रबरी बॉलने खेळता येतो, पण ती अगदीच हलाखीची परिस्थिती असल्याची खूण झाली. मग त्याच्यात आणि रस्त्याने जाताना रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या लाथाडण्यात काही फरक उरत नाही.
या मैदानी खेळांत साहित्य जसे महत्वाचे तसे मैदानही. क्रिकेट व फुटबॉलला, सपाट म्हणजे सपाट म्हणजे सपाटच जमीन लागते. बॅडमिंटन व टेनिसला शिवाय नेटचीही अट असते. बास्केटबॉलची बास्केट अधांतरीच ठेवावी लागत असल्याने त्यासाठी लागणाऱ्या साहित्यात वाढ होते. परंतु पत्त्यांना अशी कुठलीच अट नसते. एक चांगली मोठी सतरंजी, पत्त्यांचे कॅट आणि सर्वांना बसायला (खरं तर पसरायला) भरपूर जागा एवढ्यावर पत्त्यांचा अड्डा जमू शकतो. चिवडा वगैरे असेल तर उत्तमच. (तसे सतरंजीऐवजी टेबलही चालते, पण त्यामुळे वातावरण निष्कारण फ़ॉर्मल होते असे आमचे प्रामाणिक मत आहे!)
पत्ते खेळणं म्हणजे आपली तर्कपद्धती व हुशारी सिद्ध करणेच होय. कारण पत्त्यांतील सर्व खेळांना सतत डोकं चालवावं लागतं. ही अट बहुतेक मैदानी खेळांना नसते. पण क्रिकेटला डोकं लागत नाही असं मात्र मी म्हणणार नाही, कारण नियमांसकट तो अत्यंत किचकट खेळ आहे. शिवाय मी असं म्हटलं तर माझे मित्र एकतर मला बडवतील नाहीतर ‘वत्सा, तू दुनिया जाणली नाहीस’ असे काहीतरी बोलून माझी बोळवण करतील तो भाग वेगळा! पण तसं म्हणण्याइतका काही मी ‘वत्स’ नाही. पण हातात बॅट व बॉल असेल, सोबत मित्र असतील व बराच वेळ असेल, तर कोणीही क्रिकेट खेळू शकेल. कदाचित अगदी उत्तम नाही, पण बऱ्यापैकी खेळू शकेल. पत्त्यात मात्र हातात पत्ते घेऊन शुंभासारखे बसून राहिलात तर पुढच्या डावाला आउट व्हाल हे नक्की!
पत्त्यांतील खेळांचे मी माझ्या परीने तीन गट केलेत. ते म्हणजे खालच्या दर्जाचे, मध्यम व वरच्या दर्जाचे खेळ. दर्जा हा तो खेळ खेळण्यास आवश्यक असलेल्या बुद्धिमत्तेवरुन ठरतो, तसेच खेळ जितका अवघड तितका त्याचा दर्जा वरचा. म्हणून भिकार-सावकार, पेनल्टी, गुलामचोर वगैरे खेळ खालच्या दर्जाचे. ब्लॅकजॅक, पोकर वगैरे खेळ अवघड असूनही (म्हणजे असावेत!) ते जुगाराचे असल्यामुळे तेही वरील खेळांप्रमाणे कनिष्ठ आहेत. ‘रेप्युटेशन’चा बघा कसा परिणाम होतो! भिकार-सावकारला समोर येईल ते पान खाली टाकायला जेवढी बुद्धी लागते तेवढी पुरते, तसंच समोरची पानं ओळखायला. पेनल्टीला जरा अधिक दक्षता लागते, कारण खेळाचं नाव सार्थ करायला बाकीचे टपलेलेच असतात. गुलामचोर मात्र पूर्णतः दुसऱ्याकडून घेतलेल्या पानांवर बेतलेला! याच दर्जातील पेशन्स हा खेळ एकट्याने खेळायचा असून तो माणसाच्या सहनशक्तीचा अंत पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.
मध्यम दर्जाच्या खेळांना जरा जास्त डोकं लागतं. कुठलं पान केव्हा खेळावं याची जाणीव असणं हा हे खेळ खेळणाऱ्या लोकांच्यातला महत्त्वाचा गुण. हे सर्व खेळ एकाच पायावर आधारित असून तो पाया हेच त्या खेळाचं वैशिष्ट्य असतं. उदाहरणार्थ ‘डिक्लेअर’ या खेळात अंदाज बांधणे, तर ‘क्लिअरन्स’ खेळात पत्ते वाटण्याची तऱ्हा, तसंच ‘जजमेंट’ खेळात दुसऱ्यांच्या पानांसंबंधी बांधलेली अटकळ ही त्या त्या मध्यमवर्गीय खेळांची वैशिष्ट्ये आहेत. यामुळेच हे खेळ समजायला सोपे असतात. थोडक्यात काय, की अचानक यापैकी एक खेळ खेळायचा ठरला अन् कोणाला तो येत नसला तर तिथल्यातिथे शिकवून टाकता येतो. ‘उनो’ हा खेळसुद्धा तसलाच, पण याला स्पेशल पत्ते लागत असल्याने मध्यम खेळांत याची हवा आहे. परंतु ज्याला ‘क्रेडिट’ हा खेळ येतो त्याचे उनोच्या पत्त्यांवाचून काही अडत नाही. ‘रमी’ हा खेळ जरी त्याच्या नियमांमुळे मध्यम दर्जात पडत असला तरी तो त्यांच्यातील सर्वश्रेष्ठ, तसेच वरच्या दर्जाशी सर्वाधिक जवळचा खेळ आहे. असे का, हा प्रश्न पडला असेल तर हा खेळ खेळून पहा. कळेल!
आता काही वरच्या दर्जाच्या खेळांकडे वळू या. हे खेळ मध्यम खेळांपेक्षा जास्त गुंतागुंतीचे व बहुस्तरीय असतात. यातील बऱ्याच खेळांचे एका डावावर भागत नाही, तर चांगली ७-८ डावांची टुर्नामेंट रचावी लागते. शिवाय मध्यमवर्गीय खेळांची नावे जेवढी समजायला सोपी व संबंधित, तितकीच या खेळांची नावे गूढ. ‘नॉट अॅट होम’ हा त्याला अपवाद आहे. तरीसुद्धा इतरांपैकी ‘लॅडिस’, ‘कनास्ता’, ‘३०४’ व ‘ब्रिज’ या बलाढ्य खेळांची नावे गूढ आहेत. ‘३०४’ हा खेळ नावाप्रमाणेच रहस्यमय असून तो खेळायला विशेष बुद्धिमत्ता लागते. ‘ब्रिज’ या खेळाला तर दंडवतच घालावा लागतो. माझी आजी याची(ही) चॅम्पियन आहे. तिने दोनचारदा मला हा खेळ शिकवण्याचा (असफल) प्रयत्न केला आहे. या असल्या खेळांची एक स्वतंत्र भाषा असते. ती आत्मसात करून घेऊन खेळणं जास्त अवघड.
‘नॉट अॅट होम’ या खेळाचं मी घेतलेलं पहिलं दर्शन मी कधीही विसरणार नाही. माझ्या बहिणीच्या घरी एका मोठ्या फॅमिली गेट-टूगेदरला सगळे जमले होते, आणि जेवणानंतर पत्त्यांचा अड्डा जमला होता. एकोणीस जण हा खेळ खेळत होते आणि बाकीचे बघत होते. मी, अर्धवट झोपाळलेल्या अवस्थेत, आईच्या मांडीवर बसून हा खेळ पाहत होतो. तेव्हा मला काहीच कळलं नव्हतं. मी माझ्या प्रियजनांना एकमेकांकडे कसलीकसली पानं मागताना पाहत होतो. या खेळाला एकच कॅट लागत असल्यामुळे आधीच प्रत्येकाच्या वाट्याला तीनचार पानं आली होती. मग मागितलेलं पान मिळाल्यावर होणारा हर्ष, कोणी विजयी स्वरात ‘नॉट अॅट होम’ म्हटल्यावर उठणाऱ्या आरोळ्या………… खेळ कधी संपला अन् कोण जिंकलं ते काही आठवत नाही, पण लगेच दुसऱ्या दिवशी मी आईला हा खेळ शिकवायला सांगितल्याचं आठवतंय. तिने समजावून सांगितल्यावर सगळं एकदम स्पष्ट झालं. ‘नॉट अॅट होम’ चा अर्थ ‘तू मागितलेलं पान माझ्याकडे नाही’. कोणी कोणाकडे काय मागितलंय ते लक्षात ठेवून शेवटी सर्व जोड्या मागायच्या तर जिंकाल. आहे की नाही हा अगदी वरच्या दर्जाचा खेळ!
आई व बाबा, दोघांकडचे नातेवाईक पट्टीचे पत्ते खेळणारे असल्याचा मला भरपूर फायदा झाला आहे. ज्याप्रमाणे संग्रह करणाऱ्यांच्या संग्रहातली एक वस्तू ‘प्राईझ ऑफ कलेक्शन’ असते, तसे दोघांच्याही बाजूला दोन ‘प्राईझ’ खेळ होते. आईच्या बाजूचा ‘लॅडिस’ तर बाबांच्या बाजूचा ‘कनास्ता’! हे दोन्ही खेळ आधी सांगितल्याप्रमाणे वरच्या दर्जाचे आहेत. या खेळांत आपण एकटे काही डाव लढवू शकत नाही. पार्टनरची सोबत लागते. म्हणूनच खेळाडू कितीही असोत, पण संख्या सम असेल तरच लॅडिस किंवा कनास्ता खेळता येतो. एका बाबतीत मात्र या दोन्ही खेळांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. लॅडिसला अर्धाच कॅट (म्हणजे चार सत्त्या व त्यावरील सर्व पत्ते) लागतात. तर कनास्त्याची सुरुवातच मुळी दोन कॅटपासून होते. त्याची गरजच आहे ती. आता कधीही एकत्र जमलो तर या खेळांना प्राधान्य देण्यात येतं, म्हणून हे ‘प्राईझ’. तशा माझ्या दोन्ही पणज्या व पणजोबा, शिवाय आज्या व आजोबा, हे ब्रिज खेळण्यातही पटाईत, पण ब्रिज हा खेळ सामान्य माणसाला परवडणारा नसल्याने त्याला काही ‘प्राईझ’ म्हणता येणार नाही. एक मात्र खरे, की लॅडिस व कनास्ता यायला लागल्यापासून आमच्या सर्व पत्तेपटूंमध्ये माझा भाव एकदम वधारला आणि पत्त्यांच्या प्रत्येक अड्ड्यावर (दुसरा चांगला शब्द नाही त्याला) मला मनाचे स्थान देण्यात आले.
महाभारतातील युधिष्ठिर हा राजा सत्यवचनी असल्यामुळे प्रसिद्ध होता. त्याच्यातला एकमेव दोष म्हणजे त्याला जुगाराचे व्यसन होते. आयुष्यात एकदा तो ‘एक असत्य’ बोलला म्हणून त्याचा रथ चार बोटे खाली येऊन इतरांसारखाच जमिनीवर आला म्हणे. युधिष्ठिराला द्युताऐवजी ‘चॅलेंज’ या खेळाचे व्यसन असते तर त्याचा रथ कायमचा पृथ्वीच्या पोटात जाऊन बसला असता! कारण ‘असत्य’ हाच मुळी चॅलेंज या खेळाचा पाया आहे. कनिष्ठ दर्जाला जायचा हा खेळ केवळ त्यातील असंख्य डावपेचांमुळे व खेळण्यातल्या चावटपणामुळे श्रेष्ठ खेळांमध्ये आहे. यातील प्रमुख कार्य म्हणजे हातात तीन राजे असतानाही त्यात उगीचच एक दश्शी घुसडून ‘चार राजे’ हा दावा करणे. दिलं कोणी चॅलेंज तर घ्या पानं मागे. नाही दिलं तर मग इतर खेळाडू आपलाच कित्ता गिरवतात आणि एकच कॅट असूनही खाली आठनऊ राजे येउन पडतात. मग चॅलेंज द्यायला कोणीच धजत नाही. न जाणो, नेमका शेवटचा खरा असला तर? अशा वेळी दुसरं पान खपवलं तर नक्की पकडले जाऊ या भीतीने सर्व ‘पास’ म्हणतात आणि सराईतांच्या कृष्णकृत्यांच्या त्या खुणा कायमच्या एका कोपऱ्यात जाऊन पडतात!
मी मागेच म्हटल्याप्रमाणे पत्त्यांची एक वेगळीच परिभाषा असते. सराईतांचे मुख्य काम म्हणजे नवख्या माणसाला हिणवणे. तिथे ही परिभाषा उपयोगी पडते. जर नवखा मनुष्य हरलाच, तर त्याच्या गांभीर्याची जाणीव त्याला करून देण्यासाठी मराठी भाषेने एक सुंदर शब्द दिला आहे. ‘गाढव’, ‘गाढव’चा गजर इकडे तिकडे चोहिकडे होऊ लागल्यावर नवखा ओशाळतो. आपल्याला हेच हवे असते. मग काही करू पण गाढव व्हायला नको म्हणून नवखा माणूस प्रत्येक पान विचारविनिमय करून खेळू लागला, तर ‘ए जंक्शन’ म्हणून त्याची बोळवण करण्यात येते. ही सर्व पीडा टाळायचा उपाय म्हणजे जिंकणे, पण बऱ्याचदा तीही सोय नसते. समजा तो नवखा माणूस चॅलेंज खेळतोय. सगळी पानं वाट्टेल तशी खपवून तो सुटलाय. विजयी मुद्रेने वर बघतो तर, ‘सुटलास ना, छान छान. जा जरा सर्वांसाठी चहा टाक बघू.’ हे ऐकावे लागते! आता वाईट खेळाडूंना शिव्याशापांची सवय असते, पण असा व्यक्तिशः अपमान? तेव्हा खेळा; खेळत राहिलात तरच सराव होतो. मग कधीकाळी आपल्याला सतावणाऱ्या त्या युक्त्या दुसऱ्यावर चालवून पाहायला मजा येते.
असो. खूप वेळ बोललो, आता खेळतो. काय म्हणालास, किलवर दुर्री देऊ? नॉट अॅट होम! आता मी मागू ना? मग तुझ्याकडचा बदाम राजा दे ना मला! येस!
धमाल लेख आहे, आदित्य!
ReplyDeleteवाचताना मज्जा आली खूप आणि नेहमीप्रमाणे डोळ्यांसमोर चित्र उभे राहिलेच 😄
ReplyDeleteअफाट लेखन 👍👍👍👍👍
ReplyDelete