समोरचा पडदा १
परवाच मी माझ्या लहान भावाकडे गेलेलो असताना त्याने मला जेवताना त्याच्यासोबत तो बघत असलेलं कार्टून पाहण्याचा आग्रह केला. ‘बॉब द बिल्डर’ असं काहीसं त्याचं नाव असावं. (किंवा कशाला; मी तरी कुणाला गंडवतोय? ते नाव ‘बॉब द बिल्डर’ हेच आहे हे मला चांगलंच माहित आहे) मला ते अगदी लहानपणी पाहिल्याचं आठवत होतं. फार प्रयत्न करावा न लागताच, खूप पूर्वी डोक्यात शिरलेले तपशील आपोआप आठवू लागले. काही वेळ असाच शांततेत गेला. मी त्या कार्टूनकडे एकटक बघत बसलो होतो आणि घरातले बाकीचे लोक माझ्याकडे एकटक बघत बसले होते. नंतर माझ्या लक्षात आलं की मी घास घ्यायचं विसरून गेलो होतो. शेजारी माझी मोठी बहीण ‘मंत्रमुग्ध होण्यालाही काही मर्यादा असतात’ असला काहीतरी भाव डोळ्यात घेऊन माझ्याकडे पाहत होती. निमूटपणे मी तो इशारा त्या घासाबरोबर गिळून टाकला आणि मागच्या टेबलवरून एक गंभीर दीर्घकथा उचलून वाचायला सुरुवात केली. पण मग पुढचाही घास घ्यायचं विसरलो तेव्हा पुस्तक बंद करून इतरांशी गप्पा मारत जेवायला लागलो. पण खरं सांगायचं झालं, तर तो तेवढा काळ समोर जे घडतंय, त्यावर अजिबात विचार करावा न लागता फक्त सहजपणे आनंद घेत पाहू शकलो होतो, याचं मला समाधान वाटत होतं.
‘या पिढीतील बहुसंख्य लोकांप्रमाणे’ लहानपणी माझंही मनोरंजनाचं विश्व कार्टून्सनी व्यापलेलं होतं. अगदी सुरुवातीला पाहिलेली फक्त दोन-तीनच विशेष लक्षात राहण्यासारखी कार्टून्स आठवतात. याचं कारण वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षापासूनच आपण ‘चूझी’ व्हायला लागतो असं नाही, तर हे की चोवीस तास प्रसरण असणाऱ्या खूप वाहिन्या आणि विशिष्ट कार्यक्रम हे सगळं असणारे TVच त्याच्या काही काळ आधी नुकते आलेले होते. शिवाय, प्रत्येक नव्याने विकसित केलेलं तंत्रज्ञान आपण आधी जपून, बेताबेताने वापरतो आणि एकदा का ते सोपं झालं (दुसऱ्या शब्दांत, त्याचा खर्च कमी झाला) की ते वेगाने पसरतं. अगदी सुरुवातीच्या काळात आपण पाहत असलेल्या कार्टून्समध्येही आपल्याला हे जाणवायचं. उदाहरणार्थ, ‘थॉमस अँड फ्रेंड्स’ नावाच्या एका ब्रिटिश कार्टूनमध्ये, आगगाडीची इंजिन्स बोलू शकायची आणि त्यांना भावना असायच्या. पण इंजिनच्या चेहऱ्यावरचा, फार काय त्यातल्या माणसांच्या चेहऱ्यावरचाही भाव आपल्या डोळ्यासमोर नाही, तर पुढच्या फ्रेममध्ये बदले. समोर चित्र चालू असताना मागे कोणीतरी गोष्ट वाचून दाखवल्यासारखे डायलॉग्स असायचे, यावरून पात्रांना बोलताना दाखवण्याचं अॅनिमेशन तोवर विकसित नव्हतं हे कळत होतं. किंवा ते वापरणं खर्चिक असावं. शिवाय माणसं ही ठोकळ्यांसारखी दिसायची, पण ती क्वचितच गोष्टीत असल्याने आणि बाकी काळ गोष्ट इंजिन्सभोवती फिरत असल्याने या मालिकेला त्याचा फारसा तोटा नाही झाला.
TVवरच्या माझं मनोरंजनाचं विश्व म्हणजे एका अर्थी ‘थॉमस अँड फ्रेंड्स’ पासून ते ‘फ्रेंड्स’ पर्यंतचा प्रवास आहे. सुरुवात मात्र ‘थॉमस अँड फ्रेंड्स’ पासून हे नक्की! त्यानंतर वर उल्लेख केलेल्या ‘बॉब द बिल्डर’मध्ये पात्र बोलताना दिसायची आणि चेहऱ्यावरचे भावदेखील बदलू शकायची. ठोकळ्यासारखं दिसण्याबाबत ते काहीच करू शकत नव्हते असं दिसत होतं. या गोष्टीतल्या गाड्या बोलू शकत असल्यामुळे, ‘थॉमस’प्रमाणेच हीही गोष्ट लगेच माझ्या आवडीची झाली. अगदी तशा दिसणाऱ्या गाड्या कधीच दिसल्या नाहीत, नाहीतर मी त्यांच्याकडूनही बोलायची अपेक्षा केली असती. बॉबचा जेसीबी तेवढा ‘The Real Thing’शी मिळताजुळता होता. पण त्यामागे इतरही कारणं होती हे आज मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतंय. एक म्हणजे या गोष्टींमुळे खड्ड्यात पडणे, उंच खांबावर अडकून बसणे किंवा उतारावरून खाली घसरणे हेच काय ते वाईटात वाईट होऊ शकते, अशी माझी ठाम समजूत झाली होती. शिवाय, या सगळ्या गोष्टींतली सगळी पात्रं मनातून चांगलीच असतात. म्हणजे अगदी सद्गुणांचे पुतळे असं नाही. कुणी आळशी आहे, कुणी घाबरट आहे, आणि ‘स्पड’ नामक पात्र खूप खोडकर आहे, पण वाईट किंवा दुष्ट कुणीच नाही. (‘स्पड’ हा बटाट्याचा एक प्रकार आहे हे फार उशिरा कळले) यानंतर सुष्टांचा दुष्टावर विजय या धर्तीवरच्या इतक्या गोष्टी पाहिल्या, की या फॅक्टरशिवाय गोष्ट मनोरंजक होऊच शकत नाही हे डोक्यात पक्कं बसून गेलं. एक ठळक व्हिलन असलाच पाहिजे असं नाही, फक्त Evil हे कुठेतरी दडलेलं हवं. जर सोडवण्यासाठी समस्या नसल्या, हरवण्यासाठी प्रतिस्पर्धी नसले, विसरण्यासाठी सल नसले, तर गोष्ट सांगायची कशाची? पण नुसत्या रोजच्या हसतमुख जीवनाचीही मनोरंजक गोष्ट होऊ शकते, हे सांगतो तो बॉब. अर्थात, मनोरंजक म्हणताना मी “छोटू, वय वर्षे पाच” याच्या भूमिकेतून बोलत होतो हे विसरू नये. नाहीतर घास घ्यायचं विसराल.
‘सुष्ट’ आणि ‘दुष्ट’ या दोन ठळक पार्ट्या असणारी मी पाहिलेली पहिली कार्टून गोष्ट म्हणजे ‘टॉम अँड जेरी’! ‘मांजर उंदराला पकडायचा प्रयत्न करतं’ या इतक्या सध्या थीमवर आधारित एक हजारहून अधिक कथा! मला लहानपणी खूप हसवलं ते या मालिकेने. विनोद कळायला अजिबात कष्ट पडत नसल्याने, हे पाहणं म्हणजे निखळ आनंदाचं काम होतं. कुणीतरी घसरून पडल्यावर आपल्याला हसण्याची जी काही प्रबळ इच्छा होते ती इथे दाबून ठेवावी लागत नाही. प्रत्येक गोष्टीत जेरी हा उंदीर जिंकणार हे उघडच होतं, कारण नाहीतर टॉम हे मांजर त्याला खाणार आणि मग पुनर्जन्म वगैरे गोष्टी समजावून सांगणं जरा अवघडच असतं नाही का? विशेषतः शून्य डायलॉग्स असलेल्या मालिकेत. यानुसार आपण बघताना जेरीचं समर्थन केलं पाहिजे असं कुठेतरी आपल्या मनावर ठसतं. पण मी मागच्या लेखात उल्लेख केलेला माझा मित्र ‘पिलर’ हा टॉमचा कट्टर समर्थक होता. आणि आमचे त्यावरून वाद चालायचे. ‘पण तो त्याला खातो’ अशा माझ्या कळकळीच्या ‘अपील’कडे दुर्लक्ष करून तो ‘जेरीला खाल्लं नाही तर तो तुझे कपडे फाडेल, मग चालेल का’ असं विचारायचा. तेव्हा त्याचा मुद्दा अर्थातच रास्त होता. पण मी सगळं जेरीच्या भूमिकेतून पाहत असताना तो मात्र तटस्थ माणसाच्या भूमिकेतून पाहत होता, हे आज लक्षात येतंय. उगीच नाही तेव्हा आम्ही हा वाद तिथेच थांबवून TVच बंद करायचो! ‘टॉम अँड जेरी’ बद्दल मला आवडणारी एक गोष्ट म्हणजे, वरकरणी ते सरळसाधं कार्टून वाटलं तरी त्याचे किती पैलू आहेत हे मागे वळून पाहिल्यावर कळतं. गोष्टीतल्या घटना लहान मुलाला आणि मुलीला खूप हसवून जातात, पण त्याच गोष्टींची अत्यंत चतुराईने, Pun वगैरे घालून केलेली नावं वाचून तिथे त्यांच्यासोबत बसलेल्या आईच्या किंवा बाबांच्या तोंडावर नकळत स्मित येतं. ज्यामध्ये जेरी नेहमी व्यत्यय आणतो असं, टॉमचं आणि त्याच्या खास मैत्रिणीचं प्रेमप्रकरण पाहायला त्या पोरांचे मोठे भाऊ किंवा बहीणही पाय पसरून बसतात. आणि दर काही एपिसोडनंतर हटकून येणाऱ्या एका गोष्टीच्या शेवटी, सगळा वेळ शेकोटीच्या लाकडांवरून भांडून झाल्यावर मग, बाहेर कुडकुडत उभ्या असलेल्या दीनवाण्या टॉमला जेरी न राहवून घरात घेतो, मग ते एकत्र जेवतात हा सीन पाहताना आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पाहायला मिळतं.
मधल्या काळात मार्केटमध्ये वेगाने पसरत एक अढळ स्थान निर्माण केलं ते जपानी आणि कोरियन कार्टून्सनी! ब्रिटिश थॉमस आणि बॉब यांच्यामध्ये ते 3D आणि भरीव वाटायला ठोकळ्यांसारखे लोक आणणं भाग पडलं. त्याउलट जपानी आणि कोरियन कार्टून्स म्हणजे अक्षरशः हाताने रेखाटलेल्या चित्रांना चालवून दाखवल्यासारखी दिसतात. ते सगळे द्विमितीय पौर्वात्य लोक आणि त्यांच्या कपाळावर प्रत्येक एपिसोडमध्ये दिसणारा तो कॅरेक्टरिस्टिक घामाचा थेंब हे खूपच कमी वेळात लोकप्रिय झाले. यांचा प्रसार इतका वाढला की मधला काही काळ मी आणि माझे समवयस्क मित्र ‘खऱ्या माणसांचे डोळे असे आणि कार्टूनमधल्या माणसांचे डोळे मिचमिचे’ असं ठरवून टाकलं होतं. अशा लोकांच्या अनेक प्रकारच्या गोष्टी असलेली जपानी कार्टून्स असंख्य होती. त्यांचंच कौतुकास्पद तंत्रज्ञान त्यातली फक्त काही कार्टून्स वापरायची. त्याचं एक उदाहरण म्हणजे ‘पोकेमॉन’ हे कार्टून, जगातलं सगळ्यात लोकप्रिय आहे. त्याच्या प्रत्येक सिझनचे व्हिडिओ गेम्सही सगळीकडे उपलब्ध आहेत. या कार्टूनने पहिल्यांदा ‘सिरीयल’ ही संकल्पना माझ्यासमोर आणली. तोपर्यंत पाहिलेल्या सगळ्या कार्टून्समध्ये प्रत्येक एपिसोडला नवी गोष्ट असे. तीच गोष्ट पुढे चालू राहणे आणि रोजच्या एपिसोडमध्ये त्याचा थोडासा भाग पाहता येणे हे मी पहिल्यांदा पोकेमॉनमध्ये पाहिलं. तेव्हा तो भयंकर ताप वाटला होता. गोष्ट कळायला हवी असेल तर रोज नेटाने त्या वेळेला पाहायचं? दुसरी कार्टून्स नाहीत का आम्हाला! तेव्हा आणि त्यानंतर बराच काळ, पोकेमॉन हा पाहण्याचा नसून खेळण्याचा विषय होता. मी, पिलर आणि विनीने मिळून यात तात्पुरती पीएच.डी. मिळवली होती. एक व्यवस्थित विकसित केलेलं काल्पनिक जग या कथेत पहिल्यांदा मी अनुभवलं. आणि पर्यायाने काल्पनिक जगांची स्वतः निर्मिती करताना जो अनुभव आवश्यक होता त्यात पोकेमॉनचा वाटा आहे. तो अनुभव नेहमीच अपूर्ण असतो हा भाग वेगळा!
असो. बाबा एकदा म्हणाले होते की मला तेव्हा ही सगळी कार्टून्स आवडत होती, पण मी मोठा होत गेल्यावर ती मागे पडत जातील. तेव्हा मी अर्थातच ते अशक्य असल्याचं ठासून सांगितलं होतं, पण सत्य हे की अगदी तेच घडलं. हळूहळू मी पाहत असलेल्या कार्टुन्सची संख्या कमी होत गेली आणि ज्या दिवशी मी कार्टून्स पाहणं पूर्णतः थांबवलं त्या दिवसात आणि आजच्या दिवसातही खूप अंतर आहे. आज TVवर चांगलं काही पाहायला सापडलं नाही (म्हणजे इंग्लिश सिरियल्स, इंग्लिश सिनेमे, खेळ आणि अगदी हिंदी सिनेमांतही) तरीही मी कार्टून्सकडे वळत नाही. Teenage भीड आड येते! पण त्याबरोबरच, आता ती कार्टून्स आपलं मनोरंजन करू शकणार नाहीत ही जाणीव आपल्याला कुठेतरी झालेली असते. पाहत असलेली प्रत्येक गोष्टी दृष्टिकोन ठेवून, भूमिका घेऊन आणि त्यातल्या घटनांवर शंका घेत पाहत असल्यामुळे, त्या साध्यासरळ गोष्टी आपली निराशाच करतात. पण हा सगळा विचारच निरर्थक आहे, कारण त्या आपल्यासाठी लिहिलेल्याच नसतात. शिवाय आपण पुढे गेलंच पाहिजे, नाही का? मी आजही ‘टॉम अँड जेरी’च्याच अध्यायात असतो तर ‘इन्सेप्शन’ सारख्या सिनेमांना आणि ‘फ्रेंड्स’मधल्या विनोदांना दाद देऊ शकलो नसतो. फार काय, नोलनसाहेबसुद्धा कार्टून्सच बघत राहिले असते तर ‘इन्सेप्शन’ आलाच नसता! बापरे, विचारही करवत नाही! थोडक्यात, कार्टून्सचा आणि माझा संबंध कायमचा तुटला.
‘कायमचा’ हे खरंतर तितकंसं बरोबर नाही. मी आत्ता, तुलनेने नुकताच यातून बाहेर पडल्यामुळे, माझी अशी समजूत होती की मोठी माणसं कधीच कार्टून्स पाहत नाहीत. हे खरंय म्हणा, की ते स्वतःहून कधीच पाहत नाहीत. पण मी थॉमस किंवा बॉब पाहत बसलो की आई, बाबा किंवा आजी माझ्याबरोबर पाहायला बसायचे. त्यातल्या विनोदांना तेही हसायचे, त्या साध्या गोष्टींत रमून जायचे. आता ते फक्त मला कंपनी द्यायला किंवा माझ्यावर लक्ष ठेवायला बसायचे, का त्यांना खरोखरच ते आवडायचं, कुणास ठाऊक? कदाचित मीच सुरुवातीला सांगितलेल्या अनुभवानुसार त्यांनाही खूप काळानंतर इतकं साधं काहीतरी पाहण्यात आनंद मिळाला असावा. मोठ्यांच्या मनातही एक लहान मूल दडलेलं असल्याने त्यांना - आणि आपल्याला - या कार्टून्सशी असलेले संबंध पूर्णपणे तोडून टाकता येत नाहीत. आपलाच मुलगा आणि नातू ते पाहतोय त्यामुळे ते पाहायला एक साळसूद बहाणा मिळाल्याचं, आईबाबा आणि आजीला कदाचित बरंच वाटत असेल! मी त्यांच्या जागी असेन तेव्हा असंच करेन बहुतेक. कदाचित ते तेव्हाच्या कार्टून्सवर अवलंबून असेल. पण याक्षणी मात्र मी कार्टून्समधून बाहेर पडलेल्या ‘फेज’मध्ये आहे आणि म्हणूनच माझ्या मनोरंजन विश्वात इतर काही व्यक्तींनी जागा घेतल्या. ते सगळं याच लेखात सांगता येणार नाही, म्हणून आत्ता पोकेमॉनच्या प्रत्येक एपिसोडला शेवटी दिसणारं आणि माझ्या दृष्टीने अत्यंत तिरस्करणीय असलेलं वाक्य म्हणून थांबतो : To be continued!!
Now let us watch something our age on SP2
Now let us watch something our age on SP2
:)
ReplyDelete