समोरचा पडदा २


मागच्या वेळी मी लहानपणी मजेत पाहिलेल्या कार्टून्सचं वर्णन केलं. अर्थात, त्यातल्या काही कार्टून्सचं. माझ्या डोळ्यांदेखतच, या मार्केटमध्ये भारतानेही प्रवेश केला आणि भारतीय बनावटीची कार्टून्सही लोकप्रिय झाली. आजचं सगळ्यात लोकप्रिय कार्टून म्हणजे ‘छोटा भीम’ हे मीच केलेल्या एका अनौपचारिक सर्वेक्षणातून (म्हणजे कॉलनीतल्या छोट्या मुलांना गाठून) स्पष्ट झालं. एकेकाळी मीही ते पाहत असे, पण ते जेव्हा माझ्या मते अतीच अतिशयोक्ती करायला लागलं तेव्हा मी ते सोडून दिलं. नंतर मात्र ते कार्टून इतकं पसरलं, की ‘पोगो’ या त्याच्या वाहिनीने मी पूर्वी माझ्या व्हिडिओ गेम्समध्ये पाहिलेला एक प्रकार केला. माझ्याकडे असलेल्या त्या गेम कन्सोलमध्ये नावाने १०० गेम्स होते, पण दर काही गेमनंतर तोच कार रेसिंगचा गेम नाव बदलून समोर यायचा. आणि नावंही काही फार डोकं लावून दिलेली नसत. आता मला सांगा, ‘Prisoner of War’ या नावाचा कार रेसिंगशी काहीतरी संबंध आहे का? पण व्हिडिओ गेम्सच्या दुनियेवर शंका घेण्याची तेव्हा आमची परिस्थिती नव्हती. पण ‘पोगो’वर त्या एका नावाचे अनेक प्रकार वापरून दिवसभर ‘छोटा भीम’ लागे. या कार्टूनच्या यशानंतर इतर भारतीय कार्टून्सनी जागा घ्यायला सुरुवात केली. शिवाय, एका साध्या फ्रेंच कार्टूनला भारतातल्या जुन्या सिनेस्टार्सच्या आवाजाचे डबिंग जोडणे हा उपद्व्याप करण्याची कल्पना आपल्या भारतातच जन्माला आली! एरवी निमूटपणे शिवाशिवी खेळणाऱ्या त्या मांजराच्या तोंडी ‘ढाई किलो का हाथ’ वगैरे येऊ लागलं. केवळ याच एका चतुर प्रकारामुळे, हे ‘ऑगी’ नामक कार्टून आमच्या शाळेत खूप लोकप्रिय झालं, आणि आम्हा मित्रांचा कार्टून बघण्याचा काळ काहीसा वाढला.
लहानपणी आम्ही घरातले सगळे कार्टून पाहत बसलोय, असं दृश्य दिसणं सहज शक्य होतं. नाहीतर घरातले सगळे एका खोलीत आढळणंच विरळा! मला लहानपणी एकदा ‘तुम्ही घरातले सगळे एकत्र कधी जेवता’ असं कुणीतरी विचारल्यावर मी प्रामाणिकपणे ‘हॉटेलमध्ये जातो तेव्हा’ असं उत्तर दिलं होतं. कारण उन्हाळ्यात रात्री गच्चीत बसायचो तेव्हा सोडल्यास आम्ही असे रात्री टेबलवर बसून एकत्र जेवल्याचं मला काही आठवत नाही. पण आम्ही सगळे एकच कार्यक्रम बघत असल्यास आम्ही एकत्र बसायचो. कार्टून्सचं सोडा; तेव्हा मला भरवावं लागायचं. पण त्यानंतर असा फक्त एकच कार्यक्रम होता, आणि आजही आहे, जो आम्ही सगळे रात्री एकत्र पाहत असू. त्या खरोखरच सुंदर अशा कार्यक्रमाचं नाव होतं ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’!
हा शो २००९ मध्ये सुरु झाला, त्याच्या वर्षभरानंतर आम्हाला तो सापडला. आम्ही दुसऱ्या सीझनपासून आजतागायत हा पाहत आलोय आणि यापुढेही पाहतच राहू अशी आशा आहे. यापूर्वी रियालिटी शोजचं आमच्यापैकी कुणालाच फारसं आकर्षण नसायचं. ‘KBC’ लागलं असलं तर आम्ही पाहायचो, आणि आजी ‘होम मिनिस्टर’ मधला शेवटचा पैठणीचा खेळ न चुकता पाहायची. फार काय, आजही पाहते! पण हा शो सापडला आणि आमच्या दिवसातला रात्री नऊ ते दहाचा वेळ आम्ही सहजच याला देऊन टाकला. हा एक अत्यंत साधा कार्यक्रम आहे पण तो पाहण्यात प्रचंड मजा येते. याची रूपरेषा सांगायची झाली तर, ऑस्ट्रेलियामधल्या हॉटेल इंडस्ट्रीतल्या नावाजलेल्या लोकांच्या हाताखाली, काही निवडक लोकांनी प्रसंगानुसार डिशेस बनवायच्या आणि परीक्षणातून पुढच्या राउंड्समध्ये प्रवेश मिळवायचा. अगदी दुसऱ्या सीझनपासून तिन्ही होस्ट तेच आहेत आणि ते असतील तरच मजा येऊ शकते हे माझ्या मनात पक्कं बसलंय. गॅरी मॅहिगन, जॉर्ज कोलंबारीस आणि मॅट प्रेस्टन ही त्या तिघांची नावं. यापैकी गॅरी आणि जॉर्ज हे स्वतः उत्कृष्ट शेफ असून त्यांची ऑस्ट्रेलियात मोठी हॉटेलं आहेत. तर मॅट हा या इंडस्ट्रीतला प्रसिद्ध फूड क्रिटिक आहे, पण त्याच्या हातालाही विलक्षण चव आहे. (हे कळायला ते चाखावंच लागतं असं कोण म्हणतं?)
पु.लं.च्या एका लेखात ते असं म्हणतात की ‘पोटभर जेवण झालेला माणूस जगाचं काहीही वाकडं करणार नाही’. ह्या सदैव हसतमुख आणि काहीशा लठ्ठ व्यक्तिमत्त्वांकडे पाहिल्यावर मला हे काही प्रमाणात पटलं.
Image result for masterchef australia
वरील फोटोमध्ये गॅरी डावीकडे, जॉर्ज उजवीकडे आणि मॅट मध्यभागी उभा आहे. आलेल्या प्रत्येक इच्छुक स्पर्धकाशी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने वागतात. त्यांच्याकडे एकूणच अनौपचारिक वातावरणावर भर देत असल्याने ते सगळ्या स्पर्धकांना नावानिशी हाक मारतात आणि स्पर्धकांकडूनही त्यांना तीच अपेक्षा असते. मनातून खचत चाललेल्या स्पर्धकांना अगदी दयाळू शब्दांत प्रोत्साहन देतात. त्यांचे असे सगळे गुण सांगत बसलो तर बराच वेळ जाईल. पण काही माणसं कशी आपल्याला पाहताक्षणीच आवडून जातात, आणि त्यांचा स्वभाव पाहिल्यावर आपलं बरोबर असल्याचं आपल्याला कळतं, त्यांच्यापैकीच ही मंडळी.
दरवर्षी उन्हाळ्यात कधीतरी या स्पर्धेला सुरुवात होते. आधी एका वेगळ्याच ठिकाणी पन्नास इच्छुक स्पर्धकांची पहिली चाचणी होते. त्यांना हवी ती डिश बनवायची मुभा असते. मग हे तिघे परीक्षक त्या चाखून पाहतात. डिश आवडली, तर शेजारच्या टेबलावर रचून ठेवलेल्या २४ पांढऱ्याशुभ्र एप्रन्सपैकी एक काढून देतात. अशा प्रकारे चोवीस स्पर्धक निवडले जातात, ज्यांना मग पुढे मेलबर्नमधल्या सुप्रसिद्ध मास्टरशेफ किचनमध्ये पुढची स्पर्धा खेळायला मिळते. हो, मेलबर्नमधलं ते किचन, त्यासमोरची बाग, त्याच्या आतले ओटे, डायनिंग हॉल्स आणि भिंतीवर लावलेलं मोठं घड्याळ हे सारंच सुप्रसिद्ध आहे. (घड्याळ कुप्रसिद्ध म्हणता येईल) बाहेर बागेत मास्टरशेफचं चिन्ह हिरवळीवर रेखाटलेलं दिसतं. तिथे बाहेर एक लाल स्कूटर नेहमी उभी असते, पण का हे मला न सुटलेलं कोडं आहे! या चोवीस स्पर्धकांपैकी दर आठवड्याला दोन स्पर्धक कमी होतात आणि हळूहळू संख्या घटत जाते. सहा स्पर्धक उरतात तेव्हा तो ‘फायनल वीक’ असतो ज्याच्या शेवटी एक स्पर्धक ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’ हे नाव कमावतो. त्यांची बक्षिसंही दणदणीत असतात. मागच्या वर्षी जिंकणाऱ्या स्पर्धकाला फूड इंडस्ट्रीत करिअर सुरु करायला दोन लाख पन्नास हजार डॉलर्स मिळाले, शिवाय एक पुस्तक अथवा वर्तमानपत्रातलं सदर लिहिण्याची संधी आणि एक नवीकोरी ‘अल्फा रोमिओ’ कंपनीची ‘ज्युलिएटा’ ही सुंदर गाडी मिळाली. या सर्व गोष्टींमुळे, या स्पर्धेत भाग घेणं हे खूप प्रतिष्ठेचं मानलं जातं, आणि त्या चोवीसपैकी पहिल्यांदा स्पर्धा सोडून जाणाऱ्याचीही शान असते. याला प्रतिसादही तशाच प्रमाणात मिळतो. म्हणूनच, “ही स्पर्धा जिंकणं काही सोपी गोष्ट नाही. पण या सीझनच्या अखेरीस, कोणीतरी नक्की जिंकणार हेही तितकंच खरं आहे.” हे शब्द मी परीक्षकांच्या तोंडून अनेक वेळा ऐकले आहेत!
Image result for masterchef australia kitchenRelated image
तर ही स्पर्धा असते नक्की काय? या मंडळींनी काढलेल्या काही ठराविक कामगिऱ्या पार पाडत जाणं. जरी या कामगिऱ्या अनेक प्रकारच्या असल्या, तरी या स्पर्धेचा एक ठराविक पॅटर्न असतो. आठवड्याचे पाच दिवस हे स्पर्धेचे असतात. पहिल्या दिवशी, अर्थात सोमवारी सुरुवात एका ‘Mystery Box Challenge’ने होते. या कामगिरीचं स्वरूप म्हणजे समोरच्या खोक्यात असलेले जिन्नस वापरूनच एक पदार्थ तयार करायचा. अर्थात, सगळेच जिन्नस रहस्यमय नसतात, हे उघड आहे. नेहमीचे दूध, मैदा, तेल आणि बटर हे उपलब्ध असतंच. (बटर हे नेहमीचं मानलं जातं हे मला इथे पहिल्यांदा कळलं! ते लोक अक्षरशः पाण्यासारखे बटर वापरतात) ती राउंड जिंकणाऱ्याला पुढच्या ‘Invention Test’मध्ये एक आघाडी मिळते. या कामगिरीमध्ये अगदीच नवीन नाही, पण एका ठरलेल्या जिन्नसापासून वेगळ्या प्रकारचे पदार्थ करणं हे काम असतं. जिंकणारा स्पर्धक तो जिन्नस निवडतो, ही ठरलेली आघाडी. क्वचित त्याला वेळेची मर्यादा बदलायची मुभा मिळते. ही मुभा मिळण्यासाठी कोणताही स्पर्धक अक्षरशः जीव ओतून पदार्थ बनवेल. कारण प्रत्येक कामगिरी एका ठरलेल्या वेळातच करायची असते. ते कुप्रसिद्ध घड्याळ उरलेला वेळ दाखवतं. गंमत म्हणजे, मी आजपर्यंत एकाही स्पर्धकाला वेळेच्या आधी संपवून आराम करताना पाहिलेलं नाहीये. सगळे जण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करत असतात आणि कोथिंबीरीचे शेवटचे पानही परीक्षकांनी ‘Time’s up’ म्हटल्याक्षणीच पडते!
या कामगिरीचे परीक्षण झाल्यावर ‘Top 3’ आणि ‘Bottom 3’ असे वेगळे काढतात, आणि बाकीच्या अठरा स्पर्धकांच्या घोळक्यातून एक सामुदायिक उसासा बाहेर पडतो. Bottom 3 स्पर्धकांना दुसऱ्या दिवशी एका ‘Elimination Challenge’ला सामोरे जावे लागते, ज्यामधून एक स्पर्धक स्पर्धा सोडून जातो. तर Top 3 मंडळींना तिसऱ्या दिवशी एका ‘Immunity Challenge’मध्ये भाग घेता येतो. ही अजून एक मास्टरशेफची खास कल्पना! एक छोटीशी सोनेरी ‘Immunity Pin’ मिळवायची ही संधी; आणि ही पिन वापरून आपण एकदा एलिमिनेशन चुकवू शकतो. त्यासाठी आधी ते तीन स्पर्धक एका साध्या कामगिरीत भाग घेतात, ज्यातून एका स्पर्धकाची निवड होते. तो स्पर्धक मग ऑस्ट्रेलियातल्या एका प्रसिद्ध शेफशी मुकाबला करतो. गॅरी, जॉर्ज आणि मॅटचे या क्षेत्रातले सहकारी अशा वेळी येऊन जातात. त्यांच्यापेक्षा चांगला पदार्थ करणं म्हणजे अत्यंत कठीण परीक्षा. मग हे तिघंजण दोन्ही पदार्थांचं ‘Blind Tasting’ करून मार्क्स देतात, आणि जास्त मार्क असलेली व्यक्ती हा सामना जिंकते. स्पर्धक जिंकला, तर त्याला ती पिन मिळते. तो दिवस एकूण आनंदाचा असतो.
चौथ्या दिवशी मात्र ‘Team Challenge’ची मोठ्ठी कामगिरी स्पर्धक पार पाडतात. सगळ्या स्पर्धकांचे दोन किंवा प्रसंगी तीन / चार गट करून त्यांना किचनच्या बाहेर कसलीतरी ‘मागणी’ पूर्ण करायचं काम करावं लागतं. एखादं हॉटेल, डेझर्ट बार दुपारी चालवणे किंवा पन्नास थकून आलेल्या शेतकऱ्यांना मेजवानी देणे अशा स्वरूपाची ती कामं असतात. या कामगिरीचं परीक्षण बहुतेक वेळा परीक्षकच करतात, पण ते लोकांच्या प्रतिक्रिया विचारात घेतात. शेवटी, हरणाऱ्या सबंध टीमला त्यानंतरच्या दिवशी एलिमिनेशनला सामोरं जावं लागतं. इथे आठवडा संपतो. शनिवारी सकाळी एक ‘मास्टर-क्लास’ होतो आणि आपले परीक्षक स्पर्धकांना काही पदार्थ बनवून दाखवतात आणि त्यांच्या युक्त्या शिकवतात. त्या पदार्थांचे मस्त वास दरवळत असताना स्पर्धकांना नोट्स घेणं कसं जमतं कोण जाणे. शेवटी सगळे तो पदार्थ खाऊन पाहतात. दगदगीच्या एका आठवड्यानंतर हे ट्रीट सर्वांना हवंहवंसं वाटतं.
Image result for adriano zumbo fairytale house       या स्पर्धेतले काही आठवडे खूप इंटरेस्टिंग असतात. ऑस्ट्रेलियातले इतर प्रसिद्ध शेफ कधीकधी परीक्षकांच्या विनंतीवरून या स्पर्धेला चौथा परीक्षक म्हणून दिवसभर, तर कधीकधी आठवडाभरही भेट देतात. सुरुवातीचे काही सीझन्स मॅट मोरान हा Immunity Challenge मध्ये सल्लागार म्हणून यायचा. त्यानंतरच्या सीझनमध्ये कायली क्वॉन्ग या चिनी शेफने तिथे हजेरी लावली. त्यांनतर तीच जागा शॅनन बेनेटने घेतली. बाकीचे शेफ स्पर्धा पुढे जाते तसे अधिकाधिक अवघड कामगिऱ्या द्यायला येतात. एलिमिनेशनची ठरलेली कामगिरी हीच की या शेफचे खास पदार्थ पुन्हा तयार करून दाखवणे. आणि ते पदार्थ अक्षरशः काहीही असू शकतात. अॅड्रियानो झुम्बो नावाच्या एक पेस्ट्री शेफ बहुतेक वेळा सेमीफायनल किंवा फायनल राऊंडला त्याची डिश आणतो. त्याला परीक्षक गमतीने ‘Dark Lord of Pastry’ म्हणत! त्याची डेझर्ट्स इतकी अनाकलनी दिसत की ती खायची गोष्ट आहे हे तो तसं म्हणाल्यावरच लक्षात येई! याशिवाय मॅगी बिअर नावाची एक सगळ्यांची लाडकी ‘आजी’ किचनला भेट देऊन जाते.अत्यंत गोड स्वभावाची आणि हुशार शेफ अशी तिची ऑस्ट्रेलियातच नाही, तर हा कार्यक्रम पसरल्यामुळे सगळीकडे ख्याती आहे. मागचे दोन्ही सीझन्स मार्को पिअर व्हाईट या कडक स्वभावाच्या फ्रेंच शेफने एक आठवडाभर या स्पर्धेला भेट दिली
Related imageImage result for maggie beer
होती. स्पर्धकांची त्याच्यासमोर जरा टरकते, पण त्याच्यात घाबरण्यासारखे काही नाही हे तोच दाखवून देतो. Intimidating, yes, but not imposing. त्याशिवाय उल्लेख करावासा वाटतो तो हेस्टन ब्लुमेनथाल या उत्कृष्ट शेफ आणि झकास माणसाचा! तसा ‘Playing with your food’ चा ते सगळेच भन्नाट अर्थ घेतात, पण या माणसाइतका कोणीच नाही. मी त्याच्या उचापतींचं वर्णन करू इच्छित नाही; ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आपण त्याची खरी मजा लुटू शकत नाही. तरी, हेस्टन ब्लुमेनथाल म्हणजे ड्राय आईस, क्षणात गारठून जाणारं आईस्क्रीम, आपोआप फुगून वर येणारे केक, पाणी ओतल्यावर विरघळणारे थर आणि खालून वाफाळलेलं पुडिंग अशा सगळ्या गोष्टी हे समीकरण माझ्या डोक्यात बसलंय.
Image result for heston blumenthal creations
पण दरवेळी फक्त हे प्रसिद्ध शेफच लक्षात राहतात अशातला भाग नाही. प्रत्येक सीझनमधले काही काही स्पर्धकही माझ्या अजून लक्षात आहेत. काही त्यांच्या पाककौशल्यामुळे, काही स्वभावामुळे तर काही विशिष्ट घटनांमुळे. तिसऱ्या सीझनमधल्या एका केटने Invention Test मध्ये एक साधा कॉफी केक करून परीक्षकांची करमणूक केली होती, आणि परीक्षकांनी त्यांच्या नेहमीच्या गोड पद्धतीने तिला ‘हे चालणार नाही बरे!’ अशी समज दिली होती. By the way, तो सीझन केटनेच जिंकला! त्यानंतरच्या एका सीझनमध्ये डॅनिएल केल्टी हा माणूस खूप कुशल असून अनेकदा उगीच उचापती करून ठेवायचा. त्याचं नाव घेतलं की त्या सीझनमध्ये त्यांची दुबईला ट्रिप गेली आणि तिथल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांची एक कामगिरी होती, तो प्रसंग आठवतो. परीक्षकांनी नमुन्यादाखल करून दिलेले पदार्थच परत करायचे होते. या कार्यक्रमात कामगिरी चालू असताना स्पर्धकांशी संवाद चालू असे. ही कामगिरी चालू असताना काहीसा अस्वस्थ झालेला केल्टी कॅमेऱ्याला सांगत होता, “आता ही डिश पुढे कशी करायची ते मला आठवत नाहीये बुवा! कारण मी जॉर्जचा नमुना तर खाऊन टाकला.” त्या कामगिरीत तो हरला नाही हेच विशेष! मागच्याच सीझनमधला रेनॉल्ड हा माझा आवडता स्पर्धक होता. तो एखाद्या कसलेल्या शेफसारखी डेझर्ट्स करायचा. त्याच्या एका डेझर्टला Immunity Challenge मध्ये तिन्ही परीक्षकांकडून विक्रमी पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. तो तिसऱ्या क्रमांकावर स्पर्धेबाहेर पडला, पण एका नावाजलेल्या पेस्ट्री शेफने त्याला तिथून उचलून थेट आपल्या हाताखाली नेमलं. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया न जिंकणाऱ्या स्पर्धकांनाही  विसरत नाही!
बऱ्याच वेळेला परीक्षकांच्या प्रतिक्रियाही लक्षात राहण्यासारख्या असतात. डिश फारशी चांगली झाली नसली की तसं स्पष्टपणे, पण भावना न दुखावता, ‘You can do better’, ‘Just not your day’ वगैरे म्हणून ते निर्णय देतात. डिश आवडली नाही तर ती सरळ कचरापेटीत सरकावण्याच्या Masterchef USAच्या प्रथेपेक्षा चांगलंच आहे की. याउलट, पदार्थ आवडला तर ते सांगायच्या त्यांच्या बऱ्याच पद्धती आहेत. आधी चेहऱ्यावर तृप्त भाव घेऊन ‘Love it!’ असं ओरडल्यावर त्या पदार्थाचं विश्लेषण करणे, किंवा काही न सांगता तो पदार्थ त्या स्पर्धकासमोर ठेवणे आणि ‘तू बघ’ म्हणणे, आणि नंतर थोड्या टाळ्या वाजवणे, हे सगळं खूप प्रोत्साहन देणारं असतं. रेनॉल्डचं एक अनपेक्षितरीत्या सुंदर डेझर्ट चाखून पाहिल्यावर गॅरी त्याला गमतीत म्हणाला होता, “कुठे लपून बसला होतास रे इतका काळ?” जॉर्जला तिखट फार खाता येत नाही, पण एकाने अगदी पहिल्या राउंडमध्ये ‘तांदुळाची भाकरी आणि भरीत’ असं अस्खलित नाव घेऊन तो पदार्थ पुढे केल्यावर जॉर्ज कपाळावरचा घाम पुसत ‘अप्रतिम आहे!’ असं खोकत खोकत म्हणाला होता. पण आजपर्यंत मी एकच प्रतिक्रिया पाहिली आहे, जी प्रत्येक स्पर्धकाला सर्वांत हवीहवीशी वाटते. पदार्थ समोर येतो, तिघे त्यात आपला काटा-चमचा खुपसतात. (हो, हे शिष्टाचार फार क्वचित विसरले जातात) घास घेऊन पाहिल्यावर एकमेकांकडे पाहतात पण काही बोलत नाहीत. मग शांतपणे परत आपापला चमचा खुपसून तो पदार्थ संपेपर्यंत खात राहतात. मग शेवटचं उरलेलं सॉस, ग्रेव्ही किंवा जे काही असेल, ते ज्याच्या वाट्याला येतं तो चाटूनपुसून घेऊन टाकतो. स्पर्धक चेहऱ्यावर वेगळंच तेज आणि समाधान घेऊन रिकामी ताटली उचलून घेऊन जातो. अशा प्रसंगी एक शब्दही इकडचा तिकडे होत नाही, पण हीच प्रतिक्रिया सगळ्यात बोलकी असते!!!
एकदा हा कार्यक्रम पाहिला की तुम्ही त्याच्या प्रेमातच पडता. तिथे आपल्यासमोर तयार होणारा प्रत्येक पदार्थ चाखून पाहायची अनावर इच्छा होते. (अर्थात बरेच पदार्थ ‘सामिष’ प्रकारात मोडणारे असतात. त्यामुळे शुद्ध शाकाहारी लोकांनाही असंच वाटतं का ते एकदा तपासायला हवं!) शाळेतला माझा एक मित्र आज माझा अगदी जवळचा मित्र असण्याला मास्टरशेफची आवड कारणीभूत आहे. माझ्या कॉलेजमधल्या एका जवळच्या मैत्रिणीलाही तो आवडतो. माझ्या आणखी एका नव्या मित्राने त्या सगळ्या पदार्थांवर आपण केवळ नेत्रसुख घेऊ शकतो, ही माझी कल्पना खोटी ठरवली. तो आत्ताही त्यात पाहिलेले अनेक पदार्थ करू शकतो आणि त्याच्या या छंदावर या कार्यक्रमाचा प्रभाव आहे असं तो म्हणतो. ही स्पर्धा या देशाला नवीन उत्साही आणि कुशल शेफ तर देतेच, पण शिवाय “माझा स्वयंपाक ‘त्या’ पातळीचा नाहीये” अशी समजूत बाळगणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या तमाम स्वयंपाकघरांतल्या कुक्सना आवाहन करते. या क्षेत्रात उतरण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी तर हा कार्यक्रम आवर्जून पाहावा. या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडमध्ये न चुकता ऐकायला मिळणाऱ्या त्या उत्साहवर्धक वाक्यातून मिळेल तितकं प्रोत्साहन तुम्हाला इतर कुठूनही मिळणार नाही : Your time starts now!  
Image result for masterchef australia logo



Another reality show awaits you on SP3

Comments

  1. Ahaa!! Kyaa baat hai! Season samplyamule alela ritepan yamule kahisa kami jhalay ata😁

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प