समोरचा पडदा ४
ब्रेकमध्ये कुठेही न गेल्याचे आभार! (हे वाक्य आपल्याला बहुतेक अतिनम्र वाहिन्यांवर वाचायला मिळतं. खरं म्हणजे आपण कुठे गेलो की नाही याची त्यांना काही कल्पना नसते, पण हे वाक्य आपलं एक आशावादी म्हणून. आणि तसंही, कुठे गेलो तरी त्यांना कशाला काही फरक पडेल? ब्रेक संपताच परत आलो हे जास्त महत्वाचं नाही का?)
उलट काही लोक या निरर्थक पण कळकळीच्या विनंतीकडे साफ दुर्लक्ष करून ब्रेकच्या वेळाचा पुरेपूर फायदा उठवतात. मलाही या ब्रेक्समुळेच मागच्या सीझनला मास्टरशेफ आणि शार्क टॅंकपैकी एकाची निवड करायचा कठोर निर्णय नाही घ्यावा लागला. अर्थात, सारख्या इकडून तिकडे उड्या मारत राहिल्याने मास्टरशेफची हवी तशी मजा घेता आली नाही, हेही तितकंच खरं. ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी ब्रेक म्हणजे सहनशीलतेचा अंत पाहणारी गोष्ट असते. विशेषतः तो अर्ध्या तासाच्या कार्यक्रमातला दुसरा ब्रेक! तो संपल्यावर जी पाचएक मिनिटं उरलेली असतात, त्यात आधीचाच एखादा सीन (संदर्भ सुटू नये म्हणून) आणि ‘काही क्षणांत’ मध्ये आपण पाहिलेले सीन दाखवल्यानंतर वेळ उरतो तो फक्त एखाद्या उत्कंठावर्धक क्षणावर कार्यक्रम संपवायला. माझ्या मते ‘काही क्षणांत’ हा तर आपल्या रोजच्या आयुष्यातला सर्वांत ठळकपणे जाणवणारा विरोधाभास आहे! या प्रकाराचा सगळ्यात जास्त त्रास सिनेमा पाहताना होतो. आपण पाहत असलेला सिनेमा आपल्या डोळ्यांदेखत संपतो. आपण आत्ताच पाहिलेला सीन हा नक्कीच शेवटचा असणार असं आपला अनुभव ओरडून सांगत असतो, पण मग ब्रेक येतो आणि काही चुकायला नको म्हणून आपण ते ‘काही क्षण’ तसेच बसून काढतो. आणि मग ब्रेक संपल्यावर श्रेयनामावली येते आणि तेव्हा निघतात ते उद्गार ऐकून लक्षात ठेवण्यासारखे नसतात!
यावर त्या मंडळींनी काढलेला तोडगा म्हणजे HD चॅनेल्स! इथलं चित्र खरोखरच जास्त स्पष्ट असतंच, पण शिवाय इथले ब्रेक्सही अक्षरश: काही क्षणांचेच असतात! ब्रेक सुरु झाला की लगेच वरच्या कोपऱ्यात तो संपायची वेळ दिसू लागते; आणि तीही बहुतेक वेळा दोन मिनिटांपेक्षा जास्त नसते. पर्वणीच! मग अशी चॅनेल्स आल्याची बातमी मिळाल्यावर ती शोधून काढणे, मग आधीच्या ‘Favourites’ List’ मधून जुन्या साध्या चॅनेल्सना हाकलून देऊन त्यांच्या जागी ही घालणे, हे सगळं करताना एक प्रकारचं समाधान मिळत असतं. असो, आता HDचं नावीन्य बऱ्यापैकी ओसरलंय, म्हणून आपणही त्यामुळे भारावून जाण्याच्या पलीकडे जाऊन आता त्यामुळे होणाऱ्या समस्या शोधू लागलो आहोत. आणि अशी एक मजेशीर समस्या आपल्याला सापडली आहे. त्याचं असं आहे, की HDच्या या सुविधांमुळे आपल्या कार्यक्रमांची वेफर्सच्या पाकिटांसारखी अवस्था झाली आहे. आता आपण २० रुपयाला वेफर्सचं पाकीट घेतलं तर त्यातले सरासरी १० रुपये वेफर्सचे आणि १० रुपये हवेचे हे आपल्याला सर्वांना माहित आहे. आता तेच आपण कार्यक्रमांच्या बाबतीत घडताना पाहतोय. एकूण अर्ध्या तासाचा कुठलाही कार्यक्रम सरासरी बावीस मिनिटांचा असतो. आता आपण याच्याशी सहज जुळवून घेऊ शकतो, पण त्रास होतो तो चॅनेलवाल्यांना! उरलेल्या आठ मिनिटांत करायचं काय?
मला असं दिसलं की प्रत्येक चॅनेलने या समस्येवर आपल्या परीने वेगवेगळे तोडगे काढले आहेत. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं ‘झी मराठी’ नुकतंच HD झालं, आणि त्यांची युक्ती तर अचाट होती. त्यांनी ‘आम्ही HD झालो होടട’ अशा आशयाचे साधारण तीनचार मिनिटांचे गाणे चित्रित करून घेतले. आणि सिरियल्स सम्पल्यानंतरची आठ मिनिटं हे आणि त्यांचं आधीचं ‘झी मराठी’चं गाणं लावून भरून काढतात. Talk about constant reminders of where you’re standing…… तर दुसरीकडे Comedy Central, FX, Zee Cafe वगैरे चॅनेल्सवर कार्यक्रम संपला की ते इतर कार्यक्रमातले काही प्रसंग दाखवतात. यामुळे एखादा एपिसोड पाहायचा राहून गेला असेल तर आधीच ताणलेली उत्सुकता अजूनच ताणली जाते आणि आपण तो एपिसोड नक्कीच पाहतो. माझ्या बाबतीत तरी असं होतं बुवा!
Comedy Central हे चॅनेल एकूणच हलकंफुलकं मनोरंजन करण्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच ते शक्य तिथे हलके विनोद करत असतात. आणि पडद्यावर ‘कृपया कुठेही जाऊ नका’ हे वाक्य वाचण्याची सवय असलेल्या मला त्यांच्याकडचं एक प्रेक्षकांना उद्देशून लिहिलेलं वाक्य पाहून अगदी धक्काच बसला. ‘फ्रेंड्स’ सुरु व्हायच्या काही क्षण अगोदर पडद्यावर ‘काल्पनिक पात्र आणि आमचा काही संबंध नाही’ ही सूचना आली आणि त्याच्या खाली, “Put your smartphones away; the courtesy never killed anyone.” काय हा स्पष्टवक्तेपणा! आणि यावर इतर वाहिन्यांना बहुधा वाटतं त्याप्रमाणे आपण चिडायच्या ऐवजी, निमूटपणे फोन खाली ठेवून तिकडे पाहायला लागतो! तसं हेच बरंय म्हणा, कारण ‘कृपया’ वगैरे शब्द या चॅनेलच्या स्वभावात बसण्यासारखे नाहीत.
पूर्वी माझा असा समज होता, की मराठी वाहिन्यांवर फक्त गंभीर कथा असतात आणि इंग्लिश वाहिन्यांवर फक्त विनोदी. कालांतराने हे दोन्ही समज खोटे ठरले, आणि चॅनेलचा असा काही ‘स्वभाव’ नसतो हेही कळलं. मराठीत केवळ काही चॅनेल्सच सारखी पाहत असल्याने, आणि तीही विशिष्ट वेळांनाच, असे समज निर्माण झाले असावेत. आणि इंग्लिशमध्येही, Comedy Central हा अपवाद सोडता बाकी सगळीकडे गंभीर कथांचीच सद्दी जाणवते. आणि गंभीर म्हणजे अतीच गंभीर! मराठी काय किंवा इंग्लिश काय, पण अशा कथांमध्ये आपली भावनिक गुंतवणूक होऊ शकते आणि म्हणूनच वेगळ्या धाटणीच्या गंभीर कथांना खूप प्रतिसाद मिळतो. तशा प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात. माझ्या स्वतःच्या कुणाही मित्राचा अथवा मैत्रिणीचा फक्त गंभीर गोष्टींकडेच कल आहे, असं मला कुठेच दिसलं नाही. त्यामुळे आवडीनिवडी कशाही असल्या, तरी एखाद्या खरोखरीच विनोदी कथेला बहुतेक सर्वजण आनंदाने डोक्यावर घेतात. ‘झी मराठी’वरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या बाबतीत तेच झालं, आणि आजही आम्ही ती मालिका परत येणार असल्याची बातमी ऐकून खूश झालो आहोत. (हो, अशा गोष्टींनीही हल्ली कुणी ‘हरखून’ वगैरे जात नाही)
‘झी मराठी’वरच्या, प्रत्येकी वेगळा विषय घेणाऱ्या तरी ‘लग्न’ या पायावरून फार लांब न सरकणाऱ्या मालिकांमुळे जरा मरगळ पसरलेली असताना, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने सुखद धक्का दिला. आयुष्यात काहीतरी ‘बनण्याची’ धडपड करणाऱ्या, भिन्न स्वभाव आणि वेगवेगळ्या कला अंगी असणाऱ्या सहा जणांची ही गोष्ट. काही कारणामुळे हिची तुलना ‘फ्रेंड्स’शी केली गेली, पण ती जशी त्या संस्कृतीशी एकरूप आहे तशीच ही आपल्याशी आहे. विशेष म्हणजे एक अत्यंत नाजूक आणि गंभीर विषय हाताळतानाही ही मालिका गरजेनुसार विनोदी आणि गरजेनुसार गंभीर होण्यात यशस्वी झाली. हिच्या पहिल्या सीझनची (अहाहा, हे म्हणायला किती छान वाटतं!) सुरुवात रेश्मा पाटील या साध्या मध्यमवर्गीय घरातल्या मुलीच्या आयुष्यात आलेल्या अनपेक्षित कलाटणीने होते, ज्यामुळे ती ‘माजघर’ नामक विश्वाचा एक अविभाज्य भाग बनून जाते. आणि संपतेही तिच्या आयुष्यातला तो मोठा प्रश्न सुटण्यातून होते. मधल्या काळात आपली ओळख होते ती तिची आणि इतर पाच जणांची, ज्यांच्या प्रत्येकाच्या कहाण्या गोष्टीसोबत उलगडत जातात.
रेश्माचा नवरा लग्नानंतर तिला त्याच्या अफेअरबद्दल सांगतो आणि ती, तिच्या आईवडिलांची बदनामी होऊ नये म्हणून हे सत्य दीर्घकाळ त्यांच्यापासून लपवते. मुंबईत एकटी असताना तिला अपघातानेच मीनल शेवाळे ही हळव्या पण बाणेदार स्वभावाची होतकरू अभिनेत्री सरळ आपल्या घरी घेऊन येते. घरातल्या इतरांचा तिच्या घरात राहण्यावर असलेला आक्षेप हळूहळू नाहीसा होतो आणि तेही तिच्या आईवडिलांपासून ते सत्य लपवायला तिला मदत करतात. सुरुवातीला त्याच घरातला भाडेकरू असलेला संगीतकार कैवल्य कारखानीस तिच्यावर चोरीचा आळ घेतो, तेव्हा तो फार कठोर भासतो, पण नंतरच्या अनेक प्रसंगात त्याची हळवी, संवेदनशील आणि निर्मळ अशी दुसरी बाजू कळते. घर असतं सुजय साठे या साध्या मध्यमवर्गीय IT कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाच्या मालकीचं. घरातले इतर दोन भाडेकरू म्हणजे भाबडे आणि निरागस स्वभावाचे आशुतोष शिवलकर आणि अॅना मॅथ्यूज हे असतात. ही कथा पुढे जाते तसे या सगळ्यांचे भूतकाळ आणि मुंबईत असं राहण्याचं कारण आपल्यासमोर येतं. प्रत्येकाच्या कहाणीतले नाजूक विषय अतिशय सहजतेने आणि मूळचा विनोदी पाया कायम ठेवत हाताळले गेले आहेत.
अॅना ही एका फॅशन डिझायनिंग कंपनीत नोकरी करते, आणि ती स्वभावाने अगदीच निरागस व काही प्रमाणात बालिश असते. घरी आईवडिलांच्या सततच्या भांडणाला कंटाळून ती इथे आलेली असते. ‘आशू’ या नावाने परिसरात ओळखला जाणारा आशुतोष हा गावाकडचा, शिक्षण बेताचं असलेला आणि भूतकाळात काही हालअपेष्टा काढलेला तरुण मुलगा आहे. त्याला स्वतःच्या, त्याच्याच शब्दात ‘लो स्टँडर्ड’पणातून कायमचं बाहेर पडायची तीव्र इच्छा आहे आणि या बाबतीत तो नेहमीच हळवा असतो. त्या सहाजणांपैकी सगळ्यात ‘यशस्वी’ म्हणता येईल असा सुजय, चांगली नोकरी असल्याने बऱ्यापैकी स्थिरावलेला आहे, पण तो त्याच्या बहिणीच्या उपचारांसाठी पैसे साठवत असल्याचं बराच काळ त्याच्या मित्रांना आणि आपल्यालाही कळू देत नाही. कैवल्यने आपल्यासोबत आपला व्यवसाय चालवावा अशी अपेक्षा करणाऱ्या आणि त्याच्या कलेला कमी लेखणाऱ्या त्याच्या वडिलांशी तो भांडून बाहेर पडलेला आहे. कधीकधी काहीशा कडवटपणे वागणाऱ्या पण मनातून खूप चांगल्या अशा कैवल्यला कलेच्या बळावर वडिलांना ‘दाखवून द्यायची’ इच्छा आहे. या बाबतीत त्याच्यात आणि मीनलमध्ये खूप साम्य आहे. तिच्या वडिलांना मुलगा हवा असल्याने त्यांनी तिला कधीच योग्य ती वागणूक दिली नाही असं तिचं मत आहे, आणि अभिनयात यश मिळवून स्त्रियाही पुरुषांइतक्याच सक्षम असतात हे त्यांना दाखवायची तिला इच्छा आहे. पुरुषप्रधान संस्कृतीची तिला खूप चीड आहे. आणि या सगळ्यापेक्षा खूप वेगळ्या भासणाऱ्या, काहीशा अबोल, संकोची स्वभावाच्या रेश्माला, नवऱ्याने फसवल्यावरही तो तिच्याकडे परत येईल अशी कणभर आशा आहे. आपापल्या स्वप्नांना जिवंत ठेवत जिद्दीने कष्ट करणाऱ्या या सहा लोकांची कहाणी, वेगळीच भासली, आणि खूप आवडली.
या मालिकेने संपूर्ण सीझनभर एक अद्भुत समतोल राखला. काही एपिसोड असे गंभीर, उलगडत नेणारे तर काही अगदी हलकेफुलके पण खरोखरच हसवणारे. अशा हलक्याफुलक्या एपिसोडमधल्या गोष्टी त्याच एपिसोडमध्ये संपत, तर गंभीर गोष्टी काही एपिसोड टिकणारे. पण एक असा विषय संपला, की पुढचा एपिसोड पूर्ण विनोदी असणार ही खात्रीच असे! या प्रकारामुळे हा समतोल चांगला राही. या मंडळींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनी आपल्याला खूप हसवलं, तर दुसरीकडे त्यांनी इतर कितीतरी गंभीर विषय हाताळले. त्यांच्याच कॉलनीतल्या अतिअभ्यासू मुलाचे पहिल्यांदा कॉलेजला जातानाचे प्रश्न, काही एपिसोड चमकून गेलेल्या शॉर्ट फिल्म आर्टिस्टची गोष्ट, कौशल्य असूनही संधी नसल्याने पोटासाठी नाईलाजाने यांच्या घरात घुसलेल्या सज्जन चोराची कथा........ किती सांगावेत? सर्व सीझनच अतिशय मनोरंजक आणि बोधप्रद होता. अखेर तिच्या लहान बहिणीच्या लग्नात रेश्मा आईवडिलांना खरं सांगून टाकते, आणि तिच्या नवऱ्याच्या वडिलांनी त्याला तिला घरात घ्यायला सांगितल्यावर तोही त्याच्या प्रेमिकेच्या बाजूने ठाम राहतो. अर्थात, ही काही सफाई नसून, त्याने रेश्माच्या वडिलांच्या पैशाच्या मोहापायी तिच्याशी लग्न केलेलं असतं हेही स्पष्ट होतंच. पण तिच्या समस्येचा शेवट होतो, ती मनातूनही त्यातून बाहेर पडते आणि परत माजघरात राहायला येते.
मी एकदा असं कल्पनाचित्र रंगवलं की ही मालिका सहा सीझन चालावी, आणि प्रत्येक सीझनची सुरुवात प्रत्येकाच्या समस्येने होऊन शेवट ती सुटण्यात व्हावा. आणि यशस्वी झाल्यावरही ते सगळे एकत्र राहायला परत यावेत. या मालिकेने इतकं गुंतवून ठेवलं, की एक तटस्थ प्रेक्षक म्हणून पाहतानाही मला ‘स्वीस फॅमिली रॉबिन्सन’ या दीर्घकथेच्या शेवटी होतं तसं झालं. अपघाताने एका निर्जन बेटावर अडकलेल्या कुटुंबाला, दहा वर्ष तिथे राहिल्यानंतर ते बेट इतकं घरासारखं वाटू लागतं, की जहाज वाचवायला आल्यावरही ते परत जात नाहीत, असं काहीसं वाटलं. गरज म्हणून एकत्र राहणाऱ्या या सहाजणांची निखळ मैत्री आणि घनिष्ट संबंध यामुळे या गरजा संपल्यावरही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ कायम राहील असं माझं मत होतं.
काळानुसार मी अनेक इंग्लिश विनोदी मालिका पाहिल्या, पण त्यांच्यातही हा फरक दिसून आला. काही काही, ‘That 70’s Show’ किंवा ‘Are You Being Served’ अशा मालिका म्हणजे पूर्णतः हलक्या विनोदांवर आधारित. Are You Being Served ही लंडनमधल्या एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या सात-आठ मध्यमवर्गीय लोकांची गोष्ट. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अजिबात न डोकावता, फक्त त्यांच्या नोकरीच्या सहजीवनातल्या गंमतीजंमती सांगणारी. अशा अनेक मालिका असतात. त्या जेवताना मनोरंजन करतात आणि TV पाहण्याचा तो उद्देश सफल होऊ देतात. पण एवढ्या मालिकांतून दिल दोस्ती सारखीच, विनोदांतूनही गंभीर विषय हाताळणारी आणि परिस्थितीजन्य विनोदही करणारी अशी एकच मालिका मला माहित आहे. ती म्हणजे ‘Everybody Loves Raymond’. न्यू यॉर्कच्या ‘लॉंग आयलंड’ परिसरात राहणाऱ्या एका व्यवसायाने लेखक असलेल्या रेमंडची ही गोष्ट. तिथल्या स्थानिक पण लोकप्रिय वर्तमानपत्रात त्याचं ‘क्रीडा’ पानावर सदर आहे. तो, त्याची बायको डेब्रा, मुलगी अॅली आणि जुळी मुलं मायकेल आणि जेफ्री असे लिनब्रुकमधल्या एका घरात राहतात. त्यांच्या पलीकडच्या घरात रेमंडचे आईवडील, फ्रॅंक आणि मरी, आणि मोठा भाऊ रॉबर्ट असे राहतात.
‘रे’ हा या सगळ्या कथेच्या केंद्रस्थानी असतो आणि त्याच्या लहानशा विश्वात ही कथा घडते. त्याचे आईवडील त्याच्या रोजच्या आयुष्यात सारखी ढवळाढवळ करणारे असतात, आणि याच कारणामुळे डेब्रा त्यांच्यावर फार वैतागते. डेब्रा ही एक सहनशील गृहिणी आणि मरी ही टिपिकल ‘सासू’ असल्याने अचानक ही मालिका आईला आणि आजीलाही जवळची वाटू लागते. फरक इतकाच की डेब्रा ही सगळ्यात कौतुकास्पद, सद्गुणी आणि घरातल्या माणसांना जोडणारी सून अशी न दाखवल्याने, कौटुंबिक कलहाचा विषय त्यांना जास्त वास्तवदर्शी पद्धतीने मांडता आला आहे. दुसरीकडे रेचा मोठा भाऊ रॉबर्ट हा त्याच्या लहान भावाच्या यशावर कायम जळत असलेला दाखवला आहे. तो एक पोलीस अधिकारी आहे, पण रे त्याच्या आईचा लाडका असून त्याला नेहमीच सगळं आरामात मिळालं, असं त्याचं मत आहे. रेचं लग्न झालेलं असल्याचा त्याला सर्वाधिक हेवा वाटतो, कारण त्याचा स्वतःचा घटस्फोट होऊन तो मालिकेचा बराच काळ एकटाच असतो. या सगळ्यातून प्रत्येक एपिसोडमध्ये निर्माण होणारे ताणतणाव आणि उमटणारे उत्स्फूर्त आणि सुंदर विनोद यावर ही मालिका खूप लोकप्रिय झाली. तरीही या सगळ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांचं एकमेकांवर आतून खूप प्रेम असल्याची उदाहरणही आपल्याला क्षणोक्षणी मिळतात.
या मालिकेचं शीर्षक, अर्थात ‘Everybody Loves Raymond’ हे वाक्य मूळचं रॉबर्टचं असतं, आणि हा त्याचा सगळ्या जगावर आरोप आहे. त्यातून रे त्याला चिडवायची एकही संधी सोडत नसल्याने तोही या बाबतीत जरा जास्त कडवट आहे. पण दोन्ही भावांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम असल्याचं आपल्याला जाणवत राहतं, आणि आईवडिलांच्या विरोधात बोलताना ते अगदी उफाळून येतं. रे आणि रॉबर्टच्या आईवडिलांच्या पात्रांना त्यांनी खास मनुष्यविशेषाचा नमुना म्हणून तयार केलं आहे. मरीला नेहमी रेला आणि रॉबर्टलाही अति जपण्याची इच्छा असते, आणि दुसरीकडे फ्रॅंकला आपल्या मुलांवरचं प्रेम चुकूनही व्यक्त करायला आवडत नाही. फ्रॅंक हे काही अर्थी मालिकेतलं सर्वात विनोदी पात्र आहे. स्पष्टवक्तेपणा आणि सहज उमटणारे खवचट विनोद यांचं तो प्रतीक आहे. त्याला एकूणच नाटकीपणाची चीड येते, पण वेळप्रसंगी परिवाराची काळजी घ्यायला तो तत्परतेने पुढे येतो. काही एपिसोडमध्ये वरवर खवचट वाटणाऱ्या या सगळ्यांचीच दुसरी बाजू समोर येते, आणि रोजच्या यांच्या वागण्यावरून आपण जे अंदाज बांधतो, तसे हे अशा प्रसंगी वागत नाहीत म्हणून वेगळीच मजा येते.
प्रत्येक सीझनचा शेवटचा एपिसोड ते फ्लॅशबॅकसाठी राखून ठेवतात. कारण कथेची सुरुवात रेच्या रोजच्या आयुष्यापासूनच होते आणि म्हणून भूतकाळातल्या काही महत्वाच्या घटना त्यांनी अशा दाखवल्या होत्या. पहिला फ्लॅशबॅक असतो ‘आपण मुळात आईबाबांच्या समोरचं घर का घेतलं’ यावर रे आणि डेब्रा विचार करतात असा होता. या फ्लॅशबॅक्सची मजा असते या लोकांच्या स्वभावातले बदल पाहण्यात. आणि काही घटना वेगळ्याच दिशेने जाणाऱ्या भासल्या तरी भविष्यातली, म्हणजेच आजची सत्य परिस्थिती आपल्याला ठाऊक असल्याने ते पाहताना खूप मजा वाटते. उदाहरणार्थ, या एपिसोडमध्ये डेब्रा म्हणते, “तू तुला हवं तिथे नवीन घर बघ रे. व्यक्तिशः मला तुझ्या आईवडिलांबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये.” शिवाय, रे आणि डेब्रा पहिल्यांदा भेटतात तो फ्लॅशबॅक दाखवणाऱ्या एपिसोडमध्ये डेब्राशी पहिली भेट झाल्यावर लगेच मरी, “रे हिचं आणि तुझं जमणार नाही” असे उद्गार काढते, वगैरे वगैरे. शेवटी, मालिकेच्या मूळ प्रवाहात झालेल्या महत्वाच्या बदलांपैकी फक्त रॉबर्टचं लग्नच शेवटपर्यंत टिकलं. आणि आपली ओळख करून देताना रे स्वतःच जरी ‘It’s not really about the kids’ असं म्हणाला असला तरी ती मुलं मोठी होतात तसे त्यांचे विषय, जनरेशन गॅप वगैरे सहजतेने हाताळलं जातं. कुणीही कलाकार न बदलल्याने आणि घटनांचा प्रवाह एकाच दिशेने नेल्याने, (ही सिटकॉम नाहीये) ही मालिका बऱ्याच प्रमाणात ‘प्रपंच’ सारख्या मालिकेचं एक आत्यंतिक विनोदी रूप वाटतं. विशेष म्हणजे, अगदी शेवटच्या एपिसोडमध्येही वरवर कितीही खवटपणा दाखवला तरी आतून सगळ्यांना रेबद्दल प्रेम वाटतं हे पुन्हा एकदा ठसवून, त्या संपूर्ण कुटुंबाच्या रोजच्या आयुष्यातल्या एका प्रसंगावरच, सुरुवात आणि शेवट यांच्यात काही मोठा फरक न जाणवू देता, ही मालिका आपला निरोप घेते.
डावीकडून रॉबर्ट, त्याची बायको एमी, अॅली, डेब्रा, जुळे भाऊ मायकेल आणि जेफ्री, मरी, फ्रॅंक आणि मागे छत्री घेतलेला रे
असो. आजवर ज्या मालिका सलग पाहायच्या म्हणून ठरवल्या, त्यापैकी या दोन खास लक्षात राहण्यासारख्या आहेत. रेमंडचे सगळे सीझन रेकॉर्ड करून ठेवल्याबद्दल मी बाबांचा आभारी आहे, आणि दिल दोस्तीच्या बाबतीत हे शक्य असल्यास मीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकेन. शेवटी आपण TV समोर जाऊन बसतो आपलं मनोरंजन करायला, पण अनपेक्षितपणे काहीतरी बहुमूल्य हाती लागतं आणि आपण त्याकडे खेचले जातो. केवळ या कार्यक्रमांसाठी TV असल्याचं आणि गुणी मुलासारखा अभ्यास आधी उरकल्याने हवा तितका वेळ तो पाहायची मुभा असल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. तूर्तास, माझ्या आठवणीतल्या लक्षवेधी कार्यक्रमांचं वर्णन संपवून, ही समोरचा पडदा नामक मालिका इथे आटोपती घेतो. बराच वेळ लिहीत बसलो होतो. आता जरा TV पाहावा. कुणास ठाऊक? पुढच्या लेखांचे माझे बेत मला बदलायला लावून ही मालिका चालू ठेवण्याच्या ताकदीचं काहीतरी सापडेल, काय सांगावं?
Let's now move to the big screen with SP5
Let's now move to the big screen with SP5
Waah! Hi series farch avadli....baryach navin darjedar shows baddal kalala! Maja ali vachtana👍
ReplyDeleteकॉमेडी सेंट्रल चा उल्लेख केलास म्हणून..
ReplyDeleteअम्रेरिकन लोकशाहीच्या खुलेपणाचा खरा आविष्कार पाहायला मिळतो तो तिथल्या late night talk shows मधून. रात्री उशीराची वेळ असल्याने त्यांना काहीही बोलायचं स्वातंत्र्य आहे आणि त्याचा पुरेपूर वापर ते करतात. ट्र्म्प सारखा विषय असल्याने सध्या तर धमालच आहे.
असं काही आपल्याकडे घडेल याची आपण कल्पना केली तरी तशा नुसत्या कल्पनेने इथे भावना दुखावल्या जातील.
Seth Myers : Late Night with Seth Myers on NBC
Stephen Colbert : Late show with Stephen Colbert on CBS
John Oliver : Last Week Tonight on HBO
Trevor Noah : The Daily show on comedy central
आणि अर्थातच
SNL