पलीकडे : उंबरठ्यावर
लहानपणी ‘कुरूप बदका’ची गोष्ट सर्वांनीच ऐकलेली किंवा वाचलेली असेल. अर्थात, प्रत्येक माध्यमाच्या तऱ्हा वेगळ्या असणार. मी एका साध्या गोष्टींच्या पुस्तकात वाचली होती. अर्थात, ही गोष्ट इतकी फिरली आहे की सगळ्या संवादांसकट ती त्याच रूपात सगळीकडे पसरली असेल अशी कल्पनाच हास्यास्पद आहे. मी वाचलेल्या गोष्टीतला एक संवाद मला, या विषयावर लिहायला घेतलं तेव्हा आठवला. तो म्हणजे, जेव्हा सगळ्या पिल्लांचा जन्म होतो - कुरूप बदकाचाही - तेव्हा ती जग पाहून भारावून जातात. ती त्यांच्या आईला म्हणतात, “आई, किती सुंदर जग आहे हे! हे किती मोठ्ठं असेल!” आणि बदकीणबाई म्हणतात, “बाळांनो, जग त्या तिकडच्या कुंपणापर्यंत आहे बरं का!”
जन्मताक्षणीच बदकाच्या पिल्लांना इतके प्रगल्भ विचार कसे सुचले हा प्रश्न जरा वेळ बाजूला ठेवूया. तेव्हा मला या उत्तराचं हसू आलं होतं, पण आता असं वाटतं की यामागे खूप चतुराई दडलेली आहे. हे सांगून बदकीणबाईंनी आपली पिल्लं मोठी होईपर्यंत कुंपणापलीकडे जाणार नाहीत अशी व्यवस्था नाही का केली? कदाचित पिल्लांना खाणारी मंडळी कुंपणातून आत येत नसावीत. पिल्लं मोठी आणि समजूतदार झाली की त्यांना आपोआप जगाचा विस्तार माहित होईल आणि ते स्वतःचे स्वतः जगायला शिकतील.
आपण माणसंच या बाबतीत याहूनही जास्त प्रोटेक्टिव्ह असतो. आता आपल्या आयुष्यातले पहिले काही दिवस हॉस्पिटलमध्ये आणि मग एका कमालीच्या सुरक्षित वातावरणात जातात. मोजक्याच लोकांशी आपली ओळख करून दिली जाते. स्वतंत्र हालचाल जमू लागली की प्राण्यांच्यात स्वतःचं अन्न हुडकायला पाठवतात, पण आपलं संरक्षण संपत नाही. तेही योग्यच आहे म्हणा. आपण निर्माण केलेल्या मानवी दुनियेत अन्न हुडकणं इतकं सोपं नसतं, त्यासाठी स्पेशलायझेशन करून नोकरी मिळवावी लागते. आपल्या जगात योग्य ते ज्ञान प्राप्त करण्याला खूप तात्विक महत्त्व असल्याने आपण सगळ्या गोष्टी शिकून सक्षम होईपर्यंत आपलं संरक्षण काढलं जात नाही. पण ही झाली रोजच्या जीवनाची गोष्ट. आपण या मार्गावर प्रत्यक्षात जे ज्ञान मिळवतो, ते आपण आपलं मिळवत जातो की त्यावरही कुणाचा डोळा असतो? आपल्याला लहानपणापासून माहितीही ‘एन्क्रिप्टेड’ स्वरूपातच मिळत असते का?
हो, आपण मोठे होईपर्यंत आपले आईवडील आणि बाकीचे आपल्याला खऱ्या जगापासून अनभिज्ञ ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे नैसर्गिक आहे. तयार झाल्याशिवाय उंबरठा ओलांडू नये. पण आता हे अतीच तात्विक होत चाललंय आणि, कॉलेजमध्ये तत्वज्ञान घेतल्यामुळे, एका मर्यादेपलीकडे ते डोक्यात जायला लागतं हे मी स्वानुभवावरून सांगतो. म्हणून मी सरळ मुद्द्यावर येतो. हे संरक्षण कुणाला जाचक वाटत असलं, तर त्यांच्या लक्षातही येत नसेल की आपण सर्व जन्मापासून यापेक्षाही जास्त सुरक्षित वातावरणात जगत असतो. आपण सर्व म्हणजे संपूर्ण मानवजात, प्राणिमात्र, वनस्पती आणि जीवसृष्टीतले सर्व घटक, या सगळ्यांना उंबरठ्यापलीकडे असलेल्या ‘खऱ्या’ जगापासून अलिप्त ठेवण्याचं काम आपली सर्वांची जननी गेल्या जवळपास चार अब्ज वर्षांपासून करत आहे. फरक एवढाच आहे, की आपलय आईला जगाचा अनुभव असल्याने ती काळजीपोटी हे करत असते, पण इकडे आपली धरणीमाता आपल्याला कशापासून सुरक्षित ठेवत आहे, ते तिलाही नीटसं कळलेलं नाहीये. आपल्यालाही जरी आपल्या ज्ञानाच्या तुलनेत याबद्दल खूप माहिती असली तरी एकूण अनुभव आपलाही नगण्य आहे.
पण अगदी पूर्वीच्या काळापासून आपल्या सर्वांना आपल्या वरच्या ताऱ्यांनी चमचमणाऱ्या छताने भुरळ घातली आहे. दिवसा निळाशार आणि रात्री पूर्ण काळे दिसणारे, आपण कुठेही हललो तरी आपल्याकडेच पाहणाऱ्या चांदण्यांनी सजवलेले छत. पृथ्वीवर कुठूनही तसेच दिसणारे. याच छताच्या अनोख्या पडद्यावर आपल्याला पृथ्वीवरील सर्वांत मनोहर दृश्यांपैकी काही दिसतात. दिवसा पाहायचा प्रयत्न केला तर डोळे दुखावणारा सूर्य उगवताना आणि मावळताना अत्यंत सुंदर दिसतो. सुरुवातीला या प्रकाशदात्याचे असे निघून जाणे निराशाजनक वाटले, तरी हुरूप द्यायला रात्रीच्या काळ्या आकाशातला मोठा सफेत चंद्र आणि असंख्य चांदण्या असतात ना. या पार्श्वभूमीवर आपल्याला पांढरा रंग सोनेरीच्या खालोखाल भावतो. रात्रीच्या आकाशाने आपल्या चिमुकल्या जगाला पूर्णपणे अंधाराने वेढून टाकले, की हा चंद्र आणि चांदण्या प्रकाश पाडतात आणि चाचपडत का होईना, पण माणूस पुन्हा उभा राहतो.
नेहमीप्रमाणे, ज्यावर बंदी घातलेली असते त्याचे कुतूहल आपल्याला सगळ्यात जास्त अस्वस्थ करते. आणि या बाबतीत बंदी तर कल्पनेपलीकडची आहे! आपल्या आणि ‘त्या’च्या मध्ये दाट वायूंचे भलेमोठे कुंपण आहे. त्याशिवाय, आपल्या मातेची ओढ प्रचंड! तिच्या गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे जायला आपल्याला सतरा उचापती कराव्या लागतात. आपली अवकाशयाने एका अजस्त्र इंधनटाकीला जोडून जोरात उडी मारावी लागते. रॉकेट सुटतं, त्या क्षणी जो हादरा बसतो, त्याचं वर्णन करताना स्टीफन हॉकिंगचं वाक्य असं : “तो हादरा म्हणजे पृष्ठभागावर जोरात मारलेल्या लाथेसारखा असतो.” अर्थात, त्यांनी स्वतः ही लाथ अनुभवली नसली तरी त्यांचं या विषयाचं एकूण ज्ञान पाहता हे मत योग्यच असेल.
आणि एकदा गेलो, की सत्य आपल्यावर जास्त स्पष्टपणे आदळतं. आपण ठिकठिकाणी बसवलेल्या साध्या आणि रेडिओ दुर्बिणींमधून आपल्याला मिळालेली छायाचित्रे जरी रात्रीच्या चमचमत्या दृष्यापेक्षा जास्त वास्तवदर्शी असली, तरी अंतराळवीरांच्या मते खरं काय ते तिथे फार सहज जाणवतं. उपग्रहांनी काढलेले सूर्याचे फोटो पाहिले की मला मी आणि माझ्या वयाच्या सर्वांनी लहानपणी काढलेली निसर्गचित्रं आठवत. एक नदी वाहतेय, पलीकडे एक कौलारू घर आहे, पाठीमागे दोन डोंगर आहेत आणि त्यांच्यातून डोकावणारा सूर्य आहे. ‘लिट्ल आर्टिस्ट’ म्हणवून घेत असलो तर पतंग उडवणारी मुलेही आहेत. शिवाय ते आकाशातले चारच्या आकड्यासारखे दिसणारे पक्षी तर असतातच! मला वाटतं की आपण काढलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात तशा नसतात हे आपल्याला तेव्हापासून कळत असते. डोंगर, पक्षी, नद्या, घरे सगळं वास्तवात वेगळं असलं तरी आपला सूर्य मात्र तसाच असणार अशी आपल्याला तेव्हा एक खात्री असते. कारण आपण जसा काढतो तसाच नाही का तो दिसत, निळ्याशार आकाशात मोठ्या बुंदीच्या लाडवासारखा पिवळा गोळा?
खरा सूर्य पाहणं म्हणजे माझ्या मते पाश्चात्य देशांत लहान मुलांना सांताक्लॉज खरा नसतो हे कळण्यासारखं आहे. इथून दिसणारा सूर्य आपल्याला आपलासा वाटतो, कारण इथून तो तुलनेने सौम्य आणि बघायला त्रासदायक वाटत नाही. पण खरा सूर्य म्हणजे त्या अथांग काळ्या पृष्ठभागावर ठेवलेला सदैव तळपणारा आणि चमकणारा, गडद केशरी रंगाचा प्रचंड गोळा असल्याने तो बघणाऱ्यावर आघात करतो. आपल्यात अंतर खूप असल्याने त्याचा फक्त प्रकाश आणि थोडीशी ऊब आपल्यापर्यंत पोहोचते, पण झळ बसत नाही. शिवाय त्या चमकदार केशरी पृष्ठभागावर असलेले अनंत काळे डाग, काही ठिकाणी दिसणारा पांढरा प्रकाश आणि काही वेळाने न चुकता दिसणाऱ्या, अवकाशात लांबवर पसरणाऱ्या आगीच्या लाटा...... हे सगळं आपल्याला काहीसं भीतीदायक भासतं. पण असं असूनही सूर्य सुंदर दिसतो. अंतराळातून दिसणारा सूर्य हे ‘Intimidating Beauty’चं छान उदाहरण आहे.
विरोधाभासात्मक.......
जी गत सूर्याची तीच आपल्याला इथून दिसणाऱ्या इतर मनोहर दृश्यांची. इथून नुकताच धोब्याकडून आणल्यासारखा दिसणारा चंद्र तिथे गेल्यावर अगदीच मळकट वाटतो. (आता इथून तिथपर्यंत जायला जो वेळ लागतो, त्यात धूळ नाही का साचणार? असं काही लोक म्हणायचे म्हणे) शिवाय आपल्या रात्रीच्या आकाशात दिसणारी सर्वांत प्रखर चांदणी, तिथे गेल्यावरही तितक्याच अंतरावर दिसते. (प्रत्यक्षात तो ‘नरतुरंग’ नावाचा तारा असून आपल्या सगळ्यात जवळची ग्रहमाला त्याची आहे. त्याचे इंग्लिश नाव Proxima Centauri असे आहे.) इथून दिसणाऱ्या या गोष्टी आणि त्यांचं प्रत्यक्षातलं रूप यांच्यात एवढी तफावत आढळत असेल, तर आपली धरणीमाता आपल्यापासून काही गोष्टी आणि माहिती सर्वकाळ लपवत असते, हे कसं अमान्य करता येईल?
पण ती फक्त या स्वरूपाच्या गोष्टीच लपवते अशातला भाग नाही. तिथे गेल्यावर आपल्याला कळतं, की तिथून दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींतली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे आपली पृथ्वीच! पांढऱ्याशुभ्र आणि विरळ अशा ढगांनी वेढलेला नीलमणी. जमिनीवर जिकडेतिकडे पसरलेली हिरवळ आणि आपल्या काँक्रीट जंगले म्हणजे त्यात मध्येमध्ये उठणारे इवलेसे ठिपके असे दिसतात, तेव्हा वाटतं की परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. आणि हे सौंदर्य जपण्यासाठी आपण आखलेल्या मार्गांवर जास्त नेटाने चालायला लागूया.
पृथ्वीच्या एकूण आयुष्याच्या तुलनेत आपली मानवजात वयाने फारच लहान आहे. तरीही आपल्याला आता उंबरठा ओलांडण्यात यश आलं आहे. पण अंगण एवढे मोठे आहे, की सगळे फिरून यायला भरपूर वेळ लागेल, हे ओळखून आपण उंबरठ्यावरच बसून सगळे अंगण न्याहाळण्याचा प्रयत्नही करतो आहोत. आणि आपल्याला बरंच काही ठाऊक झालेलं आहे. त्याबद्दल पुढच्या लेखात. पण परत फिरायला नको. कारण एरवी कितीही जपणारी असली, तरी बाहेर काय आहे ते पाहिल्यावर गळपटून मागे फिरायला तरी तिने शिकवलंय का आपल्याला?
Let's go into the backyard in Plk2
Let's go into the backyard in Plk2
Surekh......ugach tatvik phaphatpasara naie......muddyala dharun aani surekh lihilays.......ha attaparyantacha sarwaat aavadata lekh aahe tu lihilela.......
ReplyDelete-Sushant
👌 neelmani chi upama ani shevatche vakya khas avdle. (Btw Te lahanpanicha chitra kharokhar tujhach tar nahi?
ReplyDelete😂🙈)