…. आणि अखेर येतो होकार


‘हे पुस्तक वाच’ असं सांगितल्यावर मी एक पुस्तक वाचलं आणि आपणहून त्याच्यावर स्तुतिपर लेख लिहायचं ठरवलं ही घटना अगदीच अकल्पित आहे. पण ज्यांच्या बाबतीत असे अपवाद घडतात ते असतातच सर्व बाबतीत Exceptional!! हे पुस्तक, किंवा खरे तर ही दोन पुस्तके एकदम झेप घेऊन माझ्या हृदयात शिरली. हे म्हणजे, त्यांच्याच परिभाषेत, ही पुस्तके ‘High Flyers’ असण्याचं लक्षण होतं. मी आजवर वाचलेली सर्वोत्तम कथा ही आहे असं विधान केलं असतं, पण मी ‘हॅरी पॉटर’शी चुकूनही अशी प्रतारणा करू इच्छित नाही. ही कथा ‘fiction’ नाहीये हे एक बरं! कथानक काल्पनिक आहे एवढं खरं, पण सत्याच्या इतक्या जवळ जाणारी दुसरी कुठलीही कथा वाचल्याचं मला आठवत नाही. ही सगळी कथा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या, ऐंशी ते नव्वदीच्या दशकांच्या दरम्यान लंडन शहरात घडते. (मनात आलेली शंका ताबडतोब बाजूला करा. शेरलॉक होम्स त्याच्या आधीच्या शतकात होता) एका निवडणुकीच्या निकालापासून या कथेला सुरुवात होते. ही कथा म्हणजेच साहित्याच्या इतिहासात अजरामर झालेल्या ‘Yes Minister’ आणि ‘Yes Prime Minister’ या दोन अद्भुत कलाकृती!
आपल्याकडे राजकारण्यांच्या आठवणी किंवा डायरी प्रकाशित करायची एवढी टूम नसली, तरी तिकडे याला खूप महत्त्व आहे असे दिसते. अशा अनेक मंत्र्यांच्या आणि प्रधानमंत्र्यांच्या डायरीजपैकी एक काल्पनिक डायरी आपल्या काल्पनिक नायकाची, ब्रिटिश सरकारमधल्या त्याच्या काल्पनिक कारकिर्दीचे आणि काल्पनिक अनुभवांचे वर्णन करणारी! ‘जिम हॅकर’ हे साधेसरळ नाव धारण करणारा हा साधासरळ मनुष्य. तो सर्वसाधारणपणे हुशार आहे आणि विरोधी पक्षात असताना तो एका नियतकालिकाचा संपादक होता. त्याच्या पक्षाने सत्ता मिळवल्यावर त्याला ‘प्रशासनखात्या’चा (Department of Administrative Affairs) मंत्री बनवण्यात येतं. तिथे Civil Service शी त्याची (चांगलीच) ओळख होते आणि तिथून पुढच्या त्याच्या सगळ्या कारकिर्दीचे वर्णन त्याच्या शब्दांत आपल्याला वाचायला मिळते.
ब्रिटनमध्ये आपल्या देशाप्रमाणे पक्षांची गर्दी नसून दोनच पक्ष होते, आणि ते ‘सरकार’ आणि ‘विरोधी पक्ष’ याच नावांनी ओळखले जात. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड हे चार विभाग असलेला ब्रिटन हा लहानसा देश अनेक मतदारसंघांत विभागलेला आहे. या प्रत्येक मतदारसंघातून एक MP पुढे येतो, आणि अशा MPला आपला मतदारसंघ आपल्यालाच मत देईल अशी खबरदारी घ्यावी लागते. ‘मिडलँड्स’ प्रांतातल्या एका मतदारसंघातून हॅकर पुढे येतो. काही वर्ष विरोधी पक्षात काढल्यावर ते सत्तेवर येतात आणि त्यांचा पक्षप्रमुख पंतप्रधान होतो आणि तो हॅकरला प्रशासनमंत्री बनवतो. या संपूर्ण काळात पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख कटाक्षाने टाळला आहे. एकतर PM, नाहीतर त्यांचं आवडतं नाव म्हणजेच Number Ten हेच वापरण्यात आलं आहे. या पुस्तकाचे लेखक, जॉनथन लिन आणि अँटनी जे हे दोघे हॅकरच्या डायरीजचे एडिटर असल्याचं दाखवतात. या दोन्ही पुस्तकात फक्त हॅकरचे निवेदन नाही, कारण ते अगदीच रटाळ ठरेल असे या संपादकांचे मत आहे. म्हणून त्यांनी प्रसंगानुसार इतरांच्या डायरीमधले उतारेही यामध्ये घातले आहेत. यामुळे हॅकरच्या नजरेतून सुटलेल्या (किंवा पाठीमागे घडलेल्या) घटना तर समजतातच, पण शिवाय त्यांच्या आणि हॅकरच्या निवेदनात खूप ठिकाणी विरोधाभास आढळून आल्याने वाचण्याची मजा वाढते. शिवाय स्वतः संपादकांच्या (लेखकांच्या) अनेक टिप्पण्या, खुलासे वगैरे खूप ठिकाणी आढळतात, ज्यामुळे एक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते.   
हॅकरव्यतिरिक्त दोन इतर नायकही या कथेला लाभले असून त्यांची निवेदने हॅकरच्या खालोखाल सर्वाधिक संख्येने आढळतात. ते दोघे म्हणजे सर हम्फ्री अॅपलबी आणि बर्नार्ड वूली. जेव्हा हॅकर प्रशासनमंत्री होता तेव्हा हम्फ्री त्या विभागाचा Permanent Secretary होता आणि बर्नार्ड हॅकरचा प्रायव्हेट सेक्रेटरी. हॅकरच्या कारकिर्दीतील सगळा काळ हे दोघे त्याचे खास सल्लागार होते. दोघांचेही मनुष्यविशेष लेखकांनी मस्त रंगवले आहेत. बर्नार्ड हा एक कणखर पण भाबडा असा तरुण माणूस आहे. Civil Service आणि एकूणच सरकारचे काम यासंबंधी त्याला खूप कुतूहल असते. सरकारमधला हॅकरचा तो सर्वांत विश्वासू मित्र आहे असे हॅकर स्वतः अनेकवेळा म्हणतो. त्याला स्वतःला हॅकरविषयी एक वेगळाच आपलेपणा वाटतो आणि तो कधीही त्याच्या विरुद्ध कट करत नाही. म्हणूनच काही माहिती गुप्त ठेवण्याची किंवा काही गोष्टी हॅकरपासून लपवण्याची त्याच्यावर जबाबदारी पडली की तो अस्वस्थ होतो आणि त्याची समजूत काढताना सर हम्फ्रीच्या नाकी नऊ येतात. त्याचा उल्लेख अनेक वेळा ‘High Flyer’ असा केला जातो, आणि तो खूप पुढे जाईल असा विश्वास हम्फ्री अनेकदा व्यक्त करतो. संपादकांनी (लेखकांनी) सुरुवातीला दिलेल्या टिपेत असा उल्लेख आहे की बर्नार्ड निवृत्त होतो तेव्हा तो Civil Serviceचा प्रमुख असतो. हम्फ्रीच्या मते, अशा हुशार लोकांना एक सत्त्वपरीक्षा म्हणून प्रायव्हेट सेक्रेटरी केलं जातं. आपला मंत्री आणि Civil Service या दोघांशीही एकनिष्ठ राहण्याची तारेवरची कसरत त्याला जमली तर तो खरा पुढे जाण्यास योग्य, असे ते म्हणत. तुम्ही म्हणाल, की त्यात अवघड काय आहे? शेवटी Civil Service आणि सरकार एकाच बाजूचे आहेत ना? पण तसे नाही. हम्फ्री स्वतः Civil Service च्या सर्व मूल्यांचं, तत्त्वांचं आणि कार्यपद्धतींचं जिवंत उदाहरण आहे.
सर हम्फ्री अॅपलबी हे एक अजब रसायन आहे. जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा कुठला अर्क या अवलियाने प्यायला आहे कुणास ठाऊक! परंतु Civil Service, सरकार आणि आपले काम याविषयी त्याच्या काही अचाट कल्पना आहेत. आता लोकशाही म्हटली, की लोकांनी निवडून दिलेल्या राजकारण्यांच्या धोरणांना अंमलात आणण्यासाठी जीवाचे रान करायचे हे Civil Serviceचे काम, असे कुणी सांगितले तर हा माणूस तीन ताड उडेल. Civil Service चे मुख्य काम या राजकारण्यांच्या कुठल्याही धोरणाच्या मध्ये आडकाठी आणून ते थांबवायचे किंवा लांबवायचे असे त्याचे, आणि इतर सगळ्या Civil Servants चे मत आहे. राजकारणी लोकांबद्दलची त्याची मते ऐकली तर आपण आधी थक्क होतो, आणि त्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला ते काहीसे पटतेही, म्हणून आपण परत थक्क होतो!
‘राजकारण्यांची देश चालवायची पात्रता नसते.’ असे तो एकदा स्पष्टपणे म्हणाला होता. Civil Service मधील सगळे चांगले सुशिक्षित, प्रशिक्षित आणि या कलेत तज्ञ असतात, तर राजकारण्यांचे मुख्य काम म्हणजे आपण त्यांना जे कागद देऊ त्यावर सह्या करून पुढे पाठवणे! याबद्दल त्यांनी काही प्रश्न विचारले, किंवा स्वतःची काही धोरणे ठरवायचा प्रयत्न केला, तर आपण अडवायचे. मजा अशी आहे, की लोकशाहीनुसार मंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे आदेश पाळणे हे आपले काम आहे हे तो अमान्य करत नाही. पण मग अडवणूक का, यासाठी त्याने एकदा एक सुरेख उत्तर दिले होते. या मालिकेतल्या पहिल्याच गोष्टीतला हा प्रसंग. हॅकर नुकताच प्रशासनमंत्री म्हणून निवडून आलेला असतो आणि त्याने सगळा कारभार पारदर्शक करण्याची टूम काढलेली असते. आणि हे आपण रोखणार आहोत हे हम्फ्रीने बर्नार्डला सांगताच तो म्हणतो “पण मंत्र्यांना कारभार पारदर्शक व्हायला हवा आहे.” यावर हम्फ्री म्हणतो, “आपण लोकांना काय हवं ते देत नाही; ते त्यांच्यासाठी चांगलं नसेल तर! उदाहरणार्थ, आपण एका दारुड्याला व्हिस्की देणार नाही.”!!!
हम्फ्रीच्या लेखी राजकारणी लोक दारुडे नाहीत, तर लहान मुले असतात. त्यांना आज एक गोष्ट हवी असते आणि उद्या तीच नको असते. का? कारण प्रत्येक सत्ताधारी राजकारण्याचे एकच उद्दिष्ट म्हणजे पुन्हा निवडून येणे! त्यासाठी ते प्रत्येक धोरण आखताना ‘जनतेला काय वाटेल’ हा विचार करतात. तसे ते योग्य आहे, तो विचार आपणही करतो, कारण आपण त्यांच्या भल्यासाठीच काम करतो. पण कुठलाही मुद्दा मांडला की आपण ‘याचा फायदा काय, तोटे काय, खर्च किती, देशाच्या हिताच्या दृष्टीने हे कसे आहे’ असे प्रश्न विचारू, तर राजकारणी म्हणेल “टाईम्स काय म्हणेल यावर?” म्हणूनच आपण यांच्यावर महत्त्वाचे निर्णय सोपवू शकत नाही, ही सर हम्फ्रीची विचारसरणी! आणि मंत्र्यांचे धोरण खरोखरच चांगले असले, तरी तेही अडवले गेले पाहिजे. कारण हे मान्य केले तर उद्या ते काहीतरी टुकार धोरणही मान्य करायला लावतील. मुळात Civil Service ला चालू यंत्रणेत कुठलाच बदल व्हायला नको असतो. आणि बदल नको असल्याचे कारण माझ्या मते या संपूर्ण कथेचा अंतःप्रवाह आहे. तो म्हणजे, “Why should we change the current system? After all, it has made Britain what she is today.”
हॅकर हा हम्फ्रीच्या व्याख्येत तंतोतंत बसणारा मंत्री होता, पण हम्फ्रीला वाटे तितका तो मूर्खही नव्हता. एकूण सगळ्या गोष्टींपैकी काही गोष्टींत त्यानेही मोठ्या चतुराईने विजय मिळवला आहे. सरकार कसे चालते त्याबद्दल आपणही हॅकरसोबत शिकत जातो. एक महत्त्वाचा धडा म्हणजे आपली एखादी योजना Civil Service कडून अंमलात आणून घ्यायची इच्छा असेल तर ती नुसती मांडून चालत नाही. इथे जन्म होतो तो यातल्या बऱ्याच गोष्टींचा गाभा असलेल्या सूत्राचा : Quid pro quo. आपण (आता इथे मी मंत्र्याच्या भूमिकेतून बोलतोय) त्यांच्याशी सौदा केला पाहिजे, हे दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे त्यांना हवे असलेले काहीतरी देऊ करून आपल्याला हवे ते पदरात पाडून घ्यायचे, तर दुसरे म्हणजे त्यांना कसल्यातरी अडचणीत टाकून ती सोडवण्याच्या बदल्यात आपले काम करून घ्यायचे. Civil Service बऱ्याचदा दुसऱ्या पद्धतीचा वापर करते, कारण राजकारण्यांना भीती दाखवणे सोपे! त्यांच्या नोकऱ्यांना गॅरेंटी नाही आणि ते निवडणुकीत हरू शकतात हे निदर्शनास आणले तर त्यांची खेळी बहुतेकवेळा यशस्वी होते. तुलनेने Civil Service ला कोंडीत पकडता येईल असे फार कमी अधिकार मंत्र्यांकडे असतात. त्यामुळे यातल्या बहुसंख्य गोष्टींत आपल्याला मोठा बदल घडवायची इच्छा असलेला हॅकर आणि आपल्या मताशी ठाम असलेला हम्फ्री यांच्यात चुरस पाहायला मिळते, शेवटी कोण सगळ्यात वरचढ बाजू गाठून दुसऱ्याला ऐकायला लावतोय यात! बर्नार्डचाही या लढाईत मोलाचा वाटा असतो, कारण तो आळीपाळीने हम्फ्री आणि हॅकरला महत्त्वाची मदत करतो, तेही गुप्ततेला धाब्यावर न बसवता. म्हणूनच प्रत्येक गोष्ट वाचताना ‘यात कोण जिंकतोय’ अशी भावना आपल्या मनात असल्यामुळे, कुस्तीचा सामना बघितल्यासारखे वाटते.
कुस्तीची उपमा योग्य आहे, कारण या गोष्टी लहान मुलांना रात्री झोपताना सांगण्याच्या नाहीयेत. यात सुष्ट आणि दुष्ट असे दोन ठळक गट कधीच पडत नाहीत; त्याऐवजी ‘तू कुणाच्या बाजूने आहेस’ या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते. स्वतःलाच! तांत्रिकदृष्ट्या आपण हॅकरच्या बाजूने असले पाहिजे. कारण तो भ्रष्ट नाही, त्याला खरोखरीच चांगले बदल घडवायची इच्छा असते आणि तो काही प्रमाणात अगदी निरागस आहे. पण शिवाय फक्त ‘लोक काय म्हणतील’ (किंवा ‘पेपर काय म्हणतील’) यावरून काही चांगल्या योजनाही तो फेटाळतो, काही गोष्टी गुप्त ठेवतो आणि महत्त्वाचे म्हणजे, तो योजना बघताना फक्त लोकप्रियतेचा विचार करतो. तर दुसरीकडे ‘लोकांना नेहमी स्वतःचं भलं बघता येत नाही’ असा हम्फ्रीच विश्वास. कधीकधी हॅकरला कुठल्यातरी निर्णयाप्रत नेण्यात किंवा विचार बदलायला लावण्यात त्याचे स्वतःचे काही हेतू असतात. हॅकरला अजिबात त्रास न होऊ देता आपली आणि आपल्या सहकाऱ्यांची पोळी भाजून घेणे त्याला चांगले जमते. तर एरवी तो केवळ ‘तत्त्वनिष्ठ’ राहून हॅकरला अडवतो. बर्नार्ड खरेतर निरागस आहे आणि Civil Serviceच्या कार्यपद्धतीवर तोच अनेकदा सहज शंका घेतो. पण त्याला ‘पटवणे’ आणि आपल्या बाजूला ओढून घेणे हेही फारसे अवघड काम नसते.
वरून फक्त चांगले काम करणाऱ्या आणि हॅकरशी एकनिष्ठ राहणाऱ्या एका व्यक्तीचा कथेत उल्लेख आहे : डोरोथी वेनराईट. कुठल्याही प्रसंगी हॅकरला योग्य मार्ग दाखवणे आणि त्याला कचाट्यांतून सोडवणे याला ती आपले कर्तव्य समजते. अर्थात, हॅकरला मदत करणे हे हम्फ्रीच्या हिताचे असले तर तो तिच्यापेक्षा खूप भारी काम करून दाखवू शकतो, हे खरे. हिने मात्र हॅकरला पदोपदी साथ दिली आहे. हॅकर पंतप्रधान झाला तेव्हा ती त्याची प्रमुख राजकीय सल्लागार म्हणून काम करू लागली. ती १००% चांगली असली, तरी तिचे मुख्य काम हॅकरला आणि त्याच्या पक्षाला जिंकून देणे हे असल्याने तिच्यावर काही मर्यादा येतात आणि लोकांचा रोष पत्करून योग्य तो निर्णय घेण्यास ती हॅकरला सांगू शकत नाही. तीच गत बऱ्याचदा हॅकरच्या पत्नीची, म्हणजेच अॅनीची होते. अॅनी हॅकरला वरून टोमणे मारत असली, तरी त्याच्या प्रामाणिकपणाचे तिला कौतुक वाटते. तिचे हम्फ्रीपेक्षा बर्नार्डशी जास्त चांगलं जमतं असं दाखवलं आहे.
सर्वच गोष्टींत हॅकर विरुद्ध हम्फ्री हा डाव रंगत नाही. हम्फ्रीला बहुधा युधिष्ठिराचे तत्त्वही मान्य असावे. ‘जेव्हा प्रश्न आपल्याच खात्याचा असेल, तेव्हा मी टांग घालणार. पण बाहेरचे कुणी आपल्या सगळ्यांवर परिणाम होईल असे काहीतरी घडवून आणायला आले, तर आपण एक आहोत.’ आणि खरोखरीच हॅकर आणि हम्फ्री यांना एकत्र येऊन खिंड लढवताना पाहायला तितकीच मजा येते. आणि ते ‘बाहेरचे कुणी’ म्हणजे इतर खाती आहेतच, शिवाय प्रामुख्याने अमेरिका, फ्रान्स आणि अरब राष्ट्रेदेखील! या पुस्तकांतून आपल्या मनात अमेरिकेची, ब्रिटनला सांभाळून घेणारा आणि कधीकधी दादागिरी करणारा मोठा भाऊ अशी प्रतिमा निर्माण होते, जी अनेक बाबतींत खरी आहे. दुसरीकडे फ्रान्सची प्रतिमा मात्र आपण संमेलनात ज्याला शक्यतो टाळतो त्या खवट शेजाऱ्याची आहे! तसेच यांची आणि अरब राष्ट्रांची तेलकट मैत्रीही त्यांनी खास वर्णिली आहे.    
हॅकरला प्रशासन मंत्रालयाचा मंत्री करणे ही लेखकाची एक चतुर खेळी आहे. जर हॅकर कुठल्यातरी विशिष्ट कार्यालयाचा (उदाहरणार्थ अर्थखातं, संरक्षणखातं वगैरे) मंत्री असता तर त्याच्या कामाला एक विशिष्ट स्वरूप आलं असतं. पण प्रशासनाचा संबंध सगळ्याशी येत असल्याने आपल्याला प्रशासनाची आणि पर्यायाने इतर बऱ्याच खात्यांची कल्पना येते आणि त्यांच्याशी संबंधित प्रश्नांवरही चर्चा होते. दुसरं म्हणजे Civil Service योग्य रीतीने चालू आहे का, नोकरशाहीचे प्रमाण जास्त तर नाही ना, हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. यामुळे हॅकरच्या बऱ्याच योजना थेट Civil Serviceवर परिणाम करणाऱ्या होत्या, आणि म्हणून हम्फ्रीने त्याला रोखणे इतर खात्यांच्या दृष्टीनेही खूप महत्वाचे होते!
Yes Prime Minister हा याचा दुसरा भाग. सुरुवातीला हम्फ्रीला प्रशासनखात्याचा Permanent Secretary या हुद्द्यावरून Cabinet Secretary या Civil Serviceमधल्या सर्वोच्च पदावर बढती मिळते. मग हॅकर मंत्री असतानाचे पंतप्रधान निवृत्त होतात आणि हम्फ्री हॅकरला पंतप्रधान बनण्यास मदत करतो. हॅकर, पंतप्रधान झाल्यावरही बर्नार्डविषयी त्याला वाटणाऱ्या आपलेपणामुळे बर्नार्डला त्याचा प्रायव्हेट सेक्रेटरी होण्यास सांगतो. म्हणजे आले तिघेजण परत एकत्र! योगायोग वाटाव्या अशा या घटनाही सयुक्तिक वाटतील याची लेखकांनी खूप काळजी घेतली आहे.
या पुस्तकांच्या नावात, आपण हे वाचल्यावर, आपल्याला एक ठळक विरोधाभास जाणवतो. लेखकांनी कटाक्षाने बहुतेक गोष्टींचा शेवट ‘Yes Minister’ आणि ‘Yes Prime Minister’ या उद्गारांनी होताना दाखवला आहे. हे उद्गार बहुतेक वेळा असतात हम्फ्री आणि बर्नार्डचे! कधीकधी ते हॅकरचा विजय मान्य करून पराभूत होऊन म्हटलेले असते, तर त्यापेक्षा अधिक वेळा हॅकरला अडकवल्यावर सुटण्यासाठी त्याने घेतलेला निर्णय मान्य करताना म्हटलेले असते!
भाषेच्या दृष्टीने ही पुस्तके अत्यंत समृद्ध आहेत. आपल्याला उत्कृष्ट दर्जाची सुंदर इंग्लिश वाचायला मिळते, तसेच ‘शेरलॉक होम्स’प्रमाणे ती काहीशी ‘जुनी’ नसल्याने आपण चटकन पकड घेऊ शकतो. शेवटी ही एक डायरी असल्याने अलंकारिक भाषेतली वर्णने आणि शब्दचित्रे फारच कमी आढळतात. हॅकरची भाषा साधी, सोपी असूनही खुसखुशीत आहे. तर दुसरीकडे हम्फ्रीची प्रगल्भ भाषा हीदेखील त्याच्या हॅकरला बुचकळ्यात टाकण्याच्या तंत्राचा अविभाज्य भाग आहे. कधीकधी हम्फ्रीचे एकच वाक्य पानभर असते आणि हॅकरला त्याला ‘मला थोडक्यात उत्तर नको आहे, एका वाक्यात हवे आहे’ असे सांगावे लागते. पण त्या लांबलचक, इकडचा-तिकडचा बराच पसारा घातलेल्या आणि विशेषणे-क्रियाविशेषणे यांनी ठासून भरलेल्या वाक्यांचा अर्थ लावण्यात वेगळीच मजा येते. मधला काही काळ मला अशी अजस्त्र वाक्यं रचायचा छंद लागला होता आणि त्याचा व्हॉट्सअॅप ग्रुपवरील माझ्या मित्रमैत्रिणींना चांगलाच ताप झाला होता. संपादकांनी (लेखकांनी) टिपेत केलेली “Civil Service शी इतका जवळचा संबंध दीर्घकाळ राहिल्याने हॅकरही भाषेचा उपयोग मनात डोकवायची खिडकी म्हणून नाही तर तिच्यावर ओढायचा पडदा म्हणून करू लागला.” ही टिप्पणी सूचक आहे.
अशा प्रकारे ही कथा भाषा, कथानक, विनोद, पात्रे आणि खूप अभ्यास करून काल्पनिक कलाकृतीला दिलेला वास्तव टच या सगळ्याच मुद्द्यांवर अग्रेसर ठरते. बाबांनी मला हे देताना ‘तू पोट धरधरून हसशील’ असे शिफारसपत्र सोबत दिले होते. या पुस्तकांची अनेक पारायणं करताना मी कसा हसायचो ते तेव्हा कुणी मला पाहिले असेल तर तेच सांगू शकतील. पण मला जाम मजा आली हे खरे. कदाचित आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या त्या सरकारचे असे आत्यंतिक विनोदी चित्रण वाचायला मिळाल्यामुळेही असेल. ब्रिटिश सरकारबद्दल आपल्या मनात एक प्रकारची चीड असते, पण इथे त्यांचा हा सावळा गोंधळ पाहून त्यांची थोडी कीवही येते. तसेच आपल्याकडे सरकारपुढे हात टेकले अशी भावना बऱ्याच मनांत असताना या पुस्तकातून तिकडची परिस्थिती काही फार वेगळी नसल्याचे आपल्याला कळते. आपल्याकडे अशी चित्रणं प्रकाशित होण्याची, आणि त्याहीपेक्षा चालवून घेतली जाण्याची खूपच कमी शक्यता असल्यामुळे ही कलाकृती आपल्याला अनेक अंगांनी प्रामाणिक वाटते. शेवटी सरकार म्हटले की चढाओढी, लोकप्रियतेसाठी खेचाखेची, यशापेक्षा पराभवाची उदाहरणे अधिक स्पष्ट आणि मीडियाला कुंपणापलीकडचा कट्टर शत्रू मानणे हे आलेच! या सगळ्या पार्श्वभूमीवर, हॅकरची एक निरागस टिप्पणी विशेष बोलकी आहे. एकदा हॅकरला कुठल्याशा लाजिरवाण्या घटनेची गुप्त माहिती मिळते आणि हम्फ्रीचा सल्ला नाकारून तो ती पंतप्रधानांच्या (तो प्रशासनमंत्री होता तेव्हाची गोष्ट) कानावर घालायचा प्रयत्न करतो, पण पक्षातल्याच वरिष्ठांकडून त्याच्यावर दबाव आणला जातो. त्या गुप्त माहिती देणाऱ्याला ‘मी हे सगळं निस्तरीन’ अशी ग्वाही दिल्याने हॅकरची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था होते, आणि मग हम्फ्री त्याला त्यातून सोडवतो. सगळ्या प्रकाराने थकलेला हॅकर डायरीत लिहितो :
“In government you must always try to do what is right. But you must never let anyone catch you trying to do it. Because doing right’s wrong, right?”
Yes Minister!!


The Threesome.jpg
                               
या पुस्तकांवर BBC ने काढलेल्या लोकप्रिय मालिकेतील, उजवीकडून सर हम्फ्री (नायजेल हॉथॉर्न), जिम हॅकर (पॉल एडिंग्टन) आणि बर्नार्ड (डेरेक फाउल्ड्स)

Read the next part here.
Read the English version of the same here.

Comments

  1. आदित्य,

    खूप मर्मग्राही आणि नेमके लिहिले आहेस.

    इंग्लिश भाषेच्या अद्भुत सामर्थ्याची ओळख मला या पुस्तकानं करून दिली.
    quick wit, repartee, dry humour असली एकाहून एक भारी रत्नं यात आपल्याला भेटतात.

    ReplyDelete
  2. आदित्य,मी या पुस्तकाबद्दल खूपजणांकडून वेगवेगळ्या संदर्भात ऐकले आहे.मात्र ते वाचलेले नाही.तू जे लिहिलेस त्यामुळे त्यातील कथानकाचा गाभा समजला आहे.आणि शेवटचे तीन परिच्छेद हे पुस्तकपरीक्षण/ विश्लेषण करणारे आहेत असे वाटते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प