पलीकडे : अंधाऱ्या कोपऱ्यात


आपण निघालो ते पृथ्वीपासून, मग आपण सूर्यमालेची माहिती करून घेतली. आपण म्हणजे मानवजातीने. मग आपली आकाशगंगा, बाकीची तारकाविश्वे आणि विश्व..... झालेच की. म्हणजे संपूर्ण विश्वाची माहिती जरी आपल्याला नसली, तरी ढोबळमानाने विश्वातल्या सगळ्या प्रकारच्या गोष्टींची तरी? ग्रह, तारे, लघुग्रह, उल्का, धूमकेतू, अशनी, राक्षसी तारे, ग्रहमाला, तारकाविश्वे, त्यांचे समूह...... या सगळ्याची आपल्याला माहिती झाली. विश्वातल्या एका तारकाविश्वांच्या समूहात आपण आहोत, आणि अशी अजून अनेक तारकाविश्वे आहेत, हे कळलं. त्यांच्या रचनेत काही फरक आढळले तर आपल्या ज्ञानात भर पडेल, अशी आपली समजूत. पण आपल्याला खुद्द आपल्याच आकाशगंगेच्या सर्व घटकांची संपूर्ण माहिती नव्हती, असं आता कळतंय. काही महत्वाचे घटक आपण गृहीत धरायला विसरलो, पण त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे आपल्याला आता मिळू लागले आहेत.
यांची दखल घ्यायला आपल्याला काहीसा उशीर झाला, याला माझ्या मते दोन कारणे आहेत. एक महत्त्वाचे कारण आहे त्यांची स्वतःला गुप्त आणि लपवून ठेवण्याची अद्भुत रचना. आणि समोर जे धडधडीत दिसतंय त्याचा अर्थ लावत पुढे जाण्याची आपली पद्धत आहे. आपण प्रकाशाबद्दल माहिती प्राप्त करून घेतली. तो कण आणि लहरींचा बनलेला असून, ताऱ्याच्या ऊर्जेमुळे तो निर्माण होतो आणि इतर वस्तूंवर आदळून आपल्याकडे येतो; म्हणून आपल्याला त्या दिसतात, हे सर्व आपल्याला माहित झाले. नकळत आपण असे एक गृहीतक मांडले की प्रकाश सर्वच गोष्टींपासून परावर्तित होतो, आणि म्हणूनच अस्तित्वात असलेलं सर्व आपण पाहू शकतो. एका अर्थी हे तर्काला धरून असलं, तरी एका दृष्टिकोनातून ‘इथे प्रकाश आहे म्हणून इथे शोधूया, तिकडे अंधारात जायला नको’ असे म्हणण्यासारखे आहे. अशी कल्पना करूया, की आपण रात्रीच्या वेळी शतपावली करायला मोठ्या रस्त्यावर चालत आहोत. ठिकठिकाणी दिवे लागलेले आहेत, आजूबाजूच्या इमारतींतून आणि दुकानांतून प्रकाश ओसंडतो आहे, शिवाय रहदारीच्या हेडलाईट्समुळे रस्ताही उजळून निघाला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज दिसतात. पण बाकी काही अस्तित्वातच नाही, असे तर नाही ना म्हणू शकणार आपण? समजा एका इमारतीतल्या सर्व रहिवाश्यांनी रात्री लवकर झोपायचे ठरवले असेल, आणि ती इमारत काळोखात दडलेली असेल. पण केवळ ती आपल्याला दिसत नाही, म्हणून तिचे अस्तित्व नाहीसे होईल का?
विश्वाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर रात्री आकाशात आपल्याला असंख्य तारे, ग्रह दिसतात. चंद्र तर आहेच. पण ते जिथे स्थिर आहेत त्या काळ्याकुट्ट पृष्ठभागाचे काय? आता माणसे अवकाशात जाऊन आली आहेत. तिथे काहीच, अगदी हवाही नसते हे आपल्याला ठाऊक आहे. तिथे फक्त अनंत जागा असते, म्हणून आपण त्याला Space म्हणतो. म्हणूनच ते काळं दिसतं, कारण प्रकाश परावर्तित करायला तिथे काहीसुद्धा नसतं. याच गृहितकावर काही वर्षे आपण सगळे माहिती मिळवत होतो.
इथे मला स्पष्ट करावेसे वाटते, की या गोष्टींच्या खोलात जाणे खूप अवघड आहे, कारण या विषयातल्या तज्ज्ञांना न सुटलेली कोडी आहेत ती. आपण तर नेहमीची गप्पा मारणारी माणसं. मला स्वतःला आईन्स्टाईनचा General सापेक्षतावाद म्हणजे नक्की काय याची सुतराम कल्पना नाहीये. पण त्याने जेव्हा हा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याला काही गोष्टी त्याला ठळक अपवाद ठरताना दिसल्या. त्यानुसार, Space-Time चं आंतरिक नातं काहीसं बदलण्याची क्षमता त्यात होती, आणि इतकी की काळ त्यात जास्त हळू जाऊ शकेल इतकी. आईन्स्टाईनला तो सगळा प्रकार निसर्गाच्या विरुद्ध जाणारा वाटला, आणि त्याने त्या वस्तू अस्तित्वात नसण्याचं कारण शोधायचा प्रयत्न केला. पण त्याला ते कारण सापडलं नाही, कारण त्या वस्तू खरंच अस्तित्वात आहेत. ती वस्तू म्हणजेच ‘कृष्णविवर’.
‘कृष्णविवर’ (Black Hole) हा शब्द आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकला असेल. कृष्णविवर मात्र दिसू शकतं, कारण ते आजूबाजूच्या सर्वांपेक्षा जरा जास्तच गडद काळ्या रंगाचं असतं. पण खरेतर तो काळा  रंग नसून, तो कुठल्याही रंगाचा अभाव असतो. याचे कारण म्हणजे कृष्णविवर ही अशी गोष्ट आहे जी प्रकाश परावर्तित होऊ देत नाही. त्याच्या कडांना तो परावर्तित होतो आणि आपल्याला दिसतो, पण त्याच्या आत जाणारा प्रकाश आतच राहतो. म्हणून आपल्याला विश्वाच्या त्या गुळगुळीत काळ्या पडद्यावर एक भोक पडलेले दिसते. कुणाला हे निसर्गाच्या विरुद्ध जाणारे वाटले तर त्यात काही नवल नाही. कृष्णविवराची गुरुत्वीय ओढ सगळ्यात शक्तिशाली असते, आणि म्हणूनच ते प्रकाशासहित सगळं आपल्या आत खेचून नेतं. आपल्यासारख्या सामान्यांना एवढं माहित असतं की गुरुत्वाकर्षणाचा संबंध वस्तुमानाशी आहे. म्हणून सूर्याचे गुरुत्वीय बळ आपल्यापेक्षा अधिक असते, तर आपले चंद्रापेक्षा अधिक. पण मग सर्वात मोठ्या ताऱ्यापासून सगळ्यात लहान प्रकाशाच्या कणापर्यंत सगळं आकर्षित करून घेण्याची क्षमता त्या भोकात कशी असेल? मुळात भोक म्हणजे खड्डा. त्याला वस्तुमान कसे असेल?
पण कृष्णविवराला वस्तुमान असते, आणि आपल्या कल्पनेपेक्षा कैक पटीने जास्त. त्याचे काय आहे, ‘श्वार्त्झचाईल्ड त्रिज्या’ म्हणून एक असते, तिच्यापलीकडे कुठल्याही पदार्थाला ‘चेपले’ की तिचे कृष्णविवर होते. पृथ्वीचे कृष्णविवर करायला आपल्याला तिला सगळ्या बाजूंनी दाबून एका शेंगदाण्याएवढे करावे लागेल, आणि तेही तिचे वस्तुमान अजिबात कमी न करता. मग आपल्या हातावर शेंगदाण्याच्या आकाराचे एक कृष्णविवर असेल, ज्याचे वस्तुमान पृथ्वीएवढेच असेल. प्रचंड वजन अतिशय लहान आकारात असे सामावलेले असल्यामुळे कृष्णविवरांना ही अमानुष शक्ती प्राप्त झाली आहे. आजही गुगल सर्चवर जाऊन पाहिलेत, तर ‘Central Black Hole of Phoenix Cluster’ या सर्चची एक वेगळीच हवा असते. हे आपल्याला सापडलेल्या काही महाकृष्णविवरांपैकी (Supermassive Black Hole) एक असून, त्याच्यात २० अब्ज सूर्यांचे वस्तुमान सामावले आहे!
बहुतेक तारकाविश्वांच्या मध्यभागी एक कृष्णविवर असते. त्याच्या जबरदस्त गुरुत्वीय ओढीमुळे एवढ्या ग्रहमाला, तारे आणि ढग असे वर्तुळाकार आकारात बसलेले असावेत, असा माझा अंदाज आहे. आणि आपण इथे बसून पृथ्वीकेंद्रीत आणि सूर्यकेंद्रित विश्वाची कल्पना रंगवत होतो, तर प्रत्यक्षात आपण सर्व एका कोपऱ्यात असून मध्यभागी ही मंडळी होती! समजून घ्यायला महाकर्मकठीण अशा काही गोष्टींपैकी कृष्णविवर ही एक. शास्त्रज्ञांनी त्यांची बरीच माहिती मिळवली असली, तरी अजून कुणाला कृष्णविवराच्या आत नेमकं काय घडतं आणि का, याला अजून कुणाला समाधानकारक उत्तर देता आलं नाहीये. पण त्यांचा शोध घेऊन त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्याचा आपला प्रयत्न चालू आहे.
Image result for central black hole of the phoenix cluster
विश्वात मुख्यतः चार बलं (Forces) कार्यरत असतात, त्यापैकी सगळ्यात कमजोर म्हणजे गुरुत्वाकर्षण. सर्व पदार्थांच्या मध्ये ते आढळतं आणि कशातही पदार्थाचं (Matter) प्रमाण जास्त असलं की गुरुत्वीय ओढ आढळून येते. म्हणूनच सूर्य आपल्या सगळ्यांना धरून ठेवू शकतो आणि आपण आपापल्या उपग्रहांना. पण शास्त्रज्ञांना हा प्रश्न पडला, की तारकाविश्वासारख्या प्रचंड वस्तूला एकत्र धरून ठेवायला हे बल पुरेसे नाही, कारण या पसरलेल्या तबकडीत पुरेसा पदार्थच नाही. आपली आकाशगंगा म्हणजे असंख्य तारे, त्यांच्या ग्रहमाला, अभ्रिका आणि एक भोक यांचा समूह आहे, पण या सगळ्यांमध्ये असलेल्या अनंत अवकाशाचे काय? आकाशगंगेचा बहुतांश भाग या अवकाशानेच व्यापला असेल, तर तिच्यात पदार्थाचे प्रमाण खूप कमी असेल. मग या तबकड्या अशा सुंदर आकारात राहू कशा शकतात? या प्रश्नाला नुकतेच उत्तर सापडले आहे, ते असे की गुरुत्वीय ओढ टिकू शकेल इतका पदार्थ आपल्या आणि इतर सगळ्या तारकाविश्वांत आहे, फक्त तो आपल्याला दिसत नाही एवढंच!
आपण या पदार्थाला कृष्णपदार्थ (Dark Matter) असे नाव दिले आहे. आपल्याला आजवर कृष्णपदार्थाचा एक कणही दृष्टीस पडला नसला तरी या प्रकारचे तेच सगळ्यात समाधानकारक उत्तर आपल्याला माहित आहे. हा कृष्णपदार्थ काय आहे, कशा स्वरूपाचा आहे, कशाचा बनलेला आहे, याची आपल्याला काहीच कल्पना नाही. अंदाजानुसार, विश्वाच्या एकूण सगळ्या पसाऱ्याचा २७% भाग कृष्णपदार्थाने व्यापलेला आहे. म्हणजे आपल्या ओळखीचा पदार्थ (Matter) उरलेला ७३% हिस्सा व्यापतो का? नाही. आपला Matter विश्वाच्या एकूण पसाऱ्याचा फक्त ५% भाग व्यापतो. छान! म्हणजे आजवर आपण पाहिलेले सगळे ग्रह, तारे, धूमकेतू, ढग, लघुग्रह, तारकाविश्वे, अभ्रिका आणि कृष्णविवरेही मिळून फक्त ५% भरतं? मग उरलेल्या ६८% भागात आहे तरी काय? इथे हे लक्षात ठेवावे लागेल, की आपण सगळे आता इतक्या पुढे आलो आहोत, की ही सगळी माहिती तर्क, सिद्धांत आणि गृहीतकांवर आधारलेली आहे.
पण असे असले, तरी सत्य तेच असण्याचीच सगळ्यात जास्त शक्यता आहे. एरवी आपण ‘Dark’ हा शब्द दुष्ट प्रवृत्ती किंवा हिंसक स्वभाव यांचं वर्णन करायला वापरतो. ‘हॅरी पॉटर’ आणि ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स’ या दोन्ही कथांमध्ये वाईट बाजूच्या म्होरक्याला ‘Dark Lord’ हे नाव वापरले आहे. ‘स्टार वॉर्स’ या जगप्रसिद्ध सिनेमांमध्येही सगळे दुष्ट लोक ‘Dark Side’चे सभासद असतात. शिवाय Clash of Clans या एका प्रसिद्ध स्ट्रॅटेजी गेममध्येही अमृत आणि डार्क अमृत, योद्धे आणि डार्क योद्धे असे वर्णभेद आहेत. पण ‘Dark Matter’ हे आपण त्याअर्थी वापरत नाही. तो फक्त दिसत नाही म्हणून त्याला ‘डार्क’ असे संबोधले जाते. फार काय, ‘Dark Nebula’ नामक अभ्रिकाही प्रकाशाच्या मार्गात अडथळा आणते म्हणून तिला असे नाव आहे. पण विश्वाचा ६८% भाग जिने व्यापलेला आहे, ती ‘Dark Energy’ दोन्ही अर्थांनी आपले नाव सार्थ करते.
अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वस्तूच्या अस्तित्वाला कारण असते. Dark Energy बद्दल म्हणाल तर ती विश्वाचा विनाश घडवून आणण्यासाठीच अस्तित्वात आहे.
महास्फोटापासून विश्व सतत प्रसारण पावत आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण ‘ते का’ चे उत्तर Dark Energy देऊ शकते. असं पाहा, विश्वाच्या सीमारेषा ठरलेल्या नाहीत. केंद्रबिंदूपासून सर्वांत लांब असलेली मंडळी जरा अजून लांब गेली की विश्वाचा विस्तार वाढतो. साहजिकच कुठलीतरी शक्ती विश्वातील सर्व Matterला एकमेकांपासून दूर ढकलत आहे. गुरुत्वाकर्षणाच्या बरोबर उलटा परिणाम साधणारी ही शक्ती म्हणजेच Dark Energy! ही विश्वातल्या सगळ्यांना मध्यभागापासून इतके दूर ढकलेल की एक दिवस ताणून ताणून विश्व फाटेल आणि त्याचा अंत होईल. Dark Energy सारखे बल अस्तित्वात असल्याचे काही ठळक पुरावेही आता सापडत आहेत. हिचे वैशिष्ट्य असे, की उपलब्ध जागा वाढली की हिचा व्याप वाढत जातो, जे आपण आणि कृष्णपदार्थ, दोघांच्याही बाबतीत घडत नाही. जसेजसे विश्व आणखीन मोठे होत जाईल तसा Dark Energyने व्यापलेला भागही वाढत जाईल, आणि तिची शक्तीही. म्हणजे शेवटी शेवटी महास्फोटानंतर ज्या वेगाने विश्व प्रसारण पावायला लागले, त्याच वेगाने ते ताणले जाऊन नष्ट होईल.
विश्वातल्या बाकी सगळ्या मोजमापांप्रमाणे, हे घडायलाही अजून अगणित काळ आहे. सध्या आपण विश्वाच्या आयुष्यात तारुण्यातून प्रौढावस्थेकडे चाललो आहोत आणि त्याचा प्रसारणाचा वेगही महास्फोटाच्या काळापेक्षा पुष्कळ कमी आहे, असा आपल्या शास्त्रज्ञांचा अंदाज. पण आपल्याला इतकी कमी माहिती आहे की ठामपणे काहीही सांगणे अवघड आहे, हे सगळेच मान्य करतात. ही Dark Energy अजूनही एक सिद्धांत आहे; तो खोटाही ठरू शकेल. पण आपण विश्वातल्या घटनांना तर्कशुद्ध उत्तरे देऊ शकतोय, हे काय थोडे आहे?
An absolute lack of concern can sometimes prove to be much more lethal than downright hatred. (हे वाक्य माझेच आहे, आणि मी उगीच सुचले म्हणून मध्ये घुसडतोय) विचार करता, या सगळ्या ‘कृष्ण’ मंडळींची आपल्यावर वक्रदृष्टी नाहीये. पण त्यांचे साधे अस्तित्वही आपल्यासाठी केवढा मोठा आघात ठरू शकते. या गोष्टींची माहिती मिळाली, की आपल्या सगळ्यांच्या मध्ये दडलेली चिंता हाच प्रश्न विचारेल, की या सगळ्यापासून पृथ्वीला काही धोका तर नाही ना?
मित्रहो, सर्वांत प्रामाणिक उत्तर हेच असेल की पृथ्वी नेहमीच धोक्यात असते. लघुग्रहांच्या पट्ट्यातून एखादा दगड सुटून आपल्याकडे आला, तरी तो सगळी पृथ्वी बेचिराख करू शकतो. एक दिवस आपला सूर्यच आपल्या गिळून टाकणारे, पण त्याआधी आपल्यावर भरपूर जाळ सोडणार आहे. नजीकच्या कुठल्या ताऱ्याचा Supernova स्फोट झाला तर आपल्यावर काय येऊन पडेल, कुणास ठाऊक. आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवराने एक दिवस सगळं खात खात आपल्यालाही गिळून टाकले तर? आणि हे काही घडण्याआधीच, Dark Energyने स्वतःचे प्रमाण वाढवत नेऊन विश्व फाडून टाकले तर?
या सर्व घटनांबद्दल आपल्याला जेवढी माहिती आहे त्यानुसार, या घडायला अजून भरपूर काळ आहे. तो काळ स्वतः विश्वाच्या दृष्टिकोनातूनही ‘भरपूर’च असल्यामुळे आपल्याला त्यांची चिंता करण्याचे कारण नाही. त्यामुळे सध्यातरी पृथ्वीला सगळ्यात जास्त धोका आहे तो आपल्यापासूनच! ते टाळणे तरी आपल्या हातात आहे ना?
विश्व हा खरोखरंच एक अद्भुत प्रांत आहे, अभ्यास करण्याच्या आणि भेट देण्याच्या दृष्टीनेही! आजपर्यंत विश्वात घडलेल्या सर्व घटना कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाहीत. कोण कुठले दोन कण एकत्र येतात, एक महास्फोट होतो, आणि आज अस्तित्वात असलेलं सगळं - दृश्य आणि अदृश्य, ज्ञात आणि अज्ञात - सगळं निर्माण होतं काय! या सगळ्याची जितकी माहिती मिळते तितके आपण अधिक भारावून जातो. पण आपण सगळे असतो आपल्या रोजच्या आयुष्यात गर्क. सतत आपापल्या विचारात. तेही योग्यच आहे म्हणा, कारण दिवसाही विश्वात हरवून जाणाऱ्यांना काय म्हणतात ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आपल्याकडे भारावून जायला वेळ नसतो. पण खरंच, रात्री एकदा बाहेर पडून वर नजर टाकायला असा कितीसा वेळ लागतो?                                                         

Comments

  1. मस्त अभ्यास पूर्ण विचार

    ReplyDelete
  2. Sundar jevadha kholaat jaatoes tevha jasta sundar varnan kartoes.......abhyaas dandaga aahe......sarwaat mahatvacha pariksha asunahi me tuze lekh vaachnyapasun swatahala adavu shakat nahi......abhinandan
    -Sushant

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प