रचना २ : धिस इज द हाईट


अशी कल्पना करा, की आपण दुपारच्या उन्हात रस्त्यावरून चाललो आहोत. चालताना अचानक असं लक्षात येतं, की खूप वेळ झाला आपण एकाच वास्तूच्या सावलीत चालत आहोत........ मान वर करून अगदी वरचं टोक पाहायचा प्रयत्न केल्यास डोक्यावरची टोपी खाली पडते........ आत जाऊन आपण लिफ्टमध्ये शिरतो, सर्वात वरच्या मजल्याचं बटण दाबतो आणि फोनवर आपलं आवडतं साडेपाच मिनिटांचं गाणं लावून ऐकत बसतो. पोचायच्या आधीच गाणं संपलेलं असतं....... वर जाऊन गच्चीतून समोरचं दृश्य पाहिल्यावर मनात प्रश्न चमकतो, आपलं शहर इथून असं दिसतं??
आपण (म्हणजे मानवजातीने) एखाद्या क्षेत्रात जरा जम बसवला की हळूहळू त्या क्षेत्रातल्या आपल्या आवडत्या गोष्टींकडे आपण वळायला लागतो. बऱ्याच वेळा एखादी गोष्ट जमली की तिला ‘मॅग्निफाय’ करायची आपल्याला हुक्की येते. आपलीच क्षमता कुठपर्यंत ताणली जाऊ शकते, हे पाहायचा प्रयत्न असतो तो. अशी क्षमता ताणण्यात यशस्वी झालेले काही प्रकल्प आपल्याला आता ठाऊक आहेत. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या अशा वस्तू म्हणजे पन्नास इंची टी.व्ही. आणि सहा-साडेसहा इंची स्क्रीन असलेला स्मार्टफोन. मनोरंजनात आयमॅक्स स्क्रीनचं जे स्थान, तेच खाद्यक्षेत्रातल्या विक्रमी २९,४६५ किलो लाडवाचं! अशक्य रुंदीचे रस्ते, अशक्य लांबीचे पूल आणि बोगदे, काचेची भिंतच म्हणावी अशी खिडकी....... यादीसुद्धा लांब आहे! आपल्या विषयात, म्हणजेच बांधकाम क्षेत्रातही अशा प्रकल्पांचे खूप प्रकार आहेत, पण या लेखात त्यातल्या एकाविषयीच आपल्याला कर्तव्य आहे.
‘गगनचुंबी इमारत’ हा वास्तुरचनाशास्त्राचा एक खास अविष्कार. त्यांची एक ठरलेली व्याख्यादेखील आहे. ४० किंवा अधिक मजले असलेली इमारत गगनचुंबी असते. नावावर फारसे जाऊ नका. जर ४० मजले या उंचीवरच इमारतीला गगनाला स्पर्श करता येत असता तर त्याहून उंच आपण काही बांधूच शकलो नसतो. शिवाय मग कुठल्याही गगनचुंबी इमारतीहून उंच असलेल्या पर्वतांचे काय? या नावामुळे अजून एक गंमत लक्षात येते, ती म्हणजे याबाबतीत आपली मराठी भाषा त्या इंग्रजीच्या तुलनेत खूपच मृदू आणि कोमल आहे. आपल्या भाषेत या इमारती आकाशाचं चुंबन घेतात. इंग्रजीत याला ‘Skyscraper’ असा शब्द आहे. म्हणजे आकाशाला घासणारी! विशेष याचं वाटतं की जिला अभिमानाने हे नाव द्यावं अशी एकही इमारत तेव्हा नव्हती, आणि हा शब्द आपण परदेशी इमारतींसाठीच तयार केलेला आहे. याशिवाय यांच्यासंदर्भात वापरल्या जाणाऱ्या दोन संज्ञा म्हणजे ‘Supertall’ (३०० मीटरहून उंच) आणि ‘Megatall’ (६०० मीटरहून उंच). सध्या जगात  बुर्ज खलिफा (१६३ मजली), शांघाय टॉवर (१२८ मजली) आणि मक्केतली ‘अब्राज अल-बेत’ (१२० मजली) या तीनच Megatall इमारती आहेत. मजल्यांची संख्या आणि इमारतीची मीटर्समधली उंची यांचा खूप कमी वेळा ताळमेळ जुळतो, पण इमारतीच्या एकूण आकाराची कल्पना यायला हवी असेल तर मजल्यांची संख्या एक चांगले मोजमापाचे एकक असते म्हणून या दोन्ही प्रकारे उंची मांडली जाते.  
जेव्हापासून गगनचुंबी इमारती बांधल्या जाऊ लागल्या तेव्हापासून जगभर एक स्पर्धाच सुरु झाली : जगातली सर्वात उंच इमारत बांधण्याची! इतिहासातल्या उल्लेखानुसार या जातीच्या पहिल्या सभासदांनी डोकं वर काढायला सुरुवात केली ती शिकागो शहरात. मग ते लोण न्यू यॉर्कमध्ये पसरलं. मीना प्रभूंनी न्यू यॉर्कवर लिहिलेल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, इतर शहरांच्या तुलनेने न्यू यॉर्कची वाढ आणि प्रगती खूपच जलद झाली. आणि एका लहानशा उभट बेटावर वसलेलं ते शहर, आडवं वाढायला जागा नाही म्हणून उभं वाढू लागलं. ‘जगातली सर्वात उंच’ ही चुरस सुरु झाली ती तिथे, आणि तीही एका अगदीच लहान मुलांच्या वादावादीसारख्या भासणाऱ्या चढाओढीतून. अमेरिकेतली एक मोठी कार कंपनी ‘क्रायस्लर’ यांनी आपलं मुख्यालय म्हणून ‘क्रायस्लर बिल्डिंग’ उभारायला सुरुवात केली आणि त्याच वेळी ‘बँक ऑफ मॅनहॅटन बिल्डिंग’चंही बांधकाम सुरु झालं. मग काय विचारता, बांधकामाचा सगळं काळ हे दोघेही स्पर्धक अक्षरशः इंच इंच लढवत आपापल्या इमारतीला मोठं करत राहिले. ‘जगातली सर्वात उंच इमारत’ या किताबाचे काही ठरलेले निकष आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च बिंदूची उंचीही ग्राह्य धरली जाते. यामुळे क्रायस्लरबुवांना एक युक्ती सुचली. त्यांनी इमारतीचा प्लॅन एका उंचीवर शेवटी निश्चित केला. ‘आता आपण जिंकली’ असं वाटून बँक ऑफ मॅनहॅटनने त्याच्या थोडंसं वर जाऊन आपलीही उंची निश्चित केली. आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर क्रायस्लरनी गुपचूप आपल्या इमारतीवर एक उंच खांब बसवला!! त्यामुळे इमारतीचे बाह्यरूप खराब न होता त्याचे सौंदर्य वाढले. या अशा ‘चढाओढी’तून ‘चंदेरी मुकुट’ घातलेली क्रायस्लर बिल्डिंग हा 'किताब पटकावणारी जगातली पहिली इमारत ठरली.
2017-05-17_09.11.44.jpg
क्रायस्लर बिल्डिंग, तिचा चंदेरी मुकुट आणि रात्रीचा सोनेरी प्रकाश
क्रायस्लर बिल्डिंगची उंची होती सुमारे ३२० मी. क्रायस्लरबुवांना आपल्या विजयाचा आनंद अगदीच थोडा काळ लुटता आला, कारण त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी ३८१ मी. उंचीची ‘एम्पायर स्टेट’ उभी राहिली आणि तिने हा 'किताब उचलला. ‘एम्पायर स्टेट’ ही केवळ ३९० दिवसांच्या विक्रमी कालावधीत संपूर्ण बांधून झाली, हे तिचे एक खास वैशिष्ट्य. ‘सर्वात उंच’ याशिवाय, १०० मजल्यांच्या वर जाणारी जगातली पहिली इमारत हेही तिच्याच नावे आहे. गूगलनुसार, हिच्या अंतरंगात एकूण त्र्याहत्तर लिफ्ट्स आहेत. बापरे! उगीच नाही मीना प्रभू हिला न्यू यॉर्कच्या सर्व इमारतींची ‘आक्का’ म्हणाल्या!
2017-05-17_09.20.18.jpg
एम्पायर स्टेट आणि तिचे विविध रंगांचे खेळ


क्रायस्लर बिल्डिंगच्या तुलनेत एम्पायर स्टेट खूप जास्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. हिच्या सर्वात वरच्या भागात केलेले प्रकाशाचे खेळ खूप सुरेख दिसतात. ‘फ्रेंड्स’ या लोकप्रिय मालिकेच्या पोस्टरमध्ये मागच्या बाजूला न्यू यॉर्कचं इमारतींचं जंगल दृष्टीस पडतंच, पण खास उठून दिसते ते वेगळ्याच रंगात चमकणारी एम्पायर स्टेट. ‘किंग काँग’ सिनेमा आला तेव्हा त्याच्या क्लायमॅक्समध्ये ते राक्षसी माकड एम्पायर स्टेटवर चढून बसतं असं दाखवलंय. संपूर्ण मॅनहॅटन बेट जिथून व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी ते माकड उभं राहून हेलिकॉप्टर्सना दूर सारत असतानाच शॉट खूप प्रसिद्ध झाला आणि आक्कांची शानही वाढली. त्या काळी तेवढी उंच अशी केवळ तीच होती. तिच्याकडून हा मानाचा किताब उचलायला उठले ते ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या दोन ११० मजली इमारती. या दोघींनी आजवर उंच इमारतींच्या इतिहासातली एक प्रथा बंद पाडली आणि स्वतःचा वरचा भाग निमुळता न ठेवता सरळ चौकोनीच ठेवला. त्यामुळे खालून, वरून, बाजूने, कुठूनही पहिले तरी 3D स्तंभालेखातल्या आयतांसारख्या वाटत. तरीही त्या छान दिसायच्या. नंतर काय झाले ते सगळ्यांनाच माहित आहे. आज त्यांच्या जागी दोन त्याच आकाराचे खोल खड्डे आहेत, ज्यामध्ये कृत्रिम धबधबे बसवून या कलाकृतींच्या स्मृतीला सलाम केला आहे. तसेच तिथे जवळच आज एक १०४ मजली ‘वन वर्ल्ड ट्रेड सेंटर’ नावाची सुंदर गगनचुंबी इमारत उभी आहे. जळल्यानंतरही राखेतून पुनर्जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखे तिचे अस्तित्व सूचक आणि संदेशपूर्ण आहे.
2017-05-17_17.56.41.jpg
डावीकडे जुने वर्ल्ड ट्रेड सेंटर्स आणि उजवीकडे नवीन ‘वन वर्ल्ड ट्रेड सेंटर’


या इमारती बांधून झाल्यानंतर पुढच्याच वर्षी शिकागोने परत, सुमारे ४४२ मी. उंच आणि १०८ मजली विलीस टॉवर बांधून स्पर्धा परत आपल्याकडे वळवली. काळ्या काचांनी मढवल्यामुळे याला एक वेगळंच रूप मिळतं, आणि त्याच्या डोक्यावरचे दोन पांढरेशुभ्र रेडिओ खांब त्याला शिंग असल्याचा आभास निर्माण करतात. मग त्यानंतर मात्र ही स्पर्धा अमेरिकेतून नाहीशीच झाली. मलेशियाच्या राजधानीत, अर्थात क्वाला लंपूरमध्ये ‘पेट्रोनास टॉवर्स’ या दोन ८८ मजली जुळ्या इमारती उभ्या राहिल्या. त्यांच्या मजल्यांची संख्या जरी कमी असली तरी उंची मात्र ४५१ मी. होती. आपल्या मनातलं गणित बिघडतं ते इथे. त्यानंतर तैवानच्या राजधानीत १०१ मजलीच पण ५०८ मी. उंचीची ‘तैपेई १०१’ उभी राहिली आणि पुढचा मान मिळवला. या सगळ्यांनी जरी हा किताब मिरवला असला तरी यांचे स्थान ‘यादी’च्या फारसे पलीकडे कधी गेले नाही. आजवर ह्या स्पर्धेतले स्पर्धक थोड्या-थोड्या मीटरनी उंची वाढवून जिंकत होते. पण तैपेईनंतर स्पर्धेने एक प्रचंड उडी मारली आणि मध्यपूर्वेत जाऊन स्थिरावली; जी आजही तिथेच आहे.
2017-05-17_09.26.02.jpg
वर पेट्रोनास टॉवर्स, खाली विलीस टॉवर आणि उजवीकडे तैपेई १०१

२०१० साली दुबईच्या वैराण वाळवंटात एक सुंदर, अनेक पाकळ्या असलेलं फूल उमललं. (ही फुलाची उपमा माझी नसून, या इमारतीचं डिझाईन फुलवरूनच घेतलेलं आहे) आणि जगातले सगळे रेकॉर्ड्स तोडत पाचशे मीटरवरून थेट ८२८ मी. उंची गाठली ती ‘बुर्ज खलिफा’ या गगनचुंबी इमारतीने. वरून बघितली तर खरोखरीच ही वेगवेगळ्या उंचीवर एकेक पाकळी उलगडत गेलेल्या कमळासारखी दिसते. ‘बुर्ज खलिफा’ हे नाव ऐकायला इतर इमारतींच्या नावांपेक्षा वेगळं वाटतं. तसा त्याचा अर्थ लावणे सोपे आहे. या नावाचा साधासरळ अर्थ म्हणजे ‘उंच इमारतींचा (बुरुजांचा) राजा’. हे नाव या इमारतीला अगदी शोभून दिसतं. हिने जगात Megatall इमारतींचा पायंडा पाडला, शिवाय दुबईची ख्याती चहूकडे पसरवली. आजही दुबईचे सर्वात मोठे पर्यटनस्थळ हेच असावे. याशिवाय हिच्या रचनेत एक वेगळ्याच प्रकारचे सौंदर्य आहे. याआधी उल्लेखलेल्या इमारतींना त्यांचा चौकोनी आकार पूर्णपणे लपवता आला नाहीच. तर इकडे एकमेकींशी सारखे कोन करणाऱ्या तीन भुजा असा बुर्ज खलिफाचा आकार. तसेच इतर इमारतींना न लाभलेली एक आकर्षक गोलाई तिला आहे. गगनचुंबी इमारत बांधताना एक काळजी घ्यावी लागते; ती म्हणजे उंची, रुंदी, लांबी वगैरे यांचा काही ताळमेळ जमला तरच ती सुबक दिसू शकते, नाहीतर तो काँक्रिटचा भलामोठा ठोकळाच वाटतो. हे आपल्याला एम्पायर स्टेट आणि विलीस टॉवर यांच्या बाबतीतही जाणवल्याशिवाय राहत नाही. इथे ही तर त्यांच्या दुप्पट उंच. पण एका सबंध ठोकळ्याऐवजी वेगवेगळ्या उंचीच्या काचेरी सळया रचल्यासारखी ही दिसत असल्याने तिची उंचीही नैसर्गिक भासते. रंगसंगतीचा खेळ इथे अजूनच मनमोहक वाटतो. २६ जानेवारीला यांनी बुर्ज खलिफावर तिरंगा दाखवून मजा आणली होती. तर अशा प्रकारे ही गगनचुंबी इमारत इतर सर्वांपेक्षा अनेक बाबतीत सवाई ठरते. भविष्यात हिच्याहून उंच इमारती उभ्या राहतीलही, पण हिचे स्थान कधीच डळमळीत होणार नाही.
2017-05-17_17.01.43.jpg
गगनचुंबी इमारतींचा राजा

जगभरात आज अनेक गगनचुंबी इमारती आहेत, आणि पश्चिमेकडे त्या अमेरिकेतच सर्वाधिक संख्येने आहेत. बाकी युरोपमध्ये तुलनेने यांच्याबाबत एवढी क्रेझ दिसून येत नाही. आयफेल टॉवर बांधलं तेव्हा ती खरंच कौतुकास्पद कामगिरी होती, पण तांत्रिकदृष्टया ती गगनचुंबी ‘इमारत’ नाही. केवळ हौस म्हणून स्कायस्क्रेपर्स बांधण्यात युरोपला स्वारस्य वाटत नसावं, पण इतर कारणांसाठी मात्र त्या बांधल्या जातातच. पूर्वेकडेही आज खूप अशा इमारती आहेत, आणि यात आघाडीवर चीन असले तरी मध्यपूर्वेतल्या इमारतीही उल्लेखण्याजोग्या आहेतच. मध्यपूर्वेतली वाळू खणून काढतात ती एकतर तेल उपसायला किंवा या मंडळींचे पाये बसवायला, असं म्हणता येईल. या सगळ्या तुलनेत आपल्या भारतात अजून हे वेड तितकंसं पसरलेलं नाही. सध्या मुंबईत दोन साठ मजली इमारती पूर्ण झालेल्या आहेत आणि एक नवी ११७ मजली पूर्ण ‘होऊ घातली’ आहे. पण आपण याबाबतीत अमेरिका किंवा चीनप्रमाणे करणार नाही, असे वाटते. ‘नावापुरते गोड खावे’ म्हणतात तसं ‘नावापुरत्या गगनचुंबी इमारती असाव्यात’!!
तरी आजपर्यंत गगनचुंबी इमारती क्वचितच शोभेच्या वस्तू म्हणून उभारल्या गेल्या. तसंही, एवढी मोठी आणि ‘भारीतली’ शोभेची वस्तू जपण्याऐवजी कुठल्याही देशाने तो पैसा इतर सुधारक कामांना वापरावा असं म्हणणं शक्य आहे. पण तसे नाही. जगातल्या बहुतांश गगनचुंबी इमारती औद्योगिक कारणांसाठी बांधलेल्या आहेत, आणि त्यांच्यातल्या प्रचंड जागेत शेकडो ऑफिसेस आणि काही खास मजल्यांवर पंचतारांकित हॉटेल्स, दुकानं हे सगळं असतं. एका वेगाने वाढत्या शहरात, ऑफिसेसची न संपणारी गरज भागवण्यासाठी या इमारती एक खूप चांगला पर्याय आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्या बांधण्याचा घाट घालणं काही चुकीचं ठरत नाही. काही लोक पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांमुळे यांच्या विरोधात बोलतात. या बांधायला जास्त ‘कच्चा माल’ लागतो म्हणूनही असेल. त्यांच्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने इतर काही अडचणी होत असतीलही. पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर हे पटतं, की त्यांची संवर्धनासाठी मदतही होऊ शकते. शहर वाढतंच, आणि त्याला उभं वाढू दिलं नाही तर ते आडवं वाढणार. मग काय? तसं बघायला गेलं तर एक शंभर मजली इमारत जागेचा मोठा प्रश्न सोडवू शकते. काँक्रिट जंगलाच्या वाढीचा वेग कमी करायचा असेल तर इमारती बांधणं थांबवणं एवढंच करता येईल; जे जागेच्या प्रश्नांमुळे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे आत्ता आपण ‘बांधणारच आहात म्हणता? ठीक आहे मग. पण मग इथे नको. इथे माळरानावर दाट झाडी आहे, हिरवळ आहे ती राहू द्या की. त्यापेक्षा तिथे आकाशात बांधा ना! तिथे भरपूर जागा आहे......’
पण शेवटी कुठेतरी आळा बसला पाहिजेच. शेरलॉक होम्स म्हणाला होता, “एका चांगल्या कलाकाराला एक महत्वाचा गुण असावा लागतो, तो म्हणजे कुठे थांबायचं, याची जाणीव!” इकडे आपली स्पर्धा अजून चालूच आहे, आणि बुर्ज खलिफापेक्षा उंच अशा इमारतीचा पाया घालून झालेलाही आहे. एका व्हिडिओमध्ये ‘कल्पनेतल्या उंच इमारती’ दाखवल्या होत्या. ते कल्पनारंजन पाहिल्यावर वाटलं, की आता कुठेतरी थांबलं पाहिजे. ‘एकाच इमारतीत शहर’ या नावाखाली जपानच्या फूजी पर्वताच्या आकाराची इमारत कुणाच्यातरी डोक्यातून निघाली होती. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये हे यांच्याबाबतीतही खरं आहेच. शिवाय, सगळीकडे अशा सुळक्यांचं रान माजलं तर किती गिचमिड होईल? गगनचुंबी इमारतींबद्दल जाताजाता एवढंच सांगता येईल, की त्या स्वतंत्रपणेच सुंदर दिसतात. आजूबाजूची कुठलीही इमारत तिच्या आसपासही नसेल तरच ती वेगळ्या प्रकारे उठून दिसते. सगळ्याच उंच झाल्या तर त्यात नवीन काय?
हे सगळं आत्ता उत्साहाच्या भरात असलेल्या जगाच्या लक्षात येईल अशी मला आशा आहे. तसं झालं तरच इमारतींच्या इतिहासातल्या मैलाचे दगड ठरलेल्या क्रायस्लर, एम्पायर स्टेट, वर्ल्ड ट्रेड सेंटर्स, पेट्रोनास टॉवर्स आणि बुर्ज खलिफा यांचं महत्व टिकून राहील. आता पुढच्या लेखात काही वेगळ्याच रचना असलेल्या इमारतींबद्दल थोडंसं असेल. आता विसरायच्या आधी रस्त्यावर पडलेली टोपी उचलून घेतो.


Image result for tallest buildings in the world      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प