समोरचा पडदा ८
आता खूप दिवसांनी परत छोट्या पडद्याकडे वळण्याची हुक्की आली आहे, आणि त्याला कारणही तसेच आहे. गेले काही दिवस (खरं तर, महिने) मी एक मालिका बघतोय. आजपर्यंत कुठलीही मालिका अशी TV वर ठराविक वेळेला पाहिल्याचं आठवत नाहीये, पण या एका मालिकेसाठी मला सहजच तसं करता आलं. हा लेख आलेला पाहून माझ्या मित्रांना, मैत्रिणींना आणि विशेषकरून दोन बहिणींना खूप आनंद होणार आहे.
पूर्वी मी ‘फ्रेंड्स’ बघत नसे, आणि त्याला एक अत्यंत बालिश कारण होतं. माझ्या दृष्टीने माझे उत्स्फूर्त विनोदाचे दैवत असलेले ‘हूज लाईन इज इट एनीवे’ मधले कलाकार त्याची अधूनमधून चेष्टा करायचे. पण हे काय ते न बघण्याचं कारण आहे? जर मी तसं करत राहिलो असतो तर कशाचाही अगदी कट्टर फॅन असण्याचा जो भयंकर तोटा आहे त्याला मुकलो असतो, शिवाय ही सुंदर गोष्ट हातातून सुटली असती हे वेगळंच. हा सुज्ञ विचार मला सुचला आणि मी ‘फ्रेंड्स’ कडे वळलो. पण तुम्हीही यातून कसला गैरसमज करून घेऊ नका. अजूनही Drew Careyने होस्ट केलेल्या ‘हूज लाईन’ची मी झोपेतही शिफारस करेन. पण आपण संकुचित विचार करू नये, हेही तितकंच खरं. (फिक्शन सोडून क्वचितच काही वाचणाऱ्या माझे हे वाक्य वाचून आई मला धरून बडवणार आहे. असो!)
काही गोष्टी पहिल्याच दृष्टिकोनात आपल्याला त्यांच्या साधेपणाची खात्री पटवून देतात; आणि ‘फ्रेंड्स’ त्यापैकीच आहे. या मालिकेच्या नावातच एक नैसर्गिक साधेपणा आहे. फ्रेंड्स. फक्त मित्र आणि मैत्री. न्यू यॉर्कमध्ये राहणाऱ्या सहा जिवाभावाच्या मित्रमैत्रिणींची साधी, तरीही अत्यंत विनोदी कहाणी. या हव्याहव्याशा वाटणाऱ्या इफेक्टमुळे मला या मालिकेचे लेखक डेव्हिड क्रेन आणि मार्टा काउफमन यांचे, शेवटी ‘फ्रेंड्स’ वर येऊन ठेपल्याबद्दल अभिनंदन करावेसे वाटते. जेव्हा ही कल्पना मांडली गेली तेव्हा हिचे नाव ‘Insomnia Cafe’ असे सुचवण्यात आले होते. मला वाटतं हे नाव नसतं एवढं चाललं; कारण ते आपल्या जिभेवर ‘फ्रेंड्स’ जितक्या सहजतेने तरळतं तितक्या सहजतेने तरळलं नसतं. शिवाय त्याबद्दल बोलताना नेहमी तो त्या मालिकेचा कोरडा उल्लेख वाटला असता. ‘फ्रेंड्स’ सारख्या साध्या नावामुळे विषय ‘कार्यक्रम’ वरून ‘कहाणी’ याकडे सहज उडी मारू शकतो.
तरीही Insomnia Cafe आणि फ्रेंड्स यामध्ये अजून दोन नावांचं अंतर होतं. त्या कॅफेवरून डेव्हिड आणि मार्टा आले ते ‘Six of One’ या नावावर. मला हे नाव आधीच्यापेक्षा जास्त भावलं. याचं कारण म्हणजे Insomnia Cafe यावरून, कथा तीच असली तरी त्यावर ‘न्यू यॉर्कमध्ये घडणाऱ्या घटनांचं दर्शन’ असलं काहीतरी लेबल त्याला चिकटतं, तर उलट Six of One मधून फोकस आपोआप त्या सहा मित्रांच्या आयुष्यांवर येतो, तसेच त्यांच्यातले संबंध किती चांगले आहेत हेही दिसतं. पण डेव्हिड आणि मार्टा इथेही न थांबता पुढे ‘Friends Like Us’ वर आले आणि मग तिथून फक्त ‘Friends’ वर.
‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही फ्रेंड्सची कॉपी असल्याचं म्हणत असले तरी त्यांच्यात महत्त्वाचेच फरक आहेत. एक म्हणजे सहा फ्रेंड्स एकाच घरात राहत नसतात, आणि त्यांची तिथे आल्यावर मैत्री झालेली नसते. फ्रेंड्स मधली आंतरिक नाती खूप जास्त प्रगल्भ आणि खूप काळापासून असलेली दाखवली आहेत. सर्वप्रथम सांगतो की सहा फ्रेंड्स म्हणजे रेचल (जेनिफर अॅनिस्टन), मोनिका (कोर्टनी कॉक्स), फिबी (लिसा कुड्रो), जोई (मॅट लिब्लॅंक), चँडलर (मॅथ्यू पेरी) आणि रॉस (डेव्हिड श्विमर) असे आहेत. यापैकी रॉस आणि मोनिका हे सख्खे बहीणभाऊ आहेत. मोनिका आणि रेचल शाळेत असताना अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या तर रॉस आणि चँडलर कॉलेजमध्ये असताना जवळचे मित्र होते. सहा फ्रेंड्सची एकूण चार घरे असतात आणि ती रॉस, मोनिका, फिबी आणि चँडलरच्या मालकीची असतात. यापैकी मोनिका आणि चँडलरची घरे एका इमारतीत समोरासमोर असतात तर रॉस आणि फिबी यांची पलीकडच्या इमारतीत. असं दाखवलंय की आधी रॉसमुळे आणि नंतर शेजारी असल्यामुळे मोनिका आणि चँडलरचीही खूप चांगली मैत्री होते. जोई चँडलरच्या घरी रूममेट म्हणून राहायला येतो आणि मग यांच्या गटाचा भाग बनतो, आणि रेचल मोनिकाकडे रूममेट म्हणून राहायला येते. फिबीची आणि यांची ओळख कशी झाली त्याचे फारसे उल्लेख सापडत नाहीत, त्याउलट ती कायम त्यांच्याबरोबर असतेच असं दाखवलंय. हा ग्रुप जॉईन करणारी रेचल ही शेवटची व्यक्ती असते आणि तिच्या येण्यानेच मालिकेला सुरुवात होते.
लेखकांनी या सगळ्या मित्रांची करियर्स खूप भिन्न असल्याचं दाखवून या कथेला वेगळीच मजा आणली आहे. रॉस हा एक पुरातत्त्वशास्त्रज्ञ असतो आणि एका कॉलेजमध्ये प्रोफेसर असतो. डायनासोर्स हे त्याचं पाहिलं प्रेम असल्याचे विनोद बऱ्याचदा घडत असतात. चँडलरचं काम हा मालिकेत दीर्घकाळ विनोदाचा विषय ठरतो, कारण तो नक्की काय करतो हे कुणालाच पक्कं माहित नसल्याचं दाखवलंय. कधी याचा विषय निघाला तर बाकीचे पाचजण “Something to do with numbers” असं म्हणून प्रश्न उडवून लावतात. याच अज्ञानामुळे एकदा मोनिका आणि रेचलला चँडलर आणि जोईशी घरांची अदलाबदल करावी लागली होती! मोनिका शेफ असते. या ग्रुपमध्ये जरा नैसर्गिकता आणण्यासाठी असावं, पण लेखकांनी मालिकेच्या सुरुवातीला या तिघांची आर्थिक परिस्थिती इतर तिघांपेक्षा जास्त चांगली असल्याचं दाखवलंय, आणि या हळव्या विषयावर भाष्य करणारा एक एपिसोडदेखील आहे. या तिघांना चांगल्या पगारी नोकऱ्या असतात तर बाकी तिघांना ती सुरक्षितता नसते. जोई हा कलाकार म्हणून नशीब अजमावायला ‘स्वप्नसृष्टीत’ आलेला असल्याचं दाखवलं आहे. फिबी Massage करते आणि गाणी लिहिण्याच्या आणि गाण्याच्या आपल्या छंदातून पैसे मिळवायचाही प्रयत्न करते. रेचल सुरुवातीचा काही काळ ‘काय काम करायचं’ ते न सुचल्याने तिथल्याच ‘सेंट्रल पर्क’ नावाच्या कॅफेत वेट्रेस म्हणून काम करते. नंतर मात्र फिबीला एका चांगल्या पार्लरमध्ये नोकरी मिळते, रेचलला एका मोठ्या फॅशन कंपनीत नोकरी मिळते आणि जोईला एका TV मालिकेत रोल मिळतो असं दाखवलंय.
मालिकेतल्या बहुतेक सगळ्या घटनांमध्ये सगळे फ्रेंड्स मोनिकाच्या घरी जमलेले असतात किंवा मग सगळ्यांच्या आवडत्या ‘सेंट्रल पर्क’ या कॅफेत. त्याखालोखाल बऱ्याचदा घटना चँडलरच्या घरी घडतात. तुलनेने रॉसचे आणि फिबीचे घर फारसे पाहायला मिळत नाही. जसे फ्रेंड्समधल्या नात्यांमध्ये बदल घडतात तसेच त्यांच्या राहण्याच्या पद्धतींतही. सुरुवातीचा बराच काळ रेचल-मोनिका, जोई-चँडलर, रॉस आणि फिबी अशी मांडणी असते, मग नंतर मोनिका आणि चँडलर यांचं प्रेम जुळतं तेव्हा ते मोनिकाच्या घरी आधी लिव्ह-इनमध्ये राहू लागतात आणि लग्न झाल्यावर तिथेच परत येतात. रेचल काही दिवस फिबीकडे आणि मग जोईकडे राहायला येते; तसेच तिच्या आणि रॉसच्या बाळाच्या जन्मानंतर काही काळ ती रॉससोबत राहते.
रॉस आणि रेचल हे नातं हा मालिकेतली ‘मुख्य प्रेमकथा’ असल्याचं Comedy Central वर म्हटलं होतं. मालिकेच्या दहाही सीझनमध्ये पार्श्वभूमीला त्यांचं नातं सतत जाणवत राहतं. या जोडीला मोठा इतिहास असल्याचं दाखवलंय. रेचल ही मोनिकाची मैत्रीण म्हणून लहानपणापासून सतत त्यांच्या घरी असायची, आणि रॉसला ती तेव्हापासून आवडायची. न्यू यॉर्कमध्ये आल्यावर तो ते सगळं विसरलेला असतो पण आपलं ठरलेलं लग्न मोडून रेचल जेव्हा थेट मोनिकाकडे धडकते तेव्हा त्याच्या आशा पुन्हा पल्लवित होतात. पण त्याचं धाडस होत नाही. नंतर अपघातानेच रेचलला त्याच्या भावना समजतात आणि तीही त्याच्या प्रेमात पडते, पण तोवर रॉसला नवी गर्लफ्रेंड सापडलेली असते. काही काळातच रॉसलाही अपघाताने हे कळतं आणि मग तो नव्या गर्लफ्रेंडला सोडून रेचलबरोबर फिरायला लागतो. पण ते कुठल्यातरी बालिश कारणामुळे तुटतं आणि नंतर बराच काळ त्यांच्यात एक अवघडलेपण राहतं. नंतर त्यांना जेव्हा बाळ होणार असल्याचं कळतं तेव्हा त्याच्यासाठी ते एकत्र राहायचं ठरवतात, पण पुन्हा एकत्र येणार नाहीत यावर ठाम राहतात. तरीही बाळाच्या आगमनामुळे त्यांच्यातली जवळीक पुन्हा वाढते, आणि थोडा काळ रॉसचं चार्ली नावाच्या मुलीशी जुळल्यामुळे आणि जोई आणि रेचल यांचं जुळल्यामुळे ती परत कमी होते. अखेर रेचल जेव्हा नोकरीसाठी पॅरिसला जायचं ठरवते तेव्हा रॉस त्याचं तिच्यावर प्रेम असल्याचं कबूल करून टाकतो, आणि मग तीही अगदी नाट्यमय रीतीने विमानातून उतरून त्याच्याकडे परत येते.
‘मुख्य प्रेमकथा’ म्हटलं तरी सबंध मालिकेत ते इतका कमी काळ सोबत असतात की एक प्रेमकथा म्हणून ती बघण्यात काही खास मजा येत नाही; पण शेवटी त्यांनी हा गुंता तसाच न ठेवता सोडवला याचं समाधान वाटतं. त्या तुलनेत मोनिका आणि चँडलर यांची प्रेमकथा अनुभवायला खूप जास्त मजा येते. रॉस कॉलेजमध्ये जायला लागला तेव्हापासून त्याचा खास मित्र चँडलरही त्यांच्या घरी वरचेवर यायला लागला, तेव्हापासून तो आणि मोनिका एकमेकांना ओळखतात. आपल्या मित्राचे, मैत्रिणीचे किंवा विशेषतः भावंडांचे मित्रमैत्रिणी यांची आणि आपली चांगली मैत्री होईपर्यंत (किंवा झालीच नाही तर) एक अवघडलेली ओळख असते; हा अनुभव मलाही आलाय. सुरुवातीला त्या दोघांमध्येही असंच अवघडलेपण होतं. तिचा त्याच्यावर ‘क्रश’ होता, पण त्याला ती लठ्ठ (तेव्हा होती) असल्याने तिच्याबद्दल काही वाटलं नाही असं दाखवलंय. (त्यांचं जुळल्यानंतर एकदा चँडलर अशा कारणावरून कुणाला नाकारणं हे चुकीचं असल्याचं कबूल करतो, आणि तेव्हा तो तसा मूर्खासारखा वागायचा असंही म्हणतो हेही दाखवलंय). नंतर त्यांच्यात खूप चांगली मैत्री होते, आणि बऱ्याचदा आपल्याला असं पाहायला मिळतं की चँडलर रेचल किंवा फिबीपेक्षा मोनिकापाशी जास्त मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो. चौथ्या सीझनच्या शेवटी रॉसच्या लग्नात ते दोघे एकत्र येतात आणि एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देतात, आणि त्यानंतर अगदी मालिका संपेपर्यंत ते एकत्रच असतात. त्या दोघांचं नातं रॉस आणि रेचलपेक्षा कायमच जास्त मजबूत आणि समजूतदारपणावर आधारलेलं असल्याचं आपल्याला जाणवतं. त्यांना एकत्र पाहण्याची मला इतकी सवय झाली आहे की पुन्हा जेव्हा सुरुवातीपासून फ्रेंड्स बघायला लागेन तेव्हा पहिले चार सीझन्स त्यांच्यात फक्त मैत्री आहे असं सारखं स्वतःला सांगत बसावं लागणार आहे!
सहाही फ्रेंड्सपैकी जोई हे माझं सगळ्यात आवडतं पात्र आहे. सगळ्यांमध्ये तो सगळ्यात जास्त निरागस आहे. तो तसा थोडा बावळटही असल्याने त्याच्या बाबतीत अनेक छान विनोद घडतात. आपल्याला मुलगा झाला का मुलगी हे रॉसला कळू द्यायचं नसतं आणि मोनिका “मी आत्या होणार आहे!” असं म्हणते तेव्हा जोई घाईघाईने “किंवा काका,” असं म्हणतो, तसंच फिबीच्या भावाला सल्ला देताना “मित्रा, तू १८ वर्षांचा आणि तुझी ही गर्लफ्रेंड ४४ वर्षांची आहे. विचार करून बघ; तू जेव्हा ३६ वर्षांचा असशील तेव्हा ती ८८ वर्षांची असेल” असं सहज बोलून जातो, तेव्हा आपण अगदी मनापासून खदखदून हसतो. तसंच (बाकीच्या प्रत्येकाने किमान एकदातरी बोलून दाखवल्याप्रमाणे) सगळ्यात देखणाही आहे. अमेरिकेतल्या ‘डेटिंग’ या संस्कृतीचं अगदी वास्तववादी चित्रण या मालिकेतून आपल्यासमोर येतं हे तर खरंच, आणि त्यापैकी केवळ शारीरिक आकर्षणावर बेतलेली आणि कमी काळ टिकणारी रिलेशनशिप हा प्रकार जोईच्या माध्यमातून आपल्यासमोर येतो. इतर पाचजणांप्रमाणे जोई दरवेळी गंभीर नात्याची इच्छा धरत नाही. एखाद्या मुलीसोबत एक रात्र काढणे आणि दुसऱ्या दिवशी तिचा नंबर घेऊन तिला फोन न करणे हे सूत्र त्याच्या Love Lifeचा स्थायीभाव आहे. हा प्रकार तिथल्या समाजात प्रचलित असल्याचं आपल्याला माहित असल्याने जोई हा वाईट आहे असं आपल्याला वाटत नाही. वाईट तर तो अजिबात नाहीये. दोन तीन वेळा एखादं नातं खरंच खूप पुढे जावं असं त्याला मनापासून वाटतं, पण दुर्दैवाने त्याच्या बाबतीत ते घडत नाही. मालिका संपताना सहाजणांपैकी लग्न न झालेला असा तो एकटाच आहे. पण त्याची निरागसता आणि काही बाबतींत अगदी लहान मुलाप्रमाणे हळवं होणं हे पाहता आपल्याला ते विचित्र वाटत नाही; किंबहुना त्यांनी त्याचंही जुळवून टाकलं असतं तर ते मुद्दाम केल्यासारखं वाटलं असतं. ‘फ्रेंड्स’ मालिकेला ‘जोई’ नावाचा छोटा दोन सीझनचा सिक्वेल आहे, ज्यात जोईची कथा त्यांनी पुढे नेली आहे. त्यामध्ये कदाचित तो अखेर ‘सेटल’ झालेला असल्याचं दाखवलं असेल.
कुठलंही पात्र जास्त वरचढ ठरू नये म्हणून या मुख्य सहाजणांपैकी प्रत्येकाच्या वाट्याला तेवढेच विनोद येतील अशी खबरदारी लेखक घ्यायचे म्हणे. तरी सगळ्यात विनोदी घटना जोईच्या आसपास घडतात असं आपल्याला वाटतं. केवळ त्या कारणासाठी जोईचं खोलीत असणं मला आवडतं, पण व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव या दृष्टीने पाहिलं तर माझं सगळ्यात आवडतं पात्र मोनिका असेल. या सहाही जणांपैकी ती सर्वांत Mature आणि संवेदनशील आहे. तिच्या स्वतःच्या आयुष्यात इतरांच्या तुलनेत क्वचितच कलाटणी किंवा सगळं बदलून टाकणारे प्रसंग येतात. तिला सेटल व्हायची फार घाई झालेली असते असं दाखवलंय, पण बाकीच्यांप्रमाणे ती सतत जोडीदार बदलणे असं न करता कायम एक घट्ट नातं शोधायचा प्रयत्न करत राहते. चँडलरशी जुळण्यापूर्वीच्या काळात एकदाच ती अशा एका रिलेशनशिपमध्ये होती. आणि तेही, तिचे लहान असतानाचे दाताचे डॉक्टर आणि तिच्याहून वीस वर्षांनी मोठे असलेले डॉ. रिचर्ड यांच्यासोबत! वयातल्या अंतरामुळे हे खूप कठीण होईल असं सगळ्यांनी सांगूनदेखील आपल्या प्रेमाच्या बळावर आपण हे निभावून नेऊ असा विश्वास तिला असतो, पण रिचर्डना मूल नको असतं हे कळल्यावर ती त्यांना सोडते. आपल्याला मूल असावं ही तिची सगळ्यात प्रिय इच्छा आहे आणि सेटल होण्यासाठीचा तिचा सर्वात मोठा प्रेरणास्रोतही. कधीकधी जाणवणारा तिचा हट्टीपणा, ईर्ष्या आणि साफसफाईचं वेड या गोष्टी सोडल्या तर तिच्याइतकी मनाने मोठी आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी ‘आई’ नाहीच. मोनिकाला चांगलं ओळखायला लागल्यावर, सगळ्या फ्रेंड्सचा अड्डा कायम तिच्या घरी का जमतो आणि कुठल्याही प्रसंगी आसरा शोधत ते तिथे का येतात हे लगेच उमगतं.
प्रत्येक ग्रुपमध्ये एक वल्ली असते, आणि या ग्रुपमध्ये ती म्हणजे चँडलर. सर्वाधिक उपहासात्मक विनोद याच्या तोंडी असतात. ‘विनोद’ हा चँडलरचा ट्रेडमार्क असल्याचं मालिकेत अनेकदा बोललं गेलं आहे. चँडलरचं पात्र ज्या प्रकारे उलगडत जातं ते पाहायला मला फार आवडतं. सुरुवातीच्या सीझन्समध्ये तो काहीसा बेफिकीर, वरवर थोडासा असंवेदनशील वाटणारा आणि ‘कूल’ राहण्याची धडपड करणारा असा मुलगा वाटतो. नंतर मात्र त्याच्या लहानपणी घडलेल्या काही गोष्टींचा ताण आणि त्यामुळे रिलेशनशिपबद्दल त्याला वाटणारं भय या गोष्टी तो उघडपणे व्यक्त करतो तेव्हा अधिक जवळचा भासू लागतो. नात्याबद्दलची त्याची Insecurity वगळता तोही अत्यंत संवेदनशील स्वभावाचा खरा मित्र आहे हे आपल्याला पटतं. पाचव्या सीझनपासून तर तो अचानक रंग बदलल्यासारखाच वाटायला लागतो. एखाद्या कथेत आपण गुंतलो आणि काही पात्रांविषयी आपल्याला विशेष आपलेपणा वाटायला लागला की आपण त्या पात्राच्याच दृष्टिकोनातून नकळत सगळं पाहायला लागतो. माझं असं मोनिकाच्या बाबतीत झाल्याने, तिचं आणि चँडलरचं जुळलं तेव्हा रॉस आणि रेचलप्रमाणेच काहीतरी बालिशपणा घडून, त्यांचं नातं संपून गाडी पुन्हा मेनलाईनवर यायला मला नको होती. पण चँडलर कधीच तिला तक्रार करावीशी वाटेल असा वागला नाही आणि त्यांचं नातं एकदाही न तुटता सलग मालिका संपेपर्यंत टिकून राहिलं याला तिच्याइतकाच तोही कारणीभूत आहे. शेवटी आपल्याला असं कळून चुकतं की एक चांगला जोडीदार होण्याचे सगळे गुण चँडलरमध्ये आधीपासूनच असून फक्त योग्य व्यक्तीसाठी ते प्रकट होत. आणि ती व्यक्ती मोनिका असणं हे अगदीच परफेक्ट आहे. Comedy Central वर म्हटल्याप्रमाणे हे फक्त दोनचार एपिसोड्सपुरतं प्रेमप्रकरण असणार होतं, पण त्यांच्या नात्याची कल्पना प्रेक्षकांनीच उचलून धरली आणि हा आनंददायी बदल घडला. असंही म्हटलं होतं की चँडलर आधी एक ‘supporting character’ म्हणूनच असणार होता; त्याऐवजी त्याला असं दाखवायचं लेखकांनी ठरवलं याचं मला फार बरं वाटतं.
हाच प्रकार आधी फिबीच्या बाबतीत घडला होता, पण चँडलरप्रमाणेच तिनेही शेवटी या गटाचा एक समान भाग म्हणूनच गोष्टीला सुरुवात केली. एक अत्यंत विक्षिप्त पण तितकीच गोड मुलगी. फ्रेंड्सच्या नावांपैकी ‘फिबी’ हेच नाव मला सगळ्यात ‘स्पेशल’ वाटतं. कदाचित ते नाव शनीच्या एका चंद्राचं असल्यामुळेही असेल. तिच्या भन्नाट कल्पना, काही वेळा बालिशपणा करणं आणि काही इतर बाबतीत गरजेपेक्षा जास्त हळवं होणं हे पाहिल्यावर मनाने तीही जोईइतकीच लहान आहे असं वाटतं. रॉस, रेचल, मोनिका आणि चँडलर यांचा मोठा इतिहास आहे, तर जोईसारखीच फिबीदेखील या ग्रुपमध्ये बाहेरून आलेली आहे. ती अनाथ असते आणि तिचं लहानपण न्यू यॉर्कच्या गल्ली-बोळांतल्या समाजात गेलेलं असतं. तिचा निरागसपणा आणि सच्चेपणा बघून सगळे तिला सांभाळून घेतात. आपल्याला असं जाणवतं की सहाही फ्रेंड्स एकमेकांचे तितकेच जवळचे असले तरी त्यांच्यातल्या काहींची मैत्री एका वरच्या पातळीवरची असते. उदाहरणार्थ, मोनिका आणि रेचल तसंच रॉस आणि चँडलर किंवा जोई आणि चँडलर. फिबीचं मात्र कुणाशीच असं खास नातं नाही. ती सगळ्यांसोबत असते आणि तिच्याशिवाय कुठल्याही घटनेला पूर्णत्व येत नाही, हे मात्र खरं. एका बाहेरच्या व्यक्तीशी जुळवून घेऊन ते नातं टिकवणारी फिबी एकटीच. काही बाबतींत ती जोईसारखी असल्याने तिला जोडीदार मिळालाच तर तो खूप समजूतदार, तिला बाकीच्यांप्रमाणेच सांभाळून घेणारा असा असावा असं आपल्याला वाटतं. आणि तसं घडतंही. तिच्या नवऱ्याची, माईकची व्यक्तिरेखाही त्यांनी काळजीपूर्वक तशी रंगवली आहे. सबंध मालिकेत माईक हे एकच महत्त्वाचं बाहेरचं पात्र आहे, आणि पॉल रडने या भूमिकेला तो न्याय दिला आहे.
रेचल ही एक आगाऊ, अल्लड आणि काही बाबतीत थोडी स्वार्थी अशी मुलगी आहे. मोनिकाची शाळेत असताना खूप चांगली मैत्रीण असूनही मधल्या काळात ती बदलते आणि त्यांच्यात दुरावा निर्माण होतो असं दाखवलंय, पण ती स्वतःचं लग्न सोडून पळून येते तेव्हा मोनिकाच तिला परत घेते आणि त्यामुळे, तसंच इतर फ्रेंड्सच्या सहवासामुळे ती परत बदलते आणि त्यांच्याप्रमाणेच होण्याचा प्रयत्न करते. रेचल मुळात मनाने खूप चांगली, संवेदनशील आणि प्रेमळ असल्याचं दाखवलं जातं, आणि कधीकधी डोकावणारा तिचा नाटकीपणा किंवा स्वार्थीपणा सोडल्यास ती कायम सगळ्यांशी मिळून-मिसळून वागते, सांभाळून घेते आणि गरजेच्या वेळी आधारही देते असं आपल्याला दिसतं. ‘वडिलांच्या क्रेडिट कार्ड्सवर जगणारी एक बेफिकीर मुलगी आज स्वतःच्या पायावर उभी राहून आवडतं काम करतेय ते तुमच्या सहवासामुळेच’ असं ती स्वतः एकदा म्हणते.
आता उरला तो रॉस! प्रत्येक ग्रुपमध्ये जशी एक वल्ली, एक निरागस व्यक्ती, एक सांभाळून घेणारी व्यक्ती हे बहुतेकवेळा सापडतातच तसेच अनेकदा सापडतात ते पुस्तकातले किडे! यांना इंग्लिशमध्ये ‘Nerds’ असा सर्वमान्य शब्द आहे. रॉस हा तसाच. पीएच.डी. मिळवलेला हा शास्त्रज्ञ खरंच तेवढा बुद्धिमान असल्याचं दाखवलंय. त्याची हुशारी सोडली तर एरवी कायम कशाच्याही ‘थिअरी’च्या मागे लागणे आणि अभ्यासाच्या मुद्द्यांवरून पिडत बसणे हा त्याचा स्वभाव आहे. काही प्रसंगी तो अगदी लहान मुलासारखा हळवा होतो तर काही प्रसंगांत तो मोनिकाच्या मोठा भाऊ असल्याचं दाखवून देतो. त्याच्या वाट्याला तुलनेने कमी विनोद आहेत पण त्याची फजिती मात्र अनेकदा होते. अशा वेळी बाकी फ्रेंड्स त्याच्यावर हसतात आणि तो खजील होतो, तेव्हा आपलं कधी रॉससारखं होऊ नये असं वाटतं. पण इतर फ्रेंड्सच्या चेहऱ्यावरचे भाव नीट वाचले तर असं वाटतं की त्यांच्या हसण्यातून “अरे, आम्ही फक्त तुझ्यावर हसत नाहीये; तू जसा आहेस तसाच आम्हाला आवडतोस म्हणूनही आम्ही हसतो,” हा विचार प्रकट होतोय. मग रॉससारखं झालं तर हरकत नाही असं वाटतं. किंबहुना आपण आयुष्यात एकदातरी या सहाही फ्रेंड्सच्या भूमिकेत, तात्पुरते का होईना, पण शिरतोच.
आता हे खूपच लांबत चाललंय, म्हणून शेवटच्या मुद्द्याला हात घातलेला बरा! मी जेव्हा मागे वळून फ्रेंड्सकडे बघतो, तेव्हा असं जाणवतं की प्रत्येक पात्राचं व्यक्तिमत्त्व, त्यांची आयुष्यं, त्यांचे अफलातून विनोद या सगळ्यापेक्षा मला जास्त भुरळ घातली ती त्यांच्या अत्यंत आकर्षक अशा सहजीवनाने! अगदी शेजारी-शेजारी राहणं, तेही ग्रुपमधल्याच मित्रांसोबत, आणि रोजच्या दिवसातला खूप वेळ सतत एकमेकांसोबत काढणं! सहाही फ्रेंड्सकडे मोनिकाच्या घराच्या किल्ल्या असतात आणि ते हवं तेव्हा दार ढकलून आत येतात (चँडलरची पावलं आपसूक आरामदायी सोफ्याकडे वळतात तर जोईची फ्रिजकडे!) आणि आपलंच घर असल्यासारखे वावरतात. कारण ते त्यांचंही असतं; ही अनौपचारिकता! मोनिका आणि चँडलर बाहेर नवीन घर घेतात तेव्हा इतरांना जे प्रचंड दुःख होतं त्यात मी मनापासून सहभागी होऊ शकतो. दहा वर्षांचा अखंड सहवास! माझा असा अनुभव आहे की कधीकधी काही लांबच्या नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे आपण जरा जास्त दिवस असलो की त्या सहवासाचाच आपल्याला कंटाळा येऊ लागतो आणि मग काही खटके उडतात; पण हे घडतं ते स्वतंत्र आयुष्याची सवय असलेल्यांची आयुष्य तात्पुरती एक झाल्यामुळे. इथेतर या सगळ्यांची आयुष्यही एकच आहेत, आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा बाकीचे पाचजण अविभाज्य भागच आहेत! अशा परिस्थितीत कंटाळा येईलच कसा? खटके उडतील; त्यात काही शंकाच नाही. पण किती काळ? पुन्हा समजूत घालून घ्यायला आणि व्यक्त व्हायला जायचं ते एकमेकांकडेच! एक अद्भुत सहजीवन, ज्याचा अंतःप्रवाह असतो : “I’ll be there for you,”!!!
सुखी जीवन म्हणजे काय याच्या प्रत्येकाच्या वेगळ्या कल्पना असतात. एक खूप मोठ्ठा पगार देणारी नोकरी (किंवा धंदा असल्यास उत्तमच), स्वतःची फॅमिली, चांगलं घर आणि चांगली ‘social life’ ही अनेकांची कल्पना असते. माझीही होती. पण आता वाटतं, की या फ्रेंड्ससारखं आयुष्य काढण्यात जी मजा आहे आणि जे यश आहे, ते या वरील यशापेक्षा कमी आकर्षक आहे का?
डावीकडून रॉस, रेचल, मोनिका, चँडलर, फिबी आणि जोई
Comments
Post a Comment