मागे वळून पाहताना


शाळा सोडून दोन वर्षे झाली. मधल्या काळात नवीन आयुष्याशी जुळवून घेण्यात (जणू ते फार अवघड होतं) माझा सगळं वेळ जायचा आणि त्यामुळे आत्ता, फर्स्ट इयरला आल्यावर आणि बोर्डाशी संबंध कायमचा संपल्यावर मला शाळेविषयी लिहायला सुचतंय. त्याला कारण असं : माझ्या शाळेतल्या दोन जिवलग मित्रांसोबत मी क्लासला जातो. तिथेच एकदा बसस्टॉपवर बसून वेफर्स खात गप्पा मारताना खूप काळाने पुन्हा शाळेचा विषय निघाला आणि कुणीतरी अचानक आठवणींचा बांध फोडल्यासारखं झालं. तेव्हा आता पुन्हा लेखणी हातात घेऊन ज्यांनी लेखणी धरायला शिकवली त्यांच्याबद्दल चार(शे) शब्द लिहायला घेत आहे.
माझी बहीण वेळीअवेळी म्हणते त्यानुसार, आम्हाला शाळेविषयी जी आपुलकी वाटायची ती कॉलेजबद्दल कधीच वाटणार नाही. हे विधान पटतं, आणि अशा वेळी शाळेतला एक किस्सा आठवतो. नववीत का दहावीत आमच्या वर्गाला, आमच्यासाठी ‘टीचर आणि मेंटॉर’ या दोन्ही भूमिका चोख बजावणाऱ्या आमच्या आवडत्या शिवानी टीचरनी, “आता तुम्ही कॉलेजला जाणार आहेत. खूप घाणेरडं जग आहे ते. आता पान नंबर ४० काढा.” अशा शब्दांत आमच्या भविष्याचे भूत केले होते. मला हाच अनुभव माझ्या परीने कॉलेजला आल्यावर आलाच. माझ्यासाठी शाळा म्हणजे एक वेगळंच, छोटंसं जग होतं. एक चारमजली इमारत आणि भोवताली तीन मैदानं या परिसरात सामावलेलं. कधीकधी जरा अनरिझनेबल वाटलं तरी घरासारखं. शाळा हा बाहेरच्या जगाशी होणारा पहिला ‘एन्काउंटर’ असतो असं म्हणतात. पण इकडे फक्त सव्वीस जणांचा लहान वर्ग आणि टीचर्सची आपुलकी यांच्यामुळे तो ‘एन्काउंटर’ कधी झालाच नाही.
माझी शाळा इंग्लिश माध्यमाची होती, पण सगळे व्यवहार काही इंग्लिशमधून व्हायचे नाहीत. प्रश्नोत्तरे लिहायच्या वेळी अर्थातच तीच वापरावी लागायची, पण इतिहास, भूगोल, विज्ञान किंवा गणित शिकवताना टीचर आधी आमच्याकडून पुस्तकातलं वाचून घ्यायच्या आणि मग ते इंग्लिशमध्ये समजावून सांगायच्या, आणि मग शिवाय “म्हणजे, कळलं का तुम्हाला.....” असं म्हणून मराठीतून बराचसा भाग पुन्हा सांगायच्या. काय बिशाद होती न कळण्याची? अर्थात, सगळ्या तसं करायच्या नाहीत; काहीकाही फक्त म्हणजे फक्त इंग्लिशमधूनच बोलायच्या. पण अशा टीचर्सचे आणि आमच्या वर्गाचे क्वचितच मैत्रीचे संबंध टिकायचे. फक्त इंग्लिशमधून शिकवणाऱ्या आणि एरवीच्या गप्पाही इंग्लिशमधून मारत असूनही आम्हाला जवळच्या वाटणाऱ्या टीचर्स बोटांवर मोजण्याएवढ्याच होत्या. पण त्यांचं इंग्लिश सुरेख असे. त्यांच्यामुळेच इंग्लिशमधून गप्पा मारायला शिकलो. पण याच टीचर्स जेव्हा काहीतरी काम सांगायला बोलवायच्या तेव्हा मराठीतून सांगायच्या, आणि हे अजूनच विशेष वाटे.
काही ठराविक टीचर्सचे आणि आमच्या वर्गाचे अगदीच जवळचे संबंध होते. त्यापैकी ठळक उल्लेख करावासा वाटतो तो आम्हाला सुरुवातीची काही वर्षे इंग्लिश आणि एकदोन इतर विषय शिकवणाऱ्या शुभा टीचरचा, ज्या मधल्या काळात शाळेत दिसायच्या नाहीत. पण आल्या की आमच्या वर्गावर डोकावून जायच्या. वरच्या कॉलेजच्या किश्श्यात उल्लेख केलेल्या शिवानी टीचर तर अगदी पहिलीपासून दहावीपर्यंत आमच्याबरोबर होत्या आणि त्यांनी आम्हाला चित्रकलेपासून बीजगणितापर्यंत अनेक विषय शिकवले होते. आजपर्यंत वर्गातलं कुणीही त्यांच्यावर वैतागल्याचं मला आठवत नाहीये. या दोघीजणींनीही, आठवड्यातून किमान एकदा आमच्याशी मोकळेपणाने गप्पा मारल्या नाहीत असं घडलं नसावं. एरवी ‘Lenience’ ची परिभाषा असणाऱ्या या जेव्हा कठोर होत तेव्हा आमच्यापैकी बहुतेकांना खरंच वाईट वाटे. शाळेत असताना मी केलेल्या प्रत्येक कवितेवर यांची प्रतिक्रिया मला पाठीवर जोरात मिळायची. शब्द अपुरे पडत म्हणून वगैरे नव्हते, तर त्यांची गरजच नसे म्हणून.
याशिवाय तीन टीचर्सचा उल्लेख करावासा वाटतो, ज्यांचा सहवास आम्हाला अल्पकाळासाठीच लाभला. पण त्यांनी फार लवकर आमच्या वर्गाची ओळख करून घेतली (किंवा ओळखून घेतलं) आणि तसेच जवळचे संबंध प्रस्थापित केले. या संगीता टीचर, स्नेहल टीचर आणि उमा टीचर आम्हाला दहावीत अनुक्रमे भूमिती, विज्ञान आणि इतिहास शिकवायला होत्या. यांना कधी फार कठोर व्हावं लागलं नाही, पण त्यांचीही ती इच्छाच नसावी असंच वाटे. आमचा वर्ग शाळेत प्रत्येक टीचरचा किमान एकदातरी संपूर्ण अंत पाहणाऱ्यांचा वर्ग म्हणूनच ओळखला जायचा. या आमच्या मिशनमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त ‘टफ’ दिली ती यांनी! अखेरीस उल्लेख करायचा तो आमच्या मुख्याध्यापिकांचा. दहावीत त्या आम्हाला मराठी शिकवायला होत्या. त्याही आमच्या लहानपणापासून आम्हाला पाहत आल्या आहेत. आम्ही शाळेत असतानाच त्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या. दहावीच्या परीक्षेनंतरच्या पार्टीत त्या आमच्याविषयी खूपच आपुलकीने बोलल्या होत्या. ‘एकूणच सगळ्या बाबतीत जरा पुढेच असणारा वर्ग - खोडकरपणातही’ या प्रेमळ शब्दांत आमच्या लाडक्या रोहिणी ‘मॅडम’नी आम्हाला निरोप दिला होता.
हे सगळे शब्द आमच्या शाळेच्या खास भाषेतले होते. इतर शाळांमध्ये ‘टीचर’ किंवा ‘मिस’ यापैकी काहीही (त्यावेळी जे सुचेल ते) असं संबोधतात हे माझ्या इतर मित्रांनी मला सांगितलं होतं. माझ्या बहिणीच्या शाळेत ‘ताई’ म्हणत. आमच्या वर्गाने एकदाच ‘मिस’ या संबोधनाची प्रथा पाडण्याचा प्रयत्न केला होता, पण मग ‘मिस’ कुणाला आणि ‘मिसेस’ कुणाला म्हणायचं अशा दुग्ध्यात पडल्यामुळे ते Venture तिथेच थांबवण्यात आलं. एकतर लहानपणापासून या सगळ्यांना त्यांच्या नावानेच ओळखत असल्याने आडनावं माहित असायची बोंब होती. मला वाटतं असे बदल आमच्या टीचरनाही रुचायचे नाहीत. ‘टीचर’ हेच शाळेतलं सर्वमान्य संबोधन होतं आणि नंतरही, नवीन आलेल्या मुलामुलींनाही त्यांच्या आधीच्या सवयी आम्ही बदलायला लावायचो. तसंच आमच्याकडे ‘मॅडम’ हे संबोधन फक्त आणि फक्त मुख्याध्यापिकांसाठीच राखीव होतं. नुसतं मॅडम म्हटलं की मिनी के.जी. मधल्या मुलापासून ते शिपायापर्यंत सगळ्यांना कळायचं. अशा आमच्या अनभिषिक्त मॅडमच्या शाळेत एकदा कुठल्यातरी नवीन मुलीने एका टीचरलाच मॅडम असं संबोधलं होतं, तेव्हा त्यांच्यासकट सगळे चकित झाले होते. नंतर कॉलेजमध्ये आल्यावर बाकी कोणीच टीचर म्हणत नाहीये हे पाहून मी कसंबसं मॅडम म्हणायला लागलो. पण आजही घरी उल्लेख करताना या कॉलेजमधल्या शिक्षिकांची नावे घ्यावी लागतात, कारण लहानपणापासून ‘मॅडम’ त्या एकच.
मला माझी शाळा खूप आवडते याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे तिचा आम्हाला मोकळं सोडून स्वतःचं हित स्वतः पाहायला शिकवण्याकडे कल होता. लहानपणी स्नेहसंमेलनासाठी सगळ्याचा, अगदी प्रमुख पाहुण्यांकडून बक्षीस स्वीकारण्याचाही सराव करून घेणाऱ्या शाळेने आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला स्वतःचे कार्यक्रम बसवायला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर शेवटपर्यंत आमच्या वर्गाची समूहनृत्ये आम्ही स्वतः बसवत असू. स्नेहसंमेलनासारखाच विज्ञान प्रदर्शन हा आमच्या शाळेचा ठरलेला वार्षिक कार्यक्रम. दहावीत शाळेने आम्हाला आमचे स्वतःचे प्रकल्प निवडायला परवानगी दिली. काम सुरु करण्यापूर्वी रीतसर रिपोर्ट द्यायची मात्र अट घातली. त्याच वर्षी आमची शाळा ४० शाळांचे सामूहिक विज्ञान प्रदर्शन होस्ट करत होती. अशात आम्हाला मोकळं सोडणं म्हणजे तसा धोकाच, पण शाळेने आमच्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं. त्या वर्षी दुसरं बक्षीस आमच्या वर्गातल्या एका ग्रुपच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला मिळालं. शाळेला अधिकृत सूचना मिळालेल्या सगळ्या बाहेरच्या परीक्षांना बसण्याचा ती आम्हाला आग्रह करायचीच, शिवाय आपणहून बसणार असू तर लागेल ती मदतही करायची. मी नववीत NCFEची अर्थशास्त्राची एक परीक्षा दिली तेव्हा माझी नोंदणी शाळेकडून होणं गरजेचं होतं. परवानगीचा प्रश्नच नाही, पण शिवाय एके दिवशी संगीता टीचर मला ऑफिसमध्ये घेऊन गेल्या आणि तासभर तिथे बसून मला फॉर्म भरायला आणि नोंदणी करून घ्यायला मदत केली. याशिवाय शाळा दरवर्षी नियतकालिक काढते; त्यात ती आम्हाला छोटे लेख लिहायला सांगायची. त्या बाबतीतही आमच्या वर्गाचा उत्साह होताच. मग सव्वीस जानेवारीला हे नियतकालिक निघाल्यानंतर फेब्रुवारीत ते आमच्या हाती पडायचं, आणि तो तास आधी घाईघाईने आपलं नाव शोधून काढण्यात आणि मग इतरांनी काय तारे तोडलेत ते पाहण्यात जायचा. Good times.
याच मोकळं सोडण्याच्या तत्त्वाखाली दहावीत आमच्या शारीरिक शिक्षणाच्या टीचरनी घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यात जास्त आवडला. तोपर्यंत आठवड्यातून दोनदा असणाऱ्या या तासांमध्ये काय काय ‘घ्यायचं’ याच्या पूर्वनियोजित उपक्रमाला पाळत आम्ही वर्ष काढायचो. पण दहावीत आमच्या टीचरची योजना अत्यंत आकर्षक होती. या ‘विषयाच्या’ ज्या परीक्षा बोर्डासाठी द्याव्या लागायच्या त्यांची तयारी आणि वर्षाच्या शेवटी त्या देणं हे वगळता बाकीचे सगळे तास त्यांनी आम्हाला देऊन टाकले. शिवाय शाळेने यावेळी सुज्ञपणा दाखवून आठवड्यातले दोन्ही तास शेवटी ठेवले. मग अगदी काहीही खेळायची परवानगी, बाकीचे तास संपवून उरलेला तास-दीड तासाचा वेळ, खेळाच्या सामानाच्या कपाटाच्या किल्ल्या, तीन प्रचंड मैदानं आणि यातल्या कशातही किमान वर्षभर बदल होणार नाही ही हमी या संपत्तीतून आम्ही शेवटच्या वर्षात अनेक आठवणी निर्माण केल्या. आजही मी शाळेतलं सगळ्यात जास्त काय ‘मिस’ करतो असं कुणी विचारलं तर ‘दहवीतला फुटबॉल’ हे माझं ठरलेलं उत्तर असतं आणि तेच कायम असेल.
आमच्या सव्वीस जणांच्या वर्गात फुटबॉल हा सगळ्यात लोकप्रिय खेळ होता. शेवटून दुसरा तास संपला की एकाला कपाटातून बॉल आणायला पिटाळून आम्ही सगळे काँक्रीटच्या मैदानावर पसरायचो. टीम निवडण्यात पाच मिनिटांहून अधिक जाता कामा नयेत हा ठरलेला दंडक होता. आणि मग तास संपला, शाळा सुटली तरी आम्ही भान विसरून खेळत बसायचो. कधीकधीतर दिवसाचं काम संपवून टीचरही निघाल्या तरी आम्ही तिथेच! अशा वेळी त्या कुंपणापलीकडून आमच्याकडे कौतुकाने पाहायच्या. किंवा एवढ्या अंतरावरून तरी ती कौतुकाचीच दृष्टी वाटे. बारा वर्षांच्या काळात आमच्या सगळ्या वर्गाने मिळून केलेली कुठली गोष्ट असेल तर ती हीच! तोपर्यंत बॅडमिंटन सोडून कुठल्याच खेळात मला काहीतरी जमतंय असं ठामपणे वाटलं नव्हतं. तेव्हा प्रकर्षाने वाटून गेलं. खरंच, एखादा अवघड गोल वाचवायला मदत करावी, तो बॉल व्यवस्थित आपल्याच टीममेटकडे पास करावा (इथे मी खूप माती खाल्लेली आहे), त्याने तो घेऊन गोल करावा आणि सगळ्यांना टाळी देत पळत येऊन आपल्याला मिठी मारावी, मग बाकीच्यांनी त्यात उड्या टाकाव्या आणि एका गुदमरवून टाकणाऱ्या Group Hug मध्ये चिरडलं जावं, ही माझी एक आत्यंतिक सुखाची कल्पना आहे. आणि असं घडायचं ती प्रत्येक वेळ शाळेच्या आठवणी काढायच्या म्हटल्या की डोळ्यापुढून गेल्याशिवाय राहत नाही.
दोनच वर्षे झाली आहेत यावर सहज विश्वास बसणं अवघड आहे, तर तिकडे शाळेची प्रगती झपाट्याने झाली आहे. आता इमारतीचा विस्तार वाढलाय आणि वर अजून एक मजला चढला आहे. शिवाय लिफ्टपण बसवली आहे. ही सगळी माहिती माझ्याच शाळेत जाणाऱ्या सोसायटीतल्या मित्राने दिली. फेसबुकवर शाळेचं पेज फॉलो करत असल्यामुळे सगळे नवीन प्रकल्प सहजच दृष्टीस पडतात. अशा पोस्टना ‘लाईक’ करण्यात आणि बाकी शंभर ठिकाणी लाईक करण्यात मोठा फरक आहे. माझ्या मते आम्हाला शाळेविषयी जो जिव्हाळा वाटतो त्याला अजून एक गोष्ट कारणीभूत आहे. ती म्हणजे या शाळेत आम्ही वाढलो, तशीच शाळाही आमच्याबरोबर वाढली. मी गेलो तेव्हा चारच इयत्तांची छोटी शाळा होती ती, आणि प्रत्येक ‘इयत्तेत’ चार-पाच मुलं असायची. आम्ही नववीत असतानाच पहिलीच्या तुकड्या पाडल्या तो आमच्या शाळेसाठी एक मैलाचा दगड होता. आता शाळा इतर शाळांसारखीच फुगतेय, आणि या यशाचा मला खूप आनंद होतो. आज कॉलेजमध्ये कुणी माझी शाळा विचारली की मी ‘महेश विद्यालय’ असं सांगतो, आणि तरीही प्रश्नचिन्ह जात नाही तेव्हा ‘एक स्थानिक प्रायव्हेट शाळा आहे’ हे पुढे सांगावं लागतं. पण एक दिवस असं सांगावं लागणार नाही, आणि तो दिवसही दूर नाही!                        

Comments

  1. छान लिहिलंयस. अगदी ओघवतं, फुटबॉलची आठवण तर खूपच छान. काही भाग ठरवून लिहिल्यासारखा वाटला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प