किमया २


परवा जर्मनच्या तासाला एक संभाषण लिहून आणायचा गृहपाठ दिला होता, तेव्हा उगीच नेहमीच्या ‘बस चुकली’ वगैरे विषयांवर लिहिण्यापेक्षा मी स्वप्न हा विषय निवडला आणि ‘किमया’ ब्लॉगवर आल्यानंतर पहिल्यांदाच स्वप्नांवर विवेचन झालं. त्या संभाषणात मी माझ्या आईला ‘स्वप्नं का पडतात’ असं जरा वैतागूनच विचारलं होतं. गुरु आणि शनी यांचा आपापल्या उपग्रहांच्या संख्येवरून वाद झाला तर मला काय त्याचं? मी का म्हणून सगळा वेळ तो ऐकत शेजारी उभा राहू? आणि त्यावर माझी आई झालेली माझी मैत्रीण मला समजावून सांगते की मी स्वतःला स्वप्नं पडतात म्हणून भाग्यवान समजलं पाहिजे, कारण मोठं झाल्यावर ती जादू हरवते. हे सगळं मला आईने खरंच जे सांगितलं होतं त्याच्यापासून ‘इन्स्पायर्ड’ आहे. त्या दिवशी आमच्या कामाला टाळ्या पडल्या, पण तेव्हापासून हा विचार माझ्या मनात घर करून बसला. मोठ्यांना खरंच स्वप्नं पडत नसतील काय?
हा विचार आल्यावर मी जरा दचकलोच. नुकतीच अठरा पूर्ण झाल्यापासून मी सगळीकडे मी ‘सज्ञान आणि मोठा’ झाल्याचं सांगत फिरतोय, ते माझ्या मेंदूने ऐकलं नसेल ना? पण ती भीती आता काहीशी कमी झाली आहे, कारण अठरा पूर्ण होऊन पाच महिने पूर्ण होत आले तरी आज मला प्लूटो तितक्याच स्पष्टपणे ‘ग्रहपद’ नाकारल्यामुळे रडताना दिसतो. अर्थात, मी अठरा पूर्ण होईन त्या क्षणीच माझा मेंदू ते डिपार्टमेंट बंद करणार नाही एवढं मला माहित होतं. हा जो काही नकोसा बदल आहे, तो अकस्मात घडणारा नाहीच. शिवाय आता मला नुकतंच जाणवल्यानुसार, तो बदल घडायला मोठं व्हावंच लागतं असंही नाहीये. रोजच्या कॉलेजच्या आणि क्लासेसच्या भोवऱ्यात अडकलेल्या माझ्या मित्रांना पाहिलं की असं वाटतं, स्वप्नं यांनाही पडत नसावीत. किंवा पडली तरी ते त्याच्याकडे लक्ष देत नसावेत. खाली मान घालून नाकासमोर सरळ चालणाऱ्या माणसाला आसपासचं सौंदर्यच बघायला जिथे वेळ नसतो, तिथे स्वप्नासारख्या अॅब्स्ट्रॅक्ट अनुभवाची काय बात?
मग स्वप्नांचा विश्वकोश, अर्थात ‘इन्सेप्शन’ मधला एक प्रसंग आठवतो. जास्त लोकांना एक स्वप्न जास्त काळ ‘शेअर’ करता यावं यासाठी नायक आणि कंपनी एक औषध शोधायला जातात; आणि ते त्यांना सापडतंही. पण त्याचा शोध लावणारा केमिस्ट त्याचा कशासाठी वापर करतो ते पाहिल्यावर मात्र ते थक्क होतात. दहा-बारा जण रोज त्या केमिस्टकडे एक-एक डोस घेऊन झोपायला यायची. नायकाच्या मित्राला, हे असं का करतात असा प्रश्न पडतो तेव्हा नायक म्हणतो, “After a while, this becomes the only way you can still dream.” ‘इन्सेप्शन’ ही काल्पनिक कथा असली तरी, आपल्या जगात आपण ड्रग्जचा याच कारणासाठी वापर होताना नाही का पाहत? रोजच्या आयुष्यातल्या नाना कटकटींमुळे निरागसपणा हरवलेल्या मेंदूला मग अशी ‘स्वप्नं पाड’ अशी केविलवाणी विनवणी केली जाते. मग कुठली ‘किमया’ अन् कुठलं काय? हे सगळं मनात आल्यावर मी आयुष्यात काही झालं तरी असा अडकून पडणार नाही असा मनोमन निश्चय केला.
लेखाची सुरुवातच जरा निगेटिव्ह झाली. पण सत्य, ते जसं आहे तसं स्वीकारलं तर मग त्यानंतर कल्पनेत हरवून जाणं जास्त सोपं नव्हे का?
लहानपणी रात्री उशिरापर्यंत कुठलातरी भीतीदायक सिनेमा पाहत बसू नकोस असं मला सांगण्यात यायचं. याचं कारण म्हणजे वाईट स्वप्न पडण्याचा धोका. वाईट स्वप्न पडावं अशी कुणाची इच्छा असेल? शिवाय ते पडलं तर जे होण्याची संभाव्यता असते, त्या कारणासाठी लहानपणी कुणीही एका पायावर वाईट स्वप्न टाळायला तयार होईल. नाहीतर मोठेपणी ती गोष्ट कुणालातरी ‘कौतुकाने’ सांगितली जाण्याची भीती! पण मला वाईट स्वप्नदेखील काहीशी आवडायची. त्यांतून उठल्यावर पुढचा दिवस उत्तम जायचा हे तर आहेच, पण त्या स्वप्नांतही, भीती वाटत असली तरी आयुष्यात जे केलं नाही ते करण्याची संधीही मिळायची. माझ्या अनेक वाईट स्वप्नांमध्ये मी डोंगरावरून खाली पडलोय, फक्त वयानुसार त्यात काही बदल घडायचे. म्हणजे अगदी लहान असताना तीनचाकी घेऊन तर जरा मोठं झाल्यावर मोठी सायकल घेऊन, वगैरे. (बाइकचं स्वप्न अजून पडायचंय!) तेव्हा मी ‘E.T.’ देखील बघितलेला नव्हता, म्हणून अशी सायकल घेऊन उडी मारून उडतच राहण्याची कुठली महत्त्वाकांक्षा असण्याचाही प्रश्न नव्हता. पण हे सगळे किरकोळ अनुभव झाले. माझ्या खास लक्षात आहे ते एक स्वप्न, ज्यात मी विमानातून पॅराशूट घेऊन उडी मारली होती. (हे स्वप्न एकदातरी प्रत्येकाला पडतंच असा माझा ठाम विश्वास आहे) मी हवेतच वळलो आणि पाहिलं की माझा मित्र विमानातून हात हलवत होता. तो जे हलवत होता ते माझं पॅराशूटच होतं हे माझ्या जरा वेळाने लक्षात आलं. पण खाली आपटण्यापूर्वी मी उठलो होतो एवढं खरं. या सगळ्या अनुभवांनंतर आणि बॅटमॅनच्या ‘डार्क नाईट ट्रिलॉजी’चा तिसरा भाग पाहिल्यानंतर असं वाटून गेलं की झोपण्याच्या क्रियेप्रमाणेच भीतीची संवेदनाही जीविताचा स्थायीभाव आहेच. आणि ती तशीच असू द्यावी. लहांपैकी मित्रांपैकी कुणी ‘मी कशालाच भीत नाही’ असं सांगितलं तर तो आपण फार शक्तिवान असल्याचा आव असतो हे उघड आहे. प्रत्यक्षात कशाचीही भीती न वाटणे हा एक खूप मोठा दुबळेपणाच आहे. त्या सिनेमात बॅटमॅनला प्रेरणा देणारा एक म्हातारा माणूस म्हणतो त्याप्रमाणे, “You do not fear death. You think this makes you strong; it makes you weak. How can you stand longer than possible, fight harder than possible, if you don’t experience the most powerful impulse of the spirit, the fear of death?” या सगळ्यामुळे असं वाटतं की जर खरोखरीच भीती वाटायला शिकणं हा मोठं होण्याचा एक भाग असेल, तर त्यासाठी मेंदूने ठराविक काळाने भीतीदायक स्वप्नं दाखवावीत हे सयुक्तिक वाटतं. आपल्याला जेव्हा काहीतरी पाहून भय वाटून जातं, तेव्हा मेंदू कधी ना कधीतरी आपल्याला ते स्वप्नात का होईना, पण स्वतः अनुभवायला लावतोच. भीती वाटावी, पण कधीही तिचा अतिरेक होऊन आपण असमर्थ होऊ नये यासाठी ही सगळी यंत्रणा असावी.
मला असंच एक स्वप्न आठवतंय, जे मला एका बोर्डातल्या एका महत्त्वाच्या पेपरच्या आधी पडलं होतं. त्या स्वप्नात तो पेपर सर्वार्थाने टुकार गेला. मी उठलो तेव्हा हायसं वाटलं, तरी काहीशा टेन्शननेच पेपरला गेलो. पेपर वाचून पाहिल्यावर मनात आलेला पहिला विचार ‘हा तुलनेने पुष्कळच बरा आहे’ हा होता. तो छान गेला. आता तसलं काही स्वप्न पडलं नसतं तरी चांगलाच गेला असता एवढा तो सोपा होता खरा. पण कधीकधी सोप्या पेपरलाही आधी जीव पूर्णपणे भांड्यात पडणं गरजेचं असतंच. ती भावना मला माझ्या आदल्या रात्रीच्या ‘Worst Case Simulation’ मुळे मिळाली. आता परीक्षेचं एक ठीक आहे; पेपर चांगला गेल्याचा फायदा तो देऊन बाहेर पडल्यावर लगेच दिसत नाही. पण काही इतर प्रसंगांमध्ये, आपल्याला चांगली कामगिरी करून दाखवायला उद्युक्त करण्यासाठी मेंदू ‘Best Case’ स्वप्नं का दाखवत नाही कोण जाणे. ते दिव्य पार पाडल्यानंतरची आत्यंतिक आनंदाची भावना हीसुद्धा तितकाच चांगला incentive होऊ शकतेच की. पण तसं होत नाही. तसं स्वप्न पाहून आपण टुणटुणत समोर आलो आणि कामगिरीच्या स्वरूपात किंचित जरी बदल असला तरी आपलं अवसान जातं. आणि तो बदल असणारच हे उघड आहे. ती कामगिरी रचणारे ती तयार करताना आपली स्वतंत्र कल्पनाशक्ती कुठे विचारात घेतात? शिवाय मला वाटतं की असं स्वप्न पडलं तर त्यातून उठतानाच, ‘हे जे एवढं छान होऊन बसलंय ते अजून व्हायचंय आणि आपल्याला ते करावं लागणारे’ या विचारानेच उदास होऊन उठेन. पण एरवी अशी स्वप्नं सुखावह असतात. हॅरी पॉटरमधले  डम्बलडोर म्हणतात त्याप्रमाणे, स्वप्न आणि वास्तवातला फरक करता आला की मग सगळं सोपं जातं.
हे स्वप्नांचे दोन टोकाचे प्रकार झाले. पण त्यांच्या मध्ये स्वप्नांचा एक तिसरा प्रकारही असतो. तो म्हणजे माझ्या त्या गुरु आणि शनीच्या स्वप्नासारखी रँडम स्वप्नं. अशा स्वप्नांचा आपल्या आयुष्याशी सुतराम संबंध नसतो आणि त्यांच्यात आपल्याला बहुतेकवेळा अगदीच अशक्य किंवा अनाकलनीय गोष्टी घडताना दिसतात. तरी माझ्या मते याच प्रकारची स्वप्नं सगळ्यात अद्भुत असतात. आपल्या आयुष्याशी संबंधित स्वप्नं पाहून आपण उत्तेजित होत असलो तरी त्याचाच दुसरा अर्थ असाही असू शकतो की आपण आपल्याच आयुष्यात इतके गुरफटलेले आहोत की स्वप्नातही आपल्याला तेच सगळं वेगळ्या दृष्टिकोनातून दिसतंय. पण ही रँडम स्वप्नं पडतात तेव्हा वाटतं की आपण या जगाशी पूर्णपणे बांधले गेलेले नाही आहोत आणि त्यापलीकडच्या विश्वाशी असलेलं आपलं नातं अजूनही टिकून आहे. आयुष्यात अडकून पडूनही ज्यांना ग्रहांच्या बोलण्याची, सकाळी सकाळी चिमण्या ब्रेकफास्टवरून वाद घालण्याची, झाडांची मिटिंग होण्याची किंवा कॉम्प्युटर्स मानवजातीविरुद्ध षडयंत्र रचण्याची स्वप्नं पडत असतील, ते खरोखरीच त्यांच्या आयुष्यात सुखी असतील.
हेच वाक्य जरा ‘generalize’ करून असं म्हणता येईल, की ज्यांना रोज काही ठराविक तास मस्त झोपता येत असेल ते सुखी असतील. तसं असण्यापासून त्यांना कुणी रोखलं नाहीये, पण स्वप्न फक्त झोपेतच पडतात हा समज चुकीचा आहे. चेहऱ्यावर काहीतरी मूर्खासारखा भाव घेऊन पाहावी लागतात ती दिवास्वप्नं वगळता,  काही इतर प्रसंगीही आपल्याला स्वप्नं पडू शकतात. कधीकधी आपला मेंदू समोर जे चालू असतं त्याला इतका कंटाळतो की जागेपणीच लांबच्या प्रवासाला निघतो. नुसती विचारांची आगगाडी सोडणे आणि यामध्ये फरक असतो. आपण आपलंच एक ‘समांतर वास्तव’ निर्माण करतो. आणि अशा प्रसंगी तर मेंदूचं काम आणखी सोपं झालेलं असतं, कारण त्याला संपूर्ण स्वप्न रचत बसावं लागत नाही. रंगमंच तयारच असतो. मला अशी कॉलेजमधली काही लेक्चर्स आठवतात. मी फळ्याकडे पाहत असतो पण मला फळा दिसत नसतो. त्याऐवजी मला त्या फळ्याच्या मध्यभागातून बाहेर येणारं हॅरी पॉटरमधलं भूत दिसत असतं. पण अशी स्वप्नं अगदीच ठिसूळ असतात. समोरच्या शिक्षकाने एखादा शब्द जरी वरच्या पट्टीत उच्चारला तरी ते भूत पळून जातं. या प्रकाराला क्षणिक भासही म्हणता येईल. पण जर अशा स्वप्नात काल्पनिक प्रसंग रचायच्या ऐवजी पूर्वी वाचलेला किंवा पाहिलेलाच प्रसंग पुन्हा पाहायचा प्रयत्न केला तर तो जरा जास्त वेळ टिकतो. आणि असल्या गोष्टी जमू लागल्या की ‘अगदी लक्ष देऊन ऐकत असल्यामुळे’ तुम्ही शिक्षकांचे आवडते बनता.
पण यापेक्षा खास अनुभव असतो तो जागेपणीच डोळे मिटून स्वतः रचून स्वतः पाहिलेल्या स्वप्नाचा. फक्त ही गोष्ट आपल्या एकट्याच्या आवाक्यातली नसते; तर त्याला एक खास सोबत लागते. एका चांगल्या गाण्याची. त्या गाण्याचे शब्द, लय, चाल, हे सगळे आपल्या मनात चित्र विणत जातात. आणि एखादा प्रसंग मनासारखा तयार झाला तर तेच गाणं पुन्हा ऐकताना तोच प्रसंग पुन्हा पाहता येतो. मला हा अनुभव गाणी आणि नुसतंच संगीत या दोन्ही प्रकारांमध्ये आलाय, पण गाण्यात तो जास्त चांगला वाटतो. याबाबतीत माझ्या ठळक लक्षात आहे असा एक अनुभव म्हणजे ‘A Thousand Years’ या गाण्याचा. हे एक शांत, संथ आणि कळकळीने गायलेलं प्रेमगीत आहे. एकेकाळी मी माझ्या एका मैत्रिणीसोबत रोज वेगवेगळ्या गाण्यांची अदलाबदल करायचो, तेव्हा हे तिने पाठवलं होतं. मला ते खूप आवडलं याला कारण फक्त ते गाणंच नसून त्याने दाखवलेलं स्वप्नही होतं. ते ऐकत असताना माझ्या मनात एक मुलगी, चहूकडे बर्फ पडलेला आहे आणि हिमवृष्टीही होत आहे अशा अवस्थेत, थंडीने कुडकुडत आकाशातल्या ताऱ्यांकडे डोळे भरून पाहतेय आणि त्यांच्यातल्या एकात तिच्या प्रियकराचा चेहरा शोधतेय असं दृश्य उभं राहिलं. इतरांपेक्षा हे जास्त स्पष्ट दिसलं होतं म्हणून मी हे माझ्या मैत्रिणीला सांगितलं तेव्हा ती चकित होऊन तिलाही तसंच दिसलं असं म्हणाली. किमया!
असे काही अनुभव आले की असं वाटून जातं, आपल्या आजूबाजूला काहीतरी जादू आहे हे नक्की. फक्त तिच्याकडे नीट लक्ष द्यावं लागतं. रस्त्यावरून चालणाऱ्या कुणालाही ती अशी वर्तमानपत्रासारखी सहज उचलून घेता आली असती तर ती जादू राहिली असती का? आणि ती सगळ्यांना उपलब्ध आहे, फक्त थोडेसे कष्ट घ्यावे लागतील इतकंच. फार काही करू नका. फक्त रस्त्याने जाताना पाण्याचा एखादा नळ लागला तर त्यातून ठिबकणारा पाण्याचा थेंब पाहून पुढे जा. फुटपाथच्या टाइल्समधला पॅटर्न शोधा. वाटेवर असलेल्या आणि एरवी ज्यांना सहज ओलांडून पुढे जाता त्या झाडाला किंवा इमारतीला एकदाच पण पूर्ण पाहून घ्या. वाऱ्याची लहानशी गार झुळूक एकदा ‘छ्या! आता पाऊस का’ असलं काहीतरी न बडबडता चेहऱ्यावर रेंगाळू द्या. आणि पावसात अडकला असालच, तर गडगडाट कुतूहलाने ऐकून पाहा. या सगळ्याची काही गॅरेंटी नाही, पण कुणास ठाऊक? त्याच रात्री तुम्ही कदाचित गुरूला मोठेपणा घेऊन शनीशी वाद मिटवायला सांगत असू शकाल! गुड नाईट!       
                                                                                   

                                                                                  

Comments

  1. Felt like watching an interesting abstract painting. According to Freud, Dream is a royal road to the unconscious. Your writeup articulates the same. Keep writing.

    ReplyDelete
  2. छान लिहिलं आहेस. आवडलं. काही ओळी विशेषकरून आवडल्या. :) ...मग तू जे संभाषण लिहिलंस तेव्हा त्यात हे सारं कितपत समाधानकारकपणे मांडू शकलास?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प