हे भलते अवघड असते
“What do we want?”
“Time travel,”
“And when do we want it?”
“That’s irrelevant.”
हा अगदीच छोटासा पण तरीही अर्थपूर्ण असा संवाद आहे ‘टर्मिनेटर’ मालिकेतल्या ‘जेनेसिस’ या पाचव्या सिनेमातला. आज जगाला काही अति अॅब्स्ट्रॅक्ट संकल्पनांनी वेड लावले आहे, त्यापैकी आघाडीवर असलेली संकल्पना म्हणजे ही Time Travel नामक गोष्ट. अजूनही खूप जणांना ती शक्य कोटीतली वाटते, पण वैज्ञानिक दृष्ट्या तिची प्रगती खुंटली आहे एवढं खरं. लहानपणी एच. जी. वेल्स यांची ‘द टाईम मशीन’ ही कथा वाचल्यानंतर बराच काळ मीही या कल्पनेत हरवून गेलो होतो. त्यानंतर यावर आधारित अनेक कथा वाचल्या, सिनेमे पाहिले, फार काय गेम्सदेखील खेळले. आता प्रकर्षाने असे वाटायला लागले आहे की खरा प्रश्न आपण Time Travel करू शकू का हा नाहीये. खरा प्रश्न, तसं करणं किती शहाणपणाचं असेल, हा आहे.
‘आईन्स्टाईन अँड फ्रेंड्स’च्या कृपेमुळे आपल्याला आज काळ आणि त्याचे अवकाशाशी असलेले नाते याबद्दल थोडीशी माहिती आहे. फक्त त्या माहितीवर आधारित असा काहीतरी अघोरी उपद्व्याप करणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. पण विज्ञानाला मर्यादा असू शकतात, कल्पनाशक्तीला नाही. म्हणूनच Time Travel हा ‘बेस’ असलेले किंवा त्याचा अधूनमधून वापर असलेले आज खूप साहित्यप्रकार आणि सिनेमे सापडतात. यातल्या बहुतांश ठिकाणी जास्त ‘फोकस’ भूतकाळात जाण्यावर असतो. त्याला कारणही तसेच आहे. भविष्यकाळापेक्षा भूतकाळ कैक पटींनी अधिक आकर्षक वाटण्याचं कारण म्हणजे त्यातल्या घटना बदलल्या तर त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, हा विश्वास! फक्त एका सिनेमात भूतकाळातल्या घटना बदलून काही फरक पडत नाही असा विचार मांडला गेला होता, आणि तोही तसं करण्याचा प्रयत्न फोल ठरल्यानंतर हताश होऊन मांडण्यात आला होता. ‘X-Men : Days of Future Past’ मध्ये नायकांपैकी एकजण काळाला नदीची उपमा देतो. नदीच्या प्रवाहात आपण दगड टाकला तर कंपने निर्माण होतात, पण काही वेळाने प्रवाह पुन्हा पूर्वीसारखाच वाहू लागतो. मग आपण किती का मोठा खडक टाकला असेना! मग यावर इतर नायक ‘नाही, मला तसं वाटत नाही,’ असं सहज म्हणून हा विचार मांडणाऱ्याला मूर्खात काढून घेतात आणि सिनेमा पुढे सरकतो.
आपण खरंच भूतकाळात गेलो तर नक्की कुठल्या रूपात असू, या मुद्द्यावरून खूप फरक पडतो. आपला भूतकाळात जाण्याचा हेतू अगदीच साधासरळ असेल (म्हणजे फक्त प्रत्यक्ष पाहण्याचा; कुठेही ढवळाढवळ न करण्याचा) तर आपण त्या काळात कुणालाही न दिसणारा असा एखादा भटका आत्मा बनूनही जाऊ शकतो. आणि जायची तरी काय गरज? मी पूर्वी एकदा अशी कल्पना रचली होती की कालयंत्र म्हणजे एक चष्मा असावा, ज्याचे ‘सेटिंग्ज’ बदलून भूतकाळात किंवा भविष्यकाळात थेट पाहता येईल. प्रॉब्लेम एवढाच व्हायचा की हा चष्मा घातलेला माणूस रस्त्याने चालताना भूतकाळात नसलं तरी आता समोर उघडं गटार आहे हे विसरायचा! पण तुम्ही तुमच्या खोलीत बसलात तर काही होणार नाही. पण खोलीतच काय बघणार? तेव्हा हा चष्मा जरा अपडेट करून त्यात GPS वगैरे टाकायचा विचार केला, पण नुसता चष्मा बोअर होईल हे पटल्यावर मी ही सगळी कल्पना सोडून पुन्हा नेहमीच्या ग्रहताऱ्यांच्या कल्पना रचायला लागलो.
पण हॅरी पॉटरच्या सबंध गोष्टीत दोनदा घडल्याप्रमाणे, असं करणं म्हणजे काही खरा Time Travel नाही. कारण यामध्ये आणि आपल्याच आठवणींमध्ये गुंतण्यामध्ये काही फार फरक उरत नाही. अर्थात, हॅरी पॉटरमध्ये घडल्याप्रमाणे आपण दुसऱ्यांच्या आठवणींमध्ये शिरू शकलो तर ते जास्त रोमांचक होऊ शकेलही. पण यावर नीट विचार केल्यावर हे पटतं की चांगल्या पुस्तकात एखाद्या घटनेचं किंवा ठिकाणाचं वर्णन ‘जमलं’ असेल तर आपण ते घडताना पाहूही शकतो, नाही का? नाही. Time Travel करायचा असेल तर आपल्याकडे भूतकाळात काहीतरी बदल करण्याची कुवत असायलाच हवी. अशी कल्पना करा, की आपली एखादी असाइनमेंट सबमिट करायची वेळ उलटून गेली आहे, (Time Travel म्हटलं तरी एका गरीब बिचाऱ्या कॉलेज स्टुडंटची कल्पनाशक्ती एवढीच झेप घेऊ शकते हे जरा दुःखद आहे) तरी ती आपण आरामात पूर्ण करून त्या दिवशीच्या काळात परत जाऊन ती हसतहसत सबमिट करू शकू. किंवा भूतकाळात काही कारणामुळे दुरावलेल्या कुणा जवळच्या मित्राला तेव्हाच योग्य तो बदल करून आपल्या आयुष्यात कायम ठेवू शकू. पण मग असं वाटतं, यासाठी भूतकाळात जाण्याची गरज तरी आहे का? “Time heals everything. Give the time, some time.” हे तत्त्व लक्षात ठेवलं पाहिजे. सुदैवाने माझ्या बाबतीत असं काही घडलं नसल्याने मी काही टाईमबीम देण्याच्या फंदात न पडता सरळ, आपण खरंच भूतकाळात जाऊन काहीतरी उचापती केल्या तर काय होऊ शकेल या अत्यंत मनोरंजक पण तितक्याच डोक्यात जाणाऱ्या मुद्द्याला हात घालतो.
म्हणून सुरुवात करावी ती ‘Back to the Future’ या सिनेमापासून. यातल्या नायकाला, मार्टीला चुकून भूतकाळात गेल्यावर तेव्हा कुमारवयात असलेल्या त्याच्या आईवडिलांचं पुढे जुळणारच नाही अशी उगीच भीती वाटायला लागते. म्हणून तो ते घडवून आणायचा प्रयत्न करतो, पण घडतं असं की त्याची आई त्याच्याच प्रेमात पडते! Time Travel चे असे हास्यास्पद परिणाम मांडल्यामुळे हा सिनेमा आणि त्याचे दोन सिक्वेल छान चालले. अशाच प्रकारच्या काही गोष्टी त्यानंतर ‘मेन इन ब्लॅक’च्या तिसऱ्या भागात आणि हॅरी पॉटरच्या नवीन ‘द कर्स्ड चाईल्ड’ या नाटकात दाखवल्या गेल्या. असले काहीतरी भलतेच घडू नये म्हणून हॅरी पॉटरच्याच तिसऱ्या भागात जेव्हा तो आणि त्याची मैत्रीण हर्माइनी काही गोष्टी ठीक करायला तीन तास मागे जातात तेव्हा त्यांना सतत, त्यांच्याच तीन तास पूर्वीच्या रूपांना ते दिसू नयेत अशी खबरदारी घ्यावी लागते आणि लपूनछपूनच सगळा बदल करावा लागतो. ‘मेन इन ब्लॅक ३’मध्ये नायकाला भूतकाळात आवश्यक तो बदल करून लगेच परत यायला सांगितलेले असते, त्याप्रमाणे तो तसं करतो. पण जाण्यापूर्वी त्याला स्वतःचेच बालपणीचे रूप पाहायला मिळते, आणि तेव्हाच्या काही वाईट घटना त्याच्या स्मृतीतून पुसल्या गेल्यामुळे तो जे विसरलेला असतो ते त्याला शेवटी कळून चुकतं. या सगळ्या अनुभवाचा त्याच्यावर, तो परत आल्यावर सकारात्मक परिणाम होतो. यामध्ये त्यांनी Time Travelची एक हवीहवीशी वाटणारी बाजू मांडली आहे. पण या सिनेमाची ‘थीम’ थोडीशी त्यांचीच परिभाषा वापरून सांगायची झाली तर ती अशी असेल : if you’re not careful, you could stumble upon some secrets the Universe doesn’t know about. And here’s the thing : you’re not supposed to. No matter how better it makes things, you are not supposed to.
Time Travel म्हटलं की आपण अजून एका अशाच ‘अति अॅब्स्ट्रॅक्ट’ संकल्पनेच्या खूप जवळ येतो. Time Travelचे आणि ‘alternate reality’चे एकमेकांशी खूप घनिष्ठ; अगदी जवळपास अतूट असे संबंध आहेत. ही संकल्पना अशी, की आपण जगत असतो त्याची reality ही एकच नसते. अशा असंख्य realities एकमेकांना समांतर अशा अवस्थेत अस्तित्वात असतात. त्यातली एक खरी ठरते. आणि कुठली reality घडणार हे ठरतं ते प्रत्येक घटनेमुळे किंवा अगदी आपल्या लहानात लहान कृतीमुळेही. (म्हणूनच महाभारतात ज्याचे वर्णन सगळ्या जीविताचा निर्दय शत्रू असे केले आहे त्या ‘प्राक्तनाला’ आज कोणी कुत्रंही विचारत नाही) या दोघांचा संबंध समजावून घ्यायला आपल्याला ‘सोर्स कोड’ नावाच्या सिनेमाच्या कथेत शिरावं लागेल. त्या सिनेमातल्या इतर कल्पना समजायला कमी तापदायक नसल्याने आपण फक्त त्यातल्या या मुद्द्याकडे पाहूया. एक माणूस एका ट्रेन बॉम्बच्या स्फोटात मरतो, पण त्याचा मेंदू पूर्ण बंद पडायच्या आत त्याला काळात परत पाठवून तो बॉम्ब ज्याने लावला त्याला पकडायची कामगिरी मिळते. सलग चारपाच वेळा हा माणूस सुखाने मरायची स्वप्नं रंगवत तेवढा ठरलेला काळ ट्रेनमध्ये परत जाऊन बॉम्बस्फोट व्हायच्या आधी गुन्हेगाराला ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतो. त्याला यश आल्यावर त्याला मरता येईल अशी ग्वाही त्याला दिलेली असते. तो गुन्हेगाराला पकडतो, पण पुन्हा एकदा काळात मागे जाण्याची विनंती करतो; जेणेकरून त्याला गुन्हेगाराला पकडण्यासोबतच बॉम्बही निकामी करता यावा आणि ट्रेनमधल्या उरलेल्या प्रवाशांचे तरी प्राण वाचवता यावेत. “Send me once, then switch me off.” हे त्याचे शब्द. मग तो काळात परत गेल्यावर सहज बॉम्ब निकामी करतो, आणि उरलेला वेळ त्याच्या आयुष्यातला शेवटचा वेळ असल्याने हवी तेवढी मजा करून घेतो आणि घड्याळाकडे पाहत हा Time Travel प्रोग्रॅम संपायला बाकी उरलेले सेकंद मोजत बसतो. पण तो वेळ संपला तरी तो त्याच्या अपेक्षेप्रमाणे मरून न जाता तसाच तिथे बसून राहतो. का? कारण ज्या कारणामुळे तो मुळात मेलेला असतो ते कधी घडलंच नसतं!! ज्या reality मध्ये ते सगळे आधी असतात त्यात बॉम्बस्फोट होतो आणि सगळे मरतात. पण बॉम्बस्फोट टाळून हा माणूस एका वेगळ्याच reality ला प्रत्यक्षात उतरवतो, जीत ते सगळे जिवंत राहतात. वरच्याच उदाहरणात, आपण मारे भूतकाळात त्या मित्रापासून दुरावणे टाळल्याच्या फुशारक्या मारत परत येऊ, आणि ज्या reality मध्ये परत येऊ त्यात कदाचित तो जिवंतही नसेल! किंवा आपण नसू! किंवा काहीही - अगदी काहीही! थोडक्यात, Time Travel मुळे कालचक्रात होणारा बदल फक्त आपल्या आयुष्यात घडत नसून अगदी विश्वाच्या पातळीवर घडत असतो. मग याला ‘पूर्ण माहिती नसलेल्या गोष्टींशी खेळ करणे’ असं म्हटलं तरी ते एक खूप मोठं understatement ठरेल हे नक्की.
Time Travel मुळे होणारे काही बदल तर याहून खूप जास्त भयंकर आणि समजायला क्लिष्ट असे असतात. समजा वरच्या ‘Back to the Future’च्या उदाहरणात, मार्टीच्या उपद्व्यापांमुळे त्याच्या आईवडिलांचं जुळलंच नसतं तर? तर मार्टी कधी जन्मालाच आला नसता. पण तो जन्माला आलाच नसता तर तो कधीच मोठा होऊन, काळात मागे जाऊन त्याच्या आईवडिलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू शकला नसता. मग नक्की काय घडलं असतं? त्यांचं जुळलं असतं का नाही? या भयानक प्रश्नाचा विचारच नको म्हणून बहुधा सिनेमात तो यशस्वी होत असल्याचं दाखवलं असावं. पण आपल्याला जास्त खोलवर जायचं असल्याने आपण त्याऐवजी इंटरनेटवर मला सापडलेल्या एका ‘Tasty Planet Dinotime’ नावाच्या गेमचं उदाहरण घेऊ. नाव वाचूनही मी तो खेळलाच कसा कोण जाणे, पण बरं झालं. गेम अत्यंत सोपा : एका राखाडी पदार्थाला त्याच्याहून आकाराने लहान असलेली कुठलीही वस्तू खाता यावी म्हणून त्याला माऊसने इकडेतिकडे फिरवणं हे एवढंच करायचं असतं. पण त्याच्यामागची गोष्ट छान आहे. एका शास्त्रज्ञाला कालयंत्राचा शोध लावतालावता हा पदार्थ सापडलेला असतो, आणि तो त्याच्याहून लहान वस्तू खाऊन मोठा होत असतो. त्या शास्त्रज्ञाचा मदतनीस त्याला गोळ्या देतो, आणि त्या खात खात तो मोठा होतो आणि मग पेन, कागद, पेपरवेट, खोकी असं करत शेवटी कालयंत्रच खाऊन टाकतो. मग जातो डायनासॉरच्या काळात. तिथेही असाच मोठा होत राहतो; झाडं खातो, डायनासॉर खातो, टेकड्या खातो, डोंगर खातो आणि एवढा मोठा होतो की अवकाशातच झेपावतो. मग तिथले लहानसहान दगड खात राहतो आणि ज्या उल्केने डायनासॉरचा नाश केला तिलाही खातो. आणि इथे सगळं बदलतं.
उल्काच नाहीशी झाल्यामुळे डायनासॉरचा नाश होत नाही.
डायनासॉर नष्ट न झाल्यामुळे मानवजातीचा कधीच उदय होत नाही.
मानवजात न जन्मल्यामुळे तो शास्त्रज्ञही कधी जन्माला येत नाही.
शास्त्रज्ञ न जन्मल्यामुळे कालयंत्र आणि तो पदार्थही कधी अस्तित्वात येत नाहीत.
पण तो पदार्थ कधी अस्तित्वात आलाच नाही, तर भूतकाळात जाऊन त्या उल्केला खाणार कोण आणि या इतिहास बदलणाऱ्या घटनांच्या साखळीची सुरुवात करणार कोण?
तो पदार्थच नसल्याने ती उल्का पृथ्वीवर कोसळते.
डायनासॉरचा नाश होतो.
मानवजातीचा उदय होतो.
तो शास्त्रज्ञ जन्माला येतो.
तो कालयंत्र आणि हा पदार्थ तयार करतो.
मग नक्की घडलं काय?
हे संपूर्ण ‘Time Loop’ तर्कशास्त्राच्या भाषेत मांडायचे झाले तर, यामध्ये घडतं काहीसं असं :
‘x’ is the cause of ‘y’ happening.
‘y’ not happening is the cause of ‘x’.
हा तर ‘कोंबडी आधी की अंडं’ यापेक्षाही वरच्या पातळीचा पॅराडॉक्स आहे. आणि एरवी असे अतर्क्य पॅराडॉक्स वाचून मला खूप मजा येते. पण Time Travel प्रत्यक्षात आला तर असा एखादा पॅराडॉक्स आपल्या आयुष्यात घडणे शक्य आहे. आणि एरवी आपण याला एक उदाहरण म्हणून सोडून देतो. पण त्या शास्त्रज्ञाची काय अवस्था होत असेल? त्याच्या दृष्टीने, आधी पदार्थाने कालयंत्र खाल्ले, मग काही काळाने त्याचे स्वतःचे अस्तित्व नष्ट झाले. पण त्याचक्षणी त्या पदार्थाचेही अस्तित्व नष्ट होऊन तो शास्त्रज्ञ होता तसाच राहिला. हे सगळं खरंच असं क्षणार्धात घडलं, तर त्या शास्त्रज्ञाला कदाचित काही जाणवणारही नाही. मग आपल्याला तरी जाणवेल का? का आपण अजाणतेपणी अशाच एखाद्या ‘Loop’ मध्ये कायमचे अडकून राहू?
थोडक्यात Time Travel म्हणजे बसलो कालयंत्रात आणि आलो फिरून इतकी साधीसोपी गोष्ट अजिबात नाहीये एवढं नक्की. असो. सध्याच्या आपल्या तांत्रिक प्रगतीनुसार आपण नजीकच्या भविष्यकाळात Time Travel चा शोध लावणे असंभव आहे. तेव्हा या गोष्टींची आपल्याला आत्ता चिंता करण्याची गरज नाही. पण समजा लागला याचा शोध भविष्यकाळात, तर तेव्हाचे लोक नाही का इकडे येऊ शकणार? मग कुठलं ‘आत्ता’ आणि कुठलं ‘नंतर’? आणि हाच आहे तो सुरुवातीच्या संवादात दडलेला अर्थ!
“What do we want?”
“Time Travel.” (Do we, now?)
“And when do we want it?”
“That’s irrelevant!!!”
वा! मस्त विषय! छान मांडणी!
ReplyDeleteयात आणखी एक उपप्रकार असा आहे, असू शकतो की याच काळात - वर्तमानकालात , एकाच वेळी - एकापेक्षा जास्त ठिकाणी हजर राहणे, हर्मायनी टाईम टर्नर वापरून भूतकाळात जात असते ना? ( लेक्चर्स करायला)
वेगवेगळ्या कल्पना घेत, संदर्भ देत, स्पष्टीकरण करत , लिहिलं आहेस.
आवडलं.
क्या बात है !
ReplyDeleteखूपच आवडली कल्पना. मग ती प्रत्यक्षात येवो किंवा न येवो
ReplyDelete