अदृश्य सोबती


तो बुटका माणूस वयाला न शोभणाऱ्या उत्साहाने खोलीत सगळीकडे फिरत तिच्यातल्या गोष्टींच्या जागा बदलत होता आणि त्याच्या सगळ्या हालचाली शांतपणे बघत मी आरामात कोचावर पसरलो होतो. फक्त एक विकेंड आणि तोही फक्त ‘हवेचा बदल’ या शुद्ध हेतूने लंडनच्या बाहेर पडताना एवढ्या अठरापगड गोष्टी घ्यायची काही गरज होती का असं मी न राहवून विचारलंच. त्यावर त्याने नेहमीप्रमाणे माझ्याकडे सहज दुर्लक्ष केलं आणि खोलीत उत्साहाने बागडणं चालूच ठेवलं. माझ्या अस्तित्त्वाची त्याने दखल न घेणं किंचित टोचतं खरं, पण माझा प्रश्न नेहमी एवढा उघडउघड पडेल असा असतो की कोणीतरी तो हमखास विचारतंच आणि मग मलाही आपोआप माझं उत्तर मिळून जातं, त्यामुळे मी हे सगळं फार मनाला लावून घेत नाही. पण एवढ्या धाडसी घटना एकत्र अनुभवल्यानंतरही या माणसाने आमच्याबरोबर लंडनबाहेर यायला तो कुणाला विचारतोय तेही मला आधी सांगू नये म्हणजे जरा फारच झालं. स्वतःला जगातला सर्वोत्कृष्ट गुप्तहेर म्हणवणाऱ्याला या हर्क्युल पॉइरोला माझ्या चेहऱ्यावर ठळक लिहिलेली नाराजी दिसू नये? त्याने फोन उचलला तसं मात्र मी त्याच्या संभाषणाकडे लक्ष देऊ लागलो आणि त्याने अनपेक्षितपणे कॅप्टन हेस्टिंग्जला फोन लावल्याचं मला कळलं. मी “अरे वा, हेस्टिंग्ज पण येतोय वाटतं,” असं आनंदाने बोलून गेलो; खूप काळ आमची गाठ पडली नव्हती. या पॉइरोबरोबर कुठे जाताना हेस्टिंग्ज जवळ असलेला मलाही आवडायचा खरं; तो सगळ्या घटनांचं व्यवस्थित विश्लेषण करायचा आणि त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं की मीही सहज सगळ्याचा भाग होऊ शकायचो. खरं तर आत्तापर्यंत दोनदाच तो आमच्याबरोबर होता (का मी त्यांच्याबरोबर होतो?) आणि त्यानंतर पाचसहा वेळा मी आणि पॉइरो दोघेच होतो, पण तरी मला त्याच्या सहवासाची एक सवय होऊन गेली होती; त्यामुळे मी आत्ताही खूश झालो. अर्थात, मी प्रत्येक साहसात पॉइरोची इमानाने साथ दिली आणि या हेस्टिंग्जने फक्त चारपाच प्रकारणांतच; आणि असं असूनही माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून हा त्याला फोन करून बोलावतोय वाटतं! हा कडवट विचार नाही म्हटलं तरी मनात चमकून गेलाच.
कधीकधी वाटतं त्याला सरळ सुनवावं, की मित्रा तू माझ्यासमोर तरी काही मोठेपणाचा आव आणू नकोस! खूप पाहिलेत मी तुझ्यासारखे, आणि तुझ्यापेक्षा चांगलेही! अरे मी स्वतः शेरलॉक होम्सची कारकीर्द त्याच्या घरी बसून पाहिलीय, तर तुझं काय? पण मनात हा एवढा आरडाओरडा करूनही मी प्रत्यक्षात काही बोलत नाही, कारण शेरलॉक होम्स म्हटल्यावर त्यानेही आमच्या सहवासात किती सहजपणे माझ्याकडे सतत दुर्लक्ष केलं होतं ते आठवल्याशिवाय राहत नाही.
एक मात्र आहे. पावलापावलाला जरी ही उपेक्षा सहन करावी लागली तरी ही सगळी मंडळी खूप आपुलकीने माझं आदरातिथ्य करतात. खरं तर आदरातिथ्य हा शब्द इथे अगदीच कमी पडेल. एकतर ते अनेकदा स्वप्नात कल्पना करू शकणार नाही अशा ठिकाणी घेऊन जातात आणि अद्भुत काहीतरी दाखवतात. आणि प्रत्येक वेळी जे काही त्यांच्या नशिबी येईल तेच माझ्या, अगदी त्यांच्या पानात पडणाऱ्या महागड्या पदार्थांपासून ते उतरलेल्या सर्वोत्तम हॉटेलमधल्या सर्वोत्तम खोलीपर्यंत माझ्यासाठीच. या पार्श्वभूमीवर मी अगदीच लहान मुलासारखं ‘पण एकदा माझ्याकडे बघा तरी’ असं म्हणणं तुम्हाला कृतघ्नपणाचं वाटत असेल, तर मी हे सांगितलं पाहिजे की सगळ्याच वेळी तसं सगळं नसतं. कधीकधी त्यांना काहीतरी भयानक संकटाला सामोरं जावं लागतं आणि अशावेळीही मी आहेच गाढवासारखा मागून जाणारा. त्यांच्या आयुष्यातले दुःखाचे क्षण (जे क्वचितच ‘क्षण’ असतात) मला त्यांच्याबरोबर भोगावे लागतात. चिडचिड होतेच, नाही का? आपण येतो अगदी मस्तपैकी किनाऱ्यावर सुट्टी घालवायला आणि हा आपला मित्र घरचं दुखणं घेऊन आलेला असतो. अशा वेळी काय करणार? त्यातून तो तसा खिन्नपणे वाळूत रेषा काढत बसला असेल तर मला त्याच्यापासून दूर जाणं जवळपास अशक्यच होतं म्हणा ना!
अर्थात, असं दरवेळीच होत नाही. काही लोक इतके सहजपणे मनात घर करून बसतात की त्यांच्या यातना बघून आपलं हृदय तुटतंच, आणि त्यातून तुम्ही माझ्यासारखे जिथे जाल तिथे भरपूर मित्रमैत्रिणी जमावणारे असलात तर ते अजूनच कठीण पडतं. लहानपणापासूनचा माझा एक अत्यंत जिवलग मित्र, ज्याच्या सोबत मी त्याच्या आयुष्यातली सतरा-अठरा वर्षे काढली आहेत असा हॅरी पॉटर; त्याच्याच सहवासातल्या अनेक घटना माझ्यासाठी अविस्मरणीय आठवणी बनून राहिल्या आहेत. त्याच्या जवळच्या काही लोकांना काळाच्या पडद्याआड जाताना पाहून मला जोरात किंचाळावंसं वाटायचं. त्याच्या आयुष्यातल्या त्या एका पर्वाचा सुखान्त झाला आणि तेव्हापासून आमची रोजची भेट होणं कमी होत गेलं आणि मी जरा इतर ठिकाणी अजून मित्र जमवायला लागलो. पण अजूनही कधी खूपच आठवण आली की मी जातो त्याच्याकडे; त्यालाही आवडतंच जुन्या आठवणी काढून त्यात रंगून जायला. तो थेट माझ्याशी बोलत नसला तरी, तो बोलतो नेहमी तितकंच मनापासून.
आश्चर्य या एका गोष्टीचं वाटतं, की या सगळ्या लोकांशी माझी ओळख ही कायम तिसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीच्या मार्फत होते आणि नंतर ती व्यक्ती स्वतः आमच्याबरोबर राहत नाही. लंडनला कुठल्यातरी दुकानात हातातल्या दोघांपैकी कुठला कोबी जास्त चांगला हे ठरवण्यात मला एकदा या रोलिंगबाईंनी मोलाचे सहाय्य केले होते. तो घेऊन त्यांच्याबरोबरच परत चालत जाताना त्यांनी मला मी हॅरी नावाच्या जवळ राहणाऱ्या त्या मुलाला ओळखतो का विचारलं. “अरे तुझ्याच वयाचा आहे,” वगैरे सांगून. मग काय, गेलो मी तिकडे. पुढची अनेक वर्षे आम्ही बरोबर होतो, पण याच काळात रोलिंगबाई क्वचितच दिसल्या. त्यानंतर एकदा मी लहानपणीची ती शिकवण लक्षात ठेवून नेमका बरोबर कोबी उचलला तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या एका काकांनी एकदम मला शाबासकीच दिली आणि म्हणाले “अरे वा, बरोबर कळलं तुला! तुझ्या वयाचा असताना आमच्या बर्टीला हे काहीही यायचं नाही. अजूनतरी कुठे येतं म्हणा!” असं म्हणून परतीचा आख्खा रस्ता मला हा बर्टी वूस्टर आणि त्याचा नोकर जीव्ह्ज, त्याचा मित्र पॉंगो आणि त्याचे फ्रेडकाका या सगळ्यांबद्दल मला खूप सांगितलं. कुतूहल वाटलं म्हणून मीही त्यांच्या त्या ड्रोन्स क्लबमध्ये हजेरी लावून या सगळ्यांशी दोस्ती केली (अर्थात, म्हणजे त्यांच्यात मिसळलो. त्यांच्यात मला स्वतःचं असं स्थान आहे की नाही कोण जाणे!). आजही कधी कुणाबरोबरतरी जोरजोरात हसायचा मूड आला की मी जातो तिकडे; आणि फ्रेडकाका काकूंचा डोळा चुकवून तिथे आलेले असले की आम्हा सगळ्यांनाच (पॉंगो सोडून) विशेष आनंद होतो. पण या आमच्या मैफिलीत ते मला या सगळ्यांचा परिचय करून देणारे वुडहाऊस काका फारसे कधी नसतातच. त्यांना भेटायच्या हेतूने मी पुन्हा त्या दुकानात कोबी आणायला गेलो तेव्हा एका ख्रिस्तीबाईंनी पकडलं आणि त्यांच्याशी झालेल्या ‘सगळं कसं व्यवस्थित पारखून घ्यावं’ या विषयावरच्या चर्चेतून पॉइरोची ओळख झाली आणि त्यामुळेच आत्ता मी इथे कोचावर पडून त्याची बॅग भरून व्हायची वाट बघत होतो. या लोकांचं मला एक कोडं आहे. जिवाभावाच्या सोबत्यांशी ओळख करून स्वतः कुठे गायब होतात कोण जाणे! पण त्यामुळेच मला वाटतं मी या सोबत्यांकडे ‘रोलिंगबाईंच्या ओळखीचा मुलगा’ किंवा ‘ग्रिशमकाकांचे वकील दोस्त’ असं न बघता त्यांना फक्त त्यांचे ते म्हणून ओळखू शकतो; आणि या गोष्टीचा या ओळख करून देणाऱ्या मंडळींना आनंदच होत असावा.
अशा अनेक प्रसंगांमुळे लंडन शहरात माझे खूप स्नेही निर्माण झाले आहेत, पण मी सगळा वेळ तिथे नसतो. भारतात असताना त्यांची थोडी आठवण येते खरी, पण ती कमतरता भरून काढायला इथेही त्यांच्यासारखेच अनेक मित्र मला आहेत. लहानपणी इथल्या लंपन नावाच्या मुलाशी माझं खूप जमायचं. तेव्हाच्या सगळ्या मुलांपैकी मला तोच फक्त आठवतो. पण इथेही भाजी घ्यायला जायला मी अगदीच तयार असतो करणं माझ्या ओळखीचे एक देशपांडे (त्यांना काका म्हटलेलं फारसं आवडत नाही. लोक त्यांना भाई म्हणतात, पण तसं करायला मी अगदीच लहान आहे असं मला वाटल्याने मी बहुतेकवेळा त्यांना थेट न संबोधताच विषयावर येतो) अनेकदा तिथे भेटतात. तसा आमचा परिचय खूप जुना. माझ्या लहानपणी कधीकधी ते मला दुपारी झोपवायलाही घरी यायचे. तेव्हाच्या त्यांच्या गोष्टी ऐकायला जेवढ्या आवडल्या तेवढ्या दुसऱ्या कुठल्याच कधी आवडल्या नाहीत. त्यांनीही त्यांच्या बऱ्याच ओळखीच्या लोकांशी माझी भेट घालून दिली, पण ते बरोबर नसतील तर माझा त्या कोणालाच भेटायला जायला नकार असायचा. तसा विक्षिप्त लोकांचा अनुभव मला कमी होता असं नाही, पण या लोकांच्या बाबतीत मला ते सोबत हवे असतात. माझ्याकडे अर्थातच कुणाचं फारसं लक्ष नसतं, त्यामुळे माझ्याबरोबर ते नसतील तर हे सगळे लोक ते असताना वागतात तसेच वागतील का अशी मला शंका यायची. लंडनला भाजीबाजारात भेटणाऱ्या त्या बाकी काका-मावश्यांपेक्षा हे भाई या बाबतीत खूपच वेगळे ठरतात. त्यांच्याबरोबर भेटलेले सगळे लोक मला मनापासून आवडतात, पण भाईंचं तिथे असणं हा त्या आवडीमधला सर्वात महत्त्वाचा घटक असेल.  
मी आत्तापर्यंत या सगळ्या त्यांच्या माझ्याकडे दुर्लक्ष करण्याच्या स्वभावावरून पुष्कळ चिडचिड केली आहे, पण त्याचे काही फायदेही असतात. कुठलीतरी गोष्ट सगळ्यांपासून गुप्त ठेवायची असा विचार जेव्हा यांच्यापैकी कोणी करतात, तेव्हा ते मला विचारात घेतच नाहीत. त्यामुळे मला सहज सगळ्यांकडून सगळ्या गोष्टींची माहिती मिळते आणि बाकीच्यांना ते कळायच्या खूप आधीच मला काय घडणार आहे ते कळून गेलेलं असतं. त्याच्या वर्गातल्या एका शत्रूची आई आणि मावशी त्याच्या नावडत्या शिक्षकांना भेटायला गेली ते हॅरीला अर्थातच माहित नव्हतं, पण मी नेमका तिथेच होतो. अर्थात, मी त्याला काही सांगूही शकलो नसतो म्हणा. अशा वेळी या गोष्टीची जरा भीती वाटते, पण बहुतेक इतर सर्व वेळी हिच्यामुळेच खूप मजा येते. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मी जिम हॅकरसोबत घालवलेले अनेक तास. ब्रिटनचा पंतप्रधान, पण एका जुन्या ओळखीमुळे मला हवं तेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसण्याची मुभा! त्याच्या सहकाऱ्यांनी (?) त्याच्या कुठल्यातरी धोरणाच्या विरोधात डावपेच आखलेले असले की मला कळायचे. मी त्यांच्याबद्दल कधी त्याला सांगितलं नाही का त्याचे विचार त्या सहकाऱ्यांना (ज्यांच्याशीही माझे चांगले संबंध होते) सांगितले नाहीत, कारण एकतर नक्की कुठली बाजू जास्त बरोबर ते मला कळायचं नाही. जे घडायचं ते बघण्यात मात्र खूप धमाल यायची.
मला पडलेला अजून एक मोठा प्रश्न म्हणजे या सगळ्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात विनोदी, चटका लावणाऱ्या, रोमांचक किंवा इतर कुठल्याही अर्थाने रस घ्यावा असं वाटणाऱ्या घटना बघायलाच कसा मी बरोबर तिथे जाऊन टपकतो? सध्या गेले काही महिने मी लंडनमध्येच आहे आणि आळीपाळीने ड्रोन्स क्लबचा तो गट आणि पॉइरोचं घर या दोन ठिकाणांमधून फिरत असतो. बर्टी आणि जीव्ह्जबरोबर त्याच्या कुठल्यातरी आत्याच्या घरी सुट्टी घालवायला गेलो की तिथे एकामागून एक येणाऱ्या हास्यास्पद पेचप्रसंगांमुळे पॉइरो आत्ता काय करत असेल असा विचार करायलाही सवड नसते. पण त्या सगळ्यातून बर्टीची यशस्वीरीत्या सुटका झाल्यानंतरच आम्ही परत लंडनला येतो आणि मी सहज पॉइरोला एक भेट द्यायला म्हणून जातो, तेव्हाच नेमकी त्याच्या हातात एक कुतूहलजनक केस आलेली कशी असते? म्हणजे यांच्या वागण्यातून अजिबात जाणवत नसलं तरी माझ्या अस्तित्त्वाला यांच्या आयुष्यात खरंच स्थान आहे का? नाहीतर कसे हे सगळे इतक्या शिताफीने माझ्या आयुष्याची दिशा पाळतात? मी यांच्यातल्या एकाबरोबर एक साहस करून आलो की मगच कशा दुसऱ्याच्या आयुष्यात काहीतरी ‘घटना’ घडू लागतात? आणि हे सगळं सलग घडतं असंही नाही. कधीकधी मीच इतका कामात अडकलेला असतो की त्या काळात यांना कुणालाच भेटता येत नाही. पण म्हणून भेटतो तेव्हा मी काहीतरी चुकवलं असं कधीच घडत नाही. या सगळ्यांच्या आयुष्याची धडधडणारी आगगाडी मी जरा मागे फिरलो की लगेच विश्रांती घेते. या रहस्यावर मी विचार करून दमलो, मग म्हटलं कशाला? घडतंय ते आपल्याच पथ्यावर नाही का पडत? शिवाय माझं स्वतःचं आयुष्य काही कमी साहसपूर्ण नसलं तरी यांच्याइतकं क्वचितच! म्हणूनच मी माझा खूप वेळ या सगळ्यांच्या आयुष्यात घालावतो. हे सगळे भन्नाट लोक आणि मी त्यांचा एक आपला अदृश्य सोबती!                                               
माझी इकडे ही रामकहाणी चालू असताना मागून कोणीतरी मुद्दाम खोकल्याचा आवाज आला. हातात दोन मोठ्या बॅग घेऊन पॉइरो अस्वस्थपणे चुळबुळ करत होता आणि मी इथून उठून त्याच्याबरोबर बाहेर पडायची वाट बघत होता. मी त्याच्याकडे काहीसं वैतागून एक कटाक्ष टाकला, ज्यात उघडपणे ‘एवढा वेळ मी इथे नसल्यासारखंच वागायचं आणि आता अचानक गरज पडल्यावर माझ्या अस्तित्त्वाची जाणीव झालीय काय’ असंच काहीसं मला म्हणायचं असणार हे त्याने ओळखलं. मग तो हसला आणि माझ्याकडे बघून डोळे मिचकावले, जणू काही त्याला म्हणायचं होतं की ‘अरे तू नसशील तर काहीतरी शक्य आहे का; तुझ्याशिवाय कशालातरी पूर्णत्व येईल का, तुझ्याशिवाय आमचं पान तरी हलेल का ’ या गोष्टी बोलून दाखवायला त्याला आवडत नाहीत, पण हा प्रकार पूर्वी अनेकदा घडलेला असल्यामुळे त्याच्या मनात नक्की काय आहे आणि त्याला, आणि इतर सगळ्यांनाच माझी किती किंमत आहे हे मी जाणून असतो. त्यामुळे त्याच्या त्या हास्याने मीही विरघळतो आणि त्याच्यासोबत घराबाहेर पडतो. शेवटी, या सगळ्या लोकांवर कितीही चिडलो तरी, ते कुठे निघाले तर त्यांच्या मागे अधाशासारखं पळण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय आहे तरी कुठला?   

Comments

  1. मस्त. आता एखाद्या दिवशी कोबीचा गड्डा घेताना तुझ्या भेटण्याची आणि कोणाला तरी अदृश्य सोबत करायची संधी तुझ्यामुळे मिळण्याची वाट बघत आहे.

    ReplyDelete
  2. Super!


    “The man who has not the habit of reading is imprisoned in his immediate world, in respect to time and space. His life falls into a set routine; he is limited to contact and conversation with a few friends and acquaintances, and he sees only what happens in his immediate neighbourhood. From this prison there is no escape. But the moment he takes up a book, he immediately enters a different world, and if it is a good book, he is immediately put in touch with one of the best talkers of the world. This talker leads him on and carries him into a different country or a different age, or unburdens to him some of his personal regrets, or discusses with him some special line or aspect of life that the reader knows nothing about. An ancient author puts him in communion with a dead spirit of long ago, and as he reads along, he begins to imagine what the ancient author looked like and what type of person he was.”
    ― Lin Yutang, The Importance of Living

    ReplyDelete
  3. खासच आदित्य :-) मजा आली वाचायला. साहित्यिक अ‍ॅव्हेंजर्स.

    ReplyDelete
  4. खूप मस्त आदित्य. तुझी शैली अतिशय आवडली.

    ReplyDelete
  5. खुप सुंदर लिहिलेय . मजा आली वाचताना .

    ReplyDelete
  6. आदित्य , लेखातून तुझी पुस्तकांशी खूप मैत्री असल्याचे समजते. या मैत्रीमुळे तुझ्या लेखनात खूप वैविध्य आहे. छान लिहितोस आणि असाच लिहित रहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प