सर्वव्यापी
लॉजिकच्या बाबतीत कसं मी ठामपणे सांगू शकत होतो की त्याची आणि माझी पहिली भेट ‘बटाट्याच्या चाळीत’ झाली होती. इथे तशी सोय नाही. एक विषय म्हणून बघितलं तर ओळख झाली पुष्कळ उशिरा, आठवी-नववीच्या सुमारास. पण आत्तापर्यंतच्या प्रवासात केवळ एक अभ्यासाचा विषय हे नातं केव्हाच मागे पडलं आहे. त्यामुळे ही ओळख विचारात घेऊन चालणार नाही. जरा अजून मागे नजर टाकायची म्हटली तरी किती मागे हे चट्कन कळत नाही. या विषयाला ‘सर्वव्यापी’ म्हणण्याचं कारण हेच : याच्याशी संबंध येत नाही असं या पृथ्वीवर काहीच नाही. आता असं म्हटल्यावर जरा गोंधळ होऊ शकेल, त्यामुळे खुलासा केलेला बरा. मी गणिताबद्दल बोलत नाहीये, कारण ती आपण आपल्या सोयीसाठी(?) तयार केलेली गोष्ट आहे. आपलं त्याच्याशिवाय पान हलत नसलं (ज्यावर ते घातलेलं असतं ते पानही सहज हलत नाही तो भाग वेगळा) तरी बाकीच्या अनेक जीवांना काही फारसा फरक पडत नाही. काही पक्ष्यांना स्वतःचीच अंडी मोजताना सहा आणि आठ यांच्यातला फरक कळत नाही असं कुठेतरी वाचलं होतं. सुखी जीव. आणि मी तत्त्वज्ञानाबद्दलही बोलत नाहीये; असतो तर मी ‘पृथ्वीवर’ म्हणायच्या ऐवजी थेट ‘विश्वात’च म्हटलं असतं. मग माझ्या मनात काय आहे ते सांगितल्यावर कोणीही म्हणेल, “काहीही काय? पक्ष्यांना जिथे अंडी मोजता येत नाहीत, तिथे त्यांना पैसे काय मोजता येणारेत!”
मी पहिल्यांदा पैशाची नोट हाताळली तेव्हा मी पहिल्यांदा या विषयाला भेटलो असं म्हणू शकलो असतो, पण अर्थशास्त्र म्हणजे पैशाशी संबंधित हा एक खूप संकुचित विचार आहे, हे या विषयाच्या पुरेसं खोलात गेल्यावर (आणि हा विषयही आवडू शकतो हे मान्य करून) लक्षात येतं. मी म्हणेन की पक्ष्यांना पैसे न का मोजता येईना, पण एका पक्ष्याला सगळ्या पिल्लांना पुरेल एवढं अन्न आणायचं म्हणजे नक्की केवढं ते कळतं ना? त्यांना शिवाय घरटं कुठे आणि कसं बांधायचं तेही कळतं. अस्वल वगैरे लोक थंडीसाठी अन्न साठवून ठेवतात. हत्तींसारखे प्राणी कळप करून राहतात, अशी अनेक उदाहरणं सापडतील. याशिवाय कोकिळेला तर दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात आपली अंडी घालण्याची अक्कल असते, हे समजून घेतल्यावर कोण म्हणू शकेल, की पशुपक्ष्यांना अर्थशास्त्र कळत नाही?
कुठल्याही विषयाची व्याख्या करायची म्हटलं तर दोनतीन शब्दांत संपूही शकते, उदाहरणार्थ लॉजिकला ‘Science of Reasoning’. व्याख्या तयार करण्याची कलाही मी तर्कशास्त्राचा एक तुकडा म्हणून शिकलो होतो; ज्यानुसार ही आत्ता केलेली व्याख्या ‘biverbal’ प्रकारात मोडेल. याचा अर्थ एक अपरिचित संकल्पना इतर परिचित संकल्पनांशी संबंध जोडून समजावून सांगायची. वरील उदाहरणात आपल्याला Reasoning म्हणजे काय ते कुठेतरी कळलेलं असतं, आणि Science तर माहितीची गोष्ट. या दोन संकल्पनांच्या संस्कृत रूपांची संधी होऊनच लॉजिकसाठीच्या मराठी शब्दाचा जन्म झालाय, हे सांगणे नलगे. मराठीत कसं बरं असतं. हे शब्द संस्कृत आणि मराठी दोघींचे भाग आहेत, त्यामुळे संधी वगैरे भानगड आपल्याला ठाऊक नसली तरी ‘तर्कशास्त्र’ म्हटल्यावर या विषयात नक्की काय चालू आहे याचा पुरेसा अंदाज येऊ शकतो. अशाच प्रकारे शब्दफोड करून इतर विषयांची छोटीशी व्याख्या आपल्याला करता येईल. उदाहरणार्थ मानसशास्त्राची ‘Science of the Mind’, भौतिकशास्त्राची ‘Science of the Material World’ इत्यादी. तसंच आपल्या या विषयाचे करून बघूया. आपण त्याला अर्थशास्त्र म्हणतो, म्हणजेच अगदी सोप्या भाषेत ‘Science of Money’. या अर्थाचे आपण जसेच्या तसे लॅटिनकडून घेतले असते तर याला आपण ‘Pecuniology’ असे कदाचित म्हणत असतो. पण का कोण जाणे इंग्लिशने या विषयाचे नाव लॅटिनकडून न घेता ग्रीककडून घेतले आहे; कदाचित तिला ते मुद्द्याच्या जास्त जवळ जाणारे वाटले असेल. त्यानुसार Economics या शब्दाचा अर्थ ‘Science of Management’ असा काहीसा सांगता येईल. जर्मन शिकत असल्यामुळे मला जर्मनमध्ये इकॉनॉमिक्सला ‘Wirtschaftswissenschaft’ या लांबलचक नावाने हाक मारतात हे माहित होतं. त्याचा शब्दशः अर्थ ‘Science of Economy’ असाच आहे. मग Economy ची व्याख्या करायची म्हणजे पुन्हा डोक्याला ताप! सगळ्या भाषा आपापल्या परीने अत्यंत समृद्ध आहेत, आणि कदाचित वेगवेगळ्या भाषांत हा नावांमधला मूलभूत फरक अर्थशास्त्रासारखाच इतर विषयांच्या बाबतीतही पडत असेल. पण मुद्दा असा की तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा मानसशास्त्र ‘नक्की काय करते’ हे विचारलं तर उत्तराबाबत दुमत नसते; तर अर्थशास्त्राच्या बाबतीत ते हमखास असते.
आणि का असू नये? सरकारच्या कुठल्याही धोरणांचा अर्थव्यवस्थेवरचा परिणाम समजून घेताना ते राज्यशास्त्रात शिरतं. अशा प्रकारची धोरणं यापूर्वी कुणी कधी ठेवली होती तेव्हा काय दिवे लावले होते ते समजायला त्याला त्या काळच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करावा लागतो. खनिज-उत्पादनाच्या चढउतारांची कारणमीमांसा करताना त्याला भूगोल, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या सगळ्यांची मदत घ्यावी लागते. भाषा आणि गणित तर सगळ्याच विषयांना लागतात. तत्त्वज्ञानातल्या नीतिशास्त्राच्या अभ्यासाशिवाय ‘इतरांचं भलं कसं करायचं’ या प्रश्नाचं उत्तर अर्थशास्त्राला सापडणं कठीणच! आणि या सगळ्या विषयांची पुरेपूर मदत घेऊन एक व्यवस्थित तर्कशुद्ध योजना मांडली की आत्तापर्यंत ती शांतपणे ऐकून घेणारा गाढव नंतर भलतंच काहीतरी का करून ठेवतो, ते समजायला मानसशास्त्र आलंच! एकदा असा एक विनोद वाचला होता की कधीकधी जगाचं अर्थकारण सुरळीतपणे पार पडण्यातला सर्वांत मोठा अडथळा म्हणजे खुद्द माणसाचं माणूसपण हाच! खरोखरीच, अर्थशास्त्राच्या अभ्यासात काही किचकट मॉडेल्स हाताळताना ‘माणूस’ नावाच्या एका अत्यंत आचरट व्हेरिएबलसमोर अनेकदा हात टेकवावे लागतात, तेव्हा तो नसताच तर काय हा सवाल नाही म्हटलं तरी मनाला चाटून जातोच. पण मग स्वतःलाच ‘हे सारं कशासाठी’ हा तात्त्विक प्रश्न विचारावा लागतो आणि त्याचं उत्तर दिल्यावर आपण जास्त समजूतदारपणे त्याच मॉडेलकडे पाहू लागतो. मुद्दा हा, की अर्थशास्त्राचं इतर विषयांशी असलेलं नातं गणिताच्या अगदीच उलट आहे. इतर कुठल्याही विषयाची मदत न घेता अर्थशास्त्रात फार पुढे जाताच येत नाही. किंबहुना, जाऊही नये असंच आमच्या शिक्षकांचंही मत आहे. कारण या विषयाचा मूळ उद्देश आजूबाजूच्या सर्व गोष्टींना कमीत कमी धक्का लावून आपल्या सगळ्यांचीच आयुष्यं अधिक सुकर आणि सुखी करणे हा असल्यामुळे, त्या सगळ्यांना सोडून आपण फक्त तर्काच्या जोरावर हवेत इमले बांधत बसलो तर सगळंच निरुपयोगी ठरेल. म्हणून असं म्हणावंसं वाटतं, की ज्या विषयाचं काम बाकी सर्व विषयांनी गोळा केलेल्या सगळ्या माहितीचा उपयुक्त ठरेल असा अर्थ लावणं हे आहे, तो म्हणजे अर्थशास्त्र!
असं बघितलं तर असं म्हणावंसं वाटेल, की अर्थशास्त्र म्हणजे ‘माणसाच्या नजरेतून विश्व’. एक सुखी जीवन जगण्यासाठी या विश्वाचा पुरेपूर उपयोग कसा करता येईल हा विचार इतर कुठल्याही विचारापेक्षा माणसाला जास्त प्रवृत्त करतो. अशाच विचारांची तर्कशुद्ध मांडणी म्हणजे अर्थशास्त्र, म्हणून कधीकधी अर्थशास्त्र एका शास्त्रापेक्षाही एक विचारसरणी म्हणून समोर येतं. गेल्या तीन वर्षांत केवळ हा विषय शिकत आल्यामुळे विचारपद्धतींत घडणारे सूक्ष्म बदल माझ्या आणि माझ्या नावेतल्या इतर प्रवाशांच्या दृष्टीस पडू लागले आहेत. असं अर्थातच प्रत्येक विषयाचं होतं, पण अनेकदा ते त्या विषयापुरतं मर्यादित राहतं. एखादा पिसाटलेला रसायनशास्त्राचा विद्यार्थी फारतर आसपासच्या सगळ्या गोष्टींमध्ये रासायनिक तत्त्व शोधत बसेल. मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्यापेक्षा हरतऱ्हेने वेगळ्या असलेल्या व्यक्तींकडे समजूतदार आणि स्वीकारत्या नजरेने पाहता येणे ही सहज घडणारी गोष्ट होऊ शकते हे मी माझ्या जवळच्या काही होतकरू मानसशास्त्रज्ञांना बघून ठामपणे सांगू शकतो. पण अर्थशास्त्रामुळे किंवा त्याच्या सततच्या संपर्कामुळे निर्माण होणारा दृष्टिकोन हा असा एकाच दिशेने उमटत नाही. उलट तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, गणित यांच्याप्रमाणेच अर्थशास्त्रही जगाच्या मूलभूत बांधणीची चौकशी करणारा विषय असल्यामुळे तो दृष्टिकोन एकूणच सर्वच ठिकाणी उफाळून येतो. आणि तो कसा, याच्या उदाहरणांचा विचार करताना एक विनोद आठवतो. बारावीत असताना मी अमेरिकेतल्या एम.आय.टी. विद्यापीठातून एक Microeconomics चा मूलभूत पातळीवरचा ऑनलाईन कोर्स केला होता, आणि त्या कोर्सच्या शेवटी आमच्या सरांनी हा विनोद ऐकवून आम्हाला निरोप दिला होता. आजही कुणी मला अर्थशास्त्र का आवडतं असं विचारलं, की उत्तरादाखल मी हाच विनोद सांगत आलो आहे.
पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये दर्जेदार समजल्या जाणाऱ्या असंख्य विनोदांप्रमाणेच या विनोदातही तीन वेगळे लोक एका ठिकाणी एकत्र जाण्याचा प्रसंग आहे. एकदा एक डॉक्टर, एक पाद्री आणि एक अर्थशास्त्रज्ञ असे गोल्फ खेळायला गेले. गोल्फ कोर्स एका अवाढव्य माळरानावर पसरलेला असतो आणि त्यात एकमेकांपासून पुष्कळ लांब अशी अनेक गोल्फ होल्स असतात, जी एकेक सर करत पुढे जायचं असतं. हे तिघेजण आले तेव्हा पहिल्याच ‘होल’पाशी त्यांना ही गर्दी दिसली. खूप जास्त संख्येने लोक रांगेत उभे होते आणि रांगेच्या सुरुवातीचा एकच माणूस परतपरत खेळत होता. खूप वेळ प्रयत्न करूनही त्याचा बॉल त्या होलमध्ये जाईना. चांगला अर्धा तास रांगेत निमूटपणे काढल्यावर तिघेजण वैतागून गोल्फ क्लबच्या कॅफेत गेले आणि तीन चहा सांगून त्या माणसाच्या निर्लज्जपणावर जरा जास्तच मोकळेपणाने मतं व्यक्त करू लागले. चहा आणणाऱ्या वेटरने त्यांची बडबड ऐकली आणि त्याने सांगितलं की तो माणूस आंधळा आहे, पण गोल्फ खेळण्याच्या हौसेमुळे तो अंदाज घेत न कंटाळता खेळत राहतो. क्लबच्या सगळ्यांना त्याच्याबद्दल कौतुक वाटतं म्हणून ते त्याला हवं तितका वेळ खेळू देतात, आणि त्यालाही शेवटी जमतं बरं का! हे बोलून तो गेला आणि तिघांच्यात शांतता पसरली.
काही वेळाने डॉक्टर जड आवाजात म्हणाले, “मी अजाणतेपणी एका शारीरिक व्यंग असलेल्या माणसाबद्दल वाईट बोललो, ते माझं चुकलंच. त्याची भरपाई म्हणून मी माझ्या हॉस्पिटलमध्ये आंधळ्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी एक खास वॉर्ड उघडेन.” यावर परत शांतता पसरली. मग काही वेळाने पाद्रीही दुःखी चेहऱ्याने म्हणाले, “मीही अजाणतेपणी एका अंध व्यक्तीला नावे ठेवली, हे पापच घडलं माझ्याकडून. त्याची भरपाई म्हणून मी माझ्या चर्चमध्ये शनिवारी आंधळ्यांसाठी फुकट सूपची व्यवस्था लावून देईन.” यानंतर पुन्हा शांतता पसरली आणि दोघांनी काहीशा अपेक्षेने अर्थशास्त्रज्ञाकडे पाहिले. अर्थशास्त्रज्ञाने एक खोल श्वास घेतला आणि तो म्हणाला,
“पण तो माणूस रात्री का खेळत नाही?”
यावर बाकी दोघांच्या ज्या काही प्रतिक्रिया झाल्या असतील त्या ऐकून नक्कीच कॅफेतल्या बाकीच्या लोकांनी ते विसरून जायचा प्रयत्न केला असेल, तेव्हा आपणही त्यांच्या वाटेला जायला नको! माझ्या मते अर्थशास्त्राचा दृष्टिकोन यातून अत्यंत समर्पकरीत्या मांडला जातो. अर्थात, अर्थशास्त्रज्ञाने त्याचा हा भन्नाट उपाय सुचवायच्या आधी त्या अंध व्यक्तीसाठी दोन शब्द बोलले असते तर काही आभाळ कोसळलं नसतं, आणि तोही शेवटी माणूसच असल्यामुळे कणवेची भावना त्यालाही स्पर्शून नक्कीच गेली असेल. पण मुद्दा हा की कणव, आस्था, आपुलकी, माणुसकी, समजूतदारपणा हे सगळं आपल्याला वाटणं अर्थातच खूप महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर जी शंका ताबडतोब यायला हवी ती मनात येणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हा विनोद अर्थातच अर्थशास्त्राच्या रुक्ष स्वभावाला मनोरंजक फोडणी देऊन तयार केलेला आहे, पण मी हा माझ्याबरोबर हा विषय शिकणाऱ्या होतकरू अर्थशास्त्रज्ञांना ऐकवला तेव्हा तेही मोकळेपणाने हसले, कारण हा आरोप आम्हाला मान्यच आहे! याच उदाहरणात, क्लब रात्रीच्या वेळी सुरक्षित असेल असं गृहीत धरलं, तर हा उपाय सगळ्यांच्याच दृष्टीने हितकारक ठरू शकतो, याबद्दल तर काही वाद नाहीये! जोपर्यंत त्या अंध माणसाला त्याच्या इच्छेविरुद्ध रात्री खेळायला सांगितलं जात नाही, तोपर्यंत हा उपाय अंमलात आणण्याला काहीच हरकत असू शकत नाही. थोडक्यात कल्याणाकडे नेणारी वाट असंवेदनशीलतेच्या जंगलातून जात असेल, तर जाऊ द्यावी. आस्था दाखवायची जबाबदारी कुणीही घेऊ शकतं, पण हे काम कुणीतरी केलंच पाहिजे ना?
हा विषय शिकताना त्यातला ‘भूमिका घेणं’ हा अविभाज्य भाग मला इतर खूप विषयांपेक्षा वेगळा आणि कुतूहलजनक वाटतो. बाकीच्या विषयांमध्ये ही जबाबदारी इतक्यात घ्यायला कोणी सांगत नाही. भौतिकशास्त्राच्या वर्गात तासभर सापेक्षतावादाचा सिद्धांत समजावून सांगितल्यानंतर गुरुजींनी “आता आईन्स्टाईनच्या या निष्कर्षाबद्दल तुमचं काय मत आहे?” असं विचारलं असतं तर सगळा वर्ग गुरुत्वाकर्षणाला न जुमानता उडाला असता! मत?? आपण केवळ गरीब बिचारे विद्यार्थी असून न्यूटन, आईन्स्टाईन, हॉकिंग वगैरे महानायकांच्या चरणी राहणे (आणि एकांतात त्यांना शिव्या घालणे) एवढीच आपली पत आहे हेच त्यांनी बोलून दाखवले असते. कुणाच्या कामाबाबत शंका उपस्थित करू नये असं अर्थातच मला म्हणायचं नाहीये, कारण आधीच्यांच्या त्रुटी सुधारतच आपण पुढे जाऊ शकतो. आणि महानायक असला तरी दरवाजा कोरून मांजरीसाठी एक दार आणि तिच्या पिल्लासाठी त्याहून छोटं वेगळं दार तयार करणाऱ्या न्यूटनकडून विश्वाला समजून घेण्यात चूक होऊ शकत नाही असं मानायचं काहीच कारण नाही. पण शंका उपस्थित करायची ती आपली सद्यस्थिती जाणून, एका अफाट महासागरात आपण नुकते पोहायला शिकलोय हे ध्यानात ठेवून करणं हेच योग्य. हाच नियम बाकी सगळ्या विषयांना लागू होतो, तसाच अर्थशास्त्रालाही. म्हणूनच वर्गात आम्हाला हा प्रश्न विचारण्यात आला की ‘केन्सने माती खाल्ली’ इतकी स्पष्ट भूमिका आमच्याकडून अपेक्षित नसतेच. अपेक्षित असतं ते आम्ही स्वतः आमच्या परीने आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेत केन्सचं म्हणणं किती योग्य होतं त्यावर काहीतरी भाष्य करणं. आणि हे स्वतःहून नाही केलं तर अर्थशास्त्र शिकताच येणार नाही. अर्थशास्त्राच्या संपूर्ण प्रवासातले महत्त्वाचे टप्पे म्हणजे त्यात भर घालणाऱ्या लोकांमधले मतभेद हेच! तीनशे वर्षांपूर्वी स्मिथने मांडलेले विचार प्रथमदर्शनी इतके तर्कशुद्ध वाटतात की आपण लगेच त्यांचे भक्त होतो. मग मार्क्स येऊन ते सगळं धुडकावून लावतो तेव्हा त्याच्याही म्हणण्यात तथ्य आहे हे अमान्य करता येत नाही. मग पुन्हा क्लासिकल, मग केन्स, निओ-क्लासिकल, निओ-केन्सियन…. या सगळ्या विचारसरणी दुपारच्या चहाच्या वेळेला कडाडून वाद घालतायत हा अर्थशास्त्राचा स्थायीभाव! आणि म्हणून कुठलीतरी भूमिका न घेता (किंवा किमान कुठल्यातरी विचारसरणीकडे न ‘झुकता’) ते समजणार कसं? एखादा फक्त त्याच्या विषयातले आधीचे सगळे सिद्धांत आणि गृहीतके कोळून पिऊन त्या विषयतला तज्ज्ञ होत नाही; उलट ‘well-read’ एवढ्याच उपाधीवर त्याची बोळवण करण्यात येते. म्हणून या सगळ्या विचारसरणींच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर ‘मला सगळंच पटतंय’ असं म्हणणारा विद्यार्थी अर्थशास्त्राला साक्षात रिसोर्सेसचा अपव्यय वाटतो. त्याची अपेक्षा असते की या सगळ्या परस्परविरोधी कल्पना डोक्यात ठेवून सद्यस्थितीचा पुरेपूर अभ्यास करून त्यांना अंमलात आणण्याचा मार्ग शोधणारी व्यक्ती. आणि असं करणाऱ्याने जरी ‘स्मिथ इथे चुकला’ वगैरे म्हटलं तरी तो काही पायरी ओलांडून अनादर करत नसतो, कारण स्मिथप्रमाणेच त्याचाही हेतू काळाला उपयोगी पडेल असं उत्तर शोधणं हा असतो. परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, जग बदलतं. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातली योजना आज पर्यावरणाला धोका वाढल्यावर तशीच्या तशीच उचलून कशी आणता येईल? महायुद्ध, महामंदी, तांत्रिकीकरण अशा सगळ्या महत्त्वाच्या टप्प्यांना आधीची सगळी आकडेमोड खोडून नव्याने गणित मांडण्याची कुवत पाहिजे, आणि धैर्यही! तसे प्रत्येकच विषयात महत्त्वाचे आणि आधीचं सगळं पार बदलून टाकणारे टप्पे येतात, पण म्हणून डोक्यात शिरणाऱ्या प्रत्येक नव्या माहिती आणि बातमीसकट भूमिका बदलत राहण्याची अशी निकड भासत नाही. आईन्स्टाईनने त्याच्या काळात ‘कृष्णविवरे अस्तित्वात असूच शकत नाहीत’ असं विधान केलं होतं, आणि अनेक वर्षांनी २०१५ साली त्याला ‘अरेच्या, असतात वाटतं,’ एवढं प्रत्युत्तर मिळालं आणि भौतिकशास्त्र अनेक पायऱ्या पुढे गेलं. पण असा संथ प्रवास इथे चालणार नाही, कारण ज्या गोष्टींबाबत हा विचारविनिमय सुरु आहे त्या हजारो प्रकाशवर्षे दूर नसून अगदी वर्गाबाहेरच, त्याच क्षणी घडत असतात. याच अवस्थेचं कुणीतरी अत्यंत चपखल वर्णन केलंय : “अर्थशास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे गाडीचं इंजिन चालू असताना ती चालवायला शिकण्यासारखं आहे!”

लॉजिकप्रमाणेच मला म्हणावंसं वाटेल, की या विषयात आत्तापर्यंत एवढी पातळी गाठली आहे की असं म्हणता येईल, की ‘आता अगदी थोडंथोडं कळू लागलंय’. माझ्या मते एका मर्यादेपलीकडे आपण या पातळीच्या वर कधी सरकूच शकणार नाही. हे सगळंच जग अत्यंत गुंतागुंतीचं आहे आणि सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि या ना त्या प्रकारे एकमेकांवर काहीतरी परिणाम करत असतात. सगळ्यांना व्यवस्थित समजून घेईपर्यंत कुणाच्यातरी नवीन शोधामुळे, कुठल्यातरी धाडसी योजनेमुळे किंवा कुणाच्यातरी आचरट वक्तव्यामुळेही परिस्थिती पूर्ण बदलते. तेव्हा आपल्या हातात उरतं ते फक्त काही मूलभूत संकल्पनांना हाताशी घेऊन येणाऱ्या परिस्थितीचा शक्य तेवढ्या चांगल्या प्रकारे अर्थ लावत तिला सामोरं जायचं. तर एवढ्या विवेचनानंतर मला माझ्या परीने अर्थशास्त्राची व्याख्या करता आली तर बघतो. माझ्या मते, अर्थशास्त्र म्हणजे ‘science of interests’. आपल्यासाठी परिस्थिती अनुकूल बनवण्याची कला आपल्याला जन्मतःच अवगत असते. आपापलं भलं कसं पाहायचं, आणि त्याचबरोबर आपल्या जवळच्यांचंही (कारण त्यांच्या भल्यातही कुठेतरी आपलं भलं असतंच की!) हे मनात ठेवून सगळी जीवसृष्टी रोज उठून कामाला लागते, आणि हे उद्दिष्ट सफल करताना तिचा बाकीच्या सर्व विश्वाशी नक्की कसा संबंध येतो, आणि दिवसाच्या शेवटी कुणाकुणाचे कसं भलं झालं, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास! आणि म्हणूनच, पैसे मिळवण्याच्या दृष्टीने धडपडणाऱ्या आपल्यापासून ते स्वतःचे श्रम वाचवत दुसऱ्या पक्ष्याकडून आपली अंडी उबवून घेणाऱ्या कोकिळेपर्यंत सर्वच ज्याच्या कक्षेत येतं तो हा खऱ्या अर्थाने सर्वव्यापी असा विषय आहे. शेवटी संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्त्वामागे काहीतरी कारण आहे यावर आपला विश्वास आहेच…. हीच गोष्ट आम्ही फक्त ‘मूल्य’ हा शब्द वापरून मांडतो, इतकंच.
वा आदित्य !!
ReplyDeleteअ प्र ति म