हा खेळ सावल्यांचा


“खोटं तर आपण सगळेच बोलतो - तेच तर आपल्याला एकत्र बांधून ठेवतं.”
“ज्याला काहीतरी गुप्त ठेवायचे असेल, त्याने ते गुप्त ठेवायचे आहे हेही गुप्तच ठेवले पाहिजे.”
पहिले वाक्य म्हणजे ‘Everybody Loves Raymond’ या लोकप्रिय मालिकेतल्या रेमंडच्या आईचे उद्गार - खोटारडेपणाबद्दल मनात अचानक अढी निर्माण झाल्यामुळे आपल्या आठ वर्षांच्या मुलीला सांता क्लॉज खरा नसतो हे सांगायला निघालेल्या रेमंडला उद्देशून काढलेले! तर दुसरं वाक्य आहे ‘Yes Minister’ मधील सर हम्फ्रीचं. प्रशासनमंत्री जिम हॅकर एका समितीपासून त्यांनी काही माहिती गुप्त ठेवली आहे हे त्यांना सांगायचं का असा निरागस प्रश्न विचारतो तेव्हा हम्फ्री जरा उतावीळपणेच त्याला हे सुनावतो. 
खरं सांगायचं तर या विषयावर बोलायचं झालं तर Yes Minister आणि Yes Prime Minister मध्येच इतकी उदाहरणं सापडतील की दुसरीकडे कुठे नजर टाकावीच लागणार नाही. पण वरच्या पहिल्या वाक्याचं उदाहरण देण्याचा उद्देश एवढाच की या दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीत खूप फरक आहे, आणि तसंच परिणामांतही. काही माहिती सरकारने आपल्यापासून गुप्त ठेवावी, यातच आपलं हित आहे ही गोष्ट आपल्याला तशी मान्य असते. म्हणून हम्फ्रीने केलेलं विधान आपल्याला पटतं. पण जेव्हा एक आजी तिच्या मुलाला तिच्या नातीशी खोटं बोलायला सांगते तेव्हा आपल्याला जरा आश्चर्य वाटू शकतं. त्याला कारणीभूत आपल्याला लहानपणापासून मिळालेली शिकवणही असेल. पण शेवटी प्रश्न असा उरतो, की गुप्तता पाळणं आणि त्यासाठी खोटं बोलणं हे कुठल्या व्यक्तीने, कुठल्या परिस्थितीत आणि कुठल्या पातळीपर्यंत केल्यास ते योग्य आणि उचित असेल? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, हे कोणी ठरवायचं? या आणि अशाच प्रश्नांवर चर्चा करून त्यांचा आपल्यापुरता अर्थ लावायचा प्रयत्न करणे हेच या लेखाचे उद्दिष्ट आहे. 
आपल्या परंपरेत अनेक ठिकाणी स्पष्ट म्हटल्याप्रमाणे, मुळात असत्य हेच पाप आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्याचे आचरण करू नये अशी आपल्या संस्कृतीत उगम पावलेल्या बौद्ध आणि जैन धर्मांची शिकवण आहे. याशिवाय आपल्या पुराणांमध्येही यावर भाष्य झालेलं आहे. त्यातील सर्व व्यक्तींपैकी युधिष्ठिर हा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आद्य खोटारडा! वास्तविक जन्मभर सत्याचरण करूनही त्या एका प्रसंगासाठी तो लक्षात राहावा हे नवल आहे, पण पुष्कळदा आपल्याही आयुष्यात हेच घडत असतं. जन्मभर फक्त खरं काय तेच बोलला. अगदी द्रौपदीचा स्वभाव काय विलक्षण गोड होता हे ठाऊक असूनही एकदोनदा भाजीत मीठ कमी झाल्याचंही तो तिला बोलला असेल. पण त्या वेळी रणांगणावर त्याला असत्य (technically, अर्धसत्य) बोलावं लागलं म्हणून त्याचा रथ चार बोटं खाली येऊन सर्वांसारखाच जमिनीवर चालू लागला, ही शिक्षा. आता कोणी नुसतीच ही गोष्ट सांगितली आणि वर ‘तात्पर्य : खोटे बोलू नये’ हेही त्यात घालण्याचा आगाऊपणा केला, तर ऐकणाऱ्याला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, की शिक्षा एवढीच असेल तर काय हरकत आहे? आपल्या सगळ्यांच्या ॲक्टिव्हा तशाही खड्डे आणि स्पीडब्रेकर यांच्यामधून टुणटुणतच जाणार, मग खोटं बोललो तर आपल्याला असं काय मोठं होणार आहे? 
अर्थात, या कथेचा असा शब्दशः अर्थ घेणं चुकीचं आहे. युधिष्ठिराचा रथ चार बोटं हवेत होता ते काही घर्षण टाळून माईलेज वाढवायला नाही. तो रथ हे युधिष्ठिर सामान्य मर्त्य मानवापेक्षा जरा वरच्या, एका अर्धदैवी पातळीवर असल्याचं प्रतीक होतं. ज्याक्षणी तो असत्य वदला, त्याक्षणी तो इतर सगळ्यांसारखाच झाला, ही त्याची खरी शिक्षा होती. माझ्या मते यामधून असत्यवचन हे पाप असून ते कोणी मानवाने करूच नये हे सुचवलेलं नाहीये, तर उलट असं सुचवण्यात आलंय की असत्यवचन ही मुळी सामान्य मानवाची एक खूणच आहे. मानवाकडून असत्याचीच अपेक्षा असून, युधिष्ठिर त्यापेक्षा वेगळं काहीतरी करत होता म्हणून त्याला ते ‘स्पेशल’ स्थान प्राप्त झालं होतं. आणि स्वहितासाठी जेव्हा तोही खोटं बोलला, तेव्हा ‘तूही तसलाच निघालास’ म्हणून स्वर्गातल्या लोकांनी त्याला दाबलं. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ‘खोटं बोलणं’ हे खूप मोठं दुष्कृत्य असल्याचं जैनांप्रमाणेच व्यासांनाही वाटत होतं - फरक एवढाच की व्यास या सगळ्याकडे जरा जास्त वास्तववादी नजरेने बघत होते आणि म्हणूनच त्यांनी जैन शिकवणीप्रमाणे आपल्याला असत्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न न करता आपण शेवटी खोटं बोलणारच, हे मान्य करून आपल्याला त्यासह स्वीकारलं. 
हे सगळं मी तत्त्वज्ञानात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये शिकलो, तेव्हा मला हाच प्रश्न पडला होता, की खरंच खोटं बोलणं हा आपला स्थायीभाव आहे का, आणि त्याशिवाय आपल्याला एकमेकांसोबत राहणं हेच अशक्य आहे का? आणि तसं असेल, तर मग सगळ्या परंपरांनी आपल्याला ते पाप आहे हे पटवण्याचा एवढा प्रयत्न का केला? वास्तविक शेवटचा प्रश्न मला आपल्या परंपरांच्या एकूणच सगळ्या शिकवणींबद्दल पडतो. हे जग जर एवढं सुंदर असेल, तर त्याचा त्याग करून एका मुक्त आत्म्याच्या रूपात चिरकाल अस्तित्त्वात राहायला हे सगळे का सांगतात? समोर बुर्ज खलिफा असताना डोळे मिटून त्याच्याबद्दल वाटणारी सगळी आसक्ती सोडून दिली, तर मला परत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार नाही आणि जिथून तो दिसणार नाही अशा ठिकाणी चिरकाल राहता येईल, या युक्तिवादाचा ‘selling point’च मला आजतागायत सापडलेला नाहीये.
पण त्याचा उगम काय असावा यावर मात्र आपण विचार करू शकतो. माणसाला ज्या काही गोष्टींपासून अमाप प्रेरणा मिळू शकते त्यापैकी एक म्हणजे स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याची प्रबळ इच्छा, असं तत्त्वज्ञानातल्या Anthropocentrism या विचारसरणीचं मत आहे. सृष्टीतल्या सगळ्या पशुपक्ष्यांपेक्षा आपण जास्त हुशार आहोत हे स्वतःलाच पटवून देण्यात मानवाला एक वेगळाच आनंद होत असावा. त्यामुळेच मला असं वाटतं, की सगळे जीव फक्त सृष्टीचा उपभोग घेत असतील आणि आपणही तेवढंच केलं, तर आपल्या प्रगत बुद्धीचा तो अपमान ठरेल असं त्याला वाटलं असावं. याशिवाय, याच विचारसरणीच्या मते, स्वतःला वेगळं सिद्ध करण्यामागचा हेतू म्हणजे आपल्या या अस्तित्त्वाला काहीतरी उद्देश आहे असं मानण्यासाठी कारण शोधणं. विश्वातली एकमेव तर्कशुद्ध विचार करू शकणारी प्रजाती असण्याचा विचार आपल्याला एवढी भुरळ घालतो, की आपलं अस्तित्त्वही विश्वाच्या आयुष्यातल्या एखाद्या अपघातामुळेच निर्माण झालं आहे ही कल्पनाच आपल्याला सहन होऊ शकत नाही. आणि म्हणूनच कदाचित, विज्ञान एवढं पुढे गेलेलं असूनही आपल्या मनावरचा धर्माच्या शिकवणीचा पगडा टिकून आहे, कारण धर्म आपल्याला स्वतःला स्पेशल समजण्याची संधी देतो आणि विज्ञान तीच नाकारतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर, आपण बुद्धिमान जीव असल्यामुळे, हे सारे जग फक्त आभासात्मक असून, आपल्याला त्याच्याशी बांधून ठेवणाऱ्या सगळ्या पाशांना नष्ट करून अंतिम सत्य समजून घेणे हाच आपला उद्देश आहे अशी भावना आपल्यात निर्माण होणं स्वाभाविक आहे, असा मी शेवटी तर्क केला. आणि मग हेही लक्षात आलं की जरी प्रथमदर्शनी मोक्षप्राप्तीचा विचार काहीसा विचित्र वाटला असला, तरी आजच्या विश्वाचे कोडे उलगडण्याचा आपल्या तहानेपेक्षा तो फारसा वेगळा नाहीये; कारण दोन्हीच्या मुळाशी कुठेतरी स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची इच्छा आहे. तसंच, विज्ञानाच्या आधारे विश्वाला समजून घेण्याची धडपड करणे आणि परंपरेतल्या म्हणण्यानुसार ‘ब्रह्म जाणणे’ किंवा ‘अंतिम सत्य जाणणे’ यामध्येही काही फरक नाहीये. म्हणून एखाद्या चविष्ट फळाला बघून तो मोह टाळण्याचा प्रयत्न केला काय, किंवा त्या फळाची अणू आणि क्वार्क्सपर्यंत चौकशी केली काय, त्यामागे ‘ते फळ खाऊन टाकणे हे सर्वसामान्य प्राणिमात्रांचे लक्षण आहे, you are better than this.’ हाच काय तो विचार आहे.
आणि हा विचार ज्याप्रकारे आपल्या सगळ्यांना एक जात म्हणून छळतो तसंच एका वैयक्तिक पातळीवरही छळतो. आपल्याला इतर माणसांपेक्षाच वेगळे पाडणाऱ्या गोष्टीही आपल्याला भुरळ घालतात. आणि मला असं वाटतं की मुळात ‘आपल्याला गुप्ततेचं आकर्षण का’ या प्रश्नाचं उत्तरही याच विचारात सापडू शकेल. एखादी गोष्ट फक्त आपल्यालाच माहित असेल तर ही बाब आपल्याला स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजण्याची संधी देते, आणि म्हणून ती माहिती गुप्त ठेवण्याचा आपला प्रयत्न असतो, आणि त्यासाठी वेळप्रसंगी आपण खोटे बोलतो. अर्थात, खोटं बोलण्यामागे जर आपल्याला धोकादायक ठरेल असे काही कुणाला कळू न देण्याचा हेतू असेल, तरी त्यातही आपण माहितीच लपवत असतो, फक्त वेगळ्या कारणासाठी. माहिती लपवण्याचा आपला तिसरा संभाव्य हेतू म्हणजे जे उघडकीस आणण्यामुळे आपल्या जवळच्या कोणाला काही त्रास होणार असेल तर ते टाळण्यासाठी आपण खोटं बोलू शकतो, हा. आता यापैकी कुठला हेतू उदात्त म्हणून क्षम्य मानायचा आणि कुठल्यावर आक्षेप घ्यायचा?
तसे पाहायला गेले तर तिसरा हेतू आपल्याला सर्वांत उदात्त मानता येईल, कारण त्याच हेतूमध्ये स्वार्थाची भावना सगळ्यात कमी असते. पण या मुद्द्यावर मी घरी जरा मोठ्याने विचार केला तेव्हा आईने आणि आजीने उत्तरादाखल एक सुभाषित ऐकवलं; ज्यानुसार माणसाने खरे बोलावे आणि गोड बोलावे, पण कटू सत्य बोलू नये आणि गोड असत्यही बोलू नये. थोडक्यात अगदी परंपरेतही जर एखादे सत्य कोणाला पचवणे जड जाणार असेल तर ते न उच्चरण्याचेच सुचवले आहे. पण म्हणून काही ती खोटे बोलण्याला पाठिंबा देत नाही, तर त्याउलट गप्प राहण्यास सुचवते. म्हणजेच आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आपल्या परंपरेला कुठल्याही परिस्थितीत, आणि हेतू किती का उदात्त असेना, खोटं बोलणं मान्य नाहीये. यावरून आपण असा तर्क करू शकतो, की हा विचार ज्यांनी प्रथम मांडला त्यांना या प्रश्नातून व्यक्तिसापेक्षता पूर्णपणे काढून टाकायची होती. प्रश्न असा आहे की हेतू खरोखरीच चांगला आहे का नाही हे ठरवायचं कोणी? खोटं बोलावं की नाही याची (सर्वसामान्यतः) बोर्डरुममध्ये चर्चा होत नाही, आणि दुसरं म्हणजे जी व्यक्ती एक खोटं बोलू शकते तिची सगळीच विधाने शंका घेण्याजोगी असतात. त्यामुळे शेवटी एखादं खोटं बोलण्यामागे नक्की हेतू काय आहे हे फक्त त्या खोटं बोलणाऱ्या व्यक्तीलाच ठाऊक असतं. म्हणजे थोडक्यात जर चांगल्या हेतूसाठी खोटे बोलले तर चालेल अशी सवलत आपण देऊ केली तर प्रत्येक खोट्यामागचा हेतू अगदी शुद्ध असल्याचं ती व्यक्ती स्वतःला अगदी सहज पटवू शकेल, हे आपल्या प्राचीन शास्त्रांनी जाणलं असं आपण म्हणू शकतो, आणि म्हणून ‘सेफ साईड’साठी त्यांनी सर्वच प्रकारच्या खोट्यावर बंदी घातली. 
हे खरोखरीच जर अशाच प्रकारे घडलं असेल तर आपण फिरून याच मुद्द्यावर परत येतो, की माणसाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर तो खोटं बोलणारच, याची तेव्हा सगळ्यांनाच खात्री होती. यामागे फक्त आपला स्वार्थ साध्य करण्याची इच्छा हेच कारण असेल? तसं ते अगदी पटण्यासारखं आहे. गोष्टी गुप्त ठेवण्याच्या इच्छेमागची भौतिक आणि तशीच काही मानसशास्त्रीय कारणंही Anthropocentrism देऊ शकतं, पण दरवेळी गोष्टी गुप्त ठेवायला खोटं बोलावंच लागतं असं नाही. त्यामुळे आता शिल्लक राहिलेला प्रश्न असा आहे, की खोटं बोलण्याच्या इच्छेचा उगम फक्त या स्वार्थाच्या आणि त्यासाठी गोष्टी गुप्त ठेवण्याच्या इच्छेतून झाला आहे, की त्या इच्छेला एक स्वतंत्र अस्तित्त्व आहे? मला हा विचार सुचला तेव्हा मी एखादं असं खोटं हुडकायचा प्रयत्न करत होतो ज्याला प्रिय किंवा अप्रिय यापैकी कशातच बसवता येणार नाही. मग मला माझ्याच आयुष्यातला असा एक प्रसंग आठवला, जो ‘Ethical Dilemma’च्या सदरात सहज बसू शकतो. 
कॉलेजमध्ये अगदी सुरुवातीला मी संख्याशास्त्र हा विषय घेतला होता, पण कॉलेज सुरु झाल्यानंतर त्याचा अभ्यासक्रम बघून त्यापेक्षा दुसरा विषय घ्यावा असं मला वाटलं. कॉलेजच्या नियमांनुसार असं करण्याला मला परवानगी होती. पण हा अर्ज मी जेव्हा संख्याशास्त्राच्या शिक्षकांकडे घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी मला पुढे अर्थशास्त्रात डिग्री घ्यायची असेल तर हा विषय आत्ता न सोडलेला बरा असा सल्ला दिला. या सल्ल्यात नक्कीच तथ्य होतं, पण मी इतरांचंही मत विचारात घ्यायचं ठरवलं. सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या डिग्री कोर्ससाठी संख्याशास्त्राची आवश्यकता नव्हती याची खात्री करून घेतली, आणि शिवाय तिसऱ्या वर्षाला अर्थशास्त्रातच त्यात लागणाऱ्या संख्याशास्त्राचा एक पेपर होता. तो पेपर घेतला तर तो आणि माझं बारावीपर्यंतचं गणित मिळून मला अर्थशास्त्रात कधीच कसला अडथळा येणार नाही हे माझ्या लक्षात आलं. यानंतर मला विषय बदलायचा तर होताच, पण त्या शिक्षकांना हे पटलं नसतं आणि मग मला अर्जावर त्यांची सहीही मिळाली नसती. म्हणून मी त्यांना, मला पुढे राज्यशास्त्रात डिग्री घ्यायची आहे असं सांगितलं आणि मग त्यावर त्यांनी काहीच आक्षेप घेतला नाही. परंपरेनुसार, अप्रिय सत्य सांगण्याऐवजी मी खोटं बोलण्याचा मार्ग निवडला, आणि मी बोललो ते खोटंही काही ‘प्रिय’ म्हणता येणार नाही. फार काय, ते तेव्हा संपूर्ण खोटंही नव्हतं! माझी खात्री होती की त्यानंतर मी जेव्हा डिग्री कोर्ससाठी अर्थशास्त्र घेतलं असतं तेव्हा मी मध्यंतरी विचार बदलला असंच या शिक्षकांना वाटलं असतं. त्यामुळे मी तेव्हा त्यांना जे सांगितलं ते तेव्हाही, आणि आत्ताही, जगाच्या दृष्टीने सत्यच होतं. फक्त मला स्वतःला ते खोटं असल्याची तेव्हा जाणीव होती. आता हे नैतिकदृष्ट्या बरोबर होतं का नाही हे कसं ठरवायचं? व्यक्तिगत फायद्यासाठी मी खोटं बोललो म्हणून ते चुकीचं आहे असं म्हटलं, तर नियमानुसार मी विषय बदलू शकत असताना आणि तो विषय आवश्यक नसताना त्यांनी मला सही नाकारणं हेही चुकीचंच नाही का? जरी त्यांची त्यामागे माझं नुकसान होऊ नये अशी भावना असेल, तरी मीही हे सगळं गमतीत करत नव्हतो. मला या निर्णयाचा पुढे त्रास होणार नाही याची पूर्ण शहानिशा केल्यावरच मी तो घेतला होता, आणि जर शेवटी आईनेच मला तो विषय ठेवायला सांगितला असता तर मी ठेवलाही असता. पण त्यांच्या दृष्टिकोनातून पाहता, उठसूट विषय बदलणारे अनेक बेफिकीर विद्यार्थी त्यांच्या पाहण्यात आलेही असतील. या सगळ्या पैलूंमधून याकडे पाहता, याच्यासारख्या नैतिक प्रश्नांना एक स्पष्ट उत्तर असं मिळूच शकत नाही, हेच शेवटी आपल्याला कळून चुकतं.                                      
त्या समितीपासून माहिती गुप्त ठेवण्याचा आणि त्यासाठी खोटं बोलण्याचा हम्फ्रीचा हेतू हाच, की सामान्य जनता आपल्यासारखी हुशार नसल्यामुळे माहिती दिल्याचा ते चुकीचाच अर्थ काढतील असं त्याला वाटत होतं आणि ते त्याला नको होतं. त्याखेरीज, “जाणून घेण्याचा अधिकार हा खरंतर अंधारात राहण्याचाच अधिकार आहे, कारण ज्ञानासोबत अपराधीपणाची भावना येते, तर अज्ञान एक प्रकारची प्रतिष्ठा घेऊन येतं.” हा त्याचा ठाम विश्वास! आणि याच मताशी आयुष्यभर प्रामाणिक राहून त्याने त्याच्या मंत्र्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सगळ्यांपासून अनेक गोष्टी सफाईने गुप्त ठेवल्या, आणि खूप ठिकाणी त्याचं चुकलंच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. 
तर दुसरीकडे रेमंडला पक्कं माहित होतं की काही वर्षांनी सांता क्लॉज खरा नाहीये हे त्याच्या मुलीला आपोआप कळणार आहे, आणि त्यानंतरच्या काही वर्षांनी ती स्वतः तिच्या मुलांना तो खराच असतो ते पटवून देणार आहे. ते काही असो, त्या रात्री तो स्वतः एका जबाबदार वडिलांसारखा तिच्या खोलीत सांता बनून जातो आणि तो खरा असल्याची तिची खात्री पटवून देतो, आणि तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू पाहतानाच आनंदित होऊन दिवा मालवतो. आपणही तेच करूया, आणि तूर्तास अंधारातल्या गोष्टींना अंधारातच राहू देऊया, काय?                                                   

Comments

  1. मी आता तू लिहिलेले सगळे वाचले.मांडणी तर्कशुद्ध
    आहे.आणि ती आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणारीही आहे.

    ReplyDelete
  2. चि. आदित्य ,

    सहज सुंदर मुद्देसूद लेखन 🙏🏻

    ओघवती भाषा , निर्दोष !! क्या बात हैं !

    निव्वळ वयाने लहान आहेस म्हणून असेच इतके जनांस विचार करावयास प्रवृत्त करणारे लेखन करीत रहा , हा आशीर्वाद 🤗


    ReplyDelete
  3. वा ! निष्कर्ष लिहिण्याची घाई न करता तिथपर्यंत वाचकाला रमतगमत विचार करायला भाग पडत घेऊन जाण्याची तुझी शैली मला फार आवडते. हे माझं विधान मात्र सौ प्रतिशत सच आहे हं :-)

    ReplyDelete
  4. Replies
    1. खूप सुंदर लेखन शैली . सुंदर लेख

      Delete
  5. खूपच सुंदर तर्कशुद्ध मांडणी. खूप छान

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिलं आहेस आदित्य!

    ReplyDelete
  7. छानच लिहिले आहेस आदित्य!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प