तहान
तरी विनवत होते विश्व हे सारे, वाटेवर या चालू नको
कंदील होता हाती मोठा; होती उत्सुकतेची साथ
उभे होते क्षितिजावर ते सत्य माझी वाट पहात
पडता पाऊल पुढे परि, पडले कानावर काही
‘इहलोकात दुष्ट याहुनी शाप असा कुठला नाही,’
वदले विश्व कळकळीने, ‘जेव्हा अमृतमय भासे ज्ञान,
निर्दयपणे साऱ्या मनांचा मग ठाव घेई ही तहान!
देऊन बळी समाधानाचा तू थेंबांमागे धावू नको,’
तरी विनवत होते विश्व हे सारे, वाटेवर या चालू नको
जागृतीच्या त्या क्षणाचे सुख वर्णावे तरी कसे?
चहूकडे निश्चल एकच अथांग काळे डोह दिसे
वाहत आली कुठून निद्रा, पुढ्यात माझ्या स्थिरावली
मोहिनीसह समाधानाच्या पापण्यांवर ती विसावली
मिटण्यापूर्वी डोळे पुन्हा जवळच काही चमकले
चपळ या बोटांनी मग शंकेला मनाच्या हरवले
सांडत होते एक तेज आगळेच त्या रत्नामधून
जणू होते त्यामध्ये तारे लक्षावधी बसले दडून.
ज्ञानप्राप्तीच नव्हे का मानवाचा खरा धर्म?
कुतूहलप्रेरित मनाचे हेचि तर खरे सत्कर्म
फोडून बांध या तमाचा प्रकाश सर्वत्र पसरवावा
दडलेल्या साऱ्या रत्नांवर कवडसा एक टाकावा
म्हणाले विश्व शांतपणे, ‘प्रकाशाला काय कशाचे?
रत्नांसह पाषाणावरही तो त्याच निरागसतेने नाचे
जर ठाम असशील तर मागाहून तृप्तीला तू भिऊ नको’
तरी विनवत होते विश्व हे सारे, वाटेवर या चालू नको
नव्हता मला परंतु त्या जड, कटू दगडांचा ध्यास
डोहामध्येच त्या अंधाऱ्या राहू दे सदैव त्यांस
परंतु दिसे न दूरचे काही, मंद अशा त्या प्रकाशात
पटण्यासाठी ओळख घेऊ लागलो सारेच हातात
रत्नांपेक्षा दगडच अधिक; त्वचा त्यामुळे सोलवटे
उचलून ते बाजूला करिता सर्वांगातून कळ उठे
परंतु गवसता रत्न नवे, पडे वेदनेचा विसर
आशेने पुन्हा झेपावती त्या डोहाकडे आरक्त कर
रचली मग मी सत्याने लकाकणाऱ्या रत्नांची रास
थेंबे थेंबे एके दिवशी जी शह देईल त्या अंधारास
स्पर्शून सर्व कणाकणांना करील प्रकाश हे सारे स्पष्ट
होईल मग अखेर हे भय अज्ञाताचे समूळ नष्ट
म्हणाले विश्व, ‘असे तमामध्ये भय जसे अज्ञाताचे
त्याहून मोठे भय आणितो प्रकाश, अज्ञातवासाचे.
कौतुक स्वीकारून माझे तू वेदना ती पाहू नको’
तरी विनवत होते विश्व हे सारे, वाटेवर या चालू नको
परि क्षणापूर्वीच होतो मी तर स्रोत या प्रकाशाचा
क्षणातच बनलो कसा एक थेंब त्याच्या प्रवाहाचा?
साम्राज्यात या तेजाच्या माझा कंदील छोटा हरवला
परि प्रयास करता झाकण्याचा; पुन्हा प्रखरतेने उजळला
आता सर्व दिसांच्या सर्व क्षणी ओझे त्याचे खांद्यावर
मनही झाले ‘क’च्या साऱ्या घराण्याचे राहते घर
मिळे उत्तर, वाटे तेव्हा असुदे हा अखेरचा कक्ष
परंतु दारेच पाहती सदैव थकलेले हे दोन्ही अक्ष
जाता खोल या व्यूहामध्ये विरतो मी कणाकणाने
जणू जपले होते माझे अस्तित्त्व केवळ अपघाताने
अनंतत्त्वाची या रस्त्याच्या तेव्हा लागते मज चाहूल
आल्या मार्गाने परतण्यास आपसूक वळते पाऊल
तेव्हा हसून म्हणते विश्व कसे, ‘आता मार्ग उरत नाही,
उजळलेली वाट पुन्हा काळोखास जवळ करत नाही.
विसरून तुझ्या मानवधर्माला आता मागे फिरू नको.’
तरी विनवत होते विश्व हे सारे, वाटेवर या चालू नको.
फारच छान!! अद्वितीय
ReplyDeleteआदित्य,
ReplyDeleteसुंदर!! कमाल!
👌👌