‘जीवाचं’ सिंगापूर: आदिपर्व

पुणे विमानतळाच्या, तशा प्रशस्त पण इतर विमानतळांच्या तुलनेने अगदीच भातुकलीतल्या वाटणाऱ्या आवारात मी एका सुटकेसचं हँडल धरून आणि दुसरी बॅग खांद्यावर घेऊन उभा होतो. मला इथे घेऊन येणारी रिक्षा तिथून वेगाने काढता पाय घेत होती. तिला कोपऱ्यावर वळून नाहीसं होताना पाहिलं आणि मी स्वतःशीच अत्यंत नाटकीपणाने उद्गारलो, “No turning back now,” आणि विमानतळाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी रांगेत जाऊन उभा राहिलो. 
वास्तविक माझा तो उद्गार साक्षात निरर्थक होता. मी सहज आलो तसा ती सुटकेस पाठीमागून ओढत आवाराच्या बाहेर जाऊन कुठलीही रिक्षा पकडून पुन्हा घरी येऊ शकलो असतो. पण माझ्या दृष्टीने हा उद्गार मी महिन्याभरापूर्वीच सोडलेल्या एका संकल्पावर शिक्कामोर्तब करण्यासाठी होता. तेव्हा तो प्रसंग अगदी सहज माझ्या डोळ्यांपुढून तरळला. या घटनेच्या बरोबर एक महिना आधी, मी बाबांशेजारी कॉम्प्युटरवर विमानाची तिकिटं बुक करण्याची साईट उघडून बसलो होतो. 
“करू?” बाबांनी योग्य त्या ठिकाणी कर्सर नेत विचारलं. मी एक खोल श्वास घेऊन म्हणालो, 
“हो.”
***
आता भूतकाळात जरा अजून लांबवर नजर टाकावी लागेल. बरोबर दहा वर्षांपूर्वी मी आयुष्यात पहिल्यांदा भारताच्या बाहेर पाऊल ठेवलं होतं. तेव्हा बाबांनी सिंगापूरच का निवडलं ते माहित नाही. ऑफिसच्या कामासाठी ते त्यापूर्वी काही वेळा सिंगापूरला जाऊन आलेले होते त्यामुळे त्यांना त्या शहराची ओळख होती. कदाचित माझ्या आणि आईसाठी हा पहिलाच परदेशप्रवास असल्याने तुलनेने जवळच्या आणि ओळखीच्या ठिकाणी जावं असा विचार त्यांनी केला असेल. त्याशिवाय त्यांचा आधीपासूनच सिंगापूरवर फार जीव आहे, आणि दहा वर्षाचा असताना तिथे पाच दिवस राहून आल्यानंतर माझ्याही मनात अगदी तीच भावना होती. 
या मधल्या काळात भारताबाहेरच्या ज्या काही मोजक्या ठिकाणांबद्दल माझ्या मनात एक विशेष आपुलकी निर्माण झाली आहे त्यापैकी सिंगापूर हे एक आहेच. किंबहुना, प्रत्यक्ष जाऊन आल्यावर मनात घर करणारंही हेच ठिकाण. बाकी दुबईवर तर जाऊन यायच्या आधीपासूनच माझं खूप प्रेम होतं. असंच आणखी एक म्हणजे लंडन, ज्याची ओळख आजपर्यंत फक्त पुस्तकं आणि सिनेमे यांच्याच माध्यमातून झालेली. हॅरी पॉटरसारख्या काही अत्यंत जवळच्या कथा तिथे घडत असल्यामुळे त्याचं अप्रूप एवढंच! पण सिंगापूरने मात्र माझ्या मनातलं त्याचं स्थान सर्वार्थाने कमावलेलं होतं, आणि म्हणूनच यावेळी पुन्हा परदेशप्रवासाचा विचार मनात आला तेव्हा मी सिंगापूरला पुन्हा जाऊन यायला एका पायावर तयार झालो. 
मागे वळून पाहताना असं वाटतंय की या ट्रिपसाठी मी याहून चांगलं दुसरं ठिकाण निवडूच शकलो नसतो. कारण ही ट्रिप काढण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा सगळा अनुभव मी एकट्याने घेणं हा होता. स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकण्याची ultimate पायरी या हेतूने मी याकडे पाहत होतो. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असता आणि पुढे परदेशात एकट्याला शिकायला जावं लागलं तर त्यासाठीची मानसिक तयारीही झाली असती असा सगळा हा प्लॅन होता. ही ‘प्रॅक्टिकल’ उद्दिष्टे सोडता, चारपाच दिवस फक्त आपल्याला हवं तेच करायचं हा विचार मला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देत होता. कुठेही गेलो की आपल्याला जे बघायला आवडतं ते आपल्या आजूबाजूच्या कोणालाच फारसं रुचत नाही याची कल्पना मला केव्हाच आलेली होती. उदाहरणार्थ, माझ्या ओळखीतलं कुणीही संध्याकाळी तास-दीड तास वाहत्या रस्त्यावर एका कोपऱ्यात बसून पलीकडच्या गगनचुंबी इमारतींना न्याहाळत बसलं असतं अशी मला अजिबात शक्यता वाटत नाही. 
पहिल्यांदाच एक संपूर्ण ट्रिप एकट्यानेच करायची असं ठरवल्यावर जगातल्या अनेक जागा आपोआपच कमी झाल्या. निसर्गात भटकायला जरी मला मनापासून आवडत असलं तरी एखादं मोठं शहर जर हाकेच्या अंतरावर असेल तरच मला खऱ्या अर्थाने सुरक्षित वाटतं हे माझ्या आधीच्या काही ट्रिप्समधून माझ्या लक्षात आलेलं होतं. याशिवाय त्या शहराकडूनही माझ्या काही अपेक्षा होत्या. मुंबईसारखं एखादं सदैव स्वतःच गोंधळलेलं शहर काही माझ्या फारसं उपयोगी पडू शकलं नसतं. नीटनेटकं, आखीवरेखीव, सुसंघटित म्हणजे जिथे बसस्टॉपवर लिहिलेल्या बसेसच्या वेळा आणि खुद्द ती बस यांच्यात मतभेद नसतात असं शहर मला हवं होतं. थोडक्यात, reliable infrastructure या एका निकषावर पुढच्या अनेक गोष्टी ठरणार होत्या. मग सुरक्षिततेचा विचार करता पुन्हा जवळचं आणि ओळखीचं हा मुद्दा पुढे आला. या सगळ्या प्लॅनिंगमध्ये मला लवकरच कळलं की ‘जवळ’ या गोष्टीला फारसा अर्थ उरला नव्हता. दोन्ही बाजूंना सुयोग्य आणि विश्वासार्ह विमानसेवा असेल तर हा मुद्दा तसा पूर्णपणे गैरलागू ठरतो. पण तरीही मला अगदी फार लांब जायचं नव्हतं. आणि ओळखीचं म्हणाल तर प्रत्यक्ष ओळख मला फक्त दुबई आणि सिंगापूरची होती. इंटरनेट, पुस्तकं, सिनेमे या माध्यमांतून बाकीच्या अनेक शहरांची तोंडओळख असली तरी अशी ओळख किती अपुरी असते हेच मला हा प्रवास नंतर शिकवणार होता.
दुबईला दोनच वर्षांपूर्वी जाऊन आलेलो होतो, शिवाय तिथे माझ्या काकाचं घरही होतं, त्यामुळे मी हॉटेलमध्ये राहिलो असतो तरी सगळं अगदी स्वतंत्रपणे करूच शकलो नसतो. जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या अंतरावर माझं हक्काचं घर असेल तर माझी जबाबदारी मी हव्या तितक्या गांभीर्याने घेऊ शकणार नाही असं मला वाटत होतं. मला सुरक्षितता हवीच होती, पण त्याबरोबरच कुठल्याही परिस्थितीत आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार असल्याची भावनाही मनात असायला हवी होती. आणि म्हणूनच मला अशी एखादी जागा हवी होती जिथे मी स्वतःची व्यवस्थित काळजी घेतली असती तर मला बाकी कुठलीच अडचण येण्याची अजिबात शक्यता नव्हती. या सगळ्या परीक्षा अगदी सहज पास होत सिंगापूर शेवटी समोर आलं आणि मग आमची तयारी सुरु झाली. 
एकदा तयारी सुरु झाल्यावर खूप गोष्टी नव्याने समोर यायला लागल्या. तयारीच्या प्रत्येक पायरीवर एक नवीन आणि अनेकदा अगदीच अनपेक्षित असलेला धडा मिळायचा. आता कुठल्याही प्रवासाची अगदीच पहिलीच पायरी घ्या. आत्तापर्यंत माझी समजूत आपण नक्की कुठले आणि किती  दिवस जायचं असतं ते आपण ठरवतो अशी होती. माझ्या कॉलेजला नोव्हेंबरमध्ये दिवाळीची आणि सत्र संपल्याची अशी जोडून महिनाभर सुट्टी मिळते. त्यामुळे दोन्ही बाजूंना पुरेशी सुट्टी ठेवून ही ट्रिप काढावी असं मी ठरवलं होतं. पण हा निर्णय खरंतर विमानकंपन्या घेतात हे मला प्लॅनिंगच्या पहिल्याच दिवशी कळलं. एकतर पुण्याचा विमानतळ हा नावाने आंतरराष्ट्रीय असला तरी मनाने अजूनही एस.टी.स्टँडच आहे. तिथून सिंगापूरला थेट विमानं खूपच कमी होती, आणि होती तीही अर्थातच खूप महाग. कॉलेजच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून माझ्या टीमने लिहिलेल्या अर्थशास्त्राच्या शोधनिबंधात भारताच्या Aviation Sector ला वाचवण्यासाठी सगळ्या विमानकंपन्यांनी किमती वाढवाव्यात असा निष्कर्ष काढला होता, त्या पार्श्वभूमीवर मला या किमती बघून आनंदच व्हायला हवा होता. प्रत्यक्षात काय वाटलं ते सांगण्याची गरज नाही. मग बाबांनी मला तिकिटांमध्ये पैसे वाचवण्यासाठीच्या क्लृप्त्या शिकवायला सुरुवात केली. त्यातली पहिली म्हणजे आपण आखलेल्या बेतावर अडून न राहता, जाऊनयेऊन सगळ्यात स्वस्त मिळेल अशाच दिवसांची तिकिटं काढायची, ही. मला तशीही महिनाभर सुट्टी असल्याने तारखांचा मला फारसा फरक पडणार नव्हता, म्हणून मग माझी आधीची योजना गाळात जाऊन त्याऐवजी २० ते २५ नोव्हेंबर अशा तारखा ठरल्या. शोधनिबंधाच्या कामात विमानांच्या तिकिटांच्या किमतींमागचं शास्त्र किती क्लिष्ट असतं त्याचा पुष्कळ अनुभव आला होता. त्यामुळेच नुसतीच पाहिली तर २४ तारखेपेक्षा महाग होती पण २० तारखेशी जोडून घेतली तर २५ तारखेची तिकिटं एकदम स्वस्त कशी झाली या गहन प्रश्नावर मी फार विचार नाही केला.
या ट्रिपमध्ये मला पहिल्यांदाच अनेक गोष्टी एकट्याने करायच्या होत्या, उदाहरणार्थ एकट्याने जेवण, एकट्याने हॉटेलमध्ये राहणं वगैरे. अशा अनुभवांची संख्या काय कमी होती म्हणून विमानकंपनीने ‘lay-over’ हा प्रकार त्यात घुसडला. या तारखांची सगळ्यात स्वस्त फ्लाईट मला पदरात पाडून घ्यायची असेल तर मला पुणे ते बंगलोर, मग बंगलोर ते सिंगापूर असा प्रवास करावा लागणार होता. येतानाही तसंच. सगळ्या फ्लाईट्स ‘गो एअर’ याच कंपनीच्या असल्यामुळे एकीला उशीर झाला तरी तेवढ्यात दुसरी सुटणार नाही अशी खात्री होती. तरीही हा ‘lay-over’चा वेळ पुरेसा मोठा असावा असा बाबांचा आग्रह होता. आम्ही शेवटी आखलेल्या बेतात मला बंगलोर विमानतळावर जाताना चार आणि येताना साडेपाच तास काढायचे होते असं दिसलं तेव्हा मी जरा हादरलोच होतो. रोज कॉलेजमध्ये एकदातरी पंचेचाळीस मिनिटं कशी काढायची हा प्रश्न सतावतोच. तशातही तिथे बोलायला लोक असतात, शिवाय वर्गच चालू असल्यामुळे इतरही पुष्कळ गोष्टी करता येतात. विमानतळावरच्या कडक शिस्तीच्या वातावरणात एकट्यानेच एवढा वेळ घालवणं हे मला फारसं आवडलेलं नव्हतं. मी तेव्हाच माझ्या पाठीवरच्या बॅगमध्ये एक जॉन ग्रिशमचं पुस्तक ठेवून दिलं. बाबा मात्र मला म्हणाले की विमानतळावरच्या सगळ्या प्रक्रियांमध्ये चार तास कसे उडून जातील कळणारही नाही. कालांतराने त्यांचं अगदी बरोबर असल्याचा मला प्रत्यय आला. 
शक्य तेवढ्या सगळ्या फ्लाईट्स पाहून आणि त्यांची तुलना करून शेवटी ही तिकिटं काढून झाली तोपर्यंत मी दमलो होतो. आता जरा ब्रेक घेऊन चालू लेखावर नजर टाकावी म्हणून मी ती बुकिंगची साईट बंद करणार तितक्यात बाबांनी मला थांबवलं. काम पूर्ण थोडीच झालेलं होतं? सर्वप्रथम त्यांनी सांगितल्यानुसार मी त्या बुकिंगच्या साईटच्या पानाचा एक स्क्रिनशॉट काढून घेतला, जेणेकरून त्या साईटकडून अधिकृत ईमेल येईपर्यंत माझ्याकडे हा पुरावा असता. ती ईमेल लगेचच आली तेव्हा मी बाबांसमोर ती नीट वाचली आणि त्यांना आणि आईला दोघांनाही फॉरवर्ड केली. मग त्यात दिलेल्या माझ्या तिकीटाची प्रिंट डाउनलोड करून माझ्या फोनमध्ये ठेवून दिली. आता तिकीट हाती आलेलं होतं, पण काम संपायचंच होतं. आता पुढची पायरी म्हणजे गुगल ड्राईव्हवर एक नवीन फोल्डर उघडणे आणि आईबाबांना त्याचा सदस्य करून घेणे. मग बाबांनी माझ्या तिकीटाची प्रिंट त्या फोल्डरमध्ये टाकून त्याचं उद्घाटन केलं आणि इथून पुढची सगळी कागदपत्रं तिथे गेलीच पाहिजेत असं सांगितलं. हे सगळं करून झाल्यावर मी बाबांकडे अपेक्षेने पाहिलं. 
“आता झालं,” ते हसून म्हणाले. “आता बस तू लिहायला, या तिकीटाच्या प्रती मी ऑफिसमधून येताना काढून आणतो.” मी त्यांना थँक्स म्हणून हुश्श करत लेख उघडला. जाताजाता बाबांनी “आता तुला पुन्हा एवढा वेळ असेल तेव्हा सांग, मग आपण हॉटेलचं पाहूया,” असं एक वाक्य टाकलं, ते ऐकून माझ्या डोक्यात घोळत असलेला मुद्दाच मी विसरून गेलो. परीक्षा संपल्यावर ज्या एका उत्साहात मी ‘आता प्लॅनिंग!’ म्हणत सगळीकडे फिरत होतो तो पार ओसरलेला होता. एकट्या विमानानेच माझा अंत पाहिला होता आणि ही तर अगदीच पहिली पायरी होती. काही दिवसांपासून बाबा ‘वेळ मिळाला की प्लॅनिंग कर,’ असं जे सांगत होते ते ऐकून मी ‘सिंगापूरला काय काय बघायचं,’ या बाजारातल्याच काय, पण अगदी शेतातल्या तुरीवरच माझं सगळं लक्ष केंद्रित केलं होतं. ‘बालपणीचा काळ सुखाचा; आपल्यावर आईचं बोट धरून विमानात जाऊन बसण्याचीच जबाबदारी असायची तेव्हाचा,’ असल्या गोष्टी डोक्यात यायला लागल्या होत्या. 
हॉटेलची चर्चा व्हायची तेव्हा झालीच, आणि तिनेही जवळपास तेवढाच वेळ घेतला. एकाचवेळी चार साईट्स उघडून वेगवेगळ्या डील्स आणि ऑफर्सची तुलना करत बसायचं हे माझ्या दृष्टीने प्लॅनिंगच्या कक्षेत कधीच नव्हतं, पण आता या टप्प्यावर मला यात सहभागी होणं भाग होतं. मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा ज्या ‘पेराक’ हॉटेलमध्ये राहिलो होतो ते आपलं मला आठवत होतं, आणि मी सुरुवातच त्याचंच नाव शोधून केली. ते स्वस्त तर होतंच, पण तिथल्या सगळ्या सोयीसुविधाही चांगल्या असल्याचा अनुभवही होता. पण मग मला भुरळ पडली ती ‘कॅप्सूल हॉटेल’ या संकल्पनेने. जपानमध्ये लोकप्रियता पावलेली ही पद्धत म्हणजे एका स्वतंत्र खोलीऐवजी फक्त एक ‘कॅप्सूल’ (किंवा ‘पॉड’) ज्यामध्ये अंथरूण-पांघरूण वगैरे असतं. ज्यांचा दिवस कामात किंवा बाहेर भटकण्यातच जातो आणि फक्त झोपण्यासाठी हॉटेलची आवश्यकता असते, त्यांना मोठ्या खोल्या घेऊन करायचंय काय? सिंगापूरला मला तरी हॉटेलवरच बसून राहण्यात अजिबात रस नव्हता. त्यामुळे आम्ही अशी कॅप्सूल हॉटेल्स शोधायला लागलो. त्यातलं एक सापडलं ते म्हणजे ‘द ॲटलास स्टेशन’ नावाचं एक हॉटेल. त्यातले कॅप्सूल्स अगदी अवकाशयानातले असावेत तसे दिसत होते. ते मला पाहूनच पसंत पडलं होतं, पण त्याच्या वर्णनात ‘स्टार वॉर्स थीम’ असं वाचल्यावर तर मी मनातून तेच ठरवून टाकलं. एवढ्यावर भागत नाही, लोकांचे अभिप्राय पण वाचायचे असतात असं बाबांनी सांगितलं. सुदैवाने ते सगळे हॉटेलची तारीफ करणारे निघाले; ‘अगदी आरामदायी, हसतमुख स्टाफ, चांगला ब्रेकफास्ट’ अशा आशयाचे. म्हणून मग आम्ही त्याचं बुकिंग करून टाकलं. त्या साईटवर हे ‘रात्रीचे २०००’ या दराचं कॅप्सूल हॉटेल आणि त्याच्याच खाली सिंगापूरचं सुप्रसिद्ध पंचतारांकित ‘मरिना बे सँड्स’ हे ‘रात्रीचे १,१०,०००’ या दराचं हॉटेल पाहून मला मजा वाटली. बाकी हे हॉटेल मला सर्वार्थाने आवडलं होतं, फक्त मेख एवढीच होती की तिथे चेक-इन दुपारी ३ वाजता सुरु व्हायचं. माझी फ्लाईट सिंगापूरला पहाटे पावणेचारलाच पोहोचणार होती. बाबांच्या सल्ल्यावरून मी एकदा बुकिंग पक्कं झाल्यावर हॉटेलला एक ईमेल लिहून लवकर चेक-इन केलं तर चालेल का असं विचारलं. त्यावर त्यांच्या तत्परतेने आलेल्या उत्तरात ‘आम्ही पॉडची खात्री देऊ शकत नाही, पण तुम्ही तुमची बॅग आमच्याकडे जरूर ठेवून जाऊ शकता,’ हे वाचून मी निश्चिंत झालो. 
एकदा विमानाची परतीची तिकिटं मिळाली आणि हॉटेलमधून चेक-आऊट करण्याची तारीखही ठरली की मी सिंगापूरला कुठल्याही अधिकाऱ्याच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला मोकळा! व्हिसा काढतानाच या गोष्टी जाहीर कराव्या लागतात असं मला कळलं. मला सिंगापूरने व्हिसा नाकारण्याचं खरंतर काहीच कारण नव्हतं, पण तो हातात पडेपर्यंत जरा धडधड होत होतीच. ही प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सातआठ दिवसांनी तो कागद हाती लागला तेव्हा अखेर ही ट्रिप उभयपक्षी मान्य झाल्याचं निश्चित झालं. तरी कामांची यादी काही संपलेली नव्हती. 
आता बाबांच्या सांगण्यावरून मी एक नवी यादी करायला सुरुवात केली. ‘प्राणपणाने जपायच्या वस्तूं’ची! या यादीत सर्वप्रथम आले ते अर्थातच पासपोर्ट आणि व्हिसा. तसा व्हिसा मला मिळताना कागदावर मिळालेला असला तरी मधल्या काळात तो स्कॅन करून फोनमध्ये जपून ठेवलेला होता. तरी नेमक्या गरजेच्या वेळी फोनला झोप आली तर तो असावा म्हणून एकदोन झेरॉक्सही जवळ ठेवल्याच होत्या. पासपोर्टला अशी कुठलीच सोय नसते. माझा पासपोर्ट हरवला असता तर माझ्यात आणि सिंगापूरच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहत येऊन पडलेल्या माशात तांत्रिकदृष्ट्या तसा काहीच फरक उरला नसता. म्हणजे मला अगदीच तशी वागणूक मिळाली असती असं नाही, पण ट्रिपचे पूर्ण बारा वाजले असते एवढं मात्र नक्की! परदेशात गेल्यावर पासपोर्ट हरवल्याचे चार किस्से इकडूनतिकडून मिळवले होते, आणि ती वर्णनं ऐकून ‘नवीन अनुभवा’च्या कक्षेत ही गोष्ट अजिबात येत नाही असं मी ठरवून टाकलं. यादीतली त्यानंतरची गोष्ट म्हणजे फोन! आमच्याकडे एक जास्तीचा फोन होता तो आणि माझा स्वतःचा असे दोन्ही मी बरोबर ठेवावेत असा ठराव पास झाला. पुढे या निर्णयाचा मला अगदीच अनपेक्षितरीत्या प्रचंड फायदा होणार होता. पुढचा मुद्दा होता पैशांचा. मी सिंगापूरला गेलो तेव्हा सिंगापूर डॉलर ५२ रुपयांच्या आसपास घोटाळत होता, आणि हे गणित मी मनाशी पक्कं केलं. मग ‘Don’t put all your eggs in one basket’ या न्यायाने माझ्याकडच्या सगळ्या रोख डॉलर्सची सामानात जागा करून झाली. या सगळ्यानंतर मग माझ्या परिचयाचं ‘प्लॅनिंग’ सुरु झालं. 
ट्रिपच्या या आदिपर्वात मला मिळालेल्या अनेक नवीन धड्यांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे सिंगापूरला पोहोचल्यावर कराव्या लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टींची यादी शक्य तेवढी लहान करूनच जायचं. तसंच शक्य तेवढ्या गोष्टींवर पूर्ण विचार आणि तयारी इथेच करून ठेवायची. सिंगापूर हे शेवटी सिंगापूर असल्यामुळे मला शहरात पावलापावलावर फुकट वायफाय मिळेल अशी बाबांना खात्री होती, पण यावर सगळा संपर्क अवलंबून राहू शकत नव्हता. इंटरनेट डेटा पॅकची गरज होतीच, आणि तो तिथे चालवायला मला सिंगापूरचं खास प्रिपेड कार्ड माझ्या फोनमध्ये घालून घ्यावं लागणार होतं. इथून तयारी पूर्ण करून जायचं या धोरणानुसार कार्ड आत्ताच विकत घेऊन तिथे पोचल्यावर फक्त ते घ्यायचं असं ठरलं, आणि त्यानुसार आम्ही ‘सिंगटेल’ कंपनीचं एक कार्ड विकत घेतलं. प्रत्यक्ष विकत घेण्यापेक्षा असं नेटवरून घेण्याचे फायदे लवकरच दिसू लागले. आमची खरेदी पूर्ण झाली तेव्हा माझ्याकडे एक नवीन सिम कार्ड आणि त्याचबरोबर सेंटोसा बेटावरची एक रोपवे सफर अशा दोन गोष्टी होत्या. मग यापासून प्रेरणा घेऊन आम्ही तिथल्यातिथे माझ्या ट्रिपचा सगळा कार्यक्रम आखून टाकला, आणि शक्य तेवढ्या प्रेक्षणीय स्थळांची तिकिटेही काढून घेतली. या सगळ्या खरेदीच्या पावत्या पुन्हा इतर सगळ्या कागदपत्रांप्रमाणेच ड्राईव्ह फोल्डर, कॉम्प्युटर्स, फोन असा सगळा प्रवास करून झेरॉक्सच्या रूपात माझ्या बॅगेत जाऊन बसल्या. 
परदेशात जायचं तर नुसतं उठून निघालो एवढंच नसतं हे मला पूर्वीपासून माहित होतं, पण मग ते काय ‘असतं’ त्याची आता कुठे जाणीव व्हायला लागली होती. ही सगळी प्रक्रिया आम्ही अगदी ठरल्याप्रमाणे लहानलहान पायऱ्यांमध्ये विभागून केली त्यामुळे एकदम खूप दडपण आलं नाही आणि शिवाय मला प्रत्येक पायरीचं महत्त्व व्यवस्थित कळलं. आता बॅगा भरून तयार होत्या आणि सगळ्या कार्यक्रमाची उजळणीही झाली होती. मग पुढच्या पायरीवर बाबांनी मला विमानतळावर कायकाय कुठल्या क्रमाने करायचं असतं ते नीट समजावून सांगितलं. ‘गरज पडलीच तर’ म्हणून आमचं ते संभाषणही फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं होतं. यानंतर इअरफोन्स बॅगच्या पुढच्या कप्प्यात ठेवण्यात आले आणि प्रवासासाठी आणलेले बिस्किटचे चार छोटे पुडे मागच्या कप्प्यात जॉन ग्रिशमच्या पुस्तकाशेजारी नीट बसले. चेन लावली. सुटकेसला कुलूप लावलं. आता शेवटची एकच लहानशी पायरी तेवढी उरली होती. 
सिंगापूरला जाणे.

Start the journey with me on SG2

Comments

  1. 👌
    पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

    ReplyDelete
  2. 😊😊मस्त!
    या तयारीवर तू जगात कुठेही जाऊ शकतील!

    ReplyDelete
  3. This us exactly what I do for every trip that I make two times a year but never realized that it could be a material for an excellent blog for a first timer! In short don't think that it will be any easier the second time you plan your trip.
    All the best to you.

    ReplyDelete
  4. खूप मुद्देसूद व पुढचे आता कधी वाचायला मिळेल
    असे उत्कंठावर्धकवर्णन पाठवले आहेस.

    ReplyDelete
  5. खूपच छान वर्णन आहे अनुभवांचं

    ReplyDelete
  6. मस्त, पुढचा भाग लवकर येऊ देत

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प