जीवाचं सिंगापूर: प्रस्थानपर्व ३
अचानक काहीतरी अनपेक्षित दिसल्यामुळे मला जाग आली होती. त्या दृश्याकडे पुन्हा पाहण्याच्या आधी मी जरा इकडेतिकडे पाहून आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेतलं. सगळीकडे पूर्ण अंधार होता; फक्त सामानाच्या रॅकच्या खालच्या भागाला लावलेली पट्टी अगदी मंद निळ्या प्रकाशात चमकत होती. सगळे प्रवासी गाढ झोपलेले दिसत होते. अशा प्रकारच्या वातावरणात एरवी अतिपरिचयामुळे अपेक्षित असलेला रुळांचा खडखडाट नव्हता, पण ती कमतरता भरून काढायला विमानाची स्वतःची घरघर चालूच होती. त्यातून मला पंखाकडची सीट मिळाल्यामुळे मी त्या महाकाय इंजिनाच्या डोक्यावरच बसलो होतो. पण तरी मला ती घरघर त्या रुळांच्या आवाजाच्या तुलनेत सौम्य वाटली, कारण रुळांचा आवाज नंतर एकदोन दिवस कानात घुमत राहून शरीरही हलतच असल्याचा भास निर्माण करत राहतो. मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि ज्याच्यामुळे जाग आली होती ते शोधायचा प्रयत्न केला. आतला काहीच नाही असा काळोख बाहेर होता, आणि आम्ही ढगांच्या वर होतो का खाली होतो ते कळायलाही मार्ग नव्हता. वरच असू. खिडकीबाहेर पसरलेल्या त्या लांबसडक पंखाच्या टोकावरच्या सतत लुकलुकणाऱ्या लाल दिव्याची आता सवय झाली होती, पण माझं लक्ष वेधून घेतलं गेलं होतं ते प्रकाशाच्या वेगळ्याच एका स्रोताने.
नीट पाहिल्यावर मला मघाशी ओझरता दिसलेला तो प्रखर हिरव्या दिव्यांचा महाकाय संकुल पुन्हा शोधता आला. पंखाच्या खाली नजर पडेल तिकडे अक्षरशः हजारो दिवे लागलेले होते. एकमेकांपासून ठराविक अंतरावरच, पण कुठल्याही ओळखू येण्यासारख्या आकारात नसलेल्या त्या हिरव्या दिव्यांच्या साम्राज्याकडे मी खूप वेळ तसाच बघत बसलो. ते काय आहे ते मला कळेचना. मनात पहिल्यांदा आलेली, तोच सिंगापूरचा चांगी एअरपोर्ट असेल का अशी आनंददायी शंका विमानाने मध्येच हवेत जरा अजून वर जाऊन दूर केली. मग पुन्हा झोप लागेपर्यंत मी ते काय असू शकेल यावर विचार करत राहिलो. एकत्र प्रवास करणाऱ्या बोटींचा ताफा? पण एवढ्या? का मलेशियाच्या जमिनीवरचं कुठलंतरी अवाढव्य माळरान वगैरे? ते दिवे जिथे होते तिथे जमीन होती का समुद्र होता हेच कळायला मार्ग नव्हता, त्यामुळे मी तो विचार सोडून दिला. परत आल्यानंतर मी गूगलवरून माहिती काढली तेव्हा कळलं की माझा पहिला अंदाज बरोबर होता. ते दिवे मच्छिमारांच्या बोटींवरचे होते, आणि रात्रीच्या वेळी त्या प्रखर उजेडाकडे आकर्षित होऊन मासे यावेत म्हणून ते लावलेले होते. तसंच यामुळे आम्ही तेव्हा थायलंडच्या आखातावरून उडत होतो हे कळलं.
जाग आलीच होती म्हणून मी माझ्या डोक्यावरचं बटण दाबलं. निळा दिवा लागलेला पाहताच एक एअरहोस्टेस लगेच माझ्याकडे आली.
“मला जरा पाणी देता का?”
“हो आणतेच. थांबा.” ती मागे जाऊन पाण्याचा एक ग्लास घेऊन आली. ते घेऊन मी तिला थँक्स म्हणत पुढचा महत्त्वाचा प्रश्न विचारला.
“मला इमिग्रेशन फॉर्म कधी मिळेल?”
“तुम्हाला हवाय का इमिग्रेशन फॉर्म?” तिने काहीसं गोंधळून विचारलं, त्यावरून माझा शब्दप्रयोग जरा चुकला असल्याची मला जाणीव झाली.
“नाही, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आम्हाला एक गुलाबी फॉर्म भरायचा असतो-”
“ओह,” ती म्हणाली. “हो, ते खरंय. आम्ही थोड्याच वेळात त्यासंबंधी घोषणा करू.”
मी तिला पुन्हा थँक्स म्हणून माझा ग्लास रिकामा केला आणि शेजारच्या सीट्सवर पाय पसरून पुन्हा झोपलो. ती घोषणा ‘थोड्याच वेळात’ झालीच, पण त्याच्या आधीच्या एका घोषणेमुळे मी आधीच टक्क जागा झालेलो होतो.
ती घोषणा खराब हवामानासंबंधी होती, आणि दुपारच्याच अनुभवावरून मी ती किती गंभीरपणे घ्यायची याचाच विचार करत होतो. पण माझ्या पलीकडच्या खिडकीबाहेर नजर टाकल्यावर माझ्या तोंडाला कोरड पडली. मी झोपेत असताना विमानाने सूर मारल्याचं मला आठवत नव्हतं, पण आम्ही आता ढगांच्या आत होतो. बाहेर वादळी पाऊस पडत असल्याची चिन्हं दिसत होती, आणि मी पलीकडे बघितलं तेव्हा त्यापैकीच एक चिन्ह खिडकीच्या अगदी बाहेर ठळकपणे व्यक्त होत होतं.
विजा!
जमिनीवरून पाहताना क्षणभरच दर्शन देऊनही ज्या अंगावर काटा आणतात, त्यांना न थांबता सतत आपल्यापासून काही मीटर अंतरावर कडाडताना पाहून माझा जो थरकाप उडाला त्याचं वर्णन करणं कठीण! शिवाय इथे त्या नुसत्या चमकून जात नव्हत्या. पहिल्यांदा कडाडल्यानंतर काही क्षण थिजून गेल्यासारख्या तिथेच थांबून आकाशाला तडे गेल्याचा भास निर्माण करत होत्या. पूर्वी एका पुस्तकात वाचलेलं त्यांचं ‘तीन जीभा असलेले साप’ हे वर्णन करताना लेखकाच्या मनात काय असेल ते आता कळत होतं. या अशा वेळी त्यांना चुकवायला विमान काय करतं याची मला अजिबात कल्पना नव्हती, पण ते तर अगदी मॉर्निंग वॉकला बागेत आल्यासारखं संथपणे पुढेपुढे सरकत होतं. या रणकंदनात आम्ही कशाला येऊन कडमडलो या प्रश्नाचं एकच उत्तर मला सुचत होतं, आणि ते म्हणजे आम्ही सिंगापूरच्या जवळ येत होतो. त्या एअरहोस्टेसनी तेव्हाच ते गुलाबी फॉर्म्स वाटायला सुरुवात केली.
आपल्या डोक्यावरचे वाचनासाठी वापरण्याचे खास दिवे लावून काहींनी तो फॉर्म भरायला सुरुवात केली होती, पण बाकीचे बरेच जण तो फॉर्म त्यांच्या बॅगेत कोंबून पुन्हा झोपण्याची तयारी करत होते. यावरून तो फॉर्म भरायला विमानतळावर वेळ मिळेल असा मी तर्क केला, पण त्या लोकांना ‘सराईत’ प्रवाशांच्या सदरात घालून मी शहाण्यासारखा माझ्या डोक्यावरचा दिवा लावला आणि बॅगेतून बॉलपेन काढला. त्या फॉर्मवर माझं पूर्ण नाव, भारतातला पत्ता आणि फोन नंबर विचारला होताच, पण सिंगापूरमधला पत्ता आणि तिथे राहण्याचा कालावधीही विचारला होता. माझ्या व्हिसानुसार मला सिंगापूरमध्ये तीस दिवस राहण्याची परवानगी होती, पण माझ्या प्रत्येक राहण्याच्या जागेचा मी दाखला देणं आवश्यक होतं. त्या फॉर्मवर पुढे मी कुठून आलो, आणि कुठल्या फ्लाईटने ते सगळं तपशीलवार विचारलं होतं. आधी अगदी स्वाभिमानी भारतीयाच्या आविर्भावात ‘बेंगळुरू’ असं फॉर्मवर लिहिल्यानंतर मला तिकिटावर ‘बंगलोर’ लिहिलेलं सापडलं, म्हणून मी शक्यतो कमी खाडाखोड करून ते बदललं. फॉर्मच्या एका तिसऱ्या तुकड्यावर पुन्हा माझं नाव विचारलं होतं, आणि खाली ‘हा तुकडा इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून परत घ्यावा, कारण सिंगापूरमधून परत निघताना तुम्हाला तो परत करावा लागेल,’ अशी सूचना होती. त्याच्याच खाली ‘वीस हजार SGD हून अधिक रक्कम आणणाऱ्यांना ती डिक्लेअर करावी लागेल’ आणि ‘सिंगापूरमध्ये बेकायदेशीरपणे अमली पदार्थ आणण्याच्या गुन्ह्यास फाशीची शिक्षा आहे’ अशा दोन स्वागताच्या सूचना होत्या. अशा तऱ्हेने मी तो फॉर्म डोक्यावरच्या कमी आणि खिडकीबाहेरच्या जास्त अशा उजेडात भरून काढला!
अचानक विमानाने पुन्हा सूर मारला, आणि खिडकीबाहेरच्या दृश्याने माझी मघाची भीती दूर पळवून लावली. आम्ही समुद्रावरून उडत होतो आणि आमच्या डावीकडे सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेलं एक अवाढव्य शहर पसरलेलं होतं. किनाऱ्यावर काही ठिकाणी जरा उंच इमारती दिसत होत्या, पण बाकी सगळीकडे असंख्य छोट्याछोट्या इमारती आणि घरं दाटीवाटीने उभी होती. त्यांच्यामधून सर्वत्र पसरलेली दाट झाडीही ओळखू येत होती. आम्ही आता समुद्राशी समांतर रेषेत आल्यामुळे त्यात फिरणाऱ्या बोटी आमच्या अगदी शेजारी उभ्या असल्यासारख्या वाटत होत्या. किनाऱ्याला लागूनच असलेल्या एका रस्त्यावरून गाड्यांचा सुळसुळाट दिसत होता. त्या रस्त्यावरून नजर फिरवत मी एका वेगळ्याच उभ्या चक्रासारख्या आकारापाशी थबकलो. आजूबाजूच्या इमारतींमध्ये उठून दिसणारा, संथपणे आवर्तने घेत या शहराचे अविस्मरणीय दर्शन घडवणारा तो सुप्रसिद्ध ‘फ्लायर’ ओळखू न येणं अशक्यच! गेल्या पाचदहा मिनिटांपासून ओळखीच्या खुणांचा उतावीळपणे शोध घेणाऱ्या डोळ्यांची या एका दृश्याने कायमची खात्री पटवून टाकली.
सिंगापूर.
आणि अचानक टर्मिनसची इमारत दिसू लागली, उभी असलेली विमानं दिसू लागली, मग धावपट्टीची जमीन दिसू लागली आणि क्षणभरातच धाड्कन जमिनीवर उतरून आमचं विमान वेग कमी करायला लागलं. थोडावेळ वेड्यासारखं धडधडत धावपट्टीवरून पळून झाल्यावर ते शांतपणे वळून पलीकडच्या टर्मिनसच्या इमारतीला फुटलेल्या अनेक पुलांपैकी एका पुलाला जाऊन चिकटलं. घोषणा सुरु झाल्या, त्यात सिंगापूरमध्ये आमचं स्वागत करून, बाहेरचं तापमान अमुक अंश सेल्सियस आहे आणि बॅगा ८ नंबरच्या पट्ट्यावर मिळतील असं सांगण्यात आलं. हीच घोषणा सिंगापूरच्या चारही अधिकृत भाषांमध्ये होईल अशी मला अपेक्षा होती, पण इंग्लिशनंतर सगळं पुन्हा शांत झालं. माझी अपेक्षा पुढचे पाच दिवस सिंगापूरच्या मेट्रो मात्र पूर्ण करणार होत्या.
जिथल्या मातीत भारताने आपला झेंडा पक्का रोवलेला आहे अशा ठिकाणांच्या यादीत जशी दुबई येते, तसंच सिंगापूरही. विशेषतः दक्षिण भारतीयांची लोकसंख्या इथे खूप आहे. त्यामुळे सिंगापूरच्या अधिकृत भाषांमध्ये इंग्लिशसोबत तमिळचाही समावेश आहे. उर्वरित भाषांपैकी एक अर्थातच मलाय (मलेशियाची) आणि दुसरी मँडरिन (चिनी). सिंगापूर या मलेशियाच्याच कुशीतल्या एका छोट्या बेटावर पूर्वीपासून वस्ती आहे ती मलाय, चिनी आणि भारतीय या तीन संस्कृतींचीच. इंग्लिश ही नेहमीप्रमाणे गरजेमुळे आलेली, पण इथल्या चारही अधिकृत भाषांपैकी सर्वोच्च स्थान तिलाच आहे असं मला जाणवलं. इथे जिथे सामान्यांपर्यंत माहिती पोचवणं महत्त्वाचं असतं, उदाहरणार्थ मेट्रोत, तिथे पुष्कळदा सगळ्या भाषांमध्ये घोषणा होतात आणि सूचनाही लिहिलेल्या असतात. पण बाकी सगळीकडे इंग्लिशला दिलेलं प्राधान्य ठळक जाणवतं. दुबईत जसं गरजेचं असो-नसो पण कटाक्षाने सगळीकडे आधी अरबी भाषेत आणि मग इंग्लिशमध्ये लिहिलेलं आणि सांगितलेलं असतं, तेवढं इथे जाणवत नाही. किंबहुना, हे चित्र पुष्कळसं आपल्या भारतातल्या चित्रासारखंच आहे. अधिकृत भाषांची यादीच असली तर इंग्लिशचा वापर हा ‘कॉमन ग्राउंड’या न्यायाने होतो, असंच दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतं.
आम्ही चांगी एअरपोर्टच्या चौथ्या टर्मिनसवर उतरलो होतो. इमारतीच्या आत शिरल्यावर एका खूप मोठ्या लॉबीला ओलांडून आम्हाला पलीकडे असलेल्या सामानाच्या पट्ट्यांकडे जायचं होतं. लॉबीचा आकार भिंतीवरच्या पाट्या पाहूनच कळत होता. आम्ही आत आलो तिथल्या पाटीवर ‘सामानाचे पट्टे उजवीकडे दहा मिनिटांच्या अंतरावर’ असं लिहिलेलं होतं. आता ती दहा मिनिटं घाईघाईत पळणाऱ्या माणसाच्या नजरेतून, का पहिल्यांदाच एअरपोर्ट पाहत असल्याच्या थाटात कॅमेरा चालूच ठेवून फिरणाऱ्या माणसाच्या नजरेतून ते कळायला मार्ग नव्हता. पण तिथल्या एखाद्या खुर्चीवर बसून सापेक्षतावादावर विचार करण्याची माझी तेव्हा इच्छा झाली नाही; ते सगळं मी सूटकेस ताब्यात मिळाल्यावर केलं असतं. त्यानंतर वेळच वेळ होता.
अंतर खूप असलं तरी त्या गुबगुबीत मखमली गालिच्यावरुन चालत जायला मजाही येत होती. एकदोनदा मला बूट काढून ते सॅकमध्ये ठेवून द्यायचा मोह झाला इतका तो गालिचा पायांना आल्हाददायक होता. तसंच वर छतावरही गंमत केलेली होती. एका सबंध छताऐवजी असंख्य लहानलहान खाचा केलेल्या होत्या आणि प्रत्येकीत छोटेसे दिवे लावले होते. तेही अशा खुबीने की चालताचालता वर पाहत राहिलं तर आपल्या डोळ्यांसमोर प्रकाशाची एक वेलबुट्टीदार नक्षी तयार होत जायची. मग मला कळलं की गालिच्यावरही तीच नक्षी गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या छटांमधून काढलेली होती. वास्तविक हे असं आपल्याकडच्या दिल्ली, मुंबई, बंगलोर इथल्याही विमानतळांवर असणार याची मला कल्पना होती, पण तेव्हा अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला. अर्थशास्त्र शिकायला लागल्यापासून पहिल्यांदाच मी एका ‘विकसित’ देशात पाय ठेवत होतो. हे जाणवल्यावर मी सगळ्या गोष्टींचं त्या अनुषंगाने निरीक्षण करायचं ठरवलं.
अखेर पुष्कळ चालल्यानंतर (अर्थात मध्येमध्ये ट्रॅव्हलेटर्स होतेच) मी प्रवाशांच्या गर्दीमागून इमिग्रेशनच्या काउंटर्सपाशी आलो. एका मोठ्या लॉबीत टोकाला ही काऊंटर्स होती आणि मधल्या भागात गोलाकार टेबलं ठेवलेली होती. प्रत्येक टेबलापाशी तो गुलाबी फॉर्म भरणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती. त्या टेबलाच्या पृष्ठभागावर उभ्या केलेल्या एका काचेच्या पार्टीशनवर दोन्ही बाजूंनी फॉर्म भरण्यासाठीच्या सूचना वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेल्या होत्या. माझा फॉर्म भरून झाला होताच तरी मी एका टेबलापाशी जाऊन त्या सूचना पाहिल्या. त्या टेबलावर नेमक्या अरबी, चिनी आणि कोरियन भाषेत त्या लिहिलेल्या होत्या. पलीकडच्या एका टेबलाशी जरा जास्तच गर्दी पाहून मी तिथे इंग्लिश असेल असा तर्क केला. तिथे फार वेळ न रेंगाळता मी सरळ एका काऊंटरपाशी गेलो. तिथल्या बाईंनी माझा पासपोर्ट घेऊन मला बंगलोरमध्ये विचारले होते तसेच काही प्रश्न विचारले, मग तिथल्या बायोमेट्रिक यंत्रावर माझे दोन्ही अंगठे ठेवायला सांगितले. माझ्या पासपोर्टला स्कॅन करून त्यांना मिळालेल्या माझ्या माहितीशी मी मिळताजुळता आहे ना ते तपासण्यासाठीचा हा खटाटोप होता. मग तिने तो गुलाबी फॉर्म पाहिला, तपासला, आणि त्याचा कडेचा भाग फाडून माझ्या पासपोर्टमध्ये परत घालून मला दिला. हे सगळं झाल्यावर तिने मला ‘Welcome to Singapore’ असं म्हणून ते लहानसं काचेचं दार उघडून मला जाऊ दिलं, आणि मी हुश्श करत पलीकडे सामानाच्या पट्ट्यांकडे जायला निघालो.
ते पट्टे पुढच्याच लॉबीत होते, त्यामुळे मी मिनिटभरातच ८ नंबरच्या पट्ट्यापाशी पोहोचलो. या खेपेला माझी सूटकेस खूपच लवकर आली. ती ताब्यात घेऊन मी एका खुर्चीवर जाऊन बसलो आणि सरतेशेवटी फोनचा ‘एअरप्लेन मोड’ काढून चांगी विमानतळाच्या वायफायशी त्याला जोडून टाकलं. पुढचे तीन तास मला फुकट वायफाय मिळणार होतं, म्हणून मी पहिल्यांदा लगेच घरी व्हॉट्सॲप कॉल केला. सिंगापूरमध्ये तेव्हा पहाटेचे चार वाजलेले होते, आणि म्हणजेच इकडे भारतात रात्रीचा दीड. बाबांनी मला काही वेळ आराम करायला सांगितला आणि मग विमानतळ सोडण्यापूर्वी करण्याच्या कामांची यादी काढून वाचायला सांगितली. ती यादी नेमकी सूटकेसमध्ये होती आणि तिला प्लॅस्टिक टॅगने बंद करून ठेवलेलं होतं. तो टॅग कात्रीने कापावा लागतो, पण कात्री अर्थातच सूटकेसमध्येच होती! मी बाबांना विचारल्यावर त्यांनी ‘विमानतळावर कुणालाही विचार’ असं सांगितलं. तो टॅग काढणं आवश्यक तर होतंच, म्हणून मी पलीकडच्या दारांच्या जवळ उभ्या असलेल्या काही एशियन अधिकाऱ्यांना गाठलं आणि जरा भीतभीतच ‘हे टॅग्स कुठे काढून मिळतील’ असं विचारलं. मला वाटलं होतं ते कुठेतरी पाठवतील, पण त्यांनी लगेच कुठूनतरी कात्री पैदा केली आणि ते टॅग्स कापूनही दिले. मी परत माझ्या खुर्चीकडे येऊन आम्ही तयार केलेली कामांची यादी काढून वाचायला सुरुवात केली.
सर्वप्रथम मला कुठल्याही टेलिकॉमच्या दुकानातून माझं सिंगटेलचं सिम कार्ड घ्यायचं होतं. बाहेरच्या लॉबीत आल्यावर मला थोड्या अंतरावर तसंच एक दुकान दिसलं. त्या बाईने माझी ऑर्डर असलेला कागद तिच्याकडे ठेवून घेतला आणि ते कार्ड, त्याचं सूचनापत्रक आणि ते फोनमध्ये घालण्यासाठी लागणारी इजेक्टर पिन असं सगळं दिलं. फोनच्या कडेला असलेल्या त्या लहानशा भोकात त्या पिनचं निमुळतं टोक घालून कार्ड स्लॉट बाहेर काढणं या प्रकाराबद्दल मला मनातून कधीच पूर्ण आत्मविश्वास वाटला नव्हता, म्हणून मी तिलाच ‘ते घालून देता का’ असं विचारलं. त्यावर तिने ‘तुम्ही स्वतःच घालू शकाल, पिन दिलीय त्यात’ असं उत्तर देऊन मला पिटाळलं. दुसऱ्याच्या फोनमध्ये खुडबुड करण्याची तिलाही भीती वाटत असणार असं मला वाटलं, म्हणून मी काही न बोलता एका आरामखुर्चीवर बसून ती पिन फोनमध्ये घालायचा प्रयत्न केला. दुसऱ्याच प्रयत्नात ती पिन त्या भोकातच तुटली. तिचा निमुळता टोकदार भाग भोकातच अडकून बसला आणि हँडल माझ्या हातात राहिलं.
त्या एका क्षणात मी प्रचंड हादरलो. माझ्या फोनचा सिम कार्ड स्लॉट जॅम झालेला होता आणि आता सिंगटेलचं कार्ड त्यात घालायला मार्ग नव्हता. यामुळे फोनला काही होणार नाही अशी आशा करत मी तो नाजूकपणे हाताळत राहिलो. मग पुढचा प्रश्न आलाच: पुढे काय? सिंगटेल कार्ड नसेल तर मला डेटा पॅक मिळणार नव्हता. चांगीचं वायफाय वापरायची मुदत संपल्यावर माझा घराशी संपर्कच तुटला असता. आता सिंगापूरमध्ये ठिकठिकाणी वायफाय असतं हे माहित होतं, पण त्यावर विसंबून राहणं शक्यच नव्हतं. अचानक माझ्याकडे दुसरा फोन होता हे मला आठवलं, आणि बाबांच्या या दूरदृष्टीला मनातून सलाम करत मी त्यात सिंगटेलचं कार्ड घालायच्या शक्यतेवर विचार करून पाहिला. ते सहज शक्य होतं; माझ्याकडे माझी स्वतःची पिन होतीच. पण त्याआधी मला हा तुकडा या फोनमधून काढता आला असता तर ते हवंच होतं.
मी उतरल्यावर माझ्या बाटल्यांमध्ये पाणी भरून घेतलं होतं, त्याचा एक घोट घेतला आणि जरा वेळ खोल श्वास घेत बसून राहिलो. जरा शांत झाल्यावर पुन्हा त्या दुकानातल्या बाईला गाठलं आणि तिला घडलं ते समजावून सांगितलं.
“ते तुम्ही काढून देऊ शकाल का प्लीज?”
“माफ करा, माझ्याकडे तरी त्यासाठी लागणारी टूल्स नाहीयेत. तुम्ही असं करा, वरच्या मजल्यावरच्या E-Gadget नावाच्या दुकानात जा. त्यांच्याकडे ती असतील.”
मी तिथून चालत लॉबी ओलांडून वरच्या मजल्याकडे निघालो. जरा बरं वाटायला लागलं होतं. एकतर त्या बाईने ज्या सहजपणे मला हे सुचवलं त्यावरून माझी समस्या होपलेस नक्कीच नव्हती, आणि आता एक तोडगाही सापडला होता. एस्कलेटरवरून वर आल्यावर मला समोर ते दुकान बंद दिसलं आणि पुन्हा पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. मग मी तिथल्या तशाच टेलीकॉमच्या दुकानातल्या एका कर्मचाऱ्याला गाठलं. ती ‘टूल्स’ त्याच्याकडेही नव्हती, पण ते दुकान सात वाजेपर्यंत उघडेल अशी माहिती त्याने पुरवली. मी वेळ बघितली; साडेसहा वाजले होते. आता अर्धा तास कुठेतरी बसून काढायचा, अशा विचारात मी पलीकडच्या खुर्च्यांच्या रांगेकडे निघालो. पोटातला खड्डा अजूनही तसाच होता.
तो भुकेमुळे होता हे लक्षात आल्यावर मी त्या दुकानांच्या वरच्या लहानशा फूड कोर्टकडे पावलं वळवली. तिथे गेल्यावर असं कळलं की विमानतळावरचा फूड कोर्ट चोवीस तास उघडा असेल अशी माझी कल्पना साफ चुकीची होती. माणसं तर सोडाच, त्या दुकानांमधले दिवेही लागलेले नव्हते. त्या भकास, अंधाऱ्या वातावरणात नुसतंच दोनदा चक्कर मारून माझ्या मनस्थितीवर काही चांगला परिणाम झाला नाही. मी तसाच पुन्हा खाली उतरून त्या E-Gadget च्या दुकानांच्या रांगेच्या शेवटी असलेल्या एका कॅफेत गेलो. तिथेही तशी सामसूमच होती, पण काउंटरवर कोणीतरी होतं. पलीकडे एका उंच टेबलावर दोन एशियन तरुण लॅपटॉप्स उघडून बसलेले होते. मी मेनू बघून एक साधी एस्प्रेसो कॉफी आणि ‘स्क्रॅम्बल्ड एग्ज ऑन टोस्ट’ मागवले. ते सगळं मिळून साडेनऊ डॉलर्सला पडलं, आणि मी माझी पहिली दहा डॉलरची नोट काढून दिली. ते फोनचं प्रकरण झालं नसतं तर मी आत्ता केवढ्या उत्साहात हीच देवाणघेवाण केली असती, असा विचार मनात येऊन गेल्याशिवाय राहिला नाही.
मी मुद्दाम पलीकडची दुकानं दिसत राहतील अशा ठिकाणचं टेबल निवडलं होतं. थोड्या वेळाने एका ताटलीत स्क्रॅम्बल्ड एग्ज, ब्राऊन ब्रेडच्या चार स्लाइस, बटर, जॅम आणि पाचसहा जांभळाच्या आकाराचे टोमॅटो असं मला त्याने आणून दिलं, शिवाय एका छोट्या कपात कॉफी दिली. पहिला घोट घेतल्यावरच मी साखर सांगायची विसरलो होतो हे मला जाणवलं, पण परत जाऊन ती घेऊन येण्याचं त्राण माझ्यात उरलं नव्हतं. मी ती कॉफी तशीच दोन घोटात संपवून समोरच्या ताटलीवर लक्ष केंद्रित केलं. सिंगापूरमधला माझा पहिला ब्रेकफास्ट मी अशा प्रकारे एखाद्या अपराधी माणसासारखा E-Gadgetच्या दाराकडे पुन्हापुन्हा नजर टाकत खायला सुरुवात केली!
मस्त . I am enjoying the reading and am looking forward to the next part.
ReplyDeleteमालिकांमध्ये जसं ’पुढे काय’ या उत्कंठेपाशी आधीचा भाग संपतो आणि वाट पाहावी लागते तसं झालं आहे
ReplyDelete