जीवाचं सिंगापूर: प्रस्थानपर्व १


माझ्या असं लक्षात आलंय की कुठल्याही रांगेत कागदपत्रं घेऊन आपण उभे असलो आणि आपल्या पोटात एवढासाही गोळा आला नसेल तर नक्कीच काहीतरी गडबड असते. अशा प्रकारच्या रांगांचा सरकारच्या कृपेने पुष्कळ अनुभव असल्यामुळे एक काहीतरी कागदपत्र आपल्याकडे नसल्याची भीती सतत वाटत राहते. मग नाही म्हटलं तरी आपण रांगेतल्या आपल्या मागच्यापुढच्या लोकांच्या हातातल्या कागदपत्रांकडे वारंवार नजर टाकत राहतो, आणि आपल्या हातात नसलेलं काही त्यांच्याकडे सापडू नये अशी मनाशी प्रार्थना करत राहतो. विमानतळाच्या प्रवेशद्वारापाशी सैन्याच्या सुरक्षारक्षकांच्या समोरच्या रांगेत माझी अशीच थोडी धडधड होत होती. असं पुढच्या चोवीस तासांत शंभरेक वेळा करावं लागणार आहे, आणि या टप्प्यावर त्यांना फक्त तिकीट हवंय असं मी स्वतःला पटवत राहिलो. माझी पाळी आल्यावर मी माझ्याकडच्या सगळ्या कागदपत्रांचा एक पिन मारलेला गठ्ठा त्यांच्या हातात दिला; त्याच्यात सगळ्यात वर तिकिटाची प्रत होती. गरज पडलीच तर सुटकेसमध्ये असाच दुसरा गठ्ठा आहे, शिवाय फोनमध्ये एक डाऊनलोड केलेली प्रत आणि ईमेल्समध्ये मूळ प्रत असंही सगळं आहे असं मी स्वतःला सांगत होतो. माझ्या विचारांची आगगाडी एवढी फिरून येईपर्यंत मागच्या माणसाने मला हळूच ढोसायला सुरुवात केली होती. रक्षकाने मी दिलेलं तिकीट पाहून मला केव्हाच परत देऊन टाकलेलं होतं. 
हा पहिला अडथळा ओलांडून मी लॉबीत आलो तेव्हा थेट खुर्च्यांच्या रांगा शोधून त्यातल्या एका खुर्चीवर स्वतःला झोकून दिलं. भीती फक्त डोकं वर काढायला कारणं हुडकत असते याचाही मला पुष्कळ अनुभव होता. आणि ९०% वेळा ती अगदीच निरर्थक असते. महत्त्वाच्या परीक्षेच्या वेळी हॉलमध्ये सोडताना आपली पाळी येईपर्यंत सगळे बाक संपून गेले तर, अशा काही माझ्या कारकिर्दीतल्या लक्षणीय भीत्या आहेत. सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित पार पडेपर्यंत भीती संपूर्णपणे जाणार नाहीये हे मला माहित होतं, म्हणून मी त्याचा विचार न करता पुढच्या टप्प्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. माझ्या भावाने मला खास सिंगापूरला नेण्यासाठी करून दिलेल्या काजूच्या चिक्कीचा एक तुकडा तोंडात टाकला. आजूबाजूला कोणीच काही खात नसेल तर असं एकट्याने खाण्यातही मला पूर्वी थोडा संकोच वाटायचा; तो मीच या ट्रिपच्या आठवडाभर आधी विशेष पावलं उचलून मनातून हुसकावून लावला होता. 
आठवड्याभरापूर्वी कॉलेजच्या ग्रुपचं क्रॉसवर्डचं एक नवीन पुस्तकांचं दुकान पाहून यायला औंधला जायचं ठरलं होतं. मी नेहमीप्रमाणे वेळेच्या आधीच पोहोचलो होतो. बाकीचे येईपर्यंत वेळ कसा घालवायचा या नित्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला क्रॉसवर्डच्या इमारतीच्या तळमजल्यावर एक ‘नॅचरल्स’चं दुकान सापडलं आणि मी उगीच त्यांच्याकडे कलिंगडाचं आईस्क्रीम मिळतंय का ते पाहून यायचं ठरवलं. मिळत होतं. म्हणून मी ते घेतलं आणि पुन्हा माझ्या गाडीवर येऊन बसून आजूबाजूच्या गर्दीकडे पूर्ण दुर्लक्ष करून ते आरामात संपवलं. ‘लोक काय म्हणतील’ या निरर्थक चिंतेवर आपण संपूर्ण मात करतो तो क्षण लक्षात ठेवण्यासारखा असतो असं माझ्या मनात येऊन गेलं. त्यामुळे शेवटचा  घास घेताना तो बिस्किटाचा कोन हातातच चिरडला गेला आणि त्या आईस्क्रीमचा आस्वाद माझ्या गाडीलाही घेता आला त्याचंही मला काही वाटलं नाही. लोकांना खरंतर काही पडलेली नसते, हेच सत्य आहे. सिंगापूरला काय वेगळं असणार आहे? त्यामुळे तिथे मी केलेल्या कुठल्याही गोष्टीमुळे लोकांच्या मनात माझी एक विशिष्ट प्रतिमा निर्माण होत नाही, आणि भारताची तर त्याहून नाही, असं मला सहजच जाणवलं. It’s not about you. हेच वाक्य ट्रिपमध्ये अनेक ठिकाणी माझं ब्रीदवाक्य बनणार होतं.
आता पहिली पायरी म्हणजे चेक-इन करून सूटकेस त्यांच्या हवाली करणे. बाबांनी मला यासाठी दोन पर्याय दिले होते. एक म्हणजे अर्थातच नेहमीप्रमाणे ‘गो एअर’ची काऊंटर्स शोधून त्यांच्याकडून चेक-इन करून घेणे. दुसरा पर्याय मला अगदीच नवीन होता; तो म्हणजे एका एटीएमसारख्या दिसणाऱ्या यंत्रात आपली माहिती टाकून तिथल्यातिथे बोर्डिंग पास पदरात पाडून घ्यायचा. हे केलं असतं तरी माझी सूटकेस विमानकंपनीच्या ताब्यात द्यायला मला ‘गो एअर’चं काऊंटर गाठावंच लागणार होतं. पण मिळाला बोर्डिंग पास तर घेऊन टाकूया असं म्हणून मी त्या ‘Check-In Kiosk’ नावाच्या यंत्रांच्या शोधात निघालो. पुणे विमानतळाचं एक बरं आहे की लहान असल्यामुळे कुठे पाट्या नसल्या तरी गोष्टी चटकन दृष्टीस पडतात. माझ्या खुर्चीतूनच जरा इकडेतिकडे पाहिल्यावर मला चार तशी यंत्रं पलीकडच्या भिंतीसमोर मांडून ठेवलेली दिसली. माझ्याकडे वेळ पुष्कळ होता, आणि मागे एकदोनदा घाईत निर्णय घेतल्यामुळे गोष्टी चुकल्याचंही आठवत होतं. शिवाय एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी मी यंत्रापेक्षा माणसावर केव्हाही जास्त विश्वास ठेवला असता. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी अगदी हळू करायचं ठरवलं. सर्वप्रथम त्या एका यंत्राच्या स्क्रीनवर लिहिलेलं सगळं वाचलं. आधी विमानकंपनी निवडायची होती, आणि दिलेल्या पर्यायांमध्ये मला ‘गो एअर’ सापडली. So far so good. मग त्याने माझी काही माहिती विचारली, त्यात पासपोर्टचा नंबरही विचारला होता. त्यावेळी माझा पासपोर्ट एका खास त्यासाठीच बनवून घेतलेल्या गळ्यातल्या कापडी पाऊचमध्ये सुरक्षित होता. पासपोर्ट ठेवून ते पाऊच शर्टाच्या आत घातलं तर वरून दिसत नाही याची घरी चाचणीही करून झाली होती. पासपोर्ट अंगावरच आणि सहज कळणार नाही अशा जागी राहावा म्हणून हा उद्योग केलेला होता, त्यामुळे चारचौघात तो त्या पाऊचमधून उपसायचा नाही असं बाबांनी निघताना सांगितलं होतं. त्यामुळे मी त्या स्क्रीनवर मागे जायचं बटण दाबून परत माझ्या खुर्चीपाशी आलो आणि शक्य तेवढ्या गुप्तपणे पासपोर्ट बाहेर काढला. हे असं सगळं करण्याची गरज अजिबात नव्हती, पण मला तेवढंच थ्रिल मिळालं म्हणून. मग पुन्हा त्या यंत्रापाशी जाऊन पासपोर्टचा नंबर त्याला दिला. त्यावरून त्याने लगेच मी फक्त बंगलोरला जात नसून पुढे देशाबाहेर चाललोय हे कळल्यावर ‘International check-in unavailable’ असं सांगितलं. यानंतर काऊंटरपाशीच बोर्डिंग पास घेण्यास पर्याय नव्हता, आणि माझ्या मनाच्या काहीशा भित्र्या भागाला तेच हवं होतं. म्हणून मी मघाशी एका ठिकाणी ‘गो एअर’चा फलक पाहिला होता तिथे गेलो. तिथे आत्तापर्यंत चार माणसं जमली होती. 
एकट्याने खाण्याप्रमाणेच कधीकधी वाटतो तो संकोच म्हणजे प्रश्न विचारण्याचा. सगळीकडे पाट्या आणि खुणांचा अगदी सुकाळ असेल तरी आपल्याला न कळलेली गोष्ट पूर्ण कळेपर्यंत दोनदोन-तीनतीन वेळा विचारायचीच असंही मला घरी सांगितलं होतं. आपल्या प्रतिमेची निष्कारण पर्वा करण्याचं सोडून दिलं की हेही बऱ्यापैकी सहज जमतं असं माझ्या लक्षात आलं. ‘गो एअर’च्या रांगेत मी उभा राहिलो तेव्हा माझ्या पुढच्या दोन प्रवाशांचा इंग्लिशमधून अशाच काही तांत्रिक गोष्टींवर संवाद सुरु होता. त्यांचं संभाषण संपल्यावर मी त्यांना उद्देशून ‘माफ करा, ही गो एअरच्या बंगलोरच्या फ्लाईटचीच रांग आहे ना?’ असं इंग्लिशमधून विचारलं. त्यावर त्या दोघी हसून हो म्हणाल्या. मलाही जरा हायसं वाटलं. आता त्या दोघीही त्याच विमानाने बंगलोरला चालल्या होत्या एवढं तरी मला कळलं होतं, त्यामुळे समजा ती रांग चुकीचीच निघाली असती तर त्यांच्या मागून जाऊनही माझं भागलं असतं. 
त्या दोघींपैकी एक एका मोठ्या बाबागाडीत तिच्या बाळाला घेऊन उभी होती. त्या रांगेचा त्या बाळाला फारच लवकर कंटाळा आला. त्याने निषेध व्यक्त करायला सुरुवात केल्यावर ती आई माझ्याकडे वळली. 
“प्लीज रांगेतली माझी जागा धरून ठेवता का? मी हिला जरा फिरवून आणते.” ती म्हणाली. मी अर्थातच हो म्हणालो आणि ती गेल्यावर माझी सूटकेस माझ्या पुढ्यात ठेवून उभा राहिलो. आतापर्यंत माझ्यामागेही रांग जमायला लागली होती असं माझ्या तेव्हा लक्षात आलं. तेवढ्यात चेक-इन सुरु झालं तर ती जागा सोडून मला माझं करून टाकावं लागलं तर काय, असा एक विचार कारण नसताना माझ्या डोक्यात येऊन गेला. सुदैवाने ती फार लांब जात नव्हती, आणि ‘गो एअर’चा कर्मचारी आल्यावर ती लगेच परत आली. 
या कर्मचाऱ्याने आम्हाला बॅग तपासण्याच्या एक्स रे यंत्रापाशी नीट उभं केलं आणि बोर्डिंग पासेस मागितले. मघाच्या दुसऱ्या बाईंकडे तो नव्हता, तेव्हा त्याने त्यांना त्या Kiosk मधून तो आणायला सांगितला. बोर्डिंग पास घेणं अपेक्षित आहे हे कळल्यावर माझ्या मागच्या रांगेतून बरेच लोक बाहेर पडत होते. मी त्या कर्मचाऱ्याला गाठलं. 
“मी पास घ्यायचा प्रयत्न केला तर International not available असं येत होतं-”
“अच्छा, तुम्ही सिंगापूरला चाललाय का? तुम्ही पुढे या,”
असं म्हणून त्याने माझी सूटकेस यंत्रात घातली आणि तपासून थेट काऊंटरपाशी जायला सांगितलं. काऊंटरवर मी माझं तिकीट दाखवलं आणि सूटकेस शेजारच्या सरकत्या पट्ट्यावर ठेवली. हे झाल्यावर ज्या महत्त्वाच्या प्रश्नाची मी रांगेत उभं राहिल्यापासून उजळणी करत होतो तो विचारला. 
“Is this a through check-in?”
याच्या उत्तरावर मला बंगलोरला विमानतळावर सगळीकडे माझी सूटकेस घेऊन फिरावं लागणार का ते ठरणार होतं. 
“नाही,” काऊंटरवरच्या मुलीने उत्तर दिलं. “या दोन फ्लाईट्सच्या मध्ये layover जास्त आहे ना, म्हणून तसं करता येणार नाही.”
“म्हणजे बंगलोरला मला ही सूटकेस घेऊन पुन्हा चेक-इन करावी लागेल?”
“होय,”
“आणि माझं एमिग्रेशनही बंगलोरलाच होईल?”
“होय,”
“आणि आत्ता मी इथून Domestic Security ला जायचंय?”
“होय,”
बाबांनी मला ९५% Through Check-In मिळेल अशी शक्यता वर्तवली होती, त्यामुळे या टप्प्यावर सगळं विचारून घेतलेलं बरं असं मला वाटलं. यातून मला हे कळलं की आत्ता या क्षणी मी फक्त बंगलोरला जाणारा प्रवासी होतो, आणि पुढचं सगळं बंगलोरला गेल्यावर घडणार होतं. एवढं लक्षात आल्यावर मी बोर्डिंग पास घेऊन रांगेतून बाहेर पडल्यावर पासपोर्ट माझ्या गुप्त जागी ठेवून दिला. इथे त्याची गरज पडणार नव्हती.
सुरक्षा तपासणी अगदी व्यवस्थित पार पडली. मी हातात फक्त बोर्डिंग पास आणि लागलं तर तिकीट असलेला कागदपत्रांचा गठ्ठा ठेवला होता; बाकी सगळं माझ्या बॅगेत होतं. ती एका ट्रेमध्ये ठेवून त्या यंत्रात घातल्यावर मीही मेटल डिटेक्टरमधून चालत पलीकडे उभ्या असलेल्या पोलिसासमोर आलो. त्याने तिकिटांची काही गरज नसल्याचं सांगितलं, त्यामुळे मला तिथून पुढे तीही बॅगेत ठेवून देता आली असती. विमानप्रवासाच्या प्रक्रियांबद्दल ही एक चांगली गोष्ट कळली होती. नाहीतर आत्तापर्यंत आलेल्या इतर सरकारी कामांच्या अनुभवात प्रत्येक टप्प्यावर सगळी कागदपत्रं प्रत्येकजण तपासतो असंच घडलं होतं. तेव्हा आधीची कागदपत्रं बरोबर नसतील तर मी इथपर्यंत आलोच कसा, हा साधा प्रश्न तिथल्या कोणालाही का सुचत नाही असा विचार माझ्यातल्या तर्कशास्त्राच्या विद्यार्थ्याला खूप छळायचा. अर्थात, त्या फालतू सरकारी formalities पेक्षा इथली सुरक्षा तपासणी कित्येक पटींनी जास्त महत्त्वाची असल्याचं मला माहित असल्यामुळे इथे सगळ्यांनी सगळं तपासलं असतं तरी माझा काही आक्षेप नसता. पण चेक-इन झाल्यानंतर बोर्डिंग पास पुरेसा होता असं मला तेव्हा कळलं. त्या पोलिसाने मला तपासल्यानंतर पासवर तपासणी झाल्याचे दोन शिक्के मारले आणि मी ‘क्लिअर’ झालो. 
गर्दीमुळे नाही म्हटलं तरी या सगळ्या तपासणीला पंधरावीस मिनिटं लागली होती. पलीकडच्या लॉबीत मी आणि मघाशी मी रांगेत ज्यांना प्रश्न विचारला होता त्या बाई एकदमच पाय टाकला तेव्हा आमची नजरानजर झाली आणि आम्ही दोघांनीही ‘हुश्श, झालं बुवा एकदाचं,’ अशा आशयाचं स्मितहास्य टाकलं. रांगेत असल्यापासून त्यांच्या सगळ्या हालचाली पाहून त्यांनी अनेकदा एकट्याने विमानप्रवास केलेला असेल असा मी तर्क केला होता. सराईत प्रवाशांबद्दल बाबांनी मला घरून निघताना एक इशारा दिला होता. ही सगळी प्रक्रिया त्यांच्या अगदी सवयीची झाल्यामुळे ते निर्धास्तपणे पाचएक मिनिटात सगळं उरकून घेतात, त्यामुळे आपण त्यांच्यासारखं करायचं नाही. थोडक्यात सर्कस सुरु व्हायच्या आधी जो ‘Do not try this’ असा इशारा देतात तशातलंच! त्यांनी माझ्याकडे पाहून हुश्श करणं ही माझ्या दृष्टीने मी आत्तापर्यंतचं सगळं अजिबात न अडखळता व्यवस्थित पूर्ण केल्याची पावतीच होती. मग मला माझा आत्मविश्वास जरा वाढल्याचं जाणवलं. मनात आलं, की ही ट्रिप यशस्वी करून दाखवायचीच, म्हणजे भविष्यात कधीतरी एक दिवस कुणीतरी नवशिका माणूस विमानतळावर माझ्याकडे पाहून स्वतःलाच ‘Do not try this’ असं बजावेल.
मुद्दा असा, की तपासणीनंतर मी खूपच चांगल्या मूडमध्ये होतो, आणि म्हणूनच मी माझ्या चार नंबरच्या गेटच्या समोरच्या लॉबीत गेल्यावर तिथल्या एका दुकानातून शंभर रुपयाचा चहा घेतला. मग तो चहा, जॉन ग्रिशमच्या ‘द कन्फेशन’ पुस्तकातलं पहिलं प्रकरण आणि झूम करून पलीकडच्या भिंतीवरच्या वाडेश्वरच्या जाहिरातीचे फोटो काढण्याचा प्रयत्न एवढ्यात तो राहिलेला अर्धापाऊण तास संपून गेला. गेट नंबर चारच्या समोर लोकांनी केलेल्या रांगेत मी उभा राहिलो. पलीकडे गेट नंबर तीनपाशी काहीतरी गोंधळ सुरु होता. एक माणूस उगीच आपल्याला इंग्लिश येतं आणि गरज पडली तर आपणही दम भरू शकतो असं दाखवण्याच्या प्रयत्नात कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होता. त्या कर्मचाऱ्यांनी काहीही उत्तर दिलं तरी त्याचं ‘पण तुम्ही नीट सांगायला नको?’ एवढंच चालू होतं. त्याच्या आविर्भावावरून असं वाटत होतं की जणू ती फ्लाईट चांगली तासभर उशिरा आलेली होती आणि प्रवाशांना असंच काही न सांगता ताटकळत ठेवण्यात आलेलं होतं, आणि माझ्या माहितीप्रमाणे तसं काहीही झालेलं नव्हतं. शेवटी त्या कर्मचाऱ्यांनी ‘सर, आम्ही आत्ताच आधीच्या फ्लाईटने इथे आलोय; तुमच्याबाबतीत काय झालं ते आम्हाला कसं माहित असणार?’ असं जरा त्रासिकपणे विचारल्यावर तो माणूस जरा शांत झाला. त्या प्रसंगापासून प्रेरणा घेऊन की काय, पण आमच्या कर्मचाऱ्यांनी ‘गेट नंबर चारवरून आत्ता इंडिगोच्या अमुक अमुक फ्लाईटला बोर्डिंग करावं लागतंय, तेव्हा गो एअरच्या प्रवाशांनी बसून घ्यावं.’ असा खुलासा केला. मी परत जाऊन बसलो. काही वेळाने त्यांनीच गो एअरची फ्लाईट गेट नंबर पाचवर बोर्डिंग सुरु करत असल्याचं सांगितलं आणि प्रवाशांची एक मोठी लाट गेट नंबर पाचकडे जाणाऱ्या जिन्याकडे निघाली. हा महत्त्वाचा बदल जाहीर होत असताना ती आई तिच्या बाळाला घेऊन वॉशरूमकडे गेली होती, त्यामुळे तिला हा बदल कळेल ना या चिंतेतच मी त्या लाटेत शिरलो. गेट नंबर पाचपाशी गर्दीत उभं असताना मागून जिन्यावरून ती येताना दिसली तेव्हा जरा हायसं वाटलं. 
गो एअरचे कर्मचारी आधी एकवीस ते एकतीस या रांगांमधल्या प्रवाशांना आधी सोडत होते, जेणेकरून विमानातल्या मागच्या रांगा भरल्यावरच मग पुढच्या रांगेतल्या लोकांनी आत जावं. मी पंधराव्या रांगेत असल्यामुळे माझी पाळी यायला जरा वेळ लागला. त्यानंतर मग विमानाच्या गालाला जाऊन चिकटणारा पूल ओलांडला, आणि त्याच्या शेवटी एका कर्मचाऱ्याने बोर्डिंग पासचा एक तुकडा फाडून घेतला तेव्हा सगळी प्रक्रिया अखेर पूर्ण झाल्यासारखं वाटलं. दुपारचे पावणेदोन वाजले होते. विमानात शिरताना त्याची घरघर ऐकून अंगावर काटा उभा राहिला, तो विमानाचं दार लावून घेऊन ते धावपट्टीकडे जायला लागेपर्यंत उतरला नाही. 
धावपट्टीवर येऊन विमानाने योग्य दिशेला तोंड केलं आणि पळायच्या आधी क्षणभर थांबलं. मी आत्तापर्यंत अनेक वेळा विमानात बसलोय पण माझ्या लेखी त्या सगळ्या उपद्व्यापातला हा एक क्षण कायमच सगळ्यात रोमांचक असतो. कुठल्याही क्षणी विमान वेगाने पुढे जायला लागेल हे माहित असून ते घडायची वाट बघतानाचा. तो क्षण संपायच्या आत मी हळूच पुन्हा तोच उद्गार काढला, ज्याला आता अचानक भौतिकदृष्ट्या खूप अर्थ प्राप्त झाला होता. 
“No turning back now.”
विमानाने धावायला सुरुवात केली.                           
                                                                                                        Let us reach Bangalore together on SG3

Comments

  1. आदित्य,मांडणी,शब्दसामर्थ्य आणि सहजता
    या सर्वांबद्दल,हाsssर्दिक अभिनंदन!!!

    ReplyDelete
  2. आदित्य,
    लेखन एकदम खुसखुशीत केलं आहेस. मजा येते आहे वाचताना. घटना डोळ्यासमोर उभ्या रहात आहेत.

    वैशाली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प