जीवाचं सिंगापूर: चांगीपर्व


फोनची काळजी सोडता, माझा सिंगापूरमधला पहिला ब्रेकफास्ट खूपच चांगला झाला होता. काट्यावर उरलेलं स्क्रॅम्बल्ड एग ब्रेडच्या शेवटच्या तुकड्यासोबत घशाखाली जाईपर्यंत चांगले साडेसात वाजले होते. आत्तापर्यंत तरी E-Gadget उघडलं असेल अशा आशेने मी तिथून उठलो आणि पलीकडच्या दुकानांकडे चालत गेलो, पण त्या सकाळी नेमका कुणालातरी खूपच आळस आलेला दिसत होता. आजूबाजूच्या दुकानांमध्ये डिस्प्ले लावले जात असताना या दुकानासमोरचं शटर तसंच ढिम्म होतं. मी परत मघाच्याच टेलिकॉमवाल्याकडे गेलो. “माफ करा, त्यांनी आत्तापर्यंत उघडायला हवं होतं.” तो काहीसा खजील होऊन म्हणाला. 
“टर्मिनस २ वर पण E-Gadget चं दुकान असेल का?” मी विचारलं. 
“हो, माझ्या मते अगदीच असेल.” 
चांगी विमानतळ एक अजस्त्र प्रकार आहे. त्याच्या चार टर्मिनसपैकी फक्त टर्मिनस २ पाशीच मेट्रोचं स्टेशन आहे, त्यामुळे मला सिंगापूर गावात जायला इथून टर्मिनस २ ला जाणं भाग होतं. याशिवाय, चांगी विमानतळाचं खास आकर्षण, म्हणजेच ‘ज्युएल’ (Jewel) तिथूनच अगदी पायी चालत जाण्याच्या अंतरावर होता. त्यामुळे माझ्या यादीनुसार टर्मिनस ४ वर सगळी खरेदी करून झाली की बसने टर्मिनस २ ला जायचं असं होतं, पण त्या कार्यक्रमात आता काही बदल होणार होते. एकतर फोनच्या पेचामुळे घोळ होऊन बसलेला होता, आणि दुसरं म्हणजे ज्या ‘चांगी रेकमेंड्स’ नावाच्या दुकानातून मला पूर्वीच काढून ठेवलेली तिकिटं ताब्यात घ्यायची होती ते दुकान मला टर्मिनस ४ वर कुठेच सापडलं नव्हतं. तिथल्या ‘चौकशी’ कक्षातल्या कोणीच त्या दुकानाबद्दल ऐकलंही नव्हतं हे मला खूपच विचित्र वाटलं, पण कदाचित तो प्रकार फक्त टर्मिनस २ वरच असेल. तसंही चांगी विमानतळ म्हणजे एक जरासं मोठं खेडंच होतं, आणि अशात सगळ्यांना सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी थोडीच माहित असतात?
मी सरळ टर्मिनस ४ च्या मुख्य लॉबीत येऊन टर्मिनस २ ला जाणारी शटल बस येते त्या दारापाशी जाऊन एका खुर्चीत बसलो. वायफायचा थोडाच वेळ शिल्लक राहिलाय याची जाणीव होताच मी घरी एक व्हॉट्सॲप कॉल करून परिस्थितीची त्यांना कल्पना द्यायचं ठरवलं. त्या कार्डाचा प्रश्न सुटला नसता तर मला पुन्हा कुठे वायफाय मिळालं असतं कोण जाणे. म्हणून मी घरी कॉल केला आणि बाबांना सगळं सांगितलं, तेव्हा त्यांनी मला सिंगटेलचं कार्ड दुसऱ्या फोनमध्ये घालायला सांगितलं. एकदा नेटपॅक मिळाला आणि संपर्क लागला की पुढचं सगळं सुरळीत होऊ शकत होतं. “ते जास्त महत्त्वाचं आहे,” बाबांनी सांगितलं. “या फोनमध्ये अडकलेल्या पिनचं एवढं काही नाही. त्या दुकानात त्यांना काही करता आलं तर बघ, पण फोन त्यांच्याकडे ठेवायला सांगितला किंवा खूप पैसे सांगितले तर काही करू नकोस. त्या पिनचं काय करायचं ते आपण तू परत आल्यावर बघू. आत्ता जर फोन व्यवस्थित चालू असेल, तर त्या पिनकडे दुर्लक्ष कर.”
एवढ्यात बस येणार असल्याचं समोरच्या एका टीव्हीवर दिसलं (त्या टीव्हीवर अगदी आधीची बस गेल्यापासून पुढची यायला किती मिनिटं लागतील ते सांगत होते) म्हणून मी फोन ठेवला आणि सामान गोळा करून इतरांबरोबर दारापाशी जाऊन थांबलो. अचानक मला खूप बरं वाटायला लागलं होतं. आपली समस्या घरी आईबाबांना माहित आहे आणि ते तिच्यावर चांगले उपाय सुचवतायत ही मला तेव्हा खऱ्या अर्थाने शांत करणारी गोष्ट होती. पण आता यातून मार्ग काढायचा म्हणजे स्वतःकडची एकमेव पिन वापरून दुसऱ्या फोनचा सिम कार्ड स्लॉट काढावा लागणार होता, आणि तिथेच तर मघाशी सगळं बिनसलं होतं ही आठवण सुखाने बसू देत नव्हती. पण त्याला आता पर्यायच नव्हता. ‘समजा सिंगापूरमध्ये कुठेच वायफायशी कनेक्ट नाही होता आलं तर?’ असा विचार करून मी स्वतःला हा प्रयत्न केलाच पाहिजे असं बजावलं. तेवढ्यात बस आली.
काचेची सरकती दारं आपोआप उघडली गेली आणि मी एकदम इमारतीबाहेर पडलो तेव्हा फोनचीच काय, पण जणू सगळ्याच चिंता-काळज्या त्या गार वाऱ्याच्या झुळुकेने दूर पळवून लावल्या. त्या क्षणी मला प्रकर्षाने जाणवलं, की मी सिंगापूरला पोचलो होतो! महिन्याभरापूर्वी जी गोष्ट जेवणाच्या वेळेच्या गप्पांमधून सुरु झाली ती आता प्रत्यक्षात आली होती. दुबईत पाऊल ठेवल्यावर पहिल्यांदा बुर्ज खलिफा दिसला होता तेव्हा मी वास्तव हे कल्पनेप्रमाणेच असू शकतं या अत्यंत सुखावह भावनेचा आस्वाद घेतला होता, तोच त्या क्षणी मला पुन्हा घेता आला. बाबांबरोबर बेत आखत असताना त्यांनी यूट्यूबवर दाखवलेल्या एका व्हिडिओची आठवण झाली. त्यात एका माणसाने असाच टर्मिनस ४ ते टर्मिनस २ हा प्रवास रेकॉर्ड केला होता, आणि आता मी त्यात पाहिलेलं सगळं तंतोतंत स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो. It was all real; एक खरी बस मला खऱ्या टर्मिनस २ ला नेण्यासाठी तिचं खरं दार उघडून मी चढण्याची वाट पाहत खरंच वैतागलेली होती. मी पटकन आत चढलो आणि एका खिडकीशेजारच्या सीटवर बसलो. फोनचा कॅमेरा चालू करून तो काचेवर चिकटवून धरला आणि बाहेरचं बघण्यात गुंग झालो. 
टर्मिनस ४ च्या विरुद्ध बाजूला कसलीशी इमारत होती. उंचीने लहानच होती, पण टर्मिनसइतकीच आडवी पसरलेली होती. तिच्याकडे माझं वेधलं गेलं ते तिच्या असंख्य खिडक्यांमुळे. सगळ्या खिडक्यांच्या समोर एक लहानसा पुढे आलेला कट्टा होता आणि त्यावर मातीने भरलेल्या मोठ्यामोठ्या साच्यांमध्ये खूप फुलझाडं लावलेली होती. यामुळे त्या इमारतीची एक सबंध बाजू सर्वार्थाने ‘ग्रीन’ दिसत होती, आणि नंतर तिला वळसा घातल्यावर तिच्या इतर बाजूही तशाच असल्याचं दिसलं. माझ्या मते, खूप उंच नसूनही माझ्या मनात घर करणारी ही पहिलीच इमारत असावी. नुसतं तिच्याकडेच पाहत राहावंसं वाटत होतं; जणू तिच्यावरच्या हजारो झाडांचा गारवा माझ्यापर्यंत इथेही पोहोचत होता. नंतर मी सिंगापूर हे आशिया खंडातील सर्वात ‘ग्रीन’ शहर आहे हे वाचलं, पण त्या पहिल्या दृश्यापासूनच ते काही देखाव्यासाठी नव्हतं हे मला कळून चुकलं होतं. डोळ्यांना सुखावणारा आणि मनात आशा पल्लवित करणारा तो हिरवा रंग सिंगापूरमध्ये पोस्टकार्डवर चिकटवल्यासारखा वाटत नव्हता, तर त्या शहराच्या नसानसांतून खेळता होता, हे मला पुढचे काही दिवस प्रकर्षाने जाणवत राहणार होतं. 
एका जवळपास शून्य ट्रॅफिक असलेल्या, खड्डे सोडाच पण अगदी लहानसा खडबडीत उंचवटाही नसलेल्या रस्त्यावरून बिनधास्त साठच्या स्पीडने जाऊनही आम्हाला टर्मिनस २ ला पोहोचायला पंधरा मिनिटं लागली, यावरून चांगी विमानतळाचा अफाट विस्तार लक्षात यावा. या मधल्या रस्त्यावर दुतर्फा दाट झाडी होतीच. शिवाय एकमेकांच्या वरूनखालून पसरलेले पूल आणि बोगदेही त्या रस्त्यावर पुष्कळ होते. पण या मधल्या भागात लॅंडमार्क असा कुठलाच नव्हता, त्यामुळे अजून किती अंतर कापायचे होते ते कळायला मार्ग नव्हता. झाडांच्या एका समूहाला ओलांडल्यावर अचानक आमच्या उजवीकडे एक महाकाय इमारत अवतरली, जिच्या कडेकडेने चांगली दोनतीन मिनिटे त्याच वेगाने गेल्यानंतरही तिचं टोक दिसत नव्हतं. टर्मिनस २.




टर्मिनसच्या इमारतींना लागून असलेले रस्ते हे दुमजली असतात हे ज्ञान मला तिथे नव्याने प्राप्त झालं. बशीतून उतरून मी इमारतीच्या आत गेलो तेव्हा मी दुसऱ्या मजल्यावर होतो. टर्मिनस ४ वरही दुसऱ्या मजल्यावर बसून ब्रेकफास्ट करत असताना बाहेर टॅक्सी जाताना दिसत होत्याच. तेव्हा तसाच प्रकार इथेही असेल असा मी तर्क केला. अर्थात, टर्मिनस २ ला पोहोचल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट आधी करून टाकणं भाग होतं, त्यामुळे मी सरळ त्या सबंध लॉबीला पिंजून काढून एक E-Gadget शोधून काढलं. हे सुदैवाने उघडं होतं, पण तिथल्या कर्मचाऱ्याशी बातचीत केल्यावर तो खूपच निरुत्साही वाटला. माझ्या आधीच्या मदतनीसांनी या बुवांकडे ‘टूल्स’ असतील असं आश्वासन दिलं होतं, पण हा आता ते काढणं तर सोडाच, माझा फोन हाताळायलाही तयार नव्हता. माझ्या अचानक लक्षात आलं की मलाही फारशी फिकीर उरली नव्हती. या ‘टूल्स’चा पहिल्यांदा उल्लेख झाला तेव्हा मी त्या गोष्टीवर जादूसारखा विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीत होतो, पण आता परिस्थिती पुष्कळ बदललेली होती. घरी माझी समस्या माहित होती आणि माझ्या हातात एक खूपच चांगला पर्यायी उपाय होता. त्यामुळे मीही तेव्हा उगीच त्याच्याकडून आपल्या फोनला चुकून नको ते काहीतरी होण्यापेक्षा आपणच ते सिमकार्ड दुसऱ्या फोनमध्ये टाकूया असा विचार केला. सिमकार्ड माझ्याकडे होतंच की अगदी सुरक्षित, आणि पिन अडकलेली असूनही माझा फोन अगदी दृष्ट काढावी इतका छान चालत होता. आता मला माझी भयानक अडचण खूपच क्षुल्लक वाटायला लागली होती. 
मी बाहेर येऊन चारपाच रिकाम्या खुर्च्यांवर आपलं बस्तान बसवलं आणि काळजीपूर्वक दुसऱ्या फोनचा स्लॉट माझी पिन वापरून काढायला सुरुवात केली. तो निघाला. त्यात मी सिंगापूरचं सिमकार्ड घातलं आणि तो स्लॉट परत आत सरकवून फोन चालू केला. तो चालू झाल्यावर त्याने ते कार्ड recognize केल्याचं पाहिलं आणि माझा जीव भांड्यात पडला. कार्ड आता सक्रिय होतं आणि डेटा चालू केल्यावर मला हवं ते सगळं मिळणार होतं. मी मग त्या अवाढव्य लॉबीत पुन्हा ते टेलीकॉमचं दुकान शोधून काढलं आणि त्या माणसाला डेटा चालू करून देण्याची विनंती केली. त्यानंतर थोड्याच वेळात मी एका खुर्चीत बसून माझ्या दुसऱ्या फोनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात छोट्या अक्षरात 4G दिसत असल्याची खुशखबर माझ्या पहिल्या फोनवरून आईबाबांना सांगत होतो. 
सिंगापूर प्रवासातली माझ्या वाट्याला आलेली पहिली समस्या कुठल्या भन्नाट जादुई उपायामुळे नाही, तर ती समस्या नसल्याचं मी मनाशी ठरवून टाकल्यावरच सुटली होती. 
पण कामं संपली नव्हती. या अनपेक्षित ‘ट्विस्ट’ मुळे आमच्या कामांच्या यादीत आता एक महत्त्वाचं काम येऊन बसलं होतं, ते म्हणजे दुसऱ्या फोनमध्ये व्हॉट्सॲप घालणं. ते घालणं, परत माझ्या सिंगापूरच्या नंबरचं अकाऊंट उघडणं वगैरे भानगडी टाळायला आम्ही आधी गूगल हँगआऊट्स वापरून पाहायचा प्रयत्न केला, पण ते चाललं नाही. त्यामुळे मी त्या भानगडी शेवटी केल्याच, आणि माझा सिंगापूरचा नंबर असलेलं व्हॉट्सॲपवरचं दुसरं अकाऊंट निघालं. तो फक्त आईबाबांकडेच होता, आणि माझ्या इतर कोणत्याही जवळच्या व्यक्तींना एकदम भलत्याच ८ आकडी नंबरवरून मेसेज पाठवून ‘मी तुमचा आदित्य’ असं दचकवावं असं मला वाटलं नाही. तेव्हा वायफाय मिळेल तेव्हाच त्यांच्याशी संपर्क ठेवायचा हा निष्कर्ष निघाला आणि मी वेळ बघितली. नऊ. 
मला अचानक मोठ्याने हसावंसं वाटायला लागलं. बेत आखताना हॉटेलला जायला निघण्याची वेळ आम्ही नऊच ठरवली होती, जेणेकरून मी दहा वाजता पोचेन आणि मला ते लवकरचं चेक-इन मिळण्याची शक्यता वाढेल. तेव्हा उतरल्यापासून ४ ते ९ काय करायचं यावरच आमचं सगळं बोलणं झालं होतं, आणि इथे घडलेल्या या एका लहानशा गमतीमुळे तो प्रश्नच निकालात निघाला होता. नऊ वाजले होते आणि तरी माझी काही कामं राहिली होती, शिवाय ज्युएलला भेट द्यायची तर होतीच. त्यामुळे मी अगदी आनंदाने ते ‘चांगी रेकमेंड्स’चं दुकान हुडकायला निघालो. 
बाबांनी आणि मी सगळे बेत आखतानाच ‘सिंगापूर झू’चं तिकीट काढून ठेवलं होतं, आणि शिवाय ‘युनिव्हर्सल स्टुडिओज’ आणि ‘गार्डन्स बाय द बे’ या दोन ठिकाणांचं एक एकत्रित पॅकेजही घेऊन ठेवलं होतं. त्याच्या पावत्या या दुकानात दाखवून मला ती तिकिटं ताब्यात घ्यायची होती. या तिकिटांवर एक ठराविक तारीख किंवा वेळ नसून एका विशिष्ट काळाची व्हॅलिडिटी होती, म्हणून मला आम्ही तेव्हा आखलेला बेत बदलून काही ठिकाणं मागेपुढे करणं शक्य होतं. या व्यवस्थेचा मला अपेक्षेपेक्षा लवकरच फायदा होणार होता. त्या दुकानातल्या मुलीला मी माझ्या कागदपत्रांच्या गठ्ठयातल्या पावत्या दाखवल्या तेव्हा ते सगळं नीट होईल अशी मी मनातून प्रार्थना करत होतो, पण समजा नसतं झालं तर काय यावरचं उत्तर माझ्याकडे तयार होतं. हे सगळं खरेदी करताना आम्ही पैसे भरले होते आणि त्या ट्रान्सफरच्या पावत्याही आमच्याकडे होत्या, त्यामुळे ही तिकिटं मिळाली नाहीत तर बाबा ते भरलेले पैसे सहज रिफन्ड करून घेऊ शकले असते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीच्या त्या पैलूवर तेव्हा विचार करून मी काहीच करू शकणार नव्हतो, म्हणून माझ्यासमोरचा पर्याय म्हणजे सरळ त्या त्या ठिकाणी पुन्हा तिकीट काढून जाणे. तेवढ्याशा कारणासाठी काही ठिकाणं चुकवणं मूर्खपणाच ठरला असता. मघाच्या प्रसंगातून मी एक महत्त्वाचा धडा घेतला होता, तो म्हणजे आत्ता समोर आलेला प्रश्न सोडवायचा, एकेक टप्पा ओलांडत राहायचा आणि जे मुळात आपल्या हातात नाहीच आहे त्याची अजिबात चिंता करायची नाही.
एवढं होईपर्यंत त्या मुलीने हे अगदी रोजचंच असल्याच्या थाटात एका स्टेप्लरच्या दुसऱ्या टोकाने मी त्या गठ्ठयाला मारलेली पिन बाहेर काढून, त्या पावत्या वेगळ्या करून उरलेल्या गठ्ठयाला दुसरी पिन मारूनही टाकली होती. त्या पावत्या तिने वाचल्या, आणि ‘युनिव्हर्सल स्टुडिओज’ आणि ‘गार्डन्स बाय द बे’ या दोन ठिकाणांची दोन वेगळी तिकिटं माझ्या हातात दिली. मग तिने ‘सिंगापूर झू’ची पावती मला परत देऊन टाकली. 
“झूचं तिकीट तुम्हाला तिथेच मिळू शकेल. हीच पावती तिथे दाखवा,” तिने सांगितलं. मी तिला थँक्स म्हणून माझ्याकडची दोन तिकिटं घेऊन पुन्हा मुख्य लॉबीत आलो. शेवटची घेण्याची वस्तू म्हणजे मेट्रोचा तीन दिवसांचा पास, जो मी निघताना स्टेशनवरच काढणार होतो. त्यामुळे त्याक्षणी सगळी कामं संपली होती. आता खऱ्या अर्थाने ट्रिप सुरु करायची वेळ झाली होती. माझी नजर त्या अजस्त्र लॉबीत सगळीकडे फिरून अगदी पलीकडच्या टोकाला असलेल्या एका सरकत्या जिन्याच्या वर छतावर लटकवलेल्या पाटीवर स्थिरावली. सगळी अक्षरं निऑनमध्ये चमकत असल्यामुळे मला एवढ्या अंतरावरूनही ती सहज वाचता आली: ‘Skywalk to Jewel’.



दुबईला जाऊन आल्यापासून हा ‘स्कायवॉक’ प्रकार मला विशेष आवडायला लागलेला आहे. खालचे रस्तेबिस्ते ओलांडत बसण्यापेक्षा सरळ आकाशातून चालत आपल्या इष्ट स्थळाच्या दुसऱ्यातिसऱ्या मजल्यावर पोचायचं! दुबईला खूप ठिकाणी आजूबाजूच्या इमारतींमधून असे स्कायवॉक काढून ते मेट्रो स्टेशनना जोडले आहेत. हे आकाशातले रस्ते पूर्णपणे पारदर्शक करण्याचा विचार ज्याला सुचला त्याला तर लक्ष प्रणाम! मेट्रो स्टेशनपर्यंत चालत जाताना खाली एखाद्या नदीसारखा वाहणारा दुबईचा बारापदरी शेख झायेद रोड पाहताना जाम मजा आली होती. पण त्यावर अगदी सहज कडी करेल असा हा चांगी विमानतळाचा ‘टर्मिनस २ ते ज्युएल’ चा स्कायवॉक होता. आधी त्या सरकत्या जिन्यावरून वर गेल्यावर एका भिंतीवर नुसताच ज्युएलचा भलामोठा लोगो दिसला आणि त्याच्या मागे एक अंधारा बोळ. त्या चारही बाजूंनी बंदिस्त बोळातून चालत जाताना सिंगापूरने या बाबतीत भलतीच अरसिकता तर दाखवली नाही ना असा विचार एकदोनदा मनात येऊन गेला. पण त्या लांबलचक बोळाच्या शेवटी खरा स्कायवॉक माझी वाट पाहत होता. 
काटकोनांमध्ये वळणारा, स्वच्छ पारदर्शक काचेच्या भिंती असलेला हा आकाशातला पूल चांगी विमानतळाच्या एका मोठ्या भागाचं दर्शन देऊन जातो. त्यातून जाताना मला मागे असलेली टर्मिनस २ ची इमारत दिसली, जी एवढ्या अंतरावरून खूपच मोठी दिसत होती. तिच्या एका बाजूला एक तिमजली पार्किंग चिकटलेलं होतं. त्या पार्किंगमधून फुटणाऱ्या वेगवेगळ्या पुलांवरून लहानमोठ्या गाड्या सुळकन इकडेतिकडे जात होत्या. त्यापैकी एक पूल रिकामाच वाटत होता, आणि लगेच कारणही कळलं. चांगी विमानतळाची स्वतःची खास ट्रेन सेवा टर्मिनस १ आणि ३ यांना जोडते, तीच आता त्या पुलावरून येत होती. मग मी डावीकडे नजर वळवली. समोर एक उंच कंट्रोल टॉवर आणि त्याच्या पायथ्याशी रस्त्यांचं एक जाळं दिसतं होतं. त्या रस्त्यांच्या पलीकडे एका मोठ्या हॉटेलची इमारत दिसत होती. तेवढ्यात पुन्हा वळल्यावर एक ट्रेन शेजारून जाताना दिसली तेव्हा मी डोळ्यांनी तिचा पाठलाग केला, आणि ती कुठे जात होती ते पाहून आ वासला. 
ती एका प्रचंड काचेच्या अंड्यासारख्या दिसणाऱ्या इमारतीच्या आत जात होती. या इमारतीच्या बाहेरचा भाग एकत्र बसवलेल्या असंख्य त्रिकोणी काचांचा बनलेला होता. ती तेव्हा लांब असल्यामुळे त्या काचांच्या आतलं अगदीच धूसर दिसत होतं, पण तरी त्यांच्या मागे भरपूर हिरवळ असल्याचं लक्षात येत होतं. महिन्याभरापूर्वी चांगी विमानतळाच्या वेबसाईटवर याचे फोटो पाहिले असल्यामुळे मनात शंकेला तशी जागा उरली नव्हतीच, पण तरीही या स्कायवॉकमध्ये शेवटचं वळण घेतल्यावर तोही त्याच इमारतीच्या आतमध्ये उघडत होता हे पाहून मनाने उसळी खाल्लीच. 
ज्युएल.                                           
                  

Live the Jewel magic with me on SG6

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प