जीवाचं सिंगापूर: मरिनापर्व १


दुपारच्या दोन वाजता मला अचानक जाग आली. 
अर्थात, दुपारचे दोन वाजलेत हे कळायला मला फोन पाहावा लागला, कारण पॉडमध्ये या कशाचीच कल्पना येणं अजिबात शक्य नव्हतं. तेवढ्यापुरता मी एका पूर्णपणे वेगळ्याच बंद चौकटीत होतो, जिच्यात ते तीन दिवे सोडले तर प्रकाशाचा एकही स्रोत नव्हता आणि आजूबाजूच्या कशाचाही जाणवण्याएवढा आवाज नव्हता. त्या क्षणीच्या माझ्या दुर्मिळ एकांतावर मी फारतर पाचएक मिनिटं विचार करत बसलो असेन, कारण त्यानंतर पोटातल्या कावळ्यांनी मला धाडकन भौतिक जगात परत आणलं. या सगळ्या गडबडीत मी सकाळच्या त्या ब्रेकफास्टनंतर काहीच खाल्लेलं नाहीये हे माझ्या तेव्हा अचानक लक्षात आलं. दुपारच्या जेवणाची सोय करायची वेळ आली होती, आणि त्यासाठी मला बाहेर पडावं लागेल हे कळत होतं. हे लक्षात आल्यावर मी जरा काळजीत पडलो. बाहेर तर सोडाच, पण पुण्यातल्या पुण्यातही स्वतःच एखादं हॉटेल शोधून तिथे जाऊन एकट्यानेच जेवायचं याचा मला अगदीच शून्य अनुभव होता. मी मनाची तयारी करून फोनवर मी झोपेत असताना आलेले मेसेजेस पाहायला लागलो, तेव्हा बाबांनी माझ्यासाठी एक अगदीच जवळचा फूडकोर्ट शोधून काढल्याचं मला कळलं आणि मला फार बरं वाटलं. त्यामुळे मी जरा उत्साहानेच आंघोळीला जायला निघालो. खालच्या लॉकरमधून सूटकेस उपसून पॉडमध्येच तिच्यातून बाहेर जाण्याचे कपडे काढले आणि तिला कुलूप लावून परत ठेवून दिलं. पॉडच्या कार्डाचं काय करायचं हा प्रश्न होताच, म्हणून मी त्याला एका छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून तो माझ्या नंतर घालायच्या पँटच्या खिशात ठेवून दिला. ते कपडे शॉवरच्या आतल्या हूकला लावून त्यांच्या वरून हॉटेलने दिलेला गुबगुबीत पांढरा टॉवेल अडकवल्यावर मी अखेर नळ चालू केला. पाचएक मिनिटांनी मी बाहेर पडलो तेव्हा ‘फ्रेश होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ मला पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने कळला होता; तेवढ्या पाच मिनिटांत आधीचे चोवीस तास पुसले गेले होते आणि मी अगदी नव्या उत्साहाने हॉटेलमधून बाहेर पडत होतो. 
हॉटेल ज्या ‘रेसकोर्स रोड’ नावाच्या गल्लीत आहे त्याच्या शेजारीच त्याहून मोठा असा ‘सेरांगून रोड’ आहे. हॉटेलच्या रांगेतल्या इमारती संपल्या की एका छोट्या बोळातून जाऊन त्या रस्त्याला लागता येत होतं. मग तिथून अगदीच थोड्या अंतरावर ‘सिटी स्क्वेअर मॉल’ लागतो, आणि त्याच्या चौथ्या मजल्यावर बाबांना तो चांगला फूड कोर्ट सापडला होता. मॉल तुलनेने पुष्कळ मोठा आहे, त्यामुळे त्याच्या आत पाऊल ठेवल्यापासून एकाही दुकानाकडे ढुंकूनही न बघता सरळ चार एस्कलेटर्स चढून जाणाऱ्या मला पाहून तिथल्या मॉल-संस्कृतीला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. मला भूक लागली होती, आणि दुबईनंतर अशा मॉलमध्ये मला काहीतरी स्वारस्य उरलेलं असलं असतं तरी हा मॉल मी केव्हाही उठून पाहू शकलो असतो. आम्ही आखलेल्या आजच्या दिवसाच्या बेतामध्ये चांगी विमानतळाने अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतल्याने मला पुढची योजना पाळायची असेल तर लवकर उरकणं भाग होतं. त्या बेतानुसार मी जेवण झाल्यावर मॉलच्याच खाली असलेल्या फेरर पार्क स्टेशनमधून मेट्रो घेऊन ‘गार्डन्स बाय द बे’ला जायचं होतं, आणि त्याला किमान तीन-साडेतीन तासांएवढा न्याय देऊन खूप रात्र व्हायच्या आत परतही यायचं होतं. तेव्हा फूडकोर्ट सापडल्यावर मी सरळ काहीतरी खाण्यायोग्य हुडकायला लागलो. 



फूडकोर्ट म्हणजे एका मोठ्या आवाराच्या दोन्ही बाजूंना लहानलहान गाळे आणि मध्यभागी बसण्याची मोठी कॉमन एरिया. प्रत्येक गाळ्यात एका विशिष्ट प्रकारची cuisine किंवा खाद्यप्रकार आढळतो. सगळं सेल्फ-सर्व्हिस; पैसे भरून ट्रे घेऊन मग टेबल शोधायचं. या फूडकोर्ट संस्कृतीचं तत्त्व म्हणजे फास्ट, पण तितकंच पौष्टिक आणि चवदार असं स्वस्त जेवण. त्यामुळेच कुठले पदार्थ ते त्या त्या cuisine नुसार ठरत असलं तरी प्रामुख्याने भात, नूडल्स, सूप आणि करी असे प्रकार आढळतात. दुबईत आम्ही पाहिलेल्या सगळ्या फूडकोर्ट्समध्ये जगभरातल्या सगळ्या प्रसिद्ध cuisines असायच्याच, पण इथे तसा प्रकार मला दिसला नाही. आता हे याच फूडकोर्टचं होतं का एकूणच सिंगापूरच्या फूडकोर्ट्सचं ते माहित नाही, पण इथे आशियाई cuisines ची सद्दी होती. हाँग काँगचा धरला तर चिनी cuisine चे तीन गाळे होते, तसेच जपानीचेही दोन होते. जपानी खाद्यसंस्कृतीमध्ये मध्ये नक्की काय येतं त्याकडे आपण कधीच नीट लक्ष न दिल्याचं मला जाणवलं. एकतर सगळीकडे नॉनव्हेजचं राज्य, त्यामुळे अगदी कुठल्यातरी वेगळ्याच cuisine चं सूप मागवलं तरी त्यात काहीतरी गंमत सापडण्याची शक्यता होतीच. स्वतःला ‘सर्वभक्षी’ म्हणत असलो तरी माझी मजल साध्या मटण बिर्याणीपलीकडे कधी गेली नव्हती, आणि बाबांनीही कसलाही ‘प्रयोग’ करून पाहायचा नाही असं बजावलं होतंच. त्यामुळे हाँग काँग, जपान, फिलिपिन्स, इंडोनेशिया, असा सगळा प्रवास मी मेनूकडे नुसती नजर टाकत पुढे जाऊन केला. याच मॉलच्या तळघरात एक मॅक्डोनाल्ड्स असल्याचं मला माहित होतं म्हणून मी फार काळजीत नव्हतो, पण आपल्या भारतीय जेवणानंतरची माझी सगळ्यात आवडती cuisine इथे नक्की असेल असं स्वतःला बजावत मी नेटाने शोध घेत राहिलो, आणि थोड्याच वेळात मला ‘थाई’ लिहिलेला गाळा सापडला. आमच्या घरी खूप वर्षांपासून थाई खाद्यसंस्कृतीला एक मानाचं स्थान आहे. त्या गाळ्याच्या समोर ठेवलेला मेनू वाचून मला जवळपास सगळे पदार्थ ओळखू आले तेव्हा मला कोण आनंद झाला! आता या मॉलमध्ये आलो की इथेच जेवायचं असं मी ठरवून टाकलं. 
मला भूक लागली होतीच, पण मला आत्ता लगेच नॉनव्हेज नको होतं. त्या मेनूवर मला मी तोपर्यंत ज्याचं फक्त नावच ऐकलेलं होतं असा एक व्हेज पदार्थ सापडला आणि मी तो घ्यायचं ठरवलं. तिथे पदार्थांच्या आणि साईड डिशेसच्या स्वतंत्र किमती तर होत्याच, पण काही ‘Combo’ पण होते. मी सरळ साईड डिशेसपैकी ‘थाई आईस टी’ उचलला आणि त्यासोबत माझा आधीच ठरलेला ‘मँगो स्टिकी राईस’ घेतला. सगळं मिळून हे पूर्ण जेवण मला आठ डॉलर्सना पडलं, आणि यापेक्षा माझा विमानतळावरचा ब्रेकफास्ट दीड डॉलरने महाग होता. त्या आनंदात मी जवळचंच एक टेबल पकडलं आणि सुरुवात केली. स्टिकी राईस ही एक थाई खासियत, आणि त्याचं शब्दशः वर्णन करायचं तर गोड भाताचा केक असंच करावं लागेल. तो आपल्या साखरभाताइतका गोड नसतो; किंबहुना त्याला स्वतःची अशी चव फारच कमी असते. म्हणून माझ्या पुढ्यात असलेल्या केकवर सढळ हाताने कोकोनट मिल्क ओतलं होतं, आणि शिवाय शेजारी मस्तपैकी केशरी असा अर्धा आंबा होताच. त्या आंब्याची एक फोड, ते कोकोनट मिल्क आणि केकचा एक तुकडा असं सगळं एका घासत घेतल्यावर ज्या कोणी या कॉम्बिनेशनचा विचार केला असेल त्याला मी मनातच नमस्कार केला. थाई आईस टी हा प्रकारही आपल्याकडच्या आईस टी सारखा नसून खऱ्याखुऱ्या मसाला चहासारख्या चहाचंच थंडगार रूप होतं, आणि तेही झकास लागत होतं. थोडक्यात दहापंधरा मिनिटांनी मी मॉलच्या बाहेर पडलो तेव्हा अगदी तृप्त होऊन आणि या फूडकोर्टशी संबंध कायम ठेवायच्या निश्चयासह बाहेर पडत होतो. 



या सगळ्या प्रकरणात माझं वेळेकडे लक्षच नव्हतं. मी फेरर पार्क स्टेशनच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो तेव्हा तीन वाजत आले होते. ठरलेल्या योजनेनुसार मी तेव्हा ‘गार्डन्स बाय द बे’ ला जायला निघालो असतो तर पोचायला चार तरी वाजलेच असते, आणि पहिल्या दिवशी फार उशिरापर्यंत बाहेर थांबायचं नसल्यास साडेसहा किंवा पावणेसातला तिथून निघावं लागलं असतं. तेवढ्या वेळात मी काही त्याला न्याय देऊ शकलो नसतो असं मला वाटलं, शिवाय आता भुरभुर सुरु झालेली होती आणि मला छत्री न घेता मनसोक्त तिथे फिरायचं होतं. म्हणून मी घरी व्हॉट्सॲप कॉल करून यावर जरा चर्चा केली आणि त्यातून शेवटी मी तेव्हा गार्डन्सऐवजी मरलायन पार्कला भटकायला जावं असं ठरलं, आणि गार्डन्सची वारी निघण्याच्या दिवशी सकाळी करावी असंही. मागच्या वेळी आम्ही मरलायन पार्कला गेलो होतो तेव्हा सिंगापूरचं ते सुप्रसिद्ध मानचिन्ह पाहायला मला खूप आवडलं होतं. मला योजनेतून वेळ मिळाला असता तर मी एकदा तिकडे चक्कर टाकलीही असती, पण योजनेतल्या इतर नवीन स्थळांच्या तुलनेत त्याचं एवढं आकर्षण उरलेलं नव्हतं. एक काळ असा होता जेव्हा मी यानंतर सरळ हॉटेलवर परत जाऊन माझ्या पॉडमध्ये पांघरुणात शिरून ‘द कन्फेशन’ वाचत पडलो असतो, पण आता तसं करण्याची माझी फारशी इच्छा नव्हती. मस्त जेवण झालेलं होतं, झोपही झालेली होती आणि आता उरलेली दुपार आणि संध्याकाळ नुसतं भटकण्यासाठी मोकळीच होती, त्यामुळे हा नवा बेत मी अंमलात आणायचं ठरवलं. तेव्हाच अचानक मला पूर्वी गूगल मॅप्सवर पाहिलेलं, मरलायनच्या पैलतीरावर आता काय होतं ते आठवलं आणि त्या विचाराने प्रेरित होऊन मी उत्साहाने मेट्रोकडे निघालो. 
सिंगापूरच्या मेट्रो सिस्टीममधल्या बहुसंख्य स्टेशन्सप्रमाणेच फेरर पार्क हेही भूमिगत होतं. तिथे जायला मॉलच्या तळघरातून एक रस्ता तर मॉलच्या आवारातून दुसरा रस्ता होता. त्या आवारातल्या छोट्याशा उघड्या इमारतीच्या आत दोन एस्कलेटर्स मला पाताळात न्यायला सज्ज होते. एस्कलेटर्स उतरून खाली पोचल्यावर मी एका लांबलचक भूमिगत बोळात उभा होतो. भिंती आणि जमीन दोन्हींवर फरशा बसवलेल्या होत्या आणि पिवळ्या दिव्यांचा मंद प्रकाश होता. सगळे लोक त्या बोळाच्या पलीकडच्या टोकाकडे निघाले होते; मीही त्यांच्यात मिसळलो. त्या टोकाशी मला Concourse Gates सापडण्याची अपेक्षा होती. ही गेट्स म्हणजे सगळ्या मेट्रो सिस्टीम्सच्या अजोड कार्यक्षमतेचं प्रतीकच म्हणावं लागेल. आपण मेट्रोचं तिकीट काढलं की आपल्याला एक टोकन मिळतं. ते आपण, या कमरेएवढ्या उंचीच्या आणि एका वेळी एका गेटमधून एकाच व्यक्तीला जाता येईल एवढ्या अंतरावर बसवलेल्या गेट्सवरच्या सेन्सरवर टेकवायचं म्हणजे ती छोटी सरकती दारं उघडून आपल्याला वाट करून देतात. मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडताना अशाच गेट्समध्ये ते टोकन टाकावं लागतं, ज्याच्या आधारे ती यंत्रणा आपला एकूण प्रवास मोजते. अर्थात, तिकीट काढलं तर पैसे आधीच ठरलेले असतात, पण माझ्याकडे पास असल्याने मी अक्षरशः कुठून कुठेही कितीही वेळ फिरू शकलो असतो, फक्त जातायेता ते सेन्सरवर टेकवून जायचं होतं. पण ही गेट्स सापडायला मला अजून एकदोन बोळ पार करावे लागले. स्टेशनच्या मुख्य ‘Concourse Level’ वर तिकिटांचे, माहितीचे आणि इतर असे स्टॉल्स असतात आणि या गेट्सच्या पलीकडे एस्कलेटर्स खालच्या मजल्यावर नेण्यासाठी सज्ज असतात. 
बोळात मला लोकांचा एवढा लोंढा दिसला होता की त्या गेट्सपाशी बॉटलनेक होणार असा मी तर्क केला होता, पण तसं अजिबात झालं नाही. बोळातून घोळक्याने बाहेर पडणारे लोक अगदी सहजपणे गेट्सपाशी एकेक रांग करून उभे राहत होते आणि सटासट पुढे सरकत होते. गर्दीमुळे रांगेची लांबी वाढली तरी मागचे लोक व्यवस्थित रांगेत लागत होते, आणि रांगेचा इतर ठिकाणी जाणाऱ्या कोणाला उपद्रव होऊ नये म्हणून अधूनमधून वाट करून देत होते. असं करायला एकाने रांगेतले जागा क्षणभर सोडली तरी मागचे ती बळकावायला लगेच घुसायचे नाहीत. मुळातच ‘घुसणे’ ही क्रिया त्या संतमंडळींच्या गावीच नव्हती; दोन्ही अर्थांनी! ज्या ठिकाणी ऐटीत रांग मोडणाऱ्याच्या पाठीमागे ‘भाऊंची हवा’ किंवा तत्सम वाक्प्रचार चिकटत नाहीत तिथे शंभर माणसांची रांग अक्षरशः दोनतीन मिनिटात खालच्या मजल्यापर्यंत पोहोचते यात नवल काय? अर्थात, सिंगापूरचे ‘VIP’ आल्यावर काय होत असेल कल्पना नाही, पण मुळात ते मेट्रोने जातीलच कशाला? ‘तुमचे रस्ते तुम्हाला लखलाभ होवोत’ असं म्हणत सिंगापूरचा सामान्य माणूस अभिमानाने मेट्रोने प्रवास करतो. एस्कलेटरवरही ज्यांना घाई आहे त्यांना जाऊ द्यायला उजवी बाजू पूर्ण मोकळी ठेवण्याची प्रथा तितक्याच निर्विकारपणे पाळली जाते. खरा रुबाब हा शिस्त पाळण्यात आहे हे ज्ञान तिथल्या रिक्षाच्या मागच्या भागावर चिकटवलेलं नसून मनात तत्त्व म्हणून रुजवलेलं असतं, हाच अनुभव मला सगळीकडे येणार होता. 



मरलायन पार्ककडे चालत जायला मला तिथल्या ‘Clarke Quay’ नावाच्या स्टेशनवर उतरायचं होतं. या स्टेशनच्या नावाची घोषणा झाली तेव्हा त्याचा उच्चार ‘क्वे’ असा नसून ‘की’ असा आहे असा साक्षात्कार झाला आणि मला पु.लं.च्या अपूर्वाईल्या ‘फिख्याडली’च्या प्रसंगाची आठवण झाली. स्टेशनच्या बाहेर वातावरण ढगाळ होतं. पावसाची भुरभुर चालूच असल्यामुळे मी बॅगेतून छत्री काढून उघडली. आणखी एका मॉलच्या तळघरातून वर येऊन मी सिंगापूरच्या नदीच्या किनाऱ्यावर उभा होतो. तिथून त्या नदीकाठच्या रस्त्याने चालत गेल्यावर थोड्याच अंतरावर मरलायनचं कारंजं आणि मला जे बघायचं होतं ‘ते’ही सापडेल असं बाबांनी पाठवलेल्या नकाशाच्या फोटोतून कळत होतं. या नदीकाठच्या रस्त्याला आणि तिथल्या परिसराला ‘Boat Quay’ असं नाव होतं असं कळलं. नदीचे दोन्ही किनारे पात्रापेक्षा बऱ्याच उंचावर होते आणि दोन्ही बाजूंना कठडे होते. हा किनाऱ्यालगतच्या रस्ताही मुद्दाम फेरफटका मारण्यासाठीच होता; मुख्य गाडीरस्ता त्या मॉलच्या पाठीमागे असावा. मी त्या नदीशेजारून चालायला लागलो. पाणी अगदी दुबईच्या खाडीच्या पाण्याइतकं नितळ नव्हतं पण स्वच्छ होतं. पलीकडच्या इमारतीही तशा साध्याच होत्या. मी सिंगापूरच्या ‘गावा’त आलो होतो. अर्थात, या ‘गावा’पासून मुख्य शहर किती जवळ होतं याची मला तेव्हा काहीच कल्पना नव्हती. थोडं अंतर चालून गेल्यावर पुढे एक मोठा गाड्यांचा पूल लागला तसं या रस्त्याचं त्याच्याखालून जाणाऱ्या एका बोगद्यात रूपांतर झालं. बोगद्याच्या भिंती अगदी अपेक्षेप्रमाणे ‘स्ट्रीट आर्ट’ ने भरलेल्या होत्या. मी बोगद्यातून शिरण्यापासून ते बाहेर पडेपर्यंतचा असा एक व्हिडिओ काढायला सुरुवात केली. बाहेर पडल्यावर मला फोनमध्ये समोर जे दिसलं ते पाहून मी एकदम दचकलोच, आणि मग फोन बाजूला ठेवून नीट समोर बघितलं. 


मुख्य शहर अजूनही तसं लांबच होतं, पण लांबूनही ज्या गोष्टी सहज दिसतात त्या आता दिसायला लागल्या होत्या. अचानक मला खूप छान वाटायला लागलं आणि इथे येण्याचा निर्णय घेतल्याचा मनापासून आनंद झाला. तसाच छत्री धरून मी त्या समोरच्या गगनचुंबी इमारतींकडे एकटक पाहत पुढे चालायला लागलो. आता हा रस्ता अगदी कठडा सोडून थोडासा आतल्या बाजूला वळला आणि दुतर्फा छोटी दुकानं आणि टपऱ्या लागायला लागल्या. या सगळ्याच्या मागे काही अंतरावर युनियन ओव्हरसीज बँकेच्या दोन टॉवर्सपैकी एक होतं, ती परत आल्यावर माहिती काढताच सिंगापूरमधली सर्वांत उंच इमारत असल्याचं कळलं. सामान्यतः मी गगनचुंबी इमारतींशी ओळखपाळख काढून परिचय खूप वाढवल्यानंतरच भेटीचा विचार करतो, त्यामुळे इथे एकदम सगळ्या अनोळखी इमारतींना पाहून जरा बिचकलो होतो, पण लवकरच आमचं छान जुळलं. हा लहानसा नदीकाठचा बाजार ओलांडला की थेट त्या टॉवरच्या पायऱ्याच लागत होत्या. तिथे आसपास मी खूप फोटो काढून घेतले आणि त्या इमारतींच्या मधून फिरत राहिलो. त्यांच्या त्या घोळक्याला एकदाचं ओलांडल्यानंतर मी वळलो आणि समोरच्या दृश्याने मला अजूनच जास्त रोमांचित केलं. 
मी आता एका मोठ्या रस्त्याच्या कडेला उभा होतो, ज्याचा थोड्या अंतरावर एक फाटा फुटून एका अजस्त्र पुलाच्या रूपात नदी ओलांडत होता. इथे नदीचं पात्रही खूप रुंदावलं होतं. त्या ‘फुलरटन ड्राईव्ह’ नावाच्या महाकाय पुलाच्या दुसऱ्या बाजूला ‘एस्पलनादे’चे दोन घुमट दिसत होते, आणि पलीकडच्या किनाऱ्यावर मला कधीपासून जी प्रत्यक्ष पाहण्याची ओढ लागली होती ती सिंगापूरमधली माझी सगळ्यात आवडती इमारत उभी होती. 
मरिना बे सँड्स.  
         

Let's get closer on SG8

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प