जीवाचं सिंगापूर: मरिनापर्व २


मी मंत्रमुग्ध झाल्यासारखा त्या अद्भुत इमारतीकडे चालत निघालो. 
हेच ते ‘मरिना बे सँड्स’ हॉटेल, ज्याची बुकिंग करताना मी रात्रीला १,१०,००० रुपये एवढी बघितली होती. जोडलेल्या हातांसारख्या दिसणाऱ्या तीन उंच आयताकार इमारती आणि त्यांना जोडणारी छतावरची एक महाकाय बोट - किंवा बोटीच्या आकाराची गच्ची - असं हिचं स्वरूप. ही मरलायनच्या बरोबर विरुद्ध किनाऱ्यावर आहे. तिच्याकडे असंच चालत निघालेल्या मला तो हायवे अचानक समोर आल्यावर थांबावंच लागलं. याच हायवेचा एक फाटा ‘फुलरटन ड्राईव्ह’ नावाचा पूल बनून पलीकडच्या किनाऱ्यावर जात होता आणि तिकडेच मरलायन पार्क होती. आता तिथे कसं जायचं या विचारात असताना मला माझ्या शेजारीच एक दुसरा पूल दिसला, जो फक्त लोकांना चालण्यासाठीच होता. त्या पुलावर जाण्यासाठी मला थोडं मागे येऊन या हायवेच्या खाली जावं लागलं. पुलावरून जाताना शेजारी थोड्या उंचावर तो फुलरटन ड्राईव्ह दिसत होता. 
हा पूल ओलांडून गेल्यावर मी थेट मरलायनपाशीच पोहोचलो असतो. पुलावर वर्दळ होती पण ओलांडणाऱ्यांची नाही तर कठड्यावर रेलून पलीकडच्या जलाशयाच्या आणि लांबवरच्या त्या इमारतीच्या सोबत सेल्फी काढणाऱ्यांची. माझे आधीच काढून झाले होते म्हणून बरं, कारण त्या एवढ्या गर्दीत मला आणि त्या इमारतीला छान फोटो येण्यासाठी आवश्यक असलेला एकांत मिळूच शकला नसता. इथे आल्यापासून मला फक्त नाकासमोर सरळ चालत जाताना दिसलेला सिंगापूरकर इथे मात्र थोडा वेळ थांबून त्या वातावरणाचा आस्वाद घेत होता. अर्थात, त्या गर्दीत परदेशी किती जण होते ते कळायला मार्ग नव्हता. आपले भारतीय आणि पश्चिमेकडचे गोरे अगदी ठळकपणे उठून दिसायचे, पण बाकी सगळा गोतावळा दुबईच्या भाषेत ‘आशियन’ लोकांचा होता. त्या सगळ्यांच्या गर्दीतून वाट काढत मी शेवटी मरलायन पार्कमध्ये पोचलो.

खाडीच्या किनाऱ्यावर एका मोठ्या जागेत ही पार्क पसरलेली आहे. खाडीच्या काठाला लागून जरासा उंचावर एक जॉगिंग ट्रॅक आहे. मरलायनची राजेशाही मूर्ती त्याच किनाऱ्यावर दिमाखात उभी राहून दिवसरात्र त्या खाडीत चूळ भरत असते. तिच्या आजूबाजूला उभं राहण्यासाठी जागा आहे, आणि लांब आडव्या पायऱ्या तिथपासून पसरत त्या जॉगिंग ट्रॅकच्या उंचीपर्यंत येतात. पायऱ्या कशाला, कट्टाच म्हणा, आणि लोकही अगदी सहजपणे त्यांचा तसाच उपयोग करत होते. मला खूप लोक तसेच निवांत पाय पसरून घोळक्याने किंवा एकट्याने, स्वतःला फोनमध्ये प्लग करून बसलेले आढळले. तसेच इतर लोक जॉगिंग ट्रॅकला लागून असलेल्या काही मोठ्या संगमरवरी क्यूब्जवर बसलेले होते. हे क्यूब्ज विविध आकारांचे असून एकमेकांना चिकटून एखाद्या विचित्र बाकाच्या आकारात बसवलेले होते. गर्दीची वेळ नसती तर तुम्हाला मोठ्या क्यूबवर बसून शेजारच्या छोट्या क्यूबवर पाय पसरता आले असते, तसंच मागच्या लठ्ठ क्यूबला टेकताही आलं असतं. पण ही सुविधा संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तिथे टपकल्यामुळे मला उपलब्ध नव्हती. म्हणून मी एका क्यूबवर नुसताच जाऊन बसलो आणि पाय रिचार्ज होत असताना आजूबाजूच्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून इअरफोन्स घालून एक गाणं ऐकायला लागलो. माझ्याकडच्या गाण्यांमधली काही गाणी मी काही खास क्षणांसाठी राखून ठेवली आहेत, त्यापैकी इन्सेप्शन सिनेमातलं, माझ्या दृष्टीने विजयाचं वातावरण निर्माण करणारं, ५२८४९१ नावाचं हे ते गाणं होतं. तेव्हा माझ्यासाठी मी माझा ट्रिपचा पहिला दिवस सत्कारणी लावल्याचं आणि आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या समस्यांवर तात्पुरती का होईना पण मात केल्याचं ते प्रतीक होतं. दोन मिनिटं त्या मंत्रमुग्ध अवस्थेत काढल्यानंतर मी शांतपणे खालच्या एका कट्ट्यावर जाऊन बसलो आणि संधीप्रकाशात चमकणाऱ्या त्या मरलायनकडे पाहायला लागलो. 
असंच नुसतं बसून राहून कालचक्राला विसरायचा प्रयत्न करणं हेच मरलायन पार्कला भेट देण्यामागचं उद्दिष्ट असतं, पण मला अंधार पडायच्या आत परत निघालं पाहिजे या जाणिवेने साडेसहाच्या सुमारास उठवलंच. सर्व प्रकारचे फोटो काढून झाले होते, त्यामुळे मी अगदी अंधार पडायची वाट बघण्यापेक्षा सरळ या भेटीची सांगता झाली असं जाहीर करून उठलो आणि पार्कच्या पलीकडच्या बाजूला गेलो. तिथे पुन्हा पायऱ्या उतरून मी फुलरटन ड्राईव्हच्या खाली जाऊ शकत होतो. तिथे खाडीला लागूनच एक छोटीशी ‘कॅफे एरिया’ थाटली होती, ज्यात चार गोलाकार टेबलं, दोन कट्टे, एक कॉफीशॉप, एक ज्यूस बार आणि अर्थातच एक ‘सेव्हन-इलेव्हन’चं दुकान असं सगळं होतं. हे सगळं वरून दिसणारही नाही आणि व्यवस्थित सामावलं जाईल इतका तो पुलाचा सांगाडा अजस्त्र होता. माझी ते फ्लेव्हर्स बघून ज्यूस घ्यायची इच्छा झाली, पण चार डॉलर्सएवढं बळ त्या इच्छेत नव्हतं. मी नुसतंच त्या एरियात थोडंसं फिरून पलीकडच्या बाजूने वर आलो. आता मी Financial District च्या तोंडाशी उभा होतो. दोन्ही बाजूंना उंच काचेरी इमारती असलेला हा एक मोठा रस्ता होता, आणि काही वर्षानंतर अशाच एका ठिकाणी आपण काम करत असू ही भावना मला रोमांचित करत होती. पण त्या मोहक दृश्यात फार हरवून न जाता मला माझं ध्येय पूर्ण करायचं होतं, आणि ते म्हणजे Raffles Place नावाचं मेट्रो स्टेशन शोधणं. परतीच्या प्रवासासाठी हे एक नाव लक्षात ठेवून मी बाहेर पडलो होतो. सुदैवाने पाट्यांचा सुकाळ होता, म्हणून मी इकडेतिकडे बघत निघालो. 

बसस्टॉपवर मला बस घ्यायचाही मोह झाला. सकाळपासून त्या बहुरंगी बसेसना इकडेतिकडे फिरताना पाहून त्यांच्यात बसून जाण्याची खूप इच्छा झाली होती. मला विशेषतः अनुभवायचं होतं ते दुमजली बसच्या टप नसलेल्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसणं. पण आता असं नुसतं स्टॉपवर उभं राहून मला बस मिळेल अशी आशा करणं हा पुण्यात बसेसचा अनुभव घेतल्यानंतर मूर्खपणाच झाला असता. माझं हॉटेल ज्या भागात आहे त्या भागात जाणाऱ्या बसेसची संख्या किती, फ्रिक्वेन्सी किती, त्यातली कुठली हॉटेलच्या सगळ्यात जवळ जाते, ती नाही मिळाली तर दुसरा पर्याय कोणता, हा सगळा अभ्यास मला तिथे उभं राहून करता आलाच नसता. कुणालातरी विचारू शकलो असतो म्हणा, पण त्यांनी सांगितलेलं बरोबरच कशावरून या प्रश्नाला उत्तर नव्हतं, आणि माझी रात्रीच्या वेळी भलत्याच भागात जाऊन बसायची इच्छा नव्हती. त्यामुळे हा विचार मी सोडून दिला आणि पुढे स्टेशनच्या शोधात चालत राहिलो. 
काही वेळाने माझ्या लक्षात आलं की मी चालत होतो तो सगळा भाग फुलरटन नावाच्या एका पंचतारांकित हॉटेलच्या मालकीचा होता. या हॉटेलने खाडीलगतच्या किनाऱ्याचाही काही भाग स्वतःसाठी राखून ठेवलेला होता. पण काही वाटा माझ्यासारख्या सामान्य लोकांना मोकळ्या होत्या. थोड्या वेळाने त्या हॉटेलचं मुख्य प्रवेशद्वार लागलं. मोठ्या रस्त्याला अगदी चिकटून असलेल्या एका वर्तुळाच्या टोकाला ते महाकाय दरवाजे होते. त्या वर्तुळाकार रस्त्याच्या पट्ट्यावरून मोठ्यामोठ्या लिमोझिन्स वळून येऊन थांबत होत्या आणि हॉटेलचे पोर्टर्स लगबगीने मोठ्या ट्रॉल्या घेऊन बाहेर पडत होते. सगळी सुटाबुटातली मंडळी उतरत होती आणि उतरवतही होती. मला क्षणभर उगीच माझ्या टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये जरा बुजल्यासारखं झालं. मघाशी मरलायन पार्कमध्ये मला काहीच वाटलं नव्हतं कारण तिथे बहुतांश लोक माझ्यासारखेच होते. हा भागच वेगळा होता. मी शक्य तितकं अंग चोरून हळूच ते वर्तुळ ओलांडून पलीकडे गेलो. पण नंतर विचार केल्यावर पटलं की माझ्या मनातली ती भावना हा त्या सगळ्या परिसराचा परिणाम होता; मी माझा सूट घालूनही तिथून फिरलो असतो तरी मला अगदी असंच वाटलं असतं. Financial District मध्ये मी अचानक एका खूप मोठ्या जगातला लहान माणूस झालो होतो. तेव्हा मी विमानतळावर जशी प्रतिज्ञा केली होती त्याप्रमाणेच ‘मी पुढच्या वेळी अशा ठिकाणी पाऊल ठेवीन तेव्हा मी माझं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं असेल,’ असा काहीतरी विचार केला. त्यानंतर लगेच मागून ‘स्टेशन सापडत नाहीये आणि तुझं काय चाललंय’ या विचाराने मला भौतिकात परत आणलं आणि मी निमूटपणे पुढे चालायला लागलो. 

रॅफल्स प्लेस हा भाग म्हणजे सिंगापूरच्या Financial District चा केंद्रबिंदू होता, हे मला नंतर कळलं. तिथे दाही दिशांना उंच इमारतींचं रान माजलेलं होतं. आता अंधार पडायला लागल्यामुळे त्या एकेका मजल्यावरचे दिवे लावायला लागल्या होत्या, त्यामुळे माझ्यासाठीच नटल्यासारख्या वाटत होत्या. मी पुष्कळ फोटो काढून घेतले आणि मेट्रोची खूण दिसलेल्या एका इमारतीच्या आत शिरलो. लगेच एका सरकत्या जिन्याने मला माझ्या ओळखीच्या वातावरणात परत आणलं. रॅफल्स प्लेसचं स्टेशन हे इंटरचेंज स्टेशन असल्यामुळे नेहमीपेक्षा बरंच आडवंतिडवं पसरलेलं होतं. मला एक मजला आणखी उतरून शेवटी ‘धोबीघाट’ला जाणारी गाडी सापडली. स्टेशनवर चिकार गर्दी होती, पण का कोण जाणे मला मेट्रोची दारं आणि भिंतीतली दारं जिथे एकत्र उघडतात त्या भागात एकही माणूस दिसला नाही. मी खूश होऊन त्या दारासमोर उभा राहिलो. माझ्या दोन्ही बाजूंना मात्र लांबपर्यंत रांगा लागलेल्या दिसत होत्या. दारासमोर खाली फरशीवर मी एक माझ्या दिशेने येणारा हिरवा बाण पाहिला आणि त्याच्या दोन्ही बाजूंना मेट्रोच्या दिशेने जाणारे दोन लाल बाण दिसले तेव्हा कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी लगेच मागे जाऊन त्या दोनपैकी एका रांगेत शेवटी जाऊन उभा राहिलो. सिंगापूरकरांची शिस्तप्रियता इथे पुन्हा प्रकर्षाने जाणवली, तसाच त्यांचा समजूतदारपणाही. मला हे उशिरा आलेलं शहाणपण पाहताना कोणीही हसणं तर सोडाच, पण माझी चूक माझ्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्नही केला नाही. मी रांगेत लागल्यावर नंतर आलेले शांतपणे माझ्या मागे उभे राहिले. बेदरकार आणि अननुभवी व्यक्तींमधील फरक त्यांना सहज कळत असल्याचं उघडपणे जाणवत होतं. 
धोबीघाटचा भुलभुलैय्या ओलांडून शेवटी माझ्या फेरर पार्क स्टेशनच्या दिशेने जाणारी मेट्रो पकडून मी ‘माझ्या’ भागात परत आलो. उतरल्यावर खूप भूक लागलेली असल्यामुळे मला सरळ ‘सिटी स्क्वेअर मॉल’च्या चौथ्या मजल्यावर जायचं होतं, म्हणून मी घाईघाईने जरा निष्काळजीपणेच स्टेशनमधून बाहेर पडलो. बाहेर आल्यावर मी चुकीच्या एक्झिटमधून बाहेर पडल्याचं मला कळलं पण लगेच पुन्हा खाली उतरून दुसरीकडून बाहेर पडायची अक्कल मला तेव्हा आली नाही. मला वाटलं, दोन वळणं घेतली की येऊच आपण आपल्या सेरांगून रोडवर. फक्त ती दोन वळणं अपेक्षेपेक्षा खूपच लांबली आणि पुष्कळ चालल्यावर माझ्या असं लक्षात आलं की मी त्या मॉलच्या ऐवजी थेट माझ्या हॉटेलपाशीच पोचलो होतो. आता पोट का पाय, कुणाचं आधी ऐकायचं असा प्रश्न मला सतावत होता, पण त्यावर विचार करायलाही फार वेळ नव्हता इतके दोघे पेटलेले होते. शेवटी थोडा शांतपणे विचार केल्यावर मला हे कळलं की हॉटेलपासून मॉलपर्यंत जाण्याचा मार्ग तर मला पाठ होता, त्यामुळे तो चुकण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा आधी जेवण उरकून मगच परत येऊ, म्हणजे आल्यावर पुन्हा बाहेर पडायला नको असं मी ठरवलं. दहा मिनिटांनी मी ते चार सरकते जिने चढून फूडकोर्टमध्ये पोचलो होतो आणि त्या थाई स्टॉलच्या समोर उभा होतो. 
दुपारी मेनूवर पहिल्यापासून मी ज्याचा मनातूनच आस्वाद घ्यायला सुरुवात केली होती तो पदार्थ आता घेण्याएवढी भूक मला लागली होती याचा मला खूप आनंद झाला. एक रिकामा ट्रे उचलून मी त्या काउंटरमागच्या मुलीला ‘थाई ग्रीन करी चिकन’ असं एका दमात सांगून लगेच ‘याबरोबर भातही येतो ना’ असं विचारून घेतलं. ती हसून हो म्हणाली आणि लगेच चिनीमातीचा एक मोठा गोलाकार वाडगा काढून तिने मागे ठेवलेल्या एका भल्यामोठ्या पातेल्यावरचं झाकण काढलं. त्यात नुसता पांढराशुभ्र भात गच्च भरून खदखदत होता; झाकण काढल्यावर त्याची वाफ क्षणात माझ्यापर्यंत पोहोचली आणि पु.लं.च्या ‘माझे खाद्यजीवन’मध्ये पहिल्यांदा वाचनात आलेल्या ‘पोटात रणकंदन सुरु होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ मला खऱ्या अर्थाने कळल्यासारखं झालं. तिने तो वाडगा सरळ त्या ढिगात खुपसून एकदम माझ्या ताटलीवर उलटा केला. मग तिने दुसऱ्या एका जरा उभट वाडग्यात पळीने चिकनचे आणि कांद्याचे भरपूर तुकडे घातलेली गरमागरम ग्रीन करी ओतली आणि दोन्ही माझ्यासमोर ठेवलं. मी घाईघाईने (पण काळजीपूर्वक) पैसे देऊन एका टेबलावर ते सगळं घेऊन बसलो. भाताच्या त्या घुमटाला चमच्याने फोडून एक घास त्या करीत बुडवून घेतला आणि तोंडात घालताक्षणी मी इथे आधी यायचा घेतलेला निर्णय पायांनी मान्य करून टाकला. 

फूडकोर्ट संस्कृतीनुसार एक टेबल कुणा एकाच्या मालकीचं नसतं. काही वेळाने माझ्या समोर एक आजोबा येऊन बसले. त्यांनी शेजारच्या जपानी स्टॉलवरून कसल्यातरी वेगळ्याच रंगाचं सूप आणलं होतं. या मोकळ्या वातावरणात ‘ट्रेडिंग’ हा शिष्टाचाराचा भाग होता का नाही याची मला काहीच कल्पना नव्हती, पण सुदैवाने आजोबांची तशी काही अपेक्षा दिसत नव्हती. ते एका अर्थी बरंच होतं, कारण मला त्यांच्या सूपमध्ये अजिबात रस नव्हता. मी सरळ माझ्या जेवणावर माझं लक्ष केंद्रित केलं आणि पंधरावीस मिनिटांत एका घासून ठेवल्यासारख्या वाटणाऱ्या ताटासमोर तृप्त होऊन मागे रेललो. फोनवर मेसेजेस बघितले तेव्हा मी मघाशी टाकलेल्या जेवणाच्या फोटोवर बाबांनी चिडलेला इमोजी टाकलेला दिसला. पण पुण्यातल्या कितीही ‘authentic’ चिनी हॉटेलात मिळणाऱ्या ग्रीन करीलाही सिंगापूरच्या त्या ग्रीन करीची सर येणंच शक्य नाही, कारण त्या करीचे घटक पदार्थही सिंगापूरमध्ये मूळ थायलंडमधूनच आलेले असणार. यावर बाबा ‘आता एकदा थायलंडला जा’ असं म्हणणार याची मला खात्री होती. 
अत्यंत प्रसन्न मनाने मी मॉलमधून बाहेर पडलो. बाहेर ख्रिसमसची तयारी जोरात सुरु होती. मॉलच्या आवाराच्या प्रवेशद्वारावर खूप रोषणाई केलेली दिसत होती, आणि खूपसे पोस्टर्स आणि डिस्प्लेजनी ते आवार भरून गेलं होतं. माझ्या फोनच्या कॅमेऱ्यात ‘नाईट मोड’ असल्याचं मला एकदम आठवलं आणि मी त्या आवाराचे आणि मागच्या फेरर हॉटेलच्या इमारतीचे फोटो काढून घेतले. उरलेला रस्ताभर माझा हाच उद्योग चालू होता. हॉटेलवर परत आल्यावर मी आठवणीने पाकिटातून माझं कार्ड काढून आतल्या भागात गेलो आणि बूटमोजे काढून ड्रॉवरमध्ये ठेवून दिले. वरच्या मजल्यावर आल्यावर सर्वप्रथम खालच्या लॉकरमधून सूटकेस काढली आणि पॉडच्या आत ती उघडून सगळे पैसे व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. मग मी पॉडमध्येच कपडे बदलले आणि सगळ्यासकट सूटकेस कुलूप लावून परत खाली ठेवून दिली. कार्ड माझ्याजवळच पॉडमध्ये मला वीजपुरवठा करत राहणार होतं. फोनवर दुसऱ्या दिवशीचा गजर लावून टाकला आणि दिवे मालवून पांघरुणाच्या आत शिरलो. 
खूप पूर्वी वाचलेल्या एका लेखात स्वप्नं ही दिवसातल्या सगळ्या unresolved गोष्टींची किंवा न सुटलेल्या प्रश्नांपासून निर्माण होतात असं वाचलं होतं ते एकदम आठवलं. त्या दृष्टीने पाहता आज मला संपूर्णपणे स्वप्नरहित झोप येणार असं मला वाटलं आणि मी हसून डोळे मिटले.  

                                                                                                                Tomorrow is another day on SG9

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प