जीवाचं सिंगापूर: द्वीपपर्व
“हं, आवडता रंग कुठला?”
“काळा,”
खट्कन आवाज झाला आणि शेजारच्या आयताकार लॉकरचा दरवाजा आपोआप उघडला गेला. मी आतून मी सकाळी त्याच्याकडे सुपूर्त केलेली नक्षीदार लाकडी पेटी आणि बाकरवड्यांचा पुडा काढून घेतला. मी दरवाजा परत लावून टाकल्यावर त्या यंत्राने पुढे लॉकर वापरून झाला आहे का असं विचारलं. मी हो म्हणताच त्याने त्याची नोंद केली. आता मला क्षणभरच लॉकरच्या अंतरंगाचे आभार जरी मानायची इच्छा झाली असती तरी मला त्याला काही डॉलर्स भरवावे लागले असते. या यंत्रणेच्या कार्यक्षमतेचं पुन्हा मनात कौतुक करत मी तिथून बाहेर येऊन मोनोरेल स्टेशनपाशी आलो.
स्टेशनच्या जिन्यालगतच्या भिंतीवर मोठा नकाशा होता. आता नकाशासमोर उभं राहून फोटो काढण्याची हौस कोणाला का असावी ते मला आजही कळलेलं नाही, पण तेव्हा ती हौस भागवण्याचं कार्य सुरु होतं त्यामुळे मला दोनतीन मिनिटं थांबावं लागलं. नकाशात पाहून मला कळलं की बेटावर मोनोरेलची चार स्टेशन्स होती, त्यातल्या पहिल्यावर मी होतो आणि मला तिसऱ्यावर उतरायचं होतं, म्हणजे मला केबल कारने बेटाची चक्कर मारता आली असती. मी सकाळी काढलेलं मोनोरेलचं तिकीट एकदा उतरल्यावर संपतं का ते मला अचानक आठवेना, पण हा प्रश्न ते काढताना विचारून घेतल्याचं अंधुकसं आठवत होतं. मी सरळ वरच्या मजल्यावर गेलो. तिथे तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने माझं पाहून मला परत देऊन टाकलं आणि मी हायसं वाटून त्या मोनोरेलमध्ये चढलो.
दहा वर्षांपूर्वी सिंगापूरला आलेलो असताना सेंटोसा बेटावरच्या नक्की कुठल्या भागात फिरलो होतो ते मला अजिबात आठवत नव्हतं, पण केबल कारची सफर केलेली नव्हती एवढं आठवत होतं. मोनोरेलने उरलेली दोन स्टेशन्स पार करताना मला या बेटाचं एक वेगळंच दर्शन होत होतं. कुठेही नजर टाकली तरी सर्वप्रथम दृष्टीस पडायची ती दाट, हिरवीगार झाडी. त्यांच्या अधूनमधून छोट्याछोट्या इमारती दिसत होत्या, पण त्याही एकूणच झाडांच्या साम्राज्यात पाहुण्या म्हणून आल्यासारख्या वाटत होत्या. याकडे बघत राहावं असं वाटत असताना ते स्टेशन आलं म्हणून मी जरा हिरमुसलो, पण आत्तापर्यंत पाहिलेलं हे साधासा ट्रेलर वाटावा असा खरा पिक्चर आता येणार होता.
केबल कारचं स्टेशन मोनोरेलला जवळपास खेटूनच होतं, फक्त त्याच्या वरच्या मजल्यावर नेणारा एस्कलेटर दुरुस्त करण्याचं काम सुरु होतं त्यामुळे मला शेजारचा जिना चढून जावं लागलं. मी मनात म्हटलं, शेजारी साधा जिना होता म्हणून बरं! तेव्हा माझ्या लक्षात आलं की सिंगापूरला आल्यापासून मी पहिल्यांदा जिना चढत होतो. बाकी शक्य तिथे एस्कलेटर्सचंच साम्राज्य. मला अचानक मी पूर्वी एकदा वाचलेला विनोद आठवला, ज्यात एक माणूस दुसऱ्याला सांगत असतो की तो मॉलमध्ये गेलेला असताना एक्सलेटरवर असताना वीज गेली म्हणून तो तासभर तिथेच अडकून राहिला! म्हणूनच विजेवर चालणाऱ्या यंत्रणांवर खूपच विसंबून राहण्याचे धोके एक्सलेटर्सना कधीच लागू पडत नाहीत. पण कदाचित आत्तापर्यंत या विकसित देशात पाहिलेल्या सगळ्या यंत्रणा इतक्या परफेक्ट होत्या म्हणून असेल, पण इथे इतक्या साध्या यंत्राला असं मोडून पडलेलं पाहून माझं त्याकडे विशेष लक्ष गेलं होतं.
वरच्या मजल्यावर केबल कारच्या मजबूत दोरखंडांना फिरवत ठेवणारी अजस्त्र चाकं बसवलेला टॉवर उभा होता. त्याच दोरखंडांवर लोंबकळणाऱ्या पाचसहा बहुरंगी केबल कार्स त्याच्या पायाशी घुटमळत होत्या. जवळपास गोलाकार आणि समोरासमोर दोन आडव्या सीट मावतील इतक्या रुंद असलेल्या या कार्सचा वरचा बहुतेक सर्व भाग काचेचा होता. सहा लोक आरामात बसू शकतील एवढी त्यांच्यात जागा होती. माझं तिकीट तपासून तिथल्या माणसाने मला एका हिरव्या कारमध्ये बसवलं. मला दिसलं की त्या कार्स पूर्णपणे थांबत नव्हत्याच; फक्त टॉवरपाशी आल्यावर वेग खूप कमी करून एकमेकींच्या मागून हळूहळू फिरत होत्या. म्हणजेच वरच्या दोरखंडाच्या फिरण्यात अजिबात खंड पडत नव्हता. मी आत जाऊन बसल्यावर उरलेल्या पाच जणांची वाट पाहत होतो, आणि ते यायला किती वेळ लागेल आणि तोपर्यंत ही कार कशी थांबून राहील असा विचार करत होतो. तसं काही झालं नाही. माझं दार बाहेरून घट्ट लागल्याची खात्री करून तो माणूस लांब गेला आणि दुसऱ्या कोणाची वाट न बघता ही सरळ मला घेऊन त्या स्टेशनमधून बाहेर पडली आणि पुढच्या जास्त उंचावर बसवलेल्या टॉवरच्या दिशेने हळूहळू चढायला लागली.
तिचा वेग मला अगदीच सोयीचा होता, कारण स्टेशनमधून बाहेर पडल्यावर मला अगदी किती पाहू आणि किती फोटो काढू असं झालं होतं. सर्वत्र दाट झाडी होती. काही उंच झाडांच्या फांद्या अगदी हाताशी येत होत्या. ती थोडी अजून वर चढली तसं मला दिसलं की अगदी संपूर्णपणे हिरवी चादर पांघरलेल्या एका टेकडीच्या माथ्यावर बसवलेल्या टॉवरकडे आम्ही निघालो होतो. हळूहळू शेजारी सोबतीला असलेली झाडं तळाखाली गेली, पण कारचा तळही पारदर्शक असल्याने मला खाली ती सगळी पसरलेली दिसत होती. ते खालचं जंगल इतकं घनदाट होतं की मला जमीन अजिबात दिसू शकत नव्हती. मी खालचे, आजूबाजूचे, सगळीकडून भरपूर फोटो काढून घेतले. आत्तापर्यंत मी फोटो अगदी व्यवस्थित यावा यासाठी माझ्या फोनला लागेल तेवढा वेळ द्यायचो, पण आता मी उतावीळपणे ते उरकण्याचा प्रयत्न करत होतो जेणेकरून उरलेला वेळ मला मनसोक्त सगळीकडे बघत बसता यावं. आधीच माझ्या फोनच्या डोक्याला बाण लागलेला होता, त्यात आज मी दिवसभर त्याला पुष्कळ पिडलं होतं त्यामुळे तो आता भडकला असता तर नवल नव्हतं. पण हॉटेलवर परत आल्यावर दिवसभराचे फोटो पाहताना त्याने यावेळीही मला इमानाने साथ दिली असल्याचं माझ्या लक्षात आलं.
टेकडीच्या माथ्यावरच्या टॉवरपाशी पोचल्यावर मी जे दृश्य पाहिलं त्याची तुलना फक्त बुर्ज खलिफाच्या १२५व्या मजल्यावरून पाहिलेल्या सूर्यास्ताशीच होऊ शकते. साडेपाच वाजून गेलेले असल्यामुळे इथेही सूर्याची आवराआवरी चालू झालेली होतीच. त्या उंचीवरून चहूबाजूंनी पसरलेलं सेंटोसा बेट पूर्ण दिसत होतं. मागे युनिव्हर्सल स्टुडिओजच्या इमारती आणि रोलर-कोस्टर्स दिसत होते, आणि त्या पार्कला लागून असलेली काही रिझॉर्टस् पण दिसत होती. आजूबाजूला आणि पुढे फक्त जंगल. डावीकडे संधीप्रकाशात सोन्याचा वाटणारा किनारा आणि त्यापलीकडे अथांग समुद्र. हे दृश्य मी मनात साठवतानाच इतका मुग्ध होऊन गेलो की फोटो काढायचाच राहून गेला. आणि अचानक हे दृश्य जाऊन पुढच्या स्टेशनची इमारत लागली. माथ्यावरचं टॉवर ओलांडल्यानंतर कार जास्त वेगाने खाली गेली होती हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. पण हे स्टेशन शेवटचं नव्हतं आणि थोडा वेळ त्या इमारतीच्या आत रांगून झाल्यानंतर कार पुन्हा वेगाने बाहेर पडली आणि त्याच दृश्याने पुन्हा माझ्या इंद्रियांचा ठाव घेतला.
या खेपेला डावीकडे लागलेली नजर दुसरीकडे वळवायची माझी इच्छाच होत नव्हती. आता तोच किनारा जास्त स्पष्टपणे दिसायला लागला होता. किनाऱ्यापासून अगदी थोड्या अंतरावर छोटीछोटी वाळूची बेटं होती आणि त्यांना किनाऱ्याला जोडायला पूल होते. तो किनारा आणि ती बेटं त्या रिझॉर्टच्या मालकीची असावीत असा मी तर्क केला. तिथे उतरणाऱ्या लोकांना त्या बेटांवर जाऊन येता येत असावं. ती बेटं वेगवेगळ्या आकारांची, ओबडधोबड असली तरीही सुरेख दिसत होती. अशा एका बेटावर जाऊन त्याच्यावरच्या झाडांच्या सावलीत बसून पलीकडच्या समुद्राकडे पाहत बसणं हे काय सुख असेल असा विचार करतच मी ते आहे त्याच resolution मध्ये मनात कायमचं साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलो.
तेवढ्यात खाली काहीतरी हालचाल जाणवली म्हणून मी एकदम कारच्या तळातून खाली पाहिलं. खालच्या दाट झाडीत एका ठिकाणी एक मचाण होतं आणि त्याच्यावरून झाडांमधून किनाऱ्याच्या दिशेने जाणारे दोनचार मोठे दोरखंड लटकवून ठेवलेले होते. त्या दोरखंडांचा नजरेने पाठलाग करत मी अशाच एका किनाऱ्याजवळच्या बेटावर जाऊन पोहोचलो, जिथे ते दोरखंड अशाच एका प्लॅटफॉर्मवर कुठेतरी अडकवून ठेवले होते. माझ्या डोळ्यांदेखत चार जण अंगाला बांधलेल्या आणि वर दोरखंडावर लटकवलेल्या हूकच्या आधारे त्या मचाणावरून उड्या मारून मजेत घसरत सुसाट वेगाने त्या बेटाकडे गेले. त्यांना त्या मधल्या समुद्राच्या पट्ट्यावरून उडत जाताना विशेष मजा आली असावी. माझ्या मनात आलं की मीही थोड्याफार फरकाने तेच करत होतो, फक्त या अद्भुत दृश्याच्या बदल्यात मला बंद काचेच्या आत राहण्याची किंमत चुकवावी लागली होती. तो प्रकार एकदा करून पाहायचाच असं मी ठरवेपर्यंत शेवटचं स्टेशन आलं. तिथे टॉवरला वळसा घालताना तिथल्या माणसाने फक्त एकदा माझं दार उघडून माझं तिकीट ‘राऊंड’चं असल्याची खात्री करून घेतली आणि मिनिटभरातच माझी कार मला घेऊन परत निघाली.
शेवटच्या स्टेशनपलीकडे बेटाचा फार भाग उरला नव्हता असं परतीच्या प्रवासाला निघाल्यावर मागे वळून पाहताना कळलं. काही अंतरावर मागेही समुद्र दिसत होता आणि त्यात लांबवर कुठलीतरी महाकाय रचना दिसत होती, पण एवढ्या अंतरावरून ती तेलविहीर होती, का एखादी पॉवर ग्रिड होती ते कळू शकत नव्हतं. मग मी उजवीकडे डोळे लावून पुन्हा तो किनारा पाहण्यात मग्न झालो. यावेळेस पहिल्यांदाच माझं लक्ष पलीकडच्या समुद्राकडे गेलं. त्यात असंख्य मच्छीमारांच्या नावा सगळीकडे पसरलेल्या दिसत होत्या. दिवसभराचं काम आटोपून सगळ्या परतताना दिसत होत्या, पण त्या जात मुख्य बेटाकडे होत्या. विमानातून रात्रीच्या वेळेला पाहिलेल्या त्या अगम्य हिरव्या दिव्यांच्या साम्राज्याचं कोडं मी जरा विचार केला असता ते या नावा पाहून मला लगेच उलगडलं असतं. पण तेव्हा मी फक्त त्यांच्याकडे आणि एकूणच सगळ्याकडे बघत राहिलो; कधी नव्हे ते पूर्ण समाधान मिळाल्यावरच्या निर्विचार अवस्थेचा आनंद लुटत राहिलो.
मधलं स्टेशन पुन्हा ओलांडून पलीकडे पोचल्यावर सेंटोसाच्या इमारतींपलीकडे मला आणखी एक परिचयाचं दृश्य दिसलं. तुलनेने खूपच लांब असूनही पार्कच्या सगळ्या रचनांच्याही वरून स्पष्ट दिसत होत्या त्या सिंगापूरच्या Financial District च्या गगनचुंबी इमारती. अचानक माझ्या लक्षात आलं की जेमतेम चोवीसच तासांपूर्वी मी त्यांच्यामध्येच होतो. आजचा सगळा दिवसच इतका मनोरंजक, नवनवीन अनुभवांनी भरलेला आणि समाधानकारक ठरला होता की ती घटना खूपच भूतकाळात घडून गेल्यासारखी वाटत होती. प्रसन्न मनाने मी मघाशी चढलो होतो त्या स्टेशनला उतरलो आणि बाहेर पडलो. एस्कलेटर दुरुस्त झालेला होता.
घड्याळात वेळ बघितल्यावर मला मी साडेसहापर्यंत धोबीघाटला पोहोचेन असं लक्षात आलं म्हणून मी तसं घरी कळवून टाकलं. मधल्या काळात बाबांनी मला मी ज्यांना जेवणासाठी भेटणार होतो त्या त्यांच्या कलीगचा नंबर दिलेला होता. मी त्यांनाही मी सेंटोसा बेटावरून निघत असल्याची कल्पना दिली आणि मोनोरेलमध्ये चढलो ते थेट मुख्य बेटावर उतारण्यासाठीच.
समुद्रावरून मोनोरेलने मुख्य बेटापर्यंतचा प्रवास, मग त्या VivoCity मॉलच्या गच्चीवरून खाली उतरून सकाळच्याच मार्गाने पुन्हा हार्बरफ्रंट पर्यंत चालत जाणं आणि तिथून मेट्रोत बसणं हे सगळं मी अगदी यांत्रिकपणे पार पाडलं, कारण डोक्यात त्या कलीगना भेटण्याचे विचार सुरु झाले होते. बरोबर दहा वर्षांपूर्वी मी त्यांना भेटलो होतो, आणि तेव्हाच आयुष्यात पहिल्यांदा एक संपूर्ण संभाषण इंग्लिशमधून केलं होतं, ते सगळं मला आठवलं. तेव्हा मी त्यांना अगदी उत्साहाने भारतात यायचं आमंत्रण दिलं होतं ते मला आठवलं आणि हसू आलं. आज तो एक प्रश्न विचारायचाच असं मी ठरवलं. अजून त्यांच्याशी कायकाय बोलता येईल, आपण त्यांना ओळखू का, त्या ओळखतील का, आम्ही कुठे जाऊ, काय खाऊ, त्यांनी काही भेटवस्तू दिली तर ती सूटकेसमध्ये मावेल का, असे अनेक विचार डोक्यात गर्दी करत होते. तेवढ्यात धोबीघाट आलं. मी स्टेशनच्या बाहेर पडलो, कारण त्यांनी तिथे भेटूया असं म्हटलं असलं तरी तिथून कुठे जायचं ते ठरलेलं नव्हतं. मी तसाच स्टेशनबाहेर खास बसण्यासाठी ठेवलेल्या एका मोठ्या दगडावर बसून त्यांचा मेसेज यायची वाट पाहत राहिलो. थोड्याच वेळात तो आला. त्या मला परत खाली स्टेशनमध्ये बोलावत होत्या.
मी एस्कलेटर्स उतरून परत स्टेशनच्या आत शिरलो. मग एकमेकांचं लोकेशन व्हॉट्सॲपवरून एकमेकांना कळवत आम्ही हळूहळू जवळ यायला लागलो. सुदैवाने त्यांनीच मला ओळखलं आणि लांबूनच हात करून त्या माझ्यापाशी आल्या. त्या जवळ येईपर्यंत मी ‘हाय’ म्हणावं का ‘गुड इव्हिनिंग’ या प्रश्नावर विचार करत थांबलो होतो, पण त्यांनीच संभाषण सुरु करून माझी फालतू शंका लगेच निकालात काढली.
“केवढा उंच झाला आहेस!” त्या म्हणाल्या. “मागच्या वेळी पाहिलं होतं तेव्हा केवढासा होतास!”
मला एकदम खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल सिटीझन’ झाल्यासारखं वाटलं.
Have dinner with us on SG12
आदित्य,तुझी भाषा,प्रसंगांचे वर्णन, विचार शैली
ReplyDeleteफारच छान आहे.