जीवाचं सिंगापूर: वनपर्व १
अतिशय प्रसन्न मनाने मी मेट्रोत बसून ‘आंग मो किओ’ स्टेशन यायची वाट बघत होतो. हॉटेलमध्ये मावशींनी ब्रेकफास्टला पुन्हा वेगळ्या प्रकारच्या, पण नूडल्सच केल्यामुळे पोट व्यवस्थित भरलेलं होतं आणि कालच्या पायपिटीमुळे दमलेले पाय रात्रभराच्या गाढ झोपेनंतर पुन्हा अगदी फॉर्मात येऊन पुढच्या कामगिरीसाठी तयार झालेले होते. हे चांगलंच होतं, कारण माझ्या कार्यक्रमातल्या सगळ्या ठिकाणांपैकी या एका जागी खूप चालण्याला काहीच पर्याय नसल्याचं बाबांनी जातानाच सांगून ठेवलं होतं. सिंगापूरला दहा वर्षांपूर्वी आलेलं असताना जे जे मी पाहिलं होतं त्यापैकी या एकाच गोष्टीची मी पुनरावृत्ती करणार होतो.
कार्यक्रमात झू घालायचा की नाही यावरून आमच्या त्या अंतहीन तयारीच्या दिवसांमधल्या एका लक्षणीय प्रसंगी वाद झाला होता. मी स्वतःहून ठरवलेल्या गोष्टी सुरुवातीला तशा सगळ्याच पूर्वी पाहिलेल्या होत्या; अपवाद अर्थातच फक्त मरिना बे सँड्सचा. तर आईबाबांचा आग्रह होता की मी इतर नवीन गोष्टींना प्राधान्य द्यावं, आणि हळूहळू त्यांच्या सूचना पास होत गेल्या. एकट्या झूवर मी अडून राहिलो होतो. सिंगापूरची पहिली सफर माझ्यासाठी तेव्हा सर्वार्थाने विलक्षण ठरलेली असली तरी त्यापैकी झू हा प्रकार विशेष लक्षात राहिलेला होता. झू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे पिंजऱ्यात ठेवलेल्या कंटाळलेल्या प्राण्यांचं उदासवाणं चित्र येतं त्याच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरचा झू थक्कच करून सोडणारा होता. त्याला झू म्हणण्यापेक्षा एक कृत्रिम अभयारण्यच म्हणावं, आणि कृत्रिमही अशासाठी की त्या झूमधल्या खूप कमी प्राण्यांचं ते खरंखुरं नैसर्गिक निवासस्थान आहे. त्यापलीकडे ते एक अवाढव्य जंगलच आहे, ज्यामध्ये मानवी infrastructure जवळपास काहीच लुडबूड करत नाही.
हे जंगलदेखील शहरामधलाच एखादा बारगळलेल्या बांधकामाचा प्लॉट विकत घेऊन त्यात उभारलेलं नाहीये. सिंगापूरच्या मुख्य बेटाच्या मध्यभागी काही खूप मोठे जलाशय आहेत आणि त्यांच्या आजूबाजूचा मोठा भाग संवर्धनासाठी खास जपून ठेवण्यात आला आहे. त्यापैकीच एका जलाशयाच्या काठावर हा झू आहे. हा सगळा परिसर मुख्य शहरापासून तसा यशस्वीरीत्या अलिप्त ठेवण्यात आला आहे, आणि त्यामुळेच झूला जायला मेट्रोची सोय नव्हती. मेट्रोने ‘आंग मो किओ’ला उतरून, तिथल्या बसडेपोतून एक शटल बस घेऊनच झूला जाता येतं. त्या स्टेशनची घोषणा झाल्यावर मी लगेच उतरायची तयारी केली.
हे स्टेशन सिंगापूरच्या काही मोजक्याच स्टेशन्सप्रमाणे जमिनीच्या वर बांधलेलं होतं. गेली काही मिनिटं मला मेट्रोतूनच आसपासचा परिसर पाहता येत होता. हा सगळा भाग बेटाच्या वायव्य भागात असून दक्षिणेला असलेल्या ‘डाऊनटाऊन’ पेक्षा खूपच वेगळा दिसत होता. इथल्या इमारती एकमेकींपासून तशा अंतरावर होत्या आणि अधूनमधून खूप झाडी पसरली होती. रस्तेही रुंद आणि दुतर्फा झाडं असलेले होते. इमारती अधूनमधून दिसायच्या त्याही मुख्य रस्त्यांपासून लांब, गल्ल्यांच्या टोकांना, आणि त्यातही मुख्य रस्त्यालगतच्या झाडीच्या वर डोकं काढण्याइतक्या ज्या उंच होत्या त्याच. मेट्रोचा पूल मुख्य रस्त्याच्या कडेकडेनेच चाललेला होता. त्या स्टेशनवर अखेर उतरून मी एस्कलेटरने खाली जमिनीवर आलो तेव्हा मी एका लहानशा साईड-रोडवर उभा होतो आणि माझ्या शेजारीच बसस्टॉप होता. तिथली माहिती वाचून माझ्या लक्षात आलं की माझी शटल तिथून सुटणार नव्हती; मुख्य बसडेपो पलीकडच्या इमारतीमध्ये होता. त्या इमारतीला आणि या स्टेशनला जोडणारा एखादा भुयारी मार्ग असेल असा तर्क मी केला, तो बरोबरच निघाला.
जमिनीखालून बसडेपोच्या अवाढव्य इमारतीत प्रवेश केल्यावर माझ्या अचानक लक्षात आलं, की या एका यंत्रणेची समांतर यंत्रणा घरी आपल्या अगदीच परिचयाची होती. मला आठवलं की विमानतळावर मी इथल्या सगळ्या गोष्टींचं एका ‘विकसित’ देशाचा भाग म्हणून निरीक्षण करण्याचं ठरवलं होतं. पण त्यानंतर भारतातल्या अनुभवाच्या गोष्टीशी थेट तुलना करता येईल अशी कुठली गोष्ट सापडली नव्हती. पुण्यातली बससेवा मात्र माझ्या अगदी अतिपरिचयाची असल्यामुळे मी तिच्याशी हिची तुलना करायचं ठरवलं. मी आत्तापर्यंत बघितलेले सिंगापूरमधले सगळे बसस्टॉप्स डोळ्यापुढे आणले. त्यांच्यात आणि पुण्याच्या बसस्टॉप्स मध्ये आकार, बसण्याची जागा, सावली वगैरे निकष लावून पाहता अजिबात काही फरक नव्हता, पण तरी एक गोष्ट आपल्या लगेच दृष्टीस पडते. ती म्हणजे सिंगापूरच्या बसस्टॉपवर तिथून जाणाऱ्या सगळ्या बसेसचे नंबर्स, मार्ग एका मोठ्या डिस्प्लेवर व्यवस्थित मांडून ठेवलेले असतात, तसंच एका ठराविक त्रिज्येतील परिसराचा नकाशाही असतो. या सगळ्यामुळेच मला मी पाहिलेल्या प्रत्येक बसस्टॉपवर पोचताक्षणीच याचा आपल्याला उपयोग नाही हे लक्षात आलं होतं, शिवाय त्याऐवजी मी कुठे जायला हवं तेही लगेच कळलेलं होतं. आत्ताही तसंच झालं होतं. त्या स्टेशनच्या खालच्या छोट्याशा बसस्टॉपवर इत्यंभूत माहिती नसती तर मला मुख्य डेपोत जायचं आहे हे कधी लक्षात आलं असतं कोण जाणे. पुण्यात मात्र ही गरजेची माहिती सोडाच, पुष्कळदा स्टॉपचं नावही ठळकपणे लिहिलेलं नसतं. अननुभवी प्रवाशांना नेहमीच्या प्रवाशांची मदत होईल या गृहितकावर आपल्याकडची यंत्रणा चालते, आणि ते नेहमीचे प्रवासीही मूळचे पुण्याचेच असल्याचा तपशील विसरते. त्यामुळे बसचा कंडक्टर हा प्रमुख मदतनीस ठरतो. मग स्टॉपवर बस थांबते त्या काही मोजक्या क्षणांमध्ये त्या कंडक्टरला ‘दादा’ बनवून हवी ती माहिती मिळवली जाते. या पद्धतीमुळे संभाषणकला टिकून राहते असं म्हणणं म्हणजे नोकरशाहीच्या प्रक्रियांमुळे भावनांवर विजय मिळवण्याची विद्या साध्य होते असं म्हणण्यासारखं आहे.
अर्थात, ही लहानशीच पण महत्त्वाची तफावत फक्त यंत्रणेच्याच पातळीवर दृष्टीस पडते असं नाही. मी त्या डेपोच्या इमारतीतून बऱ्याच योग्य ठिकाणी लावलेल्या पाट्यांच्या आधारे माझी बस येणार होती त्या ‘Bus Bay’पाशी पोचलो. तिथे त्या गेटशी काटकोन करून तीन स्टीलचे खांब एकमेकांना समांतर असे विभाजक म्हणून बांधलेले होते आणि रांगा करण्याची सोय करण्यात आलेली होती. अगदी पहिल्या रांगेत मी पोचेपर्यंत लोकांनी त्या पहिल्या विभाजकाची लांबी व्यापलेली होती, म्हणून मी दुसऱ्या रांगेत शिरलो. बस यायची वाट पाहत असताना मला असं दिसलं की माझ्यानंतर येणारे सगळेच अगदी सहजपणे माझ्याशेजारी दुसऱ्या रांगेत येऊन उभे राहत होते. दुसऱ्या विभाजकाचीही लांबी लोकांनी भरली तसे त्याच्या पुढचे लोक तितक्याच शांतपणे तिसऱ्या विभाजकाला लागून रांग करू लागले. एरवी अशा विभाजकांची एकाआड एक टोकंही जोडून लोकांना त्या रांगांतूनच फिरण्यापलीकडे काही पर्याय न ठेवण्याची पद्धत असते. विमानतळांवर मी तेच पाहत आलेलो होतो. पण इथे अगदी सुमडीत थेट पहिल्या विभाजकाच्या पुढे जाऊन तिथल्या लोकांना अगदी सहजपणे खेटून उभं राहणं शक्य असतानाही लोक त्या विभाजकांचा आदर करत होते. पहिली बस आली तेव्हा ती आधीपासूनच पुष्कळ भरलेली होती, त्यामुळे पहिल्या विभाजकापुढचे लोक आत गेले आणि त्यांच्या मागचे लोक हललेदेखील नाहीत. एकतर पुढची थोड्याच वेळात येईलच हा विश्वास, आणि शिवाय कमालीची शिस्तप्रियता! सिंगापूरमध्ये आल्यापासून ही एक गोष्ट मात्र मला पावलापावलावर जाणवली होती. पण या सगळ्याला कारणीभूत फक्त त्यांचा हा स्वभावच नव्हता. बाबांनी मला सांगितलं होतं की सिंगापूरमध्ये आपण आपल्याकडे ज्या गोष्टींना साधंसुधं समजतो त्यांच्यावर खूप दंड लावलेले आहेत, शिवाय अशा कुठल्याही प्रकारची वागणूक रस्त्यांवर सर्वत्र बसवलेल्या CCTV मध्ये लगेच कैद होते आणि एरवी कुठेही पोलीस फिरताना दिसले नाहीत तरी पुढच्या चौकात ते तुम्हाला व्यवस्थित गाठू शकतात. आता कडक शिस्तीला जपेल अशी कार्यक्षम यंत्रणा आणि ती शिस्त पाळणारा समाज या दोन variables पैकी dependent कुठलं आणि independent कुठलं ते मला ठरवता येईना. शेवटी मी अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो, की दोन्ही गोष्टी परस्परांना अनुकूल ठरत असाव्यात. तसे दंड आपल्याकडेही अस्तित्त्वात असूनही आपल्यातली नैसर्गिक बंडखोरी त्यांच्यावर मात करते. सिंगापूरमध्ये ही बंडखोर वृत्ती अजिबातच नसणं शक्यच नाही, पण शिस्त मोडण्याची कृती इतकी दुर्मिळ ठरते की दंडामुळे नाही तर सामाजिक प्रभावामुळे ती कोणी करायला जात नाही. पण समाजतल्या बहुसंख्य शहाण्या लोकांना ती शिस्त मोडावीशी वाटूच नये यासाठी सगळी यंत्रणा कार्यक्षम आणि उपयुक्त असावी लागते. जर बस ठरल्याप्रमाणे दर पाच मिनिटांनी येणार असेल तर रांगेत शहाण्यासारखं थांबायला कोणाला का अडचण वाटेल, आणि खरंच प्रत्येक रस्त्यावर ठराविक अंतरावर स्वच्छ, भरून न वाहणाऱ्या कचऱ्याच्या पेट्या असतील तर रस्त्यावर कोणी का कचरा करेल? आपल्याकडच्या बंडखोर स्वभावाचा एक महत्त्वाचा घटक यंत्रणेवरचा अविश्वास आणि तिच्या निष्काळजीपणाची पुरेपूर कल्पना हा असतोच. या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे घडल्या तरच इतकं सुंदर काहीतरी आकाराला येऊ शकतं आणि टिकूही शकतं.
पण या निष्कर्षावर पोहोचल्यावर माझ्या असंही लक्षात आलं, की या सगळ्याचा अर्थशास्त्राच्या भाषेतील विकासाशी तसा काहीच संबंध असण्याचं कारण नाही. हे अगदी असंच मी दुबईतही पाहिलेलं होतं. UAE देशाची अर्थव्यवस्था अजूनही मुख्यतः नैसर्गिक उत्पादनांवर (तेलावर) बेतलेली असल्यामुळे आपण त्याला विकसित म्हणत नाही, पण तरीही एक अतिशय आखीवरेखीव, सुबक आणि नित्यस्वछ शहर म्हणून दुबईत अजिबात काही कमी नाही. फार लांब कशाला जा? आपल्याकडच्या शहरांमध्येही हाच प्रकार तसा पाहायला मिळतो. हैद्राबादचे ‘हायटेक सिटी’ आणि ‘गचीबोली’ भाग हेही अगदी तसेच दिसतात, पण जुन्या गावातलं चित्र मात्र पूर्णपणे वेगळं असतं. थोडक्यात मी अशा उत्तरापाशी आलो की एखाद्या ठिकाणाचं एकूण रूप घडवायला त्याच्या आर्थिक प्रगतीइतकीच सामाजिक घडीही तितकीच महत्त्वाची ठरते.
माझी विचारांची आगगाडी एवढी धावेपर्यंत बसचंही धावून झालेलं होतं. गेल्या किमान अर्ध्या तासापासून आम्ही जवळपास संपूर्णपणे हिरव्या जगातून प्रवास करत होतो. आता मात्र हळूहळू जरा आजूबाजूची वर्दळ वाढायला लागली आणि थोड्याच वेळात आम्ही इतर अनेक गाड्यांनी भरलेल्या एका मोठ्या पार्किंगमध्ये थांबलो. आमची बस ही शटल असल्यामुळे आम्ही उतरल्याक्षणी उलट्या पावली पसार झाली आणि बसमधले सगळे लोक काउंटरपासच्या गर्दीत सामील झाले.
मी रांगेत शिरल्यावर माझा तो स्टेपल केलेला कागदपत्रांचा गठ्ठा बाहेर काढला. तो मागे वापरला होता परवाच पण ती घटना खूपच पूर्वीची वाटायला लागलेली होती. त्या काउंटवरवर मी त्यातला योग्य तो कागद दाखवला. मी पुण्यातूनच ऑनलाईन विकत घेतलेल्या सगळ्या गोष्टींपैकी हे एकच तिकीट अजून माझ्या ताब्यात यायचं राहिलं होतं. तो कागद तपासून त्या बाईने माझ्या हातात एक तिकीट दिलं आणि एक नकाशाही दिला.
प्रवेशद्वारातून आत शिरताना माझ्या मनात दहा वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा जाग्या व्हायला लागलेल्या होत्या. बहुतेक सगळं अंधुकसं आठवत असलं, तरी ठळकपणे तीन गोष्टी माझ्या लक्षात राहिलेल्या होत्या. एक म्हणजे एका उत्साही सील माशाचा खेळ होता. मागच्या वेळी मी त्याला त्याच्या टँकच्या काठावर उभं राहून खूप उत्साहाने करामती करताना पाहिलेलं होतं. तेव्हा त्या सगळ्या करामती उत्स्फूर्त आणि अगदी मनापासून केलेल्या वाटल्या होत्या, पण ते खरंच कितपत तसं असेल याबद्दल मला आता शंका वाटायला लागलेली होती. मी नकाशावर त्या सील माशाच्या ‘शो’ च्या वेळा बघितल्या. यावेळी हा शोच काय, पण सगळ्याच बाबतीत फक्त सगळं आपलं कौतुकाने बघण्याच्या ऐवजी त्या प्राण्यांच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करायचा असं ठरवलं. आपण किती म्हटलं की सिंगापूरचा एकूणच निसर्ग आणि पशुपक्ष्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच पुढारलेला असला, आणि या सगळ्या प्राण्यांचे habitats त्यांनी शक्य तितके खऱ्यासारखे तयार करण्याचा प्रयत्न केलेला असला, तरी त्या प्राण्यांना हे सगळं रुचतंय असं गृहीत धरूनच आपण गेलं पाहिजे हे काही योग्य नाही असं मला वाटलं. झूमधल्या प्राण्यांच्या सुखाबद्दल शंका उत्पन्न होण्यासाठी फक्त अस्वच्छ, छोटे पिंजरे किंवा त्यांना त्रास देणारे कर्मचारी एवढंच असावं लागतं असं नाही. या उघडउघड होणाऱ्या अत्याचारांशिवाय छुप्या अनेक गोष्टी असतात. सिंगापूरची natural philosophy खरोखरच त्याच्या स्वभावात मुरलेली आहे का ते पडताळून पाहण्याची संधी मला या झूच्या निरीक्षणातून मिळेल असं मला वाटलं.
दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मागच्या भेटीत लळा लावणारं एक गोंडस पोलर अस्वल होतं आणि त्याला पुन्हा बघण्याची माझी खूप इच्छा होत होती, पण सर्वांत जास्त आठवण मला येत होती ती तिथल्या तीन पांढऱ्याशुभ्र बंगाली वाघांची. मला त्यांची ‘विनी’, ‘जिप्पी’ आणि ‘ओमर’ ही नावंही आठवत होती. मी नकाशात बघितलं. वाघाच्या जेवण्याच्या वेळेला सर्वांना त्यांना मनसोक्त पाहण्याची संधी दिली जाते आणि ते चुकवायची माझी अजिबात इच्छा नव्हती, म्हणून मी बाकीचा सगळा बेत त्या वेळेला पाळून आखला. नकाशात मध्यभागी असलेल्या छोट्याशा उपाहारगृहाचं ‘आह मेंग’ हे नाव वाचून मला त्याच नावाची एक ओरांगउटान माकडीण आठवली. या सगळ्यामुळे मला एकदम ओळखीच्या ठिकाणी आल्यासारखं वाटायला लागलं आणि प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मी शांतपणे नकाशा मिटून समोर दिसणाऱ्या एका रस्त्याला लागलो.
Now it's really zoo time on SG14
Now it's really zoo time on SG14
सुंदर वर्णन......!!
ReplyDeleteआदित्य,ब्लॉग वाचला.वर्णन सोप्या भाषेत, मुद्देसूद व उत्सुकता वाढवणारे आहे
ReplyDeleteNice description.
ReplyDelete