जीवाचं सिंगापूर: आगमनपर्व
स्थळ होतं बोर्डिंग गेट क्रमांक G8, टर्मिनस ४, चांगी विमानतळ, सिंगापूर. वेळ पहाटेचे अडीच. मी एका चेरीच्या रंगाच्या गुबगुबीत आरामखुर्चीत बसून ‘द कन्फेशन’च्या उत्तरार्धातलं एक प्रकरण वाचत होतो. माझ्या शेजारी तशाच एका खुर्चीत एक लिंबाच्या रंगाचे safety vest घातलेला कर्मचारी गाढ झोपलेला होता. आजूबाजूला पुष्कळसे भारतीय आणि काही परदेशी लोक बसलेले होते. सगळं व्यवस्थित पार पडल्यावर अनुभवायला मिळते त्या मनःशांतीचा आस्वाद घेत मी बोर्डिंग सुरु व्हायची वाट बघत होतो.
दहा वाजता विमानतळावर पोचल्यावर मी माझा मोर्चा थेट पुन्हा ज्युएलकडे वळवला होता आणि रात्रीचा एक वाजेपर्यंत तिथेच वेळ काढला होता. रात्री ज्युएलचे एक वेगळेच रूप माझ्या समोर आले होते. रात्री तिथे त्या मधल्या गोलाकार ‘विहिरीत’ थेट छतातून पाण्याचा धबधबा सोडलेला असायचा. तो अधूनमधून स्वतःहूनच रंग बदलत राही. याशिवाय तिथे त्याचे खास शो पण होते, ज्यात बाकी सगळीकडे अंधार करून त्या धबधब्याच्या पाण्याचाच पडद्यासारखा वापर करून काही प्रकाशाच्या करामती दाखवल्या जायच्या. तो अगदी अद्भुत असा नव्हता, पण स्वप्न पाहत असल्यासारखं वाटावं एवढा खास तरी होताच. माझ्या लेखी माझ्या ट्रिपचा शेवट याहून चांगल्या प्रकारे होऊच शकला नसता: ज्युएलच्या अतिशय प्रसन्न वातावरणात आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यांमध्ये प्रतिबिंब टाकून एक वेगळीच चमक आणणाऱ्या त्या प्रकाशाच्या खेळाकडे स्वप्नाळू नजरेने, बाकी कशाचीही चिंता न करता नुसतं बघत राहायचं…. मला तो प्रकार एवढा आवडला की साडेदहा, साडेअकरा आणि साडेबारा वाजताचे तिन्ही शो मी चुकवले नाहीत. उरलेला वेळ त्या मॉलमध्ये भटकत काढला. तिसऱ्या शोनंतर अगदी समाधानी मनाने ज्युएलचा निरोप घेऊन टर्मिनस २ कडून ४ कडे जायला निघालो.
चेक-इनची प्रक्रिया पार पडेपर्यंत मी तेच पुस्तक वाचत चार दिवसांपूर्वी ज्या लॉबीत बसलो होतो तिथेच बसून राहिलो होतो. तेव्हाच्या आणि आत्ताच्या मनःस्थितीतला फरक पुन्हापुन्हा जाणवत होता. तेव्हा जर मी खचून गेलो असतो किंवा त्या फोनच्या घटनेवर ‘विश्वाकडून अमंगळ संकेत येतायत’ वगैरे भंकस विचार केला असता तर आत्ता मी ज्या समाधानाच्या आणि निखळ आनंदाच्या भावनेची मजा घेऊ शकत होतो तीही घेता आली नसती.
यावेळी बंगलोरला असलेला ‘ले-ओव्हर’ आधीपेक्षाही जास्त असल्यामुळे ‘Through Check-In’ मिळण्याची शक्यता कमीच होती, पण तरी मी विचारून घेतलं, आणि खात्री केल्यावर ‘बंगलोरला भेटू’ असं म्हणून सूटकेसला निरोप दिला. याही वेळेला मला खिडकीची सीट मिळाली होती. माझा बोर्डिंग पास घेऊन मी गेटकडे जाण्यापूर्वी एका फूडकोर्टमध्ये थंडगार लिंबूसरबत प्यायला गेलो. का कोण जाणे, पण मला त्या पहिल्या दिवशीच्या ‘समस्येवर’ सर्वार्थाने भावनिक विजय मिळवण्याची काहीतरी इच्छा होत होती. त्यामुळे सिंगापूरमधली माझी पहिली खरेदी मी खूप उदास, चिंताक्रांत अवस्थेत केलेली होती हे ध्यानात ठेवून, एक शेवटची खरेदी अगदी विजयी मुद्रेने हसत हसत करावी असं मला वाटत होतं. मला हवं होतं ते ‘closure’ या खरेदीने मला दिलंच; आणि माझ्या गेटपासून रेस्टरूम्स जरा लांब असल्याने त्या विजयाच्या भावनेची किंमत माझ्या आधीच दमलेल्या पायांना दोनतीनदा चुकवावी लागली.
बंगलोरपर्यंतचा विमानप्रवास मला फारसा आठवत नाही, कारण बहुतेक सगळा प्रवासभर मी गाढ झोपेत होतो. गंमत म्हणजे, सिंगापूरला येतानाच्या प्रवासात मला चांगली आडवं होता येईल इतकी जागा मिळाली असूनही मला इतकी शांत झोप लागली नव्हती. यावर विचार करता मला पुन्हा एकदा मनःस्थितीतला फरक दिसून येतो. जाताना दर काही काळाने छातीवरचा पासपोर्ट चाचपून पाहणे, तो गुलाबी फॉर्म भरणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनपेक्षित गोष्टीला सामोरं जाण्याची तयारी करणे या सगळ्या गोष्टी मनात होत्या. आता मात्र त्यापैकी एकही मला सतावत नव्हती. मी घरी चाललो होतो. सिंगापूरमध्ये आल्यावर या सगळ्या भीत्या गेल्याच होत्या, कारण त्यांच्या यंत्रणेची कार्यक्षमता पाहून सुरक्षित वाटल्याशिवाय राहत नाही; आणि भारतातल्या कुठल्याही शहराच्या infrastructure वर मी तितक्या सहजपणे विश्वास टाकला नसता. पण तरीही, परत जातानाच मी जास्त शांत होतो हे माझ्या लक्षात आलं. त्या तेव्हाच्या माझ्या पूर्ण ‘relaxed’ अवस्थेने मला ‘शेवटी आपला देश तो आपला देश’ हे व्यवस्थित पटवून दिलं.
या ट्रिपमध्ये मी खूप काही शिकलो असं मला वाटतं; तेव्हाही वाटत होतं. पण माझे धडे तेव्हा संपायचे होते. माझं भारतातल्या यंत्रणांबद्दलचं आणि infrastructure बद्दलचं मत अगदी पूर्णपणे बदलणारा एक जबरदस्त धडा मला काही तासांतच मिळणार होता.
सूर्य आणि मी एकाच वेळी बंगलोरला पोचलो. उतरायच्या अगदी काही क्षण आधी ढगांच्या वरची लालसर किनार पाहिल्यावर माझी पुन्हा एकदा जगात याच्याइतकी सुंदर दृश्ये खूप कमी असतील अशी खात्री पटली. सूटकेस मिळण्याच्या आधी इमिग्रेशनची प्रक्रिया पार पाडायची होती, त्यामुळे एका मोठ्या हॉलमध्ये विमानातले सगळे रांग करून उभे राहिले आणि पलीकडच्या तीन काउंटर्सवरच्या अधिकाऱ्यांनी एकेकाला बोलवायला सुरुवात केली. माझी पाळी आल्यावर मी त्यांच्याकडे चालत जाताना शिताफीने माझ्या शर्टाच्या आतल्या पाऊचमधून पासपोर्ट काढला; आता ती एक गोष्ट करण्यात मी विशेष पारंगत झालेलो होतो. त्यांनी माझा पासपोर्ट तपासताना मला काही फार प्रश्न विचारले नाहीत; फक्त शिक्के नीट वाचले आणि शेवटी बंगलोरच्या शिक्का त्यांच्याशेजारीच मारून मला पुढे पिटाळलं. त्या वेळी ‘इन्सेप्शन’मध्ये लिओनार्डो डिकॅप्रिओला अमेरिकेत घेताना अधिकारी जसे ‘वेलकम होम’ म्हणतात तसं या अधिकाऱ्यांनी मलाही म्हणावं असं मला खूप वाटून गेलं, पण मी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चोर नसून चारच दिवसांपूर्वी यांनाच भीतभीत ‘जाऊ ना?’ असं विचारून देशाबाहेर पडलेला सामान्य प्रवासी असल्याने तसलं काही अर्थातच घडलं नाही. तिथून बाहेर पडल्यावर एक गोष्ट अचानक माझ्या लक्षात आली आणि मी लगेच एक बाक शोधून बसलो आणि पासपोर्ट त्या पाऊचसकट माझ्या सॅकमध्ये ठेवून दिला. त्याची गरज संपली होती. मी माझ्या हक्काच्या जमिनीवर होतो.
या खेपेला त्या फिरत्या पट्ट्यांवरून माझी बॅग इतक्या लवकर आली की मला मागचा प्रसंग आठवून गंमतच वाटली. मागच्या वेळी जेव्हा ती आलीच नसती तर मला सॅकमधल्या जास्तीच्या कपड्यांवर माझी सगळी ट्रिप निभावून न्यावी लागली असती अशी परिस्थिती होती, तेव्हा तिने माझा अंत पाहिला होता, आणि आता मात्र सगळ्या सूटकेसेसचं नेतृत्व करत असल्याच्या थाटात ती उगवली होती. अर्थात, आता कपड्यांचा काही प्रश्न उरला नसला तरी सूटकेस हरवली तरी चालेल असं मला अजिबातच वाटत नव्हतं. पण यामुळे मला सगळं जरा विशेषच सुरळीत चालत असल्यासारखं वाटायला लागलं. माझ्या आयुष्यातल्या पहिल्या एकट्याने केलेल्या विमानप्रवासाचे चारपैकी तीन टप्पे अगदीच व्यवस्थित पार पडलेले होते आणि उरलेला टप्पा माझ्या दृष्टीने सगळ्यात सोपा होता, त्यामुळे मी कधी नव्हे ते अगदी निश्चिंत होतो आणि आता काय चुकू शकणार आहे असं मला फार वाटत होतं. Famous last words.
मी विमानतळाच्या मुख्य बाहेरच्या लॉबीत आलो तेव्हा मला असं दिसलं की माझ्या पावणेबाराच्या फ्लाईटचं चेक-इन, तेव्हा आठच वाजत असले तरी सुरु झालेलं होतं. मी रांग वगैरे लागायच्या आत लगेच ते उरकून टाकलं आणि मग वरच्या मजल्यावर सुरक्षा तपासणीसाठी गेलो. त्यांनी पुढच्या अनेक फ्लाईट्सचं चेक-इन तेव्हाच करायला सुरुवात केलेली असल्याने, सुरक्षा तपासणी कक्ष अगदी भरून वाहत होता. मी एका रांगेत लागलो आणि एका मिनिटाला एक पाऊल या गतीने पुढे सरकत राहिलो. खूप वेळाने सरकत सरकत जेव्हा ते तपासणीचे काउंटर्स दृष्टीपथात आले तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी शेजारच्या पट्ट्यावरून रिकामे ट्रे उचलायला सुरुवात केली. मीपण एक ट्रे उचलला आणि माझी सॅक त्यात ठेवून दिली, पण मग माझं तिथल्या एका पाटीकडे लक्ष गेलं. त्याच्यावर लिहिलेल्या सूचनेनुसार, चार्जर आणि लिथियम आयन बॅटरीज स्वतंत्रपणे जाहीर करायच्या होत्या. माझ्या पुढच्या काही लोकांनी त्यांचे लॅपटॉप्स, फोन्स वगैरे ठेवायला वेगळे ट्रे काढायला सुरुवात केली. माझ्याकडच्या गडद निळ्या रंगाच्या दुसऱ्या एका पाऊचमध्ये मी माझा चार्जर, adapters आणि दुसरा फोन ठेवलेला होता, त्यामुळे मी ते पाउचच काढून सरळ दुसऱ्या एका ट्रेमध्ये ठेवून तो माझ्या सॅकसोबत पुढे पाठवून दिला.
माझ्या शारीरिक तपासणीत अपेक्षेपेक्षा जरा जास्त वेळ गेला कारण एका कर्मचाऱ्याला रिकाम्या ट्रेंचा एक मोठा मनोरा त्या डिटेक्टर यंत्रातून घेऊन जायचा होता. त्यामुळे माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर तब्बल पाच मिनिटांनी मी त्या यंत्रातून पास होऊन माझी सॅक आणि पाऊच घ्यायला गेलो. सॅक उचलल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली आणि क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.
पाऊच गायब होतं.
सुरुवातीचा काही वेळ मला काहीतरी गडबड झाल्यासारखंच वाटलं, त्यामुळे मी तिथल्या अनेक अधिकाऱ्यांच्या नजरेस येणार नाही अशाप्रकारे थोडा वेळ घुटमळून येणारे सगळे ट्रे पाहून घेतले. दहा मिनिटानंतर माझं पाऊच खरंच गेल्याचं लक्षात येताच मी तिथे मागे एका टेबलाशी बसलेल्या CISF इन्स्पेक्टरकडे गेलो. एका पोलीस अधिकाऱ्याशी पहिल्यांदाच बोलायचा प्रसंग असल्यामुळे मी त्यांचं माझ्याकडे लक्ष जाईपर्यंत तिथे शांत उभा राहिलो. मग त्यांनी विचारल्यावर मी त्यांना सगळी गोष्ट थोडक्यात सांगितली. त्यांनी मी ते शोधायचा प्रयत्न केला होता का ते विचारलं आणि मी हो म्हणालो. एवढं झाल्यावर ते स्वतः उठले आणि एकदा त्या सगळ्या परिसरावर नजर फिरवून आले. मग त्यांनी त्यांच्या हाताखालच्या एका अधिकाऱ्याला काही सूचना दिल्या आणि मला म्हणाले, “तुमच्या पाऊचमधल्या फोनला एक रिंग देऊन पाहता का?”
ते ऐकून मी माझा फोन काढला, आणि तेव्हाच हा फोनही त्या पाऊचमध्ये घालण्याचा निर्णय न घेतल्याचा खूप आनंद झाला. पण तो लगेच ओसरला, कारण त्या दुसऱ्या फोनमध्ये फक्त सिंगापूरमध्ये चालणारं कार्ड होतं असं माझ्या लक्षात आलं. त्या दुसऱ्या फोनवर Hangouts मात्र होतं, म्हणून मी लगेच घरी फोन करून बाबांना त्या फोनला Hangouts वर कॉल करायला सांगितलं, पण त्यानंतर लगेचच मला तो फोन अजूनही ‘एअरप्लेन मोड’वर असल्याचं लक्षात आलं, त्यामुळे त्याचाही उपयोग झाला नसता. मी हे सगळं त्या इन्स्पेक्टरना सांगितल्यावर त्यांनी मला तिथेच थांबायला सांगितलं आणि ते इतर काही अधिकाऱ्यांना घेऊन कुठेतरी गेले. तिकडे घरी मी अचानक असं का विचारतोय ते न कळल्याने जरा खळबळ उडाली होती. मी त्यांना सगळं ठीक असल्याचं आणि नंतर सविस्तर सांगेन असं कळवून टाकेपर्यंत ते अधिकारी परत आले होते.
“आम्ही आता आमच्या अधिकाऱ्याला सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी तयार करायला सांगितलंय, त्यामुळे थोड्याच वेळात आपल्याला नक्की काय झालं ते कळेल. तुम्हाला अजून थोडा वेळ थांबायला वेळ आहे ना?” त्या इन्स्पेक्टरने विचारलं आणि मी होकार दिला. ते पुढे म्हणाले, “चिंता करू नका, तुमचं पाऊच जिने उचललं असेल त्या व्यक्तीला सीसीटीव्हीमध्ये पाहिल्यावर आम्ही लगेच तिचा फोटो आणि पाऊचचं वर्णन इथल्या सगळ्या CISF अधिकाऱ्यांना कळवू म्हणजे ते तयार राहतील. तुम्ही आत्ता तिकडे जाऊन बसा आणि काही कळलं की आम्ही लगेच तुम्हाला कळवू. आणि मला तुमचा नंबर देऊन ठेवा.”
मी त्यांच्या सांगण्यानुसार पलीकडचा हॉलमधल्या एका बाकावर जाऊन बसलो. त्या इन्स्पेक्टरचा एकूण आविर्भाव, दिलासा देणारा सूर आणि शॉर्ट्स घातलेल्या मला सतत ‘सर’ असं संबोधणं या सगळ्याचा माझ्यावर चांगला परिणाम झालेला होता; शिवाय त्यांनी इतक्या चपळाईने सगळी यंत्रणा जागृत केलेली पाहून ते मिळेल असा विश्वासही वाटायला लागलेला होता. मग त्यांनी मला हाक मारेपर्यंतची वीसेक मिनिटं मी स्वतःला ‘इथे तू काही माती खाल्लेली नाहीयेस,’ असं बजावत राहिलो.
मी परत त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांच्यासोबत साध्या कपड्यातले एक दुसरे इन्स्पेक्टर तिथे होते. त्यांनी मला त्यांचा हुद्दा समजावून सांगितला पण तेव्हा त्या अवस्थेत ते सगळं माझ्या डोक्यावरून गेलं. मग लगेच मुद्द्यावर येऊन त्यांनी आणि आधीच्या इन्स्पेक्टरनी मला सगळं समजावून सांगायला सुरुवात केली.
“आम्ही फुटेज पाहिलं. पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या या बाईंनी तुमचा पाऊच उचलला असं आम्हाला कळलंय.” ते म्हणाले. त्यांनी त्यांच्या फोनवर मला त्या बाईचा फोटोही दाखवला. तो त्यांच्या तिथल्या अधिकाऱ्यांच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवरून सगळ्यांना पाठवण्यात आलेला होता. “त्या घाईत असाव्यात असा आमचा अंदाज आहे, कारण त्यांची इथून क्लिअर झाल्यानंतर पंधराच मिनिटांत भुवनेश्वरची फ्लाईट बोर्ड होणार होती. हे सगळं आमच्या लक्षात येईपर्यंत ते विमान गेलं. पण तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कळवलं की त्या बाई त्या विमानात चढल्या होत्या, त्यामुळे तुमचं पाऊच आत्ता भुवनेश्वरला जायला निघालंय.”
हे ऐकल्यावर मला वाईट वाटलं खरं, पण किमान ते कुठे होतं ते तरी कळलं होतं. “मग आता आपण पुढे काय करू शकतो?” असं मी त्यांना विचारलं. त्यांच्याकडे उत्तर तयार होतं.
“आम्ही भुवनेश्वर विमानतळावरच्या CISF प्रमुखाला कळवलं आहे आणि त्यांनी त्यांचे अधिकारी तयारीत ठेवले आहेत. ते विमान उतरलं की लगेच आम्ही त्या बाईला अडवू आणि तुमचं पाऊच परत मिळवू.” ते म्हणाले. “तुम्हाला ते मिळेल अशी मला नव्वद टक्के शक्यता वाटतेय, पण आपण ही शक्यता विचारात घेतली पाहिजे की कदाचित ती बाई ते तिचंच असल्याचा दावा करेल. मग हे कोर्टात जाईल.”
“त्यामुळे तुम्ही आत्ता इथे एक रीतसर FIR दाखल करून ठेवा,” मी पहिल्यांदा ज्यांच्याशी बोललो होतो ते इन्स्पेक्टर म्हणाले. “त्यामध्ये तुमची बाजू अगदी सविस्तर लिहा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पाऊचचं व्यवस्थित वर्णन आणि त्याच्या आत काय होतं ते सगळं नीट लिहा. त्यामुळे तुमच्या केसला खूपच चांगला पाठिंबा मिळेल. जर तुम्ही सांगता त्या सगळ्या गोष्टी तिथल्या अधिकाऱ्यांना त्यात सापडल्या आणि त्या बाईंना त्यात काय आहे ते सांगता नाही आलं तर मला वाटतं आम्ही ते थेट ताब्यातही घेऊ शकू.” त्यांचं ऐकून मी त्यांच्या देखरेखीखाली एक तक्रार लिहिली आणि त्यांनी ती जमा करून घेतली.
“तुम्ही माझा नंबर घेऊन ठेवा आणि मलाही तुमचा द्या,” साध्या कपड्यातले ते दुसरे इन्स्पेक्टर म्हणाले. “यात मीच इथून पुढे लक्ष घालतोय. आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बंगलोरलाच राहता का?”
“नाही,”
“तुमच्या ओळखीचं कोणी इथे असतं का मग?”
“नाही,”
“ठीक आहे. ते पाऊच मिळालं तर आम्ही ते बंगलोरला मागवून घेणारच आहोत, कारण तक्रार इथे नोंदवलेली असल्यामुळे ते इथे येऊन त्याची तपासणी करावीच लागेल. मला वाटतं आम्हाला ते पुढे एका विमानाने पुण्याला पाठवण्यात काहीच अडचण येणार नाही. तुम्ही फक्त पुणे विमानतळावर जाऊन ते ताब्यात घेऊ शकाल का?”
आनंदाने, मी मनाशी म्हणालो. “हो,”
“ठीक आहे तर मग. मी तुम्हाला काही प्रगती झाली तर कळवेनच. आता तुम्ही ठरल्याप्रमाणे तुमची फ्लाईट पकडून पुण्याला जा, आणि काळजी करू नका. स्वानुभवावरून मला असं खरंच वाटतंय की तुम्हाला ते नक्कीच परत मिळेल.”
मी त्यांचे आभार मानले आणि पलीकडच्या मोठ्या लॉबीत एका ठिकाणी जाऊन बसलो. त्यांची कार्यक्षमता, माझ्या समस्येविषयीची आस्था आणि आश्वासन या सगळ्यामुळे माझ्या मनातला त्यांच्याविषयीचा आदर प्रचंड वाढला होता. या अनुभवानंतर मी भारतीय यंत्रणांवरही विश्वास ठेवू शकेन असं मला वाटलं.
मी घरी एक व्हॉट्सॲप कॉल करून सविस्तर सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. त्यावर मला आत्तापर्यंत मी सगळं बरोबर केलं असल्याचं शिफारसपत्र आणि उरलेला प्रवास अगदी निश्चिंतपणे करण्याची सूचना मिळाली. भूक लागलेली असल्यामुळे मी एका हॉटेलमध्ये जाऊन सॅन्डविच घेतलं आणि ‘वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मात्र निकालात निघाला’ यावर हसत ब्रेकफास्ट करायला लागलो. सिंगापूरमध्ये फोनचं प्रकरण झाल्यावरच्यापेक्षा आत्ताची माझी मनःस्थिती खूपच चांगली होती, आणि त्याला कारण फक्त मी भारतात होतो हेच नाही तर CISF ने मला मी एकटा नसल्याची खात्री पटवली होती हेही होतं.
माझा उरलेला प्रवास तसा अगदीच साधासोपा ठरला. ठरल्याप्रमाणे विमानतळावर मला बाबा घ्यायला आलेले होते. घरी पोचल्यावर आम्ही पुष्कळ वेळ यावर चर्चा केली. त्या पाऊचमधला फोन गूगलचं ‘रिमोट कंट्रोल’ वापरून लॉक करून टाकला आणि जास्तीचा सुरक्षेचा उपाय म्हणून आमच्या गूगल अकाउंटचे पासवर्डही बदलून टाकले. एवढं सगळं झाल्यावर मी माझ्या सॅकमधून ‘द कन्फेशन’ बाहेर काढलं आणि या साहसाचा विचार तेवढ्यापुरता मनातून काढून टाकला.
आत्ता सर्व प्रवासवर्णन वाचले.भाषाप्रभुत्त्व,घटनांचे सहजतेने वर्णन, आणि शेवटी पाऊच बद्दलची उत्सुकता वाढवणारी ( शेवट माहित नसल्याने) हे सगळेच खूप कौतुकास्पद आहे
ReplyDelete