जीवाचं सिंगापूर: उपसंहार


मी सकाळी अकरा वाजता रणरणत्या उन्हात कोथरूड डेपोच्या बसस्टॉपवर उभा होतो. लोहगावला जाणाऱ्या बसेसची संख्या कमी असल्यामुळे मी अगदी वेळापत्रक पाहून गेलो होतो, पण बराच वेळ झालेला असूनही ती काही उगवत नव्हती. सिंगापूरची बससेवा आणि इथली यांच्यातला फरक पुन्हापुन्हा डोक्यात येत होता. शेवटी विश्रांतवाडीला जाणारी सोळावी बस माझ्यापुढून हसत निघून गेल्यावर मी तिथून चालत सरळ घरी परत गेलो आणि व्यवस्थित जेवून मग थेट रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. 
बंगलोर विमानतळावरच्या माझ्या साहसाची सांगता आदल्या संध्याकाळी अतिशय नाट्यमय प्रकारे झालेली होती. मी फक्त माझ्या ‘द कन्फेशन’ वर लक्ष केंद्रित करून त्याच्यावर फार विचार करणार नाही असं ठरवलं होतं. विमानतळाहून परत येताना कॅबमध्ये बाबांनी फोनला हलकेच थोपटून त्याच्यात अडकलेला तो पिनचा तुकडा बाहेर टाकला होता, त्यामुळे फोनही अगदी टुणटुणीत होता. पण घरी मात्र त्या पाऊचच्या प्रकरणावरून चर्चेला ऊत आलेला होता. आईबाबांनी वर्तवलेल्या सगळ्या ‘त्या बाईला तिची चूक लक्षात आली असेल आणि तिने घाबरून ते कुठेतरी टाकून दिलं असेल’ असल्या शक्यता मी ऐकून न ऐकल्यासारखं करत होतो. तेवढ्यात माझा फोन वाजला म्हणून मी पाहिलं तर तो चक्क त्या मला नंतर भेटलेल्या साध्या कपड्यातल्या इन्स्पेक्टरचा होता. मी तो सरळ बाबांना दिला. 
त्या इन्स्पेक्टरशी पंधरावीस मिनिटं बोलून झाल्यावर बाबांनी आमच्यासमोर सगळा खुलासा केला. त्या इन्स्पेक्टरनी शब्द दिल्याप्रमाणे, भुवनेश्वर विमानतळावर त्या बाईला ते विमान उतरल्याक्षणी अडवण्यात आलेलं होतं. तिची चौकशी केल्यावर तिने ते पाऊच चुकूनच उचललं असल्याचं सांगितलं, आणि तसं लेखी द्यायलाही ती एका पायावर तयार होती. तिच्याकडून ते ताब्यात घेतल्यावर त्यांनी तिथेच ते उघडून सगळ्या गोष्टी जागच्या जागी असल्याची खात्री करून घेतली आणि मग ते बंगलोरला एका विमानामार्फत पाठवून दिलं. ते दुसऱ्या एका फ्लाईटने दुसऱ्या दिवशी पुण्याला येणार होतं असं आम्हाला कळलं. त्यांनी पुण्याच्या एका CISF अधिकाऱ्याचा नंबर दिला होता आणि त्यांच्याशी बोलून ते परत घेण्याची तयारी करावी असं सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला त्या बाईविरोधात तक्रार नोंदवायची आहे का असंही विचारलं. पाऊच तर मिळालं होतं आणि तिच्याकडून खरंच चूक झाली असेल असा benefit of doubt आम्ही देऊ शकत होतो, त्यामुळे आम्ही त्यांना आमची तशी इच्छा नसल्याचं सांगितलं.    
या इन्स्पेक्टरनी आम्हाला एवढी मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानले. त्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अशा एखाद्या समस्येत जातीने लक्ष घालणं ही खूपच कौतुकास्पद गोष्ट असल्याचं बाबांनी त्यांना सांगितलं. त्यावर ते, “तुमचा मुलगा खूप नम्र आणि प्रामाणिक आहे; आम्हाला त्याला शक्य तेवढी मदत करावी असं खूप वाटलं,” असं म्हणाले असं बाबांनी मला नंतर सांगितलं. मला हे सांगताना बाबांना एवढं हसू येण्याचं काही कारण नव्हतं असं मला नंतर वाटून गेलं. तेव्हा मात्र मी पाऊच मिळाल्याच्या आणि ‘चला, कोणालातरी आपण नम्र वाटलो’ याच्या आनंदात होतो. 
एवढं झाल्यानंतर आम्ही त्या इन्स्पेक्टरना विचारून त्यांचे आणि सगळ्या CISF चे ट्विटरवरून जाहीर आभार मानले. या सगळ्या प्रकरणामुळे ट्विटर या माध्यमाचा एक वेगळाच फायदा माझ्यासमोर आलेला होता. मला नंतर असंही कळलं होतं की मी विमानातून पुण्याला येत असताना बाबांनी मला आलेला अनुभव ट्विटरवर टाकला होता आणि त्यात Bangalore International Airport Limited या त्या विमानतळाचा कार्यभाग सांभाळणाऱ्या कंपनीला टॅग केलं होतं. आम्ही कॅबमध्ये बसून घरी जायला निघाल्यावर थोड्याच वेळात त्या कंपनीच्या माणसाचा फोन आला होता. आमच्या समस्येबद्दल त्याने अगदीच निराशावादी भूमिका घेतलेली असली, तरी त्याने ज्या चपळाईने संपर्क साधला त्याला कारण तो ट्विटच होता. मला असं लक्षात आलं की कुठल्यातरी कर्मचाऱ्याच्या किंवा शाखेच्या कार्यपद्धतीबद्दल आपल्याला तक्रार करायची असेल, तर ट्विटरवर थेट त्यासंबंधित सर्वोच्च कार्यालयाला टॅग करता येत असल्यामुळे, सगळ्या संस्थेची प्रतिमा खराब झाल्याची शिक्षा आपल्याला मिळू नये म्हणून ते कर्मचारी लगेच सरळ होतात. आपल्याला आलेल्या वाईट अनुभवाला अशा प्रकारे प्रत्युत्तर देण्याचे खूपच विलक्षण परिणाम आम्हाला त्याआधी आणि त्यानंतरही अनेकदा पाहता आले आहेत. या ‘Trickle Down Effect’ मुळे ट्विटर हे जसे निर्ढावलेल्या नोकरशाहीविरुद्ध आपल्या हातातलं एक महत्त्वाचं शस्त्र आहे, तसेच ते चांगल्या अनुभवांचे कौतुक करण्याचे साधनही आहे आणि त्याचा त्यांनाही फायदा होतो. त्या दिवशी CISF ची प्रतिमा सुधारण्यात एक खारीचा वाटा उचलण्यात आम्हाला आनंदच वाटला. 
पुणे विमानतळावरच्या ज्या अधिकाऱ्याचा नंबर माझ्याकडे होता त्याने मला स्वतः फोन करून माझं ‘पॅकेज’ पुण्याला पोचलं असल्याची खबर दिली. “तुम्ही सकाळी येऊ शकलात तर उत्तमच, म्हणजे मीच तुम्हाला ते देऊ शकेन. मी दुपारपर्यंतच असतो, त्यामुळे तुम्ही त्यानंतर येणार असाल तर मी कोणालातरी ते तुम्हाला द्यायला सांगेन.” असंही ते म्हणाले. मी ते असतानाच जाणार होतो, पण PMPMLच्या कृपेने मला उशीर होणार होता. त्यामुळे मी त्यांना तसं कळवलं. त्यांनीही ‘काही हरकत नाही’ असं म्हणून मग मला ते नक्की कुठून ताब्यात घ्यायचं ते सविस्तर सांगितलं. 
बरोबर पाच दिवसांपूर्वी मी ज्या रस्त्याने गेलो होतो त्याच रस्त्याने, पुन्हा रिक्षानेच मी चाललो होतो, फक्त आता मनात ‘हत्ती गेला आणि शेपूट राहिलं’ अशी भावना होती. वाटेत दोन ठिकाणी लागलेला ट्रॅफिक जॅम, रस्त्यावरची खास पुण्यातच पाहायला मिळते अशी वर्दळ हे सगळं पाहून मला अगदी खऱ्या पुणेकरासारखा वैताग येत होता. या गोष्टीही ‘मिस’ कराव्यात एवढा काळ मी यांच्यापासून लांब गेलेलोच नव्हतो, पण तरी एक ओळखीच्या वातावरणात आल्याची जाणीव मात्र होत होती. आपल्या infrastructure मधल्या सगळ्या उणिवांचाही ‘जाज्वल्य अभिमान’ बाळगायला सहज प्रवृत्त करणारं पुणे हेच शेवटी ‘माझं’ होतं, आणि सिंगापूरच्या दृष्ट काढावी अशा infrastructure ला चार दिवस पुरेपूर उपभोगून तो एक नादुरुस्त एस्कलेटर तेवढा लक्षात ठेवणारा मीही पुण्याचाच, असं मला वाटून गेलं. 
विमानतळावरचं सगळं मला आठवत होतं तसंच होतं. प्रवेशद्वारापाशी सुरक्षारक्षक तिकिटं तपासून आत सोडत होते, आणि यावेळेस माझ्याकडे ते नव्हतं. पण त्या अधिकाऱ्याला शोधायला मला इमारतीच्या आत जाणं तर भागच होतं. त्या रक्षकांना माझ्या कामाबद्दल सांगावं का? या सगळ्या गोष्टी अगदी त्यांच्यापर्यंत कशाला पोचल्या असतील पण? तरी दुसरं काय करावं ते सुचत नव्हतंच, आणि तिथे असं नुसतंच दिशाहीन माणसासारखं घुटमळणंही बरोबर दिसलं नसतं, म्हणून मी सरळ त्यांच्याकडे गेलो. 
“तिकीट?” त्यांनी विचारलं. 
“नाही, मी कुठे चाललो नाहीये,” मी सांगायला लागलो. “माझ्यासाठी आज एक पॅकेज इथे बंगलोरहून येणार होतं ते घ्यायला मी आलो आहे. ते पाठवण्याची व्यवस्था CISF नेच केली होती.”
त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहून त्यांना हे कितपत पटलंय ते मला अजिबात कळत नव्हतं, पण सुदैवाने मघापासून माझ्याकडे कुतूहलाने पाहत असलेला एक साध्या कपड्यातला माणूस हे ऐकून पुढे आला आणि त्याने मला माझं नाव विचारलं. मग त्याने ते पॅकेज मला देण्याची जबाबदारी त्याच्या सरांनी त्याच्यावर सोपवल्याचं सांगितलं आणि त्याच्यामागून इमारतीच्या आत घेऊन गेला. 
वरच्या मजल्यावरच्या एका कार्यालयाच्या बाहेर मला थांबायला सांगून तो आत गेला आणि एक मोठं पिवळ्या कार्डबोर्डचं पाकीट घेऊन बाहेर आला. पुन्हा तळमजल्यावर येऊन त्याने ते माझ्याकडे दिलं आणि मला उघडायला सांगितलं. ते कोणीतरी अगदी आख्खी दुपार मोकळी असल्याच्या थाटात पॅक केल्यामुळे मला ते उघडायला विशेष कष्ट घ्यावे लागले. अखेर शेवटची हातावर चिकटून बसलेली जाड सेलोटेप ओढून काढल्यानंतर माझं गडद निळ्या रंगाचं पाऊच माझ्या हातात पडलं. मी लगेच ते उघडून पाहिलं. फोन व्यवस्थित होता. चार्जर, इजेक्टर पिन आणि खास सिंगापूरमध्ये चालणारा adapter हेही त्यात होतं. दुसरा adapter मात्र दिसत नव्हता. 
माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहून त्या अधिकाऱ्याने मला काय झालं म्हणून विचारलं, तेव्हा मी त्याला हे सांगितलं. त्यावर त्याने काहीसे खजील होऊन खांदे उडवले. “आता ते पाऊच एवढं फिरलंय, त्यात कुठे काय घडलं असेल ते काय सांगणार आपण? आणि तुम्हीच तर आत्ताच ते तुमच्या हाताने उघडलंत. बंगलोरहून ते अगदी असंच आलं होतं.”
मी हसलो आणि त्याचं विशेष काही नाही असं त्याला सांगितलं. ते खरंच होतं. ते पाऊच ताब्यात घेतल्यावर भुवनेश्वरला आणि बंगलोरला ते उघडून त्याच्यातल्या गोष्टींची तपासणी झाली होती. पुन्हा पॅक करताना एखादी गोष्ट राहून जाणं अगदी सहज शक्य होतं. त्या बाईला यात दोष देण्यासारखं काहीच नव्हतं, कारण पाऊच उघडून त्यातला दहा हजाराचा फोन सोडून दोनशेचा adapter लांबवणारी ती बाई असेल तर ‘मिळू दे बिचारीला’ असंच मी म्हटलं असतं. त्यामुळे मी अगदी समाधानाने त्यांच्या रजिस्टरवर ते मी ताब्यात घेतल्याची नोंद करून सही केली आणि ते घेऊन बाहेर आलो. 
इमारतीबाहेर योगायोगाने माझ्या संपर्कात असलेले ते अधिकारी उभे होते, त्यामुळे मला पाऊच देणाऱ्या अधिकाऱ्याने मला ‘साहेबांशी ओळख करून देतो’ म्हणून त्यांच्याकडे नेलं. त्यांनीही मग माझी आपुलकीने चौकशी करून सगळं ठीक पार पडलं का ते विचारलं. त्या adapter चा विषय मी त्यांच्यासमोर काढणार नव्हतोच, पण तो दुसरा अधिकारीच बोलला. त्यांची त्यावरची प्रतिक्रिया बरीचशी त्याच्यासारखीच होती. मीही मला त्याचं फार काही वाटत नसल्याचं सांगितलं आणि त्यांचे पुन्हा एकदा आभार मानले, तेव्हा त्यांनी ‘आमचं कामच होतं ते’ असं हसून म्हणत आम्ही ट्विटरवर CISF चं कौतुक केल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. विमानतळाच्या आवारातून बाहेर पडतापडता, या पोलीस यंत्रणेचा माझा पहिला अनुभव, अगदी संभाषणांसकट, शाळेच्या पाठ्यपुस्तकातल्या गोडगोड धड्यांमधून सरळ उचलल्यासारखाच वाटत होता हे माझ्या मनात आल्यावाचून राहिलं नाही. त्या धड्यांमधल्या वर्णनांपेक्षा खरं जग खूपच वेगळं असतं हे खरंतर तेव्हापासूनच लक्षात यायला सुरुवात झालेली होती, पण या सगळ्या अनुभवानंतर मला त्यामागे ‘Not Necessarily,’ हे जोडावंसं वाटलं. 
बाहेर पार्किंगमध्ये आल्यावर रिक्षावाले आणि कॅबवाले अगदी ‘सेवेचे ठायी तत्पर’ म्हणून पुढे येतात याचा अनुभव होताच आणि यावेळीही त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. फक्त त्यापैकी एकाशी सौदा पक्का केल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे स्टेशनपर्यंत जाण्याएवढेही पैसे शिल्लक नव्हते. माझ्या मूळच्या योजनेनुसार मी बसने विमानतळावर जाऊन, तिथून रिक्षाने स्टेशनपर्यंत येऊन तिथून घराकडे येणारी बस पकडणार होतो, यामुळे आता त्या दृष्टीने केलेला हिशोब गडबडला होता. माझी चिंताक्रांत चर्या पाहून रिक्षावाल्याचं ‘दीडशे? शंभर? अहो तुम्ही तरी काहीतरी सांगा’ इथपर्यंत झालेलं होतं. मी नाईलाजाने त्याला ‘change of plans’ असं म्हणून थेट घरी न्यायला सांगितलं आणि ट्रिपच्या एकूण खर्चाचा हिशोब मांडताना त्यात ‘रिक्षा, सहाशे रुपये जाऊनयेऊन’ अशी एक एंट्री करायचं मनाशी ठरवलं. 
अशा प्रकारे माझ्या या अनपेक्षित साहसाची आणि त्याचबरोबर या अद्भुत ट्रिपचीही सांगता झाली. घरी आल्यावर पाऊच आणि त्यातल्या सगळ्या वस्तू आपापल्या जागी सुरक्षितपणे ठेवल्या गेल्यावर मग मी आदल्या दिवशी घरी आल्यानंतर पहिल्यांदाच ट्रिपचा विषय निघाला. 
“हां, आता करा सुरु,” माझ्याकडे अपेक्षेने पाहत आजी, आई आणि बाबा एकदमच म्हणाले. 
मी पाच दिवसांनंतर घेतलेला पोह्याचा पहिला घास गिळला आणि बोलायला लागलो.


                                                                              

Comments

  1. आत्ता सगळा मजकूर वाचला.भाषाशैलीला सलाम!पाऊच मिळण्याची सर्व प्रक्रिया फार व्यवस्थित मांडली आहेस.सिंगापूरच्या प्रवासवर्णनाला आता पूर्णविराम मिळाला आहे.याची रूखरूख मात्र आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प