पाच मिनिटांत विश्व
व्हेनिस शहरातल्या प्रसिद्ध ‘गोंडोला’ नावाच्या लांबुडक्या होड्यांच्या आकाराला तसं घडवण्यात त्यांच्या इतिहासाचा काय वाटा होता? प्राचीन काळातल्या एका इजिप्शियन स्त्री वैद्याच्या रोजच्या आयुष्यातला एक दिवस कसा जात असे? तुमचं लिखाण जास्त विनोदी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? जगातल्या सगळ्या संगणकांची भाषा अर्थात बायनरी कोड नक्की कसा वापरण्यात येतो? सर्वांना एकसमान असलेल्या परीक्षा घ्याव्यात की घेऊ नयेत? कुठल्याही प्रश्नावर जनतेचा कौल घेण्याचे फायदे आणि तोटे काय असतील? कृष्णविवरे नष्ट होऊ शकतात का? क्युबन मिसाईल क्रायसिस म्हणजे नक्की काय घडलं? जर इतिहासाने लेनिनला दोषी ठरवलं तर तो बचावासाठी आपली बाजू कशी मांडेल? कॅन्सरवर इलाज करणं खरंच एवढं क्लिष्ट का असतं? ‘द सेकंड कमिंग’ या कवितेमागे कवीचा नक्की कोणता विचार अथवा कोणती भावना दडलेली असावी? तुम्ही व्हर्जिनिया वूल्फची पुस्तके का वाचावीत? शहरांना झाडांची खूप गरज का असते? बिझन्टिन साम्राज्याचा पाडाव कशामुळे झाला? हे सगळे प्रश्न आपल्या रोजच्या आयुष्याच्या पलीकडचे झाले. त्यांचा एकमेकांशी तर नाहीच, पण सध्याच्या परिस्थितीतल्या अगदी रोजच्या झालेल्या ‘कोरोनाव्हायरस म्हणजे नक्की काय?’ अशा प्रश्नांशी तर त्याहूनही काही संबंध नाही असंच आपल्याला वाटेल. पण एक गोष्ट आहे जी या सगळ्या आणि अशा अक्षरशः हजारो इतर इकडच्या-तिकडच्या प्रश्नांना जोडते; ती म्हणजे या सगळ्यांचं उत्तर आपल्याला एकाच ठिकाणी मिळू शकतं.
हल्ली अनेकदा असं होतं की मी जेवताना किंवा असंच फावल्या वेळात हेडफोन्स अडकवून यूट्यूबवर एक फेरफटका मारायला निघतो. माझ्या ‘वॉल’वर माझ्यासाठी काही suggested व्हिडिओ, मी फॉलो करत असलेल्या काही चॅनेल्सचे नवे व्हिडिओ असं कायकाय लावून ठेवलेलं असतं. बहुतेकवेळा यूट्यूब उघडतानाच मी काय पाहायचं आहे ते ठरवून उघडलेलं असतं म्हणून या वॉलला मी फारसा भाव देत नाही. कधीकधी वॉलवरच्या एखाद्या व्हिडिओचं चित्र पाहून किंवा नाव वाचून उत्सुकता वाटल्यामुळे पाहतो तेवढंच. पण आजवर असं एकच चॅनेल अस्तित्त्वात आहे, ज्याचं नाव व्हिडिओच्या खाली दिसलं की त्याच्या विषयाकडे साफ दुर्लक्ष करून मी सरळ तो व्हिडिओ उघडतो. पाचएक मिनिटानंतर माझ्या एका विशिष्ट विषयाच्या विशिष्ट तुकड्याबद्दलच्या असलेल्या एवढ्याशा माहितीत किंचितशी भर पडलेली असते आणि त्या ‘मूड’मध्ये शिरल्यामुळे मी त्याच चॅनेलवर उर्वरित वेळ घालवतो, आणि कधी नव्हे ते यूट्यूब बंद करताना वेळ अगदी सत्कर्णी लावल्याच्या भावनेने करतो.
माहिती देण्यासाठी आणि विचार मांडण्यासाठी घडवलेल्या सगळ्यात प्रतिष्ठित प्लॅटफॉर्म्सपैकी काही उपलब्ध करून देणारी म्हणून ‘TED’ ही आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यापैकी ‘TED Talks’ या प्लॅटफॉर्मवरचे आपल्याला माहित असलेल्या एखाद्या तज्ञाचे किंवा इतर व्यक्तिमत्त्वांचे भाषण आपण ऐकलेले असते. ‘TED Ed’ हा तसाच याच संस्थेचा एक दुसरा प्लॅटफॉर्म, जो प्रामुख्याने एक यूट्यूब चॅनेल म्हणूनच अस्तित्त्वात आहे. एखादी संकल्पना समजावून सांगण्यासाठी किंवा वर मांडलेल्या प्रश्नांप्रमाणे एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी असलेला हा प्लॅटफॉर्म आहे. त्याचे वैशिष्ट्य असे, की त्यावरचे सगळे व्हिडिओ त्यांच्या खास ॲनिमेटेड स्वरूपातले असतात, त्यामुळे अगदी किचकट संकल्पनांसाठीही एखाद्या साध्या लेक्चरच्या व्हिडिओपेक्षा कित्येक पटींनी अधिक प्रभावी ठरतात.
आणि या संकल्पना कोणत्या? वरच्या पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेला प्रत्येक प्रश्न हा त्याच चॅनेलच्या एकेका व्हिडिओच्या नावातून घेतलेला आहे. कुठल्याही व्हिडिओसाठीच्या ‘धड्याचं’ एका विशिष्ट विषयात वर्गीकरण न करता ते प्रत्येक धड्याला एक स्वतंत्र प्रश्न असल्यासारखंच वागवतात; त्यामुळे बऱ्याचदा असं होऊ शकतं की आपण तो धडा तेवढ्यापुरता पाहून, समजून घेऊ शकतो. म्हणजे आता वर उल्लेख केलेल्या त्या लेनिनच्या प्रश्नाबद्दल, तो तसा ‘इतिहासाचा’ असल्यामुळे मला प्रथमदर्शनी तो पाहण्यात काही स्वारस्य वाटलं नसतं. इतर अनेक विद्यापीठांच्या किंवा खान अकॅडमीसारख्या संस्थांच्या अधिकृत चॅनेल्सवर अशा गोष्टी क्रमवारीने आणि विषयवारीने लावण्याची पद्धत असल्यामुळे, लेनिनच्या आयुष्यावरच्या एखाद्या लांबलचक लेक्चर सिरीजमध्ये असा एखादा व्हिडिओ असला तर असता. अशा सिरीज मी आपणहून कशाला शोधायला जातोय? पण इथे हा व्हिडिओ मला दोन कृष्णविवरांविषयीच्या व्हिडिओंच्या मध्ये आढळला आणि माझं तात्पुरतं कुतूहल जागृत झालं तर मी हा व्हिडिओ बघितला असता. आणि प्रत्यक्षात तसंच घडल्यामुळे, तो फक्त इतिहासाचा नसून त्यात मला उपयुक्त वाटणारी माहितीही होती हे पाहिल्यावरच कळलं.
मी जरी म्हटलं असलं की एरवी अशा प्रकारचे व्हिडिओ कुठल्याशा चॅनेल्सच्या लांबलचक मालिकांमध्ये कुठेतरी दडलेले असतात, तरी सत्य हेच आहे की TED Ed सारखी रचना आणि समजावण्याची पद्धत असलेले व्हिडिओ खूप कमी सापडतील. त्यांनीही त्यांच्याकडच्या व्हिडिओंचं आपल्या सोयीसाठी वर्गीकरण केलं आहे, पण ते विषयानुसार नसून व्हीडिओमधल्या प्रश्नांच्या प्रकारानुसार असतं. उदाहरणार्थ हा लेनिनचा व्हिडिओ आपल्याला सापडतो तो त्यांच्या खास ‘History Versus’ या विभागात. याच्यामागची कल्पना अशी, की इतिहासाच्या बाबतीत एकाच स्त्रोतावर विश्वास ही घोडचूकच म्हणावी लागेल; कारण इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या आपल्या मनातल्या प्रतिमांना छेद देण्याकरता हा विभाग त्यांनी काढला आहे. यामधल्या व्हिडिओंची साधारण रूपरेषा अशी, की इतिहासातल्या व्यक्तिमत्त्वांना कोर्टात उभं केलं जातं आणि त्यांना त्यांच्यावरचे आरोप सुनावले जातात. हे आरोप त्यांच्या लोकप्रिय प्रतिमेवर आधारित असतात, जेणेकरून त्यांना खोडून काढण्याच्या प्रयत्नात त्या आरोपींचे वकील आपल्याला त्यांच्याबद्दलच्या जवळपास अजिबातच माहित नसलेल्या गोष्टी सांगतात. परिणामी आपल्याला यांची एक दुसरी बाजू कळते आणि आपण आपल्या त्यांच्याबद्दलच्या मतावर फेरविचार करू शकतो. माझ्या लक्षात राहिलेला एक व्हिडिओ म्हणजे ‘इतिहास विरुद्ध जेंघिस खान’. मंगोलियापासून सगळं उजाडून टाकत आगेकूच करणारा आणि आपलं साम्राज्य पार युरोपपर्यंत पसरवणारा म्हणून आपण त्याला ओळखतो. पण या व्हिडिओमुळे ‘उजाडणे’ या एका शब्दात गुंडाळलेल्या अनेक गोष्टी मला नव्याने समजल्या. विशेषतः शरण येणाऱ्या साम्राज्यांना तो नष्ट करत नसे आणि नष्ट केलेल्या साम्राज्यातल्या वैद्यांना, पंडितांना आणि कलाकारांना वाचवून आपल्या अवाढव्य साम्राज्याची सांस्कृतिक जडणघडण होण्यासाठी इकडेतिकडे पाठवत असे ही माहिती त्याच्या भस्म्या झालेल्या आक्रमणकर्त्याच्या प्रतिमेशी विसंगत ठरते. पण याच व्हिडिओत ती मूळ प्रतिमा निर्माण झाली कशामुळे त्याचाही खुलासा आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की हा व्हिडिओ उघडपणे कशाचंही समर्थन करत नाही किंवा कशावर आक्षेप घेत नाही, कारण त्याचं मुख्य उद्दिष्ट आपल्या मनात प्रश्न उत्पन्न करणं हेच आहे. त्यामुळे अशा इतर सगळ्या व्हिडिओंप्रमाणेच या व्हिडिओच्या शेवटी ती कोर्टातली केस कोणीच जिंकत नाही. ‘एखाद्या राज्यकर्त्याची सुधारक धोरणे किंवा त्याच्या प्रदेशात त्याने केलेले चांगले बदल हे त्याने तो प्रदेश जिंकण्यासाठी जो विध्वंस केला त्याचं समर्थन करण्याएवढे चांगले असतात का?’ अशा प्रश्नावर तो व्हिडिओ आपला निरोप घेतो: पुढचं काम आपलं असतं.
ही एक गोष्ट त्यांच्या सगळ्याच व्हिडिओच्या बाबतीत मला महत्त्वाची वाटते. पाच मिनिटांत पूर्णपणे समजावून होईल अशी कुठलीच संकल्पना जगात अस्तित्त्वातच नाही हे त्यांना मान्य आहे. एकदा मी आईबरोबरच्या एका भूमितीविषयक चर्चेत अनावधानाने ‘Tensors’ ही संज्ञा वापरली होती, आणि आत्तापर्यंतचा माझा गणिताचा प्रवास कोळून प्यायलेली असल्यामुळे मला तिच्याबद्दल माहित असायचं काहीच कारण नाही हे तिने लगेच ओळखलं. मलाही माझ्या परिचयाचे ‘Vectors’ आणि ‘Scalars’ हे त्या ‘Tensors’ गटाचा भाग आहेत यापलीकडे काही माहिती नव्हती; आजही नाहीये. पण मी तिला माझ्या त्या एवढ्याशा माहितीच्या उगमस्थानाकडे घेऊन गेलो. तो व्हिडिओ पाहिल्यावर तिची प्रतिक्रिया हीच झाली की त्या व्हिडिओचा एखाद्या गणिताच्या विद्यार्थ्याला अभ्यासात तसा काहीच उपयोग होणार नाही. ते खरंच होतं. कुठल्यातरी गोष्टीच्या खोलात जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तीसाठी TED Ed ही फक्त एक पहिली पायरी ठरू शकते, आणि त्यांचा उद्देशही तोच आहे. इतिहासाबद्दल खूप जिव्हाळा वाटणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला हा जेंघिस खानचा व्हिडिओ पाहून एक दिशा सापडू शकते आणि तो तिथून पुढे आपल्या परीने खोलात जाऊ शकतो. मी तिथून दुसऱ्या व्हिडिओकडे वळलो; वेळ दोघांचाही वाया गेला नाही.
एखाद्या अतिपरिचित विषयाचे छुपे पैलू आपल्यासमोर आणण्यात यांचा हात धरणं अवघडच आहे. दुसरं महायुद्ध आपल्या सगळ्यांच्याच अगदी ओळखीचा विषय. पण TED Ed वरचा एक ‘अकूने भावांची गोष्ट’ नावाचा व्हिडिओ आपल्यासमोर त्या युद्धाचं वास्तव एका अगदीच अनपेक्षित प्रकारे मांडतो. युद्धाच्या खूप पूर्वीपासून अमेरिकन नागरिक असलेल्या जपानी वंशाच्या अकूने कुटुंबाने आपल्या नऊ मुलांना अमेरिकेतच जन्म दिला. त्यापैकी सर्वांत थोरले दोन भाऊ अमेरिकेला घर मानतच लहानाचे मोठे झाले आणि उरलेलं कुटुंब जपानला गेल्यावरही अमेरिकेतच राहिले. युद्धाच्या वेळी दोघेही अमेरिकन सैन्यात भरती झाले आणि आपलं जपानी भाषेचं ज्ञान वापरून शत्रू राष्ट्र असलेल्या जपानमध्ये हेरगिरी करून मिळवलेल्या माहितीचा अर्थ लावण्यात अमेरिकन सरकारला मदत करू लागले. त्याच वेळी त्यांचेच दोन धाकटे भाऊ जपानच्या सैन्यात राहून त्यांची अमेरिकेची असलेली माहिती वापरून जपानला मदत करत होते. युद्ध संपल्यानंतर हे कुटुंब जेव्हा पुन्हा एकत्र आलं तेव्हा काय झालं असेल? या तुलनेत आपले फॅमिली गेट-टुगेदर्स काहीच तणावपूर्ण वाटत नाहीत, नाही का? शेवटी त्यांच्यात दिलजमाई झाली आणि थोरल्या भावांनी धाकट्या भावांना अमेरिकेला येण्याची संधी दिली. दरवेळी युध्दाबद्दल काहीही वाचलं किंवा पाहिलं की हमखास पडणारा ‘हे सारं कशासाठी’ हा प्रश्नच आपल्याला हे पाहूनही पडतो, पण एका पूर्णपणे वेगळ्या नजरेतून.
माझा आणि TED Ed चा परिचय आता किमान चार वर्षांचा तरी असेल. त्याची सुरुवात अगदीच गंमतशीर प्रकारे झाली. यूट्यूबवर काही डोक्याला चालना देण्यासाठी कोडी सापडतायत का म्हणून मी शोधत होतो. TED Ed मध्ये कोड्यांचा एक खास विभाग आहे, आणि ती कोडीही खरंच आपल्या मेंदूला ‘बॉक्स’च्या बाहेर भिरकावून देणारी ठरली. मी तो सगळा विभाग पिंजून काढून सगळी कोडी पाहिली. त्या व्हिडिओत सुरुवातीला ते कोडं घालून, मग उत्तरार्धात उत्तर सांगतात आणि तशा प्रकारच्या प्रश्नाला भिडण्यासाठी आपण कशा प्रकारचा विचार करायला हवा तेही समजावतात. आणि कोडीही अतिशय मनोरंजक प्रकारे मांडलेली असतात. ‘भाषा माहित नसताना तीन प्रश्नांत तुम्हाला हवी ती माहिती मिळवायची आहे’ अशा स्वरूपाच्या एका तर्कशास्त्राच्या कोड्याला त्यांनी त्यात आपण परग्रहावर अडकलो आहोत आणि तिथल्या तीन एलियन सम्राटांकडून आपलं यान दुरुस्त करून घ्यायचं आहे म्हणून त्यांनी घातलेल्या या प्रश्नाला उत्तर द्यायचंय असा पुष्कळ मसाला घालून मनोरंजक बनवलं होतं. अशा वेळी TED Ed च्या टीमची कल्पनाशक्ती शब्दशः अवकाशात भरारी घेऊ लागते. त्यांची बहुतांश कोडी अशीच अवकाश, समांतर वास्तव किंवा तत्सम सेटिंगमध्ये घडतात हे ऐकल्यावर मला त्यांची चटक इतक्या सहज का लागली असावी ते मला ओळखणाऱ्या कुणाच्याही लगेच लक्षात येईल. त्यांची सगळी कोडी अधाशासारखी पाहून झाल्यावर मला त्या चॅनेलवर इतरही व्हिडिओ असतात हे कळलं, आणि तेव्हा लागलेलं व्यसन आजतागायत सुटलेलं नाहीये. सुरुवातीच्या काळात मी माझा मोर्चा अर्थातच मर्मबंधातल्या व्हिडिओंकडे वळवला. तेव्हापासून यूट्यूबवर काहीतरी ‘फ्रेंड्स’च्या एपिसोड्सचे तुकडे पाहायला जाणं आणि वॉलवर यांचा ‘कृष्णविवराने पृथ्वीला गिळलं तर?’ किंवा ‘काळ खरंच अस्तित्त्वात आहे का?’ अशासारख्या व्हिडीओंना पाहून काळजाचा ठोका चुकणं ही घटना माझ्यासाठी अजिबात नवी उरलेली नाही.
या सगळ्या माहितीचा फक्त एखाद्या पार्टीत socializing करण्यासाठीच उपयोग होतो अशातला भाग नाही. आपल्याला कशाची उत्सुकता असेल तर तिला चालना मिळते, किंवा कुठल्यातरी विषयाबद्दल आपण कुंपणावर बसलेले असू तर योग्य दिशाही मिळते. माझ्या कृष्णविवरांच्या वेडाचं श्रेय याच चॅनेलला जातं. त्यांच्या काही व्हिडिओंच्या माध्यमातून माझी कृष्णविवराशी ओळख झाली आणि मला तेवढ्याने स्वस्थ बसवत नव्हतं हेही कळलं. तेव्हा पाहिलेल्या त्या व्हिडिओंनी मला ज्या वाटेवर आणून सोडलं त्यावर मी आता अशा टप्प्यावर आहे जिथे मी स्टीफन हॉकिंग यांचं ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ वाचून समजू शकलेलो आहे. वास्तविक माझ्या क्षेत्राचा याच्याशी सुतराम संबंध नाही, पण म्हणून व्यासंग का करू नये? कृष्णविवरांप्रमाणेच TED Ed मुळे मला जिथे विशेष परिश्रम घ्यावेसे वाटले अशी दुसरी एक दिशा म्हणजे साहित्य! त्यांच्या ‘More Book Recommendations From Ted Ed’ या विभागातून मला काही परिचित आणि अपरिचित साहित्यकृतींबद्दल खूप महत्त्वाची माहिती कळली. कथानकाबद्दल गरजेपुरतंच सांगणं, कुतूहल जागृत करणं आणि मजा न घालवणं या सगळ्या गोष्टी त्यांना अचूक जमतात. होमरची ‘ओडिसी’ आणि ‘इलियड’ ही महाकाव्यं, जेम्स जॉईस यांचं ‘यूलसीस’ हे अफलातून पुस्तक, व्हर्जिनिया वूल्फची ‘द वेव्ह्ज’ आणि ‘मिसेस डॅलोवे’ ही दोन पुस्तके आणि अशी अनेक इतर पुस्तके माझ्या वाचनात येण्यासाठी TED Ed सर्वस्वी कारणीभूत आहे. तसंच ‘अ हंड्रेड यिअर्स ऑफ सॉलीट्युड’, ‘फ्लॅनेरी ओकॉनर’, ‘फॅरेनहाईट ४५१’, ‘वेटिंग फॉर गोडोट’ यासारख्या कधीच ऐकिवात न आलेल्या पुस्तकांबद्दलही माझं कुतूहल जागृत झालं ते त्यामुळेच. सध्या मी ही पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पण माझ्यावर यांच्या सल्ल्याचा सगळ्यात दृश्य परिणाम झाला तो एकाच लेखकाच्या बाबतीत: शेक्सपियर! एकतर आत्ताच्या इंग्लिशच्या पणजोबा असलेल्या भाषेत लिहिलेलं, शिवाय त्याची खास शैली आणि अफाट शब्दसंपत्ती या सगळ्यामुळे मी त्याच्यापासून जरा लांबच राहिलो होतो. पण TED Ed चा ‘मॅकबेथ’ वरचा व्हिडिओ पाहून मी जे भारावून गेलो त्यात मी हिय्या करून ब्रिटिश लायब्ररीतून ते मूळ नाटक घेऊन आलो. ती एक खास edited आवृत्ती असल्यामुळे तिच्यात शेक्सपियरची मूळची भाषा तशीच ठेवून अनेक टिपांच्या माध्यमांतून ती उलगडण्यात आली आहे, म्हणून ती मला वाचता आली आणि ते नाटक समजलं. त्यामुळे प्रभावित होऊन मी तशाच इतर नाटकांच्या edited आवृत्त्या मिळवून वाचायला लागलो. परिणामी ‘हॅम्लेट’ नाटकाचा व्हिडिओ TED Ed वर येईपर्यंत माझं ते मूळ रूपात, टिपा नसतानाही वाचून झालेलं होतं. तो व्हिडिओ पाहायला विशेष मजा आली.
काही व्हिडिओ मनात घर करतात ते फक्त त्यांनी सांगितलेल्या भन्नाट गोष्टींसाठी नाही, तर त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीमुळेही. हलकेफुलके विनोद, चतुर टिप्पण्या आणि शब्दच्छल यांनी तर ते भरून वाहत असतात. याशिवाय TED Ed ने सुरु केलेली एक प्रथा म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला त्या प्रश्नाशी संबंधित एक छानसं वाक्य टाकायचं. ते वाक्यही अगदी खूप विचार करून मिळवलेलं असतं आणि बऱ्याचदा एक अगदी चपखल सुरुवात ठरतं. गणितावर माझं खगोलशास्त्राइतकं प्रेम नक्कीच नाहीये, पण त्यांनी ‘शून्याने भाग का देता येत नाही’ असा व्हिडिओ काढल्यावर ‘शास्त्रीय कारण काय आहे ते तरी पाहूया’ म्हणून मी तो पाहायला घेतला. त्याच्या सुरुवातीला असलेलं ‘देवाने ज्याला शून्याने भाग दिला ते म्हणजे कृष्णविवर’ हे वाक्य वाचून माझ्या काळजात भयंकर उलथापालथ झाली होती. इतकी सुरेख टिप्पणी त्यानंतर माझ्या कधीच वाचनात आली नाही. आजही मी तो व्हिडिओ फक्त ते वाक्य वाचण्यासाठी पाहतो. याशिवाय काही साधी वाटणारी वाक्यंही आपल्या लक्षात राहतात. गुरुत्वीय लहरींवरच्या व्हिडिओच्या सुरुवातीला असंच एक साधं वाक्य होतं; त्या लहरी मोजणाऱ्या LIGO वेधशाळेच्या संचालकाचं. ते होतं, ‘आत्ता मला आईन्स्टाईनच्या चेहरा बघायला आवडेल’ इतकंच, पण त्याच्यामागच्या इतिहासामुळे ते महत्त्वपूर्ण ठरतं. आईन्स्टाईनने कृष्णविवरे अस्तित्त्वात असूच शकत नाहीत अशी एक कळकळीची आशा जाहीरपणे व्यक्त केली होती, आणि २०१५ साली या गुरुत्वीय लहरींच्या मोजमापामुळे त्यांचं अस्तित्त्व कायमचं सिद्ध झालं होतं. त्यामुळे त्याचा चेहरा मलाही बघायला आवडला असता. हा इतिहास मला त्या वाक्याबद्दल उत्सुकता वाटली म्हणूनच मी शोधून काढला, आणि आजही स्वर्गात बसून ज्या विश्वात कृष्णविवरे आहेत त्याचा भाग नसल्याचा आनंद साजरा करणाऱ्या त्या महान माणसाचा विचार करून मला मजा वाटते.
याशिवाय काही व्हिडिओ मुद्दाम वेगळेच काढलेले असल्यामुळे लक्षात राहतात. माझा एक विशेष आवडता व्हिडिओ आहे ‘फ्रॅक्टल्स’ वरचा. फ्रॅक्टल्स म्हणजे एकाच पॅटर्नची अगणित वेळा पुनरावृत्ती करून तयार केलेलं चित्र. त्याचा परिणाम असा होतो की ते कितीही झूम करून पाहिलं तरी तेच दिसत राहतं. यांच्यावरचा व्हिडिओ त्यांनी एका काल्पनिक कथेच्या रूपात केला आहे, ज्यामध्ये एक गुप्तहेर एका रहस्यमय स्त्रीची मदत करण्यासाठी काहीतरी शोधायला जातो आणि तिथे त्याला तीन कोडी घातली जातात, आणि प्रत्येक कोड्याच्या उत्तरातून एक फ्रॅक्टल निर्माण होतं आणि आपल्याला आपोआपच त्याचे गुणधर्म कळतात. ती कोडी म्हणजे ‘मला असा आकार दाखव जो सर्वबाजूंनी बंद आहे पण ज्याचं क्षेत्रफळ शून्य आहे’ अशा प्रकारची. ती छोटीशी कथाही अतिशय विनोदी आहे. शिवाय त्या गुप्तहेराचे नाव ‘मॅनी ब्रॉट’ म्हणजेच एका सुप्रसिद्ध फ्रॅक्टल चित्रकाराच्या, बेनोईट मँडेलब्रॉट याच्या नावाचा अपभ्रंश ठेवणे हा झाला डोकेबाज विनोद, शिवाय त्या कलाकाराला वंदनही! या व्हिडिओच्या शेवटी असं घडतं की त्या गुप्तहेराला ती स्त्री हीच एक मनुष्यरूपी फ्रॅक्टल असल्याचं कळतं आणि तिच्या अगणित सर्वव्यापी पॅटर्न्समध्ये तो हरवून जातो. जाताजाता तो आपल्याशी दोन शब्द बोलून जातो. “तुम्हाला फ्रॅक्टल म्हणजे काय ते जाणून घ्यायचंय? फ्रॅक्टल म्हणजे आपली स्वप्नं ज्यापासून बनवलेली असतात ते!” हे त्याचं वाक्य आपल्याला व्हिडिओ संपल्यानंतरची कितीतरी मिनिटे रोमंचाने थरथरणाऱ्या अवस्थेत सोडून जातं.
यूट्यूब हे जरी माहिती लोकांपर्यंत पोचती करण्याचं एक महत्त्वाचं साधन असलं तरी त्याच्यावर अगदी कोणीही व्हिडिओ टाकू शकत असल्यामुळे बऱ्याचदा यूट्यूबवर पाहिलेल्या एखाद्या व्हिडिओत सांगितलेल्या माहितीच्या खरेपणावर शंका घेतली जाऊ शकते आणि ते योग्यच आहे. त्यामुळे यूट्यूबचा उपयोग खरंच माहिती मिळवण्यासाठी करायचा असेल तर तो व्हिडिओ टाकणाऱ्या व्यक्तीची किंवा संस्थेची विश्वासार्हता आधी तपासून घ्यावी लागते. TED Edच्या बाबतीतली ही एक चांगली गोष्ट आहे की त्या संस्थेकडे येणाऱ्या सगळ्या material चे ते अगदी काटेकोरपणे स्क्रीनिंग करत असल्यामुळे त्यांच्या चॅनेलवर उपलब्ध झालेल्या व्हिडिओला आपण विश्वासार्ह मानू शकतो. त्यांच्या रचनेनुसार, कोणत्याही ‘educator’ने त्यांना व्हिडिओसाठी लागणारी माहिती पुरवायची किंवा दुसऱ्या शब्दांत, एक छोटासा ‘धडा’ लिहून पाठवायचा, मग त्यायोग्य ॲनिमेशन ते स्वतः करतात आणि त्यांच्याच टीमपैकी एकजण तो धडा ‘narrate’ करतो. यामुळे कामाची विभागणी अगदी योग्य प्रकारे होते, कारण त्या संस्थेच्या टीमला व्हिडिओसाठी content मिळवण्यासाठी खूप खोलात अभ्यास करावा लागत नाही आणि त्या विशिष्ट विषयाच्या तज्ञांना व्हिडिओ तयार करण्याची कलाही अवगत असावी लागत नाही. यच्चयावत सगळ्या विषयांना हात घालणं आणि तेही अगदी जबाबदारीने, या दुहेरी कामगिरीमधल्या TED Edच्या यशाचे हेच रहस्य आहे.
आपला अभ्यासाचा, कामाचा विषय कुठलाही एक असला तरी कुतूहल मात्र आपल्याला कशाविषयीही वाटू शकतं, आणि माझ्या मते आपल्या माणूसपणाची ती एक महत्त्वाची खूण आहे. पण प्रत्येक गोष्टीत आपल्याला स्वतः पिच्छा पुरवून आपली तहान भागवण्याची सवड नसते आणि कुवतही! अशा वेळी या TED Ed सारख्या काही लक्षणीय उपक्रमांमुळे आपली ती तहान भागतेही, आणि टिकूनही राहते. त्यांचं ब्रीदवाक्य, ‘Lessons worth sharing,’ यावरच शिक्कामोर्तब करतं. चला, आता पुष्कळ बोलणं झालं. त्यांच्या ‘Think Like A Coder’ या सुरेख मालिकेचा नववा भाग आत्ताच आलाय, त्यामुळे पळतो! तुम्हीही पुढच्या वेळी यूट्यूबवर आलात की एक चक्कर इकडे टाकून बघा. पाच मिनिटांच्या या विश्वात तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी असेल!
आदित्य,तुझी भाषा ,कल्पना,
ReplyDeleteतर्कशुद्ध मांडणी या सगळ्याला
माझा सलाम!!!
अप्रतिम वर्णन। पाहतो मी पण आता।
ReplyDelete