Dubai Diaries Special Edition: मायानगरी


किरणे कोवळी पहाटेची सर्वत्र चढवती सुवर्णाचा थर
दिपून जाई त्या प्रकाशात ते कमलपुष्प त्या मरुभूमिवर 
सुरेख द्वीप ते पर्णरूपी, स्मिताने त्यास वंदन करी 
अन् खुल्या हातांनी, आतुरतेने वाट पाहते मायानगरी

सागरतीरी या शतकापूर्वी उभी लहानशी कुटी दिसे
सागरात दूर एका नावेत जाळी टाकत रहिवासी तिचे 
नावा असती आजही, परि सर्व आता मौजेचे साधन 
अन् तीरावरील इमारती साऱ्या घेती गगनाचे चुंबन
जाळी आहेत आजही परि एका चौकटीपलीकडे 
सर्वांना या इमारतींचेच दर्शन आज प्रथम घडे 
गगनभेदी त्या वास्तूंत साऱ्या हरवली ती कुटी खरी
अन् अस्तित्त्व तिचे एकेकाळचे, मनात ठेवते मायानगरी 

जोपासला तिने नेटाने आजवर छंद हा नवनिर्मितीचा 
अविष्कारांनी भूषविला गेला कण कण त्या रेतीचा
कमलपुष्पासह रचना एवढ्या झेप घेती गगनाकडे 
अन् अवकाशातून नजर फेकता पर्णद्वीप दृष्टीस पडे
रुपडे आजचे तिचे असे की काढावी कोणीही दृष्ट  
परि ध्येय तिचे सौंदर्य नसे; असे ते सर्वोत्कृष्ट  
निःशंक तिच्या या सौंदर्याची करते स्तुती दुनिया सारी 
अन् आजही केवळ स्वतःशीच, स्पर्धा करते मायानगरी 

पराकाष्ठा सुसह्यतेची आहे जीवनास इथल्या लाभली 
रहिवाश्यांनी या अनेक वर्षे गोडी सुविधांची चाखली
 आनंदाने जीव इथला दिसभर चोहीकडे धावे
अन् सायंकाळी बागेत एका वृक्षाखाली शांत विसावे 
वास्तव्याचा काहींच्या इथल्या झाला आता अखेर अंत
सुखासाठी तयांच्या नसे मायानगरीला आता उसंत 
पूर्तता झाल्यावर कर्माची जाती सर्व आपुल्या घरी 
अन् रिक्त मनाने त्या सर्वांना निरोप देते मायानगरी

अतिसुंदर, परि आभासात्मक असे हे जग सारे
नैसर्गिक केवळ वालुकाच आणि तिच्यावरील नभातले तारे   
पर्णद्वीप सुरेख आहे तेही कृत्रिमरीत्याच एकसंध 
अन् हिमपर्वतही खोटा इथला सदैव इमारतीमध्ये बंद
परि रचनांतून या डोकावते नगरीची या कल्पकता
कृत्रिम असू दे कदाचित परंतु नसावी कुठली कमतरता
हीच जिद्द मिळाल्या हर संधीचे मग सोने करी
अन् म्हणूनच आजही हजारोंना आकृष्ट करते मायानगरी 

किरणे सौम्य सूर्यास्ताची पुन्हा फिरवती सुवर्णाचा थर 
उजळे मग स्वप्रकाशात ते कमलपुष्प त्या मरुभूमिवर 
सुरेख द्वीप ते सहस्त्र दिव्यांनी रात्रीचे त्या स्वागत करी
अन् खुल्या हातांनी, पुन्हा एकदा वाट पाहते मायानगरी  

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प