Dubai Diaries: नजराणा



IMG World of Adventures मध्ये एकापेक्षा एक अविस्मरणीय अनुभव घेऊन झाल्यानंतर तसा एक छोटासा ब्रेक घेणं अगदीच हवंहवंसं वाटत होतं. दुबईत येऊन तीन दिवस झालेले होते आणि तिन्ही तसे बऱ्यापैकी गडबडीचे ठरलेले होते, तसेच ते काही अकल्पित आणि अद्भुत गोष्टींनीही भरलेले असल्यामुळे आता एक दिवस काहीही बेत न आखता, फक्त मनात येईल तशी मजा करून घेण्यासाठी राखीव असावा असं मला वाटतच होतं. काका-काकूलाही बहुतेक असंच वाटलं असावं, आणि म्हणूनच दुबईतला आमचा चौथा दिवस कोराच ठेवण्यात आलेला होता. खरं तर पहिल्या दिवशीही आम्ही तसे स्वतंत्र होतो, पण तरी एका पातळीवर आमची झेप बिग बसच्या मार्गांपर्यंतच मर्यादित होती. आज एकतर आमचा मार्ग आम्ही ठरवू शकत होतो, शिवाय पहिल्या दिवशी बऱ्यापैकी सगळं पाहून घेतल्यामुळे ‘दुसऱ्यांदा कुठे जायचंय’ या प्रश्नाचं उत्तर देणं तेवढं बाकी होतं. तसंच यानंतरचा दिवस हा माझ्या दृष्टीने तरी सबंध ट्रीपमधला हायलाईट असल्याने आजचा हा ‘बेत नसलेला बेत’ मला विशेष आवडलेला होता. 
सकाळी काकाने आम्हाला दोन कार्ड्स दिली. पूर्वी सिंगापूरमध्ये एकदा अशी कार्ड्स वापरल्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये तिकिटं काढण्याला असलेल्या या अत्यंत कार्यक्षम पर्यायाशी परिचय झालेला होताच. आपल्या इतर कुठल्याही कार्डप्रमाणेच यांच्यात एक ठराविक रक्कम भरलेली असते. मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश केल्यावर तिथल्या लोखंडी खांबांवर हे कार्ड फिरवून त्याची नोंद करता येते, तसंच ज्या स्टेशनवर आपण उतरतो तिथेही असाच प्रकार करून आपण बाहेर पडतो. या अंतराच्या प्रवासाचा खर्च आपोआप त्या कार्डमधून वजा केला जातो. शिवाय, त्या खांबांना न ओलांडता मेट्रोतून फिरता येतच नसल्यामुळे ‘तसे’ काही प्रकार घडणंही शक्य नसतं. आता सगळ्या मेट्रो यंत्रणांमध्ये अशीच पद्धत असल्याचं माहित होतं, पण इथे नंतर हाच प्रकार बसच्याही बाबतीत पाहिला. तशी आपल्याकडे बस यंत्रणेतही जाणवण्यासारखी सुधारणा होत आहेच; पूर्वीच्या लाल-पिवळ्या तिकिटांच्या तुकड्यांऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मशिनमधून तिकिटं काढण्याची पद्धत सगळ्याच बसेसमध्ये सहज पसरली आहे, तेव्हा ही पुढची पायरीही लवकरच येईल असं तेव्हा वाटून गेलं. तोपर्यंत आम्ही चालत आता ओळखीच्या झालेल्या मॉल ऑफ द एमिरेट्सपाशी पोहोचलो. 
हा मॉल ओलांडून एकदा का त्याच्या मेट्रो स्टेशनमध्ये शिरलो, की सगळी दुबई आमच्या हाताशी येणार होती. याच उत्साहात आम्ही ते अजस्त्र चक्रव्यूह पुन्हा एकदा पार केलं आणि तिसऱ्या मजल्यावरच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना ओलांडून त्या स्टेशनकडे नेणाऱ्या बंद बोळात पहिल्यांदाच पाय ठेवला. तो बोळ पुढे संपूर्ण काचेचा झाला आणि त्यामुळे त्यातून बाहेरचं बघत बघतच आम्ही शेख झायेद रोड आकाशातूनच ओलांडला आणि त्या स्टेशनवर पोहोचलो. स्टेशनही उंचावरच बांधलेलं होतं, हे सांगणे नलगे. 
“नाही पण बाहेर पडताच कशाला?” हा दुबईचा आल्यागेल्याला एक ठरलेला प्रश्न आहे. थंडीचे दिवस असताना, सूर्य असह्य वाटत नसताना आणि धुळीची वादळं वगैरेही नसताना पण इमारतीच्या बाहेर पडायचंच कशाला? शक्य तिथे सगळं एकमेकांना जोडून मोकळं व्हायचं! त्यानंतर मुख्य शहरात आम्ही जितक्यांदा फिरलो त्या सर्व वेळा आम्हाला ही वरून, खालून, आतून वगैरे जोडण्याची रचना वारंवार दिसली. बोगद्यांचं मला तसं आधीपासून (बांधकाम क्षेत्रातल्या अनेक डोकेबाज गोष्टींप्रमाणेच) खूप आकर्षण वाटायचं, आणि म्हणूनच हे एवढं अफाट पसरलेलं शहर सगळं जमिनीखालून जोडलेलं आहे या नुसत्या कल्पनेचं मला खूप भारी वाटलं होतं. तसं ते संपूर्ण जोडलं नव्हतंच, हे तर उघड आहे. पण काही म्हणा, हे शहर कमालीच्या शिस्तीने आणि पूर्वविचाराने घडवण्यात आलेलं असल्याचं पावलापावलाला जाणवत होतं एवढं खरं. एक भलामोठा हायवे, त्याला सगळ्या बाजूंनी सर्व्हिस रोड्स, जे दर काही मीटर्सनंतर आतमध्ये वळून इमारतींच्या गर्दीत लुप्त होत किंवा मग पुलांमध्ये रूपांतरित होऊन चिक्कार वळणं घेऊन इकडेतिकडे जात. बाहेरून इमारतींची गर्दी जरी वाटत असली, तरी त्या गर्दीत खोल शिरल्यावर असं वाटतं की एका मोठ्या ठराविक आकाराचे चौकोन असलेल्या पटावर आलो आहोत, जिथे प्रत्येक रस्ताच नाही तर वळणंही आखून ठेवलेली आहे. आतल्या मोठ्या रस्त्यांमधून मधूनच एक लहानशी ट्रॅम (तिलाही ‘दुबई ट्रॅम’ असं संघात्मक नाव) सुळकन निघून जाई तेव्हा उरलेला सगळा रस्ता थिजल्यासारखा. प्लॉटच्या मध्यभागी उंच इमारत असून तिच्या आजूबाजूला भिंती, छोट्या दुकानवजा इमारती; जेणेकरून मोठ्या इमारती कधीच रस्त्याला येऊन भिडू नयेत. पलीकडच्या ‘शेख मोहंमद बिन झायेद रोड’ या दुसऱ्या मोठ्या रस्त्यावर आणि आजूबाजूलाही सगळं असंच. थोडक्यात, दुबई ही एक कार्यक्षम कृत्रिम ecosystem आहे, आणि खऱ्या ecosystems प्रमाणेच तिच्या लहानांत लहान घटकातही त्या संपूर्ण यंत्रणेचं प्रतिबिंब दिसतं. 
मेट्रो सुटली. सकाळची मस्त नऊ-साडेनऊची वेळ होती. आरामात कामावर निघालेले काही लोक डब्याच्या काचेतून येणाऱ्या उन्हाच्या उजेडात निवांतपणे पेपर वाचत होते. मेट्रोचे रूळ शेख झायेद रोडला समांतर असल्यामुळे एका बाजूला इमारती आणि दुसऱ्या बाजूला तो आत्ताही गजबजलेला रस्ता दिसू शकत होता. मधूनच एक पुलांचं जाळं येई, मग मेट्रोचा पूल एका वळणदार पुलाच्या वरून गेला की खाली सगळ्या गाड्या वळून दुसऱ्या रस्त्यांना लागताना दिसत. ते पाहतोय तोवर त्याच जाळ्यातला दुसरा एक पूल मेट्रोच्या वरून जाऊन तात्पुरती सावली देई. मेट्रोचा पूलही एक आडवा रॉड नसल्याने या जाळ्यांच्या मधून वाट काढायला तोही योग्य तिथे वळत होता, मधूनच वर-खालीही जात होता. एखाद्या हौशी मुलाने त्याच्याकडच्या खेळण्यांतून एक खऱ्यासारखं शहर उभारावं आणि त्यात पुलांची नक्षी काढून त्याच्यावरून कौतुकाने खेळण्यातल्या गाड्या फिरवत बसाव्यात - तसं माझं झालं होतं. मग बाबांनी सांगितलं की ही मेट्रो चालकरहित असल्याने, हिच्या तोंडाच्या भागातही बसण्याची सोय होती. हे कळल्यावर मी लगेच अगदी पुढे जाऊन बसलो आणि मेट्रोच्या समोरच्या खिडकीतून रुळांना डोळ्यांसमोर आकार घेताना पाहत राहिलो. तिथे बसून ते पाहिल्यावर पूर्वी एका ‘ट्रेन सिम्युलेटर’ नावाच्या गेममध्ये इंजिनमध्ये बसून ‘Driver Mode’ चालू करून बसायला मला का आवडायचं ते अचानक लक्षात आलं. खिशातलं कार्ड हलकं होत असल्याची भावना मनात नसती तर मी दिवसभर नुसता तसाच बसून राहू शकलो असतो, पण आता टोकाला कुठेतरी उतरायचं तर होतंच. बाबांनी कुठे ते विचारल्यावर माझ्या मनात क्षणभर मघाशी खिडकीतून पाहिलेल्या, गडद हिरव्या रंगाच्या काचांनी मढवलेल्या देहावर कोवळं ऊन पडल्यामुळे अधिकच खुलून दिसणारी ‘शेराटन ग्रँड’ची मोठी इमारत चमकली, आणि ‘मरिना’ हे उत्तर अगदी सहजपणे माझ्या जिभेवर आलं. 
“तू ज्या प्रकारे गगनचुंबी इमारतींच्या सौंदर्याचं वर्णन करतोस त्या प्रकारे कुठल्या मुलीची कधी स्तुती केली असतीस तर आत्ता साखरपुडा झालेला असता तुझा!” असं माझ्या एका मित्राने मला एकदा काहीसं वैतागून सुनावलं होतं. त्याला काय कळणार म्हणा!   
मरिनामध्ये सकाळचा बहुतेक सगळा वेळ घालवता यावा म्हणून मग आम्ही पहिली भेट दुबई विमानतळाला दिली. स्टेशनमधून चारपाच सरकत्या जिन्यांनीच आम्हाला थेट इमारतीच्या आत आणून सोडलं. विमानतळ हा विमानतळ असल्याने त्याचा अर्धाअधिक भाग आमच्याकडे तिकीट नसताना पाहणं शक्यच नव्हतं, म्हणून आम्ही त्या महाकाय लॉबीतच फेरफटका मारून परत त्याच स्टेशनवरून पुढे मरिनाकडे निघालो. मरिनाजवळच्या कुठल्यातरी स्टेशनवर उतरलो आणि परत बाहेर पडताना त्या खांबावरून कार्ड्स फिरवली. त्यानंतर ती एका ATM सदृश यंत्रात खुपसून पाहिल्यावर बॅलन्स पाच दिऱ्हम्सनी कमी झालेला दिसला. मग त्या सुबक अंडाकृती काचेरी इमारतीतून बाहेर पडून आम्ही मरिना भागात दुसऱ्यांदा पाऊल ठेवलं. तरी मागच्या वेळेपेक्षा यावेळेस आम्ही दुसऱ्या भागात होतो. मागच्या वेळी खाडीच्या काठाकाठाने आम्ही मरिनाच्या अंतरंगातून फेरफटका मारला होता आणि उलट्या पावली परत आलो होतो. तेव्हा तशी घाई होती म्हणा. आज मात्र आम्ही त्या संपूर्ण भागाला एक गोल चक्कर मारायचं ठरवून त्याच्या बाहेरच्या रस्त्यांवरूनच फिरायला निघालो. मरिना भागाचा आकार तसा लंबवर्तुळाकार आहे, आणि त्याच्या मध्यभागातून खाडी जाते. या खाडीच्या दोन्ही बाजूंना उंच इमारतींचा तो जगातला सगळ्यात कॉन्सन्ट्रेटेड संकुल उभा आहे. आता इथे हे मान्य करायला हरकत नाही की नुसताच तो समूह काही फार देखणा दिसत नाही, कारण मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे गगनचुंबी इमारत स्वतंत्रपणेच सुंदर दिसते. त्यामुळे तेव्हा आम्ही या भागाच्या परिघावरून फिरून त्यातल्या काही खास इमारतींसमोर जास्त वेळ घालवायचं ठरवलं.



किमान अर्धा तास तरी आम्ही त्या अशक्य रुंदीच्या फुटपाथवरून डावीकडे बघत चालत असू. डावीकडची सगळी बाजू दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींनी एवढी भरून गेली होती की डोंगराच्या कड्यावरच्या पायवाटेवरून पुढे सरकत असल्याचा भास होत होता. या इमारतींना एका दृष्टीक्षेपात सामावून घेताना जरा कष्टच पडत होते. त्यांच्या एवढ्या जवळून पहिल्यांदाच चालताना बाबांमधल्या हौशी फोटोग्राफरला अचानक जाग आली आणि एक नवीन प्रयोग करण्यासाठी आम्ही सज्ज झालो. 
लांब रस्त्यावरून एखादा डोंगर पाहणं, आणि अगदी त्याच्या पायथ्याशी उभं राहून मान वर करून त्याच्याकडे पाहणं यात (शब्दशः) जमीनअस्मानाचा फरक असतो, नाही का? लांबून पाहताना तो केवळ एक उंचवटा वाटतो, पण त्याच्या आकाराचं, विस्ताराचं आणि बलाढ्यतेचं खरं दर्शन पायथ्यावरूनच होऊ शकतं. डोळ्यांसमोर पसरलेल्या त्या विशाल रचनेच्या दृश्यानेच केवळ खुजेपणाची भावना मनात खोलवर शिरत जाते. आता आकारमानाच्या बाबतीत डोंगर आणि गगनचुंबी इमारत यांची तुलना होऊच शकत नाही, पण तरी तिच्या अगदी समोर उभं राहिलं तरी काही प्रमाणात हाच इफेक्ट जाणवतो खरा. तोच इफेक्ट capture करण्यासाठी बाबांनी कल्पना सुचवली ती अशी : मी तिच्यासमोर उभं राहायचं आणि त्यांनी खाली बसून कॅमेरा तिरपा करून माझा फोटो काढायचा. नंतर फोटो पाहताना हे सगळं विशेष जमून आल्याचं मला जाणवलं, कारण त्यांच्या सूचनेनुसार मी लेन्सकडे खाली वाकून पाहत असल्यामुळे, मी आणि माझ्यामागे उभी असलेली ती असे दोघंही खाली बघत असल्यासारखं वाटत होतं. काहीकाही इमारतींसाठी बाबांना चक्क मांडी घालून खाली बसावं लागलं. मग उरलेला वेळ आम्ही आळीपाळीने एकमेकांचे तशा प्रकारे फोटो काढत राहिलो. दुसऱ्या दिवसाच्या फोटोंसाठी हा जणू सरावच होता! 




त्या दिवशी आमच्या या फोटोंसाठी तिथल्या सगळ्या इमारती उभ्या राहिल्या, पण माझ्या विशेष लक्षात राहिल्या त्या त्यापैकी दोनच. एकीबद्दल मला पूर्वीपासून माहिती होती. ती होती ‘प्रिन्सेस टॉवर’ नावाची शंभर मजली गगनचुंबी इमारत, जी सध्या जगातली सर्वांत उंच निवासी इमारत आहे. (हा मान लवकरच मुंबईतली ‘वर्ल्ड वन’ पटकावणार असल्याचं नंतर कळलं) सर्वात उंच इमारत म्हणून बुर्ज खलिफाला सम्राटाची उपमा दिली जात असल्यामुळे, हा ‘सर्वात उंच निवासी इमारत’ नावाच्या एका दुय्य्म किताबाची मानकरी असल्यामुळे हिला ‘प्रिन्सेस’ हे नाव देणंही सयुक्तिक वाटतं. एकूण इमारतींच्या जगातल्या राजघराण्यातल्या मंडळींनाही दुबई प्रिय दिसतेय! त्यानंतर एका मॉलमध्ये पाहिलेल्या एका मॉडेलनुसार, राणीचंही बांधकाम सध्या सुरु आहे म्हणे!
पण दुसरी इमारत अगदी विलक्षण होती. तिला पहिल्यांदा पाहिल्यावर, गुलाबांच्या ताटव्याकडे बघत असताना त्यात मध्येच अनपेक्षितपणे एखादं केवड्याचं फूल सापडावं तसं झालं. स्टीलच्या जाळीपासून बनवलेला अजस्त्र चौकोनी खांब कोणीतरी मध्यभागी पिळून तसाच उभा करावा तशी ती दिसत होती. तिची चक्राकार रचना एवढ्या बारकाईने जपण्यात आलेली होती, की एखाद्या मजल्याकडे टक लावून पाहता तो जमिनीकडे झुकतोय असा भास होई. पहिल्या नजरेत कुणालाही ती पिसाच्या झुलत्या मनोऱ्याचे नवीन रूप वाटेल, पण नीट बघितल्यावर ती कुठल्याच बाजूला झुकत नसल्याचं कळतं. हिची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ही थेट फुटपाथवरच उभी होती. बाकीच्या बहुतेक सगळ्या इमारतींच्या तळाशी त्यांचा विस्तार वाढवणारी काही मोठाली दुकानं आणि शोरूम्स होत्या, त्यामुळे त्या मूळ इमारतीच्या भिंती आमच्यापासून खूप लांबवर होत्या. हिचं मात्र असं काहीच नव्हतं. मी सरळ तिच्या दरवाज्याकडे जाऊन तिच्या त्या सुबक स्टीलच्या जाळीदार नक्षीला हात लावू शकलो असतो. पण तिथून वर पाहिल्यावर मात्र चक्करच आली असती. आधीच प्रचंड उंच, त्यात इतकी जवळ, त्यात गिरक्या घेणारी! 




तिच्यानंतर एकही मोठी इमारत नव्हती; रस्ताच वळून खाडीवरून पलीकडे जात होता. त्यावरून आम्हीही चालत जाऊन खाडी ओलांडली आणि ‘पैलतीरावरून’ पुन्हा एकदा या ‘कयान टॉवर’ नावाच्या सुबक इमारतीकडे पाहत बसलो. लांबूनही ती खूप सुंदर दिसत होती. ती अजिबात झुकत नसली तरी, तिच्या गोलाईमुळे ती आजूबाजूच्या नाही म्हटलं तरी आयताकार असलेल्या सगळ्या इमारतींत उठून दिसत होती. पूर्वी पिसाच्या मनोऱ्याला लोक आधार देत असल्याचा आभास निर्माण करणारे त्यांचे लांबून काढलेले ट्रिक फोटो आठवून मीही हिला भोवऱ्यासारखं फिरवत असल्याचा आभास निर्माण करणारा एक फोटो काढून घेतला. कॅमेराच्या दोन्ही बॅटरीज संपेपर्यंत फोटो काढावेसे वाटत होते, पण आता जेवायची वेळ जवळ आल्यामुळे मरिनाला निरोप देणं भाग होतं. जाताजाता मी पैलतीरावरच्या सगळ्या इमारतींचा फोटो फोनमध्ये काढला. घरी परत जाऊन ते नीट पाहिल्यावर, त्यात कयान टॉवर ग्रुप फोटोत येण्यासाठी मुद्दाम वाकून डोकावत असल्याचा भास होत होता असं लक्षात आलं. 
जेवणासाठी नेहमीच्या मॉल ऑफ द एमिरेट्सला न येता आम्ही आमची मेट्रोची सुविधा वापरून जरा दूर असलेल्या ‘इब्न बतुता’ मॉलमध्ये गेलो. त्या मॉलमध्ये काही विशिष्ट देशांचे विशिष्ट विभाग वगैरे केलेले होते. भारताचाही विभाग होताच, त्यातल्या बोळांच्या भिंतींना नक्षीकामाने सजवलेलं होतं. या विभागाच्या मुख्य आवारात एक मोठा हत्ती आणि त्यावर लाल फेटा बांधलेला माहूत यांची मूर्ती वगैरे होत्या, आणि त्या सगळ्या आवाराला एखाद्या राजस्थानी महालाचं स्वरूप दिलेलं होतं. सगळा खटाटोप वाखाणण्यासारखा होता, पण भारत म्हणजे सगळं राजेशाही हे समीकरण त्यांच्याही मनात बसल्याचं नजरेतून सुटत नाही. चीनच्या विभागात नव्हते का ड्रॅगन्स आणि लाल कंदील? पण यावरून, भारताच्या इतिहासाला, विस्ताराला आणि वैविध्यतेला समजून घेण्यात दुबई कमी पडली हा माझा समज मात्र नंतर ग्लोबल व्हिलेजने दूर केला. 
त्यानंतर परतीच्या वाटेवर एका स्टेशनपर्यंत जायला ट्रॅममध्येही बसून झालं तेव्हा त्या अनुभवाला एक पूर्णत्व प्राप्त झालं. तुलनेने आज आम्ही खूपच लवकर घरी पोहोचलो होतो. मग मी माझी बहीण शाळेतून घरी येईपर्यंत काकूच्या कपाटात मला सापडलेल्या ‘द मेझ रनर’ नावाच्या कादंबरीत डोकं खुपसून बसलो. उरलेला सगळा दिवस घरीच आरामात घालवला. रात्री अंथरुणावर पडल्यावर असं एकदा वाटलं, की जरा अजून लांबवर भटकलो असतो… दिवस मोकळा होता आणि बिग बसच्या मार्गावर नसलेले दुबईचे अनेक भाग होते असं त्यांनीच दिलेला नकाशा सांगत होता. पण मग म्हटलं, सगळा उपलब्ध वेळ काहीतरी बघण्यात घालवलाच कशाला पाहिजे? सकाळी मरिनामध्ये वेळ झकास गेला होता, मेट्रोमधून मनसोक्त फिरून झालं होतं आणि अजून एक मॉल ओलांडला गेला होता, मग झालं तर! आणि घरात असो वा बाहेर, प्रत्येक लहानसहान अनुभव किंवा घटना दुबईच्या एकूण सगळ्या कहाणीचा भाग होते, आणि अगदीच काही खूप महत्त्वाचं राहून जात नसेल तर जरा आराम करावा, त्या कहाणीला घडायचं तसं घडू द्यावं. या विचाराने समाधान होऊन मी झोपायचा प्रयत्न करू लागलो. 
अचानक कुठूनतरी उद्या काय आहे त्याची आठवण हळूच येऊन गेली आणि त्या विचाराने झोप उडू नये म्हणून मी डोळे गच्च मिटून घेतले. आयुष्यात पहिल्यांदाच, आता कुठलंही स्वप्न पडू नये आणि झोप चटकन संपावी अशी मी आपणहून इच्छा करत होतो.    

The Dubai Diaries continue on DDSE1

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प